डिश टीव्ही व ग्राहक मंच चा अनुभव

अलबेला सजन's picture
अलबेला सजन in जनातलं, मनातलं
6 Nov 2017 - 2:49 pm

नमस्कार..

मी डिश टीव्ही चा गेले ३ वर्ष ग्राहक आहे. इतके दिवस त्यांची सेवा सुरळीत चालू होती. मात्र १८.१०.२०१७ रोजी मला एक विचित्र अनुभव डिश टीव्ही कडून मिळाला त्याबद्दलचे हे अनुभवकथन.

दि. १८.१०.२०१७ रोजी मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे झी मराठी वरील कार्यक्रम बघत होतो. ८.१० मिनिटांनी अचानक माझ्या टीव्ही वरील प्रसारण बंद झाले व तेथे “तुमचा balance संपला आहे, रिचार्ज करा” असा मेसेज झळकू लागला. मला काही समजेना कारण माझ्या खात्याला पुढचे ६ महिने पुरेल इतका रिचार्ज मी करून ठेवला होता. मग नेहमी प्रमाणे एकदा टीव्ही व डिश बंद करून चालू करून पहिले पण तोच मेसेज दिसत होता. आता रात्री ८.३० ला कुठे कस्टमर केअर ला फोन लावा उद्या सकाळी बघू म्हणून टीव्ही बंद करून ठेवला.

दुसर्या दिवशी सकाळी टीव्ही सुरु केला तरी तोच मेसेज दिसत होता व कोणताच channel बघता येत नव्हता. म्हटले चला आता कस्टमर केअर ला फोन लावूया. आणि जी काही माहिती मला कस्टमर केअर कडून मिळाली त्याने मी हादरलोच. त्यांनी सांगितले की तुमचे कनेक्शन terminate करण्यात आले आहे आणि ते आता कधीच सुरु होणार नाही. मी त्यांना विचारले की असे का करण्यात आले तर ते म्हणाले कि तुमच्याच सांगण्यावरून आम्ही हे कनेक्शन terminate केले आहे. पण मी तर असा कोणताच फोन केला नव्हता तेव्हा त्यांना मी विचारले कि कोणत्या मोबाईल नं वरून मी फोन केला तो सांगा तर तो नंबर ही भलताच कुणाचा तरी तरी होता. माझा account balance हि त्यांनी ० करून टाकला होता व तुमचे कनेक्शन आता कधीच सुरु होणार नाही असेही सांगितले.

आता मी शांत पणे विचार करायला सुरवात केली की नक्की काय करायला लागेल कारण कस्टमर केअर तर कनेक्शन सुरु करून देत नव्हते व खात्यामध्ये २००० च्या वर balance होता. इतक्या रकमेवर पाणी सोडणे तर शक्य नव्हते. येथे माझा मिसळपाव व अन्य मराठी संकेत स्थळांवर वर वाचलेल्या इतर ग्राहक तक्रारींचा अनुभव पाठीशी होता, व त्याद्वारे मला प्रत्येक मोठ्या कंपनीचा तक्रार निवारणासाठी एक रिजनल सपोर्ट ऑफिसर असतो हे आठवले. त्याप्रमाणे मी डिश टीव्हीच्या संकेत स्थळावर जावून रिजनल सपोर्ट ऑफिसर चा इमेल पत्ता शोधला. दिनांक २४.१०.२०१८ रोजी ही सर्व हकीगत मी डिश टीव्ही चे रिजनल सपोर्ट ऑफिसर श्री. अल्बर्ट साहेब यांना इमेल द्वारे कळवली व त्यामध्ये मी माझ्या तक्रारीचे निवारण दि. ३१.१०.२०१७ पर्यंत करण्यास विनंती केली व तसे न झाल्यास मी ग्राहक मंच कडे तक्रार करीन असेही कळवले. त्यावर श्री. अल्बर्ट साहेब यांनी त्यांचे सहकारी श्री. इम्रान साहेब यांना यात लक्ष घालण्याचे इमेल द्वारे कळवले.

श्री. इम्रान साहेब यांचेकडून पुढे काहीच हालचाल न झाल्यामुळे मी दि. ३०.१०.२०१७ रोजी एक स्मरणपत्र इमेल द्वारे पाठवले, त्यावर ही त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही.

शेवटी दि. ०१.११.२०१७ रोजी मी आधी ठरवल्याप्रमाणे ग्राहक मंच कडे तक्रार करण्याचे ठरवले व हे आता कसे करता येईल यासंदर्भात आंतरजालावर शोध घेण्यास सुरवात केली. आणि मला National Consumer Forum चे संकेत स्थळ सापडले. त्यावर इमेल द्वारे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तसेच मोफत दूरध्वनी क्र. व sms द्वारे ही तक्रार करण्याची सोय होती. मी लगेच इमेल द्वारे तक्रार करण्याचा पर्याय उघडून त्यात सर्व कहाणी लिहिली व डिश टीव्ही ला केलेल्या इमेल ची प्रत सुद्धा पाठवली. दिनांक ०२.११.२०१७ रोजी मला National Consumer Forum च्या प्रतिनिधी चा फोन आला व त्यांनी माझ्या तक्रारीची शहानिशा केली व मला थोडे दिवस थांबा आम्ही आपली तक्रार वरिष्ठ व्यक्ती कडे पाठवत आहोत, सर्व माहिती पडताळणी करून आपली तक्रार नक्कीच निवारण केली जाईल असे आश्वासन दिले. मला हे सर्व अजिबात अपेक्षित नव्हते, तक्रार केल्याच्या दुसर्याच दिवशी चक्क फोन करून विचारणा होते व मदत करण्याची ग्वाही मिळते याचा मला सुखद धक्का बसला व आता माझ्या तक्रारीचे नक्कीच निवारण होईल याची खात्री झाली.

ग्राहक मंच कडे तक्रार केल्यानंतर मात्र जादूची कांडी फिरल्यासारख्या हालचाली झाल्या. आतापर्यंत डिश टीव्ही वाल्यांनी माझ्या इमेल ला काहीच उत्तर दिले नव्हते मात्र ग्राहक मंच कडून त्यांना नक्कीच खरमरीत दणका बसला असणार. दि. ०३.११.२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता मला डिश टीव्ही कडून फोन आला त्यांनी माझे जे कनेक्शन आता कधीच सुरु होणार नाही असे सांगितले होते तेच कनेक्शन आता सुरु करत आहोत असे मला सांगितले. त्याप्रमाणे मी घरी जावून बघितले असता कनेक्शन सुरु झालेले होते व सर्व channel सुरळीत दिसत होते.

अशा प्रकारे एक सुखद अनुभव मला National Consumer Forum कडून मिळाला व त्यांच्या सामर्थ्याची जाणीव ही झाली. ग्राहक हा एकटा नाही व योग्य मार्गाने गेल्यास आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवारण होऊ शकते याची खात्री झाली. या सर्व घडामोडीत मी मिसळपाव व अन्य मराठी संकेत स्थळांवर वाचलेल्या अनुभव कथन लेखांचा मला फायदा झाला व माझी तक्रार कमीत कमी वेळात (१५ दिवस) निवारण होण्यास मदत झाली.

तर असे हे माझे अनुभव कथन , माझे मिसळपाव सदस्यत्व ५ वर्षे जुने आहे मात्र मिपा वर एखादा लेख लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे काही चुकले असल्यास माफी असावी.

National Consumer Forum Website: http://consumerhelpline.gov.in

धन्यवाद.

हे ठिकाणमांडणीकथामुक्तक

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

6 Nov 2017 - 3:23 pm | नितिन थत्ते

माझा डिश टीव्हीचा अनुभव......

आपण एक कुठला तरी पॅक घेतो. तो पॅक घेण्याचे कारण काही विशिष्ट चॅनेल आपल्याला हवे असतात हे असते.

केव्हातरी तो चॅनेल दिसणे बंद होते. मग कस्टमर केअरला चौकशी केली तर तो चॅनेल आता या पॅकमध्ये नाही . तुम्हाला हा चॅनेल हवा असेल तर अमुक पॅक घ्या असे सुचवले जाते. तो पॅक नेहमीच अधिक किमतीचा असतो.

