रेडइंडियन मुलांच्या कथा...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Dec 2016 - 6:20 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ...
मिशोमिस सुरु करतो...

ऐका रे मुलांनोऽऽऽ

चार शिकारी भाऊ होते. माग काढण्यात पंचक्रोशीत त्यांचा कोणी हात धरत नसे. एकदा का ते कुठल्या सावजाच्या मागे लागले की त्या सावजाला ते सोडत नसत.

जेव्हा थंडी पडू लागते, रात्री गारठतात त्या काळात एका पोर्णिमेला त्यांच्या गावात त्यांच्यासाठी एक निरोप आला की एक महाकाय अस्वल, एवढे महाकाय की त्याला राक्षस म्हणणेच ठीक, असे अस्वल जंगलात अवतीर्ण झाले आहे. ज्या गावाच्या शिकारी कुरणांवर त्या अस्वलांने हल्ला चढविला होते त्यांचा भितीने थरकाप उडाला. आया मुलांना जंगलात पाठवेनात. अरुंद, लांबलचक घरांच्या रक्षणासाठी घरातील कर्ते पुरुष हातात शस्त्रे घेऊन घरादाराची राखण करु लागले. सकाळी बाहेर पडल्यावर गावकऱ्यांना गावातच त्या महाकाय अस्वलाचे माग सापडू लागले. त्यांच्या लक्षात आले, ‘‘हा अस्वल लवकरच धीट होणार. त्याच्या आधीच त्याचा काटा काढायला हवा’’

हे चार शिकारी भावांनी आपले अणकुचिदार भाले घेतले, आपल्या छोट्या कुत्र्याला शिळ घातली व ते त्या गावाला निघाले. या कुत्र्याला दोन्ही डोळ्यांवर दोन पांढरी वर्तूळे होती, म्हणून ते त्याला गंमतीने चारडोळ्याचा म्हणत. ते गाव त्यांच्या गावापासून फार दूर नव्हते. जसे ते त्या गावाजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते जंगल फारच शांत होते. नेहमीसारखी तेथे प्राण्यांची पक्षांची गडबड ऐकू येत नव्हती. एका विशाल पाईन झाडाच्या बुंध्यावर त्यांना त्या अस्वलाने पुढच्या पंजाच्या अणकुचिदार नख्यांनी केलेल्या खुणा दिसल्या. या असल्या खुणा अस्वल त्यांची सिमा आखण्यासाठी करतात. त्या भावातील सर्वात उंच असलेल्या भावाने त्याच्या भाल्याचे टोक सगळ्यात वरच्या खुणांना लावायचा प्रयत्न केला. ‘‘ या वेळी आपल्याला एका महाकाय, राक्षसी अस्वलाची, न्याग्वाहेची शिकार करावी लागणार आहे बर का !’’ तो म्हणाला.

‘‘पण न्याग्वाहेकडे मायावी शक्ती असते ना ?’’ दुसरा भाऊ म्हणाला.

पहिल्याने मान हलविली, ‘‘ त्याचा माग जर काढला व त्याच्या मागे लागलो तर त्या मायावी शक्तीचा त्याला उपयोग होणार नाही. कळलं का ?’’

‘‘मी ही आपल्या गावातील म्हाताऱ्यांकडून हेच ऐकले आहे. हा प्राणी ज्या शिकाऱ्यांना त्याचा माग काढता येत नाही अशा शिकाऱ्यांचाच पाठलाग करतो. एकदा का न्याग्वाहेचा माग काढला की त्याला पुढे पुढे, तुमच्यापासून दूर दूर पळण्याशिवाय
गत्यंतर नाही.’’ तिसरा भाऊ म्हणाला.

त्या चौघांमधला शेवटचा हा जाड्या व अत्यंत आळशी होता. तो म्हणाला, ‘‘ भरपूर अन्न आणले आहे ना? याला पकडलायला खूप दिवस लागू शकतात. मला तर आत्ताच भूक लागली आहे.’’

थोड्याच वेळानंतर ते चौघे भाऊ व त्यांचा तो कुत्रा त्या गावाच्या वेशीत पोहोचले. गाव अगदी ओसाड पडले होते. चौकात शेकोटी नव्हती आणि सर्व लाकडी घरांचे दरवाजे बंद होते. माणसे गंभीर चेहऱ्याने घरावर पहारा देत उभी होती. कुठेच शिकार टांगलेली दिसत होती ना वाळविण्यासाठी कुठल्याही जनावराचे कातडे.

गावाचा मुखिया घराबाहेर आला. चार शिकाऱ्यांपैकी जो सगळ्यात उंच होता तो त्याच्याशी बोलला, ‘‘ काका, आम्ही तुम्हाला मदत करायला आलो आहे. त्या अस्वलाला मारायला. !’’
मग सगळ्यात जो जाडा व आळशी होता तो म्हणाला, ‘‘आम्हाला खायला आणि विश्रांती घेण्यास जागा मिळेल का ? मागावर निघण्याआधी खाऊन घेतलेले बरे !’’

पहिल्याने मान हलविली व हसून तो मुखियाला म्हणाला, ‘‘ माझा भाऊ तुमची गंमत करतोय. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आम्ही आत्ताच मागावर निघणार आहोत.’’

‘‘मला नाही वाटत तुम्ही त्याचा माग काढू शकाल. आमच्या अगदी घराजवळ आम्हाला त्याचे माग सापडले आहेत पण त्याचा मागोवा घेतला की ते माग मधेच अदृष्य होतात.’’

दुसऱ्या शिकाऱ्याने खाली वाकून त्याच्या छोट्या कुत्र्याला थोपटले, ‘‘त्याचे कारण तुमच्याकडे माझ्या या कुत्र्याइतका हुषार प्राणी नाही. त्याने त्याच्या डोळ्यांकडे बोट दाखवित म्हटले, ‘‘ याचे हे चार डोळे कितीही जुना माग असुदेत, बरोबर शोधून काढतोच !’’

‘‘देव तुमचे रक्षण करो’’ तो म्हातारा म्हणाला.

‘‘ काळजी करु नका. एकदा आम्ही मागावर निघालो की सावज सापडेपर्यंत थांबत नाही.’’ तिसरा म्हणाला.

‘‘म्हणूनच मी काही खायला आहे का ते विचारले.’’ आळशी शिकारी म्हणाला. पण इतरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्या मुखियाचा निरोप घेतला व ते जायला निघाले. ते निघालेच म्हटल्यावर त्या जाड्या व आळशी शिकाऱ्यानेही सुस्कारा टाकला व आपला भाला उचलून तो त्यांच्या मागे पाय खरडत चालू लागला.
यांच्या त्या चार डोळ्याच्या कुत्र्याच्या मागे ते चालत राहिले. तो मधेच डोके वर करे व चहुबाजूला बघे. रस्ता खडतर होता तर माग काढणे त्याहुनही अवघड.

‘‘किती वेळचे चालतोय आपण ! जरा विश्रांती घ्यायला पाहिजे आपण, असे नाही वाटत तुम्हाला ?’’ तो आळशी भाऊ म्हणाला पण त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यांना खुणा दिसल्या नव्हत्या तरी त्यांना न्याग्वाहेचे अस्तित्व जाणवत होते. लवकरच ते त्याच्या मागे लागले नाहीत तर तो त्यांच्या मागे लागणार हे त्यांना चांगलेच माहीत होते. मग मात्र त्यांचेच सावज झाले असते आणि तो शिकारी.

त्या जाड्याने कमरेची चामड्याची चंची सोडली. ‘‘नाही थांबले तर नाही थांबले. चालताना खायला तर काही त्यांची परवानगी लागणार नाही’’ तो मनात म्हणाला. त्याने त्या चंचीत हात घातला. आत त्याने मोठ्या कष्टानी मांस आणि फळांची एकत्र कुटून लगदा केलेले चवदार खाद्य होते. ते चांगले वाळवून त्याने त्यावर मस्तपैकी मधही ओतला होता. पण त्या वड्यांऐवजी त्याच्या हातात आल्या आळ्या...! तो किंचाळला. न्याग्वाहेने त्याच्या मायावी शक्तीने त्याच्या अन्नाच्या आळ्या केल्या होत्या.

‘‘लवकर पाय उचला...बघा त्याने माझ्या अन्नाचे काय केले आहे...त्याला लवकरच पकडले पाहिजे... मी आता मात्र चिडलो आहे...’’

इकडे एखाद्या महाकाय अदृष्य छायेसारखा न्याग्वाहे त्यांच्या आसपासच, दाट झाडीत वावरत होता. त्याचे तोंड उघडे होते ज्यातून त्याचे अणकुचीदार सुळे चमकत होते. त्याचे लालबुंद डोळे त्यांची चाहूल घेत होते. लवकरच तो त्यांच्या मागे त्यांचाच माग काढण्याची तयारी करीत होता.

त्याच वेळी त्या लहानग्या कुत्र्याने त्याचे डोके वर केले व तो हलक्या आवाजात केकाटला.

‘‘चार डोळ्याला माग सापडला बहुदा !’’ दुसरा भाऊ ओरडला.

‘‘ सापडला त्याचा रस्ता...’’ तिसरा ओरडला.

‘‘अस्वल्या आता आम्ही तुझ्या मागावर आहोत !’’ जाड्या ओरडला.

या सगळ्या पाठशिवणीच्या खेळात त्या महाकाय अस्वलाला प्रथमच भीतीने घेरले. घाबरुन तो पळू लागला. जसा तो उघड्यावर आला तसे त्या शिकाऱ्यांना त्याची प्रचंड पांढरी आकृती दिसली. हाकारे देत ते त्याच्या मागे धावू लागले. त्याच्या ढांगा लांब होत्या आणि तो हरिणासारखा चपळ होता. ते चार शिकारी आणि त्यांचा कुत्रा त्याच्यापेक्षाही चपळ होते. माग दलदलीतून, दाट झाडीतून जात होता. माग काढणे तसे सोपे होते कारण अस्वल रस्त्यात येईल ते बाजूला करुन धावत होता. आड येणारी मोठी झाडेही जमिनदोस्त करीत होता. दऱ्याखोऱ्यातून हा जिवघेणा पाठलाग अनेक दिवस चालू राहिला.. शेवटी एका पर्वताच्या पायथ्याला ते पोहोचले. माग काढताना ते त्या पर्वतावर उंच उंच चढू लागले. एखाद्या टेकाडावर तो त्यांना दिसे. त्याला गाठताच तो त्यांना पुढच्या चढावर दिसे. आकाशाच्या पार्श्र्वभूमीवर त्याची आकृती त्यांना स्पष्ट दिसली की ते परत जोमाने त्याचा पाठलाग करु लागत.

