लंडनवारी:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
ब्लॉग दुवे:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
आजचा अजेंडा होता लंडन झू आणि मादाम तुसां संग्रहालय. झू ला जाणार म्हणून मुलगा खूश होता. म्हणजे, त्याला बाकी काही कळत नसलं तरी सिंव्ह बघायचा, वाघ बघायचा इतकं समजत होतं. दोन तीन दिवस सेट झालेल्या दिनचर्येप्रमाणे आम्ही उठलो, ब्रेकफास्ट केला आवरलं आणि प्राम, जॅकेट्स, दिवसभराचं सामान, इत्यादी घेऊन निघालो. एव्हाना लंडन ट्यूब च्या मॅपची चांगलीच उजळणी झाली होती. त्यामुळे मेट्रोपोलिटन वरून जुबिली घेऊ तिथून बेकर स्ट्रीट ला उतरू आणि अर्धा तास चाललं की लंडन झू. हे मी अगदी दादर ला उतरू चर्चगेट ट्रेन घेऊ तिने ग्रँटरोडला उतरू आणि थोडं चाललं की आला लॅमिंगटन रोड असं सहज सांगत होतो. (उदाहरणार्थ झालं तरी पुन्हा ते मुंबईचं चित्र डोळ्यासमोर आलंच. रिडिक्युलस. असो.)
तर ट्यूबमधे बसलो. अव्याहत सौजन्य सप्ताह असल्यासारखी मंडळी वागताना दिसली इंग्लंडमधे. म्हणजे आमचा जितका म्हणून संबंध येत होता तितक्याच्या आधारावर तरी खूप फ्रेंडली वाटली. ट्रेनमधे प्राम घेऊन चढलं की लगेच प्रायॉरिटी सीट रिकामी होणं वगैरे सुखद धक्के मिळत होते. बेकर स्ट्रीट आलं. आम्ही उतरून गूगल मॅप्स सांगेल तशी पायपीट सुरू केली. मस्त हिरव्यागार अशा रीजंट्स पार्कमधून हा रस्ता होता. रिजंट्स पार्कच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत जायला खूप छान वाटलं. मग एकदाचे झू ला पोचलो. लंडनमधे खूप चालायला लागतं! चा रिमाईंडर ठरणारा हा वॉक होता. झू चं तिकिट काढून आमची सैर सुरू झाली.
लंडन झू अपेक्षेपेक्षा खूपच कॉम्पॅक्ट होता. कदाचित शहराच्या मधे असल्यामुळे असेल. पण लंडन झू मधे खरं सांगायचं तर इतकं मोठं तिकिट काढण्यासारखं काही वाटलं नाही. ठीक आहे, म्हणजे मुलासाठी एक अॅट्रॅक्शन म्हणून सुरेख होतं. पण तेवढंच. तसे झू बरेच बघितलेत पण याची खासियत, आणि तशी ती जनरल लंडन किंवा परदेशातलीच खासियत म्हणायला हवी ती म्हणजे इतकं नीटनेटकं सगळं करून ठेवलेलं आहे, इतकं स्वच्छ आणि नियोजित आहे की फिरायला मजा येते. 'कुठे आलोय चायला!' असं होत नाही. त्यामुळे तोच झेब्रा, तेच पेंग्विन, तोच सिंव्ह असूनही झू एन्जॉय केला. हे झालं आमचं. मुलाला गंमत आली ती वेगळीच. पुस्तकातले प्राणी प्रत्यक्ष दिसल्यावर त्याच्या चेहर्यावर एखाद्या पुस्तकाएवढे भाव उमटले होते.
मग झू मधेच बसून जरा खादाडी केली. घरून सँडविच इत्यादी पदार्थ घेऊन निघणं लंडनसारख्या ठिकाणी एकदम बेस्ट. एक तर बाहेर खायचे पैसे जरासे वाचतात, आणि मुख्य म्हणजे वेळ वाचतो. तसं मुळात खवय्ये असल्यामुळे ते आणूनही आम्ही बर्यापैकी बाहेरचे पदार्थ खात-पीत होतो. बायकोला बेकिंग प्रिय असल्याने अनेक ठिकाणी मफिन्स, कुकीज इत्यादी खाऊन झालं.
