घर क्रमांक – १३/८ भाग -१
घर क्रमांक – १३/८
माझा एक मित्र परवाच मला भेटला आणि म्हणाला,
‘‘तुला एक गंमत सांगतो. आम्ही मधे एक झपाटलेले घर पाहिले. इथे पुण्यात !’’ तो माझी चेष्टा करतोय का खरंच सांगतोय हे माझ्या लक्षात येईना. माझा हा मित्र बऱ्यापैकी नावाजलेला शास्त्रज्ञ आहे. मी त्याला डॉ. म्हणूनच हाका मारतो.
‘‘काय म्हणालास ? झपाटलेले ? कोणी भुताने का ? ’’ मी त्याला विचारले.
‘‘हंऽऽऽ मी ते सांगू शकणार नाही. मी फक्त तुला काय झाले ते सांगू शकतो.’’
‘‘ मागच्या महिन्यात मी व माझी बायको नवीन घराच्या शोधात होतो. अर्थात भाड्याच्या. आम्हाला फर्निचर असलेले घर पाहिजे होते. एकदा संध्याकाळी फिरायला गेलो असता एका गल्लीत एका घरावर आम्हाला ‘‘भाड्याने देणे आहे’’ अशी पाटी दिसली. खरे तर त्या भागात अशी पाटी एखाद्या घरावर लागावी याचे आम्हाला आश्चर्य वाटायला हवे होते...पण ते जाऊ देत. ती झांडांनी वेढलेली शांत, निर्मनुष्य गल्ली आम्हाला फारच आवडली. म्हणजे बघ ना संध्याकाळीसुद्धा तेथे आजिबात गर्दी नव्हती. आम्ही ते घर पाहिले आणि आम्हाला आवडले. पुढील सर्व बाबी पटापट पार पडल्या. आम्ही एका महिन्याचे भाडे व पागडी आगाऊ भरली आणि लगेचच त्या घरात रहायला गेलो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही ते घर सोडले सुद्धा. माझ्या बायकोला त्या निर्णयापासून प्रत्यक्ष परमेश्र्वरही रोखू शकला नसता. मीही तिला त्यासाठी दोष देणार नाही.’’
‘‘काय पहिले काय तुम्ही ? जरा सवीस्तर सांगशील का नाही ?’’
‘‘माफ कर मित्रा ! मला तुझी या बाबतीतली मते माहीत आहेत. मी सांगितल्यावर तू माझी येथेच्छ टिंगलटवाळी करणार याची मला कल्पना आहे. आणि मी सांगितल्यावर तुझा त्यावर विश्र्वास बसणार नाही हेही आपल्या दोघांना माहीत आहे. कशाला विषाची परिक्षा बघू मी ? आम्ही काय पाहिले आणि आम्हाला काय ऐकू आले यापेक्षा त्या घरातील एका बंद खोलीसमोरुन जाताना आमच्या मनावर जो प्रचंड भीतीचा पगडा बसत असे त्याला आम्ही घाबरलो. प्रथमच आयुष्यात मी माझ्या बायकोचे ऐकले आणि तीन रात्री त्या घरात कशाबशा काढून आम्ही जी बाई त्या घराची देखभाल करायची तिला बोलावणे पाठवले आणि या खोल्या आम्हाला फारच लहान वाटतात त्यामुळे आम्ही हा महिना पूर्ण करु शकणार नाही याची तिला कल्पना दिली... आम्हाला वाटले हे ऐकताच ती थोडीफर कटकट करेल. ‘‘जास्तीत जास्त काय होईल एका महिन्याचे भाडे जाईल‘‘ माझी बायको म्हणाली. पण असे काहीच झाले नाही..
‘‘मला माहीत आहे तुम्ही हे घर का सोडताय ते. आत्तापर्यंतच्या भाडेकरुंमधे तुम्हीच सगळ्यात जास्त दिवस राहिलात. फार कमी भाडेकरुंनी येथे दुसरा दिवस काढला असेल. काही भाडेकरुंनी तर पहिल्याच दिवशी हा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी तुम्हाला फार त्रास तर दिला नाही ना ?’’
‘‘त्यांनी ? त्यांनी म्हणजे कोणी ? मी तिचा प्रश्र्न हसण्यावारी नेण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
‘त्यांनी म्हणजे ज्यांनी ते घर झपाटले आहे त्यांनी ! फार पूर्वीपासून मी ओळखते त्यांना. मी त्या काळात येथे नोकरी करत नव्हते म्हणा. माझे मरण त्यांच्याच हातात आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आता माझ्या मेलीच्या निम्म्याच्यावर गोवऱ्या स्मशानात गेल्या. लवकरच मी त्यांच्यात जाईन व त्या घरात राहीन.’
ती बाई भारल्यासारखी, अत्यंत थंड स्वरात हे सगळे सांगत होती. माझी तर तिच्याशी पुढे काही बोलण्याची इच्छाच मेली. मी पंधरा दिवसाचे भाडे तिला दिले आणि जिवावरचे त्या भाड्यावर निभावले असे म्हणून तिचा निरोप घेतला.’’
‘‘तू माझी उत्सुकता वाढवलीस ! आता मला त्या घरात एक तरी रात्र काढल्याशिवाय झोप लागणार नाही. डॉ, त्या घराचा पत्ता देतोस का ?’’ डॉ.नी त्या घराचा पत्ता दिला. डॉ. गेल्यावर मी सरळ त्या घराचा रस्ता पकडला. तळजाईच्या टेकडीवर जंगलाच्या मागे जी वस्ती झाली आहे तेथे एका निवांत गल्लीत ते १३ क्रमांक असलेले घर होते. मी तेथे पोहोचलो तेव्हा ते घर बंद होते. घरावर ‘‘भाड्याने देणे आहे ’’ ही पाटी नव्हती. मी दरवाजा ठोठावला पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही.
मी परत फिरणार तेवढ्यात दुधवाला भेटला.
‘‘साहेब कोण पाहिजे ?’’
’‘या घराचा मालक. त्यांना ते भाड्याने द्यायचे आहे असे मला समजले आहे.’’
‘‘भाड्याने ? जी बाई या घराची देखभाल करायची ती तीन आठवड्यापूर्वीच गेली. आता येथे कोणीच रहात नाही. जहागिरदारांनी येथे साफसफाईला माणूस ठेवण्याचे खूप प्रयत्न केले पण कोणी कामच करायला तयार नाही. अगदी फक्त दारेखिडक्या उघडायच्या आणि बंद करायच्या या कामासाठी १००० रुपये द्यायची तयारी दाखविली तरीही कोणी आले नाही. ’’
‘‘का बरे ?’’
‘‘ साहेब हे घर पछाडलेले आहे ! ती बाई तिच्या गादीवर मेलेली आढळली. तिचे डोळे सताड उघडे होते. लोक म्हणतात भुताने तिचा गळा आवळून तिला ठार मारले.’’
‘‘हंऽऽऽ तू ते जहागिरदार म्हणालास, ते या घराचे मालक आहेत का ?’’
‘‘हो !’’
‘‘कुठे राहतात ते ?’’
‘‘याच रस्त्यावरुन पुढे गेले की एक मटनाचे दुकान लागेल त्याच्या शेजारीच त्यांचा बंगला आहे.’’
‘‘काय करतात ते ? म्हणजे त्यांचा व्यवसाय ?’’
‘‘काही कल्पना नाही पण बहुधा निवृत्त असावेत ते. एकटेच असतात.’’
त्याने दिलेल्या आगाऊ माहितीबद्दल मी त्याचे आभार मानले व सरळ त्या मटनाच्या दुकानापाशी पोहोचलो. दहा एक मिनिटे लागली असतील मला तेथे पोहोचायला. नशिबाने जहागिरदारांचे घर उघडे होते व तेही घरी होते. जहागिरदारांचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. मागे उलटे वळविलेले पांढरे-काळे केस च्त्यांच्या अनुभवाची व विद्वत्तेची ग्वाही देत होते. त्यांनी माझे स्वागत केले.
मी सरळ मुद्द्यालाच हात घातला व त्यांना माझ्या भेटीचे प्रयोजन सांगितले. मी त्यांना सांगितले की जे घर झपाटलेले म्हणून कुप्रसिद्ध आहे ते मला तपासायचे आहे. जर त्यांनी मला ते काही काळ भाड्याने दिले तर फार बरे होईल किंवा एकाच रात्रीपुरते त्यात मला राहू दिले तर फारच बरे होईल. त्या एका रात्रीचे भाडे म्हणून मी आठवड्याचे भाडे देण्यास तयार आही. हे ऐकल्यावर जहागिरदार म्हणाले,
‘‘ काय साहेब चेष्टा करताय गरीबाची. तुम्हाला पाहिजे तितके दिवस रहा तुम्ही त्या घरात. भाड्याचा तर प्रश्र्नच नाही. उलट तुम्ही जर जे काय होते आहे त्याचा छडा लावलात तर माझ्यावरच आपले उपकार होतील. सध्या मी ते भाड्याने देऊ शकत नाही कारण त्याची साफसफाई करण्यासाठीही मला माणूस मिळत नाही. ते घर कशानेतरी झपाटलेले आहे. मला वाटते मी बरोबर शब्द वापरलाय येथे. रात्रीच नव्हे तर दिवसाही ते घर झपाटलेले असते. पण रात्रीचे अनुभव दिवसाच्या अनुभवापेक्षा जास्त विचित्र व नभयानक असतात हे खरे आहे.. ती बाई जी घराची देखभाल करायची तिला मी एका वृद्धाश्रमातून आणली होती. आमच्या कुठल्यातरी नातेवाईकाची ती नातेवाईक होती. एके काळी तिची आर्थिक परिस्थिती खुपच चांगली होती आणि तिने ते घर माझ्या काकांकडून भाड्याने घेतले होते. ती चांगली सुशिक्षित व खंबीर मनाची होती. त्या घरात तीच राहू जाणे. जेव्हा तिच्या अचानक मृत्युचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यानंतर त्या घराकडे कोणी ढुंकुनही पहात नाही. भाडे तर दुरच राहिले. जो त्या घराचा कर भरेल त्याला ते घर वर्षभर फुकट रहायला देण्यास मी तयार आहे...’’
‘‘केव्हापासून हे घर झपाटलेले म्हणून प्रसिद्ध आहे ?’’
‘‘ते मला सांगत येणार नाही पण ती देखभाल करणारी म्हातारी मला म्हणाली होती की जेव्हा तिने ते घर भाड्याने घेतले होते तेव्हापासूनच ते झपाटलेले होते. म्हणजे बघा झाली असतील ३०-३५ वर्षे. मीही आफ्रिकेत होतो बरीच वर्षे. इथे परत येऊन मला दोन तीन वर्षेच झाली. ते घर माझ्या काकांचे. मुलबाळ नसल्यामुळे त्यांचा एकमेव वारस मीच होतो. त्यांच्या इतर इस्टेटीबरोबर तेही घर माझ्या मालकीचे झाले. मी जेव्हा येथे आलो तेव्हा ते बंदच होते व ते झपाटलेले आहे असेच मला सांगण्यात आले होते. ते ऐकल्यावर मी फक्त हसलो. असल्या गोष्टींवर माझा कधीच विश्र्वास नव्हता. मी काही पैसे खर्च करुन त्या घराची डागडुजी केली आणि काही फर्निचरही आणले. ते भाड्याने देण्यासाठी मी वर्तमानपत्रात जहिरातही दिली. बहुतेक सकाळमधेच. ती वाचून एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने ते घर भाडयाने घेतले. त्यांच्या कुटुंबात बायको, एक मुलगा व एक मुलगी आणि दोन नोकर व एक ड्रायव्हर होते. दुसऱ्याच दिवशी त्या सगळ्यांनी ते घर सोडले. प्रत्येकाने वेगवेगळी गोष्ट सांगितली. पण त्यात एकच गोष्ट समान होती ती म्हणजे ते सगळे भयंकर घाबरलेले होते. करार मोडल्याबद्दल मी त्या आधिकाऱ्याला दोष नाही देऊ शकलो !
मग मी त्या बाईला तेथे ठेवले व तिला पोटभाडेकरु ठेवण्याची परवानगीही दिली. माझ्या पाहण्यात अजून एकाही भाडेकरुने त्या घरात तीन दिवसापेक्षा जास्त मुक्काम केलेला नाही. जास्तीत जास्त तीन दिवस बास्स... प्रत्येक भाडेकरुची गोष्ट वेगळी होती.. मी तुम्हाला हे सांगतोय कारण तुम्ही त्या घरात जाणार आहे असे म्हणताय तेव्हा जी काय काळजी घ्यायची आहे ती घ्यावी...मला काही तुम्हाला घबरावयाचे नाही...बाकी काही नाही.
‘‘ या एवढ्या वर्षात तुम्हाला कधी त्या घरात रहावेसे वाटले नाही का, जहागिरदार साहेब ?’’
‘‘ रात्री नाही पण मी एकदा दिवसा ढवळ्या त्या घरात तीन तास कसेबसे काढले आहेत. मला जे काही अनुभव आले त्याने माझी उत्सुकता पूर्णपणे शमली. नव्हे तो अनुभव मला परत कधीच घ्यायचा नाही. मी तुमच्यापासून काही लपवून ठेवले आहे असे तुम्ही म्हणाल म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही कितीही शूर असलात किंवा तुमचा या असल्या बाबींवर विश्र्वास नसेल्, कृपा करुन त्या घरात रात्र काढायचा विचारही मनात आणू नका.’’
‘‘ नाही नाही आपण काळजी करु नका. मला या बाबींमधे रस आहे. माहीत नसलेल्या वातावरणात भीती वाटत नाही अशी बढाई एखादा बोलघेवडाच मारु शकतो पण मी अशा अनेक प्रसंगातून पार पडलो असल्यामुळे मी बढाई मारणार नाही, पण मला कणभरही भीती वाटत नाही...’’
हे ऐकल्यावर जहागिरदारांनी पुढे काहीही न बोलता कपाटातून त्या घराची किल्ली काढली व माझ्या स्वाधीन केली. त्यांचे आभार मानून मी ती खिशात घातली व बाहेर पडलो.
या नवीन आव्हानाने उत्तेजित होत मी घरी पोहोचल्या पोहोचल्या माझ्या नोकराला फोन लावला व त्याला बोलावून घेतले. हा नोकर कमी पण मित्र जास्त होता. आनंदी, अत्यंत निर्भय, कुठल्याही प्रसंगात न डगमगणारा हा माझा नोकर मुख्य म्हणजे कुठल्याही अंधश्रद्धेपासून शेकडो योजने दूर होता.
‘‘प्रणव... मी म्हणालो, ‘‘ मागच्या वेळी वसईच्या किल्ल्यात आपण शीर नसलेल्या पिशाच्चाला भेटायला गेलो होतो. आपल्याला भूत/पिशाच्च वैगेरे काही दिसले नव्हते आठवतय ना ? आता पुण्यातच आपल्याला ते पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मी तेथे आज रात्रीच झोपण्याचे ठरवले आहे. मला असे वाटतंय की काहीतरी दिसेल किंवा ऐकू येईल. तुला बरोबर घेऊन जावे असा विचार आहे. एकास दोघे असलेले बरे ! येणार का ?’’
‘‘ जरुर ! प्रणव हसत म्हणाला, ‘‘ नाहीतरी नुसते बसून कंटाळाच आला आहे.’’
‘‘ ठीक आहे मग. ही त्या घराची किल्ली आणि हा पत्ता. आत्ताच तेथे जा आणि माझ्यासाठी तुला योग्य वाटेल ती बेडरुम तयार कर. बरेच दिवसात ते घर उघडले नसल्यामुळे तुला बरीच साफसफाई करावी लागेल. सगळी अंथरुणे नीट झटक व मेणबत्यांचा भरपूर साठा बरोबर घे. माझे रिव्हॉल्वर व चाकू बरोबर घेऊन जा. ही लायसेन्सची कॉपी. कोणी अडवलेच तर. लोडेड आहे. नीट हाताळ. तुझी हत्यारेही बरोबर घे. जर ती भुते आपल्याला घाबरली नाहीत काय उपयोग....’’मी हसत म्हणालो.
