प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

मिल्टन's picture
मिल्टन in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 11:39 pm

अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली. त्यानंतर काही मिपाकरांशी ई-मेलवर चर्चा करताना रघुराम राजन यांना नोबेल पारितोषिक मिळायची शक्यता बरीच कमी आहे असे मी म्हटले होते. त्याचवेळी अर्थशास्त्रातील युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रिचर्ड थेलर आणि जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉनल्ड बोडरॉक्स यांना कधीतरी नोबेल मिळावे असे मला फार वाटते असे म्हटले होते. आज दुपारी रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक जाहिर झाले आणि मला जी गोष्ट व्हावी असे वाटत होते त्यासाठी फार वर्षे थांबावे लागले नाही या विचाराने खरोखरच आनंद झाला.

या लेखातून प्राध्यापक रिचर्ड थेलर यांचे काम आणि त्यांचा विषय बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स याचा आढावा घेऊ.

1
प्राध्यापक रिचर्ड थेलर

क्लासिकल इकॉनॉमिक्स
मानवी समाजाची रचना कशी असावी, मनुष्यप्राणी विचार करताना नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. हा विषय मानवी स्वभाव आणि मानवी समाजाशी निगडीत असल्यामुळे मानवी संस्कृतीची सुरवात झाली आणि माणूस समाजात राहायला लागला तिथपासूनच सुरू झाला. अगदी प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांनीही विचार मांडले आहेत त्यातले अनेक अर्थशास्त्राशीच निगडीत आहेत असे म्हणायला हरकत नसावी. पण मध्ययुगाचा अंत आणि आधुनिक जगाची सुरवात यांच्या संधीकाळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला गेला असे म्हणतात. तो पाया रचला अ‍ॅडम स्मिथ या स्कॉटिश तत्वज्ञाने. त्याने १७७६ मध्ये लिहिलेले An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations (थोडक्यात The Wealth of Nations) या पुस्तकातून तो पाया रचला गेला असे समजले जाते. हे पुस्तक म्हणजे एका अर्थी स्मिथने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये दिलेल्या व्याख्यानांवर आधारीत आहे. या पुस्तकात अ‍ॅडम स्मिथने ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणता येईल त्या पध्दतीचा पुरस्कार केला होता. त्या पुस्तकातील पुढील वाक्य बरेच प्रसिध्द आहे:

"Every individual... neither intends to promote the public interest, nor knows how much he is promoting it... he intends only his own security; and by directing that industry in such a manner as its produce may be of the greatest value, he intends only his own gain, and he is in this, as in many other cases, led by an invisible hand to promote an end which was no part of his intention."

या वाक्याचा असा अर्थ लावला जातो की माणूस हा मुळात स्वार्थी आहे असे अ‍ॅडम स्मिथला म्हणायचे आहे. प्रत्यक्षात अ‍ॅडम स्मिथला अभिप्रेत असलेला "own interest" चा अर्थ नक्की कोणता हे त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकापूर्वी १७ वर्षे लिहिलेल्या "The Theory of Moral Sentiments" या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात स्मिथ म्हणतो की प्रत्येक माणसात एक 'इनर सेल्फ' (ज्याला सद्सदविवेकबुध्दी म्हणता येईल) असतो आणि आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर या 'इनर सेल्फ' चे लक्ष असते. हा इनर सेल्फ एखाद्या निष्पक्ष पंचाप्रमाणे असतो. बहुतांश वेळी या इनर सेल्फला न आवडणारी कृती टाळण्याकडे माणसाचा कल असतो. तसेच माणसाची 'पॅशन्स' आणि हा निष्पक्ष इनर सेल्फ यांच्यात झगडा चालू असतो. कधी कधी पॅशन्सचा विजय होतो आणि इनर सेल्फ पराभूत होतो. तरीही आपल्याच कृतीकडे त्या इनर सेल्फचे लक्ष असते हे अ‍ॅडम स्मिथने अधोरेखित केले आहे. तेव्हा या इनर सेल्फला मान्य होईल अशी कृती म्हणजे "own interest" असा अर्थ अ‍ॅडम स्मिथला अभिप्रेत होता असे काही लोक म्हणतात.तरीही अ‍ॅडम स्मिथ म्हटले की तो अदृश्य हात आणि स्वार्थी माणूस हे चित्र उभे राहिलेच.

स्मिथने हे पुस्तक लिहायच्या ३८ वर्षे आधी म्हणजे १७३८ मध्ये गणितज्ञ डॅनिएल बरनॉली याने ज्या प्रकारच्या खेळांमध्ये नक्की निकाल काय लागणार हे माहित नसते (उदाहरणार्थ रॉलेट व्हिल, फासे इत्यादी) अशा खेळांमध्ये नक्की कोणत्या आधारावर माणसे निर्णय घेतात याविषयीची एक थिअरी मांडली. त्या थिअरीमध्ये 'युटीलिटी' (एका अर्थी समाधान) या एका संकल्पनेचा उल्लेख केला. विस्तारभयास्तव याविषयी अधिक लिहित नाही. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याकडील पैशातून आपण समजा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आपल्याला वाटल्यास आपण नुसती संत्रीच किंवा नुसती मोसंबीच किंवा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आता माणसे नक्की किती संत्री आणि किती मोसंबी विकत घेणार हे ठरवायचे कसे? तर त्यासाठी त्याने 'युटिलिटी' या संकल्पनेचा उल्लेख केला. संत्रे खाल्यावर समजा 'क्ष' एकक समाधान मिळते आणि मोसंबे खाल्ल्यावर 'य' एकक समाधान मिळते. (यातही जितकी जास्त संत्री/मोसंबी खाऊ त्याप्रमाणे जास्तीच्या खाल्लेल्य संत्र्या/मोसंब्यांची युटिलिटी कमी असते). तर माणूस अशा पध्दतीने संत्री आणि मोसंबी निवडेल ज्यातून त्याला मिळणारी एकूण युटिलिटी सर्वात जास्त असेल.

या संकल्पनेचा अर्थशास्त्रासाठी पुढे विलिअम स्टॅनले जेवोन्सने विस्तार केला. त्यानंतर आल्फ्रेड मार्शलने १८९० मध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात या संकल्पनेला आधार धरून आणखी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. आल्फ्रेड मार्शलचे हे पुस्तक त्यानंतर किमान २०-२५ वर्षे अर्थशास्त्रावरील प्रमाण मानले जात होते आणि विद्यापीठांमध्येही ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जात असे.

वरकरणी दिसायला हे साधेसरळ गणित वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती तितकी साधी नाही. एक तर हे 'मॅक्झिमम युटीलीटी' चे गणित सोडवायचे तर संत्री आणि मोसंबी खाऊन नक्की किती युटिलिटी मिळेल हे त्या माणसाला माहित पाहिजे. आता एखाद्या गोष्टीपासून नक्की किती युटीलिटी मिळते या प्रश्नाचे उत्तर आकड्यात कसे देणार? आणि प्रत्यक्षात निर्णय घेताना संत्री आणि मोसंबी असा साधासरळ हिशेब नसतो तर इतरही अनेक घटक असतात. ते सगळे घटक माहित हवेत. आणि त्यातून विलक्षण गुंतागुंतीची युटिलिटीची गणिते करून माणूस निर्णय घेतो असे या सगळ्या मॉडेलचे सार होते. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी करता येण्यासाठी प्रत्येक माणूस 'रॅशनल' आहे हे गृहितक धरावेच लागेल. अन्यथा हे मॉडेल कोलमडेल. या रॅशनल माणसाची लक्षणे कोणती? तर ती व्हॉन न्यूमान आणि मॉर्गन्स्टिन या दोन प्राध्यापकांनी १९४७ मध्ये लिहिलेल्या एका पेपरमध्ये सापडतील. हा पेपर बर्‍यापैकी गुंतागुंतीचा आहे. तो पेपर वाचताना माझे तरी डोके आऊट झाले होते.

तेव्हा प्रत्यक्षात आपल्यापैकी कोणीही ही युटिलिटीची गणिते करून निर्णय घेत नाही त्यामुळे हे मॉडेल मनुष्यस्वभावाचे अचूक निर्देशक नाही हे तर नक्कीच. तरीही हे मॉडेल आणि त्या मॉडेलवर आधारीत इतर मॉडेल्स अर्थशास्त्रात अनेक वर्षे बर्‍यापैकी लोकप्रिय होती, अजूनही आहेत. ज्याला निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात त्याचा आधार या मॉडेलमध्ये आहे.

हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोना

आता मिपाकर मला विचारायच्या बेतात असतील की प्राध्यापक रिचर्ड थेलरचे काम नक्की कोणते हे लिहायचे सोडून भलतेच कुठले चर्‍हाट लावले आहे. पण हे सगळे लिहिले नाही तर त्यांचे काम नक्की कोणते होते हे समजणार नाही त्यामुळे हे सगळे रामायण लिहिणे गरजेचे आहे.

तेव्हा माणूस नक्की कसा विचार करतो म्हणजेच माणसाचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र याची सांगड घालायची गरज काही अभ्यासकांना वाटू लागली. यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले. १९६० च्या दशकात पिट्सबर्गच्या कार्नेगी टेक विद्यापीठात (सध्याचे कार्नेगी मेलॉन) हर्बर्ट सायमन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि अ‍ॅन आर्बरच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये जॉर्ज कॅटोना या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे काम सुरू केले. अर्थात १९६० च्या दशकात 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हा शब्दप्रयोग वापरला गेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तो शब्दप्रयोग सर्वप्रथम केला जॉर्ज कॅटोनांनी १९८० मध्ये. १९६० च्या दशकात कार्नेगी टेकमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने भारावलेले फ्रॅन्को मोडिग्लिआनीसारखे प्राध्यापक होतेच तर भविष्यात ज्याला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हटले गेले त्याने भारावलेले हर्बर्ट सायमन सारखेही प्राध्यापक होते. या दोन्ही प्राध्यापकांना भविष्यात अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि हे दोघेही एकाच वेळी एकाच विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यावेळी कार्नेगी टेकमध्ये ज्यांना शिकायला मिळाले असेल त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.

हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोनांच्या प्रयत्नांना त्यामानाने मर्यादित यश आले. त्याचे कारण त्यांच्या कामात काही कमी होती का? तर तसे नक्कीच नाही. माझ्या मते त्याचे कारण म्हणजे काळाचा महिमा. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आपली युध्दसामग्री, दारूगोळा इत्यादींचा सर्वात जास्त परिणामकारक वापर व्हावा यासाठी अनेक आघाडीच्या प्राध्यापकांची मदत अमेरिकन लष्कराने घेतली होती. मी माझा मिपा आय.डी ज्यांच्या नावावरून घेतला आहे ते मिल्टन फ्रिडमन सर्वात परिणामकारक ठरण्यासाठी दारूगोळ्यातील बॉम्बचा आकार नक्की किती असावा हे ठरवायच्या मॉडेलिंगमध्ये सहभागी होते. म्हणजे मोठा गोळा असेल तर अधिक भागावर तो परिणाम घडवेल पण त्यामानाने त्याची परिणामकारकता 'डिफ्युज्ड' असेल आणि लहान गोळा असेल तर तो कमी भागावर परिणाम घडवेल पण अधिक 'कॉन्सन्ट्रेटेड' असेल. अशाप्रकारे अनेक गोष्टींसाठी गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केला आणि गरज ही शोधांची जननी असते या न्यायाने ऑपरेशनल रिसर्च, संख्याशास्त्र यातील अनेक नव्यानव्या गोष्टींचा उगम त्यातून झाला. त्यातूनच तो काळ आकडे, समीकरणे यांचा होता. त्या काहीशा रूक्ष वाटणार्‍या वातावरणात बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स तितकेसे परिणामकारक ठरले नाही.

बिहेविअरल इकॉनॉमिक्सची लोकप्रियता: डॅनिएल कॅनेमन आणि अ‍ॅमोस Tversky यांचे योगदान
पण १९७० च्या दशकात प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्डचे अ‍ॅमॉस Tversky या दोन मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातून क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या महत्वाच्या गाभ्यालाच (माणसे रॅशनल असतात) धक्का लावला. माणसे खरोखरच रॅशनल नसतात हे 'गट फिलिंग' कोणाला नसेल असे वाटत नाही. पण संशोधनाच्या जगतात नुसते 'गट फिलिंग' कामाचे नाही. तर आपले म्हणणे एका मॉडेलच्या स्वरूपात मांडता आले पाहिजे. कॅनेमन आणि Tversky यांनी अनेक प्रयोग केले, आकडेवारी गोळा केली आणि आपले मॉडेल मांडले. त्यांनी हे खूपच महत्वाचे काम केले. या सर्व प्रयोगांविषयी प्राध्यापक कॅनेमन यांनी Thinking, Fast and Slow या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. जर एखादे पुस्तक वाचून आंतर्बाह्य हादरून जाणे म्हणजे काय हा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. आपण फार रॅशनल आहोत असा आपल्या सगळ्यांचाच (विशेषतः आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांचा) समज असतो तो किती मोठा गैरसमज आहे याचा अनुभव ते पुस्तक वाचताना अगदी पदोपदी येतो.

ज्या गृहितकावर पूर्ण क्लासिकल इकॉनॉमिक्सचा डोलारा अवलंबून होता त्यालाच धक्का लावणे ही गोष्ट साधीसुधी नव्हती. या महत्वाच्या कामाबद्दल प्राध्यापक डॅनिअल कॅनेमनना २००२ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. प्राध्यापक अ‍ॅमॉस Tversky यांचे त्यापूर्वीच निधन झाले होते म्हणून त्यांना नोबेल मिळू शकले नाही.

रिचर्ड थेलर आणि बिहेव्हिअरल फायनान्स
प्राध्यापक डॅनिअल कॅनेमन यांचे कार्य अफलातून होते यात तीळमात्र शंका नाही. पण ते मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचे काम जास्त मानसशास्त्राच्या अंगाकडे झुकणारे होते. निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरवायचे काम त्यांनी केले. पण त्या बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सच्या तत्वांचा अर्थशास्त्रात अधिक उपयोग कसा करता येईल याविषयी काम केले रिचर्ड थेलर यांनी.

अमेरिकेत विद्यापीठांमध्ये 'फ्रेशवॉटर स्कूल' आणि 'सॉल्टवॉटर स्कूल' हा प्रकार आहे.फ्रेशवॉटर स्कूल म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो, कार्नेगी मेलॉन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर यासारखी गोड्या पाण्याच्या ग्रेट लेक्सजवळ वसलेली विद्यापीठे तर सॉल्टवॉटर म्हणजे हार्वर्ड, प्रिन्सटन, कोलंबिया, बर्केले, यु.सी.एल.ए इत्यादी समुद्राजवळ वसलेली विद्यापीठे. फ्रेशवॉटर स्कूलमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्स, फ्री मार्केट आणि एकंदरीत उजव्या विचारांचे तर सॉल्टवॉटर स्कूलमध्ये समाजवादी, डाव्या विचारांचे प्राबल्य. आता हा फरक बराच कमी झाला तरी आहे पण प्राध्यापक थेलर पी.एच.डी झाले तेव्हा (१९७५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर या फ्रेशवॉटर विद्यापीठातून) फ्रेशवॉटरमधून पी.एच.डी झाल्यास सॉल्टवॉटरमध्ये (आणि व्हाईस-व्हर्सा) प्राध्यापक म्हणून घेतले जायचे प्रमाण बरेच नगण्य होते. त्यातून थेलर पी.एच.डी झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून लागले (जिथे रघुराम राजन सध्या प्राध्यापक आहेत).

युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोचा उल्लेख मुद्दामून करत आहे. कारण याच विद्यापीठात मिल्टन फ्रिडमन हे उत्युंग व्यक्तीमत्व एकेकाळी अर्थशास्त्राचे (बूथ स्कूलमध्ये नव्हे) प्राध्यापक म्हणून होते.) तसेच ज्यांना 'फादर ऑफ मॉडर्न फायनान्स' म्हटले जाते ते प्राध्यापक युजीन फामा हे पण बूथ स्कूलमध्येच प्राध्यापक होते. मिल्टन फ्रिडमन यांनी १९५० च्या दशकात फायनान्शिअल मार्केटमधील किंमती कशा ठरविल्या जातात याविषयी सुरवातीचे काम केले. त्यावेळी फ्रिडमनने म्हटले की सर्व फायनान्शिअल सेक्युरीटी (शेअर/बॉन्ड इत्यादी) त्यांच्या योग्य त्या किंमतीला (म्हणजे भविष्यात येणार्‍या सर्व कॅश-फ्लो ला डिसकाऊंट करून आलेल्या प्रेझेन्ट व्हॅल्यूला) विकल्या जातात. जर का काही काळ ही किंमत त्यापेक्षा वेगळी असेल तर 'आर्बिट्रेजर' त्याचा फायदा उठवतात आणि सर्व फायनान्शिअल सेक्युरीटींची किंमत त्यांच्या 'फंडामेन्टल किंमतीला' विकली जातील अशी परिस्थिती निर्माण करतात. १९७० मध्ये प्राध्यापक युजिन फामा (२०१३ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) यांनी त्यात आणखी भर टाकून 'एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस' मांडले.

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांनी सुरवातीला एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस वर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स (किंबहुना बिहेव्हिअरल फायनान्स) च्या अंगाने काम केले. या हायपोथिसिससाठीही माणसे रॅशनल असतात हे गृहितक होते. थेलर आणि इतर प्राध्यापकांच्या कामातून फायनान्शिअल मार्केटमध्ये सर्व भाग घेणारे रॅशनल असू शकत नाहीत हे दाखवून दिले.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमध्ये राहून मिल्टन फ्रिडमन आणि युजीन फामा यांच्यासारख्या stalwarts चे काम पूर्णपणे बरोबर नव्हते हे दाखवून देणे ही खूप मोठी गोष्ट होती.

नज
इंग्लिशमध्ये नज (nudge) या शब्दाचा अर्थ आहे: "prod (someone) gently with one's elbow in order to attract attention.". रिचर्ड थेलर आणि हार्वर्ड विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक कॅस सनस्टीन यांनी अधिक चांगल्या पॉलिसी मेकिंग साठी 'नज' चा वापर कसा करता येईल याविषयी नज हे पुस्तक लिहिले आहे.

अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे. हे उदाहरणे देऊनच अधिक स्पष्ट करता येईल.

१. शाळेतील विद्यार्थ्यांना 'तुम्ही जंक फूड' न खाता फळे आणि सॅलड खा असे कितीही सांगितले तरी ते त्यांना पाहिजे तेच पिझ्झा बर्गर इत्यादी खाणार. म्हणून शाळेच्या कॅफेट एरिआमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल या उंचीवर पुढे फळे, सॅलड इत्यादी सकस खाणे ठेवायचे आणि जंक फूड मागे ठेवायचे.

२. अमेरिकेत अनेक कंपन्यांमध्ये रिटायरमेन्ट फंडांमध्ये इच्छा असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा असा पर्याय असतो. त्यातून होते असे की सबस्क्राईब करायचे असेल तर त्यासाठी नव्या नोकरीच्या ठिकाणी जॉईनिंग फॉरमॅलिटी करताना मुद्दामून एक टिक करावा लागायचा. आपल्याला वाटेल की एका टिकमध्ये काय मोठेसे. पण प्रत्यक्षात तसे नसते. लोक बहुतांश वेळा जो काही 'डिफॉल्ट ऑप्शन' असेल तोच चालू ठेवतात. मग कल्पना अशी की डिफॉल्टच 'ऑप्ट-इन' ठेवला तर? म्हणजे कर एखाद्याला रि टायरमेन्ट फंडात पैसे गुंतवायचे नसतील तर त्याने/तिने बाहेर पडायच्या ऑप्शनवर टिक करावे. तसे न केल्यास 'बाय डिफॉल्ट' तो कर्मचारी आपोआप रिटायरमेन्ट फंडात गणला जाणार!!

म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता.

नज या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा लेख आधीच प्रचंड मोठा झाला आहे म्हणून विस्तारभयास्तव ती टाळतो. एकूणच काय की कोणावरही कसलीही सक्ती न करता त्या माणसाच्या हिताचा निर्णय घ्यायला तो आपण होऊन उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे 'नज'. इंग्लंडच्या सरकारने पब्लिक पॉलिसीमध्ये नज कसे अंमलात आणता येतील यासाठी रिचर्ड थेलर यांचा सल्लाही घेतला होता.

इफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस आणि नज याव्यतिरिक्त प्राध्यापक थेलर यांचे इतरही काम आहे. पण त्याविषयी लिहायचे झाले तर आणखी एक लेख लागेल. तेव्हा ते टाळतो. या लेखातून बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर थोडेफार लिहायला मिळाले याचे समाधान वाटते.

लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहितो. टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसमधील प्राध्यापक दिलीप सोमण यांनी शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून पी.एच.डी केली आणि त्यांच्या डिफेन्स कमिटीमध्ये प्राध्यापक रिचर्ड थेलरही होते. आज रिचर्ड थेलरना नोबेल पारितोषिक मिळालेच आहे. त्यानंतर त्यांच्या दिलीप सोमण या विद्यार्थ्याकडूनही असेच काम व्हावे आणि आणखी १५-२० वर्षांनंतर त्यांच्यावरही असाच लेख लिहायची संधी मिळावी ही इच्छा.

रिचर्ड थेलरना नोबेल मिळाल्यानंतर खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे. त्यांच्यावर आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर एखादा छोटेखानी लेख आजच मिपावर लिहावा असे त्यांना नोबेल मिळाल्याची बातमी दुपारी वाचल्यापासून फार वाटत होते. (हा लेख छोटेखानी न राहता मोठेखानी झाला आहे ही गोष्ट वेगळी :) ) तसे करता आले याचे समाधान आहे.

अर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

10 Oct 2017 - 12:49 am | मार्मिक गोडसे

लेख आवडला.

पगला गजोधर's picture

15 Oct 2017 - 9:16 am | पगला गजोधर

लेख छान, लेखकाचे संशोधन कष्ट जाणवतात, लेखकाच्या श्रमाला १+

राजन यांना रिजर्व बँकेची २ टर्म दिली गेली नाही, त्यामुळे त्यांना अमेरिकेत जावे लागले, यावर रिचर्ड थेलार म्हणाले होते....
India's loss, is our gain !
या ट्विटमुळं विचारवंतांची कदर केली जात नाही, अशी चर्चा सुरू झालेली....
:(

पगला गजोधर's picture

15 Oct 2017 - 9:17 am | पगला गजोधर

या ट्विटमुळं, भारतात विचारवंतांची कदर केली जात नाही, अशी चर्चा सुरू झालेली....
:(

मामाजी's picture

15 Oct 2017 - 10:43 am | मामाजी

म्हणजेच याचा अर्थ असा की भारतात विचारवंतांची कदर केली जात नाही,, , अशी चर्चा सुरू करणार्यांच्या दृष्टिकोनातून अख्या जगात रघुराम राजन हे ऐकटेच विचारवंत आहेत व इतर सर्वांच्या अकला त्यांच्या गुडघ्यांमधे आहेत.

पगला गजोधर's picture

15 Oct 2017 - 1:15 pm | पगला गजोधर

नै वो मामुजान...

आमचा फोकस, वाक्याच्या
.
"रिचर्ड थेलार म्हणाले होते....
India's loss, is our gain !"
.
या भागावर होता.

मामाजी's picture

16 Oct 2017 - 9:53 am | मामाजी

पग साहेब,
आमचा फोकस,
वाक्याच्या "रिचर्ड थेलार म्हणाले होते....
India's loss, is our gain !"
या भागावर होता

तर या ट्विटमुळं विचारवंतांची कदर केली जात नाही, अशी चर्चा सुरू झालेली....

हे दोन वेळ सांगायची काय गरज होती?

mayu4u's picture

30 Oct 2017 - 9:21 pm | mayu4u

दोन वेळ सांगायची काय गरज यासाठी पडते.

अमितदादा's picture

10 Oct 2017 - 12:54 am | अमितदादा

उत्तम लेख इथेच न थांबता याची मालिका लिहा हि विनंती. अनेक उत्तम अर्थशास्त्रज्ञांनी माहिती करून दिलीत. अर्थशास्त्रातील गती यथातथाच आहे , त्यामुळे अनेक गोष्टी नवीन वाचायला मिळाल्या.

म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता.

हे अत्यंत उत्तम उदाहरण आधी वाचलेलं एका रिसर्च पेपर मधून, तुमच्या लेखामुळे तो पेपर परत आज शोधून सगळा वाचून काढला (२ पानी आहे सोप्या भाषेत)
Do Defaults Save Lives?

याच्या मध्ये युरोपियन देशांचा डेटा दिलाय, तसेच रेफेरेंन्सस मध्ये रिचर्ड थेलर, कॅस सनस्टीन, डॅनिएल काहनेमान आणि अ‍ॅमॉस Tversky या दादा लोकांची नावे सुद्धा आहेत :)

अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे.

ह्या गोष्टी आजकाल जागोजागी पाहायला मिळतात, कधी कधी तर एखाद्याला खूप सारे ऑपशन्स देऊन गोंधळात टाकून आपल्याला हवा तो निर्णय घ्यायला लावणे सुद्धा याचाच एक प्रकार आहे असे वाटते.

मिल्टन's picture

12 Oct 2017 - 5:31 pm | मिल्टन

कधी कधी तर एखाद्याला खूप सारे ऑपशन्स देऊन गोंधळात टाकून आपल्याला हवा तो निर्णय घ्यायला लावणे सुद्धा याचाच एक प्रकार आहे असे वाटते.

नाही. खूप सारे ऑप्शन दिले तर समोरचा माणूस अजून गोंधळून जातो. नजमध्ये खूपसारे ऑप्शन देणे अपेक्षित नाही तर जे काही ऑप्शन आहेत त्यांची एका अर्थी पुनर्रचना करणे अपेक्षित आहे. म्हणजेच समोरच्याने जो ऑप्शन स्विकारावा असे आपल्याला वाटते तो ऑप्शन अधिक ठळकपणे किंवा समोरच्याच्या लगेच लक्षात येईल अशाप्रकारे ठेवायचा ज्यामुळे आपोआपच समोरचा माणूस तोच ऑप्शन स्विकारायला उद्युक्त होईल.

खूप सारे ऑप्शन दिले तर माणूस गोंधळून जातो यावर The Paradox of Choice: Why More Is Less हे प्राध्यापक बॅरी श्वार्झ यांचे पुस्तक वाचनीय आहे. अधिक ऑप्शन असू नयेत असा त्याचा अर्थ नसला तरी खूपसारे ऑप्शन दिले तर माणूस बर्‍याचदा गोंधळून जातो आणि निर्णय घ्यायला उशीर लावतो हा मुद्दा आहे.

प्राध्यापक बॅरी श्वार्झ यांचा या विषयावरील टेड टॉक खाली देत आहे:

अमितदादा's picture

12 Oct 2017 - 10:48 pm | अमितदादा

खूप सारे ऑप्शन दिले तर समोरचा माणूस अजून गोंधळून जातो.

हो हे मला हि मान्य आहे ते मी लिहिलेलं आहे, माझ म्हणण असे होते कि जेंव्हा तो गोंधळतो तेंव्हा निर्णयाची जबाबदारी पुढच्यावर सोपवतो उदारणार्थ> डॉक्टर, विमा agent, आणि मग ते त्यांना फायदेशीर निर्णय घेतात, माझे मूळ वाक्य हाच अर्थ काढते, त्यचा आणि nudge चा संबंध आहे का हा प्रश्न मनात होता ज्याच उत्तर मिळाल. जेंव्हा निर्णयाची जबाबदारी स्वतवर असते तेन्व्हा मात्र तो उशीर करतो हे तुमच आणि चित्रफिती मधलं म्हणण पूर्ण मान्य.
तुमच्या प्रतिसादबद्दल आणि चित्रफितीबद्दल धन्यवाद. चित्रफित अर्धी पहिली रोचक आहे, सगळे मुद्दे पटले, डॉक्टरचा हि.

नंदन's picture

10 Oct 2017 - 1:26 am | नंदन

लेख अतिशय आवडला. अजिबात क्लिष्ट न होता प्रा. थेलर यांच्या कामाचं वैशिष्ट्य वाचकापर्यंत नेमकेपणे पोचवणारा. विस्तारभयाकडे दुर्लक्ष करून या संबंधात सवडीने अधिक लिहावे, ही विनंती.

विकास's picture

11 Oct 2017 - 11:46 pm | विकास

१००% सहमत! लेख मस्त आणि मुख्यतः माहितीपूर्ण आहे. पुढे Nudge या पुस्तकावर परीचयावर वेगळा लेख लिहावा! :)

रामदास's picture

10 Oct 2017 - 9:26 am | रामदास

ते नंदनने म्हटलेच आहे . मी फक्त 'अनुमोदन' असे म्हणतो.

सुनील's picture

10 Oct 2017 - 10:00 am | सुनील

मीदेखिल हेच म्हणतो!

बाकी अर्थशात्रातील फार काही कळत नाही तरीही लेख वाचनीय झाला.

महेश हतोळकर's picture

10 Oct 2017 - 9:40 am | महेश हतोळकर

वेळ काढून नीट वाचावा असा लेख.
या विषयाची सविस्तर लेखमाला कराच.

गंम्बा's picture

10 Oct 2017 - 10:04 am | गंम्बा

धन्यवाद मिल्टन. येल चे प्रोफेसर रॉबर्ट शिलर ( यांना पण नोबेल मिळाले आहे ) बद्दल पण असे काही लिहिलेत तर वाचायला आवडेल.

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 5:52 pm | मिल्टन

हो रॉबर्ट शिलरना २०१३ सालचे नोबेल पारितोषिक (लेखात उल्लेख केल्याप्रमाणे युजिन फामा आणि अन्य एक प्राध्यापक यांच्याबरोबर) मिळाले होते.

रॉबर्ट शिलरनी एफिशिएन्ट मार्केट थिअरीवर काम केले. या थिअरीचा गाभा हा की शेअरबाजारातील शेअरच्या किंमतींमध्ये त्या कंपनीविषयीच्या/ अर्थव्यवस्थेविषयीच्या कोणत्याही माहितीचा ताबडतोब अंतर्भाव होतो. म्हणजे एखाद्या कंपनीविषयी एखादी अनुकूल बातमी आली तर बाजारात त्या कंपनीचे शेअर लगेच वाढतात. त्यामुळे एखाद्या अनुकूल बातमीचा फायदा घेऊन कोणालाही 'छप्पर फाड के' नफा बाजारातून मिळवता येत नाही. तसेच शेअरच्या किंमती लगेचच नव्या माहितीप्रमाणे बदलत असल्यामुळे शेअरची उद्याची किंमत नक्की काय असेल हे सांगता येणार नाही कारण उद्या कोणती बातमी येईल हे आज सांगता येणार नाही. म्हणजेच शेअरच्या किंमती कशा वरखाली झाल्या याचा अभ्यास करून (टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस) काहीच उपयोग नाही कारण नव्या माहितीप्रमाणे शेअरच्या किंमती वरखाली होतील.

इथे 'छप्पर फाड के' नफा म्हणजे प्रचंड मोठा नफा असे अपेक्षित नाही तर सतत मिळवत असलेला (अनेक आठवडे, महिने, वर्ष) नफा अपेक्षित आहे. त्यामुळे १०० रूपयाला एखादा शेअर घेतला तो महिन्याभराने १५० रूपयांना विकला असे एखादे उदाहरण ही थिअरी खोटी ठरवायला चालायचे नाही. जर का असा नफा सतत मिळवता आला तरच ही थिअरी खोटी आहे असे म्हणता येईल. रॉबर्ट शिलरनी ही थिअरी कोणत्या परिस्थितीत खोटी ठरू शकते हे दाखवून दिले.

अर्थातच हे त्यांचे एक काम झाले. त्यांचे इतर काम फायनान्शिअल मार्केटच्या संदर्भात बिहेव्हिअरल फायनान्स या क्षेत्रातील आहे. २०१३ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरच कधीतरी रिचर्ड थेलरनाही ते मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली होती.

त्यांनी एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस पासून बिहेव्हिअरल फायनान्स पर्यंतचा प्रवास थोडक्यात या पेपरमध्ये लिहिला आहे. हा पेपर जर्नल ऑफ इकॉनॉमिक परस्पेक्टिव्हज मधला आहे. अर्थशास्त्रावरील रिसर्च पेपर बहुतांश वेळा जडजंबाल गणिताने आणि संख्याशास्त्राने (इकॉनॉमेट्रिक्स) भरलेले असतात. अनेकदा हा पेपर अर्थशास्त्रावरील आहे की गणितावरील आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते. त्या कारणामुळे अनेकवेळा लेखकांना नक्की काय म्हणायचे आहे याचा पत्ताच लागत नाही आणि नुसते अनुमान (कनक्लुजन) वाचून आपलेच समाधान करावे लागते. या जर्नलमध्ये त्यामानाने जडजंबाल गणित कमी असते. या पेपरमध्ये तर खूपच कमी आहे त्यामुळे त्या पेपरकडे बघून निदान भिती तरी वाटत नाही.

जर का असा नफा सतत मिळवता आला तरच ही थिअरी खोटी आहे असे म्हणता येईल. रॉबर्ट शिलरनी ही थिअरी कोणत्या परिस्थितीत खोटी ठरू शकते हे दाखवून दिले.

पुन्हा धन्यवाद मिल्टन. हे वरचे जास्त उलगडुन सांगाल का? म्हणजे कोणत्या परिस्थितीत हि थिअरी खोटी ठरते? इर्रॅशनल बिहेवियर असेल तर का?

मिल्टन's picture

11 Oct 2017 - 10:49 pm | मिल्टन

म्हणजे कोणत्या परिस्थितीत हि थिअरी खोटी ठरते? इर्रॅशनल बिहेवियर असेल तर का?

निओक्लासिकल मॉडेलप्रमाणे शेअरची किंमत त्या शेअरमधून भविष्यात येणार्‍या सर्व डिव्हिडन्डची प्रेझेन्ट व्हॅल्यू इतकी असते. पण रॉबर्ट शिलर यांच्या मते शेअर बाजारातील किंमतींचे चढउतार (व्होलॅटिलिटी) इतके असतात की शेअरची किंमत आणि डिव्हिडन्डची प्रेझेन्ट व्हॅल्यू यातील नाते कोलमडते. यावर १९८१ मध्ये त्यांनी दोन पेपर लिहिले होते. ते वाचायचा प्रयत्न केला पण ते वाचताना तामिळ भाषेतले वर्तमानपत्र वाचत आहे असे वाटायला लागले इतक्या प्रमाणात ते गणित आणि विशेषतः इकॉनॉमेट्रिक्सने भरलेले होते. अर्थात त्यातले मला काहीही कळले नाही. मध्यंतरी प्राध्यापक अ‍ॅन्ड्राई श्लायफर यांचे Inefficient Markets: An Introduction to Behavioral Finance (Clarendon Lectures in Economics) हे पुस्तक एकाने वाचायला दिले होते ते वाचले. त्यात उल्लेख होता की रॉबर्ट शिलरचे हे काम अगदीच महत्वाचे होते. ते नक्की कसे आणि त्याचे महत्व काय हे मला समजले नाही. तसेच हे पुस्तक वाचताना आमच्या एका प्राध्यापकांनी वर्गात बोलताना सांगितलेली एक गोष्ट आठवली. रॉबर्ट शिलरनी Irrational Exuberance हे पुस्तक लिहिले आहे आणि त्यात गुंतवणुकदारांनी मार्केट स्वस्त असताना जर दीर्घ काळासाठी (१० वर्षांपेक्षा जास्त) गुंतवणुक केली तर त्यांना मिळालेला परतावा एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिसप्रमाणे अगदी 'रॅन्डम' नसेल असे दाखवून दिले आहे असे त्यावेळी कळले होते. मी अजून ते पुस्तक वाचलेले नाही पण आधीच्या प्रतिसादाच्या निमित्ताने तो वर्ग आठवला आणि आंतरजालावर थोडीफार खोदाखोद केली असता रॉबर्ट शिलरनी खरोखरच तसे म्हटले आहे याची खात्री करून घेतली. आणि त्यासाठी त्या १९८१ मधील दोन पेपरचा संदर्भ आहे.

इकॉनॉमेट्रिक्स येत नसल्याची मर्यादा अगदी पदोपदी जाणवते. कारण त्या माहितीशिवाय कोणत्याही पेपरमध्ये लेखकाचा दृष्टीकोन आणि त्याने नक्की काय कारणमिमांसा दिली आहे हेच मुळात समजत नाही. वाचायचा प्रयत्न करायचा आणि नाही समजले की नुसते अनुमान वाचायचे असे अनेकदा करायला लागते. त्यातच कोणत्याही आघाडीच्या जर्नलमधील पेपरमध्ये न केलेला किंवा दिशाभूल करणारा दावा अनुमानात (कन्क्लुजन) मध्ये असणार नाही या खात्रीवर विसंबून राहावे लागते :(

सुनील's picture

10 Oct 2017 - 10:05 am | सुनील

म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा

ही नेहेमीच होत नसावे!

क्रेडिट कार्ड्ची रक्कम भरताना सहसा तीन पर्याय दिले जातात -
१) किमान रक्कम
२) एकूण रक्कम
३) अन्य रक्कम

आता जरा प्रत्येकाने तपासून पहावे की आपली बँक डिफॉल्ट पर्याय काय देते ती!!

गंम्बा's picture

10 Oct 2017 - 10:18 am | गंम्बा

अजुन एक चालूपणा म्हणजे, तुम्ही कधीहि ऑनलाईन कार्ड पेमेंट करता तेंव्हा कार्डाची माहीती सेव्ह करु का असे विचारणार्‍या बॉक्स मधे बाय डिफॉल्ट टिक असते.

तसेच एस-आय-पी काढलीत तर ऑटो-रिन्यु च्या बॉक्स मधे डिफॉल्ट टिक असते.

सुबोध खरे's picture

10 Oct 2017 - 12:42 pm | सुबोध खरे

डिफॉल्ट टिक च्या बाबत आपल्याला नेहमी जागरूक रहावे लागते. चांगल्या बँका सुद्धा असा चावट पणा करताना आढळतात. विमा कंपन्या बँका तुमच्या हिटाची गोष्ट करत असल्याचा आव आणून तुमचा खिसा खाली करत असतात.
एक उदाहरण
http://www.moneylife.in/article/hdfc-bank-charges-rs100-per-quarter-for-...

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 5:28 pm | मिल्टन

ही नेहेमीच होत नसावे!

नक्कीच. नज थिअरीप्रमाणे समोरच्या माणसाच्या हिताचा डिफॉल्ट ऑप्शन ठेवावा असे सुचविले आहे. सध्या तसे होत नाही हे उघडच आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे बँका म्हणजे नफा मिळविणारा व्यवसाय झाला. अशा ठिकाणी नज वापरताना एक conflict of interest येईल. मॅनेजमेन्टने समोरच्याच्या हिताचा निर्णय घ्यायचा म्हणजे नक्की कोणाच्या हिताचा निर्णय घ्यायचा? बँकेच्या हिताचा की ग्राहकाच्या हिताचा? जर नफा मिळविणे हा उद्देश असेल तर ग्राहकाच्या हिताचा निर्णय घेतला जायची शक्यता तितकी कमी होते. तेव्हा नज चा वापर नफा मिळवायच्या व्यवसायात नव्हे तर पब्लिक पॉलिसीसाठी केला जाणे अभिप्रेत आहे.

नज ही संकल्पना मांडली जाण्यापूर्वी व्यवसाय आपला नफा वाढविण्याच्या दिशेने आपल्या ग्राहकांना नज करत होते का? नक्कीच. एक उदाहरण द्यायचे तर वॉलमार्ट स्टोअर्सची रचना अशा पध्दतीने केलेली असते की दूध, ब्रेड, अंडी इत्यादी काहीही झाले तरी लोक खरेदी करणारच अशा गोष्टी प्रवेशद्वारापासून एकदम लांब दुसर्‍या टोकाला ठेवलेल्या असतात. त्यातून होते असे की किमानपक्षी तेवढी खरेदी करायची असली तरी ग्राहकाला इतर सगळे सेक्शन ओलांडून सगळ्यात शेवटी जाणे आले. आणि मग काहीतरी दिसून ते विकत घ्यावेसे वाटणे आले आणि प्रत्यक्ष विकत घेतले जाणे आले. तसेच लहान मुलांना आकर्षित करणार्‍या गोष्टी त्यांच्या नजरेस पडतील अशा उंचीला ठेवलेल्या असतात. म्हणजे एखादी गोष्ट दिसून मुलांचा हट्ट (जरी अमेरिकेत हा प्रकार बराच कमी असला तरी) करणे आणि म्हणून ती वस्तू विकत घेतली जाणे या गोष्टी आल्या. तसेच बिलिंग काऊंटरच्या जवळ पटकन तोंडात टाकण्यासारख्या स्वस्तातल्या गोष्टी (च्युईंग गम वगैरे) ठेवलेल्या असतात. त्यातूनच बिलिंग काऊंटरच्या लाईनमध्ये असताना पटकन कसलीतरी खरेदी होणे आले.

एका अर्थी वॉलमार्टही ग्राहकांना आपला खप (आणि म्हणून नफा) वाढावा या दिशेने नज करत आलेच आहे.

संग्राम's picture

10 Oct 2017 - 7:06 pm | संग्राम

फक्त वॉलमार्ट नव्हे तर सर्वच रिटेल स्टोअर्सची रचना अशी असते .... अगदी CPG वाले लोक याच ऑडीट करतात कि त्यांचे प्रॉडक्ट्स कसे आणि कुठे टेवले आहेत

गंम्बा's picture

11 Oct 2017 - 10:13 am | गंम्बा

हे नज करणे समजु शकतो, हे ग्राहकासाठी फारसे तोट्याचे नाही. पण चेकबॉक्स टिक करुन ठेवणे म्हणजे तुमच्या शॉपिंग कार्ट मधे ती वस्तू आधीच ठेवण्यासारखे किंवा थेट घरी पाठवण्यासारखे आहे.

मित्रहो's picture

10 Oct 2017 - 10:36 am | मित्रहो

छान माहीती मिळाली
आजच हिंदूमधे आणखीन एक उदाहरण वाचले. शिकागो विद्यापीठात शिकोगाच्या थंडीत कोण पार्किंग शोधनार म्हणून प्राध्यापक येत नव्हते तेंव्हा बेसमेंटमधे प्राध्यापकांसाठी खास पार्किंगची सोय ठेवण्यात आली आणि उपस्थिती वाढली.

अनिंद्य's picture

10 Oct 2017 - 10:42 am | अनिंद्य

थोड्या वेगळ्या विषयावरचा उत्तम लेख!
असे विषय कमी हाताळले जातात.

