सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ९ )

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
2 Dec 2016 - 8:52 am

सुम्याला वाटणार्‍या जीवघेण्या आठवणी.

पॉझीटीव्ह विचार करावा असं जरी कुणी कुणाला सांगीतलं तरी प्रत्यक्ष यातना भोगत असतो त्याला खरं काय ते कळत असतं.दिवसा सुम्याचा वेळ कसातरी जायचा.मात्र काळोख पडायला लागला आणि रात्र यायला लागली की ती बरीच अस्वस्थ व्हायची.जवळ मन मोकळं करायला कुणी नसायचं.आणि गुरूनाथकडे त्याच्याच अवस्थेबद्द्ल काय ते बोलायचं.असा विचार येऊन तिच्या मनाची द्विधा व्ह्यायची.
ती जुनं गाणं आठवून मनात गुणगूणायची,

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही

आज गुरूनाथ ज्यावेळी संध्याकाळी घरी आला तो सुम्याला बराचसा थकलेला दिसला.वय झालं आहे.वेळ जावा म्हणून काम करीत राहिलं तरी शरीराने मदत करायला हवी ना!
ती गुरूनाथला म्हणाली की,तुला दिवसभर काम करून घरी आल्यावर संध्याकाळी थकवा वाटत असेल तर उद्या पासून नको जाऊस कामावर.माझी मुलगी जेव्हडे पैसे पाठवते ते रग्गड पुरतात.घरी राहिलास तर तुला विश्रांती मिळेल.मलाही तुझी दिवसभर सोबत होईल.गुरूनाथला सुरवातीला ही सुम्याची कल्पना तेव्हडी पसंत झाली नाही.पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की जिथे तो काम करतो त्या फार्मसीच्या मॅनेजरनेसुद्धा अशीच सुचना केली होती.त्याला ही कल्पना विचारात घ्यावी असं वाटूं लागलं.पुढल्या महिन्यापासून आपण तसं करीन असं तो सुम्याला म्हणाला.एव्हडा मोठा निर्णय गुरूनाथने आपल्या सुचनेवरून घेतला हे पाहून सुम्या थोडी सुखावली.

एकदिवशी सुम्याच्या मुलीचा तिला फोन आला.ती म्हणाली की ती आणि तिच्या नवर्‍याने त्यांच्या मुंबईच्या ऑफिसची एक शाखा कोकणात काढायचं ठरवलंआहे.
आपल्या कोकणातल्या घरात ऑफिस काढावं,दोन तीन माणसं कामावर ठेवावी आणि सुम्याने आणि गुरूकाका ने गुरूकाकाच्या घरात रहावं.कामाच्या निमीत्ताने ती मुंबईहून कोकणात येईल.थोडे दिवस काम करील आणि मुंबईला जाईल.कामाच्या निमीत्ताने तिच्या बर्‍याच खेपा कोकणात होतील आणि त्यामुळे सुम्याच्या आणि गुरूकाका्च्या सहवासात ती राहू शकेल.

सुम्याला आणि गुरूनाथला ही सुम्याच्या मुलीची कल्पना लय आवडली.त्यांना जगायला हुरूप आला. त्या दोघाव्यतीरीक्त घरात आणखी जाग रहाणार आंणि त्या दोघाना एकटं एकटं वाटणार नाही.

उन्हाळ्याच्या दिवसात सुम्याची मुलगी जेव्हा कोकणात यायची तेव्हा तिला कोकणातल्या फळांवर ताव मारायला मजा यायची.मुंबईला गेल्यावर ती आपल्या नवर्‍याला आणि मुलाला कोकणात उन्हाळ्यात निरनीराळ्या फळांची कशी सुबत्ता असते ते मस्त वर्णन करून सांगायची.मुंबईच्या मानाने कोकणात तेव्हडं उकडत नाही.फळं आणि फुलं यांची उन्हाळ्यात चंगी असते. फणस,आंबे,करवंदं,जांभळं,रातांबे,काजू,बोंडू,कलिंगडं,पांढरे जाम असे फळांचे निरनीराळे प्रकार खायला मिळतात.तसंच ज्याना फुलांची आवड आहे त्यांना,निरनीराळ्या चाफ्याची फुलं-नागचाफा,सोनचाफा,हिरवा चाफा,कवठी चाफा,देवचाफा तसंच सुंदर रंगाची कमळं,आबोली,जाईजूई,मोगरा, सोनटक्का, सुंदर वासाची सुरंगी,निरनीराळ्या रंगाची गुलाबं ,रंगीबेरंगी झेंडूची फुलं,माळायला आणि पहायला मिळतात.

हे ऐकल्यापासून सुम्याचा जावई आणि नातू उन्हाळ्यात एकतरी खेप टाकायला विसरायचे नाहीत. उन्हाळ्यात सर्व मंडळी कोकणात एकत्र आल्याने गुरूनाथालापण उन्हाळा कधी येतो असं वाटायचं.नोकरी सोडल्यापासून त्यालाही सुम्याव्यतीरीक्त आणखी कुणीतरी बोलायला मिळायचं.सुम्यालाही गुरूनाथाचा उन्हाळ्यात वेळ मजेत जातो हे पाहून बरं वाटायचं.गुरूनाथाच्या व्याधीला एकटेपणाची सवय हानी कारक आहे हे तिला डॉक्टरने सांगीतलं होतं.

सुम्याच्या मुलीचा आता कोकणातल्या बिझेनेसवर चांगलाच जम बसला होता.कोकणातल्या आजुबाजूच्या गावात जाऊन कंप्युटरचा वापर करून धंद्यात किती सुवीधा आणता येतात हे निरनीराळे धंदे करणार्‍या लोकाना समजावून सांगायला तिला यश येत होतं.ज्यांच्या मोठ्या मोठ्या वखारी होत्या त्यात ठेवलेल्या मालाचा हिशोब ठेवणे,हॉटेलची मॅनेजमेंट करणे,लहान बॅंकांच्या व्यवहाराची मॅनेजमेंट करणे,कोकण दर्शनास येणार्‍या लोकांसाठी धंदा करणार्‍या टूरीस्ट कंपनीचं मॅनेजमेंट अशी एक-ना-अनेक छोटी मोठी कामं तिला मिळत होती.

दिवस जात होते.काही वर्षही गेली.सुम्याच्या मुलीचा बिझीनेस मुंबईत आणि कोकणात बर्‍यापैकी चालला होता.गुरूनाथ आणि सुम्याचा वेळही मजेत जात होता तरीपण एक गोष्ट नाकारता येत नव्हती ती म्हणजे त्यांच्या वाढत्या वयाबरोबर प्रकृतीच्या कटकटी वाढत होत्या.आणि तसं होणं स्वाभाविक होतं. गुरूनाथचा आजार जास्त स्पष्ट होत होता.त्याला जे "बाळं" लागलं होतं ते आता इतरांच्या द्द्ष्टीप्तीस येत होतं.आणि नेमकं हेच लक्षात येऊन सुम्या खूप उदास व्हायची.ह्या व्याधीवर सध्यातरी उपाय नाहीत असं तिच्या मुलीकडून ऐकून ती आणखी हतबल झाली.शरीराला व्याधी झाला की तो दिसून येतो पण मनाचा व्याधी फक्त रोग्यालाच कळतो.जोपर्यंत तो आपला व्याधी इतरांना सांगत नाही तोपर्यंत तो कुढत जात आहे ह्याचं कारण समजणं कठीण होतं.सुम्याचं असंच होत गेलं.

गुरूनाथ सुम्याला जमेल तेव्हडं खुश ठेवायचा.आपल्या आजाराची फिकीर करून तिला त्रास होत आहे हे त्याला समजणं शक्यच नव्हतं.आणि त्याचं कारण त्याच्या व्याधीचे रोगी आपल्याला असा व्याधी आहे हे कबुल करायलाच तयार नसतात.नव्हेतर कुणी जरी त्यांच्या विसरभोळेपणाची खील्ली उडवली तर त्यांना संताप येतो.एकदा बोलता बोलता गुरूनाथ सुम्याला विचारत होता की तिचा नवरा कुठे गेलाय? बाजारात का? तो आल्यावर मला सांग असं तिला म्हणाला.सुम्याला त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच कळेना.तो ह्या जगात आता नाही हे सांगीतल्यावर त्याचा विश्वासच बसला नाही.सकाळी तर तो माझ्याशी बोलत होता असं सरळ त्याने तिला सांगीतलं होतं.एव्हडंच नाही तर तो रोज माझ्याशी बोलतो असं म्हणायचा.

डॉक्टरानी तिला सांगीतलं होतं की,असा प्रसंग आल्यास अशा माणसाशी जास्त हुज्जत घालणं टाळावं. तात्पुरता विषय बदलून पहावं.अशा पेशंटचा व्याधी जर का जास्त वाढत गेला तर त्यांना घरात न ठेवता त्यांच्यासाठी परदेशात स्पेशल नर्सिग होम असतात.त्यांची सुश्रुषा करणार्‍या नर्सिसनां शास्त्रोक्त शिक्षण दिलं जातं.असे पेशंट दुःखी होऊ नयेत किंवा कधी कधी हिंसक होऊ नयेत म्हणूनत्यांच्याशी कसं वागावं ह्याचं खास शिक्षण दिलं जातं.

सुम्याला डॉक्टरने सांगीतलेलं हे सर्व आठवलं.तिला गुरूनाथची आणखी काळजी वाटू लागली.पण ती नेहमी त्याच्याशी समजूतदार राहून वागायची.पण ज्यावेळी गुरूनाथ तिला असा प्रश्न विचारायचा की त्याचं उत्तर असंभव असावं पण उत्तर देणं क्रमप्राप्त असावं त्यावेळी तिची खूपच पंचाईत व्हायची.

ह्या सर्व गोष्टींचा सुम्याच्या प्रकृतीवर खचीतच दुष्परिणाम व्हायला लागला होता.
तिला भूक कमी लागायची.त्यामुळे ती कमी जेवायची.त्यामुळे तिच्या वजनावर परिणाम व्हायला लागला होता.तिला जगणं नको व्हायला लागलं होतं.पण कुणाला कसं सांगणार असा विचार येऊन तिचा जीव गुदमरायचा.ती कमी जेवते हे पाहून गुरूनाथ पण काळजीत असायचा. कमी जेवायचं कारण गुरूनाथने विचारल्यावर त्याला ती उत्तर तरी काय देणार?

पुढचं होणार आहे ते सर्व विसरून जायचं आणि वर्तमानात रहायचं असं तिला वाटायचं.अंधार दूर करणार्‍या प्रकाशाकडे पहात रहावं.गुरूनाथाच्या सहवासानेच तिचा अंधार दूर होत होता.अंथरूणावर पडल्यावर तिला आठवलं,

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख