सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
12 Dec 2008 - 12:42 am

नमस्कार,
लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर्‍याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्‍याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले.

मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो. सोबत तीन-चार वर्षे वयांत अंतर असलेले आम्ही चौघे पाच मित्र होतो. मजा करत, हास्य विनोद करत आम्ही चाललो होतो. तेव्हढ्यात आम्हाला दिसले की पदपथावर एक अपंगाच्या चाकाच्या गाडीमध्ये मध्यमवयीन माणूस बसला आहे आणि तो इतरांकडे काही मदतीच्या अपेक्षेने पाहतो आहे. त्याने आम्हा मुलांना बोलावले आणि त्याची गाडी ढकलून थोडे अंतर चढ पार करुन द्यायला सांगितले.

त्याचे ते अतिशय ओंगळ रुप, अत्यंत मळलेले फाटके आणि एकावर एक चढवलेले कपडे आणि रोगट त्वचा अंगावर काटा आणत होती. आजवर झालेल्या पुस्तकी संस्कारांनी डोके वर काढले पण कृती करायला मन धजेना. तेव्हड्यात आमच्यातला एक जण उत्साहाने पुढे आला आणि त्याने त्या माणसाला ढकलत पुढे नेऊन सोडले. हे सर्व इतक्या जलद गतीने झाले की मी मनामध्ये एकदम खजील झालो. वास्तविक मी ती गाडी ढकलायला तयार नाही हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाच समजले नाही करण माझ्या मनातली उलघाल सुरु होत असतानाच माझा मित्र पुढे झाला सुद्धा होता.

अश्या ओंगळ किंवा किळस उत्पन्न करणार्‍या पण असहाय्य व्यक्तींबद्दल आपल्या मनात सहानुभूती असते. त्यांना मदत करावी असे ही समाजातला एक चांगला घटक म्हणून आपल्याला वाटत असते. पण सार्वजनिक ठिकाणी अशी वेळ आल्यावर माणसे चटकन तो प्रसंग टाळायला पाहतात असे मला निरिक्षणातून जाणवले आहे.

असे का व्हावे असा विचार आता करताना वाटले की अश्या वेळी अश्या माणसासोबत काही क्षण सुद्धा आपण आहोत ही भावना आपल्याला सहन होत नाही. पण पोक्त माणसे या भावनेवर विजय मिळवून कृती करतात.
-- लिखाळ.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 1:07 am | विसोबा खेचर

असे का व्हावे असा विचार आता करताना वाटले की अश्या वेळी अश्या माणसासोबत काही क्षण सुद्धा आपण आहोत ही भावना आपल्याला सहन होत नाही. पण पोक्त माणसे या भावनेवर विजय मिळवून कृती करतात.

सही बोला भिडू..

प्रामाणिक प्रकटन आवडले..

मी तिथे असतो तर मी देखील पटकन पुढे झालो असतो असे काही म्हणता येणार नाही...!

असो..

लिखाळा, तुझे हे छोटेखानी प्रकटन पटकन मला आरसा दाखवून गेले. त्या आरशात मला माझ्या चेहेर्‍याची एक खजिल छटा दिसली असं प्रामाणिकपणे सांगतो.. :)

तात्या.

शितल's picture

12 Dec 2008 - 1:15 am | शितल

लिखाळ,
लेख वाचला अनुभव पटला, कारण , मी ही शाळेत असतानाची गोष्ट ,तेव्हा एका भाजी वाल्या बाईची बुट्टी डोक्यावरून खाली घेण्यासाठी तीने मला बोलावले असता, तीला मदत न करता मी त्या बाईकडे तसेच पहात राहिले होते कारण तीचा तो कळकट मळकट पेहराव हेच कारण होते, पण ती गोष्ट मा़झ्या आईने पाहिली आणी मला काहीच न बोलता फक्त तिने त्या बाईच्या डोक्यावरची बुट्टी खाली उतरायला मदत करून कृती करून दाखविली तेव्हा माझे मलाच खुप वाईट वाटले होते, पण नंतर कॉलेज मध्ये असताना अशीच एक फळवाली बाईने मला तिच्या डोक्यावरील बुट्टी खाली घेण्यासाठी मदत मागितली तेव्हा मला खुप आनंद झाला आणी मी तीला मदत केली, आणि मनाला खुप बरे वाटले. :)

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 1:16 am | विसोबा खेचर

एका खचाखच भरलेल्या लोकलमध्ये मंडळी दाटीवाटीने बसली होती. बसायला मिळालेली मंडळी आपल्याला बसायला मिळाले आहे अशी विजयी मुद्रेने बसली होती. दोनचार माणसं दोन बाकांमध्ये दाटीवाटीनं उभी होती. एक इसम छानश्या मिळालेल्या सुलट्या खिडकीत वार्‍यावर निद्रादेवीला मिठीत घेऊ पाहात होता.

तेवढ्यात,

"जरा खिडकी के पास जाना है. मुझे उलटी आ रहा है.."

असं उभा असलेला एक इसम म्हणाला!

ते ऐकल्या बरोब्बर इलेक्ट्रिक करंट बसावा अश्या रितीने बसलेली मंडळी फटाफट उठली. तो खिडकीतला इसमदेखील आपल्या अंगावर हा ओकला तर घ्या काय! या भितीने खाडकन उठला. त्यानंतर तो उलटी येत्ये असं वाटणारा इसम आरामात सुलट्या खिडकीत बसला आणि झोपी गेला. व्हीटी येईपर्यंत तरी त्याला उलटी झाली नव्हती! ;)

आता एखाद्याला उलटी होणं म्हणजे काही पाप नाही की गुन्हा नाही, परंतु मुद्दा होता तो इतरांना वाटणार्‍या घृणेचा, जो मला या निमित्ताने आठवला! :)

आपला,
(रात्री जरा दोन घास कमीच खाणारा!) तात्या. :)

वल्लरी's picture

12 Dec 2008 - 2:01 am | वल्लरी

=)) =)) =)) =))
ह.ह. पु. वा........

टारझन's picture

12 Dec 2008 - 3:03 am | टारझन

साहजिकच आहे की ... च्यायला .. काय बी आरबट-चरबट खाल्लं असावं त्याने.. ओकला अंगावर तर काय घ्या ? किळस म्हणून नाही तर ओकला अंगावर तर तोच आंबूस वास घेउन फिरावं लागेल ते वेगळंच .. पण मानसिक शीण होईल त्याचं काय ? एकंदरीत कोणाला ओकारी येत असेल, कोणाला वायू सरणार असेल .. किंवा आणिक काय .. तर त्याच्या रेंजच्या बाहेर जाण्यातच शहाणपणा आहे ....

तात्या, ही प्रतिक्रिया अवांतर आहे का हो ? मला यात एखाद्याची मदत करायची पण किळस किंवा लाज वाटली म्हणून करू शकलो नाही , असा निष्कर्ष नाही निघला ... निष्कर्ष चुकिचा असू शकतो त्यामुळे आधीच माफी मागून ठिवतो.

- (चार घास खाऊन दोन घास जागा रिकामी ठेवणारा) टार्‍या

आपल्यावरचे संस्कार आणि पोशाखीपणा हे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकतात आणि ज्या मताची सरशी होईल ते कृत्य आपण करतो!

माझाही एक साधारण असाच अनुभव आहे. आम्ही मित्र संध्याकाळी कट्ट्यावर जमायचो. असेच दहावी अकरावीत असू. आम्ही बसायचो तिथे चांगलाच चढाचा असा रस्ता होता. एक दिवस एक म्हातारा, थकलेला, घामाने डबडबलेला हातगाडीवाला मालाने खचाखच भरलेली हातगाडी ओढत त्या चढावरुन जायला लागला. त्या चढापुढे त्याचा जोर कमी पडला खांद्यावरच्या चामड्याच्या पट्ट्याचा हिसका बसून घसरणार्‍या गाडीबरोबर तो मागे फरपटत येऊ लागला त्याक्षणी आम्ही चौघे पुढे झालो मी व एक मित्र गाडीच्या पुढे आणि दोघे मागे अशी ती गाडी चढापार नेली. त्या म्हातार्‍याला शेजारच्या कट्ट्यावर बसवून पाणी दिले. ते पाहून त्याच्या करुण डोळ्यात तरळलेले पाणी अजून आठवते! हेच अनुभव शिकवून जातात हे खरे!

