कोचमन अलिचे पत्र ( भाग २) (अंतिम)

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जनातलं, मनातलं
13 Nov 2008 - 1:59 pm

कोचमन अलिचे पत्र ( भाग २) (अंतिम)
(भाग एक , http://www.misalpav.com/node/4564)
(पूर्वसूत्र)

पोष्टमाष्टरला नवल वाटले. तो खेराणीला म्हणाला.
- माणसे पण काय वेडी असतात ?
- याच्याबद्दल बोलताय साहेब. खरेय ते. गेल्या पाच वर्षापासून हा रोज येतो. उन असो, पाऊस असो नाहीतर थंडी, त्याला पर्वा नाही. पण मजा ठाऊक आहे साहेब? गेल्या पाच वर्षात त्याला कोणीही चिठ्ठी पाठवलेली नाही.
- ते मला ठाऊक आहे रे. पण याला चिठ्ठी पाठवणारे आहे तरी कोण ?

(उत्तरार्ध)
- कोण लिहिणार साहेब? सगळा जन्म शिकारीत गेला. गावाबाहेर याने कधी पाऊलही ठेवले नसेल. याचे असणार तरी कोण बाहेर?
-वेडी लोकसुद्धा काय अद्भुत असतात नाही ?
-तेच तर साहेब. मी वलसाडला एक वेडा बघितला. सारा दिवस चुप्प बसून असायचा आणि अचानक ठाकूर हवेलीतली भजने सुरू करायचा. दुसरा वेडा नदीत काही बाही शोधत असायचा.
- अरे हे तर काहीच नाही. माझे ऐक. मी एक वेडा बघितलेला. तो फक्त बोचकी बांधायचा आणि उघडायचा. बस्स आणखी काही नाही.
असा हास्यविनोद चालू असताना पोष्टमास्तर अचानक म्हणून गेले.
- खरा वेडा त्याच्या स्वतःच्याच जगात असतो. त्याच्यासाठी आपणही वेडेच असतो. मला काय वाटते सांगू ? या वेड्यांचे आणि कवींचे काही नाते असते.
पोष्टमास्तरांचे वाक्य जणू ब्रह्मवाक्य ठरले. ती चर्चा तिथेच विरली.

बरेच दिवस झाले. अली पोष्टात आला नाही. कोणी त्याचा तसा तपासही केला नाही. शेवटी एक दिवस अलि आला. आज त्याला श्वास घेणेही जड जात होते. शेवटचे दिवस जवळ आल्याची लक्षणे दिसत होती. धाडस करून तो पोष्टमास्तरांकडे गेला आणि विचारले.
- मास्तर. माझ्या अबिदाची चिठ्ठी आली होती का हो ?
पोष्टमास्तरांना तालुक्याला जायचे होते. ते जरा घाईतच होते.
- तु वेडा आहेस का रे ?
- साहेब. मी अली. पत्रासाठी आलोय.
- हो. माहित्येय. काय रे तुझ्या पोरीचे नाव इथे नोंदवून ठेवलेय का ?
- साहेब.दया करून नाव नोंदवून घ्या. कामी येईल.
अबिदाच्या नावाची सरकारी बाबूच्या लेखी काडीचीही किंमत नव्हती. घाईत असताना विघ्न टाकणाऱ्या अलिवर मास्तर उखडले.
- तुला काय वाटते तुमची पत्रे आम्ही इथे खाऊन टाकतो ? रोज च्यामारी एकच प्रश्न. दुसरे कामधंदे नाहीत काय आम्हाला ?

मायेचा एक शब्द नाही. पण डागण्या देऊन मास्तर निघून गेले. शोकाने दुःखाने अलिच्या डोळ्यात पाणी दाटले.
अबिदा त्याची एकुलती एक मुलगी. तिचे पंजाब रेजिमेंटच्या एका सैनिकाशी लग्न झाले होते.
लग्नानंतर पाच वर्षे झाली तरी तिची काहीच बातमी नव्हती. तिची एखादी चिठ्ठी आली असेल या आशेने उन्हापावसाची पर्वा न करता अलि रोज सकाळी सकाळीच यायचा. एक ना एक दिवस तिची चिठ्ठी येईल असा त्याला विश्वास होता पण इतके वर्षे झाले तरी त्याच्या पदरी काहीच फळ पडले नव्हते. शेजारून जाणार्‍या खेमाणीला त्याने हाक मारली.

- भाई. जरा इकडे ये.
इतक्या प्रेमाने मारलेल्या हाकेमुळे खेमाणी क्षणभर गांगरला.
- हे धर. तुझ्या कामी येईल.
आयुष्याची कमाई असलेले २ ४ दागिने त्याने खेमाणीला दिले.
दागिने पाहून खेमाणी हतवाक झाला.
- अरे इतके अवाक व्हायसारखं काही नाही. ऐक आता मला म्हातार्‍याला याचा काही उपयोग नाही. तुझ्या काही कामी येतील म्हणून दिले. माझे एक काम करशिल?
- काय काम ?
अलिने आभाळाकडे बोट दाखवले.
- काय आहे तिकडे ?
- आभाळ
- बरोबर. तिथे अल्ला राहतो. त्याला साक्षी ठेऊन मी तुला दागिने देतोय. एक दिवस अबिदाची चिठ्ठी नक्की येणार आणि तु ती मला देणार.
- पण मी कुठे तेऊ तुम्हाला पत्र ? तुमचा पत्ता काय ?
- माझ्या कबरीवर.
- काय बोलताय तुम्ही ? अवाक होऊन तो म्हणाला.
- खरं बोलतोय. आज मी जाणार. या खुदा, पोरीचे तोंड बघणेही नशिबात नाही
अलिचे डोळे भरून आले.

पोष्टमास्तरांवर आभाळ कोसळले. त्यांचा परदेशात असलेला मुलगा विठ्ठलेश आजारी पडला होता. पोराची काळजी पोष्टमास्तरांना लागून राहिली होती. यांत्रिकपणे सकाळी आलेल्या नव्या पत्राकडे ते पाहत होते.
अचानक एक पत्र पाहून त्यांना जणू वीजेचा झटका बसला. पत्रावर अलिचे नाव लिहिले होते. नकळत त्यांनी हाक मारली.
- खेमाणी.
- जी साहेब.
- अली कुठेयं ? त्याचे पत्र आलेय.
- बघतो साहेब.
पोष्टमास्तरांना स्वतःच्या हाताने अलिला पत्र द्यायची इच्छा होती. बापाचे अंतकरण जागले म्हणायचे शेवटी. २ -३ दिवस झाले पण अली काही आला नाही. चौथ्या पाचव्या दिवशी दारावर टकटक ऐकू आली.
- ये अली भाई.
म्हातार्‍याचा हात धरून आणण्यासाठी मास्तर उठून अलिपाशी गेले.
- बाबा रे तुझे पत्र आलेय. होतास कुठे इतके दिवस ?
अलिला खुर्चीत बसवल्यावर मास्तर टेबलावरचे पत्र आणायला गेले. पत्र घेऊन पाठी फिरले तेव्हा बघतात तर अली गायब. तेव्हढ्यात व्हरांड्यातून खेमाणीला येताना मास्तरांनी पाहिले.
- अरे तो कुठे गेला ?
- कोण साहेब ? इथे कोणीच नाहीये.
- अली कुठेय ?
- म्हातारा वारला साहेब. चिठ्ठी ना ? मला द्या .
- काय बोलतोयेस तु? कधी गेला ? खरे बोलतोयेस खेमाणी ?
- होय साहेब. तीन आठवडे झाले.
पोष्टमास्तर अवाक झाले. आता काही क्षण आधीच तर त्यांनी अलिला पाहिले होते. खेमाणीने अलिशी झालेल्या शेवटच्या भेटीची गोष्टही सांगितली. डोळ्याने पाहिले ते सत्य, का कानाने ऐकतोय ते सत्य? मास्तरांना संभ्रम पडला. खऱ्याखोट्याचा निवाडा त्यांना करता येईना.

त्या दिवशी पोष्टमास्तर व खेमाणी अलिच्या कबरीपाशी गेले. चिठ्ठी कबरीवर ठेऊन ते परत फिरले.

त्या रात्री मास्तरांना त्यांनी केलेला अलिचा अपमान आठवला. परदेशी काविळीने आजारी असलेल्या मुलाची - विठ्ठलेशची चिंता आता त्यांना आणखी घोर लावत होती. बरेच दिवस झाले पोराची खबर आली नव्हती. मागच्या ३ -४ रात्रींसारखी ही रात्र ही त्यांनी तळमळत विनिद्र काढली.
दुसर्‍या दिवशीच्या डाकेत विठ्ठलेशची काही खबरबात असेल या आशेने मास्तर पहाटे चार वाजताच पोष्टात जाऊन बसले.

(संपूर्ण)
('धुमकेतू' यांच्या गुजराथी कथेवरून स्वैर)

प्रस्तुत कथेविषयी थोडेसे ..

