लंडनवारी: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
ब्लॉग दुवे: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
दुसर्या लाँग डे मुळे पुढच्या दिवशी बरीच निवांत जाग आली. आज आम्ही रिकमन्सवर्थ ला जाणार होतो. रिकमन्सवर्थ ही लंडनच्या उत्तर-पश्चिमेला असलेली हर्टफोर्डशायर काउंटीतील जागा आहे. इथे एक अॅक्वाड्रोम आहे. सुमारे १०० एकर विस्तार असलेला हा एक निसर्गाचा खजिना आहे. इथे एक कॅनल/कालवा आहे ज्याचं नाव ग्रँड युनियन कॅनल. त्यावरील लॉक बघायला आम्ही आज जाणार होतो.
हा लॉक प्रकार फार रोचक असतो. कालव्यातून होणार्या जलवाहतुकीला पाण्याच्या पातळीमधील बदल विनासायास ओलांडता यावेत यासाठी या लॉकचा शोध लागला. लॉक ची यंत्रणा ही बोटी पाण्याच्या पातळीनुसार वर किंवा खाली घेण्याचं काम करते. हे एक प्रकारचं चेंबर असतं ज्याला दोन बाजूंना दरवाजे असतात. कालव्याच्या पाण्याची पातळी जिथे बदलते तिथे ही लॉकची यंत्रणा बांधली जाते. कालव्यातून प्रवास करणारी बोट या लॉकजवळ येते तेंव्हा प्रथम त्या बाजूचा दरवाजा उघडून बोटीला चेंबरमधे आणलं जातं. मग तो दरवाजा बंद करून दुसर्या बाजूचा दरवाजा हळूहळू उघडला जातो. यामुळे चेंबरमधल्या पाण्याची पातळी कमी/जास्त होते. आणि ती दुसर्या बाजूच्या पातळीइतकी झाल्यावत दुसर्या बाजूचा दरवाजा पूर्ण उघडून बोट पलिकडे नेली जाते. लॉक या प्रकाराचा शोध लिओनार्डो दा विंची ने लावला, हे विशेष. It's a DaVinci design.
आम्ही गाडी रिकमन्सवर्थ ला पार्क करून तिथल्या हिरवाईतून चालू लागलो. इथेच एक तलावही आहे. तिकडून काहीतरी आवाज येत होता, म्हणून चौकशी केली तर कळलं की तिथे शिडाच्या बोटींची रेस चालू आहे. अनेक सिनियर सिटीझन मंडळी बरेचदा बोट क्लब मधे या रिमोटवर चालणार्या शिडाच्या बोटींची रेस खेळतात.
तिथून पुढे चालत चालत आम्ही लॉकजवळ पोचलो. वाटेतल्या हिरवळीवर ठिकठिकाणी बसावं, धावावं असं वाटत होतं पण मोह आवरला. आतापर्यंत लंडनमधे बघितलेली प्रत्येक गोष्ट फोटो काढण्यासारखी होती, आणि लॉकचा परिसरही त्याला अपवाद नव्हता. संथ वाहणारा एक कालवा, दुतर्फा झाडी, त्यावर एक कमानीसारखा पूल, त्या पुलाच्या टोकाला एक टोलेजंग घर, आणि निळंशार आकाश, हे समीकरण इतकं सुंदर होतं की तिथे असलेलं लॉक काही वेळ लक्षातच आलं नाही. मग असं झालं की "ते बघ. याला म्हणतात लॉक", "ओह हे का ते! अच्छा अच्छा..." आणि मग आम्ही ती लॉकची यंत्रणा समजून घेऊ लागलो. थियरीला प्रॅक्टिकलची जोड लगेचच मिळाली. एक लांबलचक प्रायवेट बोट तिथे आली. त्यातला एक माणूस उतरला व गेट उघडणं इत्यादी कामं करू लागला. हे बोटीतल्या व्यक्तीनेच करायचं असतं, त्यासाठी कुणी वॉचमन बिचमन नसतो. तिथे असेलच कुणी तर ते गेट ढकलायला मदत नक्की करतात. आम्हीही त्यानुसार जोर लगाके.... केलं. हे गेट ढकलायला विशेष जोर लागत नाही, ते एक विशिष्ट तंत्र आहे ते जमलं की अजस्त्र वाटणारं ते गेट सहज हलवता येतं. पण ते ढकलताना पायाने जोर घेता यावा यासाठी तिथे लाकडी पट्ट्या जमिनीवर लावलेल्या आहेत जेणेकरून जोर घेणं सोपं जावं, पायाला पकड यावी. बोटीतून किनार्यावर जायला जिने केलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी; पण माणसाची सोय प्रत्येक ठिकाणी बघितलेली दिसते. हे वैशिष्ट्य आहे इथलं. इथलंच नव्हे, सगळ्या प्रगत देशांतलं.
