बालदिन लेखमाला- मुलाखत फिल्मी दुनिया -पार्थ भालेराव

भुमी's picture
भुमी in जनातलं, मनातलं
27 Nov 2016 - 11:41 pm

.inwrap
{
background-color: #DFEDF8
}

1
नमस्कार मैत्रिणींनो! आज या लेखात आपण बालकलाकार पार्थ भालेराव याची ओळख करून घेणार आहोत. लहान वयात त्यानं बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांत कामे केली. त्याचा प्रवास वाचू त्याच्याच शब्दांत….

Parth

भुमी - पार्थ, तुझा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला?
पार्थ - माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग - पाचवी ते दहावी. पाचवीत असताना आमची शाळेची सहल गेली होती. त्या सहलीत मी, 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील पोवाडा सगळ्या मुलांसमोर आणि शिक्षकांसमोर सादर केला होता. तेव्हा श्री. रवींद्र सातपुते सरांनी तो पोवाडा ऐकला. सर शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख होते. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत ठराविक मुलांना बोलावले. त्यात मीही होतो. मला आधी भीतीच वाटली की का बरं बोलावलं असेल? पण तिथे गेल्यावर समजलं की शाळेच्या नाटकाकरता काही मुलांची निवड करायची आहे. तिथे माझी निवड झाली. "तीन चाकी आभाळ" नावाचं नाटक होतं ते. त्यात मला छोट्या डॉनची भूमिका होती. या नाटकाला आंतरशालेय स्पर्धांमध्ये बक्षिसेही मिळाली.

भुमी - पार्थ, चित्रपटांतील तुझ्या पदार्पणाबद्दल सांग ना.
पार्थ - शाळेत एकदा श्री. रणजित गुगळे सर लहान मुलांची शॉर्टफिल्मकरीता मुलांची निवड करायला आले होते. त्यावेळी सातपुते सरांनी मला तिथे पाठवले. तिथे माझी निवड झाली. त्या फिल्मचं नाव होतं ‘खालती डोकं वरती पाय’. या शॉर्टफिल्मला कान्सचित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला आहे.
सातपुते सरांकडे एकदा श्री. चंद्रकांत कुलकर्णी सरांकडून चित्रपटासाठी लहान मुले हवीत म्हणून विचारणा करण्यात आली होती, तेव्हा सरांच्या सांगण्यावरून मी ऑडिशनला गेलो. खूपच गर्दी होती. माझा नंबर लागला, मी बिनधास्त ऑडिशन दिली. दोन महिन्यांनी आईला माझं सिलेक्शन झाल्याचा फोन आला. ‘तुकाराम’ या मराठी चित्रपटात छोट्या तुकारामच्या मित्राची विष्णूची भूमिका होती ती. काही दिवसांनी श्री. ओंकार बर्वे यांचा आईला फोन आला की पार्थला घेऊन एफ्. टी. आय. मध्ये घेऊन या. तिथे किल्ला या चित्रपटासाठी माझी ऑडिशन झाली. मी निवडला गेलो बंड्याच्या भूमिकेसाठी.

भुमी - किल्ला चित्रपटाविषयी सांग.
पार्थ - किल्ला चित्रपटाचं शूटिंग म्हणजे एक धमाल ट्रीपच होती. जवळजवळ तीन महिने कोकणातील गुहागर येथे आमचे शूटिंग चालू होतं. या चित्रपटात माझ्या वयाचीच मुलं असल्यानं आमचा मस्त ग्रुप झाला होता. सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी होती की आम्ही जिथे रहात होतो ,तिथे मागेच समुद्र होता. आम्हा सर्वांना समुद्रावर जायला, वाळूत खेळायला, पाण्यात खेळायला फार आवडायचं. पण आम्हा मुलांना समुद्रावर एकटं जायची परवानगी नव्हती, मग आम्ही एक युक्ती लढवली. समुद्राजवळच एक लायब्ररी होती. शूटिंग लवकर संपलं की आम्ही लायब्ररीत जातोय असं सांगून समुद्र किनारी जायचो. पण आमची युक्ती शूटिंगच्या क्रुला लक्षात आली. परत समुद्रावर एकटं न जाण्याची ताकीद दिली.
या चित्रपटातील एका प्रसंगाचं मला खूप वाईट वाटलं. मला पाळीव प्राणी खूप आवडतात. एका कुत्र्याला त्रास देण्याचा सीन होता, हा सीन शूट करण्याआधी मी त्या कुत्र्याबरोबर खूप खेळलो. पण शूटनंतर तो कुत्रा मला घाबरून पळू लागला, मला तेव्हा खूपच वाईट वाटलं.
कोकणातले ते निसर्गरम्य दिवस आणि आमची धमाल गँग नेहमी आठवणीत राहील.

killa

भुमी - बॉलिवूडचे बादशहा, बिग बी अमिताभ, यांच्यासोबत तू भूतनाथ रिटर्न्स् मध्ये काम केलंस. या चित्रपटाचे तुझे अनुभव ऐकायला आवडेल.
पार्थ - हो, किल्ला चित्रपटाचे शूटिंग चालू असताना जार प्रॉडक्शनचे अजय रॉय तिथे आले होते. तेव्हा त्यांनी माझं काम पाहिलं आणि रणजित गुगळे यांना मला ऑडिशनसाठी मुंबईला पाठवायला सांगितलं.
भूतनाथ रिटर्न्स मध्ये काम करायला मिळेल, असं खरंतर मला वाटलं नव्हतं. तेव्हा मी बराच लहान होतो. त्यावेळी तीन महिन्यांनी किल्लाचं शूटिंग पूर्ण करून मी घरी आलो होतो आणि लगेचच ऑडिशनसाठी मला बी. आर . चोप्रा यांच्या स्टुडिओत मुंबईला जावं लागणार होतं. खरंतर मला खूप कंटाळा आला होता. मी आणि आई मुंबईला आलो. ऑडिशनसाठी बरीच मुलं आली होती. त्यातल्या चौदा मुलांची निवड झाली. मग चौदातून दहा, दहातून सहा, सहातून तीन, मग दोन आणि शेवटी माझी निवड झाली . या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीच माझी ऑडिशन घेतली.
शूटिंगच्या आधी नितेश तिवारी सरांनी पाच दिवस आमच्या टीमचे वर्कशॉप घेतले. हे वर्कशॉप धारावी या मुंबईच्या झोपडपट्टी भागातच घेतले. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलं कशी बोलतात, त्यांचे जीवन कसे असते, याचा अंदाज मला आला. तसं पहायला गेलं तर ही मुले आपल्यासारखीच असतात.पण परिस्थितीमुळे त्यांना फार सोयी मिळत नाहीत, त्यांना चांगल्या शाळेत जाता येत नाही हे लक्षात आल्यावर वाईट वाटलं. धारावीतल्या सर्व लोकांनी आम्हाला खूप मदत केली.
शूटिंगचा पहिला दिवस माझ्या नेहमीत लक्षात राहील, कारण फक्त टी.व्ही. आणि चित्रपटामध्ये बघितलेल्या अमिताभ सरांना मी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलं आणि भेटलो. मी व आई सेटवर बसलो होतो आणि अचानक ‘टाक टाक’ असा बुटांचा आवाज आला आणि पाहतो तर काय? चक्क अमिताभ बच्चन सर आमच्या समोरून चालत गेले. मला तर खूप आश्चर्य वाटलं. मी आईला विचारलंसुद्धा इतका मोठा माणूस बॉडीगार्डशिवाय इतका सहज सेटवर कसा काय फिरतोय गं! नंतर आमचे दिग्दर्शक नितेश तिवारी मला व आईला अमिताभ सरांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेले. सर पुस्तक वाचत बसले होते. आधी मला खूप टेन्शन आलं होत. पण ते इतक्या प्रेमानी व शांतपणे माझ्याशी बोलले, की सगळं टेन्शन पळून गेलं. मी त्यांना नमस्कार केला तर ते म्हणाले 'अरे यार हम तो पार्टनर है एेसा मत करनां।' नंतर अमिताभ सरांबरोबर माझी छान गट्टीच जमली. मला ते चॅम्पियन म्हणायचे. या चित्रपटाचं पूर्ण शूटिंग अगदी हसत खेळत व मजेत झालं.

AB

बच्चन सरांनी मला खूप कम्फर्टेबल केलं आणि त्यामुळे मी सहज अभिनय करू शकलो. माझं काही चुकत असेल तर मला ते सांगायचे. खरंच ह्या भूतनाथ नावाच्या मोठ्या मित्राकडून मी खूप काही शिकलो आणि धमाल केली.

Amitabh

‘पार्टी तो बनती है’ या गाण्याचं शूटिंग पण मस्त झालं.

AB1

थँक यू अमिताभ सर !
या चित्रपटाचे शूटिंग साडेचार महीने चालू होतं.

dubai

नंतर प्रमोशनकरिता मी दुबईला गेलो. इ. दहावीचं वर्ष होतं. संस्कृतचा पेपर फक्त शेवटचा राहिला होता. मला फोन आला की किल्ला आणि भूतनाथ रिटर्न्सच्या भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. प्रथम माझा विश्वासच बसेना पण नंतर भूतनाथच्या टीममधल्या दोन तीन जणांचे अभिनंदनाचे फोन आले. तसेच राष्ट्रपतींच्या कार्यालयातून रीतसर पत्र आणि आमंत्रण आले. ३ मे २०१५ ला मला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रादेशिक चित्रपटांत तसेच भूतनाथ रिटर्न्स चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.

NationalAward

भूतनाथ रिटर्न्स चित्रपटाच्या वेळी मी बऱ्याच कलाकारांना जसे की रणबीर कपूर, शाहरुख खान, आमिर खान आदींना भेटलो. तसेच अनेक दिग्दर्शकांनाही भेटलो.

भुमी - अजून कोणत्या चित्रपटांत आणि नाटकांत तू काम केले आहेस?
पार्थ - श्री. लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘लालबागची राणी’ या चित्रपटात मी गोविंदाची भूमिका केली. तसेच सचिन पुरोहित आणि अभिजित कवठाळकर यांच्या ‘डिस्को सन्या’ या चित्रपटात सन्याची भूमिका केली.
मौनांतर या मूकाभिनय नाट्यस्पर्धेत ‘एंड ऑफ द…’ या एकांकिकेत काम केले यात अभिनयाचे प्रथम पारितोषिक मला मिळाले.

maunantar

भुमी - सध्या काय उपक्रम हाती आहेत?
पार्थ - यंदा बारावीचे वर्ष असल्याने खूप वेळखाऊ किंवा पुण्याबाहेरचे शूटिंग जमत नाही. दोन चित्रपटांचे शूटिंग चालू आहे . नवीन वर्षात मी तुमच्या भेटीला येईनच.

भुमी - पार्थ , लहान वयात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल तुझे खूप कौतुक आणि अभिनंदन.
वाचकांसाठी आणि छोट्या दोस्तांसाठी काही संदेश?
पार्थ - मित्रांनो, सगळ्यांनाच अभिनय करायला जमतं, आवडतं असं नाही. काहींना चित्र काढायला आवडतात. काहींना गाणी म्हणायला आवडतात, काहींना नृत्य तर काहींना खेळायला. जे काही कराल ते मनापासून केलं की आपोआपच त्यात मजा येते, धमाल येते. तुम्हीसुद्धा अशी धमाल शोधा आणि मजा करा!

पार्थला मिळालेले पुरस्कार -
राष्ट्रीय पुरस्कार
लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार
मिफ्टा पुरस्कार
कसबा पुरस्कार
सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
ज्ञानेश्वरी पुरस्कार
शाहू मोडक पुरस्कार
___________________________________________

(बालदिन लेखमालिकेत अनाहितामधे पूर्वप्रकाशित)
*******
1

संस्कृतीकलाचित्रपटप्रश्नोत्तरेप्रतिभा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

28 Nov 2016 - 12:02 am | पद्मावति

सुंदर मुलाखत.
पार्थचं खूप खूप कौतुक. इतक्या लहान वयात किती समज आहे अभिनयाची.

छान झालीये मुलाखत, फोटो दिसत नाहीयेत :(

पैसा's picture

28 Nov 2016 - 7:07 pm | पैसा

मुलाखत आवडली. अतिशय गुणी कलाकार आहे. त्याला पुढच्या करियरसाठी शुभेच्छा!

छान मुलाखत. खरंच इतक्या लहान वयात मिळालेले यश कौतुकास्पद आहे. प्रश्नही आवडले :)

फार सुंदर मुलाखत. पार्थला खूपखूप शुभेच्छा!