विदेशी कथा परिचय (१०) : समारोप

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
24 Aug 2021 - 5:05 am

भाग ९ : https://www.misalpav.com/node/49146
……………..

२ जून २०२१ पासून सुरू केलेली लेखमाला आता संपवत आहे. साहित्याच्या अनेक प्रकारांपैकी (लघु)कथा हा एक महत्त्वाचा आणि वाचकांना रिझवणारा प्रकार. जागतिक कथासागर अफाट आहे. या लेखमालेच्या निमित्ताने त्यातील काही निवडक विदेशी कथांचा आस्वाद घेता आला. या लेखमालेची सुरुवात अगदी ठरवून अशी काही झाली नाही. ती कशी झाली ते सांगतो.

गेले तीन-चार वर्षे दरसाल पावसाळ्याचे सुरवातीस एखादे चक्रीवादळ येत असते. त्यावेळेस जोरदार पाऊस पडतो. दरवर्षी असा पाऊस खिडकीतून बघत असताना मला ‘Rain’ या सॉमरसेट मॉम यांच्या कथेची आठवण होई. ती कथा मी छापील पुस्तकात पस्तीस वर्षांपूर्वी वाचली होती. तेव्हापासून तिने मनात घर केले होते. गेल्या तीन वर्षांत दरवर्षी धोधो पाऊस पाहताना मला या कथेवर एखादा लेख लिहावा असे वाटे. पण आळसामुळे तो विचार कृतीत उतरत नसे. यंदा मात्र मी निर्धार केला. त्यासाठी आता ती कथा मुळातून वाचणे आले. ते पुस्तक तर आता माझ्याजवळ नव्हते. मग जालावर शोध घेता ती कथा सहज मिळाली. योगायोगाने यंदा तिची जन्मशताब्दी होती. हा सुंदर योगायोग लक्षात आल्यावर तिच्यावर लिहायचे नक्कीच करून टाकले. तो लेख इथे लिहील्यानंतर वाचकांचे उत्साहवर्धक प्रतिसाद आले. मॉम यांचे बरेच साहित्य मी एकेकाळी वाचले होते. त्यांच्या अन्य काही कथाही मला परीचयासाठी खुणावत होत्या. पण मग जरा वेगळा विचार केला.

मला एकदम माझी काही जुनी टिपणे आठवली. पूर्वी मी एस. डी. इनामदार यांचा ‘दिगंतराचे पक्षी’ हा मराठी अनुवादित कथासंग्रह वाचला होता. त्यातील चेकॉव्ह व मोपासां यांच्या प्रत्येकी एक कथा आवडल्याचे वहीत लिहून ठेवले होते. आता त्या मुळातून वाचावे असे ठरवले. त्याही जालावर सहज उपलब्ध होत्या. त्यातून मग एकच लेखक पकडण्याऐवजी विविध देशांचे लेखक घ्यावेत अशी कल्पना स्फुरली. त्या दोघांवर लेख लिहील्यानंतर वाचकांचे उत्साहवर्धक प्रतिसाद आले. मग या प्रकाराची मला गोडी लागली. त्यानंतर अन्य काही युरोपीय व अमेरिकी लेखकांच्या कथांचा शोध घेऊ लागलो.

एखादी कथा जालावर मोफत उपलब्ध असण्यासाठी ती पुरेशी जुन्या काळातील असणे आवश्यक ठरते. त्यानुसार 75 ते 100 वर्षे जुन्या कथांचा धांडोळा घेतला. त्यातूनच ही लेखमाला साकारली. यासाठी निवडलेले कथालेखक इंग्लंड, आयर्लंड, अमेरिका, न्युझीलंड, रशिया आणि फ्रान्स या देशांमधले होते. जगाच्या पूर्वेकडील वा मध्य आशियातील एखाद-दुसरा लेखक घेण्याची इच्छा होती. परंतु संबंधित भाषेत लिहिलेल्या कथेचे इंग्लिश रूपांतर जालावर सहज उपलब्ध असतेच असे नाही. त्यामुळे तो विचार सोडून दिला.

कथांची निवड ही पूर्ण माझ्या मनाप्रमाणे होणार असल्याने त्याला मर्यादा होती. त्या सर्वच कथा काही मला ‘आवडल्या’ असे नाही. परंतु ज्या मला वैशिष्ट्यपूर्ण वाटल्या त्या मी निवडल्या. तसेच सर्वच वाचकांना सर्व कथा आवडतील असे नाही, याची कल्पना होती. लेखमालेत थोडासा रुचीबदल म्हणून आठव्या भागात बेकेट यांचे तीन मिनिटांचे नाटुकले घेतले.

