माहेरचं 'माणूस'

भारी समर्थ's picture
भारी समर्थ in जनातलं, मनातलं
28 May 2017 - 7:17 pm

"आगं आक्का, खूप कामं आहेत गं ऑफिसात. दोघंजण सुट्टीवर आहेत." जनक काकुळतीला येऊन आक्काची मनधरणी करत होता.
"जनु, कुणी नको सोबत. पण तेवढं सुरमंडीच्या गाडीत बसवून दे बाबा."
"तिकडं तुझं कोण करणारे का काही? तो शशी स्वतःच्या संसारात नरडीपर्यंत बुडालाय. कधी साधा फोन नाय का हालहवाल विचारायची सवड नाय."
"हं"
"काल त्याचा फोन काय आला अन् लगीच तुला घाई झाली त्याला भेटायची. मला तर कधी तोंडदेखलंबी बोलत नाय की गावाकडं ये म्हणून."
"काय होतय मग. मी काय झाकपाक घिऊन निघाले काय माझा? म्हातारी राहील घराच्या सांदीत दोन दिवस. परत येईन माघारी माझी मीच. काय भार नाय व्हायचा शशीला माझा."
"बर ठीकाय. नाहीच तुला ऐकायचं तर मंग ठीकाय." सकाळच्या गाडीतनं देतो तुला बसवून."
"हं."

आक्का, जनकची आई, साधारण सत्तरीच्या घरातली. सुरमंडीच्या तालेवार देशमुखाच्या वाड्यात वाढलेली पोर. माणिक बुवांच्या आषाढी वारीतील शंभरेक वारकऱ्यांचा तिसरा मुक्काम सुरमंडीच्या देशमुखांकडं ठरलेला. या सधन कुटुंबातील मोकळ्या वातावरणात एका मुलीचं आयुष्य जेवढं समृद्ध असावं, त्याहीपेक्षा मणभर जास्त आबांनी सुलक्षणेला लोभ दिला. सुरमंडीच्या भैरवनाथाच्या कृपेचा हा एकुलता एक प्रसाद नरहरी आणि सुशीला देशमुखांनी अगदी आनंदानं स्विकारला.

नरहरांची नजरेच्या पल्ल्यातही बांध येऊ नये इतकी वडिलोपार्जित शेती सुरमंडीच्या वेशीपर्यंत पसरली होती. सुलक्षणेच्या पश्चात नरहरांनी धाकट्या भावाला त्याचा मानाचा हिस्सा देऊन आपला राहिला हिस्सा राष्ट्रप्रेरणेने भूदानात अर्पण केला. स्वसम्मानाच्या कमाईइतका हिस्सा स्वतःकडे ठेवून आपलं राहिलेलं आयुष्य सुरमंडीच्या मातीत त्यांनी घालवलं.

जमिनीचा नेमका हाच तुकडा स्वतःकडे ठेवण्यात नाही म्हटलं तरी देशमुखांचा स्वार्थ होताच. प्रशस्त विहीरीच्या अलीकडे एक फार जुना अन् मोठ्या घेराचा वड होता. या वडाखालच्या विस्तीर्ण घडीव पारावर बाज टाकून देशमुख बसत आणि सर्व कारभार तिथूनच हाकीत. गावातल्या सगळ्या मंडळींचा इथं नेहमी राबता असायचा. अगदी पुढाऱ्यांचीही भेट देशमुख इथंच घेत. नाही म्हटलं तरी हा पार म्हणजे आबांचा अभिमान होता.

न्याहरीच्या भाकरी घेऊन गणोबा रानात निघाला, की त्याच्यापुढं शाळेचं दप्तर घेऊन सुलक्षणा हमखास असेच. न्याहरी झाल्यावर आबा स्वतः लेकीला शाळेत सोडत. दुपारच्या सुट्टीत सुलक्षणा घरी न जाता पुन्हा वडापाशीच येऊन जेवेे. म्हणजे, दिवसभर वेळ मिळेल तसा ती वडावर आणि वडाभोवती खेळत राही. देशमुखांसमोर आलेल्या लोकांची भांडणं, गाऱ्हाणी, चहाड्या, 'इनवण्या', अन् असं बरंच काही आबांच्याशेजारी बसून सुलक्षणा ऐकत राही. अन् आबा जाताच त्यांच्या रुबाबाची नक्कल करत राही. तिच्या या सर्व लीलांचा एकमेव साक्षीदार म्हणजे ते वडाचं झाड.

होता होता पोर मॅट्रिक झाली. आख्ख्या जिल्ह्यात मॅट्रिकला पहिला नंबर काढून सुलक्षणानं आबांची मान अजून ताठ केली.

"पोरी, समद्या जिल्ह्यातनं पैला नंबर! नाव मोठंच होतं घराचं पर तु तुरा खवलास पटक्यात."
"आबा, या वर्षी माईनं पुस्तक खाली कुठं ठिवू दिलय. मोठ्यानं बोलून पाठांतर करताना तीच बसायची सारखी समोर."
"आस्सं! मंडळी, म्हंजी या तुऱ्यातलं दोन-चार पखं तुमी आणल्यात म्हणायचं तर. हाहाहा."
"आवं तसं नाय पर काळ पुढं चाल्लाय तर म्हणलं माझं लेकरु कशातबी मागं पडू नये. उगं गावात तेवढ्यावरनं तुमची चेष्टा नको मागं"
"तर तर. खरय तुमचं." देशमुखांनी कौतुकानं बायकोकडे पाहिलं आणि सुलक्षणाला म्हणाले, "बर पोरी, माईला सांगितलय आधीच. पर तुझ्या परिक्षेमुळं तुला बोललो नाय. तु मामांकडं गेलतीस मागच्या म्हैण्यात तवा दाजी आलते. तुझ्यासाठी कंडारीच्या पाव्हण्यांची सोयरीक घेवून."
सुलक्षणा स्त्रिसुलभ लाजली.
"तवा म्हणलं की होऊंद्या पोरीचा निकाल नंतर बघू लग्नाचं. पोरगं मुंबईत हाय पोलीस खात्यात इनिसपेक्टर हुद्द्यावर. कवा बोलवायचं मंग?"
एवढं बोलताच सुलक्षणा ढाळजेवरुन उठून आत पळाली. आबा अन् माई समाधानानं हसले.

जनक जेमतेम वर्षाचा झाला तेव्हा साप चावल्याचं निमीत्त होऊन आबा गेले. सुलक्षणानं माईला मग मुंबईला आणलं. तिला वाटलं पोरात जीव रमेल माईचा आणि तिलाही माईची सोबत होईल. तिचे सासू-सासरेही कधी दोन दिवसांच्यावर मुंबईत राहिले नव्हते. पण कसलं काय! माईचाही जीव मुंबईत रमेना.

जेमतेम पाच दिवस झालेले माईला मुंबईत येऊन आणि माई म्हणाल्या, "पोरी, पाव्हण्यांना कधी सुट्टी मिळल गं?"

सतत पै-पाव्हण्यांच्या गराड्यात वाढलेल्या सुलक्षणेनं मुंबईमधलं एकाकी जगणं कसंबसं तगवून धरलं होतं. पण माईच्या प्रश्नानं तिचा धीर सुटला अन् तिच्या गालाचे पाट ओले झाले.

(क्रमशः)
(पुढील भाग पुढच्या आठवड्यात)

संस्कृतीकथालेख

प्रतिक्रिया

नेमकं कोण, कोण आहे, तेच कळलं नाही. आक्का कोण, माई कोण, सुलक्षणा कोण? थोडं स्पष्टीकरण टाकाल का?

असंका's picture

28 May 2017 - 8:48 pm | असंका

सुरेख....!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....

धन्यवाद!!!

पद्मावति's picture

28 May 2017 - 9:24 pm | पद्मावति

वाचतेय. पु.भा.प्र.

इडली डोसा's picture

29 May 2017 - 8:13 am | इडली डोसा

पु.भा.ल.टा.

दशानन's picture

29 May 2017 - 8:18 am | दशानन

छान सुरवात, पुढे काय ही उत्सुकता आहेच.

संजय पाटिल's picture

29 May 2017 - 4:39 pm | संजय पाटिल

छान सुरवात...
पुभाप्र!

राजाभाउ's picture

31 May 2017 - 11:47 am | राजाभाउ

मस्त लिहलय , एकदम भारी हं 'भारी समर्थ' :) पु.भाप्र

रच्याकन

सुलक्षणेच्या पश्चात नरहरांनी धाकट्या भावाला त्याचा मानाचा हिस्सा देऊन...

इथ सुलक्षणेच्या पश्चात कसं ? सुलक्षणा मुलगी न नरहरांची ? का माझ काही चुकतय समजायला ?

प्रसन्न३००१'s picture

1 Jun 2017 - 10:40 am | प्रसन्न३००१

कोणाचं कोण तेच काही कळंना झालाय बगा

स्वधर्म's picture

1 Jun 2017 - 12:48 pm | स्वधर्म

.