ग्राम"पंचायत" लागली..!! -7

विशुमित's picture
विशुमित in जनातलं, मनातलं
16 Nov 2017 - 6:00 pm

http://www.misalpav.com/node/40963
http://www.misalpav.com/node/41040
http://www.misalpav.com/node/41296
http://www.misalpav.com/node/41316
http://www.misalpav.com/node/41364
http://www.misalpav.com/node/41395

सगळे उमेदवार चिन्ह मिळवून घरी परतले. संग्राम भाऊ ने आपली फॉर्च्युनरच आमच्या उमेदवारांच्या दिमतीला ठेवली होती. ९.३० वाजता वॉर्ड ३ मधल्या पवारांच्या घरी प्रचाराची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठकीचा सांगावा धाडण्यात आला.
नानांनी लुंगी फेडून धोतर नेसले. सदऱ्याच्यावर राष्ट्रीय पदक विजेत्या नातेसुनेचे निळसर ब्लॅझर चढवले. नानांना ते उबदार ब्लॅझर प्रचंड आवडायचे. मी एक दोनदा समजावण्याचा प्रयत्न केला की हे ब्लॅझर तिच्या सन्मानार्थ दिले आहे. आपण कोणीही वापरणे ठीक नाही.
"छत्रपती पुरस्काराची दावेदार होती ती. तिच्या कष्टाला ब्लॅझरवर भागवले. ज्याचं आहे त्याने मला वापरयाला दिले तू कशाला चोंबडेपणा करतो." आमचा नाना पाटेकर झाला होता. म्हंटले मग घाला.
बैठकीची वेळ जाणून बुजून ९.३० नंतरची ठेवली होती. बरेच फायदे होते. रात्रीचे कोणाला काही दिसणार नाही नक्की कोण कुठे चालला आहे, जेवणाची वेळ टळून गेलेली असते आणि जेवण करून आल्यामुळे लोक सहसा चहाला नाकच मुरडतात. पाव्हणा बूड टेकवतोय ना टेकवतो त्याच्या हातात चहाचा कप टेकवायला माउलींसारखी घरं गावात विरळच. बायांना कमालीचा कटाळा.
बटन स्टार्ट काय काम देईना तसा नानांचा पारा चढला. फुकाट १० हजार एक्सट्राचे घालवले असा एकंदरीत स्वर गाडीच्या बटनातून जाणवत होता,
पाय नीट काम देत नसताना सुद्धा धोतराने किक मारली आणि जोरात मूठ पिळली. गाडी बांग बांग करत ओढा ओलांडून हायवेच्या कडेच्या पवारांच्या बंगल्याजवळ पोहचली.
गाडी स्टॅन्ड वर लावली. स्वागतासाठी कोणीतरी बाहेर येईल असे त्यांना वाटले पण २-३ मिनिट झाली तरी कोणीच बाहेर आले नाही. मग ते थेट घरात घुसले.
नानांना पाहून संग्रामभाऊ आणि इतर मंडळीनी उठून राम राम शाम शाम केला. त्यांच्या अगोदर मला तिथे पाहून किकमुळे पिंडारीला खरचटलेले उपरण्याने दाबून धरले.
" सगळ्या दारे आणि खिडक्यांच्या चौकटींना मार्बल बसवले आहे. फरशी तर एकदम फेसो फेस बसवली बसवली आहे. बंगल्यापेक्षा फर्निचरलाच जास्त खर्च केलाय. ३२ लाख रुपये राखेची भुकटी उडवल्यासारखे उडवले", सदाशिव पवार आपल्या नवीन बांधलेल्या बंगल्याविषयी भरभरून बोलत होते.
"कारागीर कुठले आणले होते" पम्याने आपला चौकशीचा पाढा चालू केला.
" राजस्थानमधल्या 'सुरत'चे बिहारी मिस्त्री खास रेल्वेने आणली होती." पवारांनी लोकांच्या अ'ज्ञाना'त भर घातली.
"वाळू कशी ब्रास बसली ?" पम्याचा दुसरा हार्दिक पंड्या शॉट नानांनी मिड ऑनला झेलला.
" भाड्या तू इकडे कसा काय ?"
" नाना राजकारण आहे हे. पहिल्यापासून तुमच्या चहाच्या साखरेला जागलो आहे आणि जागत राहणार."
नानांचा मिठावरचा भरोसा उठला होता ते साखरेवर काय विश्वास ठेवणार ?
या मिटिंगच्या बातम्या विरोधी पक्षाला पोहचणार याची त्यांना पूर्ण खात्री झाली होती. पुढचे डावपेच खेळायला तसे त्यांना आयतेच कोलीत मिळाले होते म्हणा.
संग्राम भाऊंनी प्रचाराची रूपरेषा कशी असावी याचे प्रास्ताविक देण्यासाठी मला पुढे केले. नानांनी मान खाली घातली.
" आपला पॅनल हा तरुण मध्यम आणि वयस्कर मंडळींचा परिपाक आहे. संग्रामभाऊंचे नेतृत्व (मनातल्या मनात पैसा सुद्धा) आणि नानांसारख्या मंडळींचे आशीर्वाद ही आपली जमेची बाजू आहे. पहा ही निवडणूक अटीतटीची असणार आहे. विरोधक आपल्यापेक्षा पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरणार यात शंका नाही. त्यामुळे आपला प्रचार त्यांच्या पेक्षा हायटेक असायला पाहिजे. जुन्याप्रचार पद्धती बरोबरच आपण फेसबुक आणि व्हाट्सअपचा प्रभावी वापर करायचा. प्रत्येक वॉर्डात छोटे छोटे गट तयार करून अखंड प्रचार चालू ठेवायचा." अशा प्रकारे दहा मिनिटांचे प्रशिक्षणपर भाषण मी आटोपले. पम्याच्या साखरेची टीप नानांनी मला इशाऱ्यानेच दिली होती.
माझ्या नंतर संग्रामभाऊ उभे राहिले. मला वाटले होते की सैराट मधल्या पाटलांसारखे बोलेल पण संग्रामने उत्कृष्ट वक्त्यासारखे खूपच तोलून मोजून भाषण केले.
नानांनी ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीच उठून भाषण केले नाही. ते बसून बोलण्यात पटाईत होते.
नानांच्या हेर खात्याचा बहिर्जी मण्याची चुळबुळ चालू झाली. संग्राम ने मनीषला इशारा करून त्याचे म्हणणे मांडायला सांगितले.
" हे बघा भाऊ (संग्राम) आणि भैया (म्हणजे मी) यांनी योग्य मार्गदर्शन केले आहे पण ही निवडणूक जिंकायला हे पुरेसे नाही." मन्याने सुईत दोरा ओवला.
"मग आणखी काय करायला पाहिजे?" मॉब ने एक साथ आवाज केला.
" नानांसाठी आपण पूर्ण एकजुटीने लढले पाहिजे. त्यासाठी मला काही पोरे द्या प्रचाराला. त्यांनी व्हाट्सअप करण्यापेक्षा विधायक कामे केली पाहिजेत."
"कोणती " जनतेची उत्सुकता.
" आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने ४- ४ घरे धरायची. त्यांनी निवडणूक होईपर्यंत त्या घरातील बाया बापड्याना आराम द्यायचा."
"कसा ?" एक सुरात सगळे.
" त्यांच्या गुरांचे श्यान काढायचे, धारा काढून दूध डेरीला घालायचे, कडबा कुट्टी करून द्यायची आणि घरातल पाणी भरायचे. एवढे केले तर त्या बायांची मते आपल्याला फिक्सच होणार आणि त्यांच्या गड्यांची टाप नाही आपल्याविरोधात मतदान करायची. फक्त हे निवडणूक होई पर्यंत नियमित झाले पाहिजे आणि आपल्या चिन्हाची घोकंपट्टी मस्ट !"
प्रचाराचं हे अजब तंत्रज्ञान राष्ट्रीय पक्षांना मिळाले तर त्यांची घरटी हजारो वर्ष शाबूत राहतील.
-----
"आजचा काय प्लॅन आहे? " देवाला गंध लावत नाना बोलले.
मला वाटले देवालाच विचारात आहेत नंतर माझी गाडी रुळावर आली.
" सगळीकडे उमेदवारांचे फ्लेक्स लागलेत. आज वॉर्ड एक मधून सुरवात करायची आहे. आपल्याला फक्त आपल्या वॉर्डात लक्ष नाही घालायचे. संपूर्ण पॅनेलची जवाबदारी आहे."
" ती आहेच रे. पण आपल्या वॉर्डाकडे जास्त लक्ष ठेवा. आपल्या वॉर्डापासून खरं सुरवात करायला पाहिजे होती." नानांनी नाराजी दर्शवली.
" आपल्या वॉर्डाचा ७० % प्रचार रात्रीच्या मिटिंग नंतर ११ वाजताच झाला आहे." फुलांनी भरलेले ताम्रपट नानांसमोर करत म्हंटले.
" ७०% ???"
" २००० हजाराचा रेट फोडला आहे संग्राम ने " उदबत्ती पेटवून ओवाळण्यासाठी नानांच्या हातात दिली.
मागच्या सगळ्या प्रकारच्या निवडणुकीचा अनुभव पाहिला तर प्रचार आणि मतदाराचा राजरंग बघून निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसे वाटप केले जायचे. पण संग्रामच्या व्यापारी दूरदृष्टीने ऍडव्हान्स देऊन पार्ट्या आधीच बुक करून घायची चाल त्याने खेळली होती. प्रचाराचा नारळ फुटायच्या आधी वाटप करायला सुरवात केली होती. रात्रीच्या मिटिंगमध्ये बरेच विरोधी हेर असून देखील त्यांना त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.
अवकाळी पाऊस पडल्यामुळे सोयाबीन आणि बाजरीची पिके नष्ट झाली होती. सरकार कर्जमाफी करणार होते. ज्यांनी वेळेत सगळी कर्जे फेडली होती त्यांना १५-२० हजार मिळणार होते, ते पण मिळाले नव्हते. फॉर्म भरायला ५०० आणि चकरा हाणायला हजार रुपये मात्र लोकांचे खर्च झाले होते. ज्या घरात नोकरदार होते त्यांना सोडून बाकी सगळ्यांना रीन काढून सण साजरा करण्याची नामुष्की ओढवली होती.
(पैशाचा) दुष्काळ पडला की माणसाची पहिले काय बदलत असेल, ती म्हणजे नीतिमत्ता.
संग्राम ने 'आजी देतो पोट भरे' एवढी त्याची तिजोरी रीती करायची तयारी दर्शवली होती.
प्रति मतदार २००० च्या हिशोबाने घरटी १०-१६ हजार रुपये वाटले गेले होते. मत द्या नाहीतर नका देऊ पण दिवाळी गरगरीत करा आणि खुशाल विरोधी पार्टीच्या प्रचारामध्ये फिरा असा संकेतच संग्राम समर्थकांनी मतदारांना दिला होता.
नानांनी तुळशीला पाणी घातले आणि कॉफीचा फुरका वाजवला.
----
संग्रामभाऊंच्या वडिलांनी सुरवातीला डेरीची स्थापना करून पंचक्रोशीतली दूध संकलन चालू केले होते. शेजारच्या गावांमध्ये काही डेऱ्या होत्या पण ७-८ किमी पायंडल मारून डेरीत जाऊन गवळ्याला दूध घालावे लागत होते. शेतकऱ्यांचे दुःख त्यांनी जाणले होते आणि त्याचबरोबर उद्योग वाढीसाठी त्यांनी दारोदारी जाऊन दूध संकलन चालू केले. त्यामुळे त्यांची डेरी कमी वेळामध्ये खूप प्रसिद्ध झाली आणि उद्योगाचा आलेख वाढतच गेला.
गावातील बऱ्याच लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या घरादाराचे मतदान फिक्स असे समीकरण तयार झाले. त्यामुळे बराच काळ गावच्या राजकारणामध्ये त्यांनी दबदबा निर्माण केला.
वडिलांना हा एवढा मोठा प्रपंच सांभाळणे अवघड झाले म्हणून शाळा अर्धवट सोडून संग्राम ने धंद्यात लक्ष घातले. नंतरच्या काळात कॉम्पिटिशन जास्त वाढल्यामुळे संग्राम ने आधुनिक फायनान्सिंगचे प्रयोग करणे सुरु केले. ज्याला दूध धंदा सुरु करायचा आहे त्याला त्याने बिनव्याजी जेवढ्या गाई घायचा तेवढे कर्ज देणे सुरु केले. त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदा उठवत प्रगती केली. पण कालांतराने काही लोकांनी त्या बिनव्याजी कर्जाचा गैरवापर करून संग्रामाचे पैसे बुडवायचा धडाकाच लावला. त्यामुळे संग्राम अशा लोकांवर बिथरला आणि आपला व्यवसाय वाचवण्यासाठी गुजर-मारवाडी गुर्मीची भाषा अपकसुकच त्याच्या तोंडी आली. ते लोक सुद्धा इतके निर्लज की बाहेरून येणाऱ्या गुजर-मारवाड्यांचे कटू बोल थुंकी झेल्यासारखे झेलायचे पण स्वतःच्या गावातील संग्रामचा एक रगील शब्द त्यांना मानवत नव्हता.
अशा लोकांनी संग्रामच्या विरोधात काही बाही पसरवण्याची आघाडी खोलली. ही आघाडी ढाढीवाल्यांच्या पथ्यावर पडली.
मतदारांना पैसे वाटणे नैतिकतेच्या चौकटीत बसणारे नव्हते त्यावर त्याने मार्मिक उत्तर दिले.
" हे पैसे जे मी वाटतोय हे त्याच लोकांचे आहेत. या लोकांमुळेच आम्ही श्रीमंत झालो त्यातील काही रक्कम पुन्हा त्यांना दिली तर बिघडले कुठे?"
"पण हे अनैतिक आहे "
" नैतिक अनैतिक काही नसते. आपण नाही वाटले पैसे तरी पुढची पार्टी वाटणारच आहे. आता जनता लबाड झाली आहे. पूर्वी सारखी एकवचनी लोक मिळणे खूप अवघड आहे." ह्या रांगड्या माणसाने तत्वज्ञानाचे डोस पाजायला सुरवात केली.
माझ्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक होती ज्याच्या प्रचाराची सूत्रे माझ्या हाती होती.
माझ्या व्हाट्सअप आणि फेसबुकला ना रिप्लाय ना लाईक होता. कारण गावाच्या राजकारणामध्ये कोणीही मतदार उघड समर्थन किंवा विरोध करत नाही, हे मला कळून चुकले होते.
रात्री ११ नंतरचा प्रचार एकदम इफ्फेक्टिव्ह ..!
-----
" संभा मी तुलाच मतदान करणार आहे. विश्वास ठेव. पैसे वगैरे नको मला. सारखे सारखे माझ्या घरी येत जाऊ नका त्यांना संशय येईल." पाप्या काकुळतीला येऊन सांगत होता.
" पैसे वाटायलाच दिल्यात तू नाही घेतले तरी आम्ही वापरू." मन्याने फुसका बार भरला.
" बरं चालतंय, तुम्ही एवढे म्हणताय तर पैसे घेतो आणि तुलाच मतदान करतो." पप्याने पलटी खाल्ली.
" मित्र असावा तर असा. आता एक काम कर ह्या परडी आणि म्हस्कोबाच्या भंडाऱ्याला एकदा हात लाव आणि म्हण " दगा करणार नाही. संग्रामच्याच पॅनलला मतदान करील. नाही केले तर अंबाबाई आणि म्हस्कोबा माझे बरे वाईट बघून घेईन." मन्याने प्रशिक्षित भटासारखे पप्याला कैचीत पकडले.
" लका एवढा विश्वास नाही का ? पैसे घेणार म्हणजे तुम्हालाच मतदान करणार की ?" पाप्यासमोर धर्म संकट ओढवले.
" विश्वास गेला पानिपतच्या युद्धात. तू आम्हालाच मतदान करणार तर परडीला हात लावायला तुझे काय जातंय." मण्याचे बोलण्याने खवट शेंगदाण्याला पण लाजवले.
" अरे पण?""
" अरे नाही आणि कारे नाही." साला मन्या एकदम अडेल.
" याचा अर्थ तुझ्या मनात अजून पण आहे तर. मैत्रीची हीच आब राखलीस का? रात्र बघितली नाही दिवस बघितला नाही. तुझं पोरग आजारी होते तेव्हा भिंगरी सारखा पळत होता. सगळं विसरला राव तू. जाऊ दे मनू. घे पैसे ते. त्याला कोणाला मतदान करायचे आहे ते त्याला करू देत. " संभा ने पप्याला भूतकाळाची आठवण करून दिली आणि पैसे घेण्याचा प्रयत्न केला.
" बरं बाबा संभा, लावला हात परडीला. उचलला हा भंडारा. राहू देत ते पैसे आता."
पप्याने 'ना घर का ना घाट का' होण्यापासून स्वतःला वाचवले.
वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळ्या श्रद्धास्थानांच्या भंडाऱ्याच्या पुड्या मन्याने खिशात ठेवल्या होत्या.
----
प्रचार संपायला अवघे दोन दिवस उरले होते. संग्राम ने सकाळ सकाळ संपूर्ण तिन्ही वॉर्डात प्रभात फेरी काढायचे नियोजन आखले होते. शेवटच्या दिवशी फक्त पारंपारिक घोंगड्या बैठकी घायचे ठरले.
आमचा इसाळ म्हणून की काय, दाढीवाल्यांचे सुद्धा प्रति प्रभात फेरी काढायचे व्हाट्सअप फिरले.
हा हा म्हणता दोन्ही बाजूनी तोबा गर्दी झाली. फक्त कोण कोणाला मतदान करणार आहे हे गुपित होते. मतदान म्हणजे गुप्त दान..!
दोन्ही पॅनल सामोरा-समोर आले तसे कॅलॅशेस होणार हे ओळखून डिपार्टमेंट सुद्धा काठ्या घेऊन तयार होते. वळवळ करायची खुमखुमी आणि कुवत दोन्ही पॅनलमध्ये आता उरली नव्हती.
फक्त तिकडून काही घोषणा झाल्या.
" धोतर लुंगी कसं रे काय, खाली मुंडे वर पाय."
लुंग्या सुंग्यानी त्यांना फाट्यावर मारले.
प्रभात फेरी फिरत फिरत ब्राह्मण वाड्यात येऊन पोहचली.
यांचे एक मला समजले नाही. गावा-गावात आनंदनगर/इंद्रानगर जसे गावकुसाच्या थोडे फटकून एका बाजूला वस्ती असते तशी, ब्राह्मण वाड्याला सुद्धा एक स्वतंत्र जागा आमच्या गावात होती. त्या साईडला सहसा कोणी फिरकत नसे. भुताचा वाडा नव्हता तो. माणसेच राहत होती तिथे. पण लोकांनी यांना वाळीत टाकले होती की त्यांनी गावकऱ्यांना वाळीत टाकले हे कळण्याची सोय नव्हती. नावाला वाडा होता पण छान चौकोनी असे ५-५ खोल्यांचे ३-४ बंगले होते.
इथे राहणाऱ्या सगळ्या काकांना लोक ओळखत होते. कारण गावात त्यांचे शाळेतील मित्र होते. पण त्यांची पोरे नक्की काय करतात आणि कोठे असतात याचा मात्र पम्याला पण थांगपत्ता नसावा.
त्यातील एका काकांनी पूर्वी निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला होता. गावकऱ्यानी त्यांना कुळकायद्यातून वाचलेली दिड ऐकर जमीन घाण ठेवायला भाग पाडले होते. त्यापासून ते बाहेरूनच पाठिंबा देतात. असो.
काकांच्या काकू सकाळी वॉकिंगला बाहेर पडल्यावरच लोकांच्या दृष्टीस पडत असत. कवचितच त्या इतर महिलांबरोबर मिसळत असत. आजी हयात असताना तिथल्या मोठ्या काकू आवर्जून हळदी कुंकवाला आमच्या घरी येत असत.
खूप दिवसातून मी या वाड्याकडे फिरकलो होतो. तसा या वाड्यात यायचा माझा योग पूर्वी बऱ्याच वेळा यायचा. कारण प्रत्येक एकादशीला इथे भजन असायचे आणि मी लहानपणापासून नानांबरोबर तिथे भजनाला जायचो.
जर वेळेस त्या काकू आतून मला ठरलेला एक अभंग आणि गौळण म्हणण्यासाठी फोर्स करायच्या. मी त्या दुपटी उत्साहात गायचो.
आठवणीत गुंग होतो तोच, साक्षात काकूच माझ्या समोर उभ्या.
" तू माउलींचा नातू ना रे ."
" हो "
" इकडे काय करतोय या लोकांबरोबर?"
काकू कुत्सित बोलल्या नव्हत्या उलट त्यांना मी गावकरणात पडणार नाही याचा विश्वास होता का श्रद्धा होती देव जाणे.
" नानांचा पॅनल आहे. फिरले तर पाहिजे ना. तेवढे लक्ष असू द्यात आमच्या उमेदवारांवर."
" ते ठीक आहे पण आमच्यासाठी तुमचा पॅनल काय करणार?" काकूंचा जागृत मतदार तरतरीत जागा झाला.
" तुम्ही तुमचे निवेदन तर द्या. १००% आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू." आश्वासन द्यायला आता शिकलो होतो.
" मागच्या बॉडी ने आंतरिक रस्त्या मधून आमचा वाडा वगळला होता. जो कोणी तो पूर्ण करून द्यायचे वचन देईल. त्याला आमचा पाठिंबा."
विकासाला मत हा निर्धार काकूंनी बोलून दाखवला.
" निवडणुकी नंतरच्या पहिल्या ग्रामसभेत तुमच्या रस्त्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल. हे वचन देतो. अजून बोला काय पाहिजे ?" मी फुल्ल कॉन्फिडन्ट.
" आणखी तुला ती गौळण म्हणायला लावली असती पण ..."
" तुम्ही म्हणताय तर पाव्हणे म्हणतील लगेच. त्यात कुठे विद्या फुकायची आहे." मन्याने आपला कारभार करून मोकळा झाला होता.
एक गठ्ठा २३ मतदान मिळत असेल तर गौळण काय चीझ आहे.
"डोळे मोडीत राधा चाले".....
====
क्रमश :

((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))

कथासमाज

प्रतिक्रिया

नाखु's picture

16 Nov 2017 - 7:06 pm | नाखु

अंगार्याचं शहरांत चालतं का ? का आणखी काही व्यवस्था केली आहे?

शहरातील अनभिज्ञ नाखु पांढरपेशा

विशुमित's picture

20 Nov 2017 - 4:04 pm | विशुमित

परडी आणि बेल भंडाऱ्याचं प्रकरण मनाला खूप क्लेशदायक वाटले होते.

शहरात पण कमी अधिक प्रमाणात चालत असावे बहुतेक.

Nitin Palkar's picture

16 Nov 2017 - 7:44 pm | Nitin Palkar

झ्याक चाललंया!

सही आहे हा भाग.. पुढच्या भागाची जास्त वाट पहायला लावू नका..

Nitin Palkar's picture

16 Nov 2017 - 8:32 pm | Nitin Palkar

सातवा भाग प्रथम वाचला, नंतर एक ते सात भाग सलग वाचले. त्यामुळे मी सर्वाधिक enjoy केले असेल. :D :D :D

अनन्त अवधुत's picture

16 Nov 2017 - 11:07 pm | अनन्त अवधुत

छान सुरु आहे निवडणूक. पु भा प्र.

संग्राम's picture

17 Nov 2017 - 7:48 am | संग्राम

वाचतोय .... पु.भा.प्र.

निवडणूक प्रचार मस्त चालु आहे . होउ देत खर्च , शेत आहे घरचं . पुभाप्र .

आनन्दा's picture

17 Nov 2017 - 7:53 am | आनन्दा

मस्त आहे.. यातलं सगळं नाही, पण बरेचसे अनुभवले आहे. बायकोचा भाऊ स्थानिक राजकारणात आहे, त्यामुळे परवाच्या निवडणुकीच्या आठवणी ताज्या होतायत

एस's picture

17 Nov 2017 - 8:35 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

विशुमित's picture

17 Nov 2017 - 11:23 am | विशुमित

धन्यवाद मंडळी ..!!

पुढचा भाग पूर्ण करण्याच्या तयारीत...

राजाभाउ's picture

17 Nov 2017 - 2:12 pm | राजाभाउ

मस्त !! एकदम सात भाग वचुन काढले, एक नंबर !!!!
पुभाप्र

विशुमित's picture

17 Nov 2017 - 2:26 pm | विशुमित

तुमच्यासारख्या जुन्या-जाणत्या सदस्यांकडून मिळालेली पावती खरंच स्फुरण देऊन गेली.

धन्यवाद...

निमिष ध.'s picture

17 Nov 2017 - 9:04 pm | निमिष ध.

लै भारी चालू आहे बघा !! एका दमात ७ भाग वाचून काढले !! येऊ द्या पुढचे भाग जोरात !

जव्हेरगंज's picture

17 Nov 2017 - 9:30 pm | जव्हेरगंज

क्या बात है. एकदम रांगडी शैली. वाचताना फील होतेय.
जबरी!

पैसा's picture

18 Nov 2017 - 9:01 pm | पैसा

भारी रंगतेय विलेक्शन!

रातराणी's picture

22 Nov 2017 - 12:00 am | रातराणी

भन्नाट सुरू आहे!! सातही भाग वाचले, उत्कृष्ट कादंबरीचं मटेरियल आहे हे!!

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2017 - 3:18 pm | टवाळ कार्टा

पुभालटा

अँड. हरिदास उंबरकर's picture

30 Nov 2017 - 10:45 pm | अँड. हरिदास उंबरकर

एकदम रसभरित वर्णन आहे..अस लिखाण पुस्तक रूपातुन प्रकाशित झाल पाहिजे..

अस्वस्थामा's picture

4 Jan 2018 - 8:56 pm | अस्वस्थामा

येऊ द्या की पुढचा भाग आता.. :)