ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 10:54 pm

===================================================================

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी...                                ०२ : महाभरार्‍यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली...
                ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात...
            ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...

===================================================================

प्लोव्हर हा पक्ष्यांच्या subfamily Charadriinae मधील एक मध्यम आकाराचा पक्षी आहे. याच्या सुमारे ६६ जाती ओळखल्या गेल्या आहेत आणि त्याच्या subfamily, Vanellinae मधे अजून २० जाती आहेत. धृवप्रदेश आणि सहारा वाळवंट सोडता जगभरच्या समुद्रकिनार्‍यांवरच्या विस्तृत परिसरांवर हा पक्षी आढळतो.

मध्यम लांबीचे पाय, तोकडी मान, काळा-तपकिरी रंग, पांढरे पोट आणि छातीवर जाडसर काळा किंवा तपकिरी पट्टा असलेला हा पक्षी तसा फारसा आकर्षक नाही. तरीसुद्धा या पक्षांपैकी एकाच्या केलेल्या अभ्यासात त्याने केलेला जवळ जवळ सलग ३०,००० किमी चा फेरफटका पुढे आला आणि ती सफर पक्षीनिरिक्षणशास्त्रात एक मैलाचा दगड ठरली. या प्रवासी पक्षाचे नाव आहे "विलसन्स प्लोव्हर क्रमांक ९७" किंवा थोडक्यात "क्रमांक ९७".

क्रमांक ९७ आणि त्याचा जगप्रसिद्ध प्रवास

१९ जून २०१४ रोजी वॉली उर्फ विल्सन जॉनसन नावाच्या जीवशास्त्रज्ञाने (बायालॉजीस्ट) अलास्कामधिल नोम या ठिकाणी एक पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर जातीचा नर पकडला. वॉलीने जीवशास्त्रिय निरिक्षण (वजन, लांबी, इ) केल्यावर त्याच्यावर एक छोटा सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवला आणि त्याला मुक्त केले. त्या ट्रान्समीटरचा क्रमांक ९७ होता, त्यावरून वॉलीने पक्षाचे "नंबर ९७" असे नामकरण केले. अश्या तर्‍हेने "नंबर ९७" चा नकळत एका ऐतिहासिक प्रकल्पात समावेश झाला.

.


क्रमांक ९७ बरोबर वॉली जॉनसन

.


क्रमांक ९७ : त्याच्या उजव्या पायावर पांढर्‍या निशाणीसह जिओलोकेटर (geolocator) हे उपग्रहांच्या सहाय्याने जागा नक्की करणारे उपकरण चिकटवले आहे, तर स्थानिक पक्षिनिरिक्षकांना डोळ्याने त्याची ओळख पटावी यासाठी डाव्या पायावर तांबडी पट्टी बांधली आहे. उपकरण व खुणा अत्यंत कमी वजनाच्या असून त्यांचा पक्षाच्या हालचालीवर अजिबात ताण पडत नाही.

.

सप्टेंबर उजाडेपर्यंत नंबर ९७ नोम येथेच राहिला. या काळात त्याने आपल्या साथीदारीणीला त्यांच्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी सोबत केली.

सप्टेंबरमधे २०१४ मधे दक्षिणेकडे भरारी घेऊन तो अलास्कामधील युकॉन-कुशेक्विम त्रिभूज प्रदेशात (Yukon-Kuskokwim Delta) उतरला. इथे त्याला उत्तर/दक्षिण अमेरिका, आशिया आणि ओशियानियाच्या समुद्रकिर्‍यांवर स्थलांतर करणारे हजारो साथिदार मिळाले.

१५ सप्टेंबर २०१४ ला क्रमांक ९७ ने हवाई बेटांच्या दिशेने भरारी घेतली आणि त्या द्विपसमुहावर येईपर्यंत जवळजवळ सरळ रेषेत उड्डाण केले. त्यानंतर त्याने, बहुतेक एका वादळाला टाळण्यासाठी, आपली भरारी जराशी पश्चिमेला वळवली. नंतर उथळ कंसाच्या (shallow arc) आकाराचा मार्ग पकडून तो २३ सप्टेंबरला २०१४ ला जपानच्या ओकिनावा बेटावर पोहोचला. ही ८,८०० किलोमीटरची महाभरारी त्याने एकही थांबा न घेता आठ दिवसात पूर्ण केली ! नंतरचे २६ दिवस क्रमांक ९७ ओकिनावामधेच तळ ठोकून होता.

तेथून निघून तो २८ ऑक्टोबर २०१४ रोजी इंडोनेशियातिल सुलावेसी नावाच्या बेटावर पोहोचला. तेथे त्याने आपली हद्द प्रस्थापित करून भातशेतीतील किटकांवर मनसोक्त ताव मारला.

हाडाचा प्रवासी असलेल्या क्रमांक ९७ ला एका जागी फार काळ राहणे मानवणारे नव्हते. ३ एप्रिल २०१५ ला त्याने हाँग काँगच्या दिशेने प्रयाण केले. तिथून पुढे शांघाईचा काही दिवस पाहुणचार घेऊन त्याने पूर्वेच्या दिशेने उड्डाण करत पीतसमुद्र आणि कोरियाच्या द्विपकल्पावरून उडत चीनचा उत्तरपूर्व भाग गाठला व तेथे १० दिवस वस्ती केली.

तेथून शेवटची भरारी घेऊन त्याने ३१ मे २०१५ ला रात्री ९ वाजता परत नोम गाठले... आणि पुढची पिढी तयार करण्यासाठी वेळेवर सज्ज झाला !

सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या नऊ महिन्यांच्या प्रवासात त्याने नक्कीच २७,००० किमीपेक्षा जास्त आणि सर्वसाधारण अंदाजाप्रमाणे जवळ जवळ ३०,००० किमी अंतराचा प्रवास पूर्ण केला होता !


प्लोव्हर नंबर ९७ चा प्रवासमार्ग

.

या पक्षांचा गेली ४० वर्षे अभ्यास करणारा जॉन्सनही या प्रकल्पातून मिळणार्‍या माहितीने थक्क झाला. त्याच्या मते, "हा प्रवासमार्ग मला पूवी माहित नव्हता. क्रमांक ९७ ने जे केले (इतका मोठा प्रवास) तेच अनेक प्लोव्हर दरवर्षी करत असण्याची शक्यता आहे. यामुळेच या प्रकल्पाचे निष्कर्श जास्त आश्चर्यकारक आहेत."

गेल्या काही वर्षांत जिओलोकेटर (geolocator) सारख्या अत्यानुधिक प्रणाल्या उपलब्ध झाल्यानेच केