पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 10:17 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

पिसूक....
(पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.)

‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला.....

"ॲना ! ॲना !’’ त्याचे वडील हॉलमधून स्वयंपाकघरातील मोलकरणीला हाका मारीत सुटले होते. ‘‘ आत्ताच्या आत्ता किल्लीवाल्याला घेऊन ये !’’ त्या बिचाऱ्या मुलींनी पुढचा दरवाजा उघडून बाहेर धूम ठोकली. दरवाजा लावण्याचाही आवाज आला नाही. म्हणजे त्यांनी तो उघडाच टाकला असणार...घरात कोणी मेल्यावर दरवाजा असा उघडा टाकतात असे त्याच्या मनात क्षणभर चमकून गेले.

पण ग्रेगॉर आता शांत झाला होता.इतका शांत की त्याच्या तोंडातून येणारे शब्द समजत नव्हते. त्याला मात्र ते पहिल्यापेक्षाही स्पष्ट कळत होते. कदाचित त्याला ते आतूनच ऐकू येत असावेत किंवा त्याला त्याची सवयही झाली असावी. बाहेर असलेल्यांनी त्याच्या मदतीसाठी ज्या काही ठाम हालचाली केल्या त्याने त्याला जरा बरे वाटले. त्याला चक्क माणसात आल्याचा भास झाला. डॉक्टर आणि कुलूपकिल्लीवाल्यांकडून काहीतरी चांगले घडेल अशी त्याला आशा वाटली. आता न टाळता येणाऱ्या संभाषणासाठी आवाज स्वच्छ निघावा म्हणून त्याने स्वत:चा घसा हळूच खाकरुन जरा साफ केला. हो काय सांगावे, ते खाकरणेही माणसासारखे ऐकू नाही आले तर ? पुढच्या खोलीत मात्र संपूर्ण शांतता पसरली होती. बहुतेक त्याचे आईवडील हेडक्लार्कबरोबर जेवणाच्या टेबलवर कुजबुजत बसले असावेत. किंवा काय सांगावे, ते सगळे दरवाजाला कान लाऊन आत काय चालले आहे याचा कानोसाही घेत असतील..तो विचार मनात येताच मात्र त्याने दरवाजाला असलेली किल्ली तोंडात धरुन ती फिरविण्याचा प्रयत्न चालू केला. त्याच्या तोंडात दात नव्हते पण त्याचा जबडा ताकदवान होता. त्याने जबड्यात किल्लीचे टोक धरुन ती फिरविण्यास सुरुवात केली. आत कुठे तरी ती जबड्यात बोचली असावी कारण त्याच्या जबड्यातून कसलातरी फिकट रंगाचा द्रव किल्लीवरुन पाझरत खाली येऊन, जमिनीवर त्याचे थेंब पडले.
‘‘ ऐका... तो किल्ली फिरवतोय.’’
ते ऐकल्यावर ग्रेगॉरच्या जिवात जीव आला. त्याला वाटले आता जर त्यांनी एखाद्या शर्यतीमधे देतात तसे ‘‘ग्रेगॉरऽऽग्रेगॉरऽ ग्रेगॉर’’ अशा आरोळ्या मारल्या तर किती बरे होईल. त्या विचारानेच त्याने पुढचा मागचा विचार न करता जबडा आवळला आणि किल्ली जोर लावून फिरवली. कुलूप निघताना जो आवाज येतो तो ऐकल्यावर तर त्याला दरवाजा उघडण्याची घाई झाली.

‘‘चला किल्लीवाला लागला नाही तर !’’

असे मनाशी म्हणून त्याने आपले डोके दरवाजाच्या मुठीवर टेकवले...आणि दरवाजा उघडला.

आत उघडणारा दरवाजा असल्यामुळे बाहेरच्यांना तो अजूनही दिसत नव्हता. दरवाजा ओलांडून त्याला दरवाजाची कड गाठायची होती आणि ती सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक. कारण तो पाठीवर पडला असता तर सगळे संपलेच असते. तो अत्यंत काळजीपूर्वक पुढे सरकत असताना त्याच्या कानावर हेडक्लार्कचा आवाज पडला,

‘‘अरे बापरे !’’

एखाद्या फुग्यातून हवा सुटताना आवाज येतो तसा काहीतरी आवाज झाल्यासारखे वाटले त्याला. पुढच्याच क्षणी ते त्याला दिसले. ते दरवाजाच्या सगळ्यात जवळ उभे होते. त्यांनी एक हात तोंडावर धरला होता आणि कोणी तरी ढकलत असल्यासारखे एक एक पाऊल मागे टाकत होते. त्याची आई...जिचे केस अस्ताव्यस्त उडत होते..तिने हात झाडले व त्याच्या वडिलांकडे असाह्यतेने पाहिले. तिने ग्रेगॉरच्या दिशेने दोन तीन पावले टाकली मात्र ती तेथेच कोसळली. तिच्या कपड्यांचीही तिला शुद्ध राहिली नव्हती. तिने कसेबसे स्वत:ला सावरुन तेथेच बसकण मारली. बसलेल्या धक्क्यामुळे तिची मान तिच्या छातीवर टेकली. प्रयत्न करुनही तिला ती वर करता येईना. त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर वर्णन करता येणार नाहीत असे हिंस्र भाव उमटले व नैसर्गिकपणे त्यांनी आपल्या हाताच्या मुठी आवळल्या. जणू काही त्यांना ग्रेगॉरला फटका मारुन परत खोलीत ढकलायचे होते. पण पुढच्याच क्षणी त्यांनाही असाह्यपणे आपली नजर दुसरीकडे वळवली. आपल्या हातांनी आपला चेहरा झाकून त्यांनी हुंदके देण्यास सुरवात केली. येणाऱ्या हुंदक्यांनी ते थरथरु लागले. त्यांची छाती धाप लागल्यासारखी वेगाने खालीवर होऊ लागली.

ग्रेगॉर एकदम बाहेर आला नाही. त्याने दरवाजाच्या बंद असलेल्या भागावर आपले वजन टाकले व तो उभा राहिला. त्यामुळे त्याचे अर्धेच शरीर दिसत होते. त्याने त्याचे डोके बाहेर काढल्यामुळे त्या अर्ध्या शरीरावर इकडे तिकडे डोकावणारे त्याचे डोके फारच विचित्र दिसत होते. हे सगळे होईपर्यंत चांगलेच फटफटले होते. खिडक्यांच्या तावदानांमधून रस्त्यापलीकडील मद्दड करड्या रंगाची इमारत आता स्पष्ट दिसू लागली. एका इस्पितळाची इमारत होती ती. खिडकीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दिसणाऱ्या त्या इमारतीच्या खिडक्या रटाळ दिनक्रमासारख्या एका रांगेत पसरल्या होत्या ; पाऊस अजूनही पडत होता. थेंब मोठ्ठाले होते आणि थोड्या थोड्या वेळाने पडत होते. टेबलावर नाष्ट्यासाठी ताटे घेतली होती. ही सकाळची न्याहारी म्हणजे ग्रेगॉरच्या वडिलांच्या आयुष्यातेल सगळ्यात महत्वाची घटना होती. न्याहारी करत, वर्तमानपत्रे चाळत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील असंख्य तास त्या टेबलावर व्यतीत केले असतील. त्याच्या समोर असलेल्या भिंतीवर मिलिटरीच्या गणवेषातील रुबाबदार ग्रेगॉरचे छायाचित्र लटकत होते. बैठकीच्या खोलीकडे जाण्याचा दरवाजा उघडा होता. त्यातून पुढचा दरवाजा स्पष्ट दिसत होता आणि त्यातून खाली जाणाऱ्या पायऱ्याही.

‘‘बरं ! मी आता ऑफिसला जाण्यासाठी कपडे करतो.’’ तो म्हणाला.

त्याला काहीतरी बोलायलाच हवे होते कारण बोलण्याच्या परिस्थितीत फक्त तोच होता.
‘‘साहेब मी हटवादी नाही हे तुमच्या लक्षात आले असेल. मला कामाची आवड आहे..ओढ आहे. एवढा प्रवास करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही..पण मी करतो तो ! कामाशिवाय मी जगूच शकत नाही. अरे ! पण साहेब तुम्ही कुठे चालला आहात ? परत कार्यालयात का ? हो ना ? मग हे सगळे साहेबांच्या कानावर घालाल ना ? एखादा क्षण असा आयुष्यात येतो हो... त्या क्षणी तुम्हाला काहीच करावेसे वाटत नाही पण काहीच क्षणांनंतर तुम्ही परत जोमाने कामाला लागता. मी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या साहेबांचे व कंपनीचे काम करतोय याची तुम्हाला कल्पना आहे. शिवाय माझ्यावर माझ्या आईवडिलांची व बहिणीची जबाबदारी आहे. मान्य आहे मी अडचणीत आहे पण मी त्यावर मात करेन. ऑफिसमधे जाऊन कृपया माझ्या अडचणींमधे भर घालू नका. मी तुम्हाला विनंती करतो. माझीही बाजू मांडा. मला कल्पना आहे ज्यांना कोणाला कंपनीच्या खर्चाने प्रवास करायला मिळतो, त्यांचा ऑफिसमधे सगळ्यांनाच हेवा वाटतो. त्यांना वाटते आम्ही मस्त हिंडतो व पोतेभर पैसे जमवतो. अर्थात हा गैरसमज आहे त्यांचा. पण त्यांना कोण समजवणार ? पण साहेब तुम्हाला आपल्या कंपनीची आणि त्यात काम करणाऱ्यांची आपल्या मालकांपेक्षाही जास्त माहिती आहे, कल्पना आहे. आणि तुम्हाला कल्पना असेलच की जो सतत वर्षभर फिरतीवर असतो, जो क्वचितच ऑफिसमधे दिसतो त्याच्याबद्दल कंपनीत काय काय बोलले जाते ते ! आणि दुर्दैवाने त्याला बिचाऱ्याला या सगळ्याची कल्पनाही नसते. जेव्हा तो दमुन भागून फिरतीवरुन परत येतो तेव्हा त्याला त्या गावगप्पांचे परिणाम भोगावे लागतात आणि त्यांचा उगम शोधण्यासाठी बिचाऱ्याकडे वेळही नसतो कारण त्याची परत फिरतीवर जाण्याची वेळ झालेली असते. साहेबऽऽऽ साहेबऽऽऽ माझ्याशी न बोलता जाऊ नका. काहीतरी बोला...मी थोडाफार तरी बरोबर बोलतोय असे तरी म्हणा...’’

पण ग्रेगॉरचे पहिले काही शब्द कानावर पडेपर्यंत हेडक्लार्कने मागे सरकण्यास सुरुवात केली होती. ग्रेगॉरवरची नजर ढळू देता तो माणूस एकेका इंचाने मागे सरकत होता, जणू कुठल्या तरी अदृष्य शक्तीने त्याला त्या खोलीच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आहे. ग्रेगॉर काही बोलणार तेवढ्यात हेडक्लार्क बैठकीच्या खोलीतून मुख्य दरवाजावर पोहोचले. तेथे घाईघाईने त्यांनी पायऱ्यांवरील कठडा पकडण्यासाठी आपले हात फैलावले. जणू काही एखादी पाशवी शक्ती त्यांना आता कडेवर घेणार आहे...

ग्रेगॉरला एवढं समजत होते की त्याची नोकरी वाचवायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत हेडक्लार्क या मनस्थितीत ऑफिसमधे पोहोचता कामा नये. अर्थात हे त्याच्या आईवडिलांना हे समजणे शक्यच नव्हते. या एवढ्या वर्षात त्यांनी ग्रेगॉर आता याच कंपनीत कायमचा राहणार हे गृहीत धरले होते. शिवाय घरच्या कटकटींनी ते इतके गांजून गेले होते की त्यांची पुढचा विचार करण्याची क्षमताच लोप पावली होती. पण ग्रेगॉरला पुढचा विचार करणे भाग होते. हेडक्लार्कला कसे तरी थांबवून, समजूत काढायला हवी होती. शेवटी त्याच्या कुटुंबाचे भवितव्य त्याच्यावर अवलंबून होते. त्याची बहीण आत्ता असती तर ! किती बरं झालं असतं. ती चलाख होती. तिने ग्रेगॉर बिछान्यावर असतानाच रडण्यास सुरुवात केली होती. आणि तिला रडताना पाहताना हेडक्लार्क निश्चितच विरघळला असता. ऑफिसमधे तो नेहमी मुलींचीच बाजू घेण्यासाठी प्रसिद्ध होता म्हणा. तिने दरवाजा बंद करुन घेतला असता आणि त्याला बोलण्यास भाग पाडले असते. पण ती तेथे नव्हती आणि आता या परिस्थितीतून त्यालाच मार्ग काढावा लागणार होता. या विचाराने त्याच्या मनावर एवढा कब्जा केला की त्याला पूर्वीसारखे चालत येणार नाही हे तो साफ विसरला. त्याचे बोलणे इतरांना समजणार नाही हेही विसरला. त्याच तिरीमिरीत त्याने दरवाजा सोडला आणि तो भंजाळलेल्या हेडक्लार्कच्या दिशेने चालू लागला. हेडक्लार्कने अजूनही पायऱ्यांचा कठडा सोडला नव्हता. त्याच्या असंख्य पायांचा अंदाज न आल्यामुळे ग्रेगॉर जमिनीवर कोसळला. जमिनीवर पायावर पडल्यावर ग्रेगॉरला एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे त्याच्या पायात शक्ती आहे आणि तो पाहिजे त्या दिशेला त्या पायाने जाऊ शकत होता. हे पाहून त्याचा आत्मविश्र्वास वाढला. जमिनीवरची पायांची पकड त्याला सुखावून गेली आणि शिवाय त्याचे पाय त्याचे ऐकत होते ते वेगळेच. त्याला या भयंकर दिवास्वप्नातून बाहेर पडलोय अशी खात्री वाटू लागली. ज्या क्षणी तो पडत होता त्याच क्षणी त्याच्या जवळच बसलेली त्याची आई ताडकन उठली आणि हाताची बोटे पसरुन किंचाळू लागली,

‘‘त्याला पकडा,,,त्याला पकडा रे कोणीतरी !’’

तिने ग्रेगॉर नीट दिसेल म्हणून डोके पुढे झुकविले खरे पण कुठल्याशा भावनेने ती दूर राहण्याचा प्रयत्नही करीत होती. या सगळ्या गडबडीत बिचारीच्या मागे एक टेबल आहे हे तिच्या लक्षातच आले नाही. ती चुकुन त्यावर आदळली. त्याबरोबर त्यावर असलेली कॉफीची किटली लवंडली आणि त्यातून जमिनीवर वाफाळलेली कॉफी ओघळू लागली. कॉफीचा मस्त वास सगळीकडे पसरला.

‘‘ आई ! आई !’’

ग्रेगॉरने तिला खालच्या आवाजात हाक मारली व तिच्याकडे तो डोके उचलून पाहू लागला. ग्रेगॉरने कॉफी पाहिल्यावर दोन मिटक्या मारल्या त्यामुळे तो हेडक्लार्क त्याच्या डोक्यातून गेला. ते पाहिल्यावर त्याच्या आईने अजून एक किंकाळी फोडली व ती त्याच्या वडिलांच्या गळ्यात जाऊन पडली. ग्रेगॉरकडे आता त्याच्या आईवडिलांसाठी वेळ नव्हता. हेडक्लार्कला कुठल्याही परिस्थितीत थांबवणे त्याला भाग होते आणि तो तर आता पायऱ्यांवर जाऊन पोहोचला होता. त्या कठड्यावर आधारासाठी त्याने हनुवटी टेकली होती आणि तो मागे शेवटची नजर टाकण्याच्या तयारीत होता. त्याला गाठण्यासाठी ग्रेगॉरने पुढे झडप घातली पण त्याचा इरादा ओळखून हेडक्लार्क पायऱ्यांवरुन ताडताड उड्या मारुन रस्त्यावर नाहिसा झाला. पायऱ्या उतरताना तो घशातून किंचाळला, त्याने कसलातरी विचित्र आवाज काढला जो त्या हॉलमधे घुमला.

हेडक्लार्कच्या गोंधळाने इतक्या वेळ शांत असलेले ग्रेगॉरचे वडील बिथरले. हेडक्लार्कला थांबविण्याऐवजी त्यांनी हेडक्लार्कने तेथेच खुर्चीवर टाकलेली काठी, कोट व हॅट हातात घेतली व डाव्या हाताने टेबलावर पडलेले वर्तमानपत्र उचलले. ग्रेगॉरच्या पुढ्यात ते पाय आपटत, त्या वर्तमानपत्र व काठीने ग्रेगॉरला खोलीत ढकलण्याचा प्रयत्न करु लागले. बिचाऱ्या ग्रेगॉरने अत्यंत लिनतेने खाली मान झुकवून झुकवून त्यांना विनंती करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मान्य करण्यात आली नाही. किंबहुना ती विनंती समजलीच गेली नाही. त्याने मान झुकविली की त्याचे वडील त्याला आत हाकलत होते. थंडी मी म्हणत होती. वडीलांच्या मागे त्याच्या आईने धाडकन खिडकी उघडली आणि तिने त्यातून मान बाहेर काढून आपला चेहरा तळहातांनी झाकून घेतला. रस्त्यावरुन गोठालेल्या हवेचा एक झोत घरात घुसला. खिडकीचे पडदे उडाले, टेबलावरील वर्तमानपत्राची पाने फडफडली आणि जमिनीवर विस्कळीत होऊन पसरली. ग्रेगॉरच्या वडीलांनी दयामाया न दाखविता त्याला मागे हाकलण्यास सुरुवात केली, ‘‘ शूऽऽऽ शूक..’’ पण ग्रेगारला उलटे चालण्याची सवय नव्हती. त्याने प्रयत्न केला पण तो फारच हळू मागे झाला. त्याला वळून पटकन खोलीत जाता आले असते पण त्याच्या थोड्याशाही हालचालींनी त्याच्या वडिलांनी खवळून हातातील काठी त्याच्या पाठीत किंवा डोक्यात घातली असती. पण मागे सरकायच्या प्रयत्नात त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे मागे सरकताना तो कुठल्या दिशेने जातोय हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. वळण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. वडीलांवरची नजर न ढळवता त्याने वळण्याचा प्रयत्न सुरु केला. बहुतेक त्यांना त्याचा उद्देश लक्षात आला असावा. त्याला मदत म्हणून त्यांनी दुरुनच त्याला काठीने खोलीचा दरवाजा दाखविला.. एकदा...दोनदा...तीनदा.. ‘‘त्यांनी तो फुत्कार थांबवला तर किती बरं होईल’’ ग्रेगॉर मनाशी म्हणाला. त्या आवाजाने त्याचे डोके अगदी भणाणून उठले होते. त्या आवाजाच्या त्रासाने तो एकदा चुकीच्या दिशेनेही चालला होता. दुर्दैवाने तो पूर्ण वळाला तेव्हा त्याचे डोके दाराच्या फटीसमोर आले. त्यातून आत जाणे शक्यच नव्हते. त्यांच्या बिथरलेल्या मनस्थितीत त्याच्या वडिलांना दुसरे दार उघडावे हा विचार सुचणेही शक्यच नव्हते. त्याच्या मनात ग्रेगॉरला लवकरात लवकर आत हाकलणे एवढाच विचार प्रबळ होता. उभे राहून त्या फटीतून आत जाण्याची त्याची तयारी नव्हती. त्याचे वडील आता ग्रेगॉरला पुढे सरकण्याची घाई करीत होते. त्यांच्या आवाजाचा गोंगाट इतका वाढला होता की ग्रेगॉरला तो त्याच्या एकट्या वडीलांचा आवाज आहे यावर विश्र्वास बसेना. तो गोंगाट असह्य होऊन ग्रेगॉरने काय व्हायचे तो होऊदेत या भावनेने त्या फटीत आपले शरीर घुसवले. त्याबरोबर त्याच्या शरीराची एक बाजू वर उचलली गेली..त्याच्या बाजू जोरात घासल्या गेल्या आणि दरवाजावर व जमिनीवर हिरवट द्राव पसरला... या अशा परिस्थितीत ग्रेगॉरला पुढेही जाता येईना ना मागे. तो असहाय्यपणे त्याचे पाय केविलवाणे हलवित राहिला. तेवढ्या त्याच्या वडीलांनी त्याला मागून एक जोरदार धक्का दिला. इतका जोरात की तो रक्तबंबाळ झाला व खोलीत आत दूरवर फेकला गेला. दरवाजा लावण्याचा आवाज झाला आणि अखेरीस काही क्षण तेथे शांतता पसरली....


ग्रेगॉर संध्याकाळपर्यंत ठार झोपला.

त्याला झोप म्हणावे का एक प्रकारची गुंगी म्हणावी हे त्याला कळत नव्हते. भरपूर झोप झाल्यामुळे तो अजून थोड्यावेळाने उठलाच असता पण कोणीतरी हळूच दरवाजा लावला व बाहेर दबक्या पावलाने कोणीतरी चालत असल्याचा आवाज झाल्यामुळे त्याला जाग आली. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड खोलीतील छतावर अस्ताव्यस्त पडला होता पण खाली, जेथे तो पडला होता तेथे मात्र अंधार होता. डोक्यावरील वळवळणाऱ्या स्पृषांचा त्याने वापर करुन पाहिला. त्याला त्यांच्या स्पर्षज्ञानाचे कौतुक वाटले. त्यांचा वापर करुन तो अडखळत दरवाजापर्यंत पोहोचला. त्याला बाहेर काय चालले आहे त्याचा कानोसा घ्यायचा होता. त्याच्या डाव्या अंगावर उठलेल्या एका वेदनादायक व्रणामुळे त्याला पायांच्या दोन रांगांवर लंगडत चालावे लागत होते. दुष्काळात तेरावा महिना म्हणून त्या सकाळच्या गडबडीत एक पाय जायबंदी झाला होता. नशीब एकच पाय जायबंदी झाला होता. खरे तर सगळेच व्हायचे. तो पाय लोंबत मागे मागे खरडत येत होता.

तो दरवाजापर्यंत पोहोचला आणि त्याच्या लक्षात आले की त्याला बाहेर काय चालले आहे याचा कानोसा घ्यायचाच नव्हता. तो दरवाजापाशी खेचला गेला होता तो अन्नाच्या वासाने. तेथेच जमिनीवर एक भांडे होते ज्यात ताज्या दुधावर पावाचे तुकडे तरंग होते. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. भुक लागलीच होती. आनंदाने त्याने त्या दुधात तोंड बुडविले पण लगेचच मागे घेतले. डाव्या अंगाला दु:खापत झाल्यामुळे त्याला ते दुध पिता येईना. त्याच्या लक्षात आले त्याच्या खाण्याच्या क्रियेत त्याला आता सगळ्या शरीराची गरज भासत होती. आणि त्याला दुध आवडायचे हे खरे असले ( म्हणूनच त्याच्या बहिणीने ते तेथे ठेवले असणार) तरी आत्ता त्याला दुध नकोसे वाटले. त्याने तोंड वळवले आणि तो खोलीच्या मध्यभागी आला.

दरवाजाच्या फटीतून त्याला थंडीमुळे पेटलेली शेगडी दिसत होती. या वेळेला त्याचे वडील आईला वर्तमानपत्रातील बातम्या मोठ्याने वाचून दाखवायचे. पण आश्चर्य म्हणजे आज सगळीकडे शांतता होती अगदी बाहेर रस्त्यावरही स्मशान शांतता पसरली होती. कदाचित त्याच्या वडिलांनी तो वर्तमानपत्र वाचनाचा कार्यक्रम सोडून दिला असावा. त्याच्या बहिणीने त्याला तसे एकदा पत्रात लिहिलेही होते. ती शांतता, तो निवांतपण पाहून त्याला वाटले, ‘‘ या सुंदर घरात किती निवांत आयुष्य जगतोय आपण !’’ अंधारात पाहताना तो हे सगळे त्याच्या कुटुंबियांना देऊ शकतोय म्हणून त्याच्या मनात स्वत:बद्दल अभिमान दाटून आला. विचारात हरवून जायला नको म्हणून त्याने त्या खोलीत इकडे तिकडे हालचाल करण्यास सुरुवात केली.

त्या संध्याकाळी कोणीतरी बाजूचे दार ओघडून पटकन बंद केले. थोड्याच वेळाने दुसऱ्या बाजूच्या दरवाजाही उघडला आणि पटकन बंद झाला. कोणालातरी आत यायचे होते पण त्याचा धीर होत नव्हता. ग्रेगॉरने बैठकीच्या खोलीत जो दरवाजा उघडत असे त्यासमोरच थांबायचे ठरविले. जो कोणी तो दरवाजा उघडेल त्याला तो पटकन आत येण्याचे विनंती करणार होता. नाहीच जमले तर कोण आत येण्याचा प्रयत्न करतय हे तरी त्याला कळले असते. पण दुर्दैवाने तो दरवाजा परत काही उघडला गेला नाही. त्याने बराच वेळ वाटा पाहिली. रात्र झाली आणि बैठकीच्या खोलीतील शेकोटी विझली. म्हणजे ते ‘‘आत्तापर्यंत जागेच होते तर !’’ तो मनाशी म्हणाला कारण त्याला हलक्या पावलांनी चालण्याचा आवाज ऐकू आला. आता सकाळपर्यंत कोणी त्याच्या खोलीत येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्याला आता विचार करण्यास भरपूर वेळ व निवांतपणा मिळणार होता. आता पुढील आयुष्य कसे व्यतीत करायचे याबद्दल त्याला विचार करणे महत्वाचे वाटत होते.

त्या अवाढव्य खोलीत जमिनीवर पोटावर पडलेल्या ग्रेगॉरच्या मनात अचानक कसलीतरी अनामिक भिती दाटून आली. काहीतरी वाईट घडणार आहे असे त्याला वाटू लागले. काय ते त्याला सांगता येत नव्हते. ज्या खोलीत त्याने गेली पाच वर्षे काढली होती त्या खोलीवर त्याने नजर फिरविली आणि कशाचीही लाज न बाळगता तो त्या सोफ्या खाली सरकला. गंमत म्हणजे त्याला तेथे एकदम शांत व सुरक्षित वाटले. आपले सगळे अंग सोफ्याखाली जात नाही हे लक्षात येताच त्याने अंग आक्रसले पण जेवढे आत गेलं त्यावर तो खुष झाला.

त्याने रात्रभर तेथेच मुक्कम ठोकला. रात्री तशी त्याला झोप आलीच नाही शिवाय भुकेने त्याला अधूनमधून जाग येत होती. रात्रभर विचार करुन त्याचा मेंदू फुटायला आला होता. सगळ्या बाजूने विचार करीत तो परत परत एकाच निष्कर्षाशी येऊन पोहोचत होता.
‘‘सध्यातरी त्याला गप्प रहायला हवे. गप्प राहून त्याच्या कुटुंबाला मदतच होईल.’’ त्याने निश्चय केला. त्याच्यामुळेच त्याच्या कुटुंबावर हा दारुण प्रसंग गुदरला होता.

अगदी पहाटे पहाटे, अजूनही अंधारच असताना ग्रेगॉरला त्याच्या निश्चयाची परिक्षा घेण्याची संधी मिळाली. त्याच्या बहिणीने बैठकीच्या खोलीतून त्याच्या खोलीत उघडणारा दरवाजा उघडला. तिचे आवरुन झालेले दिसत होते. तिला ग्रेगॉर प्रथम दिसला नाही. तिने एक नजर सोफ्याखालीही टाकली... कुठेतरी असायलाच हवा तो..

"असा नाहिसा होऊ शकत नाही एकदम ’’ ती पुटपुटली....
क्रमशः
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

नरेश माने's picture

17 Nov 2016 - 10:43 am | नरेश माने

छान अनुवाद! पुभाप्र......

संजय पाटिल's picture

17 Nov 2016 - 12:42 pm | संजय पाटिल

पहिल्या भागाची लिंक गंडलिये..
पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

पुजारी's picture

17 Nov 2016 - 4:14 pm | पुजारी

अप्रतिम अनुवाद ! पुभाप्र

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2016 - 9:06 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

वाचतोय. काहीतरी वेगळेच.

पैसा's picture

4 Dec 2016 - 10:07 pm | पैसा

अतिशय उत्कंठावर्धक!

मास्टरमाईन्ड's picture

12 Dec 2016 - 7:59 pm | मास्टरमाईन्ड

पुभाप्र.

जयंत कुलकर्णी's picture

13 Dec 2016 - 9:59 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !
लांबणीवर टाकले आहे. कारण आजकाल मिपाकरांना एवढ्या मोठ्ठ्या व गंभीर स्वभावाच्या गोष्टी वाचण्यास आवडत नाहीत. असो... लोकांच्या आवडीनिवडी बदलत असतात... जेथे हे आवडेल तेथे टाकेन ही कथा...किंवा एकदम छापेनच एका कादंबरिकेच्या स्वरुपात.

जयंत कुलकर्णी's picture

13 Dec 2016 - 10:29 am | जयंत कुलकर्णी

अर्थात येथेही पूर्ण करीनच म्हणा...

व्यनि करा किंवा इथं पण टाका.
मी पण एक मिपाकर आहे आणि निदान मलातरी ही गोष्ट / कादंबरी वाचण्यात सध्यातरी (हो, नंतर आवडली नाही असं पण होऊ शकतं) स्वारस्य आहे.

समी's picture

14 Dec 2016 - 12:32 pm | समी

मलाहि कळवा....