सुवर्णप्रभा..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
21 Jan 2009 - 6:11 am

लाल केशरात रंग खेळते पहाट खास
दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस...

तारकांत लोपली निशा उषेस पाठवून
अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस...

सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...

थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ...

सागरात गाज आणि लाट जात उंच उंच
गारवा हवेत आणि वेड लागते मनांस...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...

- प्राजु

वृत्त : गा ल गा ल * ४

कवितागझलआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मीनल's picture

21 Jan 2009 - 6:20 am | मीनल

साक्षात सुवर्णप्रभा अनुभवली ती ही शब्दातून.
ग्रेट.

मीनल.

सहज's picture

21 Jan 2009 - 7:22 am | सहज

कविता गेय आहे.

गायला मजा आली.

:-)

वाहीदा's picture

21 Jan 2009 - 11:16 am | वाहीदा

सहज काका,
>> कविता गेय आहे.
How a poem can be GAY ?? :-(
confusing statement :-(
~ वाहीदा

घाटावरचे भट's picture

21 Jan 2009 - 12:36 pm | घाटावरचे भट

>>How a poem can be GAY ??
वाहिदाजी.....गैरसमज!! लैच मोठ्ठा गैरसमज.
'गेय' म्हणजे गाण्यास योग्य, म्हणजेच जी कविता एखाद्या तालात, सुरावटीत म्हणता येईल अशी, सुसूत्र रचना असणारी.
'वाचनीय', 'श्रवणीय', 'प्रातःस्मरणीय' इत्यादी शब्दांसारखाच 'गेय' हा शब्द आहे. विंग्रजी 'गे'शी त्याचा संबंध नाही.

बेसनलाडू's picture

10 Mar 2009 - 11:22 pm | बेसनलाडू

असाही अर्थ आहेच. त्यामुळे कविता gay असण्यासही प्रत्यवाय नसावा.
(आनंदी)बेसनलाडू

चंबू गबाळे's picture

15 Feb 2009 - 1:49 pm | चंबू गबाळे

How a poem can be GAY ??
=)) =)) =))

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

विसोबा खेचर's picture

21 Jan 2009 - 7:35 am | विसोबा खेचर

कविता छान आहे पण,

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

ह्या ओळी सहजसोप्या वाटल्या. अन्य ओळी जरा जरा शब्दजड आणि कठीण वाटल्या..

तात्या.

संदीप चित्रे's picture

21 Jan 2009 - 8:31 am | संदीप चित्रे

पहिलीच ओळ एकदम आवडेश :)

>> वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...
>>सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

हे सुद्धा खूप छान जमलंय.... विशेषतः 'विश्वतीर पेटताच' ही शब्दरचना खूप छान जमलीये प्राजु.

शीर्षक समर्पक आहे :)

जृंभणश्वान's picture

21 Jan 2009 - 10:17 am | जृंभणश्वान

मस्तच आहे .
आम्हाला तर बुवा, ‘फिटे अंधाराचे जाळे’ आठवले एकदम :)

मऊमाऊ's picture

21 Jan 2009 - 10:50 am | मऊमाऊ

सुरेख कविता आहे प्राजु ! तुझे थोडे जुने साहित्यही शोधून वाचले..ते पण आवडले.

झेल्या's picture

21 Jan 2009 - 11:03 am | झेल्या

निशा, प्रभा , उषा ...... एकदम सुंदर. :)
'सकाळ' ची कविता वाचली की 'पितात सारे गोड हिवाळा' ची आठवण होते...!

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

वृषाली's picture

21 Jan 2009 - 12:42 pm | वृषाली

सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

फार सुंदर.

अंकुश चव्हाण's picture

21 Jan 2009 - 2:13 pm | अंकुश चव्हाण

कविता सुन्दर आहे यात प्रश्नच नाही. पण जर

दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस...

या शब्दास एखादा पर्यायी शब्द वापरला असता तर आणखी मजा आली असती. कारण तुमच्या कवितेतील सर्व शब्द एका थराविक साच्यातील आहेत ज्यांमध्ये फाकताच हा शब्द बसत नाही.

लहान तोंडी मोठा घास घेतला आहे त्याबद्दल क्शमा करा.

अंकुश चव्हाण.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2009 - 3:08 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर. नजरेसमोर उभे राहिले वातावरण.

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

21 Jan 2009 - 6:46 pm | विजुभाऊ

बरेच दिवसानी प्राजु उगवली. छान ल्हिले आहेस

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

राघव's picture

21 Jan 2009 - 6:48 pm | राघव

काय लिहिलेयस प्राजु! अभिनंदन!! संपूर्ण कविताच सुंदर. त्यातही -

सागरात गाज आणि लाट जात उंच उंच
गारवा हवेत आणि वेड लागते मनांस...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...

हे अगदी खास.. बोले तो, झकाSSSSSSSSस!

शब्द अगदी सहज आल्यासारखे वाटताहेत.. एका दमात लिहून काढलीयेस का काय पूर्ण कविता?? चालही छान बसतेय.. :)

मुमुक्षु

अनामिक's picture

21 Jan 2009 - 6:52 pm | अनामिक

थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास?

कविता अगदी मस्तच आहे, पण वरच्या ओळी खूप आवडल्या...

अनामिक

ब्रिटिश's picture

21 Jan 2009 - 7:08 pm | ब्रिटिश

प्राजुतै, तुमची कवीता डायरेक कालजाला भिडत बगा!
सुंदर !

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

ऋषिकेश's picture

21 Jan 2009 - 7:15 pm | ऋषिकेश

कविता आवडली.. मात्रा एकदम जमून आल्या आहेत

रेवती's picture

21 Jan 2009 - 7:24 pm | रेवती

सकाळी सकाळी कविता वाचली.
खरच सुप्रभात आहे असे वाटले.
रेवती

दत्ता काळे's picture

21 Jan 2009 - 7:47 pm | दत्ता काळे

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...

वा, वा छान शब्दबांधणी

शाल्मली's picture

21 Jan 2009 - 8:29 pm | शाल्मली

मस्त झाली आहे कविता..
आवडली.
अजूनही येऊ दे लवकर..

--शाल्मली.

शितल's picture

21 Jan 2009 - 8:35 pm | शितल

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

प्राजु,
मस्तच रचले आहेस.
:)

बेसनलाडू's picture

21 Jan 2009 - 8:40 pm | बेसनलाडू

आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

धनंजय's picture

21 Jan 2009 - 9:16 pm | धनंजय

असेच म्हणतो!

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
...
थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
...
सागरात गाज आणि लाट जात उंच उंच

वगैरे ठिकाणी दोन-दोन अक्षरी पुनरुक्ती आणि अनुप्रास वृत्ताशी फारच सुंदर ठेका जुळवतात. वा! (तसे शब्द अधिक पखरायला पाहिजे होते असे वाटते - इतक्याने तृप्त झालो नाही.)

("अग्निरंग होत दंग..." चालेल का? पुढे गंधही धुंदच होणार आहेत, म्हणून इथे कुठलातरी वेगळा शब्द, वेगळी कल्पना अधिक वैविध्य देऊ शकेल.)

प्राजु's picture

21 Jan 2009 - 9:27 pm | प्राजु

अग्निरंग होत दंग..." चालेल का?
हे ही छान आहे. चालेल ना! सुचवणी आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

22 Jan 2009 - 1:11 am | चतुरंग

अतिशय गेय, नादमय आणि वृत्तबद्ध रचना.
अशाच आणखी रचनांसाठी शुभेच्छा!

चतुरंग

टारझन's picture

21 Jan 2009 - 11:28 pm | टारझन

आपल्याला पहाटेचा केशरी रंग फारंच आवडतो .
प्राजु ने शब्द लै भारी गुंफलेले आहेत ... ते वृत्त वगैरेच्या चुका आम्हाला णाय समजत ... पण वाचून अंमळ भारी वाटली .

