तो खून, ती बाई आणि 'ते' पत्र

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
10 Sep 2023 - 7:19 pm

सन २०२१च्या जून ते ऑगस्ट या कालावधीत वाचकांना विदेशी साहित्यातील काही गाजलेल्या निवडक कथांचा आणि कथा लेखकांचा परिचय लेखमालेतून करून दिला होता. या लेखातून अशाच एका गाजलेल्या विदेशी दीर्घकथेचा परिचय करून देतो.
शतकापूर्वीच्या त्या कथेपर्यंत जायला काही निमित्त घडले.

सध्याचे मलेशियातील लेखक Tan Twan Eng या लेखकांचे 'द हाऊस ऑफ डोअर्स' हे पुस्तक बहुचर्चित असून संभाव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी त्याचा बोलबाला झाला आहे. त्यांना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा विख्यात इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम यांच्या सन 1922मधल्या 'द लेटर' या दीर्घकथेवरून मिळालेली आहे, अशा आशयाचा एक लेख मी इंग्लिश वृत्तपत्रात वाचला. त्यात मॉम यांच्या संबंधित कथेचा, ‘गाजलेली आणि आख्यायिका बनलेली’ असा उल्लेख आहे. मग ती कथा मुळातून वाचण्याचे कुतूहल निर्माण झाले. त्यात मॉम यांचा मी चाहता असल्याने कुतूहल अधिकच चाळवले गेले. ती कथा जालावर उपलब्ध असल्याने घरबसल्या सावकाश वाचून काढली.

संबंधित कथा १९११मधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्या काळी मलेशियात घडलेला एक प्रसंग आधी पाहू आणि मग त्यावर आधारित असलेल्या मॉम यांच्या ‘द लेटर या कथेत डोकावू.

सत्य घटना
ती घटना तत्कालीन ब्रिटिश मलायातील कुआलालंपूर येथे घडली. एका मुख्याध्यापकांची पत्नी आणि तिथल्या कथिलाच्या खाणींवरचा व्यवस्थापक यांच्यातील चोरट्या प्रेमसंबंधांतून ती घडली. एकदा ते मुख्याध्यापक गावाला गेले असताना हा व्यवस्थापक रात्रीच्या वेळेला त्या बाईच्या घरात शिरतो आणि तिचा विनयभंग करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. त्यात दोघांमध्ये झटापट होते आणि बाईच्या हाती अचानक घरातले पिस्तूल लागते. ती संधी साधून बाई तिच्या त्या प्रियकरावर ओळीने सहा गोळ्या झाडून त्याला ठार करते.

तिला अटक होऊन तिच्यावर खटला दाखल केला जातो. तिचा बचाव असा असतो की तिने बलात्कार वाचवण्यासाठी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. परंतु सरकारी वकील हे सिद्ध करतात की मुळातच त्या दोघांचे पूर्वीचे प्रेमसंबंध होते; परंतु नंतर त्या व्यवस्थापकाने दुसऱ्या बाईशी सूत जुळवल्यामुळे तिच्यातील मत्सराग्नी उफाळून येतो आणि त्या सूडापोटी ती त्याचा खून करते. खटल्यात बाईला खुनाबद्दल दोषी ठरवले जाते आणि शिक्षा सुनावली जाते. परंतु एकंदरीत जनमत आणि प्रक्षोभ लक्षात घेता तत्कालीन सुलतान या बाईला माफी देऊन टाकतात.

मॉमना त्यांच्या मलायातील भटकंतीदरम्यान एका वकिलाकडून ही घटना समजली होती. परंतु निव्वळ सत्यघटना जशीच्या तशी मांडून त्याची उत्तम ‘कथा’ होऊ शकत नाही याचे त्यांना भान होते. म्हणून त्यांनी त्या बाईच्या हस्ताक्षरातील प्रियकराला लिहिलेले पत्र (चिठ्ठी) ही कल्पना त्या घटनेत मिसळली आणि त्यातून त्यांची ‘द लेटर’ प्रभावीपणे साकारली. किंबहुना त्यांच्या कल्पनेतील ते पत्रच कथेच्या केंद्रस्थानी आले.

कथेतील मुख्य पात्रे :
श्री.जॉइस : आरोपी स्त्रीचे नामांकित वकील
क्रॉसबी दांपत्य : यापैकी रॉबर्ट हा एका मोठ्या रबर-मळ्याचा मालक आहे. लेस्ली ही त्याची बायको. ती खुनी आहे.
हॅमंड : लेस्लीचा एकेकाळचा प्रियकर आणि तिच्या हातून खून झालेला.
ओंग ची सेंग : जॉइस वकिलाकडील चिनी कारकून

कथानक
सिंगापूरमधील जॉईस वकिलांचे कार्यालय. ते अशिलाची वाट पाहत बसून आहेत. त्यांचा कारकून सेंग त्यांना भेटायला रॉबर्ट आल्याची वर्दी देतो. रॉबर्टची बायको असलेल्या लेस्लीने तिच्या परिचयातील हॅमंडचा पिस्तुलातील सहा गोळ्या झाडून खून केलेला आहे. रॉबर्ट एकटे गावाला गेलेले असताना हॅमंड त्यांच्या घरात घुसला आणि त्याने लेस्लीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून तिने स्वसंरक्षणार्थ घरातील पिस्तुलाने त्याचा खून केला. परंतु संतापाच्या भरात तिने पिस्तुलातील सहाच्या सहा गोळ्या त्याच्यावर झाडल्या. या संदर्भात जॉईस वकील आणि रॉबर्ट यांचे चर्चा चालू आहे. वकील रॉबर्टला सांगतात की लेस्लीने जर तिने फक्त एकच गोळी झाडली असती तर तिचा स्वसंरक्षणार्थ बचावाचा मुद्दा कोर्टाला मान्य होतो. परंतु लागोपाठ सहा गोळ्या झाडल्याने ते प्रकरण अधिक गंभीर होते आणि तिची बाजू कमकुवत होते.

यानंतर कथेमध्ये लेस्लीने अटक झाल्यानंतर जॉईस वकिलांना खुनाच्या घटनेचा जो संपूर्ण वृत्तांत सांगितला, तो येतो. तिच्या सांगण्यानुसार ती घरात एकटी असल्याचे पाहून हॅमंड हा आगंतुकपणे घरात घुसतो. मग तिच्याशी गुलूगुलू गप्पा मारून लगट करतो. पुढे विनयभंग करतो आणि बलात्काराच्या तयारीने तिला उचलून पलंगावर नेऊ पाहतो. त्यावर ती पिस्तुतील सर्व गोळ्या झाडून त्याचा खून करते. त्यानंतर रखवालदाराला हा प्रकार समजून तो पोलिसांना बोलवतो आणि अखेर तिला अटक होऊन तिची रवानगी तुरुंगात होते.
वकील महोदय तिच्या त्या कथनावर संपूर्ण विश्वास ठेवून असतात आणि आता तिच्या सुटकेसाठी कोणते धागेदोरे मिळतील याचा विचार करीत बसलेले असतात.

आणि आता या प्रकरणाला कलाटणी देणारी एक घटना घडते..
वकिलांचा कारकून त्यांना दबक्या आवाजात सांगतो की लेस्लीने मृत हॅमंडला खुनाच्या दिवशीच लिहिलेले एक पत्र मिळाले असून सध्या ते त्याच्या मित्राकडे आहे. सुरुवातीस वकील त्याच्या म्हणण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. पुढे तो त्यांना सांगतो की ते अतिशय महत्त्वाचे असून त्याने या खटल्याला वेगळेच वळण लागू शकेल. वकील त्याला विचारतात, की असं काय आहे त्या पत्रात? त्यावर तो त्या पत्राची अन्य कोणीतरी लिहिलेली हस्तलिखित प्रत त्यांना दाखवतो (त्याकाळी झेरॉक्स नसणार हे उघड आहे). ती चिठ्ठी लेस्लीने हॅमंडला लिहीलेली असते आणि त्यातला मजकूर असा असतो :

“आज माझा नवरा गावाला गेला असून मी एकटीच आहे. तरी रात्री सामसूम झाल्यावर तू मला भेटायला ये. येताना कारने येऊ नकोस. नक्की ये.... मी तुला भेटण्यासाठी अगदी आसुसलेली आहे. नाही आलास तर बघ !”

ok
आता वकिलांना त्याचे गांभीर्य समजते. पण प्रश्न असा असतो की हे कितपत खरे आहे? त्याची शहानिशा खुद्द लेस्लीकडून करणे त्यांना आवश्यक वाटते. मग ते तुरुंगात जाऊन तिच्यापुढे त्या पत्राची ती प्रत ठेवतात आणि त्याचे स्पष्टीकरण विचारतात. प्रथमदर्शनी ती ते पूर्णपणे नाकारते,

“एक तर ते माझे हस्ताक्षर नाही. या पत्रावर तारीख सुद्धा नाही. तेव्हा ते मी त्याच दिवशी लिहीलेले असू शकत नाही..” वगैरे

त्यावर वकील तिला समजवतात, “फिर्यादीने मूळ पत्र जर कोर्टाकडे सादर केले गेले तर त्यावरील हस्ताक्षरावरून ते तुमचे आहे हे सिद्ध करता येईलच. या खेरीज तुम्ही ज्या निरोप्या मुलाबरोबर ते पत्र पाठवलेत त्याची साक्षही कोर्ट ग्राह्य धरेल”

तिला आता तिचे बिंग फुटल्याचे समजत होते परंतु तरीही ती अजून थेट कबुली द्यायची टाळत होती. मग ती म्हणाली,

“हो, मी एकदा त्याला लिहिलं होतं. मला माझ्या नवऱ्याला वाढदिवसानिमित्त नवी बंदूक भेट द्यायची होती. त्यासंबंधी मी हॅमंडला चर्चा करायला बोलावणे पाठवले होते.

हे सगळे ऐकून वकील म्हणतात, “तुमच्या त्या पत्राची भाषा बघा. ती तुमच्या या विधानाशी सुसंगत नाही”.

आता तिला आपला बचाव करणे अवघड दिसू लागते आणि ती एकदम घाबरते आणि वकिलांना विचारते,
“मग मला फाशी होणार का? तुम्ही काही तरी करू शकणार नाही का?”

आणि असे म्हणत चक्कर येऊन पडते. त्यातून सावरल्यावर ती स्पष्ट विचारते की ते मूळ पत्र आता कोणाकडे आहे. त्यावर वकील सांगतात की ते हॅमंडने ठेवलेल्या एका चीनी बाईकडे आहे. त्यावर, ते परत मिळवता येईल का, असे लेसली विचारते. त्यावर वकील स्पष्ट कल्पना देतात की त्या बाईला खूप मोठी रक्कम लाच म्हणून दिल्याशिवाय ते आता शक्य होणार नाही.

दरम्यान सेंग कारकून वकिलांच्या मागे लागलेलाच असतो. तो त्यांना पटवतो की हा खटला हरणे हे त्यांच्या नावलौकिकला साजेसे नाही; तेव्हा काही करून आरोपीला पैसे देण्यासाठी तयार करा. ते पत्र परत करण्यासाठी चिनी बाईकडून दहा हजार डॉलर्सची मागणी केली जाते. वकील घासाघीस करण्याचा प्रयत्न करतात पण काही उपयोग होत नाही. शेवटी वकिलांना ही गोष्ट रॉबर्टच्या कानावर घालावी लागते. तो खरे तर हादरतो पण आता करतो काय? बायकोला फासातून सोडवण्यासाठी तो पैसे द्यायला तयार होतो आणि व्यवहाराच्या वेळी तो प्रत्यक्ष हजर असेल हेही सुनावतो.

मग रॉबर्ट, वकील आणि सेंग हे त्रिकूट चिनी बाईला भेटायला जाते आणि त्या देवघेवीचा व्यवहार पूर्ण होतो. रॉबर्ट चलाखीने वकिलांच्या हातातून पत्र स्वतःच्या ताब्यात घेतो.
फिर्यादी पक्षाकडचा महत्त्वाचा पुरावा ताब्यात मिळाल्यामुळे आरोपीची बाजू आता वरचढ होणार हे स्पष्ट होते. अपेक्षेनुसार (स्वसंरक्षणार्थ गोळीबार या मुद्द्यावरून) लेसलीची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होते. त्यानंतर क्रॉसबी कुटुंबातर्फे हा ‘विजय’ जोरदार जल्लोष करून मेजवानीसहित साजरा होतो.

ते पत्र रॉबर्टच्या ताब्यात असल्यामुळे त्याने ते वाचल्याचे तिला वकिलांकडून समजते. तिचे चोरटे प्रेमप्रकरण त्याला कळल्याची बोच तिला लागून राहते पण ती तेवढ्यापुरतीच. आता ती वकिलांपाशी तिने केलेल्या खुनाचे कारण स्पष्ट करते. हॅमंडने तिला सोडून चिनी बाईला जवळ केल्याच्या मत्सरापोटीच त्याचा खून केल्याची कबुली देते. एकेकाळी तिने हॅमंडवर मनापासून प्रेम करून त्याला आपले सर्वस्व दिलेले असते. परंतु नंतर अगदी सहजतेने तो तिला धुडकावून चिनी बाईच्या नादी लागतो. त्यामुळे व्यथित होऊन लेस्ली त्याचा सूड घेते.
...

ब्रिटिशांच्या वसाहतवादी काळात पूर्व आशियात घडलेली ही गोष्ट. जिथे जिथे ब्रिटिश पोचले तिथे त्यांनी स्थानिकांवर जमेल तितके अन्याय व अत्याचार केलेत. लेस्ली क्रॉसबी हे त्याच प्रवृत्तीचे प्रातिनिधिक उदाहरण. एक प्रतारणा करणारी, थंडपणे खून करणारी आणि पश्चात्तापशून्य ही तिची रूपे लेखकाने छान रंगवली आहेत. कथेत नाट्यमयता आहे. जॉइस वकिलांच्या रूपात लेखकच कथेचा निवेदक बनल्याचे जाणवते. प्रत्यक्ष खून झाल्यानंतरच्या विविध घटना आणि पात्रांनी केलेल्या लटपटी-खटपटी अगदी तटस्थपणे वाचकांसमोर मांडल्यात. त्यात लेखकाचे कौशल्य जाणवते. बाकी युरोपीय आणि आशियाई व्यक्तींची यथायोग्य व्यक्तीचित्रणे खास मॉम शैलीत आहेत हे सांगणे न लगे. एखाद्या न्यायालयीन खटल्याचा 'निकाल लागणे' आणि 'न्याय मिळणे' या गोष्टी भिन्न असतात, हा नेहमीचा मुद्दाही कथेत अधोरेखित होतो.

माध्यम रूपांतरे
ok

कथा वाचकप्रिय झाल्यामुळे तिची नाट्य आणि चित्रपट रुपांतरे झालेली आहेत. नाट्यरूपांतर खुद्द मॉम यांनीच केलंय. ‘द लेटर’ या हॉलीवुड चित्रपटात लेसलीची भूमिका Bette Davisने साकारलेली आहे. या दोन्ही कलाकृतींमध्ये माध्यमानुरूप कथेत थोडेफार बदल केलेले आहेत. चित्रपटात कथेचा शेवट अगदी बदललेला आहे (तो आता सांगत नाही). तो का बदलला याचे कारण विकिपीडियावर मिळाले. त्याकाळी अमेरिकेत Motion Picture Production Code या प्रकारची काहीतरी यंत्रणा अस्तित्वात होती आणि त्यांच्या तत्वानुसार चित्रपटांना काही नैतिक मूल्यांचे पालन करणे बंधनकारक होते असे दिसते.
*****************************************
मूळ इंग्लिश कथा इथे

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Sep 2023 - 8:14 pm | अमरेंद्र बाहुबली

कुमार काकांचा लेख म्हणजे काहीतरी भारीच असनार. त्यामुळे आधी अभिप्राय देऊन मग वर जातो.

रंगीला रतन's picture

10 Sep 2023 - 10:47 pm | रंगीला रतन

छान लेख.

आंद्रे वडापाव's picture

11 Sep 2023 - 1:35 pm | आंद्रे वडापाव

‘On Sunday, 23 April 1911, Ethel Proudlock attended Mass at St Mary’s Church in Kuala Lumpur. She was well-liked at St Mary’s. She helped with jumble sales and had recently joined the choir. After Mass, the vicar’s wife invited her to lunch. But Mrs Proudlock declined. She had sewing to do. Then, taking her leave, she drove home and killed her lover.’

In the sensational trial that followed Ethel Proudlock, the Eurasian wife of an Englishman claimed that William Steward, a mine manager, had tried to rape her, but the evidence pointed to a passionate affair, and a murder inspired by jealousy. Found guilty and sentenced to death, she walked free after being pardoned by the Sultan of Selangor, much against the wishes of British officials.

The event scandalized polite society, and revealed the suffocating nature of expatriate life in Malaya, where the British ruled with an unhealthy blend of suburban aspiration and gross insensitivity to the native population. Petty, hypocritical and terribly unhappy, the British never counted Malaya as home and spent their time wishing they weren’t there. ‘Cheltenham on the Equator’ was rocked to its foundations by the dark, sordid nature of the trial.

In this compelling work of social history Eric Lawlor examines Ethel Proudlock’s case for the first time since the trial, and creates a disturbing portrait of this little-known outpost of Empire.

There are qualities of Somerset Maugham (The Letter was based on the Proudlock trial) and Conrad (Heart of Darkness) in Eric Lawlor’s book.

a

आंद्रे वडापाव's picture

11 Sep 2023 - 1:41 pm | आंद्रे वडापाव

b

तप्शिल

#http://viweb.school/proudlock.htm

कुमार१'s picture

11 Sep 2023 - 1:51 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल धन्यवाद !
संबंधित सत्य घटनेचा तपशील समजला.

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2023 - 2:25 pm | चौथा कोनाडा

अ ति शय रोचक कथानक !

