दोन अनोखे कोर्ट मार्शल

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
2 Nov 2020 - 6:22 pm

दोन अनोखे कोर्ट मार्शल

एअरफोर्समध्ये कोर्टमार्शल होणं हे एक अतिशय लज्जास्पद प्रकार म्हणून मानला जातो. पूर्वीच्या काळी आर्मीमध्ये विशेषतः कॅशिरिंग अशी एक पनिशमेंट होती. कॅशिरिंग म्हणजे अक्च्युअली तुम्ही फिल्डमध्ये ऐनवेळी साहस दाखवायला कचरता किंवा तुमची ब्रेव्हरी किंवा तुमचा काय तो धाडसीपणा दाखवत नाही किंवा काही काही वेळेला अतिधाडसीपणा करून दाखवता की जो त्या कामाकरता उपयोगी नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीला कॅशियर्ड केलं जातं. त्याच्या अंगावरची रँक बॅजेस काढून त्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिलं जातं आणि त्याचं पेन्शन वगैरे तेही बंद होते. म्हणजे तो एका अर्थाने तो डिस्कार्डेड माणूस होतो आणि तो आर्मीच्या संबंधात असल्याने लज्जास्पद असा हाकलून देण्याचा भाग झाला. तर ते कॅशिरिंग करण्याकरता म्हणून कोर्टमार्शलचा उपयोग होतो. त्याला फील्ड कोर्ट मार्शल म्हणतात आणि नॉर्मल कोर्ट मार्शल ज्यावेळेस कुठलेही युद्ध चालू नाही आहे शांततेच्या काळामध्ये जर काही चुका किंवा काही गुन्हे झाले तर त्याच्याकरता पनिशमेंट देण्याकरता कोर्टमार्शलची सोय असते किंवा कोर्टमार्शल केलं जातं. कोर्टमार्शल एखाद्या व्यक्तीचं होतय हेच अतिशय लज्जास्पद आहे.
अशा कोर्टमार्शलच्या संदर्भात साधारण १९८०च्या सुमारास मला मुंबईला दोन कोर्टमार्शलच्यासाठी कोर्टमधला मेंबर म्हणून मला अपॉईंट केलं गेलं. तिथे आम्ही पाच जण होतो. पूर्वी ज्युरीची जशी सिस्टम होती तशी ही मिक्स ज्युरीची सिस्टम आहे असं आपण थोडसं म्हणू. त्यात आम्ही पाच मेंबर आणि आम्हाला एक असिस्ट करायला एक लीगल बॅकग्राऊंड असलेला एक्सपर्ट. मग एका बाजूला प्रॉस्युक्युशन विटनेस आणि प्रॉस्युक्युशन कौन्सेलर म्हणून असतो आणि दुसरा एक डिफेंडिंग कौन्सेलर असतो. त्याला डिफेन्स कॉन्सिलर म्हणतात. कोर्ट मार्शल रूम सजवली जाते. एका प्लॅटफॉर्मवर आणि आम्ही असे सगळे बसलेले होतो. एका जज्जच्या ऐवजी आम्ही तीन जण जज बसलेलो होतो.
आणि मग कोर्ट चालू झाले. दोन केसेस आमच्या समोर होत्या लागोपाठ. आज एक दुसऱ्या दिवशी दुसरी. तर त्या केसेसमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यातल्या एका माणसाला आम्ही एअरफोर्समधून काढून टाका म्हणून रेकमेंड केलं आणि दुसऱ्याला एअरफोर्समधून काढून टाकू नका असं रेकमेडेशन केलं. अशा अर्थाने या दोन वेगवेगळ्या कोर्टमार्शल युनिक आहेत.
त्यातला पहिला जो होता तो एक मराठी माणूस होता कोकणातला आणि त्याला एअरफोर्स सोडायचं होतं. त्यासाठी त्याने बरेच नखरेबाजी केली. तो कधी वेळेवर गेला नाही. परेड केली नाही. आणि शेवटी पळून जो गेला तो आलाच नाही. मग त्याला वर्षभराने एअरफोर्सच्या लोकांनी पकडून आणला. त्यानंतर त्याला काढून टाकावं असं रेकमेंडेशन होतं. त्याला जेव्हा विचारलं की, बाबा तुला काय म्हणायचय? त्यावेळेला त्याने सांगितलं की मला एअर फोर्सची लोकं सोडत नव्हते. माझ्या घरच्यांची मोठी चांगली परिस्थिती आहे. मला एअरफोर्समधलं जीवन बरोबर वाटत नव्हतं आणि माझा विवाह झाल्यानंतर मला जे क्वार्टर मिळत होतं ते माझ्या घरच्या किंवा माझी जी संपन्नता जी होती त्याला मिसमॅच होत होती. त्यामुळे माझं एअरफोर्समध्ये मन लागलं नाही. माझं एअरफोर्सबद्दल काही वाईट मत नाही. परंतु, मी काही ह्या वातावरणात राहू शकत नाही, म्हणून मी असं केलं आणि मला काहीतरी कारण काढून सोडायचं होतं. मला तुम्ही एअरफोर्समधून काढून टाका. माझी तीच इच्छा आहे. त्यावर आम्ही तिथं निर्णय दिला की जो एक मताचा होता. अशा व्यक्तीला एअरफोर्समध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही. त्याला जाऊदे, तो गेला.
