घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

चेतन१२३प's picture
चेतन१२३प in जनातलं, मनातलं
17 Jan 2009 - 10:31 pm

...... श्रावण महिन्यातली ती एक साधारण सायंकाळ होती. सूर्य अस्ताला जाण्यास अवकाश होता. कदाचित काही कारणास्तव तो थांबला होता. एक्सप्रेस वे वरून गाडी एकशे साठ ते एकशे एंशीच्या वायुवेगाने समोर जात होती. सहालेनच्या त्या चिकण्या रस्त्यावर मावळत्या सूर्याचे लालसर प्रतिबिंब काळ्या शस्त्राने चिरत गाड्या चिं.... चिं... आवाज करत पुढे सरकत होत्या. डिव्हायडरच्या अगदी जवळच्या लेनला नचिकेतची गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत पुढे जात होती. टोल नाक्यावर गाडी थांबली. ड्रायविंग सीटच्या बाजूला नचिकेतची आयुष्याची सोबतीनं आपल्या इवल्याश्या नेत्रांनी, अनभिज्ञ मनाने सभोवार बघणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन बसली होती. पण तो अतीच त्रास देत असल्यामुळे शेवटी त्याची जबाबदारी नचिकेतच्या मागेच बसलेल्या त्याच्या आईने घेतली. आजीजवळ जाताच मुलगा अगदी शांत झाला. ते बघून सगळे जण, आश्चर्यचकित होऊन हसू लागले. आजी सुनेला उद्देशून नातवाला तिच्या मुलाची महानता सांगत होती. नचिकेत आणि मिस्टर गोंडसे शांत बसून होते. गाडी टोलनाका ओलांडून पुढे गेली. आकाशात किंचित ढग जमा झाले होते. दूरवर कुठेतरी पाऊस पडला होता. तेथील मृद गंध वाऱ्याच्या थंड झुळुकेमध्ये सर्वत्र पसरला होता. शरीराला प्रोत्साहित करणारे वातावरण तयार झाले होते.

अचानक गाडीचे मागचे चाक, प्रेमामध्ये हमखास साथ सोडून जाणाऱ्या, दुसऱ्याचा हृदयाचा विचार न करणाऱ्या मुलीप्रमाणे, गाडीचा साथ कायमचा सोडून बाहेर पडले. गाडी एकाएक हालून तिरपी झाली. १८०च्या वेगात असलेली गाडी आटोक्यात आणण्यासाठी नचिकेत अवसान गळू न देता प्रयत्न करू लागला. इतर सर्व जण गर्भागळित झाले होते. मनोमन ते ऋग्वेदाने देव मानलेल्या, आर्यांनी पुजिलेल्या, सृष्टीचा पालनकर्ता असणाऱ्या भगवान विष्णूचा सातवा अवतार मानल्या गेलेल्या रावणासारख्या वेदपंडिताला, सोळा कला, चौसष्ट विद्या निपुण असलेल्या राक्षसाला चीत करणाऱ्या भगवान रामाने मस्तकी धारण केलेल्या, ज्याच्या दिव्य तेजाला आकर्षित होऊन त्याला गिळण्यासाठी पवनसुत झेपावला, त्या दिवाकराला साकडे घालू लागले. कदाचित त्यांना साकडे घालण्यासाठी सनातन हिंदू धर्माने उल्लेखिलेले देवही कमी पडत होते. आणि इकडे गाडी आटोक्यात येत नव्हती. भगवान राम असो, श्री कृष्ण असो किंवा रवी असो काय मदत करणार??? त्यांचे स्वतःचे आयुष्यदेखील काळाच्या हातचे खेळणे ठरले. असंख्य हाताने तेजशरवर्षाव करून संबंध सृष्टीला होरपळवणारा रवी स्वतः त्याच्या अस्तित्वाला प्रश्नचिह्न ठरणाऱ्या काळोखाच्या ग्रहणापुढे हतबल आहे. काळापुढे कोणीच नाही.

एवढे असूनसुद्धा मानवी मन काळावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करते. एक्स्प्रेसवे वर एकशे एंशीच्या वेगाने जाणाऱ्या गाडीचे चाक उन्मळून पडले होते. मागून तेवढ्याच वेगाने गाड्या येत होत्या. आता ह्या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडणे म्हणजे मृत्यूशी युद्ध जिंकणेच होते. नचिकेत ने निःशस्त्र एकाकी झुंज त्याचा सर्वात प्रबळ शत्रू साक्षात काळाशी सुरू ठेवली होती. मला काय व्हायचे ते होवूदे ह्यांना काहीच होऊ देणार नाही या निश्चयाने तो रणांगणात उतरला होता. एवढ्या वेळात त्याने काळाची काळी नजर त्याच्या परिवारावर पडू दिली नव्हती. अंगी असेल तेवढा पराक्रम गाजवून कुठल्याही परिस्थितीत परिवाराला सुखरूप बाहेर काढणे हे जणू त्याचे ध्येय होऊन बसले होते. सावजाला तडपवून, तडपवून त्याच्याशी खेळून त्याचा प्राण अलगद नव्हे त्रस्त करून बाहेर काढणारे काळरूपी ते मांजर हे सर्व मजेने मिटक्या मारत बघत होते. या विजयप्रिय, खाली हात परत न जाणाऱ्या गिधाडाचे अनेक रूप आहेत. बराच वेळ नचिकेत शरण येत नाही हे बघून त्याने दुसरी युद्धनिती वापरली. गाडीचा वेग कमी करावा तर मागून येणारी गाडी आपल्यावर येऊन आदळणार म्हणून गाडी बाजूच्या लेनला घेणे आवश्यक आहे असे नचिकेतला वाटले. त्यासाठी त्याने इंडिकेटर सुरू केले पण काचांमध्ये दिसणारी मागून येणारी गाडी अगदी जवळ होती आणि वेग कमी करत नव्हती. क्षणाक्षणाला त्याचा धीर आता सुटत होता. जास्त वेळ असेच राहिलो तर काय होईल हे सांगता येत नव्हते. शेवटी त्याने बाजूचा लेन मोकळा आहे हे बघितले. आणि मागच्या गाडीनेही गती आवरली होती. आहे त्या वेगातच त्याने गाडी बाजूच्या लेनला वळवली. थाड असा आवाज झाला. त्याच्याच मागे बसलेल्या त्याच्या आईचे डोके बाजूच्या दाराला लागले आणि त्यांना ग्लानी आली. इतक्या वेळ, त्या चिमुकल्याला दोन्ही हातांनी त्यांनी घट्ट धरून सुरक्षित ठेवले होते. पण, आता त्यांची पकड सैल झाली होती. आयुष्याची सुरुवातही नकरणाऱ्या त्याच्या आयुष्याचा शेवट करायचा हे काळ ठरवूनच आला होता. गाडी अजून बाजूच्या लेनवर पूर्ण आली नव्हती. एवढ्यातच दुसऱ्या लेनवरून अचानक एक गाडी भरधाव वेगाने आली आणि नचिकेतच्या गाडीच्या समोरच्या बाजूला जोरात धडकली. काळाचा डाव यशस्वी ठरला होता. मोकळ्या असणाऱ्या लेनवर गाडी आलीच केव्हा याचे आश्चर्य नचिकेतला त्या क्षणीच वाटले.

काळाची पकड हळूहळू मजबूत होऊ लागली. त्याचा गाडीवरचा ताबा या धडकेमुळे सुटला. त्याच्या लेनवरची गाडी त्याच्या गाडीच्या मागच्या बाजूला येऊन धडकली. त्याच्या आईच्या बाजूकडील दार उन्मळून निघाले आणि आजी आणि नातू बाहेर फेकल्या गेले. काळाची सावली आता पडत आहे आणि आपण काहीच करू शकत नाही हे नचिकेत हतबल होऊन बघत होता. आजी डिव्हायडरवर कोसळल्या आणि मूल हवेतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेले. काळाला आता एकही क्षण वाया घालवायचा नव्हता. "फट्ट" असा आवाज झाला. विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकच्या समोरच्या मेटलवर ते मूल आदळले. ट्रक ड्रायव्हरने मागचा-पुढचा विचार न करता करकचून ब्रेक लावले. चाक घासत दूरवर जाऊन ट्रक थांबला. तो लगेच खाली उतरला आणि त्याने मागे वळून बघितले. ट्रकच्या एका चाकाने लाल रंगाची एक दीर्घ फिकी होत जाणारी रेघ त्या गुळगुळीत रस्त्यावर ओढली होती. आणि ती रेघ जिथून सुरू झाली होती, तिथे एक गडद लाल रंगाचा ओला "पापड" त्याला तेथून दिसला. तो "पापड" म्हणजे काय असावे हे त्याला कळले आणि तो खालीच बसला. ते सर्व बघून त्या मुलाच्या आईच्या तोंडून किंकाळी निघाली आणि ती अगदी शॉक लागल्याप्रमाणे शांत झाली. इकडे आजी डिव्हायडरच्या बरोबर कडेवर दातांवर पडल्या. समोरचे दात कट.... कट मोडले आणि त्या जागीच शांत झाल्या. गाडी उलटून पलटी खाऊ लागली. नचिकेतच्या बाबांची आता पाळी होती. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आणि त्यांचादेखील तेथेच शेवट झाला. बऱ्याच पलट्या खाऊन गाडी थांबली. काळाची भूक तीन जीवांना खाऊन देखील मिटली नव्हती. मिटक्या मारत तो रक्तच्या थारोळ्यात पडलेल्या, तडफडणाऱ्या त्या छोट्या मुलाच्या आईकडे वळला. तिला काळ समोर उभा दिसत होता तरीपण त्याची भीती वाटत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर ते पाच महिन्याचे निष्पाप, गोड, अगदी त्याच्या वडिलाप्रमाणे हसणारे मूल क्षणभर तरळले. त्यानंतर, पहिल्या भेटीत बघितलेला नचिकेत आठवला. "ऋषी!! नचिकेत..... " एवढेच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले आणि तिची नाडी शांत झाली. आतापर्यंत सर्वकाही बघणारा नचिकेत त्याच्या शरीरातला प्राण निघाल्यासारखा करून त्याच्या अर्धांगिनीच्या कलेवरकडे बघू लागला आणि क्षणार्धात बेशुद्ध पडला.

दोन-तीन दिवसानंतर मी त्याला भेटण्यासाठी दवाखान्यात गेलो. नेहमी हसतमुख असणाऱ्या त्याच्या डोळ्यात अश्रू बघून मी त्याचे सांत्वन कसे करावे याचा विचार करत होतो. त्याच्या वार्डमध्ये गेलो. त्याच्या डोक्याला जबर इजा झाली होती. माझ्याकडे बघून तो औपचारिकता म्हणून हसला खरा पण, एक सुन्न करणारे दुःख लपवत. त्याच्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब नव्हता. कदाचित रडून रडून त्याच्या डोळ्याचे पाणी आटले असावे. पण, त्याचे डोळे सुजलेदेखील नव्हते. "पुरुषांना रडण्याचा अधिकार का नाही, काका? " त्याच्या आवंढा गिळून विचारलेल्या या प्रश्नाने मी नेहमीप्रमाणे यावेळीही निरुत्तर झालो. त्याच्या डोळ्यात साठणाऱ्या सगळ्या अश्रूंना तो हृदयामध्येच साठवत होता. त्याचे दुःख बघण्यासाठी, त्याला आपले म्हणणारे या जगात कोणीही उरले नव्हते. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. ज्या चार खांबांवर त्याच्या मनाचे छत उभे होते. त्या सगळ्या खांबांची आता राख झाली होती. काही वेळ मी तेथेच बसून त्याचे सांत्वन करू बघत होतो. पण, ज्या देवाच्या दर्शनासाठी तो जात होता त्या देवाला त्याची दया सुद्धा आली नाही. कदाचित या जगात देव नाही हेच सत्य आहे. जे झाले ते तर पीडादायक होतेच पण, नचिकेतला दुसरेच दुःख होते. एवढ्या मोठ्या अपघातामध्ये वाचल्याचे. तो आता जगणार तरी कोणासाठी? युद्धामध्ये वीरमरण यायला हवे होते असे त्याला वाटत होते. पण, त्याचा प्राण न घेऊन काळाने त्याला मृत्यूपेक्षा भयंकर शिक्षा दिली होती.

काही महिन्यानंतर परिस्थिती जरा मावळली. त्याने सायनरचे घर विकले होते आणि दुसरीकडे तो राहायला गेला होता , एकटाच! शेवटल्या वेळी जेव्हा तो भेटला तेव्हा त्याने सांगितलेले वृत्त ऐकून मला मी "माणूस" या वंशामध्ये आहे या गोष्टीचे दुःख झाले. मुळात, ज्या दवाखान्यात त्याच्यावर इलाज झाला तेथील डॉक्टरने आधी केसच घेतली नव्हती. पण, त्याच्याजवळ स्वतःची चार चाकी आहे हे माहीत पडताच सर्व हॉस्पिटल त्याच्या मदतीसाठी धावले. गाडीच्या कंपनीने चाक निघाल्याच्या प्रकरणामधून साफ हात बाहेर काढला, व जबाबदारी झटकली. इन्शुरंस वाल्यांनी केस क्लेम होऊच दिली नाही. पोलिस आणि ट्रॅफिक वाल्यांनी नचिकेत वर बऱ्याच खोट्या केसेस दाखल केल्या आणि त्या निकालात काढण्यासाठी बराच मोठा घास त्याच्या काळजाचा घेतला. एवढ्या सगळ्यातून बाहेर पडतपर्यंत त्याचे घर विकल्या गेले होते. नोकरी गेली होती.

आता त्याने एक गॅरेज घेतले होते. आणि त्याला लागून दोन खोल्यांचे घर! देव, माणूस, प्रेम, भावना या पुस्तकी शब्दावरून त्याचा पूर्ण विश्वास उडाला होता. मरण येत नाही म्हणून तो जगत होता.

"माणसाचे जीवन म्हणजे एक कोरी वही असते जिच्या प्रत्येक पानावर आठवणीच्या शाईने तो अनुभव लिहून ठेवतो. बरेचदा खोडातोडिच्या रूपात चुका कागदावर घर करून बसतात. एकदा जे लिहिले ते परत मिटवता येत नाही आणि अर्ध्याहून जास्त भरल्यावर जेव्हा वही मागे पडताळून बघितली जाते तेव्हा या खाडातोडी दुरुस्त करण्याची तीव्र इच्छा होते. कधी सुंदर अक्षरांमध्ये लिहिलेले लेख वाचता वाचता मन त्याच पानांवर घुटमळते. परत, तसाच एखादा नवीन लेख नवीन पानावर नवीन रीतीने लिहिण्यास मन आरंभ करते. आणि ते वहीचे शेवटचे पान असते........ "

दोन तीन दिवस असेच उदासीन गेले. सूनबाई माहेरी गेल्या होत्या. बायकोला आता स्पर्धा उरली नव्हती म्हणून चहा बेचव होत होता. मी गॅलरीत बसून नेहमीप्रमाणे बाह्य आणि आंतरजगामध्ये होणारे बदल अनुभवी डोळ्याने टिपत होतो. अचानक मिस्टर चिमणे दिसले. माझ्या घरातील झाडावर येऊन ते बसले. थोडावेळ सर्वत्र बघितले आणि परत निघून गेले. काहीतरी बऱ्याच विचारात वाटत होते ते. जे नचिकेतसोबत झाले तेच ह्या छोट्या जिवाशीही झाले होते. दुसऱ्या दिवशी बघतो तर माझ्या घराच्या अंगणामध्ये त्या झाडावर एक छोटेशे घरटे तयार झाले होते. मिस्टर चिमणे त्यांच्या नव्या भार्येसह आमच्या घरी पाहुणे म्हणून कायमचे उतरले होते. त्यांच्या रक्षणाची मनोमन जबाबदारी मी लगेच घेऊन टाकली.

छोट्या जिवासाठी कदाचित हे शक्य आहे पण, नचिकेतचे काय? अजूनही पुराणमतवादी असणारा, दगडामध्ये देव शोधणारा, वासराला उपाशी ठेवून गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणारा, आपल्या घरी पाळणा हालण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचे घर उद्ध्वस्त करणारा, समाजाच्या भल्यासाठी तयार झालेल्या 'धर्म' या संकल्पनेचा वापर समाजाच्या विघटनासाठी करणारा हा सनातन भारतीय समाज नचिकेतला नव्या रूपात स्विकारेल?? आणि समाजाने स्वीकारले तरी, बायको मुले तरी त्याला परत 'कदाचित' "कदाचित" वेगळ्या रूपामध्ये मिळतील पण, तीर्थरूपाचे काय?
.......................................................समाप्त

समाजजीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jan 2009 - 6:53 am | llपुण्याचे पेशवेll

काही शंका!
नचिकेतने १८० च्या वेगानी गाडी चालवली यात दोष त्याचाच होता ना! त्यात देवाचा दोष काय होता? बळी मात्र इतर चौघांचे गेले. भारतीय रस्त्यावर १८० च्या वेगाने गाडी चालवणारा माणूस म्हणून मला त्याची कणव मुळीच आली नाही. उलट त्याच्या परिवाराबद्दल वाईट वाटले. त्यानी उगाच प्राण गमावला.

छोट्या जिवासाठी कदाचित हे शक्य आहे पण, नचिकेतचे काय? अजूनही पुराणमतवादी असणारा, दगडामध्ये देव शोधणारा, वासराला उपाशी ठेवून गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणारा, आपल्या घरी पाळणा हालण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचे घर उद्ध्वस्त करणारा, समाजाच्या भल्यासाठी तयार झालेल्या 'धर्म' या संकल्पनेचा वापर समाजाच्या विघटनासाठी करणारा हा सनातन भारतीय समाज नचिकेतला नव्या रूपात स्विकारेल?? आणि समाजाने स्वीकारले तरी, बायको मुले तरी त्याला परत 'कदाचित' "कदाचित" वेगळ्या रूपामध्ये मिळतील पण, तीर्थरूपाचे काय
नचिकेताला समाजाने नवीन रुपात स्वीकारायचा प्रश्न येतोच कुठे. तसे असते तर त्याचे गॅरेज चाल्लेच नसते ना.
बाकी वासराला दूध पिऊ न देता ते माणसाने प्याले तरी चालते, कोंबड्याबकर्‍यांची घरे बळीसाठी उध्वस्त होऊन नाही चालणार पण जर माणसानी डायरेक्ट खायला उध्वस्त केली तर ती चालतात. हे कसे बरे?
ऊठसूट काही झाले की आपले श्रध्दाळू लोकाना झोडत रहायचे.
घरट्याच्या पहील्या २ कथा चांगल्या वाटल्या पण ही कथा मात्र निष्कर्शामुळे नाही पटली.

पुण्याचे पेशवे
Since 1984

रामदास's picture

18 Jan 2009 - 8:03 am | रामदास

आठवत नाही पण ही कथा आधी तुम्ही प्रकाशीत केल्यासारखी वाटते आहे. असो. कथा चांगली आहे.

योगी९००'s picture

18 Jan 2009 - 2:42 pm | योगी९००

अंगावर शहारा आला अपघाताचे वर्णन वाचून..तुनळीवर अपघात बघतोय असे वाटले..

काही शंका..

हा प्रसंग भारतात घडला काय..जर असे असेल तर १८० च्या वेगाने कोठल्या रस्त्यावर नचिकेत गाडी चालवू शकत होता? द्रुतगतीमार्गावरसुद्धा एवढ्या वेगाने कोणी गाडी चालवू शकणार नाही.

खादाडमाऊ

चेतन१२३प's picture

18 Jan 2009 - 10:13 pm | चेतन१२३प

हा प्रसंग भारतातच घडला आहे........
मी पात्रांची नावे बदलली आहे.....अगदी गाडिची कंपनी आणि वेग सुद्धा......वेगवेगळ्या
वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी वेगवेगळ्या वेगाचे आकडे आले होते...त्यात ८० ते १८० ह्या मधल्या जवळपास सर्वच वेगमर्यादा दिल्या गेल्या होत्या.
मी एवढा भयंकर अपघात म्हणुन १८० वेगमर्यादा लिहिली......चुक झाली असल्यास क्षमस्व!!!