बंद असलेलं लॉक. पाण्याच्या दोन भिन्न पातळ्या दिसतात.
लॉकचे दरवाजे उघडताना मी
बोट जाताना. पाण्याची पातळी एक झालेली आहे. आणि मागील दरवाजा बद आहे.
'कमानी'य पूल
लॉकजवळ थोडा वेळ घालवला, फोटो काढले आणि परतीच्या वाटेवर चालू लागलो. आता मात्र गवतावर बागडण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. मुलाला प्राममधून सोडल्यावर दुडुदुडु करत तो जो पळू लागला, ते बघून आम्हाला भलतं छान वाटलं. मग चांगला तासभर त्याचं गवतावर खेळून झालं. तिथे इतरही कुटुंबं आली होती, लहान मुलं होती त्यामुळे गंमत आली.
तिथून मग आम्ही जेवायला एका इटालियन रेस्त्राँ मधे गेलो. अतिशय प्रेमाने वाढणारा, बोलणारा, हसतमुख वेटर आपल्याकडे क्वचित मिळतो. पण या माणसाने खरोखर आमच्या जेवणाची चव वाढवली. अशीही इथल्या पदार्थांची चव क्लास होतीच, पण असं आनंदाने वाढणारं कुणी असेल तर मग ती अजूनच भारी होते. भरपेट जेवून आम्ही घराच्या वाटेला लागलो. दिवस तीन संपला. उद्या साउथ केन्सिंगटन, रॉयल अल्बर्ट हॉल, हिस्टरी म्युजियम इत्यादी बघायचं होतं.
दिवस चौथा. ट्रेनचा पहिलाच प्रवास. पहिल्यांदाच स्टेशन, ऑयस्टर कार्ड, प्रथमदर्शनी किचकट वाटणारा मॅप, हे सगळं आज होतं. स्टेशनवर प्रामसकट दाखल झालो. पहिल्यांदाच असल्याने माझी बहीण आमच्यासोबत आज येणार होती. कार्ड पंच करून फलाटावर आलो. जुबिली, मेट्रोपॉलिटन, सेंट्रल, नि काय काय लाईन्स होत्या. म्हटलं तसं, पहिले किचकट वाटला पण नंतर तो मॅप फिट बसला डोक्यात. या मॅपची गोष्ट अशी की याची संकल्पना एका प्लमरने काढली. आणि हा मॅप पाईप्सच्या जाळ्यासारखा विकसित केला; त्याचं डिझाईन बघता ते लक्षात येतं. शहराच्या विकासात कुणाकुणाचं कसं कसं योगदान आहे याचा हा नमुना.
साउथ केन्सिंगटनला दाखल झालो. लंडनमधे कुठल्याही मोकळ्या जागेत धूम्रपान करायची मुभा आहे. त्याचा फार त्रास झाला पूर्ण प्रवासात. एक सेकंदही तो वास मला सहन होत नाही आणि इथे दर तिसरी व्यक्ती आपली भकाभक धूर सोडत उभी होती स्टेशनबाहेर. त्यात असंख्य कबुतरं होती जागोजागी. ते जरा पक्षांचं आणि माझं वावडं आहे त्यामुळे....
तर हे असं सगळं पार करून केन्सिंगटनच्या रस्त्यांवर आम्ही भटकू लागलो.
इथे अतिशय देखण्या इमारती आहेत. त्या बघताना एक सॉलिड ग्रँड फीलिंग येतं आपल्याला. सोनेरी रंगाच्या पाट्यांवर काळ्या अक्षरांनी लिहिलेली नावं, दारासमोरच्या दोन-तीन पायर्या, त्या जिन्याला असलेले नक्षीदार कठडे, इतकंच नव्हे तर दरवाज्यावर असलेलं बेलचं बटणही रॉयल. आहाहा! जाम भारी प्रकार होता सगळा.
प्रिन्स अल्बर्ट हॉलकडे आलो. इथे आम्ही आत जाणार नव्हतो; त्यामुळे बाहेरून फेरफटका मारला. एक प्रदक्षिणा केली आणि मग हिस्टरी म्युझियममधे शिरलो.
