ग्रंथ परिचय - ग्रामगीता भाग 2

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Nov 2016 - 12:38 am

भाग 2 पुढे चालू...
ग्रामगीता
भाग 2

विविध पंचक योजनाकरून गीतेचे विषयानुरूप आठ विभाग पाडले आहेत, ते असे -
पहिल्या सद्धर्म पंचकात देव, धर्म, आश्रम, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था यावर भाष्य आहे.
दुसऱ्या लोक वशीकरण पंचकात संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवा सामर्थ्य, आणि संघटना-शक्ती याचा विचार केला आहे.
तिसऱ्या ग्रामनिर्माण पंचकात ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम-आरोग्य, गोवंश सुधार असे विचार मांडले आहेत.
चौथ्या दष्टीपरिवर्तन पंचकात वेष-वैभव, गरीबी-श्रीमंती, श्रम-संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती असे विचार मांडले आहेत.
पाचव्या संस्कार शोधन पंचकात वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा-मेळे, देव-देवळे असा आहे.
सहाव्या प्रेमधर्मस्थापन पंचकात मूर्ती-उपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना आणि विश्वधर्म, दलित-सेवा, भजन-प्रभाव असा आहे.
सातव्या देवत्वसाधन पंचकात संतचमत्कार, संतस्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्नप्रभाव यावर विचार व्यक्त केले आहेत.
आठव्या आदर्श जीवन पंचकात जीवन-कला, आत्मानुभव, ग्राम-कुटुंब, भू-वैकुंठ, ग्रंथाध्ययन याचा विचार आहे. विचारकांनी हवे ते पंचक, हवा तो अध्याय शीर्षकाच्या किंवा या लिंकवर जाऊन वाचावा ही विनंती।
यानंतरच्या 41व्या अध्यायात ग्रंथाचा महिमा विषद आहे. तो असाः त्यात अन्य पोथ्या पुराणातील पारायण पद्धती, महती व फळ यावरील भाष्य बरेच काही सांगून जाते. काही उदाहरणार्थ... ग्रंथ कसा वाचावा?
वाचतानाचि बोध होतो। अंगी स्फूरण भाव उठतो। कर्म करावयासि वळतो। जीव जैसे आंतरी।।...कोठे थांबावे वाचकांनी। कोठे वाचावे जोर देवोनि। कोठे रंगवावे गंभीरपणे। कळले पाहिजे वाचकां।। मुखाने ग्रंथ वाचावे। घरी विपरीत आचरावे। तैसेचि बाहेरि गोडवे गाति थट्टेने।।... येथे श्रोत्यांनी विचारिले। आपण अर्थासि, वर्तनासि महत्व दिले।। परि कित्येक ग्रंथी सांगितले। पारायणाची फलदायी।। कोणी म्हणती ग्रंथाचे पारायण। करिता मिळेल पुत्र, धन। होईल भाग्याचा उदय पूर्ण। पारायणे ग्रंथाच्या।। कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरी । तेथे न ये काळाची फेरी।। याचा मेळ कोण्याप्रकारे बसेल सांगा?।। ग्रंथ प्रचार व्हावा म्हणून । दिले प्रलोभन दावूनि। त्यात एक आहे उत्तमही। लोक ठेविती ग्रंथ संग्रही।। नानाग्रंथ ऐसेचि वाचले। परि तैसे मुळीच नाही वर्तले। कोण्या तोंडाने मागावे भले। फळ तयासि?।। राही ग्रंथातहि अवास्तवता। हे न राहावे सांगितल्याविणा। त्यांनी श्रद्धेचा होतो धिंगाणा। फल न येता हाती।। लोकही असती आसक्त बावरे। काहिही सांगोत सांगणारे। धावोनि करती बिचारे। व्रत साधनेवेड्यापरि।। फळ न लाभता चिडति। म्हणति ‘काय चाटावे ग्रंथांप्रति’?।। कलकत्त्याच्या गाडीत बसावे आणि म्हणे- ‘देवा ! पंढरिसी न्यावे”। ऐशा प्रार्थनेसि फळ यावे । कोण्या प्रकारे?।।...
ग्रामगीता नव्हे पारायणासि। वाचता वाट दावी जनांसि। समूळ बदलवि जीवनासि। मनिं घेता अर्थ तिचा।। आपुला गाव आदर्श केला। ग्रामगीता वाचुनिया। ग्रामगीतेचे फळ नव्हे एकट्यासि। एका सहित आहे ग्रामासि।। मी पंडित नोहे आपुल्या ठाय़ी। सांगावया पंडिताई। ईश्वराचीच प्रेरणा ही। प्रकट झाली ग्रंथाद्वारे।। जो ग्रंथही वाचतो। नांगर धराया शेतातही जातो। वेळ पडल्या सेवा ही करतो । गाव लोकांची पाहिजे ती।। ऐसा असेल कोण्याहि जातिचा। धर्म पंथ देश विदेशीचा। तरी तो चालेल। ग्रामोन्नतिचा जिव्हाळा जया।। पंडित पुराणिक, विद्वान। यांनीही करावे अवश्य वाचन। समाजाचे जबाबदार म्हणोन। यथार्थ ज्ञान द्यावे सर्वां।। ज्याचे हाती हा ग्रंथ पडला। अचानक मधुनि उघडला। वाचताचि समजावा उपदेश केला। ग्राम देवतेने मजलागी।। उभा विश्वाचिया विटेवर। सद्गुरू विठ्ठल सर्वेश्वर!। त्याच्या कृपेचाचि विस्तार। तुकड्या म्हणे ग्रामगीता।। इतिश्री ग्राम गीता ग्रंथ। गुरू-शास्त्र-स्वानुभव-संमत। लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ। म्हणोनि अर्पिला विश्वरूपा।।...

।। समाप्त ।।

मांडणीसद्भावना

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Nov 2016 - 10:08 am | यशोधरा

वाचते आहे..

शशिकांत ओक's picture

15 Nov 2016 - 10:36 pm | शशिकांत ओक

ग्राम गीतेचा नवा अध्याय लिहायचा काळ चालू आहे. जुन्या चालीरितींना सोडचिठ्ठी देता देता जुन्या नोटांबरोबर त्यांच्या सोबत चिकटलेल्या गैरव्यवहारांना रामराम करायला हवा.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2019 - 9:20 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ..