YZ (परिक्षण दुरुस्ती)

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 1:09 am

(समीर_happy go lucky हे मिपावर नेहमी चित्रपट परिक्षण लिहित असतात. दर्जाच्या बाबतीत थोडंफार हुकत असले तरी त्यांची चिकाटी व आवड पाहून मला फार छान वाटले. त्यांच्या नुकत्याच आलेल्या http://misalpav.com/node/37050 ह्या वायझेड मराठी चित्रपटाच्या परिक्षणामधे बरेच काही खटकले. एक उत्तम चित्रपट परिक्षक होण्याची योग्यता असलेल्या लेखकास केवळ हुर्यो उडवून पळवुन लावावे हे मला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा त्यांच्या परिक्षणातल्या खटकलेल्या बाजू वगळून, शब्दरचना सुधारून तेच परिक्षण संपादित केले तर कसे वाटेल अशी कल्पना मनात आली. त्यानुसार खाली तेच, समीर यांनीच लिहिलेले चित्रपट परिक्षण माझ्यातर्फे काटछाट करुन सादर करत आहे. मूळ गाभा तसाच ठेवून, काही शब्दरचना, वाक्प्रयोग (भयंकर वाटले तरीही) तसेच ठेवून व्याकरण, भाषाशुद्धी करण्याचा प्रयत्न आहे. योग्य तपशीलही दिले आहेत. मी चित्रपट बघितलेला नाही हे लक्षात घ्यावे. माझा हा आगावू उपद्व्याप समीर यांच्यातल्या उत्तम लेखकास दाद देण्याचा आहे जो कदाचित त्यांच्या घाई करण्यामुळे, थोडा अभ्यास व व्यासंग कमी पडल्याने पुरेसा खुलून येत नाहीये व वाचकांना 'पाट्या टाकल्यासारखं काहीतरी वाचायला लागतंय' अशी भावना येते. समीर यांना उपदेशाचे चार डोस पाजण्याची माझी योग्यता नाही. मी माझ्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. समीर यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नये. धन्यवाद!)
.
------------------------
.

चित्रपटाला "YZ" असे विचित्र शिर्षक का दिले असावे असा प्रश्न रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे. कारण YZ ही दोन अक्षरे एका मराठी शिवीचे इंग्रजी लघुरुप आहेत. साध्या भाषेत ज्याचा अर्थ होतो "बावळट". हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल आणि नंतर या शिर्षकाचे समर्पक स्पष्टीकरण चित्रपटात दिल्याबद्दल कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांना प्रेक्षक मनापासून दाद देतीलच. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक, जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते व आपले मराठी प्रेक्षक उचलून धरतात, तेंव्हा आपण मराठी जनांनीही असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असावा आणि त्यातून जन्माला आला YZ. YZ म्हणजे नक्की काय व कसे हे जाणून घेण्यासाठी चित्रपटच बघणे योग्य.

अबब\गजानन कुलकर्णी (सागर देशमुख) या एका लग्नोत्सूक वराची कथा तीन स्त्रीपात्रांच्या कोनात फिरून शेवटी संपते. अक्षय टाकसाळे (बत्तीस) याने आपले काम चोख करुन कथेला योग्य तो न्याय दिला आहे. बहुतेक अक्षयचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तसे असेल तर मराठी चित्रपटसृष्टीत एका उत्तम अभिनेत्याचे आगमन झाले आहे हे त्याने सिद्ध केले.

या चित्रपटात तीन-तीन स्त्रीव्यक्तिरेखा असल्या तरी लेखक क्षितिज पटवर्धन यांची कथामांडणी प्रेक्षकांचा उत्साह टिकून राहिल अशीच आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपला जीवनसाथी शोधताना काही विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात धरुन असते. मग जी स्थळे येतात ती आपल्या मनात असलेल्या अपेक्षांशी ताडून त्या प्रतिमेला शोधण्याचा प्रयत्न होतो. लव्ह मॅरेज प्रकारात काही नशिबवानाना अशी प्रतिमा प्रत्यक्षात गवसलेली असते आणि अरेंज मॅरेज वाले जी व्यक्ती भेटते (का मिळते?) त्याच व्यक्तीत आपल्या मनातील प्रतिमा शोधतात. कल्पनेचा आवाका निश्चितच फार मोठा आहे पण लेखकाने एखाद्या कसलेल्या नाटककाराप्रमाणे कथेची मांडणी केलेली आहे. क्षितिज नाटकेही लिहत असेल, तसे नसेल तर त्याने नक्की लिहावे कारण प्रसंगानुरुप कथेचा अंतरात्मा वळवण्याची (?) हातोटी त्याच्याकडे आहे.