जयंत कुलकर्णी's picture

10 Oct 2017 - 11:03 am | जयंत कुलकर्णी

मोदी आणि कॉंग्रेस व त्या भोवती फिरत असलेले लेख व प्रतिक्रिया यांच्यापासून थोडावेळ तरी सुटका झाली. त्याबद्दल आपले आभार.
अर्थात लेख चांगला आहेच....

पुंबा's picture

10 Oct 2017 - 11:15 am | पुंबा

अतीउत्तम लेख..
अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना सोप्या करून सांगणारी लेखमालिका लिहा अशी विनंती..

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2017 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे

सोप्या शब्दांत अर्थशास्रिय संकल्पना समजावून सांगाणारा माहितीपूर्ण लेख ! समयोचीत लेख खूप आवडला.

एस's picture

10 Oct 2017 - 11:39 am | एस

छान लेख. अजून लिहा.

थॉर माणूस's picture

10 Oct 2017 - 12:13 pm | थॉर माणूस

उत्तम लेख, या अशा धाग्यांमुळेच अजुनही मिपावर आवर्जून यावेसे वाटते. धन्यवाद, आणि कृपया अजून लिहा.

दीपक११७७'s picture

10 Oct 2017 - 12:35 pm | दीपक११७७

माहितीपूर्ण लेख
धन्यवाद !

रामदास२९'s picture

10 Oct 2017 - 12:46 pm | रामदास२९

प्राध्यापक रिचर्ड थेलर यान्च हार्दिक अभिनन्दन!!
थोडेसे विषयान्तर, याच थेलर यान्नी 'नोटाबन्दी' चा समर्थन केला होता पण २००० रुपयान्ची नवी नोट कढण्याबद्द्ल नाराजी व्यक्त केली होती.

प्रसाद_१९८२'s picture

10 Oct 2017 - 12:55 pm | प्रसाद_१९८२

रिचर्ड थेलर यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर वरिल ट्विट करुन सर्वात आधी समर्थन केलं होतं. पण नंतर जेंव्हा त्यांना कळले की १००० ची नोट बंद करुन, २००० ची नवीन नोटा पुन्हा आणलेय त्यावर खालील ट्विट करुन त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 5:11 pm | मिल्टन

हो नोटबंदीला रिचर्ड थेलर यांनी "This is a policy I have long supported. First step toward cashless and good start on reducing corruption" म्हटले होते हे नक्कीच. कॅशलेस अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार बराचसा कमी होईल असे नेहमीच म्हटले जाते. पण तसे न होता कॅशलेस झाल्यामुळे भ्रष्टाचार वाढू शकेल का? मी याविषयी जे काही वाचले आहे त्यावर विचार करून आणि माझे काही वैयक्तिक अनुभव आले त्यावरून मला वाटते की कॅशलेस झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असे नाही तर किंबहुना भ्रष्टाचार वाढूही शकेल. याविषयी लेख ८ नोव्हेंबर रोजी मिपावर प्रसिध्द करायचा मानस आहे.

सुबोध खरे's picture

10 Oct 2017 - 6:37 pm | सुबोध खरे

रोखीचे व्यवहार कमी झाले तर भ्रष्टाचार कमी होईल असे म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार शोधून काढणे जास्त सोपे जाईल. कारण प्रत्येक व्यवहाराच्या पाऊलखुणा( paper trail) मागे राहतातच. रोखीचे व्यवहार हे वाळूत ओतलेला पाण्यासारखे पटकन जिरून जातात.
यांनतर सरकार किती उत्साहाने अशा आरोपीना शिक्षा देते त्यावर तो कमी होईल का हे अवलंबून असेल.
आताच निश्चलनीकरणानंतर सर्वच्या सर्व काळा पैसा बँकेत भरला गेला आहे ( जवळजवळ ९९% पेक्षा जास्त नोटा परत आल्या). लोकांचा हिशेब हाच आहे कि आज तर पैसे बँकेत भरू. उद्या आयकर खात्याची नोटीस आली तर कर आणि दंड भरू. नाही आली तर प्रश्न मिटला.
कित्येक व्यावसायिक( डॉक्टर, सी ए, वकील धंदे वाले) काल पर्यंत नफा ४ लाखाच्या आसपास दाखवत होते( बाकी पैसे रोखीत होते.) त्यांचा नफा एकदम २० -२५ लाख रुपये झाला आहे असे माझ्या आयकर खात्यातील मित्राने सांगितले.
कामगारांना सहा -आठ महिन्यांचा पगार अग्रीम ( advance) मध्ये( जुन्या नोटा संपवण्यासाठी) दिला गेला
निश्चलनीकरणा नंतर अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा पाहायला आणि ऐकायला मिळाल्या आहेत
भ्रष्टाचार सहज कमी होणार नाही याचे कारण मूळ स्वार्थी मानवी स्वभावात आहे.
जेथे सज्जड शिक्षा असते तेथे गुन्हे कमी प्रमाणात होतात मग त्यात काही निर्दोषी लोक हि भरडले जातात

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 10:58 pm | मिल्टन

रोखीचे व्यवहार कमी झाले तर भ्रष्टाचार कमी होईल असे म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार शोधून काढणे जास्त सोपे जाईल.

हो बरोबर. पण रोखीचे व्यवहार कमी झाले तर कदाचित भ्रष्टाचार करायचे नवे मार्ग (कदाचित आपल्यासारख्या लोकांना कल्पनाही करता येणार नाही असेही) निर्माण होऊ शकतील अशी भिती वाटते. कदाचित हे माझे विशफुल थिंकिंग असेल. तसे प्रत्यक्षात झाले नाही तर अती-उत्तम. पण तसे व्हायची शक्यता अगदी ०% आहे का? तर याचे उत्तर निसंदिग्धपणे नाही असे मला तरी देता येत नाहीये.

मी (मी म्हणजे जे काही वाचले आहे आणि मला काही अनुभव आले आहेत त्यावरून) हे का म्हणत आहे? ते ८ नोव्हेंबरला कळेल. :)

मराठी_माणूस's picture

11 Oct 2017 - 10:31 am | मराठी_माणूस

८ नोव्हेंबरला ला काय आहे ?

सुबोध खरे's picture

11 Oct 2017 - 10:35 am | सुबोध खरे

आपण भारतीय लोक "जुगाड" किंवा "छप्पन लप्पन" करण्यात पटाईत आहोत. नव्या मुंबईतील सरकारी अधिकाऱ्यांनी कंपन्यांकडून पैसे खाण्याचा नवीन मार्ग शोधला होता. निश्चलनीकरणा नंतर लहान कंपन्यांनी आमच्या कडे न व्या नोटा नाहीतच म्हणून हात वर केले. त्यावर या लोकांनि राधेश्याम तिवारी नावाचा माणसाच्या नावाने चेक द्या म्हणून सांगितले. या नावाच्या आधार आणि PAN कार्डावर एका सहकारी बँकेत खाते उघडले होते. त्यात हे चेक भरले आणि १५ दिवसांनी रोख रक्कम काढून घेतली. हा घोटाळा उघडकीस आला तेंव्हा राधेश्याम तिवारी चा शोध घेतला तर तो एक बिचारा साधा मजूर होता आणि त्याला याची काहीही माहिती नव्हती. कोणत्या तरी सरकारी कामासाठी दिलेले पॅन आणि आधार कार्ड वापरून हे खाते उघडले होते. सहकारी बँकाचे संगणकीकरण अजून नीट झालेले नाही आणि प्रत्येक आधार/ पॅन कार्डाची जोडणी झालेली नाही याचा या सरकारी अधिकाऱ्यांनी पूर्ण फायदा घेतला. (सहकारी बँकेचे कर्मचारी यात गुंतलेले नाहीतच असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल)
तेंव्हा डिजिटायझेशन करा अथवा नाही "आपण लोक" भ्रष्टाचार करणार नाही हे अशक्यच आहे.

मिल्टन's picture

11 Oct 2017 - 10:53 pm | मिल्टन

डिजिटायझेशन करा अथवा नाही "आपण लोक" भ्रष्टाचार करणार नाही हे अशक्यच आहे.

माझा मुद्दा इन जनरल आहे, म्हणजे केवळ भारतीय लोकांसाठी नाही तर कुठल्याही समाजातील लोकांसाठी निगडीत आहे. आता फार लिहित नाही. तो लेख जरा मला वेळ काढून व्यवस्थित लिहायचा आहे. त्यामुळे लवकरच सुरवात करायला हवी :)

मराठी कथालेखकः ८ नोव्हेंबरला तो लेख प्रसिध्द करायचा मानस आहे.

सुबोध खरे's picture

12 Oct 2017 - 6:13 pm | सुबोध खरे

लेखाची वाट पाहत आहे

प्रकाश घाटपांडे's picture

11 Oct 2017 - 11:17 am | प्रकाश घाटपांडे

लोक पैसे खातो पण काम करतो याला प्रामाणिकपणा म्हणायचे. आता पैसे खायची संधी कमी झाली तर पैसेही खाणार नाही व कामही करणार नाही. अकार्यक्षमता दाखवण्याचा भ्रष्टाचार करतील. सरकारी कार्यालयात असा भ्रष्टाचार करुन लोकांना स्वतःहून लाच देण्यासाठी प्रवृत्त करतात. नाही तर प्रकरण लूप मधे टाकतात.

लई भारी's picture

10 Oct 2017 - 3:00 pm | लई भारी

संबंधित विषयांवर अजून विस्ताराने लिहा; किंबहुना आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे मालिकाच करा.
आपण सांगितलेलं 'Thinking, Fast and Slow' ची २-४ पाने वाचली ऍमेझॉनवर, आवडलं! घेतोय विकत :)
धन्यवाद!

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 4:06 pm | मिल्टन

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. प्रत्येक प्रतिसादाला स्वतंत्रपणे धन्यवाद म्हणून उगीच या धाग्याचा टी.आर.पी आणि मिपाची बॅन्डविड्थ वाढवत नाही. पण सर्वच मिपाकरांचे प्रतिसाद उत्साहवर्धक असतात हे नक्कीच.

या चर्चेत आलेल्या इतर मुद्द्यांना उत्तरे प्रतिसादांमधून देतो.

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2017 - 4:25 pm | श्रीगुरुजी

लेख चांगला आहे. परंतु ज्या अर्थसिद्धांताविषयी थेलर यांना नोबेल पुरस्कार दिला आहे त्या सिद्धांताविषयी लेखात फारसे लिहिलेले नाही. त्याविषयी दुसर्‍या एखाद्या लेखात सविस्तर वाचायला मिळेल ही अपेक्षा आहे.

थेलर यांच्याऐवजी किंवा त्यांच्याबरोबरीने रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता आनंद झाला असता.

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 6:22 pm | मिल्टन

थेलर यांच्याऐवजी किंवा त्यांच्याबरोबरीने रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता आनंद झाला असता.

रघुराम राजन यांचे नाव क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या त्या यादीत आल्याचा भारतीय मिडियामध्ये गवगवा बराच जास्त झाला. पण त्यांना या वर्षी नोबेल मिळायची शक्यता त्यामानाने बरीच कमी होती असे मला वाटते.

एकतर या यादीमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जगदीश भगवती आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अविनाश दिक्षित या दोन भारतीय मुळाच्या प्राध्यापकांचे नाव पूर्वीपासूनच होते. त्याचा कधी गवगवा झाल्याचे ऐकिवात नाही. एकूणच रघुराम राजन हे मिडिया-फ्रेंडली असल्यामुळे आणि त्यामानाने भारतीयांसाठी ताज्या आठवणीत असल्यामुळे त्यांच्या नावाचा बराच जास्त गवगवा झाला असावा.

दरवर्षी जगातील आघाडीच्या अर्थतज्ञांची परिषद वायोमिंग राज्यात जॅकसन होल या ठिकाणी भरते. २००५ सालची परिषद तत्कालीन फेडचे गवर्नर अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची शेवटची परिषद होती. त्या परिषदेत इतर सर्वांनी ग्रीनस्पॅन यांच्या निर्णयांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत कसे सुवर्णयुग आले आहे याचे गोडवे गायले होते. पण रघुराम राजन यांनी मात्र Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून भयंकर मोठे आर्थिक संकट येणार आहे असा इशारा दिला. त्यावेळी त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेतले नाही पण त्यानंतर ३ वर्षातच राजन यांचेच म्हणणे बरोबर होते हे सिध्द झाले.

या सगळ्या गोष्टी कितीही खर्‍या असल्या तरी नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी अगदी पाथब्रेकिंग काम त्यांनी नक्की कोणते केले आहे याविषयी कल्पना नाही. आर्थिक संकट येणार आहे याची चाहूल इतरांपेक्षा आधी देणे हे नोबेलसाठी पुरेसे आहे का? ज्याप्रकारे डॅनिएल कॅनेमन यांनी मुळातल्या निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरा दिला आणि एका अर्थी नव्या रिसर्चसाठी मार्ग उघडून दिला ते जसे पाथब्रेकिंग काम होते त्या तोडीचे नक्की कोणते काम राजन यांनी केले आहे याची मला तरी कल्पना नाही. त्यांनी शंभरेक रिसर्च पेपर लिहिले आहेतच. पण आघाडीच्या प्राध्यापकांनी अगदी ३००-४०० पेपर्स प्रकाशित करणे ही पण त्यामानाने नेहमी बघायला मिळणारी गोष्ट आहे.

मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे युजिन फामांनी महत्वाचे काम केले होते १९७० च्या दशकात. त्यांना नोबेल दिले गेले २०१३ मध्ये. रॉबर्ट शिलर यांचाही कालावधी साधारण त्याच दरम्यानचा. त्यांनाही २०१३ मध्येच नोबेल दिले गेले. डॅनिएल कॅनेमन १९७० च्या दशकापासून संबंधित काम करत होते. त्यांना नोबेल मिळाले २००२ मध्ये. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की नोबेल देताना नुसते केलेले काम जबरदस्त आहे एवढेच न बघता ते काम काळाच्या कसोटीवर उतरलेले आहे हे पण बघतात. रघुराम राजन २५ वर्षांपासून प्राध्यापक आहेत. त्यांनी कितीही काम केलेले असले तरी त्यांना अजून पुरेसा कालावधी मिळालेला नाही असे दिसते. अजून काही वर्षांनी ही अडचण दूर होईल. त्यामानाने सध्या जगदीश भगवती आणि अविनाश दिक्षित कितीतरी जास्त पुढे आहेत. त्याचे कारण ते गेल्या ४०-५० वर्षांपासून अ‍ॅकॅडेमिक्स मध्ये आहेत.

अर्थात हे यापूर्वी वापरलेले ठोकताळे वापरून बांधलेले अंदाज आहेत. जर नोबेल कमिटी नुसत्या हवेतले बोलणे आणि मोठ्यामोठ्या गप्पांच्या आधारे बराक ओबामांना पहिल्या कारिकिर्दीत ७-८ महिन्यातच नोबेल जाहिर करू शकत असेल तर त्यांनी स्वतःचेच ठोकताळे बदलले आहेत असे म्हणायलाही जागा आहे.

या लेखाशी संलग्न एक मुद्दा:

माणूस हा रॅशनल नसतो हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन, अ‍ॅमॉस Tversky आणि इतरांच्या संशोधनातून बर्‍यापैकी सिध्द झाले. त्यातून माणूस बर्‍याचदा आपल्याच पायावर धोंडा पाडणारे निर्णय घेतो आणि तशी कृती करतो. मुळात स्थूल असूनही भरपूर कधीही व्यायाम न करणारे, सिगरेटी ओढणारे, दारू पिणारे आणि पिझ्झासारखे जंक फूड खाणारे कित्येक लोक दिसतील. आपल्याच पायावर धोंडा पाडणार्‍या कृतीचे एक उदाहरण झाले. अशी कित्येक उदाहरणे आपल्या आजूबाजूला (किंवा आपल्या स्वतःमध्येच) बघायला मिळतील. आता प्रश्न हा की अशा लोकांचे नक्की काय करायचे?

कट्टर उजवे लोक म्हणतील की प्रत्येक माणसाला त्याच्या कृतीची बरी/वाईट फळे मिळणे क्रमप्राप्त आहे. आणि जर वाईट फळे नको असतील तर अशी स्वतःच्या पायावर धोंडा पाडणारी कोणतीही कृती माणसाने करू नये. आणि तशी कृती त्याने केल्यास आपल्या कर्माची फळे भोगायलाही तयार असले पाहिजे. याचाच अर्थ त्या माणसाला काहीही करायचे अमर्याद स्वातंत्र्य आहे पण मग परिणामांपासून मात्र सुटका नाही. म्हणजे कट्टर उजव्यांच्या मते या बाबतीत काहीही करायची गरज नाही. त्याउलट अगदी कट्टर डावे जर त्याला समजत नसेल तर त्याच्यावर सक्ती करावी असे म्हणतील. म्हणजे त्यांच्यामते त्या माणसाला शून्य स्वातंत्र्य असेल.

रिचर्ड थेलर आणि कॅस सनस्टीन यांनी सुचविलेल्या 'नज' या प्रकाराला ते libertarian paternalism असे म्हणतात. वरकरणी हे दोन शब्दच परस्परविरोधी आहेत तेव्हा ते एकत्र कसे येऊ शकतील हा प्रश्न येतोच. पण libertarian paternalism मधील libertarian म्हणजे कोणावरही कसलीही सक्ती नको आणि तो माणूस आपल्याला पाहिजे ते निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेच. लेखात दिलेल्या उदाहरणात जर शाळेतील विद्यार्थ्यांना जंक फूडच खायचे असेल तर ते उपलब्ध असणारच आहे. त्यांच्यावर तुम्ही फळे आणि सॅलडच खा ही सक्ती नाही. म्हणजे आमचे मिल्टन फ्रिडमन साहेब म्हणायचे त्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा "Free to choose" आहेच. पण त्याचबरोबर paternalism म्हणजे तो माणूस योग्य तो निर्णय घ्यायला उद्युक्त होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची ('नज' च्या भाषेत चॉईस आर्किटेक्चर). एका अर्थी दोन्ही बाजूंचा सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न 'नज' मध्ये केलेला आहे.

नज थिअरीवर आक्षेपही आहेतच. यावर सर्वात मोठा आक्षेप म्हणजे दुसर्‍याच्या हिताचे काय आहे हे आपण ठरविणारे कोण आणि ते ठरवायचे कोणत्या आधारावर? आणि दुसर्‍याच्या हिताचे नक्की काय हे ठरवायला लागणारी सगळी माहिती आपल्याकडे असेलच याची काय खात्री? आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे दुसर्‍याच्या हिताचे काय असेल हे आपल्या दृष्टीकोनातून झाले. प्रत्यक्ष ते दुसर्‍याच्या हिताचे असेलच याची काय खात्री? आणि दुसर्‍याला 'नज' करायच्या आडून त्या माणसावर डॉमिनेट करायचा प्रयत्न होणार नाही याची काय खात्री?

मला वाटते की यातील आक्षेपही अगदी पूर्ण दुर्लक्ष करण्याजोगे नाहीत. त्याचप्रमाणे नज ही थिअरीही टाकाऊ नक्कीच नाही. कधी आणि कोणत्या परिस्थितीत नज वापरावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून राहिल.

दुसरे म्हणजे माणूस हा व्हॉन न्यूमन-मॉर्गन्स्टीन यांच्या पेपरमध्ये दिल्याप्रमाणे 'रॅशनल' नसला तरी पूर्ण irrational सुध्दा नाही. १९६० च्या दशकात ही रॅशनल-irrational वर चर्चा बर्‍याच रिसर्च पेपर्समध्ये रंगत असे. गॅरी बेकर यासारखे (१९९२ चे नोबेल पारितोषिक विजेते) संशोधक रॅशनॅलिटीच्या बाजूनेही मुद्दे तितक्याच प्रभावीपणे मांडत असत. तरीही माणूस रॅशनल नाही हे बर्‍याच अंशी मान्य करायला तरी काहीच हरकत नसावी.

एम.आय.टी चे प्राध्यापक डॅन एरिअली यांनी Predictably Irrational: The Hidden Forces that Shape Our Decisions या पुस्तकात ओझरता उल्लेख केला आहे की अशा irrational माणसला योग्य तो निर्णय घेता यावा यासाठी सरकारचा हस्तक्षेप व्हायला हवा. अर्थातच स्वतः डॅन एरिअलींनी त्या पुस्तकात यावर फार जास्त भर दिलेला नाही. पण मध्याच्या डावीकडच्या अनेकांचे असे म्हणणे असते.

मला स्वतःला ही गोष्ट पटलेली नाही. याचे कारण जर लोक रॅशनल नसतील तर irrational लोकांनीच निवडून दिलेले आणि irrational लोकांनी चालविलेले सरकार कसे काय रॅशनल असू शकेल? हे म्हणजे एखाद्या यंत्रातील सगळे भाग सदोष आहेत पण यंत्र मात्र निर्दोष आहे हे म्हटल्यासारखे झाले. दुसरे म्हणजे सरकार ही व्यवस्था म्हणजे लोकांनी दिलेली जबाबदारी सांभाळणारी व्यवस्था झाली (जसे कंपनीत शेअरहोल्डर्स कामाची जबाबदारी बोर्ड ऑफ डायरेक्टरवर देतात). अशावेळी हे लोकांचे 'एजंट' लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या हिताचे (राजकीय/आर्थिक इत्यादी) शक्यता मोकळी राहते. तेव्हा irrational लोक आहेत म्हणून सरकारचा हस्तक्षेप जास्त पाहिजे हे म्हणणे मात्र पटण्यासारखे नाही.

मग यातून नक्की मार्ग कोणता असायला हवा? याचे उत्तर अजून तरी कोणालाच पूर्णपणे कळले असेल असे वाटत नाही. तरीही नज ही त्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे असे वाटते. रिचर्ड थेलर यांच्या कामाचे महत्व त्यातच आहे.

नंदन's picture

10 Oct 2017 - 6:29 pm | नंदन

>>> मला स्वतःला ही गोष्ट पटलेली नाही. याचे कारण जर लोक रॅशनल नसतील तर irrational लोकांनीच निवडून दिलेले आणि irrational लोकांनी चालविलेले सरकार कसे काय रॅशनल असू शकेल? हे म्हणजे एखाद्या यंत्रातील सगळे भाग सदोष आहेत पण यंत्र मात्र निर्दोष आहे हे म्हटल्यासारखे झाले. दुसरे म्हणजे सरकार ही व्यवस्था म्हणजे लोकांनी दिलेली जबाबदारी सांभाळणारी व्यवस्था झाली (जसे कंपनीत शेअरहोल्डर्स कामाची जबाबदारी बोर्ड ऑफ डायरेक्टरवर देतात). अशावेळी हे लोकांचे 'एजंट' लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या हिताचे (राजकीय/आर्थिक इत्यादी) शक्यता मोकळी राहते. तेव्हा irrational लोक आहेत म्हणून सरकारचा हस्तक्षेप जास्त पाहिजे हे म्हणणे मात्र पटण्यासारखे नाही.

--- वॉशिंग्टनपश्चात अमेरिकेत उद्भवलेल्या जेफर्सन वि. हॅमिल्टन ह्या संघर्षाची आठवण झाली. (पहा: Ochlocracy, टिरनी ऑफ द मेजॉरिटी आणि त्यातून निर्माण झालेले 'चेक्स अँड बॅलन्सेस')

सुंदर विश्लेषण !

माणूस रॅशनल नाही हे बर्‍याच अंशी मान्य करायला तरी काहीच हरकत नसावी.

यावर जरासे...

आधुनिक शास्त्रिय संशोधनासारखे कडक नियमांनी बांधलेले काही विशिष्ट विषय सोडले तर, सर्वसाधारण व्यवहारांत माणूस रॅशनल कधीच नव्हता. सर्वप्रथम, एखाद्या गोष्टीबद्दल रॅशनल निर्णय घ्यायला त्यासंबंधीची सर्व तथ्ये आणि आकडे उपलब्ध असायला हवे, जे सर्वसामान्यपणे उपलब्ध असणे शक्य नाही *. त्यानंतर, त्यांचा कार्यकारण संबंध लावायला योग्य ती व योग्य तेवढी बौद्धीक संपत्ती असायला हवी, जी सगळ्या सर्वसामान्य लोकांत असत नाही.

वादाकरिता एखाद्या आदर्श व्यवस्थेत हे सगळे शक्य झाले आहे असे समजूया. तरीही...
१. इतक्या सर्व प्रक्रियेतून जायला लागणारी चिकाटी सर्वसामान्य माणसात नसते आणि / किंवा तो सहजपणे गोंधळून जातो;
आणि
२. एवढे करून मिळणार्‍या खरोखरच्या रॅशनल निर्णयाचे फलीत सुखकारक असेलच असेही नाही ! अर्थात, ते सर्वसामान्य माणसांच्या गळी उतरणे / उतरवणे ही कठीण गोष्ट असते.

सर्वसाधारणपणे, माणूसाची मूळ प्रवृत्ती, तत्कालिक परिस्थिती जमेल तसे "सेल्फप्रिझर्वेशन (स्व-जतन)" करणे आणि ते जमल्यानंतर "सेल्फ ग्लोरिफिकेशन (स्व-गौरव)" साधण्याकडे, केंद्रित असते. ते करण्याची प्रक्रिया आणि मिळणारे फलित, दोन्ही शक्य तेवढे सुखकारक व्हावे ही त्याची धडपड असते. शिवाय, हे करताना समान परिस्थितीतही प्रत्येक माणूस तोच निर्णय घेईल असे नाही कारण, प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा, फलिताच्या अपेक्षा आणि ते मिळविण्यासाठी 'प्रयत्न करण्याची, वेळ द्यायची व धोका पत्करण्याची' क्षमता वेगवेगळी असते.

वरचे सगळे पाहता, सर्वसाधारण माणसाचे वागणे-बोलणे-निर्णय हे, त्याला उपलब्ध असलेली तथ्ये व आकड्यांपेक्षा जास्त; त्याच्या अपेक्षा, वैयक्तिक "भीती आणि लोभ (fear and greed) व (असलेच तर) भूतकालातील तत्सम अनुभव यांच्यावर शक्य असलेल्या फलिताच्या कल्पनेवर अवलंबून असतात. भूतकालातील तत्सम अनुभव नसले तर त्यात चिंतेची (अज्ञाताची भीती) भर पडते. या प्रकारे घेतलेले निर्णय रॅशनल (तर्कप्रामाण्याधिष्ठीत) कसे असू शकतील ?

मानवंशशास्त्राच्या दृष्टीने हे तसे वाईटही नाही... माणूस मुळात जर स्वजतन करण्यात अयशस्वी झाला नसता तर (माणूसच नाही म्हटल्यावर) आता अभिमान वाटणार्‍या त्याच्या इतर गमज्यासुद्धा आस्तित्वात आल्या नसत्या... हे कितीही बरे-वाईट वाटले तरी, निर्विवाद सत्य आहे !

सर्वच जीवन (आणि म्हणून इकॉनॉमीही) बहुतांश याच तत्वांवर चालते. याच, स्व-जतन आणि स्व-गौरव तत्वांवर माणूस दोन लाख वर्षे टिकून राहिला आहे आणि (संस्कृती, अर्थ, शास्त्र, इत्यादींच्या दृष्टीने) समृद्ध झाला आहे.

================

* : नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात, आणि तेवढ्याच भांडवलावर कारवाई करावी लागते. नाहीतर, तुमचा प्रतिस्पर्धी तशा प्रकारे घेतलेल्या निर्णयांवर आधारीत कारवाई करून तुमच्यावर कुरघोडी करण्याची दाट शक्यता असते. सर्व खरी तथ्ये आणि आकडे, फक्त भूतकालात झालेल्या (पक्षी : संपलेल्या) गोष्टींबद्दलच उपलब्ध होतात ! :)

***************

नज ही थिअरीही टाकाऊ नक्कीच नाही. कधी आणि कोणत्या परिस्थितीत नज वापरावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून राहिल.

'नजिंग' हे तर माणुस 'विचारी' प्राणी झाला तेव्हापासून व्यवहारात आहे. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी ही एक कळीची गोष्ट आहे... इतर बहुतेक फरक तिचे परिणाम आहेत. 'नजिंग हे संकल्पना बनवण्याच्या (गोष्ट सांगण्याची उर्फ स्टोरी टेलिंग) क्षमतेचा एक भाग आहे. देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत). माणसांनी माणसांना या जीवनातली सुरक्षा, समृद्धी, सामाजिक, आर्थिक, इत्यादी फायदा आणि पारमार्थिक फायद्याच्या गोष्टी (संकल्पना) गळी उतरवून माणसांचे प्रचंड मोठे समुदाय बनविण्यासाठी 'नज' केले... येथेही "फियर आणि ग्रीड" यांचा उपयोगच कामी येतो. इतर प्राण्यांना हे शक्य झाले नाही / होत नाही. 'नज' करताना आपल्या हेतूला सकारात्मक असलेल्या गोष्टीला जास्त महत्व देणे आणि नकारात्मक गोष्टीला कमी महत्व देणे /लपवून ठेवणे; हे काही रॅशनल म्हणता येणार नाही, पण, ते अनेक कारणे सांगून/न सांगून माणसांच्या व्यवहारात सतत दिसते. :)

'नज'चे नेहमीच्या व्यवहारातले एक उत्तम उदाहरण म्हणजे सुपरमार्केटमध्ये बिल चुकते करण्याच्या जागांच्या (कॅशियर पॉइंट्स) जवळपास दिसणारी चॉकलेट्स (पिल्लू मंडळीना शेवटचा नज, उर्फ, 'मम्मा/पप्पा, हे हवंच्च मला' क्षण, उर्फ, ती वस्तू सरळ उचलून पैसे चुकते होईपर्यंत हातात घट्ट धरून ठेवणे); दाढीची आयुधे (पुरुषांचा 'आयला, हे संपलंय/संपत आलंय की' क्षण); आणि टिकल्या व तत्सम नेहमीच्या वापरातल्या प्रसाधन वस्तू ('अय्या, कित्ती छान आहे' क्षण)... :)

सुपरमार्केटमध्ये कोणती वस्तू कोठे ठेवावी यावर "एमबीए (रिटेल)" मध्ये अख्खे मोड्युल असते, ते याच (कस्टमर) बिहेवियरल एकॉनॉमिक्सचे ऑफशूट आहे. जाहिरातबाजीतला (आम्ही हे विकतो यापेक्षा, "काय म्हणता, हे तुमच्याकडे नाही ?!", असा संदेश देणारा (पक्षी : ग्राहकाच्या मनात असा कमतरतेचा संदेह उत्पन्न करणारा) उपयोग तर नेहमीचा झाला आहे.

***************

व्यवस्थापनशास्त्राचे मानवी स्वभावावर आधारित दोन मूलभूत नियम आहेत; ते मानवी जीवनात सर्वत्र लागू होतात :

१. "(दुसर्‍यांचे) मन बदला, (त्यांचे) शरीर अनुसरण करेल (चेंज द माईंड, बॉडी विल फॉलो)."

२. "त्यात माझा काय फायदा ? (व्हॉट इज इन इट फॉर मी ?)" याचे सकारात्मक उत्तर देऊ शकलात तर लोकांची समजूत घालायला इतर कोणत्याही पुराव्याची जरूर पडत नाही.

माणूस सारासार विवेकापेक्षा (तर्कप्रामाण्यापेक्षा) जास्त हितसंबंधांवर अवलंबून वागतो, याची चपखल उदाहरणे पावलो-पावली दिसतात, हे काय फार मोठे गुपित आहे काय ? ;) :)

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 9:45 pm | मिल्टन

सुंदर प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब.

तुम्ही प्रतिसादाच्या पहिल्या भागात माणूस रॅशनल असतो या गृहितकावरचे सगळे आक्षेप (उदाहरणार्थ अपूर्ण माहिती असणे, सर्व आकडेमोड करायची क्षमता नसणे इत्यादी) थोडक्यात मांडले आहेत.

नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात,

असे "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" हेच आपण निर्णय कसे घेतो याचे योग्य मॉडेल आहे. माझ्या माहितीतील कोणीही सगळी युटिलिटीची आकडेमोड करून मग सर्वात जास्त युटिलिटी मिळेल तो निर्णय घेत नाहीत. आणि माझी खात्री आहे की मिपावरील कोणीही अशा गोष्टी करणार्‍या कोणाला ओळखत असेल. याच "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" ला हर्बर्ट सायमन यांनी 'सॅटिसफायसिंग" असे म्हटले. म्हणजे घेतलेला एखादा निर्णय अगदी सर्वोत्तम नसला तरी समाधानकारक असला तरी बहुतांश लोकांना चालण्यासारखे असते. याचे सर्वात चपखल उदाहरण म्हणजे एखाद्याला घर विकायचे असेल आणि जास्तीतजास्त १ कोटी येतील अशी अपेक्षा असेल आणि एक ग्राहक १ कोटी ५ लाख द्यायला तयार झाला तर ते घर विकण्याकडेच मालकाचा कल असेल. आता आणखी किंमत देणारा कोणी गिर्‍हाईक मिळणार नाही का? मिळेलही कदाचित. रॅशनॅलिटीच्या आकडेमोडीत एक गृहितक आहे की सगळे पर्याय आपल्यापुढे एखाद्या पत्त्याचा डाव उघडावा त्याप्रमाणे एकाच वेळी आहेत. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसते. सगळे गिर्‍हाईक एकाच वेळी येणार नाहीत (हा काही लिलाव नाही). त्यामुळे एकाला घर विकायचे नाकारले तर दुसरा गिर्‍हाईक विचारात घेतला जाणार. अशा प्रसंगी कोणी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार झाले तर त्यालाच घर विकण्याकडे कल असतो. (घर विकायच्या प्रक्रीयेत आपल्याला नक्की किती पैसे मिळू शकतील ही अपेक्षा बदलली-- म्हणजे १ कोटीवरून १ कोटी १० लाख झाली तर त्यापेक्षा जास्त पैसे देऊ इच्छिणार्‍या गिर्‍हाईकाला घर विकले जाईल).

देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत).

रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत. बहुतांश वेळा "नज" झालेल्या माणसाला आपण "नज" झाले आहोत हे लक्षातही येत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2017 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत.

मी वर 'नज' बाबत केवळ रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या वित्तव्यवस्थेतील सकारात्मक उपयोगात बद्दल लिहित नव्हतो. तर 'नज' आदीम कालापासून मानवी जीवनातल्या सर्व अंगांना स्पर्श करून आहे, असे मला म्हणायचे आहे.

नजिंग ही, आदिम कालापासून सर्वसाधारण माणसाच्या जीवनात एक सर्वसाधारणपणे वापरली जाणारी पद्धत आहे... आणि त्यात इतरांनी आपले म्हणणे मानावे यासाठी "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" या मानवाच्या मूळ प्रवृत्तींचा उघड-छुपा उपयोग केला जातो. ही दुधारी तलवार आहे... ती कधी इतरांनी योग्य निर्णय घ्यावा यासाठी वापरली जाते (उपकारक), तर इतर वेळेस स्वार्थ साधण्यासाठी. हे जेवढे गुप्त ठेवता येईल तितका तिचा परिणामकारकपणा जास्त. यासंबंधिचे एक विनोदी (पण सत्य) वचन असे, "Expert motivator is the one, who will ask you to go to hell, in such a way that, you start looking forward to the journey !"

***************

"बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" : हे बनवतानाही 'माणूस / संस्था' यांच्या "मिशन-व्हिजन" यांच्या संबंधात सद्य परिस्थितीत असणारे "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" हे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असतेच. थोडक्यात, "भीती आणि लोभ" यांच्याविना मानवी निर्णय केवळ सैद्धांतिक जगातच (theoretical world) शक्य आहे. :)

चौकटराजा's picture

15 Oct 2017 - 3:59 pm | चौकटराजा

मानव विकसित होत असल्यापासून एक माणूस दुसर्‍यावर फिअर व ग्रीड चा प्रयोग करीत असतो. बाय पास केली नाहीत तर आताच पेशंट पाच मिनिटात मरू शकतो व आमच्या एक एल एम मधे सामील वा कामाला लागा एकदिवस तुम्हाला इंडिका मिळेल बक्षिस ही दोन उदाहरणे .

सुबोध खरे's picture

16 Oct 2017 - 1:17 pm | सुबोध खरे

आहार निद्रा भय आणि मैथुन या चार कोणत्याही प्राण्याच्या अंत:प्रेरणा ( instincts) आहेत. यावर बहुसंख्य विपणनाचे डावपेच अवलंबून आहेत (marketing strategy).
आहार --हॉटेलं, विविध खाद्यवस्तू त्या तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल किंवा
निद्रा -- सुखाची झोप येईल यासाठी लागणाऱ्या वस्तू उदा गाद्या, तेलं, कपडे, हा कसा आणि किती आकर्षक तर्हेने मांडला कि विकता येतो हे सर्व मार्केटिंगच्या लोकांना माहिती आहे.
भय -- विविध तर्हेचे आरोग्याचे चेक अप पासून गाड्यांचे आणि उपकरणांचे ऍन्युअल मेन्टेनन्स अनिसर्व्हिसिंग, विविध विमा कंपन्या आणि त्यांचे विम्याचे प्लॅन, वास्तू, फेंगशुई, नारायण नागबळी, ग्रहशांती, गर्भसंस्कार पासून ऑटो कॉप, कुलुपे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स सिस्टिम्स या सर्व वस्तू भय या भावनेला हात घालून विकल्या जातात.
राहिले मैथुन --sex always sells. विविध तर्हेची औषधे, कायाकल्प, चिर तारुण्य मिळवण्यासाठी , जपण्यासाठी असणारी औषधे, उपाय या उघडपणे दिसणाऱ्या गोष्टी आहेत. बायका सुंदर दिसण्यासाठी आणि पुरुष रुबाबदार दिसण्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टी या सुद्धा अशाच छुप्या अंतस्थ हेतूंनी विकत घेतल्या जातात.
हा विषय फार मोठा गहन आणि खोल आहे.

वैयक्तीक रित्या माणुस रॅशनल नसतो, पण समुहानी आणि एका मोठ्या कालावधी मधे माणुस* रॅशनल असतो. मार्केट एफिसियंट नसते पण मोठ्या कालावधीत मीन मात्र एफिशियंट मार्केट चा असतो,

* : प्रगत देशांसाठी हे लागु आहे. पण ह्याला एक मोठा अपवाद आहे, पण ते अवांतर होइल.

मिल्टन's picture

11 Oct 2017 - 11:05 pm | मिल्टन

वैयक्तीक रित्या माणुस रॅशनल नसतो, पण समुहानी आणि एका मोठ्या कालावधी मधे माणुस* रॅशनल असतो.

हो बरोबर. याची फायनान्शिअल मार्केटसंदर्भातील कारणमिमांसा अशी की जे कोणी irrational लोक असतात ते रॅन्डमली ट्रेड करतात. त्यामुळे काही शेअर विकत घेतील तर काही तोच शेअर विकतील. त्यामुळे या दोन बाजू एकमेकांना कॅन्सल करतात आणि समुह म्हणून रॅशनॅलिटी शिल्लक राहते. एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस पूर्ण गंडलेले नाही आणि त्याच्या यशस्वीतेचे जेवढे काही पुरावे मिळाले आहेत त्यामागे हे कारण असावे असे मला वाटते.

याला अपवाद म्हणजे 'मेंढरांसारखे वागायची' (हर्ड बिहेव्हिअर) प्रवृत्ती काही परिस्थितीत निर्माण होते हे आहे का? उदाहरणार्थ २००७-०८ चे आर्थिक संकट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावे. सुरवातीला काही इन्व्हेस्टर्स (अर्थातच संस्था, व्यक्ती नव्हे) सी.डी.ओ घेत आहेत म्हणून ते इतरांनी घेणे, त्यात नक्की जोखीम काय याकडे लक्ष न देणे, आणि सगळा बुडबुडा फुटायची वेळ आल्यावर आपले पैसे बुडतील या भितीने नॉर्दन रॉक या इंग्लंडमधील बँकेवर रन होणे या सगळ्या गोष्टी त्याचे उदाहरण आहेत आणि अर्थातच हे रॅशनल वागण्याचे लक्षण नक्कीच नाही. यातून झाले असे की बिअर स्टर्न किंवा लेहमन ब्रदर्स कोसळायच्या आधी काही महिने अशा घातक सी.डी.ओ मध्ये गुंतवणुक नसलेली नॉर्दन रॉक बँक विनाकारण बुडली हा दैवदुर्विलास.

वकील साहेब's picture

10 Oct 2017 - 9:16 pm | वकील साहेब

लेख आवडला. धन्यवाद

मिल्टन's picture

10 Oct 2017 - 10:49 pm | मिल्टन

या चर्चेत एक प्रश्न येईल असे वाटले होते. तो प्रश्न म्हणजे जर का माणूस रॅशनल आहे हे मुळातले गृहितकच चुकीचे असेल तर त्यावर आधारीत असलेले निओक्लासिकल इकॉनॉमिक्स पूर्णच बोगस आहे का? तर तसे नक्कीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की माणूस रॅशनल आहे या गृहितकावर कळत-नकळतपणे अगदी अ‍ॅडम स्मिथच्या नंतरच्या काळापासून सगळा डोलारा आधारीत होता. ते गृहितक चुकीचे आहे हे संशोधना अंती बर्‍यापैकी सिध्द झाले.पण तरीही या निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने केलेली भाकिते बर्‍यापैकी बरोबरही आली आहेत. उदाहरणार्थ किंमत वाढल्यास मागणी कमी होणे आणि पुरवठा वाढणे हे निरीक्षण बर्‍याच अंशी योग्यच आहे. तसेच निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणजे नुसती रॅशनॅलिटी नाही. तर त्या निओक्लासिकल इकॉनॉमिक्समधून निर्माण झालेले उजव्या बाजूचे विचार आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सचा विचार करता नक्की कोणत्या प्रकारची धोरणे ठेवावीत ही गोष्ट सुध्दा. जगात डाव्या राजवटी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या (खुद्द रशियात ७०-७५ वर्षात तर पूर्व युरोपात ५० वर्षाच्या आत) पण बर्‍यापैकी उजव्या राजवटी मात्र अनेक शतकांपासून टिकल्या आहेत ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. तसेच एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस म्हणते की शेअरच्या किंमती नवीन माहिती आली की ताबडतोब बदलतात. हे हायपोथिसिसही अमेरिकन शेअरबाजारात अनेक प्रसंगांमध्ये योग्य आहे असे आकडेवारी सांगते.

म्हणजे गंमत बघा की मुळातले गृहितक चुकीचे असले तरी भाकिते मात्र बर्‍याच वेळी बर्‍यापैकी अचूक आली . हे का होते? भौतिकशास्त्रातले उदाहरण घ्यायचे तर मॉडेल्समध्ये घर्षण नसणे वगैरे गृहितके असतातच. तरीही त्यातून काढलेली फोर्सची वगैरे भाकिते अगदी १००% नाही तरी बर्‍यापैकी योग्य असतात. तसेच काहीसे निओक्लासिकल इकॉनॉमिक्सविषयीही.

