सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
1 Oct 2019 - 7:09 pm

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा
८: ताबो ते काज़ा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो

३ ऑगस्टला नाकोवरून ताबोला पोहचलो. ताबो खूप छान गाव वाटलं. छोटंच, पण छान रस्ते, हॉटेल- दुकानं असूनही गावच असलेलं. पर्यटक आणि विदेशी पर्यटकही आहेत, पण तरीही शांत गाव वाटलं. नाकोपेक्षा ताबोची उंची कम आहे, परंतु भटक्यांच्या दृष्टीने त्याची 'पातळी' नाकोच्या पुढची आहे! ताबोमधला होम स्टे छान होता. ज्यांच्या घरी थांबलो होतो, त्यांनी रात्री जेवायला घरीच बोलावलं. अगदी आपुलकीची वागणूक इथे दिली. त्या कुटुंबियांसोबतही बोलणं झालं. स्पीतिमधलं स्थानिक घर आतून बघता आलं. आणि अर्थातच तिबेट जवळ असल्याचं जाणवत आहे. आपण ज्याला ड्रॉईंग रूम म्हणतो अशा खोलीमध्ये ध्यान व प्रार्थनेसाठी खाली गाद्यांसारखी आसनं लावून ठेवलेली आहेत. एका वेळी पंधरा जण बसून ध्यान करू शकतील अशी व्यवस्था आहे. आदरणीय दलाई लामांचा फोटो आणि मंत्र पताका तर सगळीकडे आहेतच.

इथे व्हॉईस आणि डेटा अशी थोडी रेंज मिळाल्यामुळे दोन दिवसानंतर कुठे घरी आणि मित्रांसोबत नीट बोलता आलं. अनेक अपडेटस कळाले. जम्मू- कश्मीरमध्ये अभूतपूर्व परिस्थिती आहे. अमरनाथ यात्रा बंद केली गेली आहे आणि सगळ्या पर्यटकांना राज्यातून निघून जायला सांगितलं आहे. म्हणजे मला माझा प्रवास मध्ये थांबवावा लागणार. कारण नंतर मी मनाली- लेह हायवेने लेहकडे जाणार होतो, पण आता जाऊ शकणार नाही. आणि इतक्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये सगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स तिथे असतील. जेव्हा हे कळालं, तेव्हा खरं सांगायचं‌ तर एका अर्थाने खूप बरं वाटलं. कारण सततच्या अनिश्चिततेमध्ये ह्या प्रवासाचं मानसिक दडपण खूपच आलं आहे. जेव्हा कळालं की, लेहच्या साईडला पुढे जाता येणार नाही, तेव्हा अगदी हलकं वाटलं, खरं सांगतो. शिमलावरून ताबोपर्यंत पोहचलो आहे, परंतु शारीरिक आणि मानसिक दृष्टीने थकायलाही तितकंच झालं आहे. हे अपडेट कळाल्यानंतर तर ह्या मोहीमेची रूपरेषा बदलून गेली. तसंच मध्ये मध्ये पावसाचाही अलर्ट आहेच. हिमाचल आणि जम्मू- कश्मीरची सीमा अद्याप खूपच दूर आहे, परंतु तब्येतीची स्थिती बघता तिथपर्यंत जाणंही कठीण वाटतंय. ४ ऑगस्टला ताबोवरून काज़ाकडे निघताना ह्या सगळ्या अनिश्चितता आहेत. अर्थात्, आजचा टप्पा कठीण नसणार, उलट हा सर्वांत छोटा टप्पा आहे, फक्त ४७ किलोमीटरचा.

घरातल्या काकांनी मला नाश्ता करण्यासाठी रस्त्यालगत असलेलं जवळचंच एक हॉटेल सांगितलं. म्हणाले की, त्यांच्या घरी बनायला वेळ लागेल. ताबोमध्येच हे नेपाळी महिलेचं हॉटेल आहे. गरम आलू पराठा खाऊन काज़ासाठी निघालो. मनामध्ये कितीही शंकाकुशंका असल्या तरी सायकल चालवायला लागल्यावर हळु हळु त्या दूर होतात. सकाळचं प्रसन्न ऊन आणि ताजी हवा! ताबोची उंची जवळपास ३२६० मीटर आहे आणि काज़ा ३७०० मीटरवर आहे. म्हणजे मला सलग पण हलका असा चढ असेल. पण आता हा सायकलिंगचा सातवा दिवस असल्यामुळे चढ जवळजवळ जाणवतच नाहीय. एका बाजूला शरीर जसं किंचित थकलेलं आहे, तिथे पेडलिंग मात्र खूप सोपं झालं आहे. हिमाचलमध्ये शिमलापासून स्पीतिपर्यंत प्रत्येक गावांमध्ये वर्षा शालिका अशी शेड बघतोय. पावसापासून वाचण्यासाठी निवारा! स्पीति! अद्भुत निसर्ग! पुढे जातोय तसे बर्फ शिखर रस्त्याच्या आणखी जवळ येत आहेत. आणि सगळीकडे निर्जनतेमधलं अनोखं सौंदर्य! सगळीकडे वायू- क्षरण झाल्याची असंख्य दृश्ये दिसत आहेत. इथे खरंच वा-याला अडवणारे अडसर कमी आहेत; ढग तसे कमी असतात; झाडंही कमीच. किंबहुना झाडं तर अगदीच विरळ. त्यामुळे वारे फारच वेगाने वाहतात. ह्या प्रवासात अनेकदा असं वाटलं की, पाण्याच्या धबधब्याने रस्ता अडवावा आणि सायकलला रोखावं तसा चक्क वारा म्हणजे वा-याचा धबधबा अडवतोय! पण ह्या करड्या निसर्गचित्रात जे रौद्र सौंदर्य आहे, ते फार फार वेगळं! आणि हिरवा रंग अगदी तोंडी लावण्यापुरता नदीच्या जवळच्या काही गावांपुरता!

ह्या प्रवासात सदैव नदीची सोबत मिळाली आहे. दुस-या दिवसापासून सलग चार दिवस सतलुज आणि आता स्पिति. तिच्या गर्जनेचा एक व्हिडिओ इथे बघता येऊ शकतो. अविश्वसनीय आणि अविस्मरणीय आहेत हे क्षण! मध्ये मध्ये काही प्रवासी सोडून रस्ता अगदी निर्जन आहे. जिथे कुठे वस्ती लागते आहे, तिथे प्रेयर फ्लॅग्ज आणि माने हमखास दिसतातच. काही बुलेटवाले बाईकर्स मला हॅलो करून जातात, काही जण थांबून बोलतातही. रस्ता परत एकदा अगदी अरुंद जागेतून जातोय, पण आता भिती अजिबात वाटत नाहीय. उलट इतकी सवय झाली आहे की, त्याची मजा वाटतेय आता. अर्धं अंतर झाल्यावर पराठ्यासाठी एका हॉटेलमध्ये ब्रेक घेतला. स्पीतिमध्ये पर्यटक खूप येतात आणि विदेशी पर्यटकही खूप येतात. ह्यामुळे इथे हॉटेल सुविधा छान आहेत. जवळजवळ प्रत्येक गावामध्ये होम स्टे आहेत. होम स्टे तसा प्रत्येक घरात नसतो. त्यासाठी एक लायसन्स असतो व त्याद्वारे हिमाचल सरकार स्थानिक लोकांना तशी अनुमती देतं. त्याबरोबर काही व्यवस्थाही करावी लागते- वेगळं स्वच्छतागृह, खोल्या अशी.


मध्ये आणखी एका पट्ट्यात कच्चा रस्ता आहे मस्त! एके जागी डावीकडून येऊन एक रस्ता मिळाला. इथे दिशा दाखवणारा काही बोर्ड नाहीय. पण जवळ घरं होती आणि वस्ती आहे. एका ताईंना विचारलं काज़ाला जाण्यासाठी कोणता रस्ता आहे. त्या सरळ जा म्हणाल्या. मग त्यांनी सांगितलं की, डावीकडे जाणारा रस्ता पिन खो-यामध्ये जातो. जवळच पिन नदी आणि स्पीतिचा संगमही आहे. जेव्हा छोटी गावं लागतात, तेव्हा थोडा हिरवागार परिसर आणि शेती दिसते. अनेक दिवसांनंतर इथे वाटलं की, रस्ता आता एका मैदानामध्ये आला आहे. आता खूप तीव्र चढ किंवा उतार असे लागणार नाहीत. तेव्हा एक निश्वास सोडला. पुढे काजापर्यंतचा प्रवास सहज झाला आणि तसंही अंतर कमीच होतं. त्यामुळे दुपारी दोनच्या आधी काज़ाला पोहचलो! काज़ाच्या किंचित आधी मस्त चढ लागला. काज़ामध्ये मोबाईल टॉवर शोधत होतो, तेही दिसलं! काज़ा मार्केटमध्ये बस स्टँडच्या जवळच एका हॉटेलमध्ये खोलीची चौकशी केली. थोडं विचारल्यानंतर हॉटेलवाल्याने मस्त रूम सुचवली. बेड शेअरिंग असलेली डॉर्मिटरी! एका होम स्टेमध्येच ही व्यवस्था होती. जर बाकी बेडवर कोणी आले नाहीत, तर खोली माझीच असेल. अगदी स्वस्तात ही शेअरिंग बेडची रूम मिळाली. आज फक्त ४७ किलोमीटरच सायकल चालवली. सात दिवसांमध्ये ४२७ किलोमीटर सायकल चालवून झाली. अगदी अविश्वसनीय वाटतोय हा प्रवास!

