प्रेरणा: एकाच शिर्षकाचे हे दोन वेगवेगळे धागे - 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.' आणि 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम'
नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी मोनी टीव्ही नावाच्या उपग्रह वाहिनीवरील 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या लोकप्रिय 'गेम शो' च्या निर्मात्यांनी ह्या कार्यक्रमाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने तयार करण्यात येणाऱ्या 'विशेष' भागासाठी विशेष अतिथी म्हणून ह्या गेम शो च्या दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात सहभागी झालेल्या धनंजय, शंतनू, सुधीर आणि परशुराम अशा चार स्पर्धकांना सहकुटुंब सहपरिवार आमंत्रित केले होते.
***
तुम्हाला 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' हा अमेरिकन गेम शो माहिती आहे का?
ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असे असते, स्पर्धकांच्या समोर तीन बंद दरवाजे असतात. त्यापैकी एका दरवाज्यामागे मुख्य पारितोषिक म्हणून एक महागडी आलिशान कार तर उरलेल्या दोन दरवाज्यांमागे प्रत्येकी एक बोकड असतो. स्पर्धकाला तीन पैकी एक दरवाजा निवडायचा असतो आणि त्या दरवाजामागे जे काही असेल ते त्याला बक्षीस म्हणून मिळते.
मुख्य पारितोषिक असलेली कार जिंकणे हा खेळाचा उद्देश असल्याने ती कुठल्या दरवाजामागे असेल ह्याचा अंदाज लावून स्पर्धकाने दरवाजा क्रमांक १, २, ३ पैकी आपली निवड सांगितली कि ह्या खेळात थोडी रंगत आणण्यासाठी मग सूत्रसंचालक स्पर्धकाने निवडलेला दरवाजा सोडून उरलेल्या दोन दरवाजांपैकी एक दरवाजा उघडून त्यामागे काय दडले आहे ते दाखवतो त्यामागे अर्थातच बोकड असतो. त्यानंतर सूत्रसंचालक स्पर्धकाच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी त्याला अजून एक संधी देत आपला निर्णय बदलायचा आहे का? अशी विचारणा करतो. आता तीन पैकी एक दरवाजा बाद झालेला असल्याने स्पर्धक आपला निर्णय बदलतो कि त्यावर ठाम राहतो हे बघणे रंजक असते कारण आधीच्या निर्णयावर ठाम राहिल्यास किंवा तो बदलून दुसरा दरवाजा निवडला आणि त्यामागेही बोकड निघाल्यास त्याच्या पदरी निराशाच पडणार असते.
'झंटी मॉल प्रॉब्लेम' हा गेम शो म्हणजे त्याचीच भारतीय आवृत्ती, आवृत्ती कसली भ्रष्ट नक्कलच म्हणा ना! 'मॉन्टी हॉल' नामक व्यक्ती त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायची म्हणून त्या गेम शोचे नाव 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम', त्याच धर्तीवर 'झंटी मॉल' नामक व्यक्ती ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्याने ह्या कार्यक्रमाचे नाव 'झंटी मॉल प्रॉब्लेम' असे ठेवण्यात आले.
वास्तविक 'झंटी मॉल' हे काही त्या सूत्रसंचालकाचे खरे नाव नाही. त्याचे पुर्ण नाव 'झंकार बाबुलाल टिकैत'. उत्तर प्रदेशात बारशा पासून मयता सारख्या कुठल्याही मंगल-अमंगल प्रसंगी गाण्या बजावण्यासाठी संपूर्ण गाझियाबाद जिल्ह्यात वर्ल्ड फेमस असलेल्या 'झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा' मध्ये यथा तथा गाणी गाऊन उदरनिर्वाह चालवणाऱ्या बाबुलाल टिकैत नामक गायकाच्या घरी त्याचा जन्म झाला होता. त्याच्या बापाला आपल्या पोराच्या रडण्याचा आवाज पैंजणांच्या झनकारी सारखा मंजुळ वाटत असल्याने मोठ्या कौतुकाने त्याने त्याचे नाव तो गात असलेल्या ऑर्केस्ट्राच्या नावावरून 'झंकार' असे ठेवले होते.