चतुरंग

विकेड बनी's picture

12 Dec 2008 - 1:35 am | विकेड बनी

मला मागे कोणीतरी सांगत होतं की एक साईट काढूया पण मला कल्पना रुचली नाही. खूप ओंगळ वाटली, खूप खत्तरनाक म्हणून मी ती साईट काढायला मदत केली नाही. आज ही चर्चा वाचून मला माझी चूक कळली. आता जर कोणी साईट काढली तर मला त्यात काही वाटणार नाही.

हलकेच घ्या.

-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

अनाडि's picture

12 Dec 2008 - 2:41 am | अनाडि

वा मजा आहे.

काही भाग संपादित.

अनाडि.
(ब्दुल नारायण डिसुझा)

मुक्तसुनीत's picture

12 Dec 2008 - 2:31 am | मुक्तसुनीत

जाऊ द्या हो लिखाळ राव , तुमच्यासारखे लोक कुणालाही येतील असे अनुभव स्वतःला आले की ते प्रांजळपणे कथन करतात. अशा कथनातून आमच्यापैकी बहुतेकांना आपलाच चेहरा दिसतो , अशा प्रसंगांमधले कारुण्य दिसते. कुणी म्हणावे , अशा अनुभवांच्या कथनातून आमच्यापैकी कुणाला आपल्या कोशातून बाहेर येऊन मूलभूत माणुसकी दाखवायची बुद्धी होईल. पण आमच्या पैकी काहीना असे लिखाण ओंगळ नि खतरनाक वाटते. असे लोक स्वतः कधी एक स्वतंत्र मत मांडतील , कुठला नवा विचार मांडतील , काहीतरी सकारात्मक करतील तर शपथ. पण तोंड वेंगाडायला नि कुणावरही दुगाण्या झाडायला मोकळे.

माझ्या अल्पमतीला तुमचे लिखाण अतिशय प्रामाणिकपणाचे वाटले, त्यातून काहीतरी बोध घ्यावा असे वाटले. अक्कलच कमी आमची , आम्हाला कोण बोलावतंय साईट काढायला ! ;-)

काही भाग लेखकाद्वारे संपादित.

विकेड बनी's picture

12 Dec 2008 - 3:37 am | विकेड बनी

माझा फोटो काढू नका की प्लीज

-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

धनंजय's picture

12 Dec 2008 - 2:51 am | धनंजय

लिखाळ यांचे प्रामाणिक स्फुट आवडले. माझाच चेहरा दिसला (मदतचुकार म्हणून). पूर्वी मुळीच मदत करत नसे, पण एका चांगल्या मित्राच्या सहवासाने, त्याचे उदाहरण बघून माझ्यात थोडासा बदल झाला आहे. (तो मित्र लोकांना आवर्जून मदत करतो.)

आजकाल कोणी "मदत कराल का" म्हटले, तर सहसा थांबतो - पैसे मागितले तर मात्र "नाही" असेच म्हणतो. (हेच अधिक असतात :-( )

चित्रा's picture

12 Dec 2008 - 9:17 am | चित्रा

पैसे मागितले तर मीही नाही म्हणत असे, हल्ली म्हणत नाही. पैसे देणे योग्य की अयोग्य, कल्पना नाही.

छोटेखानी लेख विचार करायला लावणारा.

सहज's picture

12 Dec 2008 - 4:06 am | सहज

शाळेत असताना, एकदा रस्ताच्या दुसर्‍या बाजुला एक मनुष्य जरा हेंदकाळत चालत होता, एक दोन वेळा पडता पडता वाचला. त्याच्या वेशभुषेकडे पाहुन तो अट्टल बेवडा असेल असे वाटले नाही, पुढे रस्त्याला वळण होते व तिथे वहातुक जास्त होती, न जाणो ह्या माणसाच्या अंगावर गादी यायची किंवा रस्ता ओलांडताना अपघात होईल ह्या माणसाचा अशी एक शंका मनात. "सकाळ" मधे बेफीकिर, बेपर्वा बघ्यांच्या बातम्या वाचल्या होत्या त्यामुळे "नॉट ऑन माय वॉच" म्हणुन एक मित्राला बळेबळे ओढत, मी त्या माणसाला रस्ता ओलांडायला मदत म्हणुन गेलो. जेव्हा त्याला आम्ही दोन्ही बाजुनी आधार द्यायला व तो आमच्याकडे बघुन फिस्कारत हसायला व त्याचा तोंडातुन भपकारा पार आमच्या नाकातुन मेंदुत. माझा मित्र माझ्यावर वैतागला होता. :-)

झकासराव's picture

12 Dec 2008 - 9:34 am | झकासराव

आरसा रे निव्वळ आरसा आहे हा तुझा लेख. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

स्वाती दिनेश's picture

12 Dec 2008 - 2:23 pm | स्वाती दिनेश

प्रामाणिक प्रकटन आवडले, लिखाळबाबू.
स्वाती

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 4:14 pm | लिखाळ

लेख वाचून आवर्जून प्रतिसाद देणार्‍या तसेच आपले अनुभव आणि मते मांडणार्‍या आपल्या सर्वांचे आभार. तुमचे अनुभव वाचून एक लक्षात येते की माझे निरिक्षण बरोबर आहे. चतुरंग म्हणतात तसे पोषाखीपणा आणि घृणा यामधले द्वंद्व अश्यावेळी समोर येते. सवय आणि संस्कार या वेळी माणसाला कनवाळुपणे मदतीसाठी प्रवृत्त करत असतात.

गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. एक महारोगी त्यांच्या कडे वास्तव्यासाठी आला होता. ते रोज त्याला शेजारी बसवून त्याची विचारपूस करत असत, त्याला औषधपाणी मिळते आहे ना ते पाहात असत आणि धीर आणि उत्साह देत असत.

असे अनेकानेक लोक आपल्या समाजात आहेत, होऊन गेलेत जे दुसर्‍याला सहजतेने मदत करतात. त्यावेळी त्यांना इतर लोकांच्या स्तुती-निंदेची काही फिकिर नसते. उलट त्यांचे असे सहज मदत करणे इतरांना पोषखीपणा टाकुन द्यायला मदतच करते.

मी लेखामध्ये लिहिलेला प्रसंग खरेतर कबुली किंवा कन्फेशन स्वरुपातला नाही. पण प्रत्येकाची काही मते असतात आणि दृष्टीकोन असतात. विकेड बनी यांनी जे मत नोंदवले त्याबद्दल मला काही वाईट वाटले नाही. तात्या आणि इतर अनेकांनी या लेखला बोधप्रद, आरसा दाखवणारा लेख असे म्हटले ते वाचून मला असे जाणवले की माझ्या मनात जे येते ते इतर अनेकांच्या मनात येत असते. त्यावर एक चांगली चर्चा आणि मतांची देवाणघेवाण झाली.
मी सर्वांचा आभारी आहे.
-- लिखाळ.

सुनील's picture

12 Dec 2008 - 4:31 pm | सुनील

असे अनेकानेक लोक आपल्या समाजात आहेत, होऊन गेलेत जे दुसर्‍याला सहजतेने मदत करतात. त्यावेळी त्यांना इतर लोकांच्या स्तुती-निंदेची काही फिकिर नसते. उलट त्यांचे असे सहज मदत करणे इतरांना पोषखीपणा टाकुन द्यायला मदतच करते.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वाहीदा's picture

12 Dec 2008 - 4:23 pm | वाहीदा


अश्या ओंगळ किंवा किळस उत्पन्न करणार्‍या पण असहाय्य व्यक्तींबद्दल आपल्या मनात सहानुभूती असते. त्यांना मदत करावी असे ही समाजातला एक चांगला घटक म्हणून आपल्याला वाटत असते. पण सार्वजनिक ठिकाणी अशी वेळ आल्यावर माणसे चटकन तो प्रसंग टाळायला पाहतात असे मला निरिक्षणातून जाणवले आहे.

खरे आहे !

दत्ता काळे's picture

12 Dec 2008 - 4:42 pm | दत्ता काळे

वास्तविक मी ती गाडी ढकलायला तयार नाही हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाच समजले नाही . . . अश्या प्रकारची "स्वत:च मन खाणारी " अवस्था, नंतर बराच काळ अपराध्यासारखी मनास डाचत राहते.

धमाल मुलगा's picture

12 Dec 2008 - 5:07 pm | धमाल मुलगा

माझाही एक अनुभवः

अस्मादिकांस उठसुठ लोकांना मदत करण्याची भारी हौस!
अकरावीत होतो तेव्हाची ही गोष्ट. आमची गणिताची शिकवणी बारामतीच्या एस.टी.स्टँडच्या बाजुलाच असलेल्या इमारतीत असायची. वेळ संध्याकाळी ६ वाजताची. नेहमीप्रमाणे आम्ही दहा पंधरा मिनिटं लवकर येऊन टवाळक्या करत बसलेलो.
अचानक एक मध्यमवयीन गृहस्थ आमच्यापाशी आला, चप्पल तुटलेली, शर्टाची दोन बटणं गायब, पँटही थोडी मळलेली असा.. अगदी दीणवाण्या चेहर्‍याने समोर आला, आम्हाला दादा-ताई दोन मिनिटं बोलु का तुमच्याशी असं विचारायला लागला.
त्याची ती अवस्था पाहुन सगळ्या मुलींनी तर पळ काढलाच, पण मुलंही "ए..चल ए...नीट" वगैरे करायला लागली..झालं, आमच्यातले तुकाराम महाराज जागे झाले...म्हणलं "काय काका? काय झालं?"
बस्स...त्याला एक हुंदका आला...मळक्या बाहीनं डोळे पुसत म्हणाला, "दादा, काय सांगू, माझ्या भावकीतल्यांनी मला चल जत्रेला म्हणुन गाडीत बसवून इथं आणलं, जमिनीच्या कागदांवर हाणुन मारुन सह्या घेतल्या...आणि माझ्याकडचे सगळे पैसे, अंगठी, चेन सगळं काढून घेऊन मला इथंच सोडून पळुन गेले..." हे सांगताना तो ओक्साबोक्शी रडायलाच लागला.. म्हणाला, "मला फक्त गाडीभाड्यापुरते पैसे द्या, तुमचा पत्ता द्या, मी मनिऑर्डर करेन. मला घरी जायला पायजे, माझी पोरगी आजारी आहे... "
ऐकुन पोटात तुटल्यासारखं झालं. खिसे चाचपले, आता अकरावीत कुठुन आलेत खिसे भरुन पैसे? सायकलचं पंक्चर काढण्यापुरते आणि एखाद-दुसरा फोन करण्यापुरते ५-७ रुपये होते. म्हणालो, पाच मिनिटं थांबा, आलोच.
शिकवणीला आलेल्या प्रत्येकाकडून किमान एकतरी रुपया घेतला, ५९ रुपये गोळा झाले. दिले त्याला. तो हट्ट करायला लागला, "पत्ता द्या, मनिऑर्डर करेन" म्हणुन एका मित्राचा पत्ता दिला. आमचे गुर्जी आले म्हणुन आम्ही शिकवणीला निघून गेलो. तासाभरानं बाहेर येऊन पाहतो तर हा भडवीचा त्या इमारतीच्या अंगणातच तर्र होऊन पडलेला.....
अशी कवटी तडकली ना....लाथाच घातल्या साल्याला...
पण आमचे सर धावत आले नी म्हणाले, आता मारुन काय उपयोग? आधी गाढवपणा करायला कोणि सांगितला होता तुम्हाला?

तेव्हापासून साला माझा विश्वासच उडालाय असा (आर्थिक) मदत करण्यावरचा.

हा माझा एक अनुभव सहानुभुती आणि त्यापायी केलेल्या प्रत्यक्ष कृतीचा!

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 10:30 pm | लिखाळ

सुनील, वाहिदा, बाळ्कराम, धमु आपल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

सहजरावांनी आणि धमुने मदत करायला गेल्यावर आलेल्या अनपेक्षित पण वाईट अश्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. मदतीची गरज नसताना समोरच्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन लुबाडणारे काही लोक असतातच. अश्या लोकांमुळे मदत करण्याची आपली इच्छा कमी झाली नाही हेच विशेष.
-- लिखाळ.