जर का रॅशनॅलिटीच्या गृहितकामुळे सगळाच प्रकार गंडलेला असता तर एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस मांडणार्‍या युजिन फामांना अगदी २०१३ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले नसते. यातही एक गंमत लक्षात घ्यायला हवी. २०१३ मध्ये एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस मांडणार्‍या युजिन फामांबरोबरच ते नक्की कोणत्या परिस्थितीत अयोग्य मॉडेल आहे हे म्हणणे मांडणार्‍या रॉबर्ट शिलरनाही नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्याचे कारण दोघांच्याही कामातून त्या क्षेत्रात मूलभूत नवे ज्ञान निर्माण झाले.

तरीही मग बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्ससारखी इतर मॉडेल का विचारात घ्यायची? याचे कारण कोणतीही थिअरी परिपूर्ण नसते. जर एखाद्या मॉडेलमधील काही कमकुवत दुवे दुरूस्त करता येत असतील तर त्यातून कदाचित प्रत्यक्ष जगात नक्की काय चालू आहे हे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीने कळेल. म्हणूनच या रॅशनिलिटीच्या बर्‍याच अंशी चुकीच्या गृहितकाने आभाळ कोसळत नसले तरी असे कमकुवत दुवे जर दुरूस्त करायचा प्रयत्न होत असेल तर तो करायलाच हवा. पण अर्थशास्त्रासारख्या समाजशास्त्राची एक मर्यादा आहे. अशी मर्यादा भौतिकशास्त्रासारख्या शास्त्राला नाही. समजा एखाद्या गोष्टीवर तपमानाचा नक्की काय परिणाम होतो हे शोधून काढायचे असेल तर प्रयोगशाळेत वेगवेगळ्या पातळींवर तपमान स्थिर ठेऊन वेगवेगळ्या तपमानात नक्की काय परिणाम होतो हे तपासून बघता येते. पण तसे 'कंट्रोल्ड प्रयोग' सामाजिक शास्त्रांमध्ये करता येत नाहीत.

दीपक११७७'s picture

11 Oct 2017 - 12:15 pm | दीपक११७७

माणूस rational च की irrational च आहे हे एकाच वाक्यात सर्रास पणे शिक्का मारुन ठरवणेच अश्यक्य आहे, Human behavior is some time rational and some time irrational due to two reasons, (म्हणुन rational आणि irrational दोन्ही थेअरी मानवाला लागु होतात.)

first :-
मुळात माणुस एखादा निर्णय घेतो तेंव्हा त्यात दोन गोष्टी समाविष्ट असतात एक म्हणजे बुध्दी आणि दुसर मन (इच्छा/ आवड)

उदा:- १. दारु पिणे, पिझ्झा खाणे वाईट बुध्दी ला पटते पण मन (इच्छा/ आवड) खायला-प्यायला लावते. खाल्ले-प्याले तर irrational , नाही खाल्ले-प्याले तर rational
२. मन (इच्छा/ आवड) खुप वाटतं स्पोर्ट बाईक्/कार घ्यावी पण बुध्दी सांगते price EMI, average -resell value ई. मग त्याप्रमाणे rational निर्णय घेतला जातो , जर मन (इच्छा/ आवड)( अरे मग मज्जा कधी करायची) प्रमाणे निर्णय घेतला तर irrational... कर्जाचे डोंगर...

म्हणजे कायतर कधी बुध्दी तर कधी मन (इच्छा/ आवड) यांच्या दबावात घेतलेला निर्णय हा ब-याचदा अणुक्रमे rational , irrational ठरत असतो

second:-

दुसर म्हणजे काळ (सोप्याभाषेत नशीब)

आज घेतलेला rational निर्णय काळाच्या ओघात पुढे irrational ठरणे

किंवा

आज घेतलेला irrational निर्णय काळाच्या ओघात पुढे rational ठरणे

याच सोप उदाहरण म्हणजे (not for each and every individual)

उदा:- 1994-1997 ज्यांनी engineering केलं त्याच काळातील काही जणांनी कुठेच admission मिळत नाही म्हणुन BA-B.Sc. केलं पण पुढे lecturer-govt service (यात केवळ typist म्हणुन सुध्दा कोर्टात लगलेले ई. ई.) ला लागले, ते जेंव्हा एकमेकांचा विचार करतात तेंव्हा वरील rational की irrational चा अनुभव करतात

परिणामी rational आणि irrational ह्या दोन्ही थेअरी मानवाला लागु पडतातं आणि कसोटीवर ख-यापण उतरता .

मॉल मध्ये तुम्ही डेली निड कुठेही ठेवा केवळ तेच घेऊन जाणरे सुध्दा आहेत आणि केवळ डेली निड घेण्यासाठी म्हणुन आलेले पण इतर वस्तुही दिसतात म्हणुन घेणारे सुध्दा आहेत.

मिल्टन's picture

11 Oct 2017 - 11:08 pm | मिल्टन

माणूस rational च की irrational च आहे हे एकाच वाक्यात सर्रास पणे शिक्का मारुन ठरवणेच अश्यक्य आहे,

हो बरोबर. पण मुद्दा हा की निओक्लासिकल मॉडेलमध्ये गृहित धरले आहे तितक्या प्रमाणावर माणूस रॅशनल नक्कीच नाही.

दीपक११७७'s picture

12 Oct 2017 - 12:00 pm | दीपक११७७

दोन्ही theory equally correct. एकाच नाण्यच्या दोन बाजु

Anand More's picture

10 Oct 2017 - 11:47 pm | Anand More

धन्यवाद.

विशाखा पाटील's picture

11 Oct 2017 - 9:48 am | विशाखा पाटील

लेख आवडला.

विकास's picture

12 Oct 2017 - 12:10 am | विकास

आत्ताच वाचनात आल्याप्रमाणे, थेलरना (अथवा आधीच्या कुठल्याच पारीतोषिक मिळालेल्या) अर्थतज्ञांना नोबेल पारीतोषिक मिळालेले नाही! :)

नोबेल पारीतोषिकांच्या संस्थळावर अर्थशास्त्राच्या पारीतोषिकच्या पानावर या संदर्भात एक मथळा आहे, Not a Nobel Prize. त्यानुसार, इंग्रजीतलेच चोप्य्पस्ते करतो: The Prize in Economic Sciences is not a Nobel Prize. In 1968, Sveriges Riksbank (Sweden's central bank) instituted "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel", and it has since been awarded by the Royal Swedish Academy of Sciences according to the same principles as for the Nobel Prizes that have been awarded since 1901. The first Prize in Economic Sciences was awarded to Ragnar Frisch and Jan Tinbergen in 1969.

अमुक-तमुकचे नोबेल नॉमिनेशन झाले आहे असे कायम ऐकतो. किंबहूना एका नामवंत अर्थतज्ञाच्या संदर्भात असे नॉमिनेशन झाल्याचे ९०च्या दशकात बर्‍याचदा ऐकले होते. ;) पण नोबेलच्या संस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ही सर्व पद्धती खूप गोपनीय असते आणि नॉमिनेट झालेल्यांची नावे किमान ५० वर्षे गोपनीयच राहतात!

मदनबाण's picture

12 Oct 2017 - 12:54 am | मदनबाण

सुंदर लेखन !
आजच रिचर्ड थेलर यांच्या विषयीची बातमी वाचली होती, संदर्भ म्हणुन इथे ती देत आहे.
Nobel Economist Thaler Says He's Nervous About Stock Market
“We seem to be living in the riskiest moment of our lives, and yet the stock market seems to be napping,” Thaler said, speaking by phone on Bloomberg TV. “I admit to not understanding it.”

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- US sends SECOND nuclear warship and 7,500 marines within strike range of North Korea

पैसा's picture

12 Oct 2017 - 1:26 am | पैसा

प्रतिसादहीआवडले

राघवेंद्र's picture

12 Oct 2017 - 2:05 am | राघवेंद्र

गॅरी भाऊ लेख आवडला!!!

नोबेल कमिटीने गॅरी भाऊना लिहिते केल्याबद्दल जाहीर आभार !!!

असेच लिहिते रहा

गामा पैलवान's picture

12 Oct 2017 - 2:48 am | गामा पैलवान

मिल्टन,

लेख आवडला. आजून येऊ द्या.

माणसाच्या तार्किकतेवर (म्हणजे ऱ्याशन्यालिटीवर) अस्मादिकांनी कोणे एके काळी बरंच चिंतन केलंय. अगदी दारू पिऊन सामूहिक चिंतन देखील केलंय. अशा मंथनमालिकेतनं निर्माण झालेलं रत्न प्रस्तुत करतो.

त्याचं काय आहे की तार्किकता ही एक अत्यंत फसवी संज्ञा आहे. ही मुळातून निरर्थक असते. हिला अर्थ प्राप्त करून देणारं रसामृत आहे ते माणसाचं उद्दिष्ट. अमुक एक कृती वा पर्याय तार्किक आहे की नाही हे तपासण्यासाठी पार्श्वभूमीवर उद्दिष्टाचा पट हवाच. याचा दुसरा अर्थ असा की आपलं उद्दिष्ट पक्कं असेल तर तर्क त्याच्या भोवती बांधता येतो. Logic should be constructed around aim. तर्काने हेत्वनुरूप आकार घेतला पाहिजे. नुसता तर्क कामाचा नाही.

जर तार्किक विचार केला असता तर तानाजी कधीच सिंहगडाचा कडा चढू शकला नसता. तर्कबुद्धीने विचार करू पाहता शिवाजीमहाराज पन्हाळ्यावरून निघूच शकले नसते. पण एकदा का निघायचं ठामपणे ठरलं, की मग तर्काने आपली भूमिका चोख बजावली. तर्काची भूमिका म्हणजे शिवा काशीदची तयारी, मावळ्यांच्या दोन तुकड्या करून एकीने खिंड अडवणे तर दुसरीने विशाळगडाकडे कूच करणे, महाराजांनी तोफांनी बाजीप्रभूंना सांगावा धाडणे, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

त्याचं काय आहे की तार्किकता ही एक अत्यंत फसवी संज्ञा आहे. ही मुळातून निरर्थक असते. हिला अर्थ प्राप्त करून देणारं रसामृत आहे ते माणसाचं उद्दिष्ट. अमुक एक कृती वा पर्याय तार्किक आहे की नाही हे तपासण्यासाठी पार्श्वभूमीवर उद्दिष्टाचा पट हवाच.

पटलं..
पण मग उद्दिष्ट साध्य झालं तरंच कृती तार्किक?

गंम्बा's picture

12 Oct 2017 - 10:04 am | गंम्बा

गा.पै.

खरे तर सिंहगडाची चढाईचा प्लॅन आणि विशाळगडावरुन सुटकेचा प्लॅन ही तर्कबुद्धीचीच ( लॉजिकल विचारांची ) उदाहरणे आहेत.

मिहिर's picture

12 Oct 2017 - 7:08 am | मिहिर

उत्तम लेख. आवडला.

प्राची अश्विनी's picture

12 Oct 2017 - 9:52 am | प्राची अश्विनी

लेख अतिशय आवडला.

अभिजीत अवलिया's picture

12 Oct 2017 - 9:59 am | अभिजीत अवलिया

उत्तम लेख आणि प्रतिसाद देखील.

गंम्बा,

खरे तर सिंहगडाची चढाईचा प्लॅन आणि विशाळगडावरुन सुटकेचा प्लॅन ही तर्कबुद्धीचीच ( लॉजिकल विचारांची ) उदाहरणे आहेत.

प्रस्तुत उदाहरणांतली तुम्ही म्हणता ती तर्कबुद्धी एका धडाडीच्या उद्दिष्टाभोवती लपेटलेली आहे. अन्यथा हिला काहीच अर्थ नव्हता.

उद्दिष्ट ठरवणे ही एक तार्किक प्रक्रिया असेलंच याचीही खात्री नाही. या धाग्यात अर्थशास्त्राची चर्चा चालू आहे. या शास्त्राच्या गृहितकानुसार प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट स्वत:चा पैसा वाढवणे आहे. मात्र सरसकटरीत्या हे उद्दिष्ट असेलंच याची खात्री नाही.

नेमक्या याच कारणासाठी मी आधुनिक अर्थशास्त्रास अर्धशास्त्र म्हणतो. Economics is half science.

आ.न.,
-गा.पै.

वि.सू. : half म्हणजे टाकाऊ नव्हे.

मिल्टन's picture

12 Oct 2017 - 5:20 pm | मिल्टन

या शास्त्राच्या गृहितकानुसार प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट स्वत:चा पैसा वाढवणे आहे.

हे तुम्ही नक्की कुठे वाचलेत हे समजू शकेल का?

गामा पैलवान's picture

12 Oct 2017 - 5:43 pm | गामा पैलवान

पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?
-गा.पै.

मिल्टन's picture

12 Oct 2017 - 5:55 pm | मिल्टन

पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?

हे तुमचे गृहितक झाले. पैशामुळे समाधान मिळत असले तरी पैशामुळेच समाधान मिळते असे नाही. आणि अगदी क्लासिकल इकॉनॉमिक्सही केवळ युटिलिटी असाच शब्दप्रयोग करते. ती युटिलिटी (समाधान) पैसा किंवा अमुक एका गोष्टीतूनच यायला पाहिजे असे गृहितक अजिबात नाही. एकाच गोष्टीमधून दोघांना मिळणारी युटिलिटी वेगळी असू शकेल.

तुम्ही बहुदा 'बजेट लाईन' आणि 'युटीलीटी लाईन' मध्ये गल्लत करत आहात. क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या गृहितकांप्रमाणे आपल्याकडे जितके पैसे आहेत (आपले बजेट) त्यात जास्तीत जास्त युटिलिटी म्हणजे समाधान देणारा पर्याय लोक निवडतात. पण मुळातली युटिलिटी नक्की कशातून येईल हे त्या माणसावर सोडलेले असते. वरकरणी या मांडणीत चुकीचे असे काहीच नाही. फक्त युटिलिटी मोजता न येणे, सगळी माहिती नसणे, युटिलीटीची सगळी आकडेमोड (जर अशी आकडेमोड करता आलीच तर) सगळ्यांनाच करता येईल असे नाही वगैरे वगैरे आक्षेप निघाले. कारण या सगळ्या गोष्टी करता यायला माणूस कोणीतरी सुपरनॅचरल हवा (ज्याला काही लेखकांनी 'इकॉन' म्हटले आहे). पण माणूस हा 'इकॉन' नसतो तर सामान्य 'ह्युमन बिईंग' असतो म्हणून हे सगळे युटिलिटीचे मॉडेल आपण नक्की निर्णय कसे घेतो त्याचे योग्य मॉडेल नाही हा आक्षेप आहे आणि त्यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले.

