तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
27 Jun 2023 - 3:17 pm

मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती.
तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे. लहानपणापासूनच अलौकिक जाणीव असलेले तुकाराम आंबील्ये ..ते ब्रम्हज्ञान मिळालेले.. तुकाराम महाराज असा मोठा प्रवास हळू हळू उलगडत जातो.
तुकोबांचे वडील विठ्ठलाचे भक्त ,वैष्णवपन्थीय,दरवर्षी वारी करणारे,प्रपंच घडी नेटकी ठेवणारे समाजातील सज्जन व्यक्ती होते.अशा वातावरणात तुकाराम यांनाही विठ्ठलाचा लळा लागलाच,भाळी तेच लिहिले असणार.
मोठा भाऊ सावजी लवकर विरक्तीस लागला.आता आई वडिलांची आशा तुकारामच होते .त्यांचाही सावकारकी करावी ,व्यापार वाढवावा असा रोखठोक व्यवहार होता.पहिल्या पत्नीच्या आजारपणामुळे आईने 'आवली' ही दुसरी बायको तुकोबांसाठी आणली.परि हा प्रपंचात असतानाही मनात विठोबाचे स्मरण असतच. संध्याकाळी दीप लावणे ,मंदिरात पंचपदी ,इतर वेळी नामदेव –एकनाथ –ज्ञानेश्वर यांचे अभंग,ओव्या वाचन ,लेखन सुरु होते.केवळ ज्ञानतेज उजळायचे बाकी होते.
सतत ओव्या लिखाण वाचन यामुळे तुकोबांचे ते लीलया पाठ झाले होते.वारीत त्यांच्या मुखामुखावाटे नेहमी रसाळ अभंग ऐकायला मिळत आणि ते त्यांचे निरुपणही सुरेख करत .पुढे मग आमच्याकडे कीर्तन कराल का?अशी प्रेमळ मागणी लोकजन करू लागले.
हरिसेवा,कीर्तन निरुपण ,प्रपंच सर्व निईतसे सुरु होते.काळाने रूप बदलले आधी पित्याचे मग मायेचेही छत्र हरपले,तुकोबा घरातले मोठे कर्ते पुरुष झाले.हा सगळा भार लीलया करत होते.त्यासाठी देशाटन करीत ते कोकणात मीठ खरेदीसाठी गेले.पहिल्यांदा समुद्र पाहिला.त्याचे अपूर्व वर्णन गोनीदांनी तुकोबांच्या नजरेसाठी केले आहे.

“काय त्या उसळणाऱ्या लाटा !असे गमते की जणू डोंगरच धावत येत आहे.किनाऱ्यावरील हे सर्वच स्थूळसूक्ष्म आता गिळून टाकणार ही लाट !पण नाही,ज्ञानोबांचे खरे .किनारा सोडून पाणी अलीकडे काही येत नाही एवढे त्याचे कल्लोळणे सुरु असते,आणि तीरावरची बायाबापादिखुस्हाल आपापले वेव्हार उर्कीस असतात .त्यांस समुद्र केवळ घर आंगण झाला आहे”
सत्य ज्ञानानांतगगनाचे प्रावरणा नाही रूप वर्ण गुण जेथे!

हे एवढे अमर्याद आकाश ,त्याचे त्याने या धरती सागरावर पांघरूण घातले आहे.
आणि कोकणातून देहूला परत येतांना घाट डोंगर पाहून ते म्हणतात ,
“ज्यांना विश्वाच्या जानित्याच्या करनीच चमत्कार पाहायचा असेल ,तर आपले गावढे सोडून या पर्वतांवर गेले पाहिजे”

“जेथ आमृताचेनी पाडे|मुळेहीसकट गोडे|
जोडती दाटे झाडे| सदाफळती
पाउला पाउला उदके|परीवर्षाकाळाही चोखे
निर्झर का विशेखे |सुलभे तेथ
-ज्ञानेश्वर महाराज

पण त्यावर्षी ज्येष्ठ सरला तरीही पावसाच्या मेघांचा थांग नव्हता.धरती चीराळली होती.गायी गुरे तरवडही खाऊन दिवस काढीत होती.शेती भकास झाली होती.पाऊस रुसला होता .दुष्काळ पसरत होता.अशाही परिस्थित तुकाराम वारकऱ्यांसोबत नित्यनेमानुसार पंढरी जाऊन त्या सावळ्यास “पाण्याचे लोट उसळू डे ,रान शेत बहरू दे असे साकडे करून आले”
परंतु मेघराज खुश झालाच नाही ,पावसाने चांगलीच दडी मारली.
लोक अन्नाच्या दाण्याला मुकु लागले.

