Confession Box : भाग २ ...शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 1:01 am

भाग १

आज बाबा हट्टालाच पेटले होते. मला माहीत आहे तुला कशात करीअर करायचे आहे ते, परंतू स्पर्धा परिक्षेच्या निमित्ताने आपल्या प्रदेशाचा, समाजाचा व त्यांचा विकास करणार्‍या यंत्रनांचा तुझा अभ्यास होइल. आणि इथे शहरापेक्षा तुझ्या मामाच्या गावी तुला ह्या गोष्टी जवळून अभ्यासता येतील. बाबा मागे हटायला तयार नव्हते. मला स्पर्धा परिक्षांबद्दल ओ का ठो माहीती नव्हती आणि तीच्या वाटेला जायचेही नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून बाबांना म्हटले, दोन महिन्यांच्या सुटीनंतर माझे कॉलेज सुरू होइल तिकडे लावलेल्या क्लासची फी वाया जाईल. खरं तर मी हे बोलून चूक केली होती. म्हणजे माझा त्या क्लासला ना नव्हती अस अर्थ बाबांनी काढला.पैशाची फिकिर नको करू, ते बघता येईल, बाबानी माझा शेवटचा प्रयतन्ही हाणून पाडला.

मामा, तू मला फक्त क्लासचा पत्ता दे मी येतो अ‍ॅडमिशनची चौकशी करुन, बाबा आणि तू घरीच थांबा. दोघानीही ऐकले नाही. ते दोघेही माझ्यासोबत आले.काउंटरवरील मुलीकडे बाबांनी प्रवेशाची चौकशी केली, फीबद्दलही विचारले. तीने एक फॉर्म दिला व अधिक माहीतीसाठी समोरील केबिनमधील सरांना भेटायला सांगितले. आम्ही तिघेही सरांच्या केबिनमध्ये गेलो. बाबांनी माझी व मामाची ओळख करुन दिली व प्रवेशाबद्दल विचारले. सरांनी मला काय करतो विचारले. मी एस.वाय.बीकॉम.ची परिक्षा दिली म्हटल्यावर सरांनी हलकीशी नकारार्थी मान हलवत म्हणाले, जरा उशीर केला तु येथे यायला, ह्या परि़क्षेसाठी इथे विद्यार्थी अकरावीपासून तयारीला लागतत. हे ऐकून मला हायसे वाटले. माझ्या ए़कट्याशी बोलण्यासाठी सरांनी बाबांना व मामाला थोडावेळ बाहेर बसण्याची विनंती केली, व मोर्चा माझ्याकडे वळवला.

सरांनी कुठे रहातोस पासून इथे कसा आलास इथपर्यंत प्रश्न विचारले. मला स्पर्धा परिक्षेत रस नव्हताच म्हणून मीही प्रामाणीकपणे माझ्याबाबतीत घडलेला किस्सा (पोलिसकाकांचा) व पुढील इतिहास सांगितला. सरांनाही माझा किस्सा ऐकून हसू आले. तुमच्या घरी कोणते वर्तमानपत्र येते व तू त्यातील कोणते पान प्रथम वाचतोस? सरांनी विचारले. दोन इंग्रजी व एक मराठी पेपर येतो, मी फक्त पेज थ्रीच वाचतो. कधीतरी स्पोर्ट्सचे पानही चाळतो, मी खरं ते सांगितले. असाच प्रश्न टिव्ही बद्दल विचारला असता मी 'रोडीज' माझा आवडता शो आहे हे सांगितले. सरांना ह्या शोबद्दल काही माहीत नसल्यामुळे मलाच सर्व सांगायला लागले. ह्या शोमधील परीक्षक खुबीने स्पर्धकाचे खरे व्यक्तीमत्व बाहेर काढताना कशी शिवराळ भाषा वापरतात, आणि ती भाषा मला आवडते. असे मी सांगितल्यावर सरांनी आश्चर्याने माझ्याकडे बघितले व विचारले तुला येते अशी शिवराळ भाषा? पुढे जे काही घडले ते इथे देत नाही,परंतू सर माझ्यावर जाम खुश झाले होते.सरांनी बाबांना आत बोलावून घेतले. सध्या तुमच्या मुलाला आठवडाभर येथे बसू द्या. मग ठरवू त्याच्या प्रवेशाबद्दल. फीचेही तेव्हाच बघू. आजपासूनच सुरवात करुया.

