Confession Box : शकीरा..बहूरुपी आणि..... भाग १

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
15 Apr 2016 - 2:35 pm

कांदेपोहे खाताखाता टिव्हीवर म्युझिक चॅनलवरील गाणी बघत असताना दारावरची बेल वाजली. टिव्हीचा आवाज म्युट केला व दरवाजा उघडला.
साहेब आहेत का? खाकी वर्दीतल्या व्यक्तीने विचारले.
हो. - मी
कोण आहे ? - बाबांनी विचारले.
पोलिसकाका आहेत. - मी
हातातील वर्तमानपत्र बाजुला ठेवून बाबा पटकन उठून दाराजवळ आले.
आपल्या सोसायटीतील मैदानात कार्यक्रम करायचा आहे, सोसायटीच्या सेक्रेटरीने आपली सही घेऊन यायला सांगितले आहे.
- पोलिसकाका
बाबांनी वाचून वहीत सही केली. ११ वाजता कार्यक्रम बघायला या असे आमंत्रण देऊन पोलिसकाका निघून गेले.
बाबांनी दरवाजा बंद केला व आईला हाक मारून बोलावले. आपल्या चिरंजीवाला पोलिस व बहुरूपीतील फरक कळत नाही, खाकी कपडे घातलेल्या प्रत्येक माणसाला हा पोलिसच समजतो. आईला काहीच समजले नाही. बाबांनी मी केलेला पराक्रम सांगितल्यावर आईला काय बोलावे हे सुचेना, ती गप्प उभी राहीली.

अगं आई, काहीतरी बोल ना. मागे नाही का एकदा एका गाण्यात प्रिती झिंटाला बघून बाबा म्हणाले होते, अरे! मुमताज अजूनही सिनेमात काम करतेय? तेव्हा बाबांची चूक तू कशी खिलाडूपणे माफ केली होती, आता का गप्प बसलीस.(हे सगळे स्वगत)

काही न बोलता आई किचनमध्ये निघून गेली. मी निर्लज्जपणे टिव्ही बघायला लागलो. फार दिवसांनी शकीराचे गाणे लागले होते, त्याचा आनंद घेऊ लागलो. दारावरची बेल पुन्हा वाजली. संकटे आली की, ती एकटी-दुकटी येत नाही, त्याचाच प्रत्यय लगेचच आला. ह्यावेळेस बाबांनी दरवाजा उघडला. दारात बाबांचा मित्र उभा. बाबांनी मित्राला घरात घेतले व मला टिव्ही बंद करायला सांगितले. मी टिव्हीचा फक्त आवाज म्युट केला. बाबांच्या मित्राचे पोहे खाताखाता पेपर चाळणे चालू होते. अधूनमधून टिव्हीवरील गाणेही बघत होते. हे वाचले का ? मित्राने पेपरमधील एका बातमीकडे बाबांचे लक्ष वेधत विचारले. बघ ना, कोणत्याही सोयीसुविधा नसताना ही ग्रामीण भागातील मुलं इतके मोठे यश मिळवतात. एक नाही तर तीन मुलांनी MPSC परिक्षेत यश मिळवले आहे. आपली शहरातील मुलं सामान्यज्ञानात मागेच पडतात. बाबांनी माझ्याकडे बघत होकारार्थी मान डोलावली.बाबांच्या मित्राने नकळत आगीत तेल ओतले होते.

पुढील अर्धा एक तास ग्रामीण व शहरातील विद्यार्थी ह्यावर दोघांची चर्चा चालू होती. ग्रामीण भागातील मुलांच्या जिद्दिचा विषय निघाला आणि अचानक बाबांच्या मित्राला काहीतरी आठवले, त्यांनी बाबांना कॉम्प्यूटर चालू करायला सांगितला. बाबांनी कॉम्प्यूटर व नेट चालू केले. मित्राने युट्युबवर एक विडिओ बाबांना दाखवला, सुरवातीला मी फक्त ऐकत होतो, परंतू विडिओतील व्यक्तीची ग्रामीण भाषा व प्रामाणीकपणामुळे मी पुरता भारावून गेलो व मीही तो विडिओ बघू लागलो.

खालील विडिओतून चूकीचा संदेश दिला जात असेल तर धागालेखक त्याचे समर्थन करत नाही.

शिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Apr 2016 - 4:11 pm | धर्मराजमुटके

एक नंबर ! आवडले.

आनन्दा's picture

15 Apr 2016 - 5:49 pm | आनन्दा

मस्त

रातराणी's picture

15 Apr 2016 - 10:19 pm | रातराणी

आवडले!

पैसा's picture

16 Apr 2016 - 2:18 pm | पैसा

लेख खूप छान पद्धतीने लिहिलाय. पण सगळ्यांना एक तासाचा व्हिडिओ नेटवर बघणे कठीण आहे! त्याचा आशयही थोडक्यात लिहा प्लीज.

तर्राट जोकर's picture

17 Apr 2016 - 4:37 pm | तर्राट जोकर

हेच म्हणतो, भाषन ऐकले नाही. नेटपॅक संपेल.

भीमराव's picture

16 Apr 2016 - 9:01 pm | भीमराव

१ लंबर
जवा लय कट्टाळा याचा आभ्यासाचा तवा तवा आमी हॉस्टेल मधले मित्र भरत भौ यांचे ते स्पीच ऐकायचो, प्रयत्नांची पराकाष्ठा केली राव,
एकदा मात्र एका दोस्तानं त्यांचं भाषण ऐकुन हा काष्ट वाला हाय म्हनुन कमी मार्क आसुन पन फुड गेला आशी प्रतीक्र्या दिलेली, तवा मात्र वाईट वाटले.
ही काडी नाही एक आलेला अनुभव सहज सांगीतला, नाहीतर उगाच त्याजावरुन चावाचावी सुरु होईल.

उगा काहितरीच's picture

17 Apr 2016 - 2:56 pm | उगा काहितरीच

ऐकलेलं आहे हे. खरंच अगदी प्रामाणिकपणे बोलतात भरत सर . रच्याकने विश्वास नांगरे पाटील यांचही भाषण ऐका तेही असंच प्रेरणादायी आहे.

मार्मिक गोडसे's picture

18 Apr 2016 - 7:19 pm | मार्मिक गोडसे

धन्यवाद पैसाताई. बघतो प्रयत्न करून.

भरत आंधळे यांनी आपला ITI ते IPS अधिकारी पर्यंतचा प्रवास मिष्कील भाषेत व प्रामाणीकपणे मांडला आहे. प्रतिकूल परिस्थीतीतून केवळ जिद्दिच्या जोरावर हे यश त्यांनी संपादन केले आहे. स्पर्धा परिक्षेत बर्‍याच वेळा अपयश आले,परंतू ते खचले नाही.मिळालेल्या संधीचा फायदा घेवून अंतिम प्रयत्नात त्यांनी यश प्राप्त केले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास "अपयश ही यशाची पहीली पायरी असते हे माहीत होते, परंतू मला अंतीम यश प्राप्त करायला अपयशाचा जिनाच चढावा लागला". हे यश मिळाल्यावर ते तेथेच थांबले नाहीत्, तर ग्रामीण भागातील कमीतकमी २ लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प केला आणि आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवार ते न चुकता राज्यात कुठेना कुठे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. तीव्र ईच्छाशक्ती व प्रचंड मेहनत केल्यास अपयशावर मात करता येते व परिक्षेत अपयश आल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे सांगताना ते तरुणांना स्वतःचे उदाहरण देतात.
जमिनीवर पाय असलेल्या ह्या माणसाला सलाम.