बारा एक वर्षांपूर्वी 'टिंग टॉंग' अॅपवर बरे-वाईट व्हिडीओज पोस्ट करून भारतात जे थोडेफार 'टिंग टॉंग स्टार्स' उदयाला आले त्यांच्यापैकीच एक असा हा झंकार टिकैत. सुरुवातीला आपल्या नावातले आणि आडनावातले आद्याक्षर घेऊन 'झंटी' ह्या टोपणनावाने टिंग टॉंग अॅपवर तो आपले व्हिडीओज पोस्ट करत असे. पुढे त्याच्या चाहत्यांची संख्या वाढू लागल्यावर त्याने 'जॉनी लिव्हर' ह्या त्याच्यासाठी गुरुस्थानी असलेल्या विनोदी अभिनेत्यापासून प्रेरणा घेऊन 'सिटी मॉल' मध्ये कामाला असलेल्या ह्या झंकार टिकैतने आपल्या संक्षिप्त टोपणनावापुढे 'मॉल' जोडून टाकले आणि काय आश्चर्य! हिंदुस्थान लिव्हर कंपनीत काम करणारा 'जॉन प्रकाश राव' जसा 'जॉनी लिव्हर' म्हणून नावारूपाला आला होता, तसाच हा हरहुन्नरी झंकार टिकैत देखील मनोरंजन क्षेत्रात अल्पावधीत चांगलाच नावारूपाला आला.
तर अशा ह्या झंटी मॉलला 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' ह्या जुन्या गेम शो बद्दल समजल्यावर त्याच्या डोक्यात भारतात ह्या संकल्पनेवर आधारित एक गेम शो सुरु करण्याचा कीडा वळवळु लागला. त्यासाठी अनेक चॅनल्सचे उंबरठे झिजवल्यावर अखेर नव-नवीन उपग्रह वाहिन्या सुरु करून त्या थोड्या लोकप्रिय झाल्या कि एखाद्या बड्या उपग्रह वाहिनी समूहाला विकून टाकण्यात हातखंडा असलेल्या एका व्यावसायिकाने आपल्या नव्याने सुरू केलेल्या मोनी टीव्ही नामक उपग्रह वाहिनीसाठी ह्या गेम शोची निर्मिती करण्याची तयारी दर्शवली होती. आज हा कार्यक्रम भारतातील सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे.
अर्थात कार्यक्रमाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोचवण्यापर्यंतच्या प्रवासातला सुरुवातीचा टप्पा 'झंटी मॉल' साठी अत्यंत खडतर होता. कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात झंटीच्या ढिसाळ सूत्रसंचालनामुळे सहभागी झालेल्या चार स्पर्धकांपैकी धनंजय आणि सुधीर ह्यांनी प्रत्येकी एक 'मर्सिडीज-बेंझ ई क्लास' कार आणि शंतनू व परशुराम ह्यांना प्रत्येकी एक जमुनापारी जातीचा 'बोकड' उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून मिळाले होते.
खरंतर कुठल्या दरवाज्यामागे कार आहे आणि कुठल्या दरवाजांमागे बोकड आहेत हे सूत्रसंचालकाला चांगले माहिती असते आणि त्याने स्पर्धकाने बरोबर दरवाजा निवडला असल्यास त्याला आपला निर्णय बदलायला भाग पाडण्यासाठी बोकड असलेला दरवाजा उघडून दाखवत स्पर्धकाला आपली निवड बदलण्यासाठी संभ्रमित करणे अपेक्षित असते, परंतु ह्या गेम शोचा तो पहिलाच भाग असल्याने स्पर्धकांपेक्षाही झंटीच जास्त नर्व्हस झालेला दिसला होता आणि त्या मन:स्थितीत त्याने चुकून धनंजयने निवडलेला दरवाजा क्रमांक १ ज्याच्यामागे खरंच कार होती, तोच दरवाजा उघडून दाखवत कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात, पहिलाच स्पर्धक असलेल्या धनंजयला थेट 'मर्सिडीज-बेंझ ई क्लास' कार विनासायास मिळवून दिली होती.