- संध्याकाळचा उगवता चंद्र) टारझण

सुहास..सदेव हसनार्..'s picture

21 Jan 2009 - 11:33 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

हे समजले नाही..वृत्त : गा ल गा ल * ४

मदनबाण's picture

21 Jan 2009 - 11:48 pm | मदनबाण

सागरात गाज आणि लाट जात उंच उंच
गारवा हवेत आणि वेड लागते मनांस...

हे लयं आवडल बघा.. :)

(गारव्याच्या शोधात...)
मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

मैत्र's picture

22 Jan 2009 - 4:02 pm | मैत्र

मालवून टाक दीप ची आठवण झाली. त्यांच्या एका कॅसेट मध्ये अशाच वृत्तात त्यांनी कविता ऐकवली होती.
त्या तिथे फुलाफुलात पेंगते अजून रात
सावकाश घे टिपून एक एक रुप रंग

प्राजू ताई - अतिशय सुंदर कविता. छान शब्द आणि वर्णन...

प्राजु's picture

22 Jan 2009 - 8:06 pm | प्राजु

सुवर्णप्रभा आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित's picture

23 Jan 2009 - 12:46 am | आपला अभिजित

तारकांत लोपली निशा उषेस पाठवून
अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस...

तारकांत लोपली निशा
मस्तच!

सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

विश्वतीर
पण भारी! कशी काय सुचली ही कल्पना?

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

आम्र नाही कळले...

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...


`प्रभातकाल'
एक शब्द हवा.

- कविता न कळणारा,
अभिजित.

स्वाती राजेश's picture

23 Jan 2009 - 2:27 am | स्वाती राजेश

सुंदर काव्य...
वृत्त वगैरे काही माहित नाही...:)

थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ...

या ओळी खासच...

प्रमोद देव's picture

15 Feb 2009 - 12:31 pm | प्रमोद देव

इथे ऐका!

प्राजु's picture

15 Feb 2009 - 10:10 pm | प्राजु

लिहिण्यासोबतच प्रमोद काका गाते झाले हे ही बरं झालं.
चाल आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

15 Feb 2009 - 1:45 pm | आनंदयात्री

छान कविता प्राजु. रोजरोज दर्जेदार कविता देती आहेस .. धन्यवाद.

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Feb 2009 - 6:31 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजु,
हिच नव्हे तर तुझी प्रत्येक कविता अप्रतिम असते.
सुधीर फडके म्हणतात,
"हे जे माझ्या हातून होत आहे ते माझं मलाच कळत नाही.परत करीन म्हटलं तर पुन्हा असंच होईल हे सांगता येत नाही.कोण तरी माझ्याकडून करवून घेतो."
म्हणून म्हणतो,
"प्रतिभा उरी धरूनी
तू गीत लिहित रहावे"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चन्द्रशेखर गोखले's picture

11 Mar 2009 - 12:41 am | चन्द्रशेखर गोखले

काय बोलावे !! अतिशय सुंदर.....!!!!

क्रान्ति's picture

10 Mar 2009 - 5:52 pm | क्रान्ति

नपेक्षा उशीर बरा ! उशीरा प्रतिक्रिया देतेय पण कविता खूपच सुन्दर आहे. सुन्दर सोनेरी सकाळ दिसतेय समोर! मला माझा एक मित्र नेहमी म्हणतो की तू राहतेस शहरात, सीमेंटच्या जन्गलात, पण कविता मात्र लिहितेस फार्म हाउसवर रहात असल्यासारख्या! तसच वाटतय. खूप सुन्दर वर्णन आहे. मी शरण!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

पिवळा डांबिस's picture

11 Mar 2009 - 5:39 am | पिवळा डांबिस

अरेच्चा, ही कविता कशी नजरेतून निसट्ली!
छान कविता आहे प्राजु.
शब्दांची निवड मस्त आहे...
आवडली!!