कथांची लांबी हाही त्यांच्या निवडीचा एक महत्त्वाचा निकष होता. त्या जालावर वाचायच्या असल्यामुळे दीर्घकथा टाळल्या. अपवाद फक्त एकच- रेन ही कथा पीडीएफची तब्बल 51 पानी आहे. प्रत्येक कथा वाचल्यावर त्यासंबंधी काही अभ्यासकांची मते वाचली. तसेच अजून एक मुद्दा त्या अभ्यासादरम्यान लक्षात आला. बऱ्याच गाजलेल्या जागतिक कथांची माध्यम रूपांतरे झालेली असतात. उदाहरणार्थ नाटक, लघुपट, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, इत्यादी. कथा निवडताना हाही निकष मला रोचक वाटला. अशी माध्यम-रूपांतरित झालेली कथा वाचकांच्या अधिक आवडीची असते असे अनुभवातून लक्षात आले. जर अशी एखादी कथा आपल्याला आवडली तर तिचे चित्रफीत रूपांतर युट्युबवर बघण्यासाठी सहज उपलब्ध असते हाही एक फायदा.

लेखमालेतील कथांमधून दांपत्यजीवन, विवाहबाह्य स्त्री-पुरुष संबंध, हिंसक प्रवृत्ती, युद्ध, अंधश्रद्धा, मानवी दुःख, संवादाची गरज आणि आयुष्यावरील मूलभूत चिंतन असे विविध विषय हाताळता आले. बऱ्याच वाचकांनी सातत्याने प्रतिसाद दिले आणि ते अभ्यासपूर्ण होते. तर काही वाचकांनी लेख वाचल्यानंतर वेळ काढून आधी मूळ इंग्लिश कथा वाचली आणि मग इथे प्रतिसाद दिले. त्यांचे विशेष कौतुक !

या लेखमालेचा मला अजून एक महत्वाचा फायदा झाला. गेले अनेक वर्षे मी मूळ इंग्लिश साहित्य वाचणे सोडून दिले होते. यामागे कारण होते. माझे व्यावसायिक काम तसेच आरोग्य लेखन करण्यासाठी मी जे वाचन करतो ते सर्व इंग्लिशमध्ये असते. मला जर छंद किंवा विरंगुळा म्हणून अन्य काही करावेसे वाटले तर मग पुन्हा मनात इंग्लिशमय वातावरण नको, असा विचार त्यामागे होता. अधूनमधून काही गाजलेल्या इंग्लिश साहित्याचा मराठी अनुवाद फक्त वाचत होतो. यानिमित्ताने मनावरील वैचारिक धूळ झटकून इंग्लिश साहित्यवाचनाचा पुन्हा एकदा सराव केला आणि त्या भाषेची खुमारी अनुभवता आली. या कथांच्या मूळ लेखकांनी वापरलेली काही सुंदर विशेषणे, कल्पना तसेच वाक्प्रचार हे अप्रतिम आहेत. त्यांचे चपखल मराठी भाषांतर करणे खरंच कठीण आहे. काही ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा मूळ लेखनाचा आशय तंतोतंत मराठीत सांगण्यास मी कमी पडलो याची जाणीव आहे.

ही लेखमाला संपवत असताना मनात एक नवी कल्पना आली आहे, ती अशी. भारतातही अनेक भाषा असून त्यांमध्ये नामवंत कथाकार होऊन गेलेले आहेत. निवडक अशा दहा (अमराठी) भारतीय भाषांमधील कथांचा मराठीतून परिचय करून देणे अशी एक लेखमाला होऊ शकते. अर्थात त्यासाठी मी इतका योग्य माणूस नाही. ज्या वाचकांचा विविध भारतीय भाषांशी थोडाफार संबंध येत असेल, अशांपैकी कोणीतरी हा प्रकल्प हाती घेतल्यास ती सुरेख लेखमाला होईल. जरूर विचार करावा.

या लेखमालेचे सर्व वाचक, अभ्यासू प्रतिसादक, संस्थळाचे संपादक आणि प्रशासक या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे !
....................................................................

विदेशी कथा परिचयमालेतील संपूर्ण लेख व लेखकसूची

१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! ( Rain -Somerset maugham)

२. एका आईचा सूडाग्नी ( mother savage - Guy de Maupassant)

३. कुणास सांगू ? ( Misery - Anton Chekhov)

४. ‘भेट’ तिची त्याची ( the gift of the Magi -O Henry)

५. नकोसा पांढरा हत्ती ( hills like white elephants- E. Hemingway)

६. ती सुंदर? मीही सुंदर ! (A cup of tea : Katherine mansfield)

७. ‘लॉटरी’.....अरे बापरे ( the lottery: Shirley Jackson)

८. तीन मिनिटांची ये-जा ( come and go: Samuel Beckett)

९. नियतीचे वर आणि माणसाची निवड (the five boons of life: Mark Twain)
…,.............

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

24 Aug 2021 - 5:50 am | गॉडजिला

खरे तर ही मालिका अजुनही जरा मोठी हवी होती असे वाटत होते, अगदी आत्ता देखील एखादी कथा वाचायला मिळेल असे वाटले होते पण असो. आपल्या सहजता आणि साधेपणावर मी फिदा आहे.

आपण विवीध बाबींवर लेखन करता, त्या माहीती मागील कष्ट व प्रांजळता व आपले लिखाणाचे समाधान लगेच नजरेत भरते. मी आपलं सर्व साहित्य इथे वाचलेले नाही त्यामूळे माझे अज्ञान मुलभूत ठरवून आपण तथाकथित शब्दबंबाळ वाक्ये/लिखाण परिणामी साहित्यिक या किताबापासून कोसो दूर आहात तरीही तूम्ही जे लिहता ते मनाचा ठाव घेते हे एक मिपाकर म्हणून आपले फार मोठे यश आहे... जिथे प्रत्येक क्षणाला काही किक नसेल क्षणात वाचनाचा रस गमावून बसायच्या आजच्या वॉट्स युगात आपण जे काही सुंदर, समतोल व माहितीप्रद वाचकांसाठी घेउन येता त्या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे...

टंगळ मंगळ न करणे, अकारण मजा न घेत बसणे, आवेशपूर्णचर्चेत न झोकून देणे हे काही दुर्गुण सोडले तर एक मिपाकर म्हणून आपला मला अभिमान वाटतो... असेच लिहित रहावे ही विनंती

_/\_

कुमार१'s picture

24 Aug 2021 - 8:26 am | कुमार१

अभ्यासपूर्ण सुंदर प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
वाचकांना असे समाधान मिळत राहील असे लिहिण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल.

मला बऱ्यापैकी आरोग्य वाचनही करावे लागते. त्याच्या लेखन संदर्भात वाचकांच्या प्रश्नांमध्येही बर्‍यापैकी वेळ व शक्ती खर्च करावी लागते .
त्याचा विचार करूनच मी आवेशपूर्ण अथवा वादग्रस्त चर्चापासून मला लांब ठेवलेले आहे !
ते माझ्या मूळ लेखनशक्ती टिकवण्यासाठी आवश्यक आहे.

गॉडजिला's picture

24 Aug 2021 - 12:17 pm | गॉडजिला

पण तुमची मूळ लेखनशक्ती तुम्हाला तेव्हडा ट्यारपी देणार नाही जेव्हडे तुम्हाला थोडा आविचार करून आवेशपूर्ण अथवा वादग्रस्त चर्चा करून मिळू शकेल व त्याचा दुहेरी फायडा हा आहे की तूम्ही हाडाचे मिपाहक्क वापरकर्तेकर ठराल आणि तुमच्या मुळ आवडीच्या लिखाणाला बरेच जास्त लोक वाचतील, कारणं ते तूम्ही लिहलंय... शेवटी एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी म्हणतात तसं...

माझे म्हणणे पटत नसेल तर जरा इकडे तिकडे बघा अनेक डॉक, सर, कलाकार, चित्रकार, कथाकार, प्रतिसाद बहाद्दर वगेरे वगेरे वगेरे इथे हे नक्कीच करताना दिसतील... इथे कटकट दोनच प्रकाराचे लोकं कमी करतात अथवा करत नाहित १) कसलाच अभ्यास नसणारे २) हुच्च हभिरूचीचा भाव लावणारे

तसेही मुळात तुमच्यात ठसठसणारा एखादा दुर्गुणच नसेल तर तूम्ही लिखाणात ठसा कसा उमटविणार ?

अगदी आत्ता देखील एखादी कथा वाचायला मिळेल असे वाटले होते पण...
>>
मलाही वाटले की समारोप हे दहाव्या कथेचे नाव आहे. :)

असो...
' आता का नाही' असं विचारायच्या आधी ' आता का?' असं विचारलं जाण्यात थांबण्याची मजा असते. तुमचे हे कथा लेख कायमच स्मरणात राहतील.

धन्यवाद, डॉक्टर..

Bhakti's picture

24 Aug 2021 - 7:02 am | Bhakti

यानिमित्ताने मनावरील वैचारिक धूळ झटकून इंग्लिश साहित्यवाचनाचा पुन्हा एकदा सराव केला आणि त्या भाषेची खुमारी अनुभवता आली.

खुपचं छान झाली मालिका!
निवडलेल्या प्रत्येक कथा आणि तुम्ही लिहिलेल्या कथेचा रसास्वाद परिणामकारक होता.

कुमार१'s picture

24 Aug 2021 - 8:32 am | कुमार१

तुका, धन्यवाद.

आता का नाही' असं विचारायच्या आधी ' आता का?' असं विचारलं जाण्यात थांबण्याची मजा असते
>>> अ ग दी !

सदरलेखनाच्या बाबतीत मी विजय तेंडुलकर आणि लक्ष्मण लोंढे या दोन दिग्गज साहित्यिकांना आदर्श मानतो.
त्या दोघांच्याही लेखनातून मला हा मुद्दा उमजला होता. वाचक अथवा संपादकाने 'आता थांबा ', असे म्हणायच्या आधीच काही काळ हे दोन्ही लेखक त्यांचे सदर लेखन थांबत असत.
......

भक्ती
सातत्यपूर्ण प्रतिसाद व उत्साहवर्धना बद्दल आभार !

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Aug 2021 - 8:05 am | ज्ञानोबाचे पैजार

काही कथा / कादंबरर्‍या मनात घर करुन बसतात. इतक्या की वाचून कित्येक वर्षे झाली तरी त्यांचे गारुड काही कमी होत नाही, मग ती कोणत्याही भाषेत असो.

खरे तर मी देखिल एखादी नवी कथा वाचायला मिळेल या अपेक्षेने आलो होतो. पण या सहज सुंदर आणि नेमक्या मनोगताने निराश केले नाही.

समारोप केला असला तरी अजून काही नव्या कथांची ओळख करुन घ्यायला आवडेल. तेव्हा होउन जाउदे अजून एक दहा भागांची मालिका.

इतर भारतिय भाषेतल्या अनवट कथांचा परिचय करुन देण्याची कल्पना / सुचना सुध्दा छान आहे.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

24 Aug 2021 - 8:36 am | कुमार१

सातत्यपूर्ण प्रतिसाद व उत्साहवर्धना बद्दल आभार !

तुमची सूचना चांगली आणि विचार करण्याजोगी आहे.
सध्या ओ टी टी चा जमाना आहे . त्याला अनुसरून असे म्हणतो :

ही दहा भागांची मालिका झाली त्याला आपण पहिला मोसम असे म्हणू या ! बरोबर अजून एक वर्षाने दुसर्‍या मोसमाचा विचार करता येईल.
बघूयात....

रांचो's picture

24 Aug 2021 - 12:43 pm | रांचो

<बरोबर अजून एक वर्षाने दुसर्‍या मोसमाचा विचार करता येईल.> एक वर्षभर नका वाट पहायला लावुत डॉक. काळावर कुणी विजय मिळवला आहे ?

कुमार१'s picture

24 Aug 2021 - 12:47 pm | कुमार१

त्या दुव्यावरील कथा चांगली आहे .
पण सध्या अन्य काही उपक्रमात आणि कामात व्यग्र आहे.
सवडीने बघू
धन्यवाद !

स्मिताके's picture

24 Aug 2021 - 6:24 pm | स्मिताके

मलाही ही "समारोप" नावाची कथा असेल असं वाटलं होतं. :)
सर्व प्रतिसादांशी सहमत.

Nitin Palkar's picture

24 Aug 2021 - 7:14 pm | Nitin Palkar

अनेकांप्रमाणे मलाही ही समारोप नावाची कथा असेल असेच वाटले होते.
एखाद्या प्रेक्षणीय स्थळाकडे जतानाचा प्रवासही जसा मनोरम असतो, त्या स्थळी पोहोचल्यावर प्रवास सांपल्याचीसुद्धा जशी हुरहूर लागते तसे काहीसे वाटत आहे. अतिशय रंगलेली ही कथा परिचय मालिका इतक्यात संपू नये असे वाटत होते.
तुम्ही म्हणता तसे हा पहिलं मोसम संपला असेच होवो, पुढच्या मोसमाची नक्की वाट पाहतोय..
तुमच्या एकंदर लेखनातील विषय वैविध्याबद्दल तुमचे कौतुक वाटते.
पुलेशु
_/\_

कुमार१'s picture

24 Aug 2021 - 8:07 pm | कुमार१

सातत्यपूर्ण प्रतिसाद आणि प्रोत्साहनाबद्दल आभार !

लोकहो,
या भागात केलेला 'समारोप' याला सर्वांनी माझी कथा समजायला हरकत नाही !!
:)))))

मित्रहो's picture

25 Aug 2021 - 10:07 am | मित्रहो

खूप छान उपक्रम, खूप सुंदर कथांची सुंदर ओळख.
साऱ्य़ाच कथा आवडतील असे नाही हे खरे आहे.