त्यानंतरचा स्पर्धक असलेल्या शंतनूला बोकड मिळाला होता तर पुढचा स्पर्धक असलेल्या सुधीरने दरवाजा क्रमांक तीन निवडला होता, ज्याच्यामागे खरंच कार होती. धनंजयच्या बाबतीत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती टाळत झंटीने त्याला बोकड असलेला दरवाजा क्रमांक २ उघडून दाखवत त्याने निवडलेला दरवाजा क्रमांक ३ चा निर्णय बदलून दरवाजा क्रमांक १ ची निवड करायची आहे का असे विचारले होते. परंतु सुधीरने आपण आपल्या निर्णयावर ठाम असून त्यात कुठलाही बदल करायचा नसल्याचे सांगितल्यावर झंटीची थोडी पंचाईत झाली होती. काहीही करून सुधीरला गाडी मिळण्यापासून रोखण्यासाठी मग त्याने त्याला निर्णय बदलायचाय का? हा प्रश्न अनेकदा विचारूनही हट्टी स्वभावाचा सुधीर काही त्याला बधायला तयार नव्हता, पण कार्यक्रमासाठी प्रेक्षक म्हणून स्टुडिओत आलेल्या काही शे लोकांपैकी एकजण मात्र वैतागून ओरडला "अरे कितीवेळा तोच तोच प्रश्न विचारशील, आता तू गपगुमान दरवाजा क्रमांक ३ उघडून दाखवशील का मी येऊन उघडू?" ह्यावर प्रेक्षकांमध्ये प्रचंड हशा पिकल्यावर नाईलाजाने अखेर झंटीने तो दरवाजा उघडून दाखवल्यावर त्याच्यामागची कार पाहून सुधीरच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता, तर झंटीच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. सुधीर नंतरचा चौथा आणि शेवटचा स्पर्धक असलेल्या परशुरामलाही बोकडावर समाधान मानावे लागले होते.
पहिल्या भागासाठी जाहिरातींतून मिळालेल्या तुटपुंज्या उत्पन्नाच्या तुलनेत त्या भागाच्या निर्मिती आणि प्रमोशनवर तसेच बक्षिसांवर खर्च झालेली रक्कम प्रचंड मोठी असल्याने चॅनलचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने संचालक मंडळाचे धाबे दणाणले होते. ह्या नुकसानीवर चर्चा करण्यासाठी त्याच रात्री तातडीने बोलावण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्यात उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून आले होते.
एका गटाचे म्हणणे होते कि "झंटी सारख्या उपटसुंभावर विश्वास ठेऊन चॅनलचे आणखीन नुकसान करण्यापेक्षा परवा सुरु होणारे पुढच्या भागाचे चित्रीकरण रद्द करून हा कार्यक्रम बंद करून टाकावा." तर दुसऱ्या गटाचे म्हणणे होते कि "केवळ एका भागाच्या प्रसारणानंतर कार्यक्रम बंद केल्यास चॅनलची नाचक्की होईल. तसाही पहिल्या भागाचा टीआरपी चांगला आहे तेव्हा झंटीची कानउघडणी करून आणखीन काही भाग करून बघू आणि जाहिरातींचे उत्पन्न नाही वाढले तर मग कार्यक्रम बंद करू!"
कानउघडणीच्या नावाखाली संचालक मंडळाने झंटीची चांगलीच चंपी केली होती, दोन-तीन भडक माथ्याच्या संचालकांनी तर त्याच्या माता-भगिनीचाही उद्धार केला होता. ह्या प्रसंगाने हादरून काकुळतीला आलेल्या झंटीने हा गेम शो सुरु राहावा म्हणून सर्व संचालकांचे मन वळवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून "नुकसान भरपाई म्हणून माझ्या मानधनातून अमुक एक रक्कम कापून घ्यावी" पासून "वर्षभर विना मानधन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करेन" असे प्रस्ताव स्वतःच देऊन काय वाट्टेल त्या तडजोडी स्वीकारण्याची तयारी दाखवली होती.
पण झंटीचे नशीब त्यावेळी बलवत्तर असावे, कारण त्याच्याकडून झालेल्या चुकीमुळे का होईना पण पहिल्याच भागात दोन स्पर्धकांना दोन आलिशान 'मर्सिडीज-बेंझ ई क्लास' कार्स मिळवून देणारा हा कार्यक्रम आणि न्यूज चॅनलवर चालणाऱ्या राजकीय चर्चांमध्ये जसे सूत्रसंचालक हातवारे करून तार स्वरात किंचाळून आक्रस्ताळेपणा करतात तशी आक्रस्ताळी शैली झंटीने आत्मसात करून आपल्या कार्यक्रमात वापरण्याची दाखवलेली कल्पकता ह्या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रत्येक भागागणिक ह्या गेम शोचा टीआरपी वाढत गेल्याने चॅनलला जाहिरातींतून मिळणाऱ्या उत्पन्नातही प्रचंड वाढ होत गेली होती.