म्युझियम बद्दल लिहायला एक धागा पुरायचा नाही त्यामुळे ते लिहीत नाही. पण इतकं सुरेख आणि रंजक आहे त्या म्युझियम मधलं प्रत्येक दालन, की ते प्रेक्षणीय स्थळ न म्हणता अभ्यासाचं स्थळ म्हणायला हवं.
अर्थातच आम्हालाही वेळ पुरला नाही, शिवाय मग मुलाचाही फिरण्यातला रस संपल्यावर आम्ही दिवस आटपता घेतला. हां; पण पेटपूजा राहिली होती, त्यामुळे हॉटेलात शिरलो. एक वेगवेगळी चीज असलेली डिश आम्ही घेतली होती. इथे चीजबरोबर स्वीट खाण्याची पद्धत आहे. चीजचा फ्लेवर बरेचदा तीव्र असतो त्यामुळे ती टेस्ट न्यूट्रलाईज करायला त्या त्या चीजबरोबर जाणारं विशिष्ट स्वीट तुम्हाला देतात. अशाप्रकारे जिभेचे चोचले पुरवून पुन्हा अंडरग्राउंड आणि बॅक टू होम.
सर्वात डावीकडचं ब्लू चीज आहे. भारीच स्ट्राँग फ्लेवर होता याचा.
लंडन ट्रिप वॉज गोइंग ग्रेट.
क्रमशः
प्रतिक्रिया
5 Oct 2016 - 11:53 am | दिपक.कुवेत
आमचीही सफर चालू आहे. लंडन आणि न्यू यॉर्क हि दोन शहर भेट द्यायच्या यादित नेहमीच पहिल्या क्रमांकावर आहेत...बघुया कधी जमतय ते...
5 Oct 2016 - 12:12 pm | पद्मावति
फारच छान चाललीय लंडनवारी. पु.भा.प्र.
5 Oct 2016 - 12:42 pm | विशाखा राऊत
वाह लंडन सिटि की बात हि अलग है.. :)
5 Oct 2016 - 2:41 pm | पाटीलभाऊ
मस्त लिहिलंय..आणि फोटो पण उत्तम.
5 Oct 2016 - 5:26 pm | अजया
सुहाना सफर सुरु आहे!
लाॅकबद्दल वाचलं होतं.पहिल्यांदाच बघितलं ते काय असतं.
5 Oct 2016 - 6:01 pm | रेवती
वाचतिये. फोटू आवडतायत.
5 Oct 2016 - 11:30 pm | रातराणी
मस्त!
6 Oct 2016 - 1:05 am | खटपट्या
मस्त चालू आहे लंडनवारी. हीरवळ बघून प्रसन्न वाटले...
7 Oct 2016 - 8:00 am | वेल्लाभट
आभार सगळ्यांचे !
9 Oct 2016 - 9:19 am | चौकटराजा
सर्व फोटो सुंदर आलेत ! मोठे उंच प्रवेशद्वार असलेली ती रोमन शैलीतील इमारत फारच देखणी आहे.
22 Oct 2016 - 1:45 pm | प्रभाकर पेठकर
मस्त आहे वर्णन लेख.
ही लॉक्स इजिप्तमध्ये नाईल नदीवर अनुभवली होती. आमची बोट अजस्त्र होती. क्रुझशिपच होती. लॉक्सच्या तीन पातळ्या होत्या. मुळ पातळी, मधली पातळी आणि बाहेर पडायची तिसरी पातळी. एव्हढी अजस्त्र बोट पण धरणाच्या वरच्या पातळीतुन जिन्याच्या पायर्या चढाव्या/उतराव्या तशी अलगद पलीकडच्या नदी प्रवाहात जाते आणि येणार्या बोटी धरणाच्या वरच्या पातळीत प्रवेश करतात.
शाळेत भुगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं ते तिथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. जगात अशी अनेक ठिकाणी लॉक्स आहेत. तर कांही ठिकाणी लिफ्ट आहेत. आख्खी बोट उचलून वरच्या प्रवाहात सोडतात.
लंडनच्या सोयी सुविधा, शिस्त, मेट्रो सगळंच छान आहे. पण लंडन बाहेरील शहरांपेक्षा थोडा बकालपणा इथे जाणवतो. पण तो नगण्य आहे आणि मोठ्या शहरांच्या माथी तो लिहीलेलाच असतो. त्यामुळे दुर्लक्ष करावे लागते.