सर मला एका वर्गात घेऊन गेले, त्या वर्गावरील शिक्षकाची ओळख करून दिली व संध्याकाळी जाण्याअगोदर मला भेटून जा असे सांगून निघून गेले. वर्गात २० एक मुलं होती, सगळ्या मुलांचे राहणीमान अगदी साधे होते. वर्गात 'ग्रामीण वित्तपुरवठा' हा विषय शिकवणे चालू होते.मुलं शांतपणे लेक्चर ऐकत होती. मधेच कोणीतरी शंका विचारत होते,मुलांची भाषा ग्रामीण वाटत होती.. सदर विषय माझ्या डोक्यावरून जात होता. अचानक शिक्षकांनी मला प्रश्न विचारला, भूविकास बँकचे कार्ये काय आहेत? अशी कोणती बँक अस्तीत्वात असते हे मला माहीतच नव्हते त्यामुळे तीचे कार्य सांगणे दूरच. मी स्पष्टपणे माहीत नसल्याचे सांगितले. शिक्षकांनी वर्गातील एका मुलाला तोच प्रश्न विचारला. त्या मुलाने पोपटासारखे उत्तर दिले, सर माझ्याकडे बघून छद्मिपणे हसले. पुढे तासभर व्यापारी बँका, शेतकी बँका, सहकारी बँका अशा अनेक प्रकारच्या बँकांची नावे कानावर आदळू लागली. १ वाजता लेक्चर संपले व जेवणाची सुटी झाली. वर्गातल्या मुलांनी डबे आणले होते, मी आणला नसल्याने बाहेर जाऊन खाऊन आलो.

२ वाजता वर्गात दूसरे शिक्षक आले. त्यांनी 'रक्तगट' हा विषय शिकवायला सुरूवात केली. रक्तातील अँटिजन,अँटिबॉडी रक्ताचे ए,बी,एबी आणि ओ गट. पॉझिटीव, निगेटीव, बॉम्बे गट. युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल रिसिव्हर सगळे डिटेलमध्ये शिकवणे चालू होते. एखाद्या मेडिकलच्या वर्गात बसल्यासारखे वाटू लागले. इतके डिटेल्स शिकण्याची गरज काय अशी मला शंका आली व न राहवून मी ती विचारली देखील. हो, गरज आहे. पोलिस अधिकार्‍यापासून ते कले़क्टरपर्यंत प्रत्येकाचा आरोग्य खात्याची संबंध येतो त्यावेळी त्यांना हे ज्ञान उपयोगी येते शिक्षकांनी जरा नाराजीने माझ्या शंकेचे निरसन केले. परंतू पुढील दोन तास मला हे शिक्षक ह्या विषयावरील कठीण प्रश्न विचारत राहीले. दिवसभरात मी दोन शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो होतो.

क्रमशः

शिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

खेडूत's picture

1 May 2016 - 9:20 am | खेडूत

वाचतोय..
अजून थोडे मोठे भाग चालतील.

रातराणी's picture

1 May 2016 - 10:13 am | रातराणी

+ १
रोचक मालिका.

एस's picture

1 May 2016 - 11:43 am | एस

+२

पैसा's picture

1 May 2016 - 8:38 pm | पैसा

इंटरेस्टिंग!

अनुप ढेरे's picture

2 May 2016 - 11:04 am | अनुप ढेरे

रोचक लिहिताय. आवडतय!

शिव कन्या's picture

28 May 2018 - 10:11 pm | शिव कन्या

पुढचे येऊ द्या....
स्पर्धा परीक्षा , एक खत्री खेळ . जाता जाता टायटल सुचले... ;)))

मार्मिक गोडसे's picture

29 May 2018 - 11:08 am | मार्मिक गोडसे

अंतीम भाग
http://www.misalpav.com/node/35994