डबल सीट आणि टाइमप्लीज चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शक समीर विद्वांस हेच YZ चे दिग्दर्शक. एक कठिण कल्पना अडीच तासाच्या तुटपुंज्या वेळेत त्यांनी चांगल्या तर्‍हेने मांडली आहे. वास्तविकत: ह्या कल्पनेच्या अवजडपणामुळे प्रेक्षक संभ्रमित होण्याची शक्यता होती. तरीही समीरने अत्यंत हुशारीने आपली दिग्दर्शकिय कसब पणाला लावून कोठेही बोट ठेवता येणार नाही अशा सफाईदारपणे ही कल्पना हाताळली आहे.

चित्रपटाला ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव आणि जसराज जोशी ह्यांनी संगीत दिले आहे. याच त्रिकुटाने समीरच्याच टाइमप्लीज ह्या चित्रपटालाही सुमधूर संगीत दिले आहे. यातले केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांचे 'प्रियकरा' हे गाणे अस्खलित संस्कृतमध्ये आहे. महाकवी कालिदासांच्या शाकुंतल या नाटकातील ही रचना केतकी अन स्वप्नील या दोघांनीही सुंदररित्या सादर केली आहे.

सागर देशमुख याने साकारलेला गज्या हा व्यक्ती आपल्याला रोजच्या जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत कुठे-ना-कुठे लपलेला आढळतो. पण आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणारा गज्या हा शेकडोंपैकी एखादाच असतो. 'लोक काय म्हणतील' या भावनेखाली आपल्याला दिसणारे शेकडो गज्या दबून जातात. लेखकाची ही कल्पना पटली अन आवडली म्हणून व दिग्दर्शन, पटकथा, केतकी व स्वप्नीलचे एकमेव अस्खलित संस्कृत मधील गाणे यासाठी चित्रपटाला साडेतीन (3 1/2) गुण. शेवटी निर्णय प्रेक्षकांनी घ्यायचा आहे.

-----------------
.
चित्रपट परिक्षणाबद्द्लच्या एक वाचक म्हणून माझ्या फार साधारण अशा अपेक्षा:

१. चित्रपटाची कथा, कथाबीज थोडक्यात सांगून, स्पॉयलर्स टाळून नीट कळेल अशी किमान दहा ओळीत तरी सांगावी.

२. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, संगितकार इत्यादी महत्त्वाच्या लोकांबद्दल लेखकास खूप नाही पण योग्य ती माहिती असावी. परिक्षण लिहिण्याआधी त्याने ते अभ्यासलेले असावे. निर्माते व बॅनर यांचाही उल्लेख असावा. यामुळे चित्रपटाच्या टीमच्या पुर्वेइतिहासानुसार चित्रपटाची पातळी ध्यानात येऊ शकते.

३. 'कौतुक, अभिनंदन' असे सत्कारसमारंभी भाषणाचे अंश परिक्षणात असू नये. हे परिक्षण आहे, पुरस्कारसमारंभ नाही हे लक्षात असणे महत्त्वाचे.

४. एकाच प्रकारची वाक्ये परत परत वापरु नये. 'पेलून दाखवले' छाप वाक्ये कसलेल्या कलाकारांसाठी वापरणे हास्यास्पद होऊ शकते. लेखकाकडे शब्दसंग्रह कमी असल्याचा त्रास वाचकाला होतो.

५. कर्ता, कर्म, क्रियापद ह्याबद्दल व्याकरण शुद्धता असणे आवश्यक आहे. तसेच लिंग, काळ ह्याबाबतीत दक्षता घेणे आहेच. मराठीत लिहितांना अतिशय आवश्यक असेल तरच व मराठी प्रतिशब्द नसेल किंवा अत्यंत कठिण असेल तेव्हाच इंग्रजी शब्द वापरावे.

६. परिक्षणात लेखक डोकावू नये. मी, मला, माझे मत असे स्पष्टपणे लिहायची गरज नसते. सगळे परिक्षण हे लेखकाचेच मत असते, त्यात वेगळा मीपणा आणायची आवश्यकता नाही.

७. चित्रपट परिक्षणाची एक सर्वप्रचलित धाटणी आहे. ज्यात चित्रपटाच्या अनेक (शक्यतो उल्लेखनिय) अंगाबद्दल किमान दोन शब्द लिहिले जावे अशी अपेक्षा असते. जेणेकरुन चित्रपट निर्माण होण्यास ज्या गोष्टींचा उपयोग झाला त्यांच्या परिणामकारकतेबद्दल लेखकास काय वाटले हे आले तर योग्य असते. जसे दिग्दर्शन, कल्पना, कथा, पटकथा, अभिनय, गीत-संगीत, पार्श्वसंगीत, कलादिग्दर्शन, एकंदर वातावरण (चित्रपटातले).

८. चित्रपट परिक्षण लेखकास परिक्षणाचा उद्देश, गाभा, परिणामकता याबद्दल जुजबी तरी माहिती असावी.

चित्रपटप्रतिसादसमीक्षा

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

21 Aug 2016 - 1:34 am | अमितदादा

मूळ लेख तसाच हा हि लेख आवडला. तुम्ही जणू मिपावर चित्रपट परिक्षण साठी मार्गदर्शक तत्वे जरी केली आहेत असे वाटून गेले. तुम्ही मांडलेला 3 नंबर चा पॉईंट जास्त आवडला.

शेवटचे मुद्दे बरोबर. त्याबरोबरच चित्रपटनिर्मितीसंबंधित इतर बाबींचीही जुजबी माहिती असणे आवश्यक आहे. उदा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूळ कथाबीज किती सशक्त आहे. त्यानंतर त्यावरून पटकथा कशी फुलवली आहे. दिग्दर्शकाने ती कलाकारांकडून कशी अभिनित करून घेतली आहे. त्यानंतर संकलन किती परिणामकारक झाले आहे. तांत्रिक बाजू, संवाद, चित्रीकरण, मांडणी, इ. सर्व बाजूंचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास परीक्षणातून दिसून आला तर जाणकार व दर्दी चित्रपटरसिकांना नक्कीच आवडतं.

बादवे वरील सुधारीत लेखनातल्या शुद्धलेखनाच्या चुका खटकल्या.

माझ्या मते समीर यांनी परीक्षण पूर्ण विचारांतीच लिहिलेलं असावं त्यामुळे त्यात सुधारणा जरूर सुचवाव्यात, पण तरीही एक विशिष्ट धागा काढून सर्व मिपाकरांसमोर त्या धाग्यात काय असावं आणि काय नको याचं प्रदर्शन करु नये.
त्यासाठी व्यनि व खरडवही याची सोय आहेच.

व्याकरण, भाषाशुद्धी करण्याचा प्रयत्न आहे.>>>>>
यांवर मी नम्रपणे सांगू इच्छितो, कि सुधारित लेखनात शुद्धलेखनाच्या भरपूर चुका आहेत, मूळ लेखात त्या तितक्या नाहीत.

प्रत्येकाची एक लेखनशैली असते, त्यात तो स्वतःची भाषा वापरतो.
उदा. काय घाण अभ्यास करतो तो!
यात घाण हा शब्द वाईट या अर्थाने वापरला जातो, पण नाशिकमधील कॉलेजच्या युवकांनी हा शब्द बऱ्याचदा भरपूर या अर्थाने वापरताना दिसतात. त्यामुळे भाषाशुद्धी ह्या प्रकारची गरज नसावी.
(अपवाद: मोकलाया दाही दिशा)

काजुकतली's picture

22 Aug 2016 - 6:50 am | काजुकतली

पूर्ण विचारांती? नुसते संगीतकारात एक नाव जसराज आहे आणि चित्रपटात एक गाणे संस्कृत आहे यावरून पंडित जसराज हेच चित्रपटाचे संगीतकार आहेत हे ठामपणे लिहिणे पूर्ण विचारांती? चित्रपटाबद्दल थोडे वाचले असते तरी हा ठामपणा वाळूच्या किल्ल्यागत ढासळला असता. असो. वर लेखात लिहिलेय ते योग्यच आहे.

प्रत्येकाची एक लेखनशैली असते, त्यात तो स्वतःची भाषा वापरतो.

+१..
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंच.
सांगायचं तंत्र सांगणार्‍याला जे पटेल तेच हवं...
नैतर सगळे लेख 'यशराज पिच्चर'सारखे होतील...

समीर_happy go lucky's picture

21 Aug 2016 - 10:38 am | समीर_happy go lucky

मनापासून धन्यवाद सर, यापुढे निश्चितच काळजी घेईन हे माझ्याकडे सेव्ह करून ठेवलं.

सत्याचे प्रयोग's picture

22 Aug 2016 - 1:20 pm | सत्याचे प्रयोग

परीक्षण लिहा तरीही .

मुळात मला कुठल्याच लेखनात शुद्धलेखनाच्या चुका सापडत नाहीत. त्या कश्या शोधाव्यात ह्याचे मार्गदर्शन जोकर गुरुजी करू शकतील काय? किंवा आपल्याच लेखनातल्या अशुद्ध लेखनाच्या चुका कश्या शोधाव्यात?

(गरीब बिचारा)पक्षी

काजुकतली's picture

23 Aug 2016 - 1:37 pm | काजुकतली

अरे गरीब बिचाऱ्या पक्ष्या, उगी टेन्शन घेऊ नकोस. व्याकरणाच्या चुका त्यांनाच बोचतात ज्यांचे ते पक्के असते. बाकी लोकांना पक्ष्याने टेन्शन घेतले आणि पक्षाने टेन्शन घेतले मधला फरकही कळणार नाही.

क्षमस्व's picture

24 Aug 2016 - 7:43 pm | क्षमस्व

पक्ष्याने- उडणारा पक्षी या अर्थाने
पक्षाने- राजकीय पक्ष

काजूकतली आपला सदस्य काळ बघता आपण फार जुन्या आहात असं वाटतं।
आणि त्याहूनही सन्माननीय सदस्य तर्राट जोकर कुणालाही काही म्हणत नसतांना आपणच भांडणाचा पवित्रा घेत आहात।
आपल्या सदस्य काळात आपणाकडून एकही लेख आला नाही, मात्र या धाग्यावर सरसावून प्रतिसाद देत आहात।
कारण काय असावे बरे?

अलका सुहास जोशी's picture

29 Aug 2016 - 2:02 pm | अलका सुहास जोशी

सुधारित परिक्शण - मुद्दे वाजिब आहेत.पण...

मुळात सिनेमाच न बघता तत्वत:उत्तम परिक्शण कसे असावे याची पोटति़डीक व्यक्त करणे आणि ते हातासरशी सुधारूनही देणे हे फार म्हणजे फारच बुवा असामान्य.

दरम्यान ………

मी पाहिलाय YZ. आवडला यासाठी की विषय वेगळाय. खूपसा abstract. पण दिग्दर्शकाला लेखकाचा आणि विषयाचा फंडा नीटच समजलेला असल्याने आपल्याला सिनेमा कळणे सोपे होते. हा विषय भरकटोत्तम दिग्दर्शकाकडे गेला नाही हे छानच.

अबब हा सामान्य माणूस. त्याची साधीसरळ आवाक्यातली स्वप्ने पहाणेसुध्दा तो बंद करून टाकतो. कां? तर तो सध्याच्या जगाप्रमाणे SMART नाही म्हणून. त्याला SMART बनवणारं Character म्हणजे “बत्तीस”. (आठवा- अमोल पालेकर अधिक अशोककुमार) वजा असरानी – (चित्रपट छोटीसी बात). सरतेशेव़टी अबब SMART बनतो. म्हणजे काय………तर आपल्याला नक्की काय हवे आहे आणि मुख्य म्हणजे काय नक्कीच नको आहे, याचा त्याला शोध लागतो.

कथेतली आई करेक्ट टिपिकल. नाकीडोळी ,बरी कमवती , सालस देवभोळी मुलगी चालून आलेली असताना, मुलगा लग्न मोडतो आहे म्हटल्यावर ती अबबला तोडावर जे काही तडतडा बोलते, ते भयानकच. चारच वाक्ये असतील ती . पण ती नेहमी वाजवली जातात घराघरांत. हे असलं करू नका प्लीज……….असंही सांगायचंय या सिनेमाला.

संस्कृत गाणयाचे चित्ीकरण आणि अभिनय दोन्हीही अगदी बाळबोध. (पर्ण पेठे- सागर देशमुख) अंतरा आणि अबब एकमेकाना seduce करताहेत हा सगळा प्रकार विनोदीच दिसलाय स्क्रीनवर.

नक्की पहा, जमेल तेव्हा. TV वर येईल तेव्हा चुकवू नका. कारण बहुधा उतरवलेला आहे हा चित्रपट मल्टिप्लेक्सातून.

समीर_happy go lucky's picture

29 Aug 2016 - 11:08 pm | समीर_happy go lucky

नाही पुण्यात आहे अजून, सीझन्स मॉलला

तर्राट जोकर's picture

2 Sep 2016 - 10:58 pm | तर्राट जोकर

समीरजी, हलके घेतल्याबद्दल धन्यवाद. काही लोकांना हा प्रकार आवडलेला नाही. मूळ लेखकास कोणत्याही प्रकारे हतोत्साहित करण्याचा उद्देश नाही, नव्हता.

मला सिनेमा मनोरंजक वाटला.
गाणी आवडली.