सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ४ )

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
4 Nov 2016 - 6:55 am

आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण एक मात्र निमीत्त असतो.(जीवन प्रवासातल्या आठवणी)

दिवसामागून दिवस जात होते,वर्षामागून वर्ष.गुरूनाथचा आणि सुम्याच्या कुटूंबाचा सहवास वाढत होता. एक दिवशी अचानक गुरूनाथला कोकणातून त्याच्या आईवडीलांकडून निरोप आला.त्याच्या वडलांना बरं वाटत नव्हतं तू लागलीच निघून ये.

गुरूनाथचे आईवडील त्याला वरचेवर सांगायचे की तू लग्न करून घे.तुझेही पुढलं आयुष्य सुखकर जाईल आणि आमच्या म्हातारपणी तुझ्यावर जास्त ताण पडणार नाही.पण तो त्यांचं एकून घेऊन वेळ मारून न्यायचा.वडील आजारी झाल्याचं समजल्याने त्याच्या मनात विचार यायला लागला की लग्नाचा विचार करायला हवा होता. .पण सुम्याचा चेहरा डोळ्यासमोर येऊन त्याचा विचार बदलायचा.त्यापेक्षा आपण इकडचं सगळं सोडून कोकणात जावं.तिकडे एखादा जॉब घेऊन तिकडच्या आपल्या हजेरीत आईवडीलांची सेवा करावी,असं त्याच्या मनात यायला लागलं.

मध्यंतरी सुम्याच्या वडीलाना वार्धक्यामुळे वरचेवर आजारी व्ह्यायला व्हायचं.आणि एकदा खरंच ते गंभीर आजारी झाले.त्याना पुण्याला हॉस्पिटलमधे ठेवलं होतं.गुरूनाथला कळल्यावर तो तसाच पुण्याला गेला. तोपर्यंत वडलांना घरी आणलं होतं.गुरूनाथ त्यांच्या सेवेसाठी काही दिवस पुण्याला राहिला.गुरूनाथचा असा प्रेमळ स्वभाव पाहून सुम्याचा नवरा फार खजील झाला.सुम्यालापण गुरूनाथचा आदर वाटत होता. ज्यावेळी सुम्याला कळलं की त्याचे वडीलही आजारी आहेत आणि तो येण्याची ते वाट पहात आहेत त्यावेळी ती त्याच्या मागेच लागली की तू इकडची काळजी न करता तडक कोकणात जावं.

सुम्याच्या वडीलांची सेवा करताना गुरूनाथला आपल्या आजारी वडीलांचीपण आठवण यायची.पण योगायोग असा झाला,की सुम्याचे वडील परत गंभीर आजारी झाले आणि त्यांना परत हॉस्पिटलात ठेवावं लागलं.निमोनीया होऊन ते दोन दिवसातच गेले.गुरूनाथला आता काय करावं समजेना. त्याला आपल्या वय झालेल्या वडीलांची आठवण येऊन त्याने कोकणात जाण्याचं पक्कं केलं.सुम्याला त्याने आपला विचार सांगीतला.सुम्या त्याला तसं करण्याबद्दल मागेच लागली. मुंबईची जागा भाड्याने देऊन तो कोकणात गेला.गुरूनाथची गैरहजेरी सुम्या कंपनीला फार जाणवायला लागली होती. सुम्याच्या मुलीलापण गुरूकाकाच्या सहवासाची गोडी लागली होती.आईवडील आपल्या कामात व्यस्त असताना गुरूकाकाची तिला कंपनी मिळायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर मुलीसारखं प्रेम करायचा. गुरूकाकाकडे ती बरेच वेळा
स्वतःच्या भावी जीवनाबद्दल चर्चा करायची.आता गुरूकाका गेल्यामुळे ती आपल्या भविष्याचे जास्त गंभीरपणे विचार करायला लागली होती.

सुम्याची मुलगी आता बरीच मोठी झाली होती.कॉलेज संपवून ती अमेरिकेत पुढच्या शिक्षणाचा विचार करू लागली होती.सुम्याच्या नवर्‍याने तिच्या अमेरिकेतल्या खर्चासाठी अगोदर पासून पैसे जमवायला सुरवात केली होती.सुम्याचं आणि त्याचंही वय वाढत चाललं होतं.मुलगी अमेरिकेत गेली की जवळ जवळ चार-पाच वर्षंतरी परत येणार नाही.तिच्या गैरहजेरीत त्या दोघांचंआयुष्य एकटेपणाचं होणार होतं. मुलगी परत येईपर्यंत कसे तरी दिवस काढावेत आणि ती आल्यावर ती इकडे येऊन लग्न करायला तयार असेल तर तिचं लग्न करून देऊन आपण कोकणातल्या घरात जाऊन रहावं.असा काहीसा विचार सुम्याच्या डोक्यात फिरत होता.पुण्याची जागा भाड्याने देऊन मुंबईची जागा मुलीला द्यावी असा विचार तिने आपल्या नवर्‍याजवळ मांडला होता.तिचा नवरा तिच्या नेहमी सांगण्यात असल्याने तुला जे आवडेल ते मी करायला तयार आहे.असं तिला त्याने समजावलं होतं.

गुरूनाथ कोकणात जाऊन राहिला.आईवडीलांची सेवा करीत होता.एका फार्मसीत त्याला काम मिळालं होतं.आईवडीलांच्या औषाधाची ओघाने सोय होत होती.कोकणातून तो सुम्याच्या संपर्कात होता.त्यांच्या बंद घराची तो देखभाल करायचा.मागे परसात गेल्यावर त्याला सुम्याची आठवण यायची.सोनचाफ्याचं झाड आठवण देउन सतावत असायचं.झाडाल खूप फुलं लागायची.सुम्याची आठवण आल्यावर ओंजळभर सोनचाफ्याची फुलं काढून गडग्यावर पसरून ठेवायचा.

सुम्याला कधी त्याची आठवण आल्यावर तिच्या मनात यायचं,
मागे परसात गेल्यावर
तुका सोनचाफो दिसतलोच
ओंजळभर फुलां काढून
गडग्यावर नेऊन ठेव
बघ माझी आठवण येतां कां?

इतकी वर्ष संसार करूनही,लहानपणी जीव्हारी लागलेल्या स्मृती सहजासहजी फुसल्या जात नाहीत हेच खरं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख