लॉकडाऊन सुरु आहे - भाग ४ - फ्रेशर्स की बकरे.

श्रीकांतहरणे's picture
श्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं
30 May 2020 - 1:46 pm

मी, मनिष अन राहुल्या, अकोल्यातल्या, तापडीयानगरच्या भाड्याच्या घरात राहाले आलो. घरमालकान, दोन टोलेजंग लोखंडी पलंग दिले होते, म्हणजे, मले आता, ढाराढूर लोळाले, ऐसपैस जागा भेटली होती. एक थंडगार पाण्याच मडक, बाकी आमच्या ब्यागा ठेवाले लय जागा होती. फक्त प्रॉब्लेम एकच, अन तोई लय डेंजर. आंघोळ कराले, घरमालकाच्या घरात मागच्या दरवाजातून आत बाथरूमध्ये जायच होत. आला ना इज्जतीचा सवाल? मंग काय, अंघोळीले पण पुरा ड्रेस घालून, चोरावाणी घुसाचं, अन चोरावाणीच बाहेर पडाच. एव्हडं फुल ड्रेसिंग करून, त आम्ही कॉलेजाले पण जात नोतो. पण नाईलाज, खासकरून राहुल अन मनष्याची, ती काळू पेहलवानवाणी बॉडी, ती शर्टाच्या अंदरच झाकलेली बरी दिसत होती. अन मी त, एकादी पोट्टी काय लाजन, तिच्या पेक्षाही जास्त लाजरा. मंग, इज्जतीचा भाजीपाला कसा होऊ देणार? जाऊद्या.

दिवस हळू हळू पलटू लागले, अन कॉलेजचालू झाल. कॉलेजमध्ये येताजाता आम्ही तिघे सोबतच. सकाळच्या टायमाले कुठे तरी टपरीवर चहा, नाश्त्याले तर्रीपोहे, भजी, अन जेवाले, धाबा टाईप टपरी हाटेल मदे, मिक्स व्हेज नाई त इन्स्टंट दालफ्राय, अन पोळ्या घायच्या. सगळा हिशोब तिघांन मिळून कराचा. रात्रीच्यालें, म्या अमरावती वरून आणलेल्या कुकर मदि, मस्त खिचडी बनवाची. स्टो अन घासलेट चा जांगडबुत्ता, मनष्यानं शेजारच्या काका कडून करूनच ठेवला होता. त्या टायमाले, मले काई लय खास जेवण बनवता येत नोतं. कितीदा त डाळ न शिजलेली खिचडी, तरी पण, काय बनवली बे अनप्या, अस म्हणत राहुल्या मजेन ढोसत असे. मन्याला आवडली कि नाई, जास्त समजत नसे. पण एकुण, आंधळ्या गाईत, लंगडी गाय शायनी असा सीन होता. दोन टाइमचा हॉटेलचा खर्च, तिघांनाही झेपत नसल्यान, सगळे खुशीखुशीत जे हाय ते गिळत होते. असा, रोजचा कार्रक्रम चालू झाला होता. पण रोजच बाहेरच जेवण, अन रात्री हे असं अर्धवट शिजलेल् जेवण, किती दिवस ढकलणार? यावर, कमालीची आयडिया, माया अकोल्याच्या बाल्यादादा (आत्तेभावान) काढली. त्याच्या ओळखीन त्यानं आमले मेस लावून देली. बाल्यादादा, नावासारखाच दादा कॅरेक्टर.

"अन्या, कॉलेजले रॅगिंग बिगिग झाली त सांग. सालपट काडू एक एकच्या ढुंगाणावरचे." त्याचा या वाक्यान आमच्या तिघांच्याही अंगात जोर भरला होता.

"रॅगिंग" आजही नुसता शब्द, जरी कानावर पडला, तरी पाय लट लट लट लट कापतात बे , तेव्हा तर पंढरी घाबरून जाये. टपरीवरचा चहा, नास्ता, सकाळच जेवण, आता सगळ, लपून छपून करावं लागे, कारण आम्ही फर्स्ट ईयरचे पोट्टे म्हणजे फ्रेशर्, की हलाल कराले, सिनिअरला भेटलेले बकरे. त्यातल्या त्यात आम्ही बाहेर गावचे, लोकल नाही, मंग आमचा कोणी माईबाप होता काय?. "डॉन को ढुंढने के लिये जैसे ग्यारा मुल्लकोकी पोलीस लगी है, वैसे ही सिनिअर्स की टोली, हम फ्रेशर्स के पिछे भी लग चुकी थी."

कोणता तरी लेक्चर संपला. सिनिअर्सच्या भीतीन सगळे चिडीचूप क्लास मधेच बसले होते. अख्खा क्लास, अशोक सराफच्या भाषेत सांगाच त "खाम्प्लिट सायलेन्स" झोन मध्ये गेला होता. दुसरे लेक्चरर येई पर्यंत छातीत, लय जोरान धडधड चालू होती. देवा नेक्स्ट लेक्चररले, पाठव रे बा लवकर, अस भजन, म्या अन राहुल्यान कधीच चालू केल होत.

पण भक्तांची परीक्षा पायनार नाई, त मंग तो देव कसाला?
एक्दम, दहा बारा सिनिअर्सचा घोळकयान क्लासमध्ये एन्ट्री मारली. नेक्स्ट लेक्चरचे लेक्चरर आज सुट्टीवर, याची माहिती काढून, सिनिअर्सने ही चाल टाकली होती.

"क्या बे , सिनिअर्स क्लास मै आये, तो गुड मॉर्निंग कहनेका, सिखाया नही क्या बे माँ बाप ने? सिनिअर्स को कोई रिस्पेक्ट है के नही?"

अशा कडक, अन वाघाने डरकाळी फोडलेल्या आवाजाले, आमच्या बकऱ्याच्या कळपातून एक ही उत्तर आलं नाही.

"अबे रिस्पेक्ट है कि नंही?" अजून एकदा तिच डरकाळी.

"है सर." बकऱ्याच्या कळपातून कोण तरी बारीक घाबरट आवाजात बचरल.

"फिर?"

सगळे एकसाथ "गुड मॉर्निंग सर."

मंग हे दहा बारा वाघ, आता अलग अलग होऊन, आप आपली शिकार पकडाले निगाले.

त्यातलेच दोन वाघ, मायाकडे येऊन पोहचले. मले फक्त वाघांच्या पायातले बूट, अन चपलाच दिसल्या.

त्यातला एकजण, " नाम क्या बे तेरा?"

" सर, श्रीकांत हरणे "

"हम्म ... मराठी काबे?"

"हो सर"

"हॉबी काय?"

"स.. सर सिंगिंग"

मले काऊन त, अचानक मायाकडे आलेला वाघ बहुतेक शाकाहारी अन नख कापून आल्यासारखा वाटू लागला. अजूनही माया डोळ्यांपुढं बूटच होता.
तितक्यात दुसरा वाघ, अचानक ब्लॅकबोर्ड जवळ पोहचला होता. तेथूनचं खडूचा एक तुकडा जोरत मायाकडे फेकून

"अय इधर देख!" असा आवाज आला.

माई नजर आता फळ्यावरील वाकड्या तिकड्या नागमोडी सापासारख्या लाईन वर गेली होती.

"इसे देख और जिस तऱ्हासे ग्राफ हैं, चल वैसे ही चाल मे हंस के दिखा." झाला, आता इज्जतीचा भाजीपाला झालाच. कशाला होबासक्या केल्या, अन सिंगिंग बोललो बे.

"स. ...स ..सर "

"अबे स. ...स सर क्या लगा रखा है? चल बोला वो कर. नही तो थर्ड डिग्री इस्तेमाल करणा पडेगा बेटा."

आईच्या गावात!!! हे थर्ड डिग्री काय लफडं हाय बावा? हे त मले बिल्कुल माहित करून घ्याच नॊत. अन मंग, मी सुसाट सूटलो ना म्याटा वाणी.

"हाहाहाहाहाहा...आआआआ ....हाहाहाहाहाहा..... ...आआआआ…. .हाहाहाहाहाहा..... ...आआआआ."

नागमोळी वाळणातच नाही, त हसण्याचा आवाज़ाले लय उप्पर नीचे करत म्या गाडी स्टेशनात घातली होती. ते ऐकून हा वाघ, दातकडं बाहेर काडून जोर जोरान हसाले लागला. लगेच बाकीच्या वाघांले आवाज देत.

"अबे ये देखोबे, क्या आवाज निकलता ये छोटू उस्ताद."

सगळे आता माया कडेच पाऊ लागले. जसा काई मी सर्कशीतील जोकरच. लगेच फळ्यावर आता नवीन, अजून वाकडातिकडा नागमोडी, अन मधात दिवाळीचे सुतळी बाम, फटाके लावलेला ग्राफ मले दिसाले लागला होता.

"देख ईस बार हसना तो हैं, लेकिन जहाँ फटाखा है, वाह फटाकेका आवाज भी आणा चाहिये और वो भी जोर से."

बाप्पारे, काई कराले लावून रायला हात. जस काई, यायले माया सुप्तगुणच दिसला होता. पण करणार काय? आलिया भोगाशी, असावे सादर.
म्या अजून एकदा काळली बुलेट, अन सुसाट सुटलो.

"हाहाहाहाहाहा...आआआआ...... फाट फाट फाट ....... हाहाहाहाहाहा...आआआआ...... धडाम धूम ...... भडाम भूम ........ हाहाहाहाहाहा...आआआआ......"

अक्ख्या क्लास मध्ये पोट्टे हसले. तितक्यात कोणी लेक्चरर येत आहे म्हणून सगळ्या वाघांनी धूम ठोकली, अन माया जीव भांडयात पडला. या टायमात राहुल अन मनश्याची, वाघांनी काय हजामत केली, मले समजच नाई. पण येथूनच, आता क्लास मध्ये आम्हा तीन बिलंदराले लय नवीन दोस्ताची ओळखी झाली. प्रवीण माटे (नाव बदलेले) अजून एक अमरावतीच कार्टून आमच्या क्लास मदे हाय, हे आता आम्हाला समजलं. हा प्रवीण माया पेक्षाही बुटका अन सडपातळ हड्डी पण एवढ्या डेरिंगन या वाघाच्या कळपात कसा काय भटकतो हे जरा अजबच वाटत होत.

अजून एक छोटाशी, पण लई टाईमपास गोष्ट इथं आठवली म्हणून सांगतो. एक दिवशी रात्री, मेसचा डबा घेऊन येत होतो. त एका चौकात, बियाणी नावाच्या एका सेकंड एअरच्या सिनियरन आमले पकळल. बियाणी त कॉलेजच हुशार पोट्ट,पण ह्यानं पण आमले रॅगिंग साठी पकळल? थोडस काय त इकडचं तिकडचं विचारून, आता आमाले कामावर लावाची वेळ आली, तो बोलला " तेरे को अब वो चौक के बिचो बीच जा के, जोर से बारिश आयी भागो , बारिश आयी भागो चिल्लाना हैं."

बैंताड हाय का बे हा? काई काम सांगून रायला लेका. अशा कडक उनाच्या दिवसात, याच्या बापानं तरी पाऊस पायल का बे? कुठून पडणं पाऊस? अन लोक आपल्याले म्याटत काडीन ते वेगळेच.

" सर लोग क्या सोचेंगे."

"अबे चल, बोल वॊ कर और हा, मेरे को यहां तक आवाज सुनाई देना चाहिये."

झाल आता काई उपाय शिल्लक नोता. आता आपल्या इज्जतचा भाजीपाला होणारच होता. मग म्या म्हटलं, अकोल्यात आपल्याला कोण काळ कुत्र ओळखते बे? मग कायची आली लाज अन खाज. हा काय म्हणते ते पटकन करू अन फुटू इथून. भुक पण लाय जोरात लागली हाय. लगेच मी चौकात गेलो. अन चौकातुन त्याच्या कडे पाहत फुल्ल वोल्युम मध्ये

"जोर से बारिश आयी , भागो रे , जोर से बारिश आयी , भागो रे" ओरडलो. काय पागल बीगल त नाही ना? काही लोक माझ्याकडे पाहून रायले होते. पण त्या कोणाच्याकडे न पायता, माय लक्ष फक्त बियानीसर कडे गेलं, त्याने दुरूनच हासत थम्सअप देत जायाचा इशारा केला.

रंगीला हा त्या टाईमचा एकनंबर हिट मूवी, उर्मिलाले पाहाले सगळी कॉलेजची पोट्टे म्याट झाली होती. आमी फ्रेशर्स पण म्याटच, उर्मिला अन माया फेव्हरेट आमिरखान दोघई होते. मंग पिच्चर त पायनारच. सगळ्यात सोमरच्या रांगेतल तिकिट काढल. हुडकॅप असलेल शर्ट घालून आम्ही सुमडीत पहिल्या रांगेत जाऊन बसलो. म्हणजे आम्ही कोणाले दिसणार नाई. कारण त्या टाईमाले ही रांग म्हणजे इथून तिथून मिथुनच्या फॅनची होती. पिच्चर चालू झाला. बाल्कनी आणि स्टॉलमध्ये सगळी सिनिअर्सन खचाखच गर्दी भरली होती. अबे लेका, पकडलो त जाणार नाय ना? म्हणून मी अन राहुल्या चुपचाप मुंडी खाली टाकून पिच्चर पाहू लागलो.

"यायी रे यारी जोर लगा के नाचों रे." गाण लागलं, अन सिनिअर्सन अक्खा थिएटर डोक्यावर घेतला. पांचिवास, पन्नास पैश्याची चिल्लर, गाणे चालू असताना बाल्कनी अँड स्टॉलमधुन पडद्यच्या दिशेनी फेकली गेली, पैश्याचा ताड ताड पाऊस, पुढे बसलेल्या आमच्या अंगावर येऊन पडू लागला. असा सिनेमा पाहाचा अनुभव, त आम्ही पहिल्यांदाच घेतला होता.

|| सूचना ||

दोस्तांनो , हास्य , कॉमेडी , विनोद हे या दुनियेतले सगळ्यात चांगले शस्त्र हाय. ते जर योग्य रीतीने, योग्य वेळेस , योग्य ठिकाणी वापरता आले, तर अर्धी परधी लढाई त तुमी जिंकलीच म्हणून समजा. हे शस्त्र कळत , नकळत, समोरीच्या माणसाच्या आयुष्यातल दुःख , राग , वेदना, थोडावेळ का होईना पण गायब करत. अन त्याचे मन प्रसन्न करत. मग समोरीचा माणूस, कमीत कमी त्या टायमाले तरी तुमच वाईट चिंतू शकत नाही. म्हणूनच सदगुरु श्री स्वामी समर्थनी सांगितलंच आहे. "मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण!! "

धन्यवाद.

राहणीव्यक्तिचित्रलेख