दमछाक होऊन शेवटी त्या जाड्या व आळशी भावाने खाली पडल्याचे नाटक केले, ‘‘माझा पाय मुरगळलाय ! तुम्हाला मला उचलून न्याचे लागणार बहुतेक. त्यातील दोघांनी त्याला उचलून घेतले तर तिसऱ्याने त्याचा भाला संभाळला. त्यांचा वेग या नवीन ओझ्यामुळे कमी झाला पण ते अस्वलाच्या फार मागे पडले नाहीत. दिवस मावळून रात्र झाली पण त्यांना त्याची महाकाय पांढरी आकृती स्पष्ट दिसत होती. पाठलाग करता करता आता ते त्या डोंगराच्या माथावर पोहोचले. पायाखालची जमीन आता पूर्णपणे अंधारात बुडाली. शिवाय त्यांच्या भावाचे ओझे न्यायचे ही काही सोपी गोष्ट नव्हती. चार डोळ्याचा त्यांचा कुत्रा माग काढण्यात गुंग झाला होता. अस्वल आता दमला असणार पण तेही दमले होते.

‘‘ मला खाली ठेवा आता ! बराय माझा पाय !’’ जाड्या भाऊ म्हणाला. त्यांनी त्याचे ऐकले आणि त्याला खाली ठेवले.

त्याने आपल्या भाल्यावर झडप मारली व सगळ्यांच्या पुढे धाव घेतली. अस्वलही थांबले, गुरगुरत तो कुत्र्याचा घास घेणार तेवढ्यात त्या जाड्या आळशी भावाने आपला भाला सरसावला व थेट अस्वलाच्या छातीत खुपसला. तो महाकाय, राक्षसी अस्वल मरुन खाली पडला.

उरलेल्या तिघा भावांनी त्याला गाठले तोपर्यंत त्याने तो अस्वल सोलण्यास सुरुवात केली होती.

‘‘या चला जेऊया आता. पळून पळून मला कडाक्याची भूक लागली आहे.’’ जाड्या म्हणाला.

त्यांनी अस्वलाचे मांस भाजायला घेतले. त्याची चरबी वितळून खाली पाझरत होती. ते पोटभर जेवले अगदी त्या जाड्याचे पोट भरेपर्यंत. जेवण झाल्यावर ते जरासे मागे रेलून बसले, तेवढ्या पहिल्या शिकाऱ्याने त्याच्या पायाकडे पाहिले.

‘‘खाली बघा !’’ तो म्हणाला.

त्या चौघांनी खाली पाहिले..खाली चमचमणारे दिव्यांशिवाय दुसरे काहीच नव्हते.

‘‘आपण डोंगरावर नाही ! आपण आकाशात आहोत !’’ तो ओरडला.

ते खरंच आकाशात होते. ग्रेट बेअर खरोखरीच मायावी होते. त्यांच्या पाठलाग टाळण्यासाठी त्याने पृथ्वी सोडली होती पण शिकाऱ्यांनी त्याचा माग न सोडण्याच्या नादात या विचित्र वाटेवर पाऊल ठेवले होते.
त्याचवेळी त्यांचे कुत्रे केकाटले.

‘‘ग्रेट बेअर ! दुसरा शिकारी ओरडला. ‘‘ बघा !’’

त्यांनी त्या दिशेला पाहिले तर ज्या ठिकाणी त्यांनी त्या अस्वलाची हाडे टाकली होती तेथे तो अस्वल परत जिवंत होत होता. ते आश्चर्याने पहात असतानाच त्याने परत पुढे पळायला सुरुवात केली. त्याच्या मागे त्या कुत्र्यानेही उडी मारली.

‘‘माझ्या मागे या !’’ दुसरा शिकारी परत ओरडला. आपापले भाले सरसावत ते चौघेही आकाशात त्या ग्रेट बेअरचा पाठलाग करु लागले.

‘‘हंऽऽऽऽ हा पाठलाग अजुनही चालला आहे..’’ गावातील म्हातारे सांगतात. प्रत्येक शिशीर ऋतूत शिकारी आकाशात ग्रेट बेअरचा पाठलाग करतात, त्याची शिकार करतात. त्याला फाडल्यावर त्याचे रक्त आकाशातून खाली पडते ज्याने मॅपलच्या झाडांची पाने लाल होतात. ते त्या अस्वलाचे मास शिजवताना जी चरबी खाली ओघळते त्याने खाली गवत पांढरे होते.
ऋतू बदलताना जर तुम्ही आकाशात नीट पाहिलेत तर आजही ती कथा तुम्ही आकाशात वाचू शकता. मधला चौकोन याला ते अस्वल म्हणतात व त्याच्या बाजूला ते चार शिकारी व त्यांचा कुत्रा तुम्हाला अंधुकसे दिसतील. त्या ऋतूत ते नक्षत्र उलटे होते आणि जग म्हणते....त्या जाड्या आळशी शिकाऱ्याने पहा त्या अस्वलाला मारला...’’ पण जसा वसंत ऋतू येतो, पोर्णिमेचा चंद्र डोक्यावर दिसायला लागतो तेव्हा तो अस्वल परत उठतो व पळायला लागतो व परत एकदा तो जिवघेणा पाठलाग सुरु होतो..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आता आपण आपली प्रार्थना म्हणू... ती म्ह्टलीत तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन...
‘‘गरुडाची ?’’
हो ! म्हातारा म्हणाला.

‘‘हंऽऽ म्हणा माझ्या मागे....

हे परमात्म्या !
ज्याचा आवाज या वाऱ्यात घुमतो,
आणि ज्याच्या श्र्वासात हे जग जिवंत आहे,
तू ऐक ! मी क्षुद्र आहे.
तुझ्या शक्तीची आणि ज्ञानाची मला गरज आहे.

या निसर्गात मला चालू दे !
आणि माझ्या दृष्टीस लाल जांभळा
सूर्यास्त दररोज पडू देत.

माझ्या हातात एवढी ताकद दे की
तुझ्या निर्मितीचा
मी आदर करु शकेन

माझी श्रवणशक्ती
तुझा आवाज ऐकण्याइतकी
कुशाग्र असू देत

मला बुद्धी दे
जेणे करुन तू आम्हाला जे शिकवितोस
ते मला समजेल.

प्रत्येक पानात आणि दगडात
तू जे ज्ञान लपविले आहेस
ते मला उमगू दे.

माझ्या भावापेक्षा मला जास्त शक्ती नको.
पण माझ्या शत्रूशी,
म्हणजे स्वत:शीच,
लढण्याइतकी मला शक्ती निश्चितच दे.

तुझ्याकडे ताठ मानेने येण्यासाठी
मला नेहमी तयार ठेव.
म्हणजे सूर्यास्तासारखे
जेव्हा माझे आयुष्य लयास जाईल
तेव्हा माझ्या आत्म्याला
तुझ्यात विलीन होण्यास
कसलीही शरम वाटणार नाही.

हंऽऽऽ आता ऐका शेवटची गोष्ट..

मौजमजा

एक काळ असा होता की माणसाला आनंद, मौजमजा हे शब्दच माहीत नव्हते.

आयुष्यभर कष्ट करायचे, अन्न मिळवायचे, खायचे, पचवायचे व दमून झोपायचे एवढाच काय तो दिनक्रम. दिवसामागून दिवस असेच जात होते. कष्ट, जास्त कष्ट, झोपणे आणि उठल्यावर परत कष्ट आणि जास्त कष्ट ! शेवटी त्यांच्या एकसूरी आयुष्यावर कंटाळ्याचा गंज चढला.

त्याच काळात एक जोडपे समुद्रापासून जवळच त्यांच्या झोपडीत एकटेच रहात होते. त्यांना तीन उमदी मुले होती. बापाच्या पावलावर पऊल टाकून ते उत्तम शिकारी होणार याबाबत त्यांना शंकाच नव्हती. एवढ्या लहान वयातच त्यांना खडतर आयुष्याची सवय झाली आणि ते कुठल्याही अडचणींवर मात करण्याची क्षमता आता त्यांच्यात निर्माण झाली. त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणी त्यांच्या अन्नापाण्याची सोय झाली याचा परम संतोष होत असे.
पण दुर्दैवाने त्यांचा मोठा मुलगा व काही काळानंतर दुसरा मुलगा शिकारीला गेले ते परतच आले नाहीत. त्यांनी मागे कुठलाही मागमूस ठेवला नाही. कंटाळून त्यांनी त्यांचा शोध थांबवला. दु:खाने आक्रोश करीत त्यांनी ह्रदयावर दगड ठेवून त्यांच्या धाकट्या मुलावार लक्ष देण्यास सुरुवात केले. ते त्याची काळजी घेत. पण तो आता वडिलांबरोबर शिकारीला जाण्याएवढा मोठा झाला होता. या मुलाचे नाव होते आर्माईन. याला वडिलांबरोबर शिकारीला जाण्यास आवडत नसे कारण ते फक्त समुद्रावर माशांची शिकार करीत. त्याला रस होता जंगलात काळविटांची शिकार करण्यात. खरा शिकारी आयुष्यभर काळजी करु शकत नाही या म्हणीला अनुसरुन त्याच्या वडिलांनी शेवटी त्याला जंगलात काळविटाच्या शिकारीस जाण्यासाठी परवानगी दिली. ते आपले कयाक घेऊन समुद्रावर जात.

एक दिवस असाच काळविटाचा पाठलाग करत असताना आर्माएनला त्याच्या डोक्यावर एक भला मोठा गरुड घिरट्या घालताना दिसला. त्याने एक बाण भात्यातून काढला पण धनुष्याला लावला नाही कारण तो गरुड घिरट्या घालत त्याच्यापासून थोड्या अंतरावर उतरला व त्याच्या कडे पाहू लागला. पुढच्याच क्षणी त्याने त्याच्या डोक्यावरील पिसांची कुंची काढली. त्याचबरोबर त्याचे एका तरुणात रुपांतर झाले. तो तरुण आर्माईनला म्हणाला,

‘‘ मीच तुझ्या दोन भावांना मारले आणि तू जर घरी गेल्यावर मौजमजेचा, मोदगाण्यांचा, खाण्यापिण्याचा आनंदत्सोव साजरा करेन असे मला वचन दिले नाहीस तर मी तुलाही मारीन.’’ बोल तुला मान्य आहे का नाही ?’’

‘‘मी आनंदाने हे मान्य करेन फक्त एकच अडचण आहे. मला गाणे म्हणजे काय हे माहीत नाही आणि मौजमजा, आनंदोत्सव हे काय आहे ?’’

‘‘तू ते करणार की नाही हे आधी सांग!’’

‘‘मी तू म्हणतोस ते सगळे करेन पण मला खरच या सगळ्याचा अर्थ माहीत नाही. तो तू सांगितलास तर मी ते सगळे निश्चितच पार पाडेन. मला मरायची हौस मुळीच नाही...!’’

‘‘ जर तू माझ्याबरोबर माझ्या आईकडे आलास तर ती तुला शिकवेल. तुझ्या दोन्हीही भावांनी गाणे शिकण्यास व मौजमजेस नकार दिला म्हणून मी त्यांना ठार मारले. आता तू माझ्याबरोबर ये. शब्द गाण्यामधे कसे गुंफायचे ते शिक. मौजमजा, गाणेबजावणे काय असते तेही शिक. मग तू तुझ्या घरी जाऊ शकतोस.

‘‘मी येतो तुझ्याबरोबर ’’ आर्माईन म्हणाला. ते ऐकल्याबरोबर ते दोघेही निघाले. आता तो गरुड गरुड राहिला नव्हता तर पिसांच्या कपड्यातील एक उमदा तगडा तरुण झाला होता. ते चलात होते, चालत होते. त्यांनी बऱ्याच दऱ्या, टेकड्या पार केल्या व शेवटी ते एका उंच पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले.

‘‘या पर्वतमाथ्यावर आमचे घर आहे.’’ तो गरुड म्हणाला. ते तो पर्व मोठ्या कष्टाने चढत चढत वर पोहोचले जेथून त्यांना खाली शिकाऱ्यांचे काळविटांचे कुरण दिसले. पण त्याला अचानक दबका धडधड असा आवाज ऐकू आला. जणू काही एखादे ह्रदय मोठ्या आवाजात धडधडतंय. जसे ते वर जात होते तसा तो आवाज स्पष्ट व मोठ्याने ऐकू येऊ लागला. एवढ्या मोठ्याने की आर्माईनच्या कानात कानठळ्या बसू लागल्या.

‘‘तुला कसला आवाज ऐकू येतोय का ?’’ गरुडाने विचारले.

‘‘हो कसला तरी विचित्र पण कानठळ्या बसविणारा. कधीच न ऐकलेला!’’

‘‘ हंऽऽऽऽ माझ्या आईच्या धडधडणाऱ्या ह्रदयाचा आवाज आहे तो !’’

शेवटी त्या पर्वताच्या सर्वोच्च कड्यावरील त्याच्या घराजवळ ते पोहोचले.

‘‘तू जरा येथेच थांब. मी माझ्या आईला तुला भेटण्यासाठी तयार करतो’’
थोड्याच वेळात तो परत आला व त्याने आर्माईनला आत बोलावले. इतर घरांसारखे घर होते. आत एका लाकडी दिवाणावर गरुडाची आई बसली होती. जख्ख म्हातारी, कृष व दु:खी. तिचा मुलगा म्हणाला,

‘‘ हा बघ तो माणूस. यानेच परत गेल्यावर तो उत्सव भरविण्याची तयारी दाखविली आहे. पण त्याला एक अडचण आहे. त्याला म्हणजे काय करायचे हेच माहीत नाही. कसे गायचे, ढोलक्याच्या तालावर आनंदासाठी कसे नाचायचे हेच त्याला नाहीत नाही. हेच शिकण्यासाठी हा इथपर्यंत आला आहे’’

हे ऐकल्यावर त्या कृष म्हातारीच्या चेहऱ्यावर टवटवी आली. ती उत्साहाने बोलू लागली, ‘‘ प्रथम तुला हे शिकण्यासाठी मोठी खोली बांधावी लागेल ज्यात अनेक माणसे मावू शकतील.''

त्या दोघांनी लगेचच एक मोठी खोली बांधण्यास घेतली ज्याला आपल्या भाषेत कागस्से म्हणतात. ही आपल्या इतर खोल्यांपेक्षा जरा प्रशस्त असते. ती खोली बांधून झाल्यावर मग गरुडाच्या आईने त्यांना शब्द गाण्यात गुंफायला शिकविले व नंतर त्याला चालही लावून दाखविली. मग तिने एक ढोलके तयार केले व ते ठेक्यात वाजवून त्या ठेक्यावर कसे नाचता येते हेही शिकविले. जेव्हा आर्माईनने हे सगळे शिकून घेतले तेव्हा ती म्हणाली, ‘‘प्रत्येक उत्सवाआधी भरपूर मांस गोळा करायला लागते. मग अनेक लोकांना त्या मेजवानीसाठी आमंत्रीत करावे.

‘‘ पण आम्ही दुसऱ्या कुठल्याही माणसाला ओळखत नाही...’’ आर्माईन म्हणाला.

‘‘बरोबरच आहे. मनुष्यप्राणी एकाकी असतो कारण त्यांना अजून आनंद म्हणजे काय हेच माहीत नाही.’’ गरुडाची आई स्मित करत म्हणाली.

‘‘तू काळजी करु नकोस. सगळी तयारी कर. मग माणसे शोधण्यास बाहेर चक्कर मार. तुला अनेक जोडपी भेटतील. त्यांना गोळा कर व मेजवानीचे निमंत्रण दे. मग तुझ्या नृत्यसंगीत मेजवानीस प्रारंभ कर.’’

हे सांगितल्यावर तिने त्याला मेजवानीच्या आयोजनातील बारकावे समजावून सांगितले. व म्हणाली, ‘‘ मी गरुड आहे पण मी एक म्हातारी स्त्रीही आहे. मलाही इतर स्त्रियांसारखी मौजमजा कराविशी वाटते. आता मी तुला एवढे शिकविल्यावर तू मला मी मागेन ती गुररुदक्षिणा देशीलच. मी फार काही मागणार नाही पण मला तू आतड्यांपासून विणलेले धागे भेट म्हणून दे. मला वाटते हे मागणे फार विशेष नाही पण मला त्याने आनंद होईल हे निश्चित.’’

आर्माईन गोंढळून गेला. आता या आजीला असला धागा कुठून आणून देऊ ?’’ तो मनात म्हणाला. त्याच्या घरे असले पुष्कळ धागे होते पण आत्ता कुठून आणायचे ? तेवढ्यात त्याला आठवले की त्याच्या भात्यातील बाणाची टोके असल्याच धाग्यांनी बांधलेली होती. त्याने ते सगळे धागे सोडविले आणि त्या गरुडाच्या आईला दिले... आईचा निरोप घेऊन त्या गरुडाने परत आपले मूळरुप धारण केले व आर्माईनच्या गळ्याभोवती आपले पंजे टाकले. कड्यावरुन खाली झोकून देऊन तो गरुड काही क्षणातच खाली उतरला. ज्या ठिकाणी ते भेटले होते तेथेच जमिनीवर त्याने आर्माईनला डोळे उघडण्यास सांगितले. त्यांची आता दोस्ती झाली होती पण आता निरोप घ्यायची वेळ आली होती. त्याचा निरोप घेऊन आर्माईनने घाईघाईने घर गाठले व आपल्या आईवडिलांना सगळी हकिकत सांगून तो म्हणाला,

‘‘ माणसे एकाकी असतात कारण त्यांना आनंदात कसे रहायचे ते माहीत नसते. पण मला गरुडाने आनंदी राहण्याचे रहस्य शिकविले आहे. आता मी माणसांना ती विद्या शिकवेन व त्या आनंदात त्यांना सहभागी करुन घेईन.’’

आर्माईनच्या आईवडिलांनी मोठ्या कुतुहलाने आर्माईनची ही हकिकत ऐकली. त्यांचे मन उल्हासित झाले व डोळे चमकू लागले कारण त्यांना असल्या गोष्टीची कसलीही कल्पनाच नव्हती. आनंदाच्या, मौजमजेच्या कल्पनेनी त्यांचे ह्रदय धडधडू लागले. अर्थातच त्यांनी आर्माईनला कसलाही विरोध केला नाही कारण त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा गमवायचा नव्हता.

लवकरच गरुडाच्या मेजवानीगृहाइतकीच मोठी खोली बांधण्यात आली. त्यात मोठे हंडे भरुन मासे, व काळविटाचे मांस मुरत ठेवण्यात आले. आर्माईन व त्याच्या आईवडिलांनी मग त्यांच्या आठवणी गाण्यात गुंफल्या. त्यांनी ढोलकी तयार केली एवढेच नव्हे तर त्यांनी काळविटाच्या आतड्यापासून तयार केलेल्या धाग्यापासून व लाकडापासून तंतू वाद्ये तयार केली. जशी तंतू वाद्ये व ढोलकी तालात वाजू लागली तशी त्यांची पावले आपोआप त्या तालावर थिरकू लागली. हात लयीत हलू लागले. त्यांची मने उल्हसित झाली. त्यांचा अनैसर्गिग निराशा पळून गेली. त्यांच्या शरीरातून एक उबदार लहर दौडत गेली व ते खुषीने बेहोष झाले. अशा अनेक संध्याकाळ तयारीत गेल्या.

तयारी झाल्यावर आर्माईन मग मेजवानीची आमंत्रणे देण्यासाठी बाहेर पडला. ते त्या जंगलात एकटेच रहात नव्हते हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. आनंदात सहभागी होण्यासाठी माणूस नेहमीच सोबत शोधत असतो हे त्याच्या लक्षात आले. त्याला सगळीकडे माणसेच माणसे दिसू लागली....विचित्र का होईना पण त्याला माणसे भेटत होती. त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची कातडी पांघरली होती. कोणी लांडग्याची तर कोणी कोल्ह्याची. कोणी सश्याची तर कोणी खारीची. कोणी अस्वलाची तर कोणी काळविटाची.... आर्माईनने जो भेटेल त्याला मेजवानीचे निमंत्रण दिले. सगळे जमल्यावर त्यांनी त्यांच्या आनंदोत्सवास सुरुवात केली. गाणी म्हटली. त्या गाण्याच्या साथीला वाद्ये वाजविली व त्या तालावर सुंदर नाच केले. खळाळणाऱ्या हास्याने व विनोदाने वातावरण भरुन गेले. सर्वांनी एकमेकास भेटवस्तू दिल्या. एवढे मनमोकळे वातावरण त्यांनी आजवर कधीच अनुभवले नव्हते. जेवणाने तर या सगळ्या आनंदावर कडी केली. सगळ्यांनी आर्माईनच्या आईच्या जेवणाचे तोंड फाटेपर्यंत कौतुक केलं. रात्रभर मेजवानीच गोंधळ चालू होता. ज्या डोंगरामधून संध्याकाळीच अंधार होत असे, एखादा दिवाही लुकलुकत नसे त्या जंगलात आर्माईनच्या घरातील दिवे काहीतरी चालले आहे हा निरोप सर्वदूर पोहोचवीत होता.

पहाट झाली आणि सगळे पाहुणे जाण्यासाठी घराबाहेर आले व आपल्या चार पायांवर धावू लागले.
ती माणसे नव्हती तर आर्माईनच्या आईवडिलांचे कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून गरुडाच्या आईने पाठविलेले सोबती, सवंगडी होते... तेव्हापासून माणसापेक्षा कमी आढ्यतेखोर असलेले प्राणी हे प्रथम मेजवानीस निमंत्रीत केले जातात...बर का मुलांनोऽऽऽ... पण गोष्ट इथेच संपत नाही.

या मेजवानीनंतर आर्माईन एकदा शिकारीस गेला असता त्याला त्याचा जुना मित्र गरुड भेटला.. त्याने माणसाचे रुप घेतल्यावर ते दोघे त्याच्या आईला भेटण्यास गेले... ती म्हातारी त्यांचे आभार मानण्यास सामोरी आली. आर्माईनने तिला ओळखलेच नाही ती आता खूपच तरुण दिसत होती.... थोडक्यात काय जेव्हा माणसे मौजमजा करतात तेव्हा सगळे गरुडही तरुण होतात...

समाप्त.
भाषांतर : जयंत कुलकर्णी.
लहान मुलांसाठी आजपर्यंत काहीच लिहिले नव्हते. मधे बहिणीच्या नातीला या गोष्टी सांगितल्या... मग लिहिल्या. तिला आवडल्या..म्हणून येथेही टाकतोय..

लहान मुलांच्या गोष्टीत त्या त्या जमातीच्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडतेच पडते. उदा या गोष्टींमधे आकाशात दिसणारी नक्षत्रे येतात. ती वाट दाखवतात. निसर्ग प्राणी इ इ हे त्यांच्या संस्कृतीत किती महत्वाचे आहे हेही कळते. युरोपमधे लहान मुलांच्या गोष्टींमधे नेहमीच एखादा मुलगा गरीब असतो. त्याच्यावर त्याचीच मावशी/आत्या/काका अन्याय करीत असतात. आईवडील नसतात. मग तो पळून जाऊन बोटीत बसतो... भारतात येतो खूप पराक्रम करतो व श्रीमंत होतो...सरदार होतो. या गोष्टी आपल्याला युरोपमधे असलेल्या त्या काळातील दारिद्याविषयी बरेच काही सांगतात व त्यावर मात करण्याचे बाळकडूही देतात. या उलट आपल्या येथे प्रेम, सद्‍भावना, आदर, युक्ती, माणसावरील विश्र्वास, इत्यादी इ. भावनांवर गोष्टी असतात... अर्थात हे मी मी ऐकलेल्या कथांवरुन सांगतोय. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकेल... :-)

कथाबालकथाभाषांतर

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

28 Dec 2016 - 6:58 pm | साधा मुलगा

छान आहेत गोष्टी!
पहिली गोष्ट मी मृग नक्षत्रसंबंधी ऐकली होती, ते अस्वल दाखवलेले तारे म्हणजे एक हरीण आहे आणि आणखी एक तारा अथवा ताऱ्यांचा समूह म्हणजे शिकारी आहे.

