प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

मिल्टन's picture
मिल्टन in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 11:39 pm

अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली. त्यानंतर काही मिपाकरांशी ई-मेलवर चर्चा करताना रघुराम राजन यांना नोबेल पारितोषिक मिळायची शक्यता बरीच कमी आहे असे मी म्हटले होते. त्याचवेळी अर्थशास्त्रातील युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रिचर्ड थेलर आणि जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉनल्ड बोडरॉक्स यांना कधीतरी नोबेल मिळावे असे मला फार वाटते असे म्हटले होते. आज दुपारी रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक जाहिर झाले आणि मला जी गोष्ट व्हावी असे वाटत होते त्यासाठी फार वर्षे थांबावे लागले नाही या विचाराने खरोखरच आनंद झाला.

या लेखातून प्राध्यापक रिचर्ड थेलर यांचे काम आणि त्यांचा विषय बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स याचा आढावा घेऊ.

1
प्राध्यापक रिचर्ड थेलर

क्लासिकल इकॉनॉमिक्स
मानवी समाजाची रचना कशी असावी, मनुष्यप्राणी विचार करताना नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. हा विषय मानवी स्वभाव आणि मानवी समाजाशी निगडीत असल्यामुळे मानवी संस्कृतीची सुरवात झाली आणि माणूस समाजात राहायला लागला तिथपासूनच सुरू झाला. अगदी प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांनीही विचार मांडले आहेत त्यातले अनेक अर्थशास्त्राशीच निगडीत आहेत असे म्हणायला हरकत नसावी. पण मध्ययुगाचा अंत आणि आधुनिक जगाची सुरवात यांच्या संधीकाळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला गेला असे म्हणतात. तो पाया रचला अ‍ॅडम स्मिथ या स्कॉटिश तत्वज्ञाने. त्याने १७७६ मध्ये लिहिलेले An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations (थोडक्यात The Wealth of Nations) या पुस्तकातून तो पाया रचला गेला असे समजले जाते. हे पुस्तक म्हणजे एका अर्थी स्मिथने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये दिलेल्या व्याख्यानांवर आधारीत आहे. या पुस्तकात अ‍ॅडम स्मिथने ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणता येईल त्या पध्दतीचा पुरस्कार केला होता. त्या पुस्तकातील पुढील वाक्य बरेच प्रसिध्द आहे:

"Every individual... neither intends to promote the public interest, nor knows how much he is promoting it... he intends only his own security; and by directing that industry in such a manner as its produce may be of the greatest value, he intends only his own gain, and he is in this, as in many other cases, led by an invisible hand to promote an end which was no part of his intention."

या वाक्याचा असा अर्थ लावला जातो की माणूस हा मुळात स्वार्थी आहे असे अ‍ॅडम स्मिथला म्हणायचे आहे. प्रत्यक्षात अ‍ॅडम स्मिथला अभिप्रेत असलेला "own interest" चा अर्थ नक्की कोणता हे त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकापूर्वी १७ वर्षे लिहिलेल्या "The Theory of Moral Sentiments" या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात स्मिथ म्हणतो की प्रत्येक माणसात एक 'इनर सेल्फ' (ज्याला सद्सदविवेकबुध्दी म्हणता येईल) असतो आणि आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर या 'इनर सेल्फ' चे लक्ष असते. हा इनर सेल्फ एखाद्या निष्पक्ष पंचाप्रमाणे असतो. बहुतांश वेळी या इनर सेल्फला न आवडणारी कृती टाळण्याकडे माणसाचा कल असतो. तसेच माणसाची 'पॅशन्स' आणि हा निष्पक्ष इनर सेल्फ यांच्यात झगडा चालू असतो. कधी कधी पॅशन्सचा विजय होतो आणि इनर सेल्फ पराभूत होतो. तरीही आपल्याच कृतीकडे त्या इनर सेल्फचे लक्ष असते हे अ‍ॅडम स्मिथने अधोरेखित केले आहे. तेव्हा या इनर सेल्फला मान्य होईल अशी कृती म्हणजे "own interest" असा अर्थ अ‍ॅडम स्मिथला अभिप्रेत होता असे काही लोक म्हणतात.तरीही अ‍ॅडम स्मिथ म्हटले की तो अदृश्य हात आणि स्वार्थी माणूस हे चित्र उभे राहिलेच.

स्मिथने हे पुस्तक लिहायच्या ३८ वर्षे आधी म्हणजे १७३८ मध्ये गणितज्ञ डॅनिएल बरनॉली याने ज्या प्रकारच्या खेळांमध्ये नक्की निकाल काय लागणार हे माहित नसते (उदाहरणार्थ रॉलेट व्हिल, फासे इत्यादी) अशा खेळांमध्ये नक्की कोणत्या आधारावर माणसे निर्णय घेतात याविषयीची एक थिअरी मांडली. त्या थिअरीमध्ये 'युटीलिटी' (एका अर्थी समाधान) या एका संकल्पनेचा उल्लेख केला. विस्तारभयास्तव याविषयी अधिक लिहित नाही. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याकडील पैशातून आपण समजा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आपल्याला वाटल्यास आपण नुसती संत्रीच किंवा नुसती मोसंबीच किंवा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आता माणसे नक्की किती संत्री आणि किती मोसंबी विकत घेणार हे ठरवायचे कसे? तर त्यासाठी त्याने 'युटिलिटी' या संकल्पनेचा उल्लेख केला. संत्रे खाल्यावर समजा 'क्ष' एकक समाधान मिळते आणि मोसंबे खाल्ल्यावर 'य' एकक समाधान मिळते. (यातही जितकी जास्त संत्री/मोसंबी खाऊ त्याप्रमाणे जास्तीच्या खाल्लेल्य संत्र्या/मोसंब्यांची युटिलिटी कमी असते). तर माणूस अशा पध्दतीने संत्री आणि मोसंबी निवडेल ज्यातून त्याला मिळणारी एकूण युटिलिटी सर्वात जास्त असेल.

या संकल्पनेचा अर्थशास्त्रासाठी पुढे विलिअम स्टॅनले जेवोन्सने विस्तार केला. त्यानंतर आल्फ्रेड मार्शलने १८९० मध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात या संकल्पनेला आधार धरून आणखी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. आल्फ्रेड मार्शलचे हे पुस्तक त्यानंतर किमान २०-२५ वर्षे अर्थशास्त्रावरील प्रमाण मानले जात होते आणि विद्यापीठांमध्येही ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जात असे.

वरकरणी दिसायला हे साधेसरळ गणित वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती तितकी साधी नाही. एक तर हे 'मॅक्झिमम युटीलीटी' चे गणित सोडवायचे तर संत्री आणि मोसंबी खाऊन नक्की किती युटिलिटी मिळेल हे त्या माणसाला माहित पाहिजे. आता एखाद्या गोष्टीपासून नक्की किती युटीलिटी मिळते या प्रश्नाचे उत्तर आकड्यात कसे देणार? आणि प्रत्यक्षात निर्णय घेताना संत्री आणि मोसंबी असा साधासरळ हिशेब नसतो तर इतरही अनेक घटक असतात. ते सगळे घटक माहित हवेत. आणि त्यातून विलक्षण गुंतागुंतीची युटिलिटीची गणिते करून माणूस निर्णय घेतो असे या सगळ्या मॉडेलचे सार होते. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी करता येण्यासाठी प्रत्येक माणूस 'रॅशनल' आहे हे गृहितक धरावेच लागेल. अन्यथा हे मॉडेल कोलमडेल. या रॅशनल माणसाची लक्षणे कोणती? तर ती व्हॉन न्यूमान आणि मॉर्गन्स्टिन या दोन प्राध्यापकांनी १९४७ मध्ये लिहिलेल्या एका पेपरमध्ये सापडतील. हा पेपर बर्‍यापैकी गुंतागुंतीचा आहे. तो पेपर वाचताना माझे तरी डोके आऊट झाले होते.

तेव्हा प्रत्यक्षात आपल्यापैकी कोणीही ही युटिलिटीची गणिते करून निर्णय घेत नाही त्यामुळे हे मॉडेल मनुष्यस्वभावाचे अचूक निर्देशक नाही हे तर नक्कीच. तरीही हे मॉडेल आणि त्या मॉडेलवर आधारीत इतर मॉडेल्स अर्थशास्त्रात अनेक वर्षे बर्‍यापैकी लोकप्रिय होती, अजूनही आहेत. ज्याला निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात त्याचा आधार या मॉडेलमध्ये आहे.

हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोना

आता मिपाकर मला विचारायच्या बेतात असतील की प्राध्यापक रिचर्ड थेलरचे काम नक्की कोणते हे लिहायचे सोडून भलतेच कुठले चर्‍हाट लावले आहे. पण हे सगळे लिहिले नाही तर त्यांचे काम नक्की कोणते होते हे समजणार नाही त्यामुळे हे सगळे रामायण लिहिणे गरजेचे आहे.

तेव्हा माणूस नक्की कसा विचार करतो म्हणजेच माणसाचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र याची सांगड घालायची गरज काही अभ्यासकांना वाटू लागली. यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले. १९६० च्या दशकात पिट्सबर्गच्या कार्नेगी टेक विद्यापीठात (सध्याचे कार्नेगी मेलॉन) हर्बर्ट सायमन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि अ‍ॅन आर्बरच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये जॉर्ज कॅटोना या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे काम सुरू केले. अर्थात १९६० च्या दशकात 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हा शब्दप्रयोग वापरला गेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तो शब्दप्रयोग सर्वप्रथम केला जॉर्ज कॅटोनांनी १९८० मध्ये. १९६० च्या दशकात कार्नेगी टेकमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने भारावलेले फ्रॅन्को मोडिग्लिआनीसारखे प्राध्यापक होतेच तर भविष्यात ज्याला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हटले गेले त्याने भारावलेले हर्बर्ट सायमन सारखेही प्राध्यापक होते. या दोन्ही प्राध्यापकांना भविष्यात अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि हे दोघेही एकाच वेळी एकाच विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यावेळी कार्नेगी टेकमध्ये ज्यांना शिकायला मिळाले असेल त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.

हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोनांच्या प्रयत्नांना त्यामानाने मर्यादित यश आले. त्याचे कारण त्यांच्या कामात काही कमी होती का? तर तसे नक्कीच नाही. माझ्या मते त्याचे कारण म्हणजे काळाचा महिमा. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आपली युध्दसामग्री, दारूगोळा इत्यादींचा सर्वात जास्त परिणामकारक वापर व्हावा यासाठी अनेक आघाडीच्या प्राध्यापकांची मदत अमेरिकन लष्कराने घेतली होती. मी माझा मिपा आय.डी ज्यांच्या नावावरून घेतला आहे ते मिल्टन फ्रिडमन सर्वात परिणामकारक ठरण्यासाठी दारूगोळ्यातील बॉम्बचा आकार नक्की किती असावा हे ठरवायच्या मॉडेलिंगमध्ये सहभागी होते. म्हणजे मोठा गोळा असेल तर अधिक भागावर तो परिणाम घडवेल पण त्यामानाने त्याची परिणामकारकता 'डिफ्युज्ड' असेल आणि लहान गोळा असेल तर तो कमी भागावर परिणाम घडवेल पण अधिक 'कॉन्सन्ट्रेटेड' असेल. अशाप्रकारे अनेक गोष्टींसाठी गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केला आणि गरज ही शोधांची जननी असते या न्यायाने ऑपरेशनल रिसर्च, संख्याशास्त्र यातील अनेक नव्यानव्या गोष्टींचा उगम त्यातून झाला. त्यातूनच तो काळ आकडे, समीकरणे यांचा होता. त्या काहीशा रूक्ष वाटणार्‍या वातावरणात बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स तितकेसे परिणामकारक ठरले नाही.

बिहेविअरल इकॉनॉमिक्सची लोकप्रियता: डॅनिएल कॅनेमन आणि अ‍ॅमोस Tversky यांचे योगदान
पण १९७० च्या दशकात प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्डचे अ‍ॅमॉस Tversky या दोन मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातून क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या महत्वाच्या गाभ्यालाच (माणसे रॅशनल असतात) धक्का लावला. माणसे खरोखरच रॅशनल नसतात हे 'गट फिलिंग' कोणाला नसेल असे वाटत नाही. पण संशोधनाच्या जगतात नुसते 'गट फिलिंग' कामाचे नाही. तर आपले म्हणणे एका मॉडेलच्या स्वरूपात मांडता आले पाहिजे. कॅनेमन आणि Tversky यांनी अनेक प्रयोग केले, आकडेवारी गोळा केली आणि आपले मॉडेल मांडले. त्यांनी हे खूपच महत्वाचे काम केले. या सर्व प्रयोगांविषयी प्राध्यापक कॅनेमन यांनी Thinking, Fast and Slow या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. जर एखादे पुस्तक वाचून आंतर्बाह्य हादरून जाणे म्हणजे काय हा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. आपण फार रॅशनल आहोत असा आपल्या सगळ्यांचाच (विशेषतः आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांचा) समज असतो तो किती मोठा गैरसमज आहे याचा अनुभव ते पुस्तक वाचताना अगदी पदोपदी येतो.

ज्या गृहितकावर पूर्ण क्लासिकल इकॉनॉमिक्सचा डोलारा अवलंबून होता त्यालाच धक्का लावणे ही गोष्ट साधीसुधी नव्हती. या महत्वाच्या कामाबद्दल प्राध्यापक डॅनिअल कॅनेमनना २००२ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. प्राध्यापक अ‍ॅमॉस Tversky यांचे त्यापूर्वीच निधन झाले होते म्हणून त्यांना नोबेल मिळू शकले नाही.

रिचर्ड थेलर आणि बिहेव्हिअरल फायनान्स
प्राध्यापक डॅनिअल कॅनेमन यांचे कार्य अफलातून होते यात तीळमात्र शंका नाही. पण ते मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचे काम जास्त मानसशास्त्राच्या अंगाकडे झुकणारे होते. निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरवायचे काम त्यांनी केले. पण त्या बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सच्या तत्वांचा अर्थशास्त्रात अधिक उपयोग कसा करता येईल याविषयी काम केले रिचर्ड थेलर यांनी.

अमेरिकेत विद्यापीठांमध्ये 'फ्रेशवॉटर स्कूल' आणि 'सॉल्टवॉटर स्कूल' हा प्रकार आहे.फ्रेशवॉटर स्कूल म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो, कार्नेगी मेलॉन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर यासारखी गोड्या पाण्याच्या ग्रेट लेक्सजवळ वसलेली विद्यापीठे तर सॉल्टवॉटर म्हणजे हार्वर्ड, प्रिन्सटन, कोलंबिया, बर्केले, यु.सी.एल.ए इत्यादी समुद्राजवळ वसलेली विद्यापीठे. फ्रेशवॉटर स्कूलमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्स, फ्री मार्केट आणि एकंदरीत उजव्या विचारांचे तर सॉल्टवॉटर स्कूलमध्ये समाजवादी, डाव्या विचारांचे प्राबल्य. आता हा फरक बराच कमी झाला तरी आहे पण प्राध्यापक थेलर पी.एच.डी झाले तेव्हा (१९७५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर या फ्रेशवॉटर विद्यापीठातून) फ्रेशवॉटरमधून पी.एच.डी झाल्यास सॉल्टवॉटरमध्ये (आणि व्हाईस-व्हर्सा) प्राध्यापक म्हणून घेतले जायचे प्रमाण बरेच नगण्य होते. त्यातून थेलर पी.एच.डी झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून लागले (जिथे रघुराम राजन सध्या प्राध्यापक आहेत).

युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोचा उल्लेख मुद्दामून करत आहे. कारण याच विद्यापीठात मिल्टन फ्रिडमन हे उत्युंग व्यक्तीमत्व एकेकाळी अर्थशास्त्राचे (बूथ स्कूलमध्ये नव्हे) प्राध्यापक म्हणून होते.) तसेच ज्यांना 'फादर ऑफ मॉडर्न फायनान्स' म्हटले जाते ते प्राध्यापक युजीन फामा हे पण बूथ स्कूलमध्येच प्राध्यापक होते. मिल्टन फ्रिडमन यांनी १९५० च्या दशकात फायनान्शिअल मार्केटमधील किंमती कशा ठरविल्या जातात याविषयी सुरवातीचे काम केले. त्यावेळी फ्रिडमनने म्हटले की सर्व फायनान्शिअल सेक्युरीटी (शेअर/बॉन्ड इत्यादी) त्यांच्या योग्य त्या किंमतीला (म्हणजे भविष्यात येणार्‍या सर्व कॅश-फ्लो ला डिसकाऊंट करून आलेल्या प्रेझेन्ट व्हॅल्यूला) विकल्या जातात. जर का काही काळ ही किंमत त्यापेक्षा वेगळी असेल तर 'आर्बिट्रेजर' त्याचा फायदा उठवतात आणि सर्व फायनान्शिअल सेक्युरीटींची किंमत त्यांच्या 'फंडामेन्टल किंमतीला' विकली जातील अशी परिस्थिती निर्माण करतात. १९७० मध्ये प्राध्यापक युजिन फामा (२०१३ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) यांनी त्यात आणखी भर टाकून 'एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस' मांडले.

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांनी सुरवातीला एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस वर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स (किंबहुना बिहेव्हिअरल फायनान्स) च्या अंगाने काम केले. या हायपोथिसिससाठीही माणसे रॅशनल असतात हे गृहितक होते. थेलर आणि इतर प्राध्यापकांच्या कामातून फायनान्शिअल मार्केटमध्ये सर्व भाग घेणारे रॅशनल असू शकत नाहीत हे दाखवून दिले.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमध्ये राहून मिल्टन फ्रिडमन आणि युजीन फामा यांच्यासारख्या stalwarts चे काम पूर्णपणे बरोबर नव्हते हे दाखवून देणे ही खूप मोठी गोष्ट होती.

नज
इंग्लिशमध्ये नज (nudge) या शब्दाचा अर्थ आहे: "prod (someone) gently with one's elbow in order to attract attention.". रिचर्ड थेलर आणि हार्वर्ड विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक कॅस सनस्टीन यांनी अधिक चांगल्या पॉलिसी मेकिंग साठी 'नज' चा वापर कसा करता येईल याविषयी नज हे पुस्तक लिहिले आहे.

अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे. हे उदाहरणे देऊनच अधिक स्पष्ट करता येईल.

१. शाळेतील विद्यार्थ्यांना 'तुम्ही जंक फूड' न खाता फळे आणि सॅलड खा असे कितीही सांगितले तरी ते त्यांना पाहिजे तेच पिझ्झा बर्गर इत्यादी खाणार. म्हणून शाळेच्या कॅफेट एरिआमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल या उंचीवर पुढे फळे, सॅलड इत्यादी सकस खाणे ठेवायचे आणि जंक फूड मागे ठेवायचे.

२. अमेरिकेत अनेक कंपन्यांमध्ये रिटायरमेन्ट फंडांमध्ये इच्छा असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा असा पर्याय असतो. त्यातून होते असे की सबस्क्राईब करायचे असेल तर त्यासाठी नव्या नोकरीच्या ठिकाणी जॉईनिंग फॉरमॅलिटी करताना मुद्दामून एक टिक करावा लागायचा. आपल्याला वाटेल की एका टिकमध्ये काय मोठेसे. पण प्रत्यक्षात तसे नसते. लोक बहुतांश वेळा जो काही 'डिफॉल्ट ऑप्शन' असेल तोच चालू ठेवतात. मग कल्पना अशी की डिफॉल्टच 'ऑप्ट-इन' ठेवला तर? म्हणजे कर एखाद्याला रि टायरमेन्ट फंडात पैसे गुंतवायचे नसतील तर त्याने/तिने बाहेर पडायच्या ऑप्शनवर टिक करावे. तसे न केल्यास 'बाय डिफॉल्ट' तो कर्मचारी आपोआप रिटायरमेन्ट फंडात गणला जाणार!!

म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता.

नज या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा लेख आधीच प्रचंड मोठा झाला आहे म्हणून विस्तारभयास्तव ती टाळतो. एकूणच काय की कोणावरही कसलीही सक्ती न करता त्या माणसाच्या हिताचा निर्णय घ्यायला तो आपण होऊन उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे 'नज'. इंग्लंडच्या सरकारने पब्लिक पॉलिसीमध्ये नज कसे अंमलात आणता येतील यासाठी रिचर्ड थेलर यांचा सल्लाही घेतला होता.

इफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस आणि नज याव्यतिरिक्त प्राध्यापक थेलर यांचे इतरही काम आहे. पण त्याविषयी लिहायचे झाले तर आणखी एक लेख लागेल. तेव्हा ते टाळतो. या लेखातून बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर थोडेफार लिहायला मिळाले याचे समाधान वाटते.

लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहितो. टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसमधील प्राध्यापक दिलीप सोमण यांनी शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून पी.एच.डी केली आणि त्यांच्या डिफेन्स कमिटीमध्ये प्राध्यापक रिचर्ड थेलरही होते. आज रिचर्ड थेलरना नोबेल पारितोषिक मिळालेच आहे. त्यानंतर त्यांच्या दिलीप सोमण या विद्यार्थ्याकडूनही असेच काम व्हावे आणि आणखी १५-२० वर्षांनंतर त्यांच्यावरही असाच लेख लिहायची संधी मिळावी ही इच्छा.

रिचर्ड थेलरना नोबेल मिळाल्यानंतर खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे. त्यांच्यावर आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर एखादा छोटेखानी लेख आजच मिपावर लिहावा असे त्यांना नोबेल मिळाल्याची बातमी दुपारी वाचल्यापासून फार वाटत होते. (हा लेख छोटेखानी न राहता मोठेखानी झाला आहे ही गोष्ट वेगळी :) ) तसे करता आले याचे समाधान आहे.

अर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

मिल्टन's picture

14 Oct 2017 - 11:06 pm | मिल्टन

अर्थशास्त्राला अर्धशास्त्रापासून सर्व्यव्यापी शास्त्र म्हणण्यापर्यंत दोन दिवसात खूपच मोठा पल्ला गाठलात तर :)

तसे निर्णय सगळेच घेत असतात. अनेकदा आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात निर्णय घेत असतो ते अर्थशास्त्राशी निगडीत असतात (किंवा अर्थशास्त्राच्या कक्षेत येतात) याचा आपण दरवेळा विचार करतोच असे नाही. अगदी एक साधे उदाहरण द्यायचे तर घरून स्टेशनला जाताना बसनी जायचे की रीक्षानी जायचे यात वेळ आणि पैसा या दोन्हींचा विचार करून आपण निर्णय घेत असतो. अर्थशास्त्र नेमक्या अशाच (आणि इतर बर्‍याच) गोष्टींचा विचार करत असते.

अर्थशास्त्रासाठी गणिताचा मोठा आधार आहे. प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रातील अनेक पेपर क्लिष्ट वाटणार्‍या गणिताने भरलेले असतात. म्हणजे गणितातील पध्दती वापरून अर्थशास्त्रातील प्रश्न सोडविले जातात. दुसरे म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रात मानसशास्त्राचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे.

तर नोबेल निवड समितीने अर्थशास्त्राची व्याप्ती कशी ठरवली असेल याचं कुतूहल आहे.

ही व्याप्ती नोबेल समितीने ठरविलेली नाही. एखादा प्रश्न अर्थशास्त्राशी निगडीत होऊ शकेल की नाही हे त्या प्रश्नाकडे बघून कळते. एका अर्थी सगळीकडेच अर्थशास्त्र निगडीत असले तरी किती प्रमाणात हा अंदाज येईलच. मार्केटिंग शेवटी ग्राहकाला एखादी गोष्ट विकायला काय करता येईल यासाठी आहे. अर्थातच त्यात किंमत हा महत्वाचा घटक असतो आणि म्हणून अर्थशास्त्र त्यात आले. फायनान्समध्ये तर अर्थशास्त्र आलेच आले. पण ऑपरेशन्ससाठी (इन्व्हेंटरी मॅनेजमेन्ट इत्यादी) अर्थशास्त्र तितक्या प्रमाणावर लागणार नाही. इमारती बांधायच्या शास्त्रात अर्थशास्त्र किंमतीद्वारे येत असले तरी तो त्या क्षेत्रातील निर्णय घ्यायचा मुख्य गाभा नाही. अशाप्रकारे एखादा प्रश्न बघून अर्थशास्त्र त्यात किती प्रमाणात आहे हे समजेलच.

नोबेल समितीने आतापर्यंत फायनान्समध्ये काम केलेल्या प्राध्यापकांनाही नोबेल दिले आहे. ऑप्शनची किंमत काढायच्या ब्लॅक-शोल्स-मर्टन मॉडेलचे संशोधक शोल्स आणि मर्टन यांना १९९७ मध्ये नोबेल पारितोषिक दिले गेले होते (ब्लॅकचे १९९५ मध्ये निधन झाले म्हणून त्यांना ते मिळू शकले नाही). हे काम मुख्यत्वे फायनान्समधले आहे. पण अर्थशास्त्र हा फायनान्सचा महत्वाचा गाभा आहे म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल दिले गेले होते.

मिल्टन,

१.

अर्थशास्त्राला अर्धशास्त्रापासून सर्व्यव्यापी शास्त्र म्हणण्यापर्यंत दोन दिवसात खूपच मोठा पल्ला गाठलात तर :)

होय तर. आहेच मुळी मी पल्लेबाज! ;-)

पण या व्याप्तीविस्तारामुळे एक प्रश्न उद्भवतो. तो असा की ....

२.

अर्थशास्त्रासाठी गणिताचा मोठा आधार आहे. प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रातील अनेक पेपर क्लिष्ट वाटणार्‍या गणिताने भरलेले असतात.

गंमत अशी की सत्येंद्रनाथ बसूंना नोबेल नाकारण्यात आलं कारण की बोस-आईनस्टाईन सांख्यिकी विज्ञानात मोडंत नसून निव्वळ गणिती कार्य आहे.

ठीके. शुद्ध गणित तर शुद्ध गणित. पण अर्थशास्त्राच्या वेष्टनात सादर केलं तर नोबेल मिळू शकतं. पण विज्ञानाशी संबंधित असेल तर मिळू शकंत नाही. हे जरा किंवा बरंच उफराटं दिसतंय.

३.

अशाप्रकारे एखादा प्रश्न बघून अर्थशास्त्र त्यात किती प्रमाणात आहे हे समजेलच.

अशा प्रकारे एखादा प्रश्न बघून त्यात विज्ञान आहे अथवा नाही हे शोधण्याची काही रीत असती तर प्रा. सत्येंद्रनाथ बसूंना केंव्हाच नोबेल मिळालं असतं. शेवटी नशीब आपापलं.

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

15 Oct 2017 - 10:38 pm | मिल्टन

सत्येंद्रनाथ बसूंना नोबेल नाकारण्यात आलं कारण की बोस-आईनस्टाईन सांख्यिकी विज्ञानात मोडंत नसून निव्वळ गणिती कार्य आहे.

हे माहित नव्हते. नोबेल समितीने नक्की कोणता विचार केला हे आपल्याला सांगता येणार नाही.

ठीके. शुद्ध गणित तर शुद्ध गणित.पण अर्थशास्त्राच्या वेष्टनात सादर केलं तर नोबेल मिळू शकतं.

नाही ते शुध्द गणित नाही तर ज्याला' 'अ‍ॅप्लाईड गणित' म्हणता येईल असे गणित अर्थशास्त्रातील पेपरमध्ये असते. शुध्द गणित अजून जास्त क्लिष्ट आणि व्विविध प्रकारच्या नोटेशननी भरलेले असते.

गामा पैलवान's picture

15 Oct 2017 - 11:16 pm | गामा पैलवान

मिल्टन,

शुद्ध गणित म्हणजे प्युअर म्याथ्स असं शब्दश: नका घेऊ. सत्येंद्रनाथ बसूंचं गणित देखील उपायोजक (=अप्लाईड) च आहे. पण तो वैज्ञानिक शोध म्हणता येणार नाही. नोबेल समितीकडून सायंटिफिक ही संज्ञा काटेकोरपणे वापरण्यात आली आहे. याउलट तीच समिती इकॉनॉमी ही संज्ञा मात्र बऱ्याच अघळपघळपणे वापरते. हा विरोधाभास आहे. मग इकॉनॉमीस अर्धशास्त्र म्हणावं का, असा प्रश्न पडतो.

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

15 Oct 2017 - 11:36 pm | मिल्टन

नोबेल समिती कोणते मापदंड वापरते हे अर्थातच आपल्यासारख्यांना सांगता येणार नाही. जर बराक ओबामांना ७-८ महिन्यात नुसत्या मोठ्या गप्पांच्या आधारावर नोबेल पारितोषिक ते देऊ शकत असतील तर काहीतरी चुकत असेल ही शक्यता आहेच. तरीही नोबेल समितीने समजा चूक केली असली तरी अर्थशास्त्राला 'अर्धशास्त्र' असे वाटण्याचेही काही विशेष कारण समजले नाही. एका अर्थी ते 'अर्धशास्त्र' आहेच कारण तो कला शाखेचा हा विषय असला तरी गणित या महत्वाच्या शास्त्रशाखेच्या विषयाचा मोठ्या प्रमाणावर वापर अर्थशास्त्रात असतो. त्या अर्थी ते 'अर्धशास्त्र' आणि 'अर्धकला' आहे :)

माझा मुद्दा नोबेल समितीपेक्षाही अर्थशास्त्राशी निगडीत आहे. मला गणिताची आवड असली तरी विज्ञानाची फारशी आवड नाही आणि गती तर अजिबात नाही. त्यामुळे त्या विषयावर काही मुद्दामून विशेष वाचावे असे कधीच वाटले नाही. त्यामुळे तुमचे विज्ञानावरचे मुद्दे लक्षात येत नाहीयेत.

रानरेडा's picture

16 Oct 2017 - 6:41 pm | रानरेडा

नोबेल तर यासर अराफत सारख्या दहशतवादी खुन्याला पण मिळाले होते . मी एका ( ओसामाला मारण्यापूर्वीच्या ) लेखात तर वाचले होते कि जर ओसामा शरण आला आणि काही दिखाव्याची चांगली कामे करू लागला तर त्यालाही नोबेल मिळेल !

मिल्टन's picture

16 Oct 2017 - 9:29 pm | मिल्टन

हो बरोबर. अनेकदा शांततेचे नोबेल पारितोषिक म्हणजे एक विनोदच असतो. पण अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देताना मात्र नोबेल समितीने नामवंत अर्थतज्ञांना दिले आहे. त्यातही संबंधित व्यक्तीची विचारसरणी कुठलीही असली (उजवी/डावी) तरी त्या व्यक्तीने विचारांना नवी दिशा देऊन काही मूलभूत योगदान दिले आहे हे लक्षात घेऊनच बहुतांश वेळा पारितोषिक दिले आहे. या नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये उजव्या बाजूचे फ्रेडरिक हायेक, मिल्टन फ्रिडमन, गॅरी बेकर यासारखे होते तर समाजवादी/डाव्या विचारांचे जोसेफ स्टिगलिझ, पॉल क्रुगमन इत्यादीही होते. त्या अर्थी नोबेलचे मापदंड असे लिहिले आहे.

गामा पैलवान's picture

16 Oct 2017 - 9:30 pm | गामा पैलवान

रानरेडा,

शांततेचं नोबेल नॉर्वेची समिती देते. बाकीची स्वीडची समिती देते.

शांततेचं नोबेल हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मोठ्ठा व हिणकस विनोद आहे.

आ.न.,
-गा.पै.

चौकटराजा's picture

15 Oct 2017 - 4:11 pm | चौकटराजा

लहान पणी माझ्या मनात कै. जादूगार रघुवीर यानी सांगितलेले एक वाक्य आठवते. "दुसरी शक्यता विचारात घेण्यासाठी मानसिक कष्ट करावे लागतात . आम्ही जादूगार बोलण्यात अत्यंत प्रवाही व पटाईत असतो. माणसाला ऐकण्यातच गुंगून ठेवून पोटासाठी मी तुमच्याशी खोटे बोलत असतो. नाणे माझ्या डाव्या हाताच आडवे पाडतो पण तुम्हाला सांगताना तो उजव्या हातात घेतले आहे असे सांगतो. हजारात एखादाच असा असतो की त्याच्या मनांत कष्ट करण्याची उर्जा असते. तो म्हण्तो " अहो, डाव्या हातात नाणे असण्याचीही शक्यता आहे तो उघडून दाखवा बरे. " बाकी ९९९ म्हणतात जादूगार रघुवीर एक मोठे सदगृहस्थ आहेत. इमानदारीत गावोगावी जाऊन व्यवसाय करतात मग ते कशाला खोटे बोलतील ? ? मानवाच्या रॅशनल न राहाण्यामागे ही मिमांसा त्यानी भर चौकात सर्वाना सांगितली. आजही प्रत्येक क्षेत्रात ही अटकळ वापरली जाते. मग तो डॉक्टर असो, सी ए की वकील !

मी स्वतः ही माणूस असल्याने काही वेळेस मानसिक " कष्ट" करण्याचा आळस करतो तरीही मी बर्यापकी " संशयी" बनण्यात यशस्वी झालो आहे. नेटवर , पुस्तकांत दिलेले सर्व खरे असते असे मी मानत नाही.

मिल्टन's picture

15 Oct 2017 - 11:25 pm | मिल्टन

याविषयी आज लोकसत्तामध्ये डॉ.अजय ब्रम्हनाळकर यांचा हा लेख आला आहे. माझ्याकडून या लेखात राहिलेल्या एका मुद्द्याचा-- रिचर्ड थेलर यांच्या 'काजूच्या किस्स्याचा' उल्लेख केला आहे. तसेच या लेखातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे बर्‍याच शब्दांना चपखल मराठी शब्द दिले आहेत. उदाहरणार्थ बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स ला 'वर्तनात्मक अर्थशास्त्र' हा चपखल शब्द त्यांनी वापरला आहे. यापुढे तो शब्द वापरायला हरकत नसावी. मला असे मराठी प्रतिशब्द पटकन सुचत नाहीत. मागे एकदा प्रयत्न केल्यावर सुचलेले शब्द बर्‍यापैकी बोजड निघाले त्यामुळे त्यानंतर तो प्रयत्न बंद केला. लोकसत्तातील या लेखातही प्रा.डॅनिएल कॅनेमन यांच्या Thinking, Fast and Slow या पुस्तकाचा उल्लेख आहे.

तसेच या लेखात एक उल्लेख आहे-- वर्तनात्मक अर्थशास्त्राची सुरवात १९७४ मध्ये डॅनिएल कॅनेमन आणि अ‍ॅमॉस Tversky यांच्या Judgment under Uncertainty: Heuristics and Biases या शोधनिबंधातून झाली असे म्हणता येईल असे म्हटले आहे. अनेकांचा तो दावा असतो. पण तसे म्हणता येईल का याविषयी मला शंका वाटते. हर्बर्ट सायमन यांनी 'मर्यादित तर्कबुध्दी' (bounded rationality) ही संकल्पना १९५० च्या दशकातच मांडली होती. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे अ‍ॅडम स्मिथने १७५९ साली The Theory of Moral Sentiments हे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकातील कित्येक उल्लेख २० व्या शतकात वर्तनात्मक अर्थशास्त्र विकसित झाले त्याच्याशी मिळतेजुळते आहेत असे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापिका नवा अश्रफ , कॅलिफॉर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक कॉलीन केमरर आणि कार्नेगी मेलॉन विद्यापीठाचे प्राध्यापक जॉर्ज लोवेन्स्टाईन यांनी लिहिलेल्या
Adam Smith, Behavioral Economist या नितांतसुंदर शोधनिबंधात म्हटले आहे.म्हणजे त्या अर्थी अ‍ॅडम स्मिथ हा आद्य वर्तनात्मक अर्थशास्त्री झाला. पण नंतरच्या काळात विलिअम स्टॅन्ले जेवोन्स यांनी युटिलिटीचा वापर अर्थशास्त्रात केला आणि त्यानंतर आल्फ्रेड मार्शल इत्यादींनी त्यावरच आधारीत काम पुढे नेले आणि अ‍ॅडम स्मिथ या मुळातल्या वर्तनात्मक अर्थशास्त्र्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आणि अ‍ॅडम स्मिथ म्हटले की 'स्वार्थी माणूस' आणि 'अदृश्य हात' सोडून तिसरी गोष्ट कोणाच्या डोळ्यासमोर येईनाशी झाली.

या प्रतिसादात उल्लेख केलेले दोन शोधनिबंध मुद्दामून वाचावेत असे आहेत. उगीचच क्लिष्ट आणि बोजड गणित न मांडता सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सगळे मुद्दे मांडले आहेत. अ‍ॅडम स्मिथवरच्या शोधनिबंधात संदर्भ म्हणून दिलेल्या इतर शोधनिबंधांपैकी काही Games and Economic Behavior या जर्नलमधले आहेत. लोक असे काही काम करत असतात हे बघितले की खरोखरच भारावून जायला होते.

मिल्टन's picture

16 Oct 2017 - 9:32 pm | मिल्टन

सर्वांना चर्चेत भाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद म्हणून या चर्चेत आणखी ३०-४० प्रतिसाद लिहून या धाग्याचा टी.आर.पी आणि मिपाची बॅन्डविड्थ या दोन्ही गोष्टी उगीच वाढवायच्या नव्हत्या. म्हणून सर्व मिपाकरांच्या प्रोत्साहनाबद्दल एकच एकत्रित धन्यवाद म्हणत आहे.

प्रा.थेलर यांना १० डिसेंबर रोजी नोबेल पारितोषिक दिले जाईल. त्यावेळचे त्यांचे भाषण आंतरजालावर कुठेतरी मिळेलच. ते ऐकून या चर्चेत भर टाकण्यासारखा आणखी काही मुद्दा मिळाला तर तो लिहिनच.

लई भारी's picture

28 Oct 2017 - 10:48 am | लई भारी

आपण उल्लेख केलेल्या पुस्तकाचे परीक्षण आणि टिपण आजच्या लोकसत्ता मध्ये आहे:
http://www.loksatta.com/athour-mapia-news/nudge-improving-decisions-abou...

मिल्टन's picture

28 Oct 2017 - 11:40 am | मिल्टन

हे परीक्षण इथे दिल्याबद्दल धन्यवाद . परीक्षण वाचले.

मी वापरलेल्या अनेक इंग्रजी संज्ञांना या परीक्षणात बर्‍यापैकी चपखल असे मराठी शब्द वापरले आहेत. असे करणे मला अजूनपर्यंत तरी साध्य झालेले नाही. तरी प्रयत्न करायला हवेत.

'नज' ला दोन्ही बाजूंचा विरोध असायचे काही कारण नाही हे पण एका प्रतिसादात म्हटलेच आहे. तरीही 'नज' वर दोन्ही बाजूंचे एकमत होणे कठिणच आहे हा मुद्दा मान्य. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे दोन्ही बाजूंनी एकमेकांविरूध्द इतकी टोकाची भूमिका घेतली आहे की दुसरी बाजूही एखादी गोष्ट मान्य करायची शक्यता जरी निर्माण झाली तर ती गोष्ट आपणही मान्य करणे म्हणजे आपलाच पराभव असल्याप्रमाणे दोन्ही बाजूंना वाटेल (असे मला वाटते). त्यामुळे दोन्ही बाजूंचे या एका कारणामुळे एकाच मुद्द्यावर एकमत होणे कठिण. त्यासाठी दोन्ही बाजूंनाही 'नज' करता यायला हवे :)

शैक्षणिक वर्तुळातही एकमेकांच्या मुद्द्यांवर (अनेकदा एकमेकांवर वैयक्तिकही) जहरी टिका होत असते. रघुराम राजन यांनी त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात एक उल्लेख आहे. २००५ मध्ये त्यांनी जॅकसन होल परिषदेत इतर सगळे अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असताना त्यांनी मात्र लवकरच मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागायची शक्यता आहे आणि त्याचे मूळ ग्रीनस्पॅन यांच्या धोरणात आहे असे म्हटल्यावर इतर सगळे त्यांच्यावर तुटून पडले. त्यावर राजन म्हणतात की शैक्षणिक वर्तुळात अशास्वरूपाची टिका झाल्यास त्याला घाबरून मागे हटणारा माणूस कोणतेही शोधनिबंध लिहू शकणार नाही आणि असे काम करताना निबर कातडी (thick skin) होतेच.

दोन बाजू एकमेकांवर कशी टिका करत असतात याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अ‍ॅट शिकॅगो (लेखात उल्लेख असलेले युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो हे शिकॅगो शहरातीलच दुसरे विद्यापीठ आहे) मधील प्राध्यापिका Deirdre Nansen McCloskey यांचे लेखन आणि व्हर्जिनियामधील फेअरफॅक्स येथील जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक डॉनल्ड बोडरॉक्स यांचे त्यांच्या कॅफे हायेक या ब्लॉगवरील लेखन यावरून कल्पना येऊ शकेल.