घर क्रमांक – १३/८ भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 4:11 pm

घर क्रमांक – १३/८ भाग - १
घर क्रमांक – १३/८ भाग - २
घर क्रमांक - १३/८ भाग - ३

घर क्रमांक – १३/८ भाग - ४

..... त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की मी भेटल्यानंतर ते एकदा त्या घराला भेट देऊन आले होते व तेथे त्यांना ती दोन पत्रे सापडली. त्यांनी ती वाचली देखील. ती वाचल्यानंतर त्यांनी त्या बाईबद्दल थोडीफार सावध चौकशीही केली. त्यांना मिळालेली हकिकत खालीलप्रमाणे-

साधारणत: ३०/३५ वर्षांपूर्वी (त्या पत्राच्या तारखेअगोदर एक वर्षं) त्या स्त्रीने तिच्या इतर नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध एका संशयास्पद चारित्र्य असलेल्या भटकलच्या एका तांडेलाशी विवाह केला. त्याच्याबद्दल बऱ्याच अफवा त्या काळात पसरल्या होत्या. कोणी तर असे सांगत की तो एक समुद्री चाचा होता आणि त्यामुळे तो बऱ्यापैकी पैसे बाळगून होता. ती स्त्री एका घरंदाज व्यापारी घराण्यातील होती आणि तिला एक श्रीमंत भाऊ होता ज्याची पत्नी त्याच्या तरुण वयातच निवर्तली होती. त्यांना एक सहा वर्षाचा मुलगा होता. लग्नानंतर त्या स्त्रीच्या भावाचा संशयास्पद मृत्यु झाला. त्याचे प्रेत नदीपात्रात सापडले होते. त्याच्या अंगावर मारहाणीच्या बऱ्याच खुणा सापडल्या. पण त्यामुळे त्याचा मृत्यु झाला असे न म्हणता आल्यामुळे तो नदीत बुडून मृत्यु पावला असे पोलिसांनी जाहीर केले होते.

त्यानंतर तांडेल व त्याच्या पत्नीने त्या लहान मुलाचा सांभाळ केला. त्याच्या वडिलांच्या संपत्तीचा तो एकमेव वारस होता. त्याच्या वडिलांच्या मृत्युपत्रानुसार जर त्याचा मृत्यु झाला तर ती सगळी संपत्ती त्याच्या आत्याला मिळणार होती. दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यु नंतर सहा महिन्यातच झाला. असे म्हणतात त्याचे त्या घरात फार छळ झाला व रात्री बेरात्री त्यांच्या घरातून किंकाळ्याही ऐकू यायच्या. कोणी म्हणत तो पूर्ण वेडा झाला होता. त्याच्या प्रेताची शवचिकित्सा करणाऱ्या डॉक्टरने तो भुकेने आणि मारहाणीने मेला असा अहवाल दिला होता. एका रात्री त्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना तो भिंतीवरुन खाली पडला आणि फरशीवर आपटून त्याचा मृत्यु झाला असाही एक प्रवाद होता. पण खुनाचा कसलाही पुरावा नसल्यामुळे त्या कलमाखाली कोणालाच अटक झाली नाही. आत्याला सगळी इस्टेट मिळाली. लग्न होऊन एक वर्ष झाले असेल नसेल तांडेल जो गायब झाला तो परत आलाच नाही. त्याचा बहुधा समुद्रावरच कोणीतरी काटा काढला असावा. त्या विधवेकडे बरीच संपत्ती शिल्लक असली तरी तिचे नशीब चांगले नव्हते. तिने ज्या पोर्तुगीज बँकेत पैसे गुंतवले होते ती बुडाली. मग तिने एक छोटासा व्यवसाय सुरु केला त्यातही तिचे दिवाळे निघाले. मग तिने नोकरी पत्करली. पण बिचारीची अधोगतीच होत गेली. मग शेवटी मोलकरणीची नोकरी करण्याची तिच्यावर वेळ आली. शेवटी तिची रवानगी एका वृद्धाश्रमात करण्यात आली. तिच्या शेजाऱ्यांनी तिला पुष्कळ मदत केली कारण तिच्याबद्दल कोणीही एकही वाईट शब्द बोलत नसे. त्याच आश्रमातून शेवटी जहागिरदारांनी तिला आणली होती व त्या घराची काळजी घेण्यास नोकरीवर ठेवले. त्याच घरात ज्या घरात एके काळी ती मालकीण म्हणून वावरली होती.

जहागिरदारांनी पुढे लिहिले होते की ते त्यांनी त्या घरात एक तास कसाबसा काढला पण त्या काळात त्यांच्या मनावरचे दडपण एवढे वाढले की त्यांनी तेथल्या तेथेच ती खोली व त्याच्या खालचा मजला पाडण्याचा निर्णय घेऊन टाकला. त्यांनी त्यासाठी एका मुकादमाला कंत्राटही दिले होते. ते फक्त माझी वाट पहात होते. मी सांगितलेल्या दिवशी तो कंत्राटदार काम सुरु करणार होता.

त्यांनी पत्रात लिहिलेल्यानुसार मी त्यांच्यासाठी एक दिवस ठरवला. मी तेथे पोहोचेपर्यंत त्याने त्या खोलीची तक्तपोशी उखडून टाकली होती. त्या फरशांखाली तुळयांच्या खाली पण खालच्या मजल्यावर (म्हणजे दोन मजल्यांच्या मधे) एक माणूस उतरु शकेल एवढा चोर दरवाजा आम्हाला सापडला. मोठमोठ्या कुऱ्हाडी खिळ्यांनी तो दरवाजा ठोकला होता. ते काढल्यावर आम्ही आत उतरलो. आजवर त्या खोलीच्या अस्तित्वाची शंकाही कोणाला आली नव्हती. त्या खोलीच्या खिडक्या व दार विटांचे बांधकाम करुन बुजविलेले दिसत होते. मेणबत्त्यांच्या सहाय्याने आम्ही त्या खोली तपासली. त्यात अजुनही जुनाट तीन खुर्च्या व एक टेबल होते. एका कोपऱ्यात ड्रॉवर असलेले कपाट होते. त्यात मला वाटते जुनाट बऱ्याच वर्षापूर्वीचे काही दरबारी पोषाख व काही पदके होती. एक सुंदर निळसर पात्याची तलवारही होती. काही सोन्याची, चांदीची नाणी, हस्तिदंती मुद्रा अशा अनेक वस्तू होत्या पण आमचे लक्ष होते भिंतीत पुरलेल्या एका तिजोरीवर ज्याचे कुलुप तोडण्यास आम्हाला बरेच प्रयास पडले.

त्या तिजोरीत तीन कप्पे व दोन छोटे ड्रॉवर होते. कप्प्यात लोलकासारख्या चमचम करणाऱ्या स्फटिकाच्याअनेक हवाबंद केलेल्या कुप्या होत्या. त्या कसलेतरी द्रव होते त्याच्या वासाचे वर्णन मी करु शकणार नाही. विचित्र वाटणाऱ्या काही काचेच्या नळ्या व लोखंडाच्या सळयाही तेथे दिसल्या.

एका ड्रॉवरमधे एक छोटेसे तैलचित्र होते, जे सोन्याच्या फ्रेममधे बसवले होते. ते चित्र एका मध्यमवयीन माणसाचे होते. त्याचे वय असेल अंदाजे अठ्ठेचाळीस. त्याचा चेहरा वेगळाच होता. लक्षात राहील असा. एखाद्या भुजंगाने माणसाचे रुप धारण केले तर तो कसा दिसेल असे त्याचे रुप होते. विशेषत: त्याचे डोळे ! त्या शांत हिरवटसर डोळयात सत्ता व निष्ठुरता पुरेपुर भरलेली दिसत होती.

मी सहजपणे ती चौकट उलटी केली आणि तिची मागची बाजू तपासली. त्यावर कसलेतरी यंत्र कोरले होते ज्यावर १७६५ असे साल कोरले होते. जरा नीट तपासल्यावर तेथे मला एक कळ दिसली जी दाबल्यावर त्या चित्राचे मागील झाकण फटकन उघडले. आत कुठलातरी मजकूर कोरला होता... ‘‘ मरेतो पर्यंत ...शी प्रामाणिक रहा.’’ येथे एक नाव लिहिले होते जे मी आता उघड करु शकत नाही कारण ज्या व्यक्तिबद्द्ल हे लिहिले होते ती इतिहासातील फार मोठी व्यक्ती आहे. हा माणूस त्याच्या पत्नीचा व तिच्या प्रियकराचा खून खून करुन परागंदा झाला होता. मी काही हे जहागिरदारांना सांगितले नाही. खरे तर ते चित्र मला माझ्याकडेच ठेवायचे होते पण थोड्याशा नाखुशीनेचे ते चित्र मी त्यांना परत दिले.

सगळ्यात वरचे ड्रॉवर उघडण्यास आम्हाला फार काही श्रम पडले नाहीत. दुसरे उघडताना मात्र आम्हाला फार कष्ट पडले. त्याला कुलुप नव्हते पण आतून कोणीतरी ते ओढून धरल्यासारखे उघडतच नव्हते. शेवटी आम्ही एका कामगाराकडून त्याची छिन्नी घेतली व त्याच्या फटीत घातली व ते उघडले. आत एका पुस्तकासारख्या वहिवर एका स्फटिकाच्या बशीत कसला तरी द्रव पदार्थ होता आणि त्या द्रवात होकायंत्रासारखे दिसणारे काहीतरी तरंगत होते. फक्त यावर चार दिशांऐवजी सात खुणा होत्या. या खणामधून कसलातरी विचित्र, घाणेरडा भपकन वास आला. कप्प्याला लाकडाच्या फळ्या लावल्या होत्या. त्या वासाचा आमच्या मनावर कसलातरी भयंकर परिणाम झाला. आम्हाला सगळ्यांना ते जाणवले. एवढेच काय आमच्या बरोबर आत उतरलेले दोन कामगारांनाही ते जाणवले. ते तर म्हणाले त्यांच्या हातापायांना मुंग्या आल्या आहेत. मी ती वही तपासण्यासाठी घाईघाईने ती बशी उचलल्यावर त्यातील होकायंत्राची सुई गरगरा फिरायला लागले व त्याच वेळी माझ्या अंगातून वीज गेल्याचा मला भास झाला. घाबरुन मी ती बशी सोडली. त्यातील द्राव सांडला व ते होकायंत्र किंवा तत्सम काहीतरी गडगडत भिंतीवर आपटले. त्याच बरोबर ती खोली गदगदा हलली जणू काही कोणीतरी तिला झोका देतय. ते कामगार इतके घाबरले की त्यांनी त्या पटकन त्या चोरदरवाजातून वर पळ काढला. पुढे काहीच न झाल्यामुळे त्यांची समजूत काढून आम्ही त्यांना परत आत घेऊन आलो.

तोपर्यंत मी ती वही उघडली. लाल रंगाच्या चामडी वेष्टणात बांधलेल्या त्या वहीत फक्त एकच कातड्याचा कागद होता. त्यावर एक यंत्र काढले होते व त्यावर पालीमधे काहीतरी लिहिले होते. त्याचा अर्थ आम्ही जो नंतर शोधला तो असा होता ‘‘ जो कोणी जीव किंवा निर्जिव वस्तू या खोलीत पोहोचेल, जिवंत किंवा मृत ते कायम अस्वस्थ राहतील. या फिरणाऱ्या सुईप्रमाणे ! असा माझा शाप आहे.’’

त्या खोलीत अजुन काही नव्हते. जहागिरदारांनी ती वही जाळून टाकली. ते घर जमिनदोस्त केले (म्हणजे ती खोली व त्याच्या खालचा भाग) अगदी पायाही खणून काढला, नंतर ते धाडस करुन स्वत: त्या घरात एक महिना राहिले व त्या दरम्यान ते घर त्यांनी चांगले सजवले. अर्थात आता ते घर कोणाला नापसंत पडण्याचे कुठलेच कारण उरले नव्हते.

मागच्याच महिन्यात त्यांनी ते एका सभ्य माणसाला भाड्याने दिले... आणि त्या भाडेकरुने अजुनतरी कसलीही तक्रार केली नाही.....

समाप्त.

जयंत कुलकर्णी.
भयकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता....

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नमकिन's picture

11 Jun 2016 - 4:27 pm | नमकिन

पहिल्याच प्रयत्नात खिळा कु-हाडीविनाच.
पुलेशु!

एस's picture

11 Jun 2016 - 4:36 pm | एस

मस्त.

अजया's picture

11 Jun 2016 - 5:56 pm | अजया

मस्त.

जेपी's picture

11 Jun 2016 - 6:09 pm | जेपी

आवडल..

सामान्य वाचक's picture

11 Jun 2016 - 7:35 pm | सामान्य वाचक

अनुवाद देखील खुपच चांगला झाला आहे

खटपट्या's picture

12 Jun 2016 - 3:02 am | खटपट्या

वा अप्रतीम कथानक !

जव्हेरगंज's picture

12 Jun 2016 - 7:29 pm | जव्हेरगंज

खिळवून ठेवलंत!

पण कथानक समजलं नाही!
कोणी इस्कटून सांगेल काय?

स्रुजा's picture

14 Jun 2016 - 1:02 am | स्रुजा

+१ , रहस्य कळलं नाही :(

सस्नेह's picture

14 Jun 2016 - 2:58 pm | सस्नेह

पहिल्या आणि दुसऱ्या भागातील विचित्र घटनांच्या कार्यकारणभावाचा उलगडा झाला नाही. टेबलातून हात बाहेर येणे, प्रकाशाचा गोळा फिरणे इ.

सस्नेह's picture

14 Jun 2016 - 7:42 pm | सस्नेह

Double

आरोह's picture

13 Jun 2016 - 9:09 pm | आरोह

असे वाटल होतं कि काहीतरी भानामती चा प्रकार असेल आणि नायक त्याचा पर्दाफाश करेल

नमकिन's picture

13 Jun 2016 - 9:47 pm | नमकिन

यंत्र त्या त्या वेळेला नेमून दिलेली कामं करत होती असे सर्व झाले, नायकाने मानसिक खंबीरतेने व तर्कशुद्ध उकल करुन उगम शोधले.
मला एवढेच समजले

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Jun 2016 - 7:27 am | कैलासवासी सोन्याबापु

वेगळाच दृष्टिकोन आहे काका कथानायकाचा! फार आवडली कथा मला!

कानडाऊ योगेशु's picture

14 Jun 2016 - 7:51 am | कानडाऊ योगेशु

खरे सांगायचे तर प्रचंड अपेक्षाभंग झाला ह्या भागात. आधीच्या भागात भुते वगैरेबद्दल नायकाची विशिष्ठ भूमिका वा तत्वज्ञानाची बैठक ज्यापध्दतीने मांडली गेली त्यामुळे ह्या भागात नायक एखाद्या अनुमानापर्यंत येईल असे वाटले होते. (भूत असले तरी व नसले तरी.). ह्या भागामुळे ही पूर्ण कथा एक तद्दन भूतकथा बनुन गेली आहे. (जयंतरावांचा अनुवाद उत्तमच ह्यावर अर्थातच दुमत नाही.)

हकु's picture

14 Jun 2016 - 11:44 am | हकु

सहमत.
तिसऱ्या भागापर्यंत कथेने अगदी घट्ट पकड घेतली होती.
पण शेवट अगदी अचानक गुंडाळल्यासारखा वाटला.

जयंत कुलकर्णी's picture

14 Jun 2016 - 2:42 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jun 2016 - 5:38 pm | हतोळकरांचा प्रसाद

कथा चांगली खिळवून ठेवणारी पण का कुणास ठाऊक, सारखी नारायण धारपांची आठवण येत होती. शेवटी भ्रमनिरास!

तिसऱ्या भागापर्यंत कथेने अगदी घट्ट पकड घेतली होती.
पण शेवट अगदी अचानक गुंडाळल्यासारखा वाटला.++++++++++११०००००००००

शेवट चा भाग अगदी निवेदनात्मक वाटला

सानिकास्वप्निल's picture

14 Jun 2016 - 9:57 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिले पण शेवटच्या भागाने निराशा केली.

अभिजीत अवलिया's picture

15 Jun 2016 - 12:00 pm | अभिजीत अवलिया

पहिले ३ भाग मस्त होते. हा भाग अजिबात आवडला नाही.

विशाखा राऊत's picture

15 Jun 2016 - 3:16 pm | विशाखा राऊत

पहिले ३ भाग खुपच मस्त होते.. हा भाग कुछ जम्म्या नही