वा! अत्यंत रोचक कथा आहेत. फारच सुंदर!

पैसा's picture

28 Dec 2016 - 7:06 pm | पैसा

किती सुरेख कथा!! मृग नक्षत्राबद्दलची गोष्ट खूप आवडली, तशी लोकांनी का नाचले गायले पाहिजे याबद्दलचीही. साध्यासुध्या लोकांच्या साध्यासुध्या गोष्टी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Dec 2016 - 7:47 pm | अनिरुद्ध.वैद्य

विशेषतः प्रार्थना फारच आवडली!!

मितान's picture

29 Dec 2016 - 10:51 am | मितान

सुंदर !!!!

नरेश माने's picture

29 Dec 2016 - 2:42 pm | नरेश माने

मस्त आहेत दोन्ही कथा. आणि प्रार्थना सुद्दा खुपच छान आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2016 - 3:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक कथा !

कपिलमुनी's picture

29 Dec 2016 - 3:15 pm | कपिलमुनी

बालकथा छान आहेत.

यशोधरा's picture

29 Dec 2016 - 9:17 pm | यशोधरा

सुरेख गोष्टी, गोष्टीतील प्रार्थना ज्या मूळ प्रार्थनेवरुन अनुवादित केली आहे ती मूळ प्रार्थना देता येईल का?

जयंत कुलकर्णी's picture

30 Dec 2016 - 7:34 am | जयंत कुलकर्णी

मी जेथून घेतले होते ते सापडले नाही पण यात दोन ओळी जास्त आहेत ती देतोय...
"Oh, Great Spirit, whose voice I hear in the wind,
Whose breath gives life to all the world.
Hear me; I need your strength and wisdom.
Let me walk in beauty, and make my eyes ever behold the red and purple sunset.
Make my hands respect the things you have made and my ears sharp to hear your voice
Make me wise so that I may understand the things you have taught my people.
Help me to remain calm and strong in the face of all that comes towards me.
Let me learn the lessons you have hidden in every leaf & rock.
Help me seek pure thoughts & act with the intention of helping others.
Help me find compassion without empathy overwhelming me.
I seek strength, not to be greater than my brother, but to fight my greatest enemy - Myself.
Make me always ready to come to you with clean hands and straight eyes.
So when life fades, as the fading sunset, my spirit may come to you without shame.

यशोधरा's picture

30 Dec 2016 - 3:55 pm | यशोधरा

धन्यवाद काका.

कर्ण's picture

30 Dec 2016 - 3:38 pm | कर्ण

स्वतःच लिहिलेले स्वतः ही वाचत चला, माझ्या आयुष्यात इतक्या फालतू गोष्टी कधी वाचल्या नाहीत ....
माझ्या कंमेंट ला फीडबॅक म्हणूनच गृहीत धरा, नाही तर हणाल "पुणेरी टोमणे"

जयंत कुलकर्णी's picture

30 Dec 2016 - 6:09 pm | जयंत कुलकर्णी

क़र्णसाहेब ठीक आहे पण तुम्ही एवढे चिडून प्रतिसाद का देताय ? मी तुम्हाला कधी टोमणा मारलाय का ? ( मी आत्तापर्यंत मिपावर फक्त एकदाच टोमणा मारलाय. ते तुम्हीच असाल तर मात्र माझा नाईलाज आहे) आणि दुसरे..आपण लिहिलेले सगळे हे सगळ्यांना आवडायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे ? आपल्या फिडबॅकचे स्वागत आहे... अर्थात फिडबॅक हा कितिजणांकडून आलाय यालाही मी महत्व देतो. या कथा लहान मुलांसाठी आहेत हे लक्षात घेतले तर बरं....
:-) :-)

ज्योति अळवणी's picture

31 Dec 2016 - 2:28 pm | ज्योति अळवणी

खूप सुंदर आहेत दोन्ही कथा. दगदगीच्या आयुष्यात अशा हलक्या फुलक्या कथा कोणत्याही वयातल्या व्यक्तीला आवडतील अस मला वाटत.

संदीप डांगे's picture

1 Jan 2017 - 8:57 pm | संदीप डांगे

छान लिहिलंय काका! रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता. मराठीत अनुवादीत कथा असायच्या त्यात. त्यांची आठवण आली. त्यांच्या कथांचे विषय, वातावरण, संदेश खूप वेगळे असायचे. दुसर्‍या देशांच्या अशा बालकथा, लोककथा वाचल्या की अद्भूत वाटतं.


रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता. मराठीत अनुवादीत कथा असायच्या त्यात.


आमच्याकडेही यायचे. आणि इतर गोष्टींची पुस्तकेही यायची.
त्यातली निळा घोडा गोष्ट अजुनही आठवते. खुप छान वाटायची तेंव्हा.

अनिता's picture

3 Jan 2017 - 11:17 am | अनिता

"रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता"

सोविएत नारी असे रशियन मासिक आठ्वते आहे