तुकारांम यान्च्या घरी लोकांच्या रांगा लागल्या “हे दागिने,डाग घ्या ,ऋण द्या धान्य आणायचं आहे ,धान्य द्या ...एव्हढा दुष्काळ आम्हांस जगवा.”
अखेर दुकानातलेही धान्य संपले.लोकांच्या रांगा संपत नव्हत्या .तुकाराम मंदिरात नित्यपूजा करीत असता विठ्ठलाने सदबुद्धी दाखवली ...मार्ग दाखवला.घरातले सर्व दागिने कर्जावर ठेवून तुकोबांनी त्यातून साऱ्या गावासाठी धान्य खरेदी केलं.पण तरीही पुरले नाही.दुष्काळ गुराढोरांचा,माणसांचाही घास घेत होता.सर्वत्र प्राण्याच्या प्रेताची त्यावर घिरट्या घालणाऱ्या गिधाडांची गर्दी दाटली.भकास दुष्काळाचे वर्णन अंगावर काटा आणतो.सावकाराने एक ना ऐकले कर्जफेडीचा तगादा लावत शेवटी घरी धाड घालत”तुकाराम आम्बिल्ये यांचे दीवाळ निघाल ,अशी दवंडी पिटवली.” भरीत भर तुकारामांची पहिली बायको अन्न अन्न करून वारली आणि पाठोपाठ मुलगाही गेला.
अशा दु:खाचे भार माथी घेऊन तुकाराम पुरते खचले....दूर निघून गेले....कोणासही न सांगता...ते कुठे गेले?

तुकारामांना शोधायला माउलींची आळंदी,पुणे,चाकण,जुन्नर ना ना ठिकाणांचा शोध घेतला.अखेर १४ दिवसांनी भामगीरीच्या पर्वतावर एका खोल घळीमध्ये एक तेजस्वी चेहरा ,ब्रम्ह्तेज असलेला दिसला-तुकोबाराय ...शांत प्रसन्न ,ध्यानस्त!त्यांच्या शरीरावर त्यांचे स्वामित्व संपले ,ते आता निळ्याचे झाले होते.या आनंदात ते म्हणतात,

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

त्याना धन्य तृप्त वाटत आहे
पूर्व जन्मी सुकृते थोर केली|
ती मज आजि फळासी आली||
परमानंदु आजि मानसी||
-माउली

पर्जन्यधारा न्हात न्हात घराशी पोहचताना इतक्या दिवसांच्या कल्मेषाचे मूळ त्याना समजले –जनाचे व्याज ,सावकारी.आपले अमंगळ ऋणाची खातेवही ..हा मोह...इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे ते ठरवतात.पत्नी आवली संघर्ष करते पण सारे व्यर्थ ...तुकोबा आता मोह मुक्त होतात.
तुकोबारायांच्या मनीच्या अभंगाच्या धारा धो धो करत वाहत सुटतात.अगणित अभंग उत्स्फूर्त त्यांच्या मुखावाटे प्रगटत असतात.एकांत चिंतनासाठी ते भांडारेश्वर मंदिरात ध्यानाला बसत,ग्रंथ अभ्यासात श्रीहरी हृदयात वास्तव्य करून असे-

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हाचि वर देईं ।
संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

आणि ही अजरामर रचना..

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

हे सारे घडत होते पण सामर्थ्य कोण देत होते ..प्रत्यक्ष हरीच

आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची ॥2॥
काय म्यां पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभर बोलविले ॥3॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायाविण ॥१॥

समाजातील अंधश्रद्धेवर मार्मिक टीका ,प्रपंच मर्म ,देवाचा गोंधळ’,ओव्या अनेक साहित्य प्रकार त्यांच्या प्रतिभेतून स्फुरत राहत होते.
एक गमतीशीर रचना ,प्रपंचातून मन सुटत नाही ..देवाची गोडी काही लागत नाही...

परिसे गे सुनेबाई |
*नको वेचू दूध दही ||१
*आवा चालीली पंढरपुरा |
*वेसींपासुन आली घरा ||२
*ऐके गोष्टी सादर बाळे |
*करि जतन फुटके पाळे ||३
*माझा हातींचा कलवडू |
*मज वाचुनी नको फोडूं ||४
*वळवटक्षिरींचे लिंपन |
*नको फोंडू मजवाचून ||५
*उखळ मुसळ जाते |
*माझे मनं गुंतले तेथे ||६
*भिक्षुंक आल्या घरा |
*सांग गेली पंढरपुरा ||७
*भक्षी परिमित आहारु |
*नको फारसी वरों सारू ||८
*सुन म्हणे बहुत निके |
*तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९
*सासुबाई स्वहित जोडा |
*सर्वमागील आशा सोडा ||१०
*सुनमुखीचे वचन कानी |
*ऐकोनी सासु विवंची मनी ||११
*सवतीचे चाळे खोटे |
*म्या जावेसे इला वाटे ||१२
*आता कासया यात्रे जाऊ |
*काय जाऊन तेथें पाहू ||१३
*मुले लेकरे घर दार |
*माझे येथेंचि पंढरपूर ||१४
*तुका म्हणे ऐसे जन |
*गोवियेलें मायेंकरून ||१५

जुन्नर ,कोल्हापूर अनेक ठिकाणी तुकारामाच्या कीर्तनाचे सप्ताह ऐकण्यास झुंबड उडत.त्यांच्यामुळे अनेक जन वारकरी,माळकरी झाले.
पण आवली मात्र काळ्या पांडुरंगाचे गुणगान गात नव्हती..कर्काशाच होती.

देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥
स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागीं कर्कशा करुनी ठेवी॥२॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥

ते तिला समजावून सांगत मन मोठ कर..तरच तुझा माझा वियोग होणार नाही.

हळू हळू तुकारामांच्या रचना सर्वत्र गाजू लागल्या.एक कुणबी रचना करतो,वेदांवर टीका करतो असे खुसपट रामेश्वर भट यांच्या समोर येते.”तू या पुढे अभंग लिहू नको जे लिहिले ते इंद्रायणीत बुडव”असे फर्मान तुकोबांना सुचवतात.
तुकोबाराय याने उद्विग्न होतात,ही काय ईश्वराची माया ?तोच रचविता होतो आणि तोच परीक्षा घेतो?
नाही या परीक्षेस सामोरे गेले पाहिजे..
जलदिव्य केलेच पाहिजे.तुकाबांचे देवाशीच भांडण लागते.माझा संशय फिटू दे.हे लिखाणाचे बाड देवाचे असेल तर ते तरून वर येईल नाहीतर या पाण्याआड राहिलं!
आठ दहा चौदा दिवस इंद्रायणी काठी ते अन्नपाण्याशिवाय संकेताची वाट पाहत ठाण मांडतात.
आणि संशय फिटतो.ज्या दोर्यांनी बाड दगडाने बांधलेले असतात ते मासे खातात आणि वह्या पाण्यावर तरंगून येतात.

थोर अन्याय केला | तुझा अंत म्यां पाहिला |
जनाचिया बोला | साठीं चित्त क्षोभविलें ||१||
भोगविलासी केला क्षीण | अधम मी यतिहीन |
झांकूनी लोचन | दिवस तेरा राहिलों ||२||
अवघें घालूनियां कोडें | तहानभुकेचें सांकडें |
योगक्षेम पुढें | तुज करणें लागलें ||३||
उदकीं राखिलें कागद | चुकविला जनवाद |
तुका म्हणे ब्रीद | साच केलें आपुलें ||४||

तुकाराम यांचे जीवन आता मोगरीचा मळा झाला ,सर्वत्र सुगंध त्याने चहू दिशांनी भ्रमर त्यांजकडे धाव घेऊन येऊ लागतात.
जनतेचा राजा शिवाजी महाराजही तुकोबांच्या कीर्तनाचा रसस्वाद घेतात..त्या वर वीररस यातील रचना घडतात.

ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!

माउलीने २१ व्या वर्षी समाधी घेतली आपण ४२ वर्षे जगलो आता इंद्रियांना हा तेज झोत सहन होईना.पण थांबावयास हवे.येथे रेंगाळून राहायला नको.

फाल्गुन वद्य बीज
आपुल्या माहेरा जाईन मी आता ! निरोप या संता हाती आला !!१!!
सुख दुःख माझे आइकिलें कानी ! कळवळा मनी करुणेचा !!२!!
करुनी सिद्ध मूळ साऊलें भातुके ! येती दिसे एकें न्यावयासी !!३!!
त्याचि पंथे माझे लागलेसें चित्त ! वाट पाहे नित्य माहेराची !!४!!
तुका म्हणे आता येतील न्यावया ! अंगे आपुलिया मायबापा !!५!!

प्रचंड वावटळ आली ,गरगरत... धूळ उठली ..जन डोळे चोळत राहिली ,काही नजरेस पडेना.
तुकोबांभोवती वेगाने वावटळ आली भिरभिरत आकाशापर्यंत गेली ,ब्रम्हांड घुसळून निघत होते...
तुकोबा दिसेनासे झाले
तुकोबाराय आकाशाएवढा झाला होता .