मी अगदी प्रथम जो पॅक घेतला तो काहीतरी बेस पॅक व इंडिया क्रिकेट पॅक असा घेतला होता. म्हणजे भारताची* क्रिकेट मॅच कुठल्याही चॅनेलवर असली (स्टार/टेनस्पोर्ट्स) तरी ती मी पाहू शकतो. काही काळाने मला कळले की हा इंडिया क्रिकेट पॅक आता अस्तित्वात नाही. आणि मला स्पोर्ट्स चॅनेल वेगळे घ्यावे लागतील.

*यातली मेख नंतर कळली . एकदा वर्ल्ड कप चालू असताना इंग्लंड विरुद्ध कोणीतरी अशी मॅच (आणि भारत ज्या मॅचमध्ये नाही ती कुठलीच मॅच) पाहता आली नाही. इनफॅक्ट वर्ल्ड कपची फायनलही बघता आली नाही.

येथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

महेश हतोळकर's picture

6 Nov 2017 - 4:00 pm | महेश हतोळकर

येथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुढे पाठपुरावा केलात की नाही? जरूर करा.

माझ्याकडे आहे डिशटिव्ही. आमचा दुकानदार बरोबर सांगतो - भारताची मॅच असली की नॅशनललाही दिसणार आहेच. फुटबॅाल कप असला की ज्यावर मॅच आहे तो चानेल चालू करायचा महिन्याभराने बंद करायचा.तीस रुपयांत काम होते.
१) डिशटिव्हि प्लस मध्ये रेकॅार्डिंग स्वस्तात होते.
२)डिशटिव्हिचा युजर इंटरफेस खास आहे.
( टाटास्कायचा २००८पासून आहे तोच भिकार आहे)
३)डिशटिव्हि(mpeg2) आणि व्हिडिओकॅान(mpeg4)
एक होत आहेत.
४) डिशटिव्हिच्या आडव्या डिशचा गेन टाटास्कायच्या डिशपेक्षा जास्ती वाटतो.
५) पॅकेज सतत बदलतात व तशी सूचना प्रत्येक डिटिएच देतो. इलाज नाही.

टाटा स्काय आणि व्हिडिओकॉन दोन्ही डीडी नॅशनल ब्लॉक करतात मॅचच्या दिवशी.

अभिजीत अवलिया's picture

6 Nov 2017 - 7:19 pm | अभिजीत अवलिया

भारताची मॅच असली की नॅशनललाही दिसणार आहेच.

न्यूझीलंंड विरुद्धची व थोड्या दिवसांंपूर्वी झालेली आॅॅस्ट्रेलिया विरुद्धची दिसली नाही. सुप्रीम कोर्टाने बंंदी घातलीय असा संंदेश येत होता.

मार्मिक गोडसे's picture

6 Nov 2017 - 6:55 pm | मार्मिक गोडसे

येथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. सेवा खंडित का केली ह्याचा जाब विचारा . जाणूनबुजून घोटाळा केला असेल तर नुकसान भरपाई मिळेल. नुकसान भरपाईपेक्षा कंपनीच्या मनमानी कारभाराला आळा बसणे महत्त्वाचे.

१) नॅशनल चानेल ब्लॅाक करायला परवानगी नसते.
२)त्या एका मॅचच्यावेळी बहुतेक सोनीने हक्क विकत घेतले होते.
३)पॅकेजमधले चानेल कधीही बदलण्याचे हक्क डिटिएच सेवादाताकडे अबाधित आहेत. ICAS पद्धत लागू झाल्यावर एका दिलेल्या बेस पॅकेजवर अधिकचा ADDON घेता येतो. तो बंद नाही होत. परंतू चानेलचे मालकच त्यांचे बुके बदलू शकतात तेव्हा डिटिएच सेवादाता काही करू शकत नाही. अधिकचे पैसे देण्यावाचून पर्याय नाही.
१) एपिक चानेल डिशटिव्हीवाल्यांनी माझ्या पॅकेजातून काढला आणि त्याचे वेगळे तीस रुपये लागतील असे दिसले. परंतू तोच टाटास्कायच्या ९९/- बेस पॅकेजात आहे. गेल्या दीड वर्षात फक्त जुनी उजळणीच करत आहेत. शिवाय बंदही होईल कारण रिलाअन्सचा आहे.
२) साउथ- तेलगु , बंगाली,उडिया चानेल्ससाठी टाटास्काय उत्तम आहे.