काज़ा! स्पीतिचं मुख्य केन्द्र| हे गाव मात्र ताबोसारखं शांत वाटलं नाही. दाटीवाटी आणि गर्दी! स्थानिक लोक, भारतातून इतर भागांमधून आलेले मजूर, अन्य व्यावसायिक आणि विदेशीही मोठ्या संख्येमध्ये दिसले. नाकोमध्ये दोन दिवस राहिल्यानंतर ३७०० मीटर उंचीवर काहीही फरक वाटला नाही. काज़ामध्ये स्पीति सिव्हिल सोसायटीच्या एका सदस्यांसोबत संपर्क झाला आहे. त्यांच्याकडे राहण्याविषयीही विचारलं होतं. पण त्यांच्या रूम्स हाय क्लास आहेत, पर्यटकांसाठीच्या आहेत. भटक्यांच्या स्तराच्या नाहीत! त्यांनाही भेटायचं आहे. पण स्पीतिमध्ये हा काळ सगळ्यात व्यस्त सीजन असतो. आणि इथे प्रत्येक जण अनेक कामं करत असतात. एकच व्यक्ती शेतीही करतो, हॉटेलही चालवतो, लोकांना टूअरवर फिरायलाही नेतो आणि दुकानही चालवतो. त्यामुळे तेही व्यस्त होते व भेट नाही होऊ शकली. एक मात्र बघता आलं की, इथे अनेक ठिकाणि संस्था आहेत. महिलांच्याही संस्था आहेत आणि समाजात महिलांचा सहभागही खूप चांगला दिसतो. मी जिथे थांबलो आहे, ते होम स्टेसुद्धा एक ताईच चालवतात. त्याच दुकानातही बसतात. असो! काज़ा मार्केटमध्ये फिरताना बघितलं की, रस्त्याने जाणारा प्रत्येक जण प्रेयर व्हील उजवीकडून डावीकडे फिरवूनच पुढे जातो. त्याला चांगल्या भाग्याचं प्रतिक मानलं जातं.

४ ऑगस्टची संध्याकाळ काज़ामध्ये गेली. रात्री परत एकदा त्याच हॉटेलात जाऊन जेवण घेतलं. संस्थेचे कोणीच भेटू शकले नाहीत. गावाजवळच उंच पर्वत आहेत आणि एका बाजूच्याच पर्वतावर बर्फ दिसतोय. पुढच्या प्रवासासंदर्भात आता प्रश्नचिह्न उभं राहिलं आहे. जम्मू- कश्मीर तर शट डाउन केलं आहेच, माझी तब्येतही फार ठीक नाहीय. आठ दिवसांमध्येच पँट लूज झाली आहे. कारण रोजचं हॉटेलचं खाणं तितकं चांगलं वाटत नाहीय. शिवाय सर्व वातावरणच अगदी अपरिचित आहे. आणि मुख्य अडचण म्हणजे शरीराचा फिटनेस कितीही असला तरी शरीरामध्ये adaptibility पाहिजे. त्याची थोडी कमतरता जाणवतेय. बघूया पुढे कसं होतं. It is now all ifs and buts. एक डोळा हवामानाकडेही आहे. अर्थात् इथे हे कळालं की, लेह आणि मनालीकडून वाहनं येत आहेत. काज़ा ते मनालीमध्ये एक बसही चालते. उद्या काज़ावरून लोसरला जाईन.


आजचा रूट


आजचे चढ

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: काज़ा ते लोसर. . .

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानक्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

4 Oct 2019 - 6:41 am | सुधीर कांदळकर

अविस्मरणीय अनुभव घेतला आहे आपण आणि या लेखमालिकेद्वारे आपण तो वाचकांना देताय. अनेक, अनेक धन्यवाद.

प्रचेतस's picture

4 Oct 2019 - 8:27 am | प्रचेतस

अतिशय सुंदर आहे हे.

यशोधरा's picture

4 Oct 2019 - 9:02 am | यशोधरा

वाचते आहे..

मार्गी's picture

4 Oct 2019 - 1:58 pm | मार्गी

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!