झू मधून पुन्हा रेजेंट्स पार्क पार करून दुसर्या बाजूला आलो. तिथे मेरिलेबोन रोड वर मादाम तुसाँ आहे. बेकर स्ट्रीटपासून अक्षरशः एक दोन मिनिटावर. आम्ही आत गेलो खरे, पण मुलाचा पेशन्स फारच कमी झाला होता, त्यामुळे पटापटा आटपायला लागणार हे समजलं होतं. एक तर तिथे अंधारलेल्या त्या संग्रहालयात बर्यापैकी गर्दी होती. अर्थातच 'आपले' पर्यटक जास्त. त्यात ते पुतळे नीट बघता येणं महाकठीण होतं. पण पुतळ्यांपेक्षा सजीव व्यक्तींना बघूनच जास्त मनोरंजन झालं. विशेषतः बॉलिवूड दालनात. ते पुलंचं वाक्य नाही का, 'आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय....' त्याप्रमाणे आपण कुठे आहोत, आपण कुणाबरोबर आहोत, मुळात 'आपण' कसे आणि काय आहोत या कशाचीही तमा न बाळगता ते पुतळे सजीवच आहेत असं मानून सगळे प्रकार चालू होते. म्हणजे की, फोटो काढणं (हे अपेक्षितच आहे त्यामुळे त्याचं विशेष नाही), ते फोटो काढताना खांद्यावर हात ठेवणं, कमरेवर हात ठेवणं, मिठी मारणं, अगदी पापे घेणंही चालू होतं. म्हणजे कतरीना कैफ, माधुरी दिक्षित वगैरेंना त्याचा व्हिडियो काढून दाखवला तर झोपेत घाबरून उठतील त्या. असे हे 'चीप बट हिलेरियस' प्रकार आम्ही काही वेळ बघितले. मग संधी मिळेल तसे बायकोने एक दोन फोटो (सामान्य माणसासारखे) काढले आणि आम्ही पुढे निघालो कारण त्या बॉलिवूडी पुतळ्यांमधे मला विशेष रस नव्हता.
तसेही एकूण सगळ्या पुतळ्यांपैकी बॉलिवूड किंवा एशियन लोकांचे पुतळे गंडलेले आहेत असं आमचं मत झालं. खपाटीला गेलेले गाल, सुरकुतलेली त्वचा, काँप्लेक्शन मधे काहीच्याकाही फरक, अशी वाट लावलेली आहे आपल्या लोकांची. त्या मानाने सगळ्याच परदेशी व्यक्ती मस्त वठल्यात. लिओनार्डो डी कॅप्रियो, जॉनी डेप, जुलिया रॉबर्ट्स, मर्लिन मॉनरो, विल स्मिथ विशेष. मग स्पोर्ट्स च्या दालनात आर्नल्ड श्वार्झनेगर, रफाएल नदाल, क्रिस्तियानो रोनाल्डो, होसे मुरिन्यो, इत्यादींशी पुतळाभेट घेतली. इथे बेसमेंटमधे शेरलॉक होम्स मिस्टरी बॉक का काहीतरी प्रकार असतो. तिथे जाणार इतक्यात 'समबडी इज अनवेल देअर' असं सांगून सिक्युरिटी वाला सगळ्यांना बाहेर जायला सांगू लागला. त्यामुळे आम्ही थेट एक्झिट कडे रिडायरेक्ट झालो.
माझे नातेवाईक मला बकिंगहॅम ला ऑफिसमधून परस्पर भेटणार होते. त्यामुळे मग ट्यूबने ग्रीन पार्कला गेलो आणि पॅलेस गार्डन्स मधून चालत चालत चिमण्या, कावळे, कबुतरं मुलाला दाखवत आम्ही बकिंगहॅम पॅलेसला पोचलो.
चेंज ऑफ गार्डस मधे विशेष असं काही नाही हे आधीच ठरल्यामुळे आम्ही संध्याकाळी तिथे जायचं ठरवलं. मग मस्त संधिप्रकाशात ती ग्रँड इमारत बघितली, इकडे तिकडे जरा फिरलो आणि मग वेस्टमिन्स्टर वरून परतीची ट्यूब पकडली.
आज चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे रात्री झोपा पटापट लागल्या. मला सोडून; कारण उद्याचा दिवस माझा होता. पंढरपुराला जायचं होतं, विठठलालाच जणु बघायचं होतं. आय वॉज गोइंग टू मॅन्चेस्टर. मॅचचं काही जमलं नसलं तरी ओल्ड ट्रॅफर्डला जायचं हेच पुरेसं होतं. त्यामुळे गजर वगैरे नीट बघून घेतला, आणि मग विचार करता करताच माझा डोळा लागला.
प्रतिक्रिया
17 Oct 2016 - 4:28 pm | टवाळ कार्टा
रिडिक्युलस???
17 Oct 2016 - 4:41 pm | वेल्लाभट
अॅब्सल्यूटली.
