मौसमी....एक दुखरी सल (भाग २)

OBAMA80's picture
OBAMA80 in जनातलं, मनातलं
29 May 2021 - 11:28 am

.....ती रात्र मला अजून लख्ख लक्षात आहे. माझा पहिलाच दिवस. माझा मित्र अविनाश मुलांना शोधायला गेला होता आणि मी त्या तिकीट खिडकी जवळ आमची सामानाची बॅग सांभाळत उभा होतो. त्याच वेळी कपाळावरचे कुंकू फिसकटलेले, अस्ताव्यस्त झालेले केस, ओंठावरील लाली चित्रकाराने ब्रशचा फराटा मारावा तशी डाव्या गालापर्यंत पसरलेली, चोळीची वरचे बटन निघाल्यामुळे खांद्यावरून ओघळणारं सैलसर पोलकं, खांद्यावरून ढळलेल्या पदराचे भानही नसलेली, अंगाभोवती कशी तरी गुंडाळलेली साडी, किंचीत वेडेवाकडे पटाशिचे दात, फेंदारलेलं नाक, मोठाल्या नाकपुडया व त्याच्या छिद्रात कसल्या तरी काडीचा बारीक तुकडा टोचलेला, ओठावर किंचित केसांची लव, वर आलेली गालफाडे, खोल गेलेले मिचमिचे डोळे, हातात रंगबेरंगी बांगड्या, हातात चुरगाळलेली नोट व तोंडाने बंगाली भाषेत अर्वाच्च शिव्या देत एक सावळ्या रंगाची तरूण मुलगी थेट मी उभा होतो त्या दिशेला तरातरा चालत आली व माझ्याजवळच्याच पायरीवर येऊन बसली. ती येऊन बसली त्या पायरीपासून थोड्या अंतरावर जाऊन मी हळूच उभा राहिलो. कोणाशीतरी पैशावरून बहुतेक तिचे वाजले होते, त्यामुळे हातवारे करत इकडेतिकडे बघत बंगालीमध्ये त्या माणसाचा उध्दार चालला होता. अचानक, चांगल्या कपड्यातील व हॅंडसम दिसणार्‍या माझ्याकडे पाहून ती मला बोलवत असल्यासारखे हातवारे करून बंगालीमध्ये काहीबाही बोलू लागली. मी दाद देत नाही म्हटल्यावर माझ्या बाजूला येऊन, अंगाशी खेटण्याचा, लाडीगोडी करण्याचा व अश्लील हावभाव करून मला चेतवणाच्या प्रयत्न करू लागली. तिच्या नजरेत एक प्रकारचे आव्हान होते. ती नजर मला आरपार चिरते आहे असे वाटले. आजूबाजूचे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. भितीने माझी दातखीळ बसायची वेळ आली होती, तेवढ्यात माझा मित्र अविनाश देवदूतासारखा धावून आला. तिच्यावर किंचीत आवाज चढवून तो तिला पिटाळत म्हणाला,

“मौसमी, छोड इसे। ये मेरा आयआयटी का दोस्त है। यहां बच्चोंको सिखाने मेरी मदद करने आया है। चल उधर। तुझे बैठना है पढाई के लिए तो आजा।”

या बोलण्याचा तिच्यावर चांगलाच परिणाम झालेला दिसला. लहान मुल त्याच्या आवडीचे एखादे खेळणे ज्या नाखुशीने दुसर्यांना देते त्याच प्रकारे तिने मला जरा नाखुशीने सोडून दिले. तरी त्या रात्रभर तिचे ते अंगचटीला येणे व तीची नजर मला डाचत होती. स्टेशन वरून परत येताना अविनाशने मला सांगितले की येथे काम करणारी वेश्या आहे व तिला गिर्‍हाईक नसेल तेव्हा कधीमधे आपल्या आपल्या वर्गात शिकायला येऊन बसते. तिच्यापासून आपल्याला काही त्रास नाही. मी जरा टरकलो होतो. आत्ता झालेल्या प्रसंगानंतर मनोमन ठरवले की हिला शिकवायच्या भानगडीत पडायचे नाही व चार हात लांबच रहायचे.
नंतर अधेमधे ती भेटत राहिली पण लांबूनच. आदल्या रात्री जर तिला चांगले पैसे मिळाले तर दुसर्‍या दिवशी ती त्या मुलांसाठी काही खाऊ घेऊन यायची. माझे दोन्हीं मित्र तिच्याशी बोलायचे, तिने आणलेला खाऊ मुलांना वाटायचे पण माझी काही तिच्याबद्दलची भिती अजून ओसरली नव्हती. तिने त्या प्रसंगानंतर कधीही माझ्या अंगचटीला यायचा प्रयत्न केला नाही उलट तिच्या नजरेत एकप्रकारचा आदरभावच दिसायचा. पण म्हणतात ना माणूस ज्या गोष्टींपासून लांब रहायचा प्रयत्न करतो त्याच नेमक्या सतत आडव्या येतात.......