Dhumketu won the rare honour to represent India in a book published in the USA with the title “Stories From Many Lands”. This was a collection of the best stories from sixty countries. His story ‘The Letter’ (Post Office) found a place in it. Sahitya Academy, Delhi published this story in “Contemporary Indian Short Stories” and Penguin Books published in “The Best Loved Indian Stories of The Century” (vol. II).

वाङ्मयकथाभाषांतर

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2008 - 2:07 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर कथा आणि तितकेच सुंदर भाषांतर / रुपांतर.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

13 Nov 2008 - 2:23 pm | नंदन

सहमत आहे, रूपांतर आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

महेश हतोळकर's picture

13 Nov 2008 - 3:16 pm | महेश हतोळकर

कथा. पु. ले. शु.

अभिज्ञ's picture

13 Nov 2008 - 3:42 pm | अभिज्ञ

भाषांतर/रुपांतर छान झालेय.
मुळ कथेचा बाजहि तितकाच ताकदवान आहे.तो तसाच ठेवण्यात यशस्वी झालास.

अभिज्ञ.

लिखाळ's picture

13 Nov 2008 - 4:01 pm | लिखाळ

सुंदर कथा.. फार छान रुपांतर...
आवडले.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2008 - 4:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छान लिहिलं आहेस.

अनिल हटेला's picture

13 Nov 2008 - 5:09 pm | अनिल हटेला

हम्म !!

जमलये खरं !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

रामदास's picture

13 Nov 2008 - 5:13 pm | रामदास

असं वाटलं नाही. प्रेमचंद आणि त्या जमानातल्या इतर लेखकांच्या स्टाईलनी लिहीलेली कथा आहे.
आणखी काही कथा तयार आहेत का ?

ऋषिकेश's picture

13 Nov 2008 - 5:22 pm | ऋषिकेश

रुपांतर आहे असं वाटलं नाही

असेच म्हणतो.. दमदार कथा.. नेमक्या शैलीत आणि शब्दात रुपांतर
अजून येऊ दे! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभिरत भिरभि-या's picture

13 Nov 2008 - 5:24 pm | अभिरत भिरभि-या

काही आवडल्या आहेत.
मिपाकरांना आवडत असेल तर बघेन प्रयत्न करुन ..

आनंदयात्री's picture

13 Nov 2008 - 6:01 pm | आनंदयात्री

खत्तरनाक !! .. जियो भिरभिर .. जियो !!
लै दिवसांनी दर्जेदार वाचायला मिळाले !! :)

और आनदो दोस्त .. तुमच्या लिखाणात लै पोटँशिअल आहे !!

ओ हेन्रीच्या कथांची आठवण झाली दोस्ता !!

कपिल काळे's picture

13 Nov 2008 - 7:31 pm | कपिल काळे

अरे भिरभिरया

अगदी भिरभिरवून टाकलस की रे. पहिल्या भाग वाचून ही कथा रशियन पार्श्व्भूमीवर घडत आहे असे मी म्हटलं होतं. अजूनही कुणाला पहिला भाग चेकॉव्ह सारखा वाटला होता.

पण आता कथा एकदम वलसाडच्या आसपास आली, तरी पण ती एखाद्या परदेशी लेखकाचीच वाटत होती. मूळ गुजराती लेखक आहे तरी कोण? धूमकेतू हे टोपण नाव आहे का? अजूनही काही कथा बघ अनुवाद करुन.

आणि अनुवाद करतान तुझा अगदी त्या अली त परकाया प्रवेश झालाय अस वाटण्याएवढा इतका सुंदर अनुवाद. खरं सांगायच तर रुपांतर/ अनुवाद वाटतच नाही.

http://kalekapil.blogspot.com/

अभिरत भिरभि-या's picture

13 Nov 2008 - 8:16 pm | अभिरत भिरभि-या

मूळ गुजराती लेखक आहे तरी कोण? धूमकेतू हे टोपण नाव आहे का?

गौरीशंकर जोशी (१८९२ - १९६५)

त्यांच्याविषयी थोडेसे ..

In 1935, he was awarded the meritorious Ranjitram Gold Medal, instituted by the Gujarat Sahitya Sabha for the best contribution to Gujarati literature, which he humbly refused. He was awarded Kavi Narmad Gold Medal for his devoted literary activities. He was an adviser to the Sahitya Academy, Delhi for Gujarati in 1957.

विसोबा खेचर's picture

14 Nov 2008 - 12:07 am | विसोबा खेचर

लै भारी रे! उत्तम रुपान्तर....

तात्या.

शितल's picture

14 Nov 2008 - 3:29 am | शितल

खुपच सुंदर कथेचे रुपांतर केले आहे.
कथा आवडली. :)