रॉजरमूर's picture

6 Nov 2017 - 8:51 pm | रॉजरमूर

चांगला दणका दिलात....
पण असे काही केल्याशिवाय कंपन्या ताळ्यावर येत नाहीत हेच खरे .
जिओ DTH ची टांगती तलवार असताना डिश टीव्ही असे वागतेय हे अजब आहे .
मध्यंतरी मे महिन्याच्या सुमारास जिओ DTH लाँच होणार या अफवांना घाबरून डिश TV ने ३ महिन्यावर १ महिना फ्री ६ वर २ महिने अशा ऑफर आणल्या होत्या पण अजून जिओ DTH लाँच होण्याची चिन्हे दिसत नसल्याने या ऑफर काढून घेण्यात आल्या आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2017 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं टक्कर दिलीत !

जागो ग्राहक जागो !

@नितिन थत्ते सर : यापूर्वी भारताची क्रिकेट मॅच नॅशनलला दिसायची परंतु गेल्या २ महिन्यांपासून दिसणे बंद झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रसारण दाखवू शकत नाही असा मेसेज दिसतो.

@कंजूस सर : जुन्या डिश tru HD चा युजर इंटरफेस चांगला होता, मात्र नवीन आलेल्या डिश nxt HD चा इंटरफेस दिसायला चांगला आहे पण वापरायला अतिशय भिकार आहे, मधेच ह्यांग होतो. तसेच चालू करताना २ वेळा डिश बंद चालू केल्याशिवाय चानेल्स सुरूच होत नाहीत. रेकॉर्डिंग करायला गेले असता जागा शिल्लक असली तरी डिस्क फुल error दाखवतो, डिश बंद करून परत चालू केली की बरोबर रेकॉर्डिंग होते.

@मार्मिक गोडसे सर : डिश टीव्ही वाल्यांना दुसर्याच कोणाची तरी सेवा खंडित करायची होती, त्यांनी चुकून माझी सेवा खंडित केली, VC No टाकताना गफलत झाली असेल. मात्र ते ही चूक मान्य करायलाच तयार नाहीत. त्यांचा एकच घोष की माझ्याच सांगण्यावरून त्यांनी माझी सेवा खंडित केली आहे. त्यांना मी हे पण निदर्शनात आणून दिले कि ज्या मोबाईल नंबर वरून सेवा खंडित करण्याची विनंती करण्यात आली तो नंबर पण माझा नाही तरी पण ते ऐकायलाच तयार नव्हते व तुमची सेवा आता कधीच सुरु करता येणार नाही यावरही ठाम होते.
मी ग्राहक मंच कडे तक्रार केली तेव्हा त्यांनी माझे कनेक्शन सुरु करून दिले, नाहीतर आधी १२ दिवस माझ्या इमेल वर त्यांचा काहीच प्रतिसाद नव्हता.

मराठी_माणूस's picture

9 Nov 2017 - 12:24 pm | मराठी_माणूस

त्यांचा एकच घोष की माझ्याच सांगण्यावरून त्यांनी माझी सेवा खंडित केली आहे.

एक म्हणजे , बोलणारा माणूस तुम्हीच आहात हे त्यांनी कसे निश्चित केले , दुसरे नुसते तोंडी सांगण्यावरुन त्यांनी कार्यवाही कशी केली. लिखित किंवा इ-मेल स्वरुपाची
विनंतीची मागणी का नाही केली . अशी मागणी त्यांना त्यांच्या कार्यवाही साठी आधार म्हणुन उपयोगी पडली असती .
हा एक प्रकारचा खोडसाळ पणा तर नसेल , जेणे करुन ग्राहक परत एकदा पैसे भरुन नवीन जोडणी घेइल.

कंजूस's picture

7 Nov 2017 - 1:30 pm | कंजूस

>>>जुन्या डिश tru HD चा युजर इंटरफेस चांगला होता, मात्र नवीन आलेल्या डिश nxt HD चा इंटरफेस दिसायला चांगला आहे पण वापरायला अतिशय भिकार आह~~~~>>

माझा STB डिशटिव्ही प्लस ( hd नाही). तुम्ही सांगितलेला hang होणे,रिकॅार्डिंग सुरू न होणे हा प्राब्लेम आलेला. मी तो डबा काढून घेऊन त्यांच्या आमच्या इथल्या एजंटकडे गेलो. त्याने लगेच डबा कनेक्ट केला , मेन्युमध्ये जाऊन काहितरी डिलिट,अपडेट केले अन पाच मिनिटांत परत दिला. ( फ्री) पुन्हा तोच प्राब्लेम आल्यावर तो काय करतो ते बघून ठेवले. " कॅश क्लिअर केली." आता माझं मीच करतो.

युजर इंटरफेस चांगला म्हणण्याचं कारण त्यात कितीसी फेवरिट आणि प्रत्येकात चानेल्स सेट करता येतात.( तसा प्रकार टाटा स्कायमध्ये नाही. एकच फेवरिट आहे आणि त्यात पन्नास ठेवता येतात. स्लो आहे. )

कंजूस's picture

7 Nov 2017 - 1:35 pm | कंजूस

माझ्याकडे डिशटिव्ही, टाटास्काइ आणि सरकारी DTH FREE DISH तिन्ही चालू आहेत.

डिशटिव्ही/ टाटास्काइचे कस्टमर केअर इमेल लगेच प्रतिसाद देतात.
टाटास्काइचे android app वापरून आपणच पॅकेज, चानेल बदलणे वगळणे सहज करू शकतो.

अलबेला सजन's picture

7 Nov 2017 - 2:28 pm | अलबेला सजन

माझ्याकडेही आधी डिश प्लस च होता. त्याचा युझर इंटरफेस चांगला आहे. मात्र आता डिश nxt नावाचा नवीन सेट टोप बॉक्स आला आहे त्याचा इंटरफेस चांगला नाही.
टाटा स्काय प्रमाणेच डिश टीव्ही चे ही android app आहे. त्यातही आपणच पॅकेज, चानेल बदलणे वगळणे सर्व करता येते.

यमगर्निकर's picture

7 Nov 2017 - 3:16 pm | यमगर्निकर

आम्ही घरी पूर्वीपासून जी केबल होती तिचा STB घेतला महिना २०० रु मध्ये सगळे HD चॅनेल, सगळे स्पोर्ट चॅनेल आणि बाकी असतील नसतील तेव्हडे चॅनेल दिसतात, ज्यासाठी डिश टीव्ही चे पॅकेज ५०० रु च्या पुढे असेल तेच २०० रु मध्ये केबलवाला देतो

१)काहीच केबलवाल्यांच्या STB मध्ये रिकॅार्डींग असते.
२) केबलवाले एअरिआ वाटून घेतात, आमच्या DEN च्या एजंटच्या भागात तो HATHWAY घेऊ देत नाही.
३)केबल्स बिल्डिंगच्या वरून ,पावरलाइनवरून नेतात. लाइनवर पडली की टिव्ही उडतात.

अलबेला सजन, तुमच्या धाग्यावर थोडे अवांतर झाले हो।

विनिता००२'s picture

9 Nov 2017 - 12:10 pm | विनिता००२

अभिनंदन हो!!

