सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

आठवणीतला घरचा मेवा -१

Primary tabs

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
16 Sep 2017 - 8:08 pm

एकाने ऑफीसमध्ये फुटाणे घेऊन आला होता, चार वाजता खायला. ते विकत आणलेले नव्हते हे स्पष्ट दिसत होते . कोठून भाजून आणले रे ? मी विचारले. सासुरवाडीकडून आलेत , तो म्हणाला . अर्थातच मला पूर्वी कधीतरी आईने केलेल्या अगदी तशाच फुटण्याची आठवण आली . हरभरे, हळद , मीठ घालून रात्री आई हरभरे भिजवायची . सकाळी त्यातले पाणी काढून दुरडीत नितळत ठेवायची . मग थोडे सुकवून चार वाजता पिशवीत बांधून ते भट्टीत भाजायला द्यायची , कोणीच भट्टीत घेऊन जायला मिळाले नाही तर सरळ तव्यावर भाजून घ्यायची . डबाभर फुटाणे तयार , फुटण्याच्या बरोबरीने शेंगदाणे पण खारवले जायचे . आठवडी बाजारातून चिरमुरे आणलेले असायचे . असाच वर्षभराच्या पोहे करण्याचा पण एक कार्यक्रम असायचा . त्यासाठी भात (शिजवलेला नव्हे, तांदळाचे कोंडयासहित दाणे ) भिजवले जायचे . ते हे असेच सकाळी दुरडीत निथळूवुन भट्टीत दिले जायचे . कच्चे का भाजके हे त्या भट्टीवाल्याला बरोबर सांगितले जायचे . कच्चे असतील तर कांदे पोह्यासाठी डब्यात साठवले जात . जे भिजवल्यावर त्याचा लगदा होत नसे तर थोडा वेळच लागे भिजायला . पण पोहे अगदी मस्त सुटे सुटे , आताच्या पोह्यांना थोडे जास्त भिजवले कि लगदा होतो . भाजक्या पोह्यांना मात्र धोतरात बांधून आपटले जाई , त्यातील रेती निघण्यासाठी . राहिलेली कुनगुटं काढून मग चिवडा असायचा . दिवाळीला असेच भात भिजवून , भट्टीत भाजलेल्या पोह्याचा चिवडा असे . ह्यातलं काहीही मूठ मूठ भर खाता येई . पण मूठभरच मिळत एकावेळी .
ह्या फुटाण्यांनी माझ्या आठवणी चांगल्याच उकलल्या आणि आई काय काय बनवायची ते आठवायला लागले . उन्हाळ्यात तर खाण्याची रेलचेल असे . फेब्रुवारी मार्च पासून उन्हाळी कामे चालू व्हायची .त्यात खपली गहू भिजवून ठेवले जात . आता बाजारात ४०० रुपयाचे ५ किलो खपली गहू येतात . असो . खपली गहूच का तर त्याचा कोंडा कमी निघतो म्हणून . तीन चार भिजवायचे . रोज पाणी काढायचे . नंतर चीक काढायचा .इथपर्यंत हे सर्व प्रकरण वासाने नको व्हायचे . घरभर तो आंबूस वास येत राही . चीक काढून तो पातेल्यात ठेवला जाई . चीक काढणे हे प्रकरण फार किचकट असे . ते गहू पाट्यावर उपसून त्याला फोलार फोलार वाटायचे जेणेकरून कोंडा वरती राहील व आतला चीक बाहेर येईल. पुन्हा ते वाटलेलं मिश्रण मोदकपात्रात (स्टीलची चाळणी ) घेऊन त्यावर पाणी ओतून गहू थोडे किवचायचे. राहिलेला कोंडा नीट सुखवून ठेवायचा . त्याच्याही नंतर कोंड्याच्या पापड्या करत कमीत कमी पायलीभर(पाच किलो) गहू भिजवले जातच. निदान अर्धा दिवस हा चीक काढायला लागेच . मग तो चीक निवळायला ठेवला जाई पूर्ण रात्रभर . सकाळी वरचे सर्व पाणी काढून जेवढे सत्व शिल्लक राहील तेवढेच पाणी उकळायला ठेवे. पाणी उकळले कि मीठ टाकून तो चीक हळूहळू ओतणे . नंतर मात्र सुगरणीचा कस लागे . सर्वात अवघड काम म्हणजे चीक हाटणे . अजिबात गाठी झाल्या नाही पाहिजेत . आई घामाघूम होऊन जाई . चीक व्यवस्थित शिजला तर ठीक नाहीतर कुरडयांचे तुकडे पडतात . जास्त घट्ट झाला तर कुरडया पाडायला खूपच जड जाते . नंतर पाटावर धोतर किंवा प्लास्टिक शीट टाकून कुरडया पाडणे . सर्वात मजा वाटीत घेऊन शिजलेला चीक आणि शेंगा खाणे .स्वर्गीय सुख असते ते. आताही त्याची चव तोंडात रेंगाळतीय . तो पाट , खाट जे काय असेल ते उन्हात ठेवून वाळवणे . त्यासाठी राखण बसायचेच म्हणजे दिवसभर हळूहळू सुखत चाललेली कुरडई खाणे . अरे हो , खरवड राहिलीच कि , पातेले रिकामे झाल्यावर खाली राहिलेल्या खरवडीचे सांडगे ते बिनधास्त खाता येत .
तांदळाचे तळणीचे सांडगे , ज्वारीच्या पापड्या , सालपापड्या केल्या जात . कोंड्याच्या पापड्या , उपवासाच्या पापड्या, मुळ्याच्या ताकात घातलेल्या शेंगा असे बरेच काही बनवून ठेवले जाई . पापडाच्या पिठाच्या गोळ्या खायला पण खूप मज्जा येते . टाळ्याला पीठ चिकटले पण त्याची चव ,अहाहा ! ह्या सर्व पिठाची उस्तवार आई घरीच करे . कुरडया , तांदळाचे सांडगे तळूनच खावे लागतात मात्र भातवड्या , पापड्या , पापड मात्र निखाऱ्यावर भाजून शेंगा बरोबर खाता येत
तिखटाचे सांडग्याचे पीठ पण बनवले कि त्या पिठात कांदा , कोथिंबीर घातले कि झाले डांगर . ते हि भाकरीबरोबर झकासच लागे . पूर्ण उन्हाळाभर आंबे , जांभळ ,करवंद, आणि कलिंगड यांची रेलचेल असायची . आजी आंब्याचा हाराच घेई आणि प्रत्येकाला मोजून दोन दोन देई . मग तो चोखून खायचा . एक तासभर वेळ मजेत जायचा.उन्हाळी काकड्या तर खाण्यात अक्षरशः सुख होते . उन्हाळ्यात त्या थंड गार काकड्या फोडी करून मीठ टाकून आजी देई .
रताळं भाजून खाण्यात जी मजा आहे ती उकडून किंवा अजून त्यांचे नाना प्रकार , तेल तूप घालून खाण्यात अजिबात नाही .
ह्याच दिवसात डाळी केल्या जात, त्यांचा एक मोठा कार्यक्रमच असायचा . तुरी भिजवून तुरीची डाळ , हरभरे भिजवून हरभऱ्याची डाळ केली जाई . सकाळी सुखत घालून त्या बरोबर सुखल्याचा एक अंदाज घेऊन त्याची डाळ केली जाई नाहीतर डाळ अगदी अर्धगोल तुकडे पडत नाहीत . त्याला काहीतरी शब्द आहे पण तो आता आठवेना त्याचा कोंडा काडून बारीक झालेला डाळगा राही . तुरीच्या डाळग्याचे शेन्गोळे बनवले जाई . हरभऱ्याची डाळ भिजवून आंब्याची चटणी , पन्हे ... काय काय आठवू ? काकीच्या माहेरातून फणस यायचे . फणस कापताना त्याचा घमघमीत वास नाकात बसतो अक्षरशः . काय काय आठवू?
तांदळाची अमृतफळ , तांदळाच्या आंबोळ्या , मेतुंडा असले बरेच काही उन्हाळयात केले जायचे . लग्न सराई असल्याने कोणाच्या ना कोणाच्या घरी लाडू चिवडा केलेला असेच. मागरणीला पाठवणी म्हणून केलेल्या सजुऱ्या (साठोऱ्या ). रोज नाव्ही कोणाची ना कोणाची शिदोरी देऊन जाई . मज्जा असायची नुसती .
हे झाले उन्हाळ्यातले , पावसाळा चालू झाला कि अजून काय काय पदार्थ असायचे ते पुढच्या भागात.

संस्कृतीपाकक्रियाजीवनमानलेख

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

16 Sep 2017 - 10:16 pm | तेजस आठवले

भारी लिहिलंय. वाचून भूक लागली. चीक लहानपणी खाल्ला आहे, मला खूप आवडायचा. त्याचा तो आंबूस वास आठवला आणि मन भूतकाळात गेले.
अवांतर : खारे दाणे घरच्या घरी कसे बनवायचे ? ओव्हन/मायक्रोवेव्ह नाही माझ्याकडे. पण खारे दाणे प्रचंड आवडतात.
कोणी कृती देईल का/ किंवा पूर्वी लिहिली असेल तर दुवा द्या.

शेंगदाणे मंद गॅसवर भाजायचे.भाजत आले की वाटीत मिठाचे पाणी करुन त्या दाण्यांवर ओतायचे. दाणे फक्त ओले झाले पाहिजेत. पुन्हा खमंग भाजायचे

प्रमोद देर्देकर's picture

16 Sep 2017 - 10:29 pm | प्रमोद देर्देकर

कमाल आहे नाही पूर्वी च्या लोकांची. आता एव्हढी वैविध्यता राहिलीच नाही. साधे पापड सुध्दा कोणी घरी लाटत नाहीत.

जेडी's picture

16 Sep 2017 - 11:35 pm | जेडी

खरय

गव्हाच्या सत्वाचा चीक आठवला. आजीच्या आठवणीने कासावीस व्हायला झालं. असो..

एस's picture

17 Sep 2017 - 12:44 am | एस

यातले बरेच प्रकार पूर्वी जवळपास प्रत्येक घरी होत असत. त्या दिवसांच्या आठवणी रम्यच म्हणायच्या.

संग्राम's picture

17 Sep 2017 - 1:54 am | संग्राम

+1

पिलीयन रायडर's picture

17 Sep 2017 - 2:01 am | पिलीयन रायडर

फार मस्त लेख!!

माझी आई पापड्या करायची, आजी खारवड्या. बाबा तुम्ही सांगितले तसेच खारे दाणे करायचे. आता सासूबाईमुळे मी गव्हाचा चीक करायला शिकले. आणि त्याच्या कुरडया.

मेतकूट येसर करून घ्यायचे. हरभऱ्याच्या डाळीची वाटली डाळ, पन्ह हे सगळं होतं घरी.

पण तुम्ही जितके पदार्थ लिहिलेत ते खरंच ऐकलेही नाहीयेत. तुम्ही भाग्यवान!!

संग्राम's picture

17 Sep 2017 - 2:03 am | संग्राम

सहलीमध्ये नेहमी न्यायचा ठरलेला .....
मला वाटते डाळीच्या पीठात शेंगदाणे घोळवून मग तळले जायचे
तसेच आजी लाहयाची कुटरी बनावयची ... स्पेशल
चुलीवरच माडगं ...
Nostalgic .....

पिलीयन रायडर's picture

17 Sep 2017 - 2:34 am | पिलीयन रायडर

ह्या पाककृती यायला हव्यात मिपावर. कुणी तरी टाका खरंच..

चामुंडराय's picture

17 Sep 2017 - 3:09 am | चामुंडराय

भाताचे सांडगे

आई थोडासा चिकटसर तांदळाचा भात मीठ घालून रात्री शिजवून ठेवायची व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे लहान लहान सांडगे करायची.
ते दिवसभर कडकडीत उन्हात वाळवायचे.

हे सांडगे तळून खूप कुरकुरीत होत असत, छान लागत. डब्यात भरून ठेवले कि येता जाता तोंडात फेकायचे. धमाल चव होती त्यांची.

Good old days ... rather ... good young days.

गेले ते दिन गेले.

गव्हाचा चिकात दुध व साखर टाकून खाणे तर अमृतपान! ऊन्हाळ्यात कुरड्या, शेवया,,वडे ,पापड सर्व करताना आम्ही बच्चे कंपनी खूप मदत करत असू.

रमेश आठवले's picture

17 Sep 2017 - 10:04 am | रमेश आठवले

तुमच्या निरीक्षणशक्ति आणि स्मरणशक्तिला दाद द्यावीशी वाटते. स्वतः काही बनवले असल्यास त्याचे ही वर्णन येऊ द्यात.

भातवड्या कशा बनवायच्या ?

खरे तर ह्यांना भातवड्या का म्हणतात ते माहित नाही कारण त्या ज्वारीच्या बनवतात . ज्वारी भिजवायची रात्रभर , दुसऱ्या दिवशी उपसून सावलीत सुखवायची , मग ती सडायची (उखळात घालून मुसळाने ती कुटायची ). मग तिचा कोंडा झाडून राहिलेली ज्वारी दळायची . त्यात पाणी , मीठ ,जिरे , तीळ घालून पातळ खिरीसारखे शिजवायचे . शिजवलेले पीठ डावाने साडी, धोतर यावर गोल गोल ओतायचे . पोहे खाण्याच्या डिश एवढा त्याचा आकार झाला पाहिजे . हे सर्व उन्हातच करायचे . नंतर साडी, धोतर उचलता येत नाही . संध्याकाळी साडी शिडीवर उलटी टाकायची आणि उलट्या बाजूने पाणी मारत मारत पापड्या सोडवून नीट एकावर एकावर एक ठेवायच्या . सर्व पापड्या काडल्या कि त्या पुन्हा सुख्या साडीवर सुखत घालायच्या . दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवायच्या .किती सुखल्यात त्या प्रमाणात वाळवायच्या . खूप वाळल्या की तुकडे पडतात . भाजून तर छान लागतातच पण तळूनही खूप छान लागतात .

सालपापड्या
तांदूळ रात्री भिजवायचे . सकाळी उपसून सावलीत सुखवायचे . नंतर दळायचे . त्यात पाणी , जिरे , मीठ घालून थोडे पातळ करायचे. करायला घेण्यापूर्वी दुरडी किंवा हारा बाजूला पालता घालून ठेवायचा . गॅस वर पातेल्यात पाणी गर्व करत ठेवायचे . खूप साऱ्या स्टीलच्या थाट्या बाजूला काढून ठेवायच्या . शिवाय मोठ्या सूयाही पाहिजेत बाजूला . पीठ थाटलीत ओतायचे . गोल गोल थाटी फिरवत तिचा मोठा गोल झाला पाहिजे . मग एकदम पातळ गोल झाला कि थाटी उलटी त्या पातेल्यावर झाकायची , वाफेने ती शिजते . मग ताट खाली काढून सुईने त्याची थोडी बाजू उचालवूं घ्यायची . थोडा बाजू निघली कि पापडी बोटानी हळूच सरकन उचलून पालथ्या हाऱ्यावर टाकायची . लक्षात घ्या , सालपापडी हे नाव का पडले असावें कारण त्या अगदी सालीसारख्या पातळ असतात . हारा चहुबाजूनी भरला की उन्हात नेवून ठेवायचा . ह्या पापड्या पातळ असल्याने लगेच सुखतात . थोड्या सुखल्या कि परत धोतरावर ,साडीवर वाळवायच्या . ह्या पापड्या अतिशय चविष्ट लागतात .

तांदळाचे खारे सांडगे
वरिलप्रणानेच तांदूळ भिजवून ठेवायचे , हे मात्र थोडे दोन तीन दिवस भिजवतात , चीक काढायचा . कुरडई सारखाच शिजवायचा आणि गरम गरम मोदकासारखे सांडगे घालायचे . वरती एकदम बारीक कळी यायला हवी . शिवाय पीठ गरम असते तर पाण्यात हात बुडवून बुडवून ते सांडगे घालायचे . तळल्यावर गुलाबाच्या फुलासारखे फुलले पाहिजेत . पीठ चांगले शिजले असले तरच ते फुलतात .

संजय पाटिल's picture

17 Sep 2017 - 1:11 pm | संजय पाटिल

ह्या सालपापड्या वाळवायला ताकायचं काम मी आवडीने करायचो..कारण वाळवायला टाकन्या पुर्वी ओल्या खायला फार मस्त लागत! आमच्या कडे शेवया करणे हे एक मोठ्ठे प्रकरण असे...

हो शेवयांवरही लिहायचे आहे , ते ही गहू वलवून केलेल्या .

वकील साहेब's picture

17 Sep 2017 - 1:15 pm | वकील साहेब

1.सांडगे घालायचे म्हणजे काय ? सांडगे हा शब्द पहिल्यांदा वाचतोय ....... मुटकूळे असतात तसे का ?
2.दुरडी, हारा म्हणजे काय ? आमच्याकडे (नासिक जिल्ह्यात ) हे शब्द प्रचलित नाहीत.
3. तांदळाचे सांडगे तयार केल्या नंतर तळण्या अगोदर सुकवावे लागत नाही ना ?
हारा म्हणजे कामट्याची पाटी असावी बहुतेक ........

पद्मावति's picture

17 Sep 2017 - 2:10 pm | पद्मावति

फारच मस्तं लेख.

जेडी's picture

17 Sep 2017 - 3:00 pm | जेडी

धन्यवाद .

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2017 - 2:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लेख ! लहाणपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या !

उन्हाळ्याच्या सुट्टी म्हणजे वर्षाची बेगमी करायची वेळ : लोणची (आंबा, लिंबू, मिरची), पापड ( उडीद, तांदूळ, पोहे, नाचणी), कुरडया, फेण्या, साबूदाण्याच्या चिकोड्या, उपासासाठी बटाट्याचा कीस, बटाट्याच्या काचर्‍या, इ, इ, इ.

यात बालकमंडळींचे काम म्हणजे (विशेषतः उडीदांच्या) पापडांचे पीठ कुटून देण्याचा प्रयत्न करून हात सोलून घेणे, पापड-कुरडया-फेण्या वाळत घालणे आणि तो माल कावळ्यांनी लंपास करू नये यासाठी काठ्या घेऊन राखण करता करता मस्ती करत बसणे !

सांडगे सुखवावे लागतात , ते विसरले वाटते लिहायचे . सांडगे म्हणजे -- छोटे छोटे गोट्या मधल्या मोठ्या गोटी एवढे तुकडेच पण मोदकाच्या आकाराचे .
हारा म्हणजे वेताची मोठी (आपल्या घरात जो सर्वात मोठा टप असतो त्याच्यापेक्षा दुप्पट मोठी ) टोपली आणि दुरडी म्हणजे त्याच्या पेक्षा लहान वेताची टोपली

वकील साहेब's picture

17 Sep 2017 - 3:38 pm | वकील साहेब

ओह छान माहिती दिलीत, याबाबत अजून वाचायला आवडेल.
आमच्या घरी यातले बरेचसे प्रकार जसे नागलीच्या, तांदळाच्या कुरडया, डाळीचे वडे, उडदाचे पापड, नागलीच्या पापड्या, शेवया हे सर्व प्रकार अजूनही होतात.
वरती ज्याला गव्हाच्या कुरडया करताना चिक हाटने म्हंटलेले आहे त्याला आमच्याकडे घाट घेणे म्हणतात. तोही चुलीवर. आमच्या लहान पनी आई आणि आजी घाट घ्यायच्या. आता आईला अन बायकोला घाट घ्यायला मला मदत करावी लागते. घामाघूम व्हायला होत. पण मजा येते.
हारा वर वाळत घालण्या ऐवजी आमच्याकडे कुरडया पापड्या मोहोळावर (म्हणजे दर्भाच्या काड्या पसरवून ) वाळत घातल्या जातात.
मिपा करांना याबाबत ज्या रेसेपीज माहीत असतील त्यांनी कृपया पाककृती सदरात सविस्तर लिहाव्यात.
रच्याकने सुखवावे ऐवजी सुकवावे असा शब्दप्रयोग उत्तम राहील असे सुचवावेसे वाटते.

वकील साहेब's picture

17 Sep 2017 - 3:52 pm | वकील साहेब

त्याला काहीतरी शब्द आहे पण तो आता आठवेना त्याचा कोंडा काडून बारीक झालेला डाळगा राही .

कुळीद का ?

नाही, हरभरे डाळ करायला तयार होणे ... हा शब्द आठवेना

उपेक्षित's picture

17 Sep 2017 - 4:50 pm | उपेक्षित

सही लिहिले आहे भाऊ.
आमच्या पंढरपुरात शेंगदाणे, फुटाणे भाजायच्या लयी भट्ट्या आहेत.

लहानपणी कर्वेनगरात चाळीमध्ये सगळे मिळून असले उद्योग करत, यात मधी मधी उचापत्या करताना पायाला खाट लागली होत, तुमच्या आठवणी वाचून परत लहान व्हावस वाटले.

जेडी's picture

17 Sep 2017 - 6:31 pm | जेडी

भाऊ नाही ओ मी, ताई आहे

मला वाटले हा सापवाल्या जॅक डॅनीयल्सचा आयडी आहे.

सापवाला जॅक, भारी नाव आहे

लेखा बद्दल काहीच नाही आणि आय डी बद्द्ल एवढी उत्सुक्ता...

सस्नेह's picture

17 Sep 2017 - 8:49 pm | सस्नेह

लहानपणी लाटलेल्या आणि चोरून मटकावलेल्या पापडाच्या लाट्या, तांदळाच्या कुरडया, घोड्यासारख्या पाटावर बसून वळलेल्या शेवया हे सगळं आठवलं !

मितान's picture

18 Sep 2017 - 1:45 pm | मितान

सुंदर लेख ! यातल्या अनेक आठवणी जुळताहेत :)

पैसा's picture

18 Sep 2017 - 3:25 pm | पैसा

खूप छान लिहिलंय. आमच्याही घरच्या चिकवड्या, पापड सांडगे मिरच्या, साठ आठवले.

II श्रीमंत पेशवे II's picture

18 Sep 2017 - 4:22 pm | II श्रीमंत पेशवे II

या बायका बरोब्बर आमच्या सुट्टीच्या दिवशी असले कार्यक्रम करायच्या

आणि मग त्यांचे हात गुंतलेले असले कि पोरांचा पिट्ट्या पडायच्या , हि परात तिथे ठेव , हे जरा चक्र फिरव , ते बघ गाय आलीये पापड खायला तिला हाकलव , उन्हात्न्हातून ये जा करून जीव दमायचा , आई पाणी दे - तर - जरा जा आजच्या दिवस तूच घेऊन पी ---आणि मग बऱ्याच सूचना --- घाणेरडे हात आत घालू नको , उष्ट भांड बुडवू नको इत्यादी .....
आजू बाजूच्या काकवा , आज्या मदतीला असायच्या .. त्या मधेच आईची नाहीतर मुलांची चेष्टा करायच्या ... कधी कधी राग यायचा पण जेव्हा आपल्या बद्दल चांगल बोलल जाई तेव्हा इतक्या मोठ्या घोळक्यात आपल्याला चांगल म्हणत आहेत याचा अभिमान वाटायचा ...
पण त्या एव्हढी स्तुती त्यांना हवी तस राबाव म्हणून करायच्या ... बिना टोपी च उन्हात फिरून , घामाघूम व्हायचं , पापड वाळत घालताना त्या खाली पसरलेल्या कापडा कडे सतत पहिल्याने डोळ्यापुढे अंधारी यायची ................थकल्या सारखे वाटायचे

बदल्यात जेव्हा तो गरमागरम चिक खायला मिळायचा तेव्हा तो थकवा गायब व्हायचा

पण खर्च मजा होती ..........शाळेसाठी म्हणून जेव्हा शहरा कडे आलो तेव्हा सगळी मजा संपली .........

खरच जुन्या आठवणी ज्या अनुभवल्या आहेत त्या सांगून नाही समजणार .त्या साठी एप्रिल मे दरम्यान गावी चक्कर मारली कि आपोआप चित्र दिसेल

हुप्प्या's picture

18 Sep 2017 - 7:27 pm | हुप्प्या

मस्त लेख आहे.
पण एक शंका आहे
मेवा हा शब्द फारसी भाषेतून आला आहे. त्याचा अर्थ फळ असा आहे. सुका मेवा म्हणजे सुकवलेली फळे, बेदाणे, मनुका, जर्दाळू इ. जंगल मेवा म्हणजे जंगलात मिळणारी फळे.

फळाशिवाय अन्य खाद्यपदार्थांना मेवा म्हणतात का ह्याची खात्री नाही.

मस्त लेख! खरंच खूप आठवणी जाग्या झाल्या.

सांडगे, कुर्डया आमच्याकडे दर वर्षीच व्हायच्या, पापडही केव्हा केव्हा होत.

आमच्याकडे गव्हाच्या चिकात साखर, केशर, वेलची वगैरे घालून गरम गरम खायला खूप आवडतो. एवढे सारे गहू घेतले की त्याचा एवढासा चीक पडतो. पण आई अजूनही दर वर्षी करते. काही जणांना तिखट मीठाचाही आवडतो, पण मला तरी फार आवडला नाही.
तांदळाचे सांडगे कधी खाल्ले नाहीत, पण मुगाच्या डाळीचे सांडगे अजूनही होतात आईकडे, भिजवलेली डाळ दळून तिखट मीठ इ. घातले की त्याला 'कळण' म्हणतात. हे कळण असेच तोंडी लावायला मस्त लागते, त्याची पोळी तर खासच! सांडगे घालून झाले की संध्याकाळी मुगाची भजी हवीतच!

भिंगरी's picture

20 Sep 2017 - 10:18 pm | भिंगरी

2.दुरडी, हारा म्हणजे काय ? आमच्याकडे (नासिक जिल्ह्यात ) हे शब्द प्रचलित नाहीत.

नाशिक मध्ये दुरडी हा शब्द प्रचलीत आहे.

शलभ's picture

21 Sep 2017 - 3:24 pm | शलभ

मस्त लेख