दुसरे दिवशी आणखी एक केस समोर आली. या मधल्या दिवसाच्या काळात माझा कोर्समेट फ्लाईट लेफ्टनंट पी एन मिश्रा जज एडव्होकेट आम्हाला लीगल ऍडव्हायझर म्हणून होता. तो कोर्टाचे कामकाज कंडक्ट करत होता. तो अकाऊंट्स, ब्रांच मधलाच पण त्याच्यानंतर त्याने लीगल क्वॉलिफिकेशन त्याने मिळवले आणि तो लीगल ऍडव्हायझर म्हणून झाला. निवृत्तीनंतर त्याने अलाहाबाद हाय कोर्टात वकीली केली. तर तो आणि मी आम्ही असेच मेसमध्ये गप्पा मारत होतो. तर मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं, ‘अरे आज एका एयरमनला काढला उद्याला आता दुसरा जाईल’. तर हसून म्हटला की, ‘शशि, यू नेव्हर नो टुमारो व्हॉट विल हॅपन!’, तर त्यावेळी माझ्या लक्षात नाही आलं. किंबहुना त्याने मात्र मुद्दाम असं ठरवून म्हटलं असावं.
दुसऱ्या दिवशीच दुसरं कोर्ट प्रोसेडिंग चालू झालं. ते प्रोसेडिंग चालू झाल्यानंतर एका व्यक्तीला समोर उभं करण्यात आलं आणि त्याच्याबद्दलची चार्जेस लावण्यात आले. त्याने हे केलं, ते केलं. चार्जेसचा पाढा वाचला गेला. तो होता आसामी. त्याचं पोस्टींग म्हणजे एअरफोर्स स्टेशन कॉटन ग्रीनला होतं. तो तिथून जो गायब झाला होता. बरीच वर्षे आला नाही आणि शेवटी तो पकडला गेला म्हणून त्याला कॉटन ग्रीनमध्ये आणण्यात आलं. त्याला विचारण्यात आलं, तुला काय म्हणायचयं तर त्याने सांगितलेली त्याची गोष्ट ती जवळ जवळ दोन तास चालली होती. त्या दोन तासामध्ये सगळे जे जमलेले लोक होते, प्रॉसिक्युशनवाले, दुसऱ्या बाजुचे आणि आमच्यासारखे सगळ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं. भोजनाच्या नंतर व याचं काय करायचं म्हणून आम्ही चर्चा केली आणि आमच्या पाचही मेंबर लोकाचं मत असं बनलं की, अशा व्यक्तीला एअरफोर्सने ठेवलंच पाहिजे. आणि ती व्यक्ती एअरफोर्समध्ये कंटीन्यू केली जावी. त्याला काही छोटीशी मायनर म्हणजे लॉस ऑफ सिनीयॉरीटी करून आम्ही आमच्या पध्दतीप्रमाणे जजमेंट केलं.
एअरफोर्समध्ये ठेवावं असं आमचं रेकमेंडेशन होतं. तर ही केस काय होती? आमच्या डोळ्यात पाणी का आलं? आम्हाला असं का वाटलं की त्या सार्जंटने हवाईदलात राहावे? ही जी व्यक्ती होती, ती आसाममधली होती. त्यावेळेस आसाम गण परिषद नामक आसामी लोकांची एक चळवळ चाललेली होती. त्या व्यक्तीचा धाकटा भाऊ त्या परिषदेच्या पक्षाचा एक महत्वाचा व्यक्ती होता आणि त्यामुळे हा जेव्हा सुट्टीला जायचा तेव्हा त्याच्या भावाच्या बोलण्यातून त्यांच्यावर प्रभाव पडायचा. आणखी तो म्हणायचा की, ‘माझ्यामुळे घरचं वातावरण अतिशय दुषित झालेलं आहे. मला घराकडे पहाता येत नाही’. तो धाकटा भाऊ बोलत होता. ‘तू आता असं कर, तू इकडे घरात येऊन रहा. आपली शेती आहे. आई वडील आहेत, तु इथं रहा कारण मी आता इथं राहू शकत नाही. मला बऱ्याच वेळेला अंडरग्राऊंड राहावं लागतं. त्यामुळे माझा रोल आता परिस्थितीप्रमाणे बदललेला आहे. तर तू इथे येवून आईवडीलांची सेवा वगैरे कर’. हे सर्व करत असताना हा सार्जंट दोन चार वेळेला हो-हो म्हणायचा आणि सुट्टी संपली की कामावर परतायचा. पण एका पर्टिक्युलर वेळेला हा जेव्हा तो सुट्टीला होता त्या काळात त्याचा धाकटा भाऊ घरातून जो गेला तो गायबच झाला आणि त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की, ‘अरे तु थांब, घरात रहा इथे. आपली मोठी शेती आहे. ती शेती सोडून तू तिथनं गेलास तर सगळंच जाईल. मुख्य म्हणजे तुझा जो भाऊ आहे त्याला पकडलेलं असल्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. निदान आमच्या रक्षणाकरता तरी तू रहा’ म्हणून त्यांनी कळवळून सांगितलं. त्याप्रमाणे तो राहिला. तो अबसेंट विदाऊट लिव्ह झाला. त्याच्यानंतर त्याने तीन वेळा एअरफोर्स स्टेशन गुवाहाटी जाऊन सांगितलं की मी इथं आहे. हे बघा मी गेलो होतो, त्याने एक कागद काढून दाखवला एअरफोर्स स्टेशनचा. त्या एअरफोर्स स्टेशनच्या गार्डरूम मधून मला सांगितलं की, तु आमच्या स्टेशनचा नाहीस मग तू इथे का येतो आहेस? तू आम्हाला का राम कहानी सांगतोस? तू तुझ्या मुंबईच्या कॉटन ग्रीन युनिटमध्ये जाऊन सांग. असं त्याला सांगण्यात आलं. तेंव्हा घर सोडून मुंबईला जाणे शक्य नव्हतं.
मधल्या काळात मग त्या इलेक्शन झाल्या, आसाम गण परिषद पार्टी निवडून आली. त्यांच्या पार्टीचे दिनेश गोस्वामी एम पी म्हणून लोकसभेत गेले. त्याने त्याचं पत्र दाखवलं. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘मी ह्या व्यक्तीला ओळखतो आणि जे तो काही सांगतोय ते बरोबर आहे. मधल्या काळात त्याचे आई वडील मेले. त्यांना मारून टाकलं गेलं. मधल्या काळात त्याच्या विरूध्द पार्टीचे लोक होते त्यांनी सगळ्यांना बदडून काढलं आणि हा फिजिकली डिझेबल झाला. ह्याची बायका मुलं जी होती ती क्वॉटरमध्ये इकडे एअरफोर्स स्टेशनवर. ते आसामात निघून गेले. बायकोला सुद्धा त्याचा ठावठिकाणा माहित नव्हता. यालाही तिथल्या त्या लोकांनी पकडून नेलं. असं जवळजवळ दोन वर्ष तो गायब होता. ज्यावेळी तो सुटला त्यावेळी स्वतःहून इथे येऊन त्यानं कॉटन ग्रीन एअरफोर्स स्टेशन मध्ये रिपोर्ट केला. मी अमुक अमुक सार्जंट होतो आणि मी अबसेंट विदाऊट लीव्ह होतो आणि आता मी परत आलोय. मला एअरफोर्समध्ये सर्व्हिस करायची आहे. कारण एअरफोर्सने जो सन्मान दिलेला आहे, तो मला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. आई वडील वारले, भाऊही मारला गेला. घर, शेती गेली. आता आसामात काहीही जवळिकीचे राहिलेले नाही. मला एअरफोर्स जवळ आहे’. असं त्याचं म्हणणं होतं ते सगळं ऐकून घेतल्यानंतर जो स्वतः हून एअरफोर्समध्ये येऊन म्हणतो की मला सर्व्हिस करायची आहे. याला शिक्षा म्हणून बाहेर काढला, मग तो जाणार कुठे? असं म्हणून आम्ही पाचही जणांनी एकमताने म्हटलं की ही व्यक्ती हवाईदलात असलीच पाहिजे.
आणि म्हणून दुसऱ्या कोर्ट मार्शल मधला तो जो सार्जंट होता, ही वॉज अडमिटेड इन सर्विस विथ मायनर पनिशमेंट.
…….
काही दिवसांपुर्वी विंग कमांडर म्हणून रिटायर झालेल्या पी एन मिश्राची भेट फोन वरून ४० वर्षांनी झाली. मी त्याला म्हणालो, 'अरे पी एन, माझ्यावर कोर्ट मार्शल व्हायचा वेळ आली होती तेंव्हा माझ्या बाजूने तू लढावेस असे वाटले होते'. पण ती वेळ आली नाही तो भाग सोडा. त्याला त्याच्या संदर्भातल्या माझ्या हवाईदलातील आठवणी वाचायला आवडतील म्हणून त्याने फर्माईश केली. म्हणून हा किस्सा त्याच्यासाठी इंग्रजीत लिहिला होता. त्याचे मराठी रूप इथे सादर करावेसे वाटले.

मांडणीआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

2 Nov 2020 - 7:05 pm | आनन्दा

मस्त

बाप्पू's picture

2 Nov 2020 - 7:44 pm | बाप्पू

मस्त..
लेखन आवडले

योगी९००'s picture

2 Nov 2020 - 8:54 pm | योगी९००

मस्त आणि रोचक किस्से..

तो कोकणातला माणूस जर सोडायचेच होते तर एअरफोर्सला गेलाच कशाला? विमानं पहायला? त्याचा खरोखर राग आला. अशा लोकांना जीपीएल केले पाहिजे व त्याचे जे काही बॅलन्स असेल ते सर्व रद्दबतल करून खरोखर अपमान करून हाकलले पाहिजे.

चलत मुसाफिर's picture

2 Nov 2020 - 9:33 pm | चलत मुसाफिर

तुमच्या भावना अनावर झालेल्या दिसतात. पण अशी भाषा वापरू नये. सैनिक हा माणूसच असतो. प्रत्येकाची वृत्ती, स्वभाव, विचारशैली निराळी असते. पैकी युद्धात शत्रूला पाठ दाखवणारा भ्याड, ड्यूटीच्या स्थळावरून गायब होणारा निष्काळजी, हुकूम वारंवार धुडकावणारा बंडखोर किंवा ऐन लढाईत दगा देणारा दगलबाज हे सर्वस्वी अपात्र लोक वगळले तर इतर सर्व सैनिक हे वीरच असतात.

दारू पिणे, सुटीवरून उशीरा येणे, ओळखपत्र हरवणे, सुटी न घेता घरी पळून जाणे वगैरे 'गुन्हे' सैन्यात कमीअधिक प्रमाणात घडतच असतात. तिथे शिक्षेचा निर्णय घेताना त्या सैनिकाच्या माणूसपणाचा, परिस्थितीचा विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावा लागतो. तसा विचार करण्याची क्षमता नसलेला दंडेलखोर इसम सैन्यतुकडीचे अधिपत्य कधीच करू शकणार नाही. 'ताबडतोब गर्दन मारा त्याची (Off with his head!)' ही पद्धत सैन्यात चालत नसते.

लेखकाने येथे हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते.

मराठी_माणूस's picture

3 Nov 2020 - 10:28 am | मराठी_माणूस

सहमत. अनुभवा नंतर विचार बदलु शकतात.

Gk's picture

2 Nov 2020 - 9:25 pm | Gk

छान

एअरफोर्सला गेलाच कशाला?

आत गेले की कशी काय व्यवस्था असते याची माहिती नसते. ऑफिसर आणि एयरमन यांच्यातील फरक देखील माहिती नसतो.
माझा प्रिय कै. फ्लाईंग ऑफिसर धनंजय मोटेचे उदाहरण हेच होते...
सर मला ऑफिसर म्हणून जॉईन व्हायचे होते. पण नीट गाईडन्स मिळाला नाही म्हणून एयर मन म्हणून ९ वर्षे दवडावी लागली.
ज्याचा कधीच दुसरा नंबर आला नाही. जो एकपाठी म्हणून प्रसिद्ध होता. त्याची ही गत झाली.
या पेक्षाही अनेक श्रीमंत मुलींची नवरा सेनेत अधिकारी आहे असे म्हणून मुद्दाम फसवणूक केली जाते. तो एयरमन आहे हे कळल्यावर प्रचंड घोळ निर्माण होतात.

कानडाऊ योगेशु's picture

2 Nov 2020 - 10:21 pm | कानडाऊ योगेशु

ऑफिसर व एअरमन मध्ये काय फरक आहे?

अवांतरः मागे ती नवीन कॅप आल्यापासुन सामान्य ट्राफिक हवालदार व सब इन्स्पेक्टर मधला फरक देखील धूसर झालाय.

दुसरे कोर्ट् मार्शल वाचून. "युद्धस्य कथा रम्या: " हे शाळेत शिकलेले वाक्य आठवले.

पण युद्ध रम्य नाही.जगातील सर्व स्वभावाने (मुख्यत:) गरीब,व परिस्थितिने पिचलेल्यां बद्दल अतीव वाईट वाटणारी
nutanm

पण युद्ध रम्य नाही.जगातील सर्व स्वभावाने (मुख्यत:) गरीब,व परिस्थितिने पिचलेल्यां बद्दल अतीव वाईट वाटणारी
nutanm

रोचक किस्से !!! अजूनही असतील काही तर नक्की लिहा.

सुधीर कांदळकर's picture

3 Nov 2020 - 6:41 am | सुधीर कांदळकर

आसाममधील केस खरेच हादरवून सोडणारी आहे. त्याचे पुनर्वसन केले हे आवडले. लढाईत जायबंदी होणे आणि त्याच्यासारखे जखमी होणे यात फारसा गुणात्मक फरक दिसत नाही. चांगल्या निर्णयाबद्दल संबंधितांचे अभिनंदन.

मराठी_माणूस's picture

3 Nov 2020 - 10:29 am | मराठी_माणूस

पहील्या केस मधे रितसर राजीनामा देण्याचा पर्याय आहे का नाही ?

शशिकांत ओक's picture

3 Nov 2020 - 11:10 am | शशिकांत ओक

पर्मनंट कमिशन ऑफिसर्सना २० व एयरमन (आज काल त्यांना एयर वॉरियर म्हणून संबोधले जाते) १५ वर्षे सर्व्हिस पूर्ण झाली की राजीनामा देऊ शकतात.
पण ज्यांना तितके थांबून राहणे पसंत नसते त्यांची कुचंबणा होते.
माझ्या खाली काम करणारा एक जुनियर अकौंट्स ऑफिसरची अशीच एक मजेशीर घटना आहे. तांबरमला तो काही महिने माझा डेप्युटी होता.
सर्व उत्तम होता. पण मला नोकरी सोडायची आहे असे त्याने डोक्यात घेतले होते. अनेक वेळा राजीनामा दिला तरीही तो रिजेक्ट होऊन जाई. 'सर मला काही उपाय सांगा की मी नोकरीतून बाहेर पडेन' ...
एकदा त्याची खोड मोडायला मी म्हणालो, अरे अगदीच सोपे आहे. आपल्या सेफमधून पब्लिक फंड चे पैसे गायब कर. किल्लीचा जुडगा तुझ्याकडेच असतो ना? कोर्ट मार्शल फेस कर आणि जा बाहेर...
त्या काळात नाडीग्रंथ भविष्याचा खोटेपणा उघडे पाडायची सुरसुरी मला गप्प बसवत नसे. एकदा माझ्याकडून नाडी भविष्य काय आहे ते समजून घेऊन मला म्हणाला, 'अरे वा ऽऽ असे आहे का'? नंतर एकदा मला तो नाडी केंद्रात पत्नीसह भेटला. आधी तोंड चुकवलेन. मग म्हणाला, 'सर इथे ही पट्टीत मला नोकरी सोडून जायची इच्छा असली तरी ती करत रहावे लागेल असे म्हटले आहे. तुला एक मुलगी अपत्य होईल असे म्हटले आहे. आज बरीच वर्षे झाली आहेत लग्नाला म्हणून आम्ही अपत्य आशा सोडली आहे...'
नंतर बर्‍याच वर्षांनी तो पुन्हा भटिंडा एयर फोर्स स्टेशनला भेटला. लंच करताना मला नाडी भविष्याची आठवण देऊन म्हणाला.' मी नोकरी सोडायचा विचार बदलला. थँक्स टू नाडी...'
... पुन्हा काही वर्षांनी मला त्याचे पत्र मिळाले. मी आता रिटायर झाल्यावर बेळगाव येथे राहतो. माझी पत्नी कॅनरा बँक मधून रिटायर झाली. हे पत्र लिहायचे कारण म्हणजे आम्ही एका मुलीला दत्तक घेतले आहे. नाडी भविष्यातील ते कथन ही खरे झाले...
निष्कर्ष काय?
राजीनामा देता येतो पण तो मान्य होईल असे नाही...

Jayant Naik's picture

3 Nov 2020 - 11:36 am | Jayant Naik

अतिशय सुरेख अनुभव. तुमचे लिखाण मला नेहमीच आवडते. अगदी सरळ आणि ओघवती भाषा आणि अतिशय मोजक्या शब्दात प्रसंग सांगण्या चे तुमची हातोटी आहे.

मूकवाचक's picture

3 Nov 2020 - 1:55 pm | मूकवाचक

+१

तुषार काळभोर's picture

3 Nov 2020 - 1:47 pm | तुषार काळभोर

पहिला किस्सा वाचून मेजरसाब ची आठवण झाली.

दुसरा किस्सा दुर्दैवी. पण त्याची घरवापसी झाली हे महत्वाचे.

मित्रहो's picture

3 Nov 2020 - 4:30 pm | मित्रहो

दुसरा किस्सा रोचक आणि गंभीर आहे. संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले त्या आंदोलनात.

छान अनुभव कथन

अवांतर : कोर्ट मार्शलवरुन टॉम क्रूझचा Few Good Men आठवला. प्रत्यक्ष आणि सिनेमा यात भरपूर फरक असणारच तरी सिनेमा मनोरंजक होता.

गोंधळी's picture

3 Nov 2020 - 9:54 pm | गोंधळी

Few Good Men व Code M वेब फिल्म नुक्तेच पाहीले.

बाकी दुसरा किस्सा दु:खद होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2020 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्हीही किस्से रोचक. वेगळा अनुभव देणारे कथन. आभार.

-दिलीप बिरुटे

पण त्यातून माझी सही सलामत सुटका झाली!
तो किस्सा नंतर कधीतरी...