***
'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या गेम शोच्या दशकपूर्तीनिमित्त असलेल्या विशेष भागासाठी दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाचे चार स्पर्धक 'विशेष अतिथी' म्हणून मंचावर सपत्नीक स्थानापन्न झाले होते. धनंजय-माधुरी, शंतनू-सुषमा, सुधीर-मनीषा आणि परशुराम-कमळा अशा चारही जोडप्यांची झंटीने आपल्या आक्रस्ताळ्या शैलीत प्रेक्षकांना ओळख करून दिल्यावर मग पहिल्याच भागात दोन कार्स आणि दोन बोकड जिंकलेल्या ह्या चौघा स्पर्धकांना बक्षीस जिंकल्यानंतर गेल्या दहा वर्षांतील त्यांचे अनुभव आणि त्या अनुभवांच्या जोरावर आज ते 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या कार्यक्रमाकडे आणि त्यांना मिळालेल्या बक्षिसांकडे 'समस्या', 'समाधान' कि 'अमूल्य भेट' ह्यापैकी कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात ह्यावर आपापली मते व्यक्त करण्याची विनंतीवजा आज्ञा दिली...
क्रमशः
पुढचा भाग:
प्रतिक्रिया
21 Oct 2023 - 1:34 pm | कंजूस
आवडला लेख.
मत देण्याएवढे माझे ग्यान नाही.
21 Oct 2023 - 3:51 pm | टर्मीनेटर
कल्पनविलासावर मत देण्यासाठी 'ग्यान' कशाला हवे?
लेख आवडल्याचे सांगीतलेत हेच पुरेसे आहे कि 😀
21 Oct 2023 - 3:08 pm | Trump
सत्यकथा आहे की नुसतीच कथा आहे? असा काही कार्यक्रम असल्याचे मला माहित नाही, अर्थातच तितके दुरप्रेक्षपकावर( टेलीव्हजन ) कार्यक्रम पहात नाही.
सत्यकथा असेल तर माहीतीसाठी धन्यवाद.
21 Oct 2023 - 3:52 pm | टर्मीनेटर
केवळ 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' हा अमेरिकन 'गेम शो' तेवढा वास्तविक आहे, बाकीचा सर्व प्रेरणेत दिलेले दोन धागे आणि त्यांच्यावरचे प्रतिसाद वाचून सुचलेला कल्पनाविलास! थोडक्यात, निव्वळ काल्पनिक कथा आहे 😀
21 Oct 2023 - 6:00 pm | तुषार काळभोर
त्या प्रॉब्लेम एवढीच उत्कंठावर्धक..
21 Oct 2023 - 6:27 pm | मुक्त विहारि
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
21 Oct 2023 - 8:41 pm | रंगीला रतन
+१
पुभाप्र
21 Oct 2023 - 7:34 pm | अहिरावण
पुढिल भाग वाचण्यास उत्सुक
21 Oct 2023 - 8:03 pm | भागो
पुढिल भाग वाचण्यास उत्सुक.
मी पण!
22 Oct 2023 - 11:45 am | श्वेता व्यास
गोष्टीची सुरुवात आवडली, पुढे होणार याची उत्सुकता आहे.
KBC मध्ये जसं आपण काहीही जिंकत नसतानासुद्धा स्पर्धक किती जिंकणार याची उत्सुकता असते तशीच :)
23 Oct 2023 - 10:14 am | प्रचेतस
कहर आहे =))
23 Oct 2023 - 1:08 pm | अथांग आकाश
मस्त! पुढिल भाग वाचण्यास उत्सुक!!

23 Oct 2023 - 1:36 pm | चांदणे संदीप
मस्त.... जोड्या पण काय निवडल्यात =))
पुभाप्र
सं - दी - प
24 Oct 2023 - 1:14 pm | टर्मीनेटर
संत तुकाशेठ । मुविकाका । रंगीला रतन । अहिरावण । भागो । श्वेता व्यास । प्रचेतस । अथांग आकाश । चांदणे संदीप
प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
श्रीगणेश लेखमालेतल्या लेखाचा हँगओव्हर अजून कायम असल्याचे द्योतक आहेत 'त्या जोड्या' 😂 😂 😂
24 Oct 2023 - 7:30 pm | ज्ञानोबाचे पैजार
हा नक्की काय प्रकार आहे ते शोधावे लागणार
पैजारबुवा,