नेमके त्या दिवशी बरीच कामे रांगेत होती. रात्रीच्या कार्यक्रमाबद्दल विचार करण्यास फुरसतच मिळाली नाही. रात्रीचे जेवण उशीराच झाले. जेवताना मला वाचण्याची सवय होती. ही सवय चांगली का वाईट हे मला माहीत नाही पण एकट्या माणसासाठी ही सवय चांगली आहे हे निश्चित. त्या दिवशी मी ‘‘परमेश्वराचे उगमस्थान’’ नावाचे एक पुस्तक वाचत होतो. सगळ्या अंधश्रद्धांच्या मुळाशी हा एकच भ्रम कसा आहे यावर लेखकाने चांगलाच प्रकाश टाकला आहे. असो.
बरोबर साडेनऊ वाजता मी ते पुस्तक माझ्या झोळीत टाकले व रमतगमत तळजाईचा चढ चढण्यास सुरुवात केली. सहकारनगरमधून तळजाईवर जाण्यास असा कितीसा वेळ लागणार ? माझ्याबरोबर माझा बुलडॉग कुत्राही होता. वाघ्याने माझ्या अनेक पिशाच्चभंग करण्याच्या मोहिमेत भाग घेतला होता. मला वाटते भुतेखेते त्याला घाबरत असावीत.
उन्हाळ्यातील रात्र होती पण मोकळ्या पटांगणात चांगली हवा सुटली होती. तळजाईच्या जंगलात उमललेल्या रातराणीचा सुवास वाऱ्याबरोबर येथेपर्यंत येत होता. आकाश ढगांनी थोडेसे काळपट झाले होते व त्यातून चंद्र केविलवाणा दिसत होता. उजव्या बाजूला त्या अंधारात ठुब्यांचा पडका भुताचा भेसूर बंगला मला अंधुकसा दिसला.
‘‘हंऽऽऽ आज काही अमावस्या नाही ! चमकेल तो काही वेळाने !’’ मी मनाशी म्हटले. ठुब्यांचा बंगला पार करुन मी पठारावर पोहोचलो.
मी १३/८ च्या दोन पायर्या चढल्या व दारावर टकटक केले.....
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
एडवर्ड लायटॉनच्या ‘‘हाऊस अँड द ब्रेन’’ या कथेवर आधारित.
Book traversal links for घर क्रमांक – १३/८ भाग -१
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ये बात! पुभाप्र!
शेवटच्या ओळीत ठुब्यांचा कसा
ओह ओके. आत्ता समजलं. माय
Taljai tekadivarcha the
अतिशय उत्कंठावर्धक आणि जबरा रहस्यमय
चांगली रहस्यकथा वाचायला
एकच नंबर
असा खजिना असतो...
मस्त.
वा मस्त सुरुवात. पु.भा.प्र.
उत्कंठावर्धक सुरवात.
सुंदर..!
वातावरण निर्मीती
छान सुरुवात. पुभाप्र.
oh another horror type of
फ़्याण्टास्टिक.
कडक!!!! वाचतोय!
मस्तच..
तळजाई आणि सहकारनगर भागातले
मस्त झालाय हा भाग
मस्त....पुभाप्र
अफलातून!
उत्कंठावर्धक सुरुवात.
मस्त
मस्त....पुभाप्र
जबरदस्त
रहस्यकथा की भयकथा? प्रचंड
रात्रीस खेळ चाले... ;)
उत्कंठा वाढली आहे.
अरे वाह छान... लवकर टाका
जबरदस्त सुरुवात!
छान सुरवात
भारी
उत्कंठावर्धक! पु.भा.प्र.
सहीच ! लवकर येऊ द्या पुढचा
पुभाप्र.. लवकर टाका
कवा येणार णविण भाग
सर्वांना धन्यवाद !
मस्त सुरुवात
मेजवानी
पुढच्या भागाचे काय झाले?