अनादी .....अनंत.....

Vivekraje's picture
Vivekraje in जे न देखे रवी...
22 Jun 2020 - 9:14 pm

आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो..

आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो..

त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो..

आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो..

तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो..

दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो..

आणि तरीही तुझ्यावरचा विश्वास जेव्हा आमचा डळमळीत होत असतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

तू निर्मिलेल्या विश्वात आम्ही जेव्हा तुलाच विसरत असतो..

किंवा तुझ्या निर्मितीतच आम्ही, तुला शोधत असतो..

पण कुठल्याही तंत्राशिवाय एखादं पाखरू जेव्हा घरटं बांधत असतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

नास्तिक म्हणून जेव्हा आम्ही तुझं अस्तित्वच नाकारत असतो..

किंवा आस्तिक म्हणून आम्ही तुला मूर्तीत शोधत असतो..

पण दोघांच्या श्वासोश्वासातून जेव्हा तू व्यक्त होत असतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

जेव्हा विश्वात शोधूनही तू आम्हाला कुठेच दिसत नसतो..

तरी विश्वाचा रहाटगाडा अविरत चाललेला असतो..

आणि तरी आम्ही जेव्हा तुलाच शोधत असतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

सर्व काही व्यापुनही तू अस्तित्वहीन असतो..

शोधायचं म्हटलं तर स्वरूपाकार असतो..

स्थिरावलो थोडा की तू मनात खुदकन हसतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

धडपडलो जीवनात की तूच सावरत असतो..

कुणा न कुणाच्या रुपात तू नेहमी वावरत असतो..

जेव्हा तुझ्या शिवाय दुसरा कुणी पर्यायच नसतो..

त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..

(माझ्या फेसबुक पेजवर पूर्वप्रकाशीत)

धर्मकवितामुक्तक

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

23 Jun 2020 - 8:55 am | सस्नेह

छान