अलबेला सजन's picture

9 Nov 2017 - 1:26 pm | अलबेला सजन

अपडेट : डिश टीव्हीवाल्यांनी कनेक्शन तर चालू करून दिले पण account balance मात्र अर्धाच परत दिलाय. उरलेला balance परत देण्यासाठी आता इमेल-इमेल चालू आहे. रोज तिकडून फोन येतो, सगळी स्टोरी ऐकून घेतात आणि लवकरच आपल्या तक्रारीचे निवारण होईल असे सांगतात. अजून ७ दिवस वाट बघणार नाहीतर परत घाहक मंच. कारण ग्राहक राजा आता जागा झालेला आहे.

एक प्रश्न: सेवा बंद करा असं कुठे सांगावं लागतं? बॅलन्स संपल्यावर चानेल दिसत नाहीत एवढेच होते. कोणी बंद करा फोन केल्यावर त्याचा बॅलन्स ( तुमचा २हजार) बघून ते सांगणारच की एवढा बॅलन्स आहे त्याना रिफंड मिळणार नाही. काही गोल माल वाटते.
माझे टाटास्काइ खाते २००८-१२ वापरले नंतर बंद होते तरी आता पुन्हा पैसे भरल्यावर चानेल्स दिसतात, रेजिस्टर्ड फोनमधून ( लँदलाइन आणि मोबाइल)फोन ठेला की लगेच हॅलो **** आपल्यासाठी काय करू शकतो ही विचारणा होते. यावरून मला शंका येते की तुमच्या मोबाइल नंबराचा काही प्रॅाब्लेम?

अलबेला सजन's picture

9 Nov 2017 - 5:00 pm | अलबेला सजन

DTH कंपन्यांच्या नियमानुसार जर आपण रिचार्ज करत नसू तर ते आपला सेट टॅाप बॉक्स परत घेवू शकतात. प्रत्येक सेट टॅाप बॉक्स वर “ This box is company’s property always and will be take back if not recharged” अस बारीक अक्षरात लिहिलेला स्टीकर लावलेला असतो. अर्थात या नियमाची अंमलबजावणी होत नाही. मागे १ वर्षांपूर्वी टाटा स्काय वाले ५०० रु. मध्ये HD अपग्रेड करून देत होते तेव्हा काही ठग लोकांनी याचा फायदा करून पैसे कमावले होते. बंद असलेला सेट टॅाप बॉक्स घेवून HD बॉक्स उद्या आणून देतो सांगून पसार व्हायचे. आणि नंतर तेच बॉक्स कंपनी ला देवून ५०० रु. मध्ये HD बॉक्स घ्यायचे आणि ते HD बॉक्स नवीन कस्टमर ला १५००-२००० ला विकायचे.

आता माझ्याबद्दल - डिश टीव्ही ने जेव्हा चुकीने माझे कनेक्शन terminate केले तेवा त्यांना ती रिक्वेस्ट त्यांना दुसर्याच कोणीतरी त्याच्या मोबाईल नंबर वरना दिली गेली होती. त्यांनी ती रिक्वेस्ट प्रोसेस करताना त्याच्या VC नंबर ऎवजी माझ्या VC चा नंबर टाकला असावा. म्हणजे हा सर्व माझा तर्क आहे. डिश टीव्ही वाल्यांना त्यांच्या चुकीबद्दल काहीच खेद नाही. माझे जेव्हा कनेक्शन रेस्टोर केले गेले तेव्हा मला माझ्या account ला VC नंबर माझा पण register mobile म्हणून तो दुसराच मोबाईल नंबर दिसत होता. तो मी नंतर sms करून बदलून घेतला. डिश टीव्ही ने माझे कनेक्शन रेस्टोर करताना मला ९०१ रु. इतकाच balance परत दिला. डिश टीव्ही online account वर जे महिन्याचे स्टेटमेंट मिळते त्यात माझ्या account ला १९ ऑक्टोबर रोजी “payment transferred – RS. -१०२२” अशी नोंद दिसत आहे. या पैशासाठी आता माझे भांडण सुरु आहे. ते पैसे नक्की कुठे गेले ते त्यांना पण त्यांच्या सिस्टम मध्ये कळत नाहीये म्हणून त्यांनी थोडा अवधी मागून घेतला आहे. बघू आता नक्की काय करतायत ते. पण एकंदरीतच कारभार फार ढिसाळ आहे.