चित्रपट: The Descendants!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
2 Jun 2019 - 10:02 am

हॉटस्टार वर काहीतरी शोधत असताना ह्या चित्रपटाबद्दल कळलं. शक्यतो मी गुगल करून अंदाज घेतल्याशिवाय चित्रपट बघत नाही. त्यात 'जॉर्ज क्लूनी(की क्लोनी)' आहे म्हटल्यावर बघायचं ठरवलं. त्याचे थोडेच चित्रपट बघितलेत पण त्याचा अभिनय, संवादफेक प्रचंड आवडलीय.

तस चित्रपटात नाट्य खूप नाही आहे आणि बऱ्यापैकी संथ वाटू शकतो. पण त्याच वेळी एकदम तरल आणि मनाला स्पर्शून जाणारा वाटला.

हवाई बेटांवर राहणार कुटुंब. नायकाच्या ३-४ पिढ्या आधी हवाई बेटांपैकी एका मुख्य भूभागाचे बऱ्यापैकी अधिकार नायकाच्या(मॅट) पूर्वजांकडे असतात. राजघराणे म्हणा ना. त्यायोगे आताच्या विस्तारलेल्या भल्या मोठ्या कुटुंबाकडे प्रचंड मोठी जमीन असते. अर्थातच नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध. त्याच्या ट्रस्टचे प्रमुखपद मॅटकडे असते. त्याच बर चाललेलं असत आणि ह्या जमिनीवर काही चरितार्थ अवलंबून नसतो. पण जवळपास बाकी सगळे नातेवाईक ती जमीन रिसॉर्ट वगैरे साठी विकून येणाऱ्या कोट्यवधी डॉलरकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यासाठीचा व्यवहार सुरु करण्याबाबत चर्चा चालू असते. ती जमीन तस म्हटलं तर एक वारसा आहे आणि सगळ्या बेटावरच्या लोकांसाठी तो एक जिव्हाळ्याचा विषय आहे.

याच दरम्यान मॅटच्या बायकोचा अपघात होतो आणि ती कोमामध्ये जाते. १० आणि १७ वर्षाच्या मुली. ज्या बापाशी खूप जवळ नाहीत. थोरली बोर्डिंग स्कूल मध्ये आहे आणि बऱ्यापैकी वाया गेल्यात जमा आहे. दुसरी पण शाळेत इतर मुलींवर दादागिरी करणे वगैरे प्रकार करत असतेच.
बायको कोम्यातून बाहेर येणार नाही म्हटल्यावर मोठ्या मुलीला घरी आणायला गेल्यानंतर बायकोसंबंधी एक धक्कादायक गोष्ट मुलीकडून कळते. आणि तिथून एक वेगळीच घालमेल आणि एक वेगळा प्रवास सुरु होतो.
या प्रवासादरम्यान मॅट आपल्या मुलींच्या जवळ कसा येतो, त्यांना कसा सांभाळतो(की मुली त्याला सांभाळतात!) हे खूपच छान मांडलं आहे. सुखांत नाही आहे माहित आहेच पण तरी सुद्धा त्या प्रवासात त्यांचं नातं खूप छान दाखवलं आहे. मुलींची भाषा, वागणं बघून तो एका क्षणी एवढा हतबल होतो की मुलीच्या वाया गेलेल्या मित्राकडे (जो ह्या दरम्यान ह्यांच्या सोबतच राहत असतो) सल्ला मागतो की तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस!

एका प्रसंगात मोठी मुलगी आणि तिचा मित्र यांच्या एकमेकांच्या स्पर्शाने बेचैन झालेला बाप त्यांना म्हणतो की 'माझ्या समोर तरी जरा स्पर्श टाळा'! त्या दोघांच्या वयाप्रमाणे ते वागताहेत, पण कुठेही त्यांना सीमा ओलांडलेली दाखवली नाही. उलट ते दोघे समोर असलेल्या परिस्थितीला आहे तस सामोरं जाताना दिसताहेत. काही झाकून ठेवण्याचा किंवा उगीच आव आणायचा प्रयत्न नाही करत.
असे खूप छान प्रसंग आहेत. स्पॉईलर नको म्हणून जास्त लिहीत नाही आता!

शेवट सुद्धा सुंदर केलाय. तिच्या अस्थींचे समुद्रात विसर्जन करतानाचा आणि शेवटचा एकत्र टीव्ही बघतानाचा प्रसंग म्हणजे परमोच्च बिंदू आहेत!
बाकी हवाई बेटांचं नितांतसुंदर चित्रण आणि निळाशार समुद्र तर आहेच!
जरूर बघा!

चित्रपटअनुभवशिफारस

प्रतिक्रिया

एमी's picture

2 Jun 2019 - 12:56 pm | एमी

छान लिहलंय.
माबोवरचा माझा जुना प्रतिसाद:-

अकबर-बिरबलाच्या गोष्टींपैकी 'चार मूर्ख शोधून आण' आठवतेय का? त्यातला पहिला मूर्ख, "माझी बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. आज त्यांचे लग्न आहे. त्यासाठी रुखवत घेऊन चाललोय." सांगणारा. तो खरंच मूर्ख असतो का? ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे
काऊई हार्ट हेमिंग्जचे The Descendants हे पुस्तक आणि त्याच नावाचा चित्रपट.
बोटिंग अपघातामुळे बायको कोमामधे गेल्यावर मॅट किंगला कळते की तिचे अफेअर होते. आणि आतापर्यंत अलिप्त नवरा-बाप असलेला मॅट, बायको-मुलींशी असलेले आपले नाते परत एकदा जोखायला लागतो. त्या प्रवासाची ही कथा.
इथेदेखील मला पुस्तकापेक्षा चित्रपट जास्त आवडला कारण:
• गोष्ट हवाई बेटांवरची आहे. त्यामुळे वाचण्यापेक्षा पहायला छान वाटते.
• हवाईन शर्ट-बर्म्युडामधला जॉर्ज क्लुनी आहे
• क्लुनी, शैलेन वूडले आणि इतरांनी छान अभिनय केला आहे.
• पण परत एकदा भावभावना, मनातले विचार वगैरे वगैरे पुस्तक वाचल्यास नीट कळतात.
• कोमा, लाईफ सपोर्ट काढून घेणे, विवाहबाह्य संबंध, १० आणि १७ वर्षांच्या मुलींना बापाने सांभाळणे आणि वारसाहक्कात मिळालेली जमीन खरंच 'आपली' असते का? असे जडजड विषय असूनही पुस्तक, चित्रपट दोन्ही हल्केफुलके, संथ वगैरे आहेत. सर्वांना आवडेलच असे नाही.

छान लेख, सुरेख प्रतिक्रिया....

मिपावर असे लेख व अश्या प्रतिक्रिया भरपूर वाढतील ... अशी आपेक्षा.

नैतर आहेच.... घोळवुन घोळवून चोथा झालेले टॉपिक्स

कुमार१'s picture

2 Jun 2019 - 1:37 pm | कुमार१

चांगला परिचय.

धर्मराजमुटके's picture

2 Jun 2019 - 1:40 pm | धर्मराजमुटके

मस्त परीक्षण ! फुकटात कोठे बघावयास मिळू शकतो ?

यशोधरा's picture

3 Jun 2019 - 8:13 am | यशोधरा

यू ट्यूब वर आहे.

धर्मराजमुटके's picture

4 Jun 2019 - 10:05 am | धर्मराजमुटके

युट्युबवर एक पेड वर्जन आहे रु. १२०.०० चे आणि दुसरा कोणीतरी टाकलेला आहे पण त्याची प्रिंट ठीकठाक नाहीये. अजुन थोडी शोधाशोध करतो.

लई भारी's picture

3 Jun 2019 - 7:12 am | लई भारी

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

@धर्मराजमुटके, टोरंट वर मिळून जाईल बहुधा.
आधीच वेळ मिळत नाही आणि त्यात हॉटस्टार आणि प्राईमवरच प्रचंड कंटेंट आहे त्यामुळे सध्या माझा टोरंट वावर कमी झालाय. :)

उगा काहितरीच's picture

4 Jun 2019 - 1:08 pm | उगा काहितरीच

आत्ता बघितला Hotstar वर.

लई भारी , धन्यवाद !
एका नितांत सुंदर चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.
ॲक्टिंग , कॕमेरा, सगळं सगळं अप्रतिम . वरवर पहाता साधी सरळ वाटावी अशी कथा आहे. पण नात्यांची गुंतागुंत खूप खोलवर आहे. वर सांगितलं त्याप्रमाणे थोडा संथ वाटतो मधेमधे पण तरीही खूप आवडला चित्रपट.
पुन्हा एकदा धन्यवाद.

लई भारी's picture

4 Jun 2019 - 5:04 pm | लई भारी

आपल्याला आवडला हे वाचून आनंद झाला :)

मराठी कथालेखक's picture

4 Jun 2019 - 4:07 pm | मराठी कथालेखक

छान
हिंदी आवृत्ती आहे का ?

लई भारी's picture

4 Jun 2019 - 5:07 pm | लई भारी

हॉटस्टार वर तरी दिसली नाही.
माझ्या मते शक्यतो हिंदी मिळाला तरी बघू नका. इंग्लिशच बघा.

मला पण बरेच संवाद कळत नाहीत, पण सबटायटल्स वाचत बघतो. थोडी मजा कमी होती('वाचू की बघू' असं झाल्यामुळे) पण मूळ संवादाची मजा वेगळीच असते!

मराठी कथालेखक's picture

6 Jun 2019 - 12:52 pm | मराठी कथालेखक

माझ्या मते शक्यतो हिंदी मिळाला तरी बघू नका. इंग्लिशच बघा

माझ्या मते चित्रपट ज्या भाषेतून जास्त कळू शकेल त्या भाषेतूनच बघणे योग्य होईल. जर सगळे संवाद कळालेच नाहीत तर त्याचा आनंद कसा घेणार.. ? शिवाय डब करताना जे भाषांतर केले गेले त्या भाषांतरकारापेक्षा माझे इंग्लिश उजवे आहे असे काही मी मानत नाही :)

इंग्रजी सबटायटल वापरा. सुरवातीला बराच त्रास होतो पण नंतर सवय होते.

> शिवाय डब करताना जे भाषांतर केले गेले त्या भाषांतरकारापेक्षा माझे इंग्लिश उजवे आहे असे काही मी मानत नाही :) > अमेझिंग स्पायडरमॅन 2 च्या शेवटी एक डायलॉग होता People will get hurt त्याचे डबिंग 'लोगों के दिल तूट जायेंगे' असं केलेलं :D

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2019 - 2:44 pm | मराठी कथालेखक

People will get hurt त्याचे डबिंग 'लोगों के दिल तूट जायेंगे' असं केलेलं

मला तरी या रुपांतरात काही चूक वाटत नाही. शब्दशः भाषांतर नसले तरी अर्थ तोच आहे की... तुम्हाला काय भाषांतर अभिप्रेत होते ?

इंग्रजी सबटायटल वापरा

खूप घाईने वाचावे लागतात तरी अनेकदा पुर्ण वाचून होत नाही शिवाय दृष्याकडे दुर्लक्ष होते ते वेगळे. त्यापेक्षा हिंदीत संवाद ऐकत दृष्याचा पुर्ण आनंद घ्यायला मला आवडते.

> मला तरी या रुपांतरात काही चूक वाटत नाही. शब्दशः भाषांतर नसले तरी अर्थ तोच आहे की... तुम्हाला काय भाषांतर अभिप्रेत होते ?> मला नक्की सीन आठवत नाहीय पण खलनायक लोकांना जाळपोळ वगैरे करून खरंच शारीरिक दुखापत करत असतो त्याबद्दल तो डायलॉग आहे. Hurt हे शारीरिक दुखापतीबद्दल आहे दिल दुखावण्याबद्दल नाही :D :D

> खूप घाईने वाचावे लागतात तरी अनेकदा पुर्ण वाचून होत नाही शिवाय दृष्याकडे दुर्लक्ष होते ते वेगळे. > तुमच्या या आणि इतर सर्व तक्रारी मान्यच आहेत. मीदेखील खूप रीलकटन्टली सबटायटल्स वापरायला चालू केलं. पण इंग्रजी चित्रपट, मालिका बघायचे असतील तर हाच एक मार्ग आहे. कारण एक्सेंटमुळे त्यांचे संवाद सहज कळत नाहीत आणि डब सिनेमा मिळत नाहीत.

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2019 - 5:16 pm | मराठी कथालेखक

Hurt हे शारीरिक दुखापतीबद्दल आहे दिल दुखावण्याबद्दल नाही :D :D

हा हा ... !!
पण भाषांतर दरवेळी इतकं गंडलेलं नसेल अशी आपण आशा करु :)
बाकी डब सिनेमाची अजून एक समस्या म्हणजे अनेकदा संवादफेक विचित्र /एकसूरी पद्धतीने असते .. मूळ चित्रपटातील पात्राने जीव ओतून अभिनय केलेला असतो , भावना समजून संवाद म्हंटलेले असतात पण डबिंगवाले सगळंचा एका पातळीला आणतात (अपवाद वगळता)
पण काय करणार त्या गोर्‍यांचे उच्चार कळत नसल्याने दुसरा पर्याय नसतो ना :)