कुमार सरांचे असे लेख म्हणजे मेजवानी !
धन्यू !

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Sep 2023 - 8:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

तूनळीवर चित्रपट बघायला मिळेल का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Sep 2023 - 6:48 am | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद मुविकाका!! जरुर बघेन

कुमार१'s picture

11 Sep 2023 - 8:51 pm | कुमार१

तूनळीवर चित्रपट

होय, कृष्णधवल रूपात आहे !

कुमार१'s picture

11 Sep 2023 - 8:51 pm | कुमार१

तूनळीवर चित्रपट

होय, कृष्णधवल रूपात आहे !

समरसेट मॉम हे विखय्त लेखक आहेतच पण एक वेदांती सुद्धा होते. वेदांत च्या आधारावर त्यांनी The Razor’s Edge हे पुस्तक लिहिले (नावांत चूक झाल्यास चूक भूल द्यावी घ्यावी). मॉम हे श्री रमण महर्षी ह्यांचे भक्त होते. त्यांची शेवटची इछा आधी शंकराचार्यांवर पुस्तक लिहिणे हि होती पण वयोमानाने त्यांना ते शक्य नाही झाले.

कुमार१'s picture

12 Sep 2023 - 7:10 am | कुमार१

मॉम हे श्री रमण महर्षी ह्यांचे भक्त होते.

हे पूर्वी वाचले होते.
महर्षींची भेट घेण्यासाठी मॉम भारतात अरुणाचलम येथे आले होते. भारतातील वास्तव्यात त्यांना तत्कालीन व्हाईसरॉयने शाही पाहुण्याचा दर्जा दिला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Sep 2023 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला. पुढील नवीन खुमासदार लेख लवकर येऊद्या.

शेखरमोघे's picture

12 Sep 2023 - 12:37 am | शेखरमोघे

Latin phrase “Veni, vidi, vici” च्या धर्तीवर (कुमार१ च्या लिखाणाबद्दल) "मनात आले, लिहून टाकले आणि सगळ्याना (नेहेमीसारखेच) आवडले" असे म्हणावेसे वाटते.

कुमार१'s picture

12 Sep 2023 - 7:12 am | कुमार१

अभिप्राय, पूरक माहिती आणि प्रोत्साहनबद्दल धन्यवाद !

श्वेता व्यास's picture

12 Sep 2023 - 1:44 pm | श्वेता व्यास

घटना आणि कथानक परिचय लेख आवडला.

MipaPremiYogesh's picture

13 Sep 2023 - 8:31 pm | MipaPremiYogesh

वाह मस्तच कुमार सर

कुमार१'s picture

13 Sep 2023 - 10:00 pm | कुमार१

सर्वांना धन्यवाद !
..
आज मी या कथेशी संबंधित चित्रपट युट्युबवर पाहिला. खूप चांगला आहे !!

मुख्य म्हणजे त्यात कथेचा शेवट अगदी बदललेला आहे (तो आता सांगत नाही). तो का बदलला याचे कारण विकिपीडियावर मिळाले. त्याकाळी अमेरिकेत Motion Picture Production Code या प्रकारची काहीतरी यंत्रणा अस्तित्वात होती आणि त्यांच्या तत्वानुसार चित्रपटांना काही नैतिक मूल्यांचे पालन करणे बंधनकारक होते असे दिसते.

न्यायालयीन खटल्यात न्यायाधीश आणि वकिलांच्या डोक्यावरचे विशिष्ट कुरळ्या केसांसारखे दिसणारे टॉप मजेदार वाटले. तसेच हॅमंडच्या चीनी बाईची भूमिका छोटी असली तरी जबरदस्त आहे. दहा हजार डॉलर्सच्या बदल्यात ते पत्र परत करतानाच्या वेळेला तिच्या चेहऱ्यावरचे तुच्छतेचे भाव अगदी बघण्यासारखे आहेत.

जरूर बघावा असा चित्रपट !

टर्मीनेटर's picture

16 Sep 2023 - 1:01 pm | टर्मीनेटर

मस्त कथा परिचय…
कथा/कादंबरी आणि लेखकाचे नाव आठवत नाही पण ह्याच कथाबीजावर आधारित एक पुस्तक मराठित वाचल्याचे स्मरतंय!
(ते प्रेरित होते, अनुवादीत नव्हते)