18 Oct 2016 - 2:17 am | अभिदेश
आहे. भारतामध्ये लोकांना सिव्हिक सेन्स नाहीच. छान चाललीये तुमची ट्रिप , पण आम्ही लिव्हरपूल वाले , त्यामुळे UFC ला तुम्ही भेट देणार म्हणजे थोडी जळजळ झालीये... :-)
18 Oct 2016 - 11:16 am | वेल्लाभट
ओह आय सी! सो यू नेव्हर वॉक अलोन इस इट :)
काय आता! आहेच युनायटेड भारी... जळजळ तर होणारच ! हाहाहा
नो बट या वेळची लिव्हरपूल टीम तगडी आहे. टॉप सिक्स मॅनेज करेल क्लॉप असं वाटतंय. चँपियन्स लीग मिळवून दिली तर कडकच मग.
सिव्हिक सेन्स बाबत सहमत.
17 Oct 2016 - 5:06 pm | आदूबाळ
दिली नै सीट मोकळी करून तर इतर पब्लिक तिरकस बोलतं.
18 Oct 2016 - 1:58 am | स्रुजा
भारताच्या मानाने इथले पब्लिक मॅनर्स बरे वाटतात हे खरंच आहे पण. छान चालू आहे सफर. ३२ बेकर्स स्ट्रीट ला गेलात की नाही?
18 Oct 2016 - 7:31 am | चौकटराजा
एकूणात बागा रम्य आहेत. मस्त फोटो तेच सांगताहेत.
18 Oct 2016 - 11:30 am | वटवट
सही जा रहे हो....
18 Oct 2016 - 5:46 pm | रेवती
वाचतिये. थोडंफार आठवतय.
19 Oct 2016 - 7:28 am | अगम्य
मादाम तुसाँच्या वर्णनाशी सहमत. गेल्या दहा-बारा वर्षांत बॉलिवूडच्या लोकांचे पुतळे झाले आहेत. त्यामुळे भारतीयांचा उदंड प्रतिसाद (किंवा भारतीय हे मार्केट हेरून, त्यासाठी बॉलिवूड चे पुतळे) असे झाले आहे. आधी फक्त गांधीजी आणि इंदिरा गांधी होत्या. लंडन झू हे चांगले असले तरी अगदी युनिक नाही. त्यापेक्षा टॉवर ब्रिज , कोहिनूर वगैरे रत्ने, ब्रिटिश म्युझिअम, पार्लमेंट, लंडन आय , ग्रीनविच वेधशाळा ह्या जागा लंडनची खासियत आहेत.
22 Oct 2016 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर
एकूण सगळ्या पुतळ्यांपैकी बॉलिवूड किंवा एशियन लोकांचे पुतळे गंडलेले आहेत असं आमचं मत झालं. खपाटीला गेलेले गाल, सुरकुतलेली त्वचा, काँप्लेक्शन मधे काहीच्याकाही फरक, अशी वाट लावलेली आहे आपल्या लोकांची. त्या मानाने सगळ्याच परदेशी व्यक्ती मस्त वठल्यात.
प्रचंड सहमत त्यातल्या त्यात सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी आणि पाकिस्तातची बेनझीर भुत्तो बर्या पैकी जमवेल आहेत. इंदिरा गांधी गोर्या (रंगाने) असूनही सावळ्या का बनवल्या आहेत कळले नाही. गांधीजी ही बरे बनवलेत. पण त्यांना त्यांची माणसे चांगली जमतात ह्याशी सहमत.
मागे एकदा तिथे गेलो असता एक भारतिय मुलगाच गांधीजींच्या पुतळ्याच्या डोक्यावरुन हात फिरवून त्याच्या भावाला की मित्राला दाखवत होत. त्याला तिथेच त्याच्या आईवडीलांसमोरच झापला. त्याची आई त्याला बखोटीला धरून पुढचे पुतळे दाखवायला घेऊन गेली.
पुतळ्यांच्या कमरेत, खांद्यावर हात ठेवून फोटो घेणारे फक्त भारतियच नसतात इतर युरोपियन पर्यटकही हेच करत असतात. कांही युरोपिअन पर्यटक महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदींसमोर विशेष रेंगाळतात. विविध कोनातून पुतळ्यचे अवलोकन करतात आणि त्यांच्या समवेत छायाचित्रेही काढत असतात.
आपल्या वर्णनात भारतिय दिग्गजांचा उल्लेख आला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. बॉलीवुडचे कलाकार म्हणजे, अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, कतरीना कैफ आदी साफ गंडलेले पुतळे आहेत. कतरीना आणि ऐश्वर्या तर फोरास रोडवरील वेश्या वाटतात. असो.
23 Oct 2016 - 5:21 am | अभिजीत अवलिया
अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातल्या कोणत्या काळात मादाम तुसा मधील पुतळ्यासारखे दिसत होते हे केवळ पुतळा बनवणाराच जाणे.
22 Oct 2016 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर
शेरलॉक होम्स मिस्टरी बॉक हा एक बकवास प्रकार आहे. लहान मुले एन्जॉय करतील कदाचित.
23 Oct 2016 - 2:35 am | विशाखा राऊत
मस्त वर्णन