एका रात्री अविनाशला प्रोजेक्टच्या कामामुळे माझ्याबरोबर यायला जमणार नव्हते तेव्हां शाळेच्या कामात खंड पडू नये म्हणून मी अनिशबरोबर जायचे ठरले. आम्ही स्टेशनवर आलो तेव्हा कळाले की जवळच्या झोपडपट्टीतील मुलांनी या मुलांमधील एका मुलीची छेड काढली तेव्हां सौम्या नावाच्या मुलाने त्यांना विरोध केला. त्या मुलांनी सौम्याला भरपूर मारले होते. त्याचे हातपाय खरचटले होते, डोक्यावर खोच पडली होती व मौसमी त्याला आपल्या कुशीत घेऊन पाणी पाजत बसली होती. आम्हांला आलेले पाहताच तिला थोडा आधार वाटला. आम्ही सौम्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा ती पूर्णवेळ आमच्या बरोबर होती. डॉक्टरांची फी पण तिनेच भरली. हे सगळे संपवून रात्री साडेअकराला आम्ही जेव्हां निघालो तेव्हां जणूकाही आम्ही तिच्या धाकट्या भावाला मदत केल्यासारखी तीने आमच्या पाया पडून धन्यवाद दिले. आम्हांला संकोचल्यासारखे झाले. तिच्या त्या दिवशीचे डोळ्यातले भाव व पहिल्या दिवशी माझ्यावर रोखलेली नजर यात जमीन अस्मानाचा फरक होता. एक वेश्या असूनदेखील तिची त्या अनाथ मुलांबद्दलची तळमळ व प्रेम तिच्या नजरेतून आणि कृतीतून कळून येत होते. त्या दिवशी पहिल्यांदा अनिश व मी निशब्द झालो होतो. स्टेशन वरून परत येताना त्या निरव शांततेत फक्त आमच्या सायकलच्या पेडलचा करकर असा आवाज येत होता. माझ्या मनातील मौसमीबद्दलची भिती खूपच कमी झाली होती व भितीची जागा आता तिच्याबद्दलच्या कणवेने घेतली. माझा त्या प्रसंगानंतर तिच्याशी वागण्यात एक प्रकारचा मोकळेपणा आला. तिला गणितातील बेरजा-वजाबाकी, इंग्रजीतील सोपी सोपी वाक्ये शिकवताना एक प्रकारचे समाधान मिळू लागले. तीदेखील गुणी विद्यार्थ्यासारखी सगळे आत्मसात करायचा मनापासून प्रयत्न करायची. पण तिच्या शाळेत येण्यात कधीच नियमितता नसायची. कधी सलग दोन दिवस यायची तर कधी पंधरा पंधरा दिवस गायब व्हायची. त्यावर्षी कुठल्यातरी एका नियमीत गिर्‍हाईकाबरोबर दुर्गापूजेदरम्यान कलकत्ता फिरून व राहून आली. बहुतेक तिचे त्याच्यावर प्रेम बसले होते. दुसर्या दिवशी ती सतत स्वप्नांत हरवल्यासारखी तरंगत होती. आम्हांला त्या कलकत्ता भेटीचे, दुर्गापूजेच्या पंडालांचे सगळे इत्यंभूत वर्णन करून सांगताना तिचा उत्साह ओसंडून वहात होता. त्याच्या विषय निघाला की नव्या नवरी सारखी लाजायची. प्रत्येकासाठी तिने काही ना काहीतरी आणले होते. ती जणूकाही पहिल्यांदा माहेरी आलेल्या माहेरवाशीणीसारखी भासत होती. किती सांगू न किती नको असे तिला झाले होते. बाकीची सगळी मुले तिच्यावर हसत होती पण त्यादिवशी तिला कोणाचीही पर्वा नव्हती. ती तिच्याच विश्वात हरवलेली व रमली होती. तिच्या सावळ्या चेहर्यावरचे निरागस तेज त्यादिवशी पाहण्याजोगे होते......(क्रमश:)

कथाव्यक्तिचित्रणलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

30 May 2021 - 1:02 pm | तुषार काळभोर

खूप छान लिहीत आहात.
दुःखांत नसेल, ही आशा.

सुहास चंद्रमणी बारमासे's picture

30 May 2021 - 8:56 pm | सुहास चंद्रमणी ...

मौसमीचे भावविश्व छान रंगवले आहे,खरच काम कोणतेही करत असले तरी आपल्यामध्ये काही चांगल्या गुणांचा वास असतो.तुम्ही त्या गुणांचा प्रत्यय या व्यक्तिचित्रणाद्वारे देत आहात त्याबद्दल विशेष कौतुक आपले!
पुलेशु

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2021 - 12:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

तटस्थ पणे केलेले मौसमीचे चित्रण भावले.
पुढील भाग लवकर लिहा
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

2 Jun 2021 - 6:50 pm | प्राची अश्विनी

हेच म्हणायचंय.