गामा पैलवान's picture

12 Oct 2017 - 9:16 pm | गामा पैलवान

मिल्टन,

अर्थशास्त्राचा उपयोग नक्की कोण करतो आणि कोणासाठी करतो? सत्ताधारी करतात का? माझं पैशाचं गृहीतक मलातरी बरोबर वाटतं कारण शासनाच्या आर्थिक धोरणांत सतत पैसे येत असतात.

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

12 Oct 2017 - 9:56 pm | मिल्टन

शासनाच्या धोरणात पैशाचा उल्लेख असतो कारण पैसा हे पाहिजे त्या गोष्टी साध्य करायचे साधन आहे. सरकारला कोणत्या गोष्टी हव्या असतात (किंवा हव्या असणे अपेक्षित आहे)? एक उद्देश हा की देशात लोकांना काही गोष्टी (भारतासारख्या देशात या काही गोष्टी म्हणजे घर, पाणी इत्यादी मूलभूत गोष्टी असतील तर विकसित देशांमध्ये या 'काही गोष्टींची' व्याख्या बदलेल) मिळायला हव्यात. त्या काही गोष्टी मिळवायच्या असतील तर मग तितक्या प्रमाणात नोकर्‍या लोकांना हव्यात, लोकांची क्रयशक्ती वाढायला हवी. त्या नोकर्‍या कशा निर्माण करायच्या? एक तर सरकारनेच काही उद्योगात उतरून किंवा सरकारने स्वतः न उतरता खाजगी उद्योग उतरतील अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून. सरकार स्वतः उतरले तर नक्की किती प्रमाणात उतरावे हे ठरवायचे कसे? तर त्याचे एकक पैसा. खाजगी उद्योगांना पाहिजे ती परिस्थिती निर्माण करायची असेल तर परत एकदा त्या पैशाची किंमत (व्याजाचे दर) किंवा त्या पैशाचा पुरवठा (मनी सप्लाय) किती ते ठरवून. म्हणजे पैसा हे या सगळ्या गोष्टी मोजायचे एकक आहे. पैसा हे साध्य नाही पण पैसा नसेल तर काहीच मोजता येणार नाही. म्हणून शासनाच्या धोरणात पैशाचा उल्लेख असतो. नुसता पैसा हे साध्य नाही हे हिटलर सत्तेवर येण्यापूर्वी जर्मनीतील किंवा काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वेमध्ये आलेल्या महाप्रचंड महागाई या उदाहरणावरून समजेलच.

ब्रॉडली, अर्थशास्त्र हे निर्णयशास्त्र आहे. काही गोष्टी साध्य करायला सरकारने कसे निर्णय घ्यावेत हे सरकारच्या पातळीवर तर आपल्याकडे मर्यादित साधने (परत एकदा पैसे) आहेत आणि त्या मर्यादित साधनातून आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी कोणत्या प्रमाणात घ्याव्यात हे निर्णय वैयक्तिक पातळीवर घ्यायचे. हे वैयक्तिक पातळीवरील निर्णय 'मायक्रोइकॉनॉमिक्स' मध्ये तर पूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील निर्णय 'मॅक्रोइकॉनॉमिक्स' मध्ये अभ्यासले जातात. बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सचे नाव ऐकण्यापूर्वीच्या काळात मला 'मॅक्रोइकॉनॉमिक्स' जास्त आवडत असे पण आता 'मायक्रोइकॉनॉमिक्स' जास्त आवडते. या लेखात उल्लेख केलेल्या गोष्टी (युटिलिटी वगैरे) मायक्रोइकॉनॉमिक्सशी संबंधित आहेत. बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स मॅक्रोमध्ये वापरता येईल का? तर येईल. किंबहुना येते. अमेरिकन फेडच्या गव्हर्नर जॅनेट येलेन यांचे पती जॉर्ज अ‍ॅकरलॉफ (२००१ चे नोबेल पुरस्कारविजेते) यांनी या क्षेत्रात काम केले आहे. ते नक्की काय आहे हे मला याक्षणी माहित नाही कारण त्याविषयी काहीही वाचलेले नाही. पण बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स मॅक्रोमध्येही वापरले जाते हे नक्कीच.

थॉर माणूस's picture

12 Oct 2017 - 10:34 pm | थॉर माणूस

ज्याव्यक्तीविषयी धागा आहे त्याने याच विषयावर (युटीलिटी म्हणजे काय आणि नज त्या अनुषंगाने कसे उपयुक्त आहे) बरेच काम केले आहे.

या निमित्ताने उत्तम चर्चा चालू आहे त्याबद्दल धन्यवाद.

मिल्टन's picture

12 Oct 2017 - 10:31 pm | मिल्टन

तसेच आपण सगळेच निर्णय घेताना कळत-नकळत नुसत्या पैशाचा (किंमत) विचार करत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा विचार करत असतो. कॉफीच प्यायची झाली तर बाहेर टपरीवर ५-१० रूपयात मिळू शकेल. पण तरीही आपण स्टारबक्ससारख्या ठिकाणी जातो आणि त्याच कॉफीसाठी १५०-२०० रूपये द्यायला तयार होतो. म्हणजे आपल्याला किंमतीबरोबरच इतरही काही गोष्टी महत्वाच्या असतात.त्यात आपली हौस, आरामात एसीमध्ये बसून कॉफी पिता येणे, चव, 'स्टेटस' आणि इतरही अनेक गोष्टी त्यात असतात. जर का पैसा हा एकच घटक निर्णय घेताना असता तर आपण सगळ्यांनी प्रत्येकवेळी सर्वात स्वस्त वस्तूच खरेदी केली असती. पण तसे होत नाही.

आपण निर्णय घेताना नुसता पैसाच नाही तर इतर काही गोष्टींचाही विचार करतो यावर रिचर्ड थेलर यांचा The ultimatum game हा पेपर जबरदस्त आहे. अल्टीमेटम गेम या खेळात दोन खेळाडू (अ आणि ब) असतात. 'अ' कडे सुरवातीला १० डॉलर दिलेले असतात. त्यातील काही रक्कम त्याने 'ब' ला द्यायची ऑफर द्यायची. जर 'ब' ला ती ऑफर मान्य झाली तर 'ब' तितकी रक्कम स्वतःकडे ठेवेल आणि 'अ' कडे १० डॉलरमधून 'ब' ला दिलेले पैसे सोडून उरलेली रक्कम राहिल. पण जर 'ब' ला ती रक्कम कमी वाटली तर तो ती ऑफर नाकारू शकतो. जर 'ब' ने ती ऑफर नाकारली तर दोघांनाही एक सेंटही मिळणार नाही असे या खेळाचे नियम आहेत. जर पैसा हा एकच घटक निर्णय घेताना असता तर 'ब' ने अगदी १ सेंटही मान्य करायला हवा. कारण त्याने ती ऑफर नाकारल्यास त्याला (आणि 'अ' ला पण) काहीही मिळणार नाही. आणि काहीही न मिळण्यापेक्षा १ सेंट मिळणे चांगलेच नाही का? पण या खेळातील निकाल बघता असे कळते की साधारण ५ डॉलरच्या आसपास रक्कम 'अ' ने देणे कबूल केले तरच बर्‍याचशा 'ब' नी ती ऑफर मान्य केली . पण जर 'अ' ने बरीच कमी रक्कम दिली तर ती 'ब' ची भूमिका करणार्‍या बहुतेकांनी नाकारली.

म्हणजेच काय की पैशाबरोबरच आपल्याला योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे अशीही अपेक्षा लोकांची असते आणि 'अ' ने कमी ऑफर केली तर आपल्याला योग्य ती वागणूक मिळत नाही असा त्याचा अर्थ 'ब' काढतो आणि ती ऑफर नाकारतो--- ही ऑफर नाकारून त्याचेही नुकसान होणार आहे हे माहित असूनही. जर 'ब' हा 'रॅशनल' असेल तर मात्र त्याने १ सेंटही मान्य करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही.

रिचर्ड थेलर यांनी या जर्नल ऑफ इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हज या जर्नलमध्ये १९८० च्या दशकात साधारण २० च्या आसपास लागोपाठच्या अंकांमध्ये असेच वेगवेगळे विषयांवर इंटरेस्टींग पेपर लिहिले होते. त्यातला हा एक पेपर आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2017 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?

पैसा आणि समाधान यांचा तडक (डायरेक्टली प्रपोर्शनल) संबंध (असलाच तर) अत्यंत कमी वेळा असतो.

मानवी जीवनात पैशाचे एकदिशा नकारात्मक महत्व नक्की आहे... पुरेसा पैसा नसला तर दु:ख/असमाधान बहुदा असतेच, मात्र, भरपूर पैसा असला तर सुख/समाधान असतेच असे नाही... या दुसर्‍या मनःस्थितीचे कारण माणसाची मुलभूत मानसिकता आहे, जिच्यामुळे जसजसा पैसा वाढत जातो तसतसे त्याच्या सुख-समाधानाच्या अपेक्षा क्षितिजाप्रमाणे विस्तारत (दूरदूर जात) राहतात. :)

गामा पैलवान's picture

13 Oct 2017 - 1:22 am | गामा पैलवान

मिल्टन,

हे सगळं अर्थशास्त्रापेक्षा सारीपाटशास्त्र (= गेम थियरी) वाटतं. त्याचा संबंध अर्थशास्त्राशी जोडणं कितपत व्यवहार्य असेल अशी शंका आहे.

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

13 Oct 2017 - 10:47 pm | मिल्टन

हे सगळं अर्थशास्त्रापेक्षा सारीपाटशास्त्र (= गेम थियरी) वाटतं. त्याचा संबंध अर्थशास्त्राशी जोडणं कितपत व्यवहार्य असेल अशी शंका आहे.

गेम थिअरी हा अर्थशास्त्राचाच भाग आहे. एकूणच अर्थशास्त्र म्हणजे निर्णयशास्त्र आहे-- वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत/घेतले जातात याचे शास्त्र. यात गेम थिअरी हा एका विशिष्ट परिस्थितीतील निर्णयप्रक्रियेची थिअरी आहे. ती विशिष्ट परिस्थिती म्हणजे आपण एखादी कृती करत असू त्यावरून समोरचा माणूस त्याची कृती करेल आणि आपल्या दोघांच्याही कृतीचा एकमेकांवर परिणाम होईल पण आपल्या कृतीला समोरचा काय उत्तर देणार हे आपल्याला माहित नसते तेव्हा.

उदाहरणार्थ समजा ५ मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. आपल्या कंपनीला खर्च जास्त होतो म्हणून तोटा व्हायची वेळ आली म्हणून जर दर वाढवायचे आहेत असे समजू. पण यावर इतर कंपन्या नक्की कशा प्रतिक्रिया देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. जर इतर कंपन्यांना पण दर वाढवायची ही योग्य वेळ वाटली तर ठिक. पण इतर कंपन्यांनी दर वाढवले नाहीत तर? त्यातून होईल असे की आपण आपले ग्राहकही गमावून बसू कारण आपले दर इतर कंपन्यांपेक्षा जास्त असतील आणि त्यातून आपल्या अडचणी वाढतील. इतर कंपन्या काय करतील हे आज सांगता येणार नाही. म्हणजे आपल्या कृतीचा समोरच्यावर आणि समोरच्याच्या कृतीचा आपल्यावर परिणाम होणार आहे पण समोरचा नक्की काय करणार आहे याची कल्पना आपल्याला नाही अशा परिस्थितीत नक्की कसा निर्णय घ्यावा याचा अभ्यास 'गेम थिअरी' मध्ये केला जातो.

आपण वाण्याच्या दुकानात सामान घ्यायला गेलो तर तिथे गेम थिअरी लागू होणार नाही. कारण आपल्याकडे आहे त्या किंमतीला वस्तू विकत घेणे किंवा न घेणे हे दोनच पर्याय असतील. आपल्या कृतीमुळे समोरच्यावर आणि समोरच्याच्या कृतीमुळे आपल्यावर परिणाम होणार असली भानगड तिथे नाही. हा विषय पण प्रचंड इंटरेस्टींग असेल हे नक्कीच. गेम थिअरी या विषयातले प्राध्यापक अविनाश दिक्षित हे 'दादा' आहेत.

विकास's picture

13 Oct 2017 - 4:52 am | विकास

पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे?

सर्वप्रथम डिसक्लेमरः पैसे कमवू नका अथवा पैशाची गरज नाही असे म्हणायचा उद्देश नाही! ;)

इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे: Money buys comforts, not happiness

त्या व्यतिरिक्त खालचे चित्र बरेच काही असेच सांगते...

Money buys comfort

सिंथेटिक जिनियस's picture

12 Oct 2017 - 10:52 pm | सिंथेटिक जिनियस

लेख वाचला ,पण कळला नाही.ज्याअर्थी कळला नाही त्याअर्थी चांगलाच लेख असावा.

राही's picture

13 Oct 2017 - 8:11 am | राही

अतिशय सुंदर लेख. चवीचवीने वाचला. एरवी क्लिष्ट वाटला असता असा विषय सोप्या भाषेत चान समजावून सांगितला आहे.
demonatisation च्या प्रथम वर्धापनदिनी येणार असलेल्या आपल्या सविस्तर लेखाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या विषयावर टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक दिलीप सोमण यांचा edX वरील कोर्स इथे आहे. या कोर्समध्ये नज विषयी अधिक माहिती मिळेल.

मिल्टन,

एकूणच अर्थशास्त्र म्हणजे निर्णयशास्त्र आहे-- वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत/घेतले जातात याचे शास्त्र.

ही फार ढोबळ व्याख्या झाली. अर्थात त्यामुळे काही बिघडत नाही. पण त्यामुळे या शास्त्राची व्याप्ती बरीच वाढते. निर्णय तर प्रत्येक जण सतत घेतंच असतो. मग इकॉनॉमिक्सला नोबेल कशासाठी? जरी सामान्य माणसाला याची सीमा ठाऊक नसली तरी नोबेल पारितोषिक समितीस नक्कीच ठाऊक असावी. अन्यथा नोबेल देणं अवघड होऊन बसायचं.

तर नोबेल निवड समितीने अर्थशास्त्राची व्याप्ती कशी ठरवली असेल याचं कुतूहल आहे.

आ.न.,
-गा.पै.