अणुरेणुया थोकडा ।
तुका आकाशा एवढा ||

a
-भक्ती

वाङ्मयसाहित्यिकआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Jun 2023 - 6:10 pm | प्रचेतस

सुरेख लिहिताय.
गोनीदांच्या रसाळ लेखणीतुन तुका आकाशाएव्हढा, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो ही पुस्तकं वाचणं एक अद्भुत अनुभव आहे.

खरंच!दोन पुस्तके झाली वाचून, आता दास डोंगरी राहतो वाचणार :)

सतिश गावडे's picture

27 Jun 2023 - 10:30 pm | सतिश गावडे

ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत.

अजूनही आठवते, लेखन इतके प्रभावी आहे की वाचत असलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर साकारत असे.

Bhakti's picture

28 Jun 2023 - 7:55 am | Bhakti

ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत.
आय अम अल्वेज लेट ..असो.

कर्नलतपस्वी's picture

27 Jun 2023 - 7:43 pm | कर्नलतपस्वी

१९८१ मधे काश्मीर मधे कृष्णा घाटीत कार्यरत होतो. गद्धे पंचविशीचे दिवस.

ना लोटा ना थाली
खुद ही खुद का कृष्ण मुरारी

कश्मीर जरी स्वर्ग आसला तरी मी जीथे होतो तो मात्र नर्कच म्हणला पाहीजे. एक अदद माशुका गावाकडे ,देशांतर्गत अंतरदेशीय पत्राने विचारांचे आदान प्रदान व्हायचे. एका पत्रात तीने गोनिदा च्या या नवीन प्रकाशीत पुस्तका बद्दल भरभरून लिहीले होते.
एक सहकारी सुट्टीवर गेले होते त्यांनी ऐबीसी मधून एक प्रत आणली. तेव्हा पहिल्यांदा वाचन झाले.आता ती पार फाटून गेली म्हणून दुसरी याच वर्षांत घेतली.

सांगायचा मुद्दा हा की यातील दोन प्रसंग गोनिदांनी फार सुंदर लिहीले आहेत. मला फार आवडतात. एक तुकोबा अंबिल्याचे तुकाराम महाराज झाले व आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडला व दुसरा जेव्हा महाराज सदेह वैकुंठाला जातात तो. गळा भरून येतो.

कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते.

पुढे काही दिवसांनी आमचे दिवस फिरले व "तू औरो की क्यू हो गयी", हे गाणं सतत ओठावर असायचे.

सर्वव्याधीवर एकच उपाय तो म्हणजे "समय बडा बलवान", पुढे सर्व चांगलेच झाले. विधिलिखित आणी काय.

Bhakti's picture

27 Jun 2023 - 9:38 pm | Bhakti

कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते.

बाकी फार हळव्या आठवणी लिहिल्या आहेत :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jun 2023 - 11:51 am | राजेंद्र मेहेंदळे

"तू औरो की क्यू हो गयी", आणि "समय बडा बलवान"

भावना पोचल्या. येउंद्या की टप्प्याटप्प्याने मिपावर

सतिश गावडे's picture

27 Jun 2023 - 10:31 pm | सतिश गावडे

छान ओळख करून दिली आहे पुस्तकाची.

प्रसाद गोडबोले's picture

28 Jun 2023 - 12:00 am | प्रसाद गोडबोले

सुंदर !

Bhakti's picture

28 Jun 2023 - 7:56 am | Bhakti

धन्यवाद मार्कस!

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।।
येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 1 ।।
आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।।
कंथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु।। 3 ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची।। 4 ।।
तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।। 5 ।।
पांडुरंग पांडुरंग

https://open.spotify.com/track/3zjH9MwmE3ecLYsKZ2tdlL?si=hzovaHPVSg2qMq7...

तुकोबांचे अनेक लोकप्रिय अभंग हे त्यांचे स्वतःचे नसून प्रक्षिप्त आहेत असे अनेक जण म्हणतात.

श्रीगणेशा's picture

28 Jun 2023 - 3:49 pm | श्रीगणेशा

छान लिहिला आहे पुस्तक परिचय!
----
अवांतर: बरीच वर्षे देहू पाहायचं राहून गेलं होतं. शेवटी, या उन्हाळ्याच्या सुट्टीत देहू दर्शन झालं. तेथील गाथा मंदिर छान आहे!

हो,गाथा मंदिर सुंदर आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2023 - 9:23 pm | मुक्त विहारि

लेखन आवडले

कुमार१'s picture

14 Oct 2023 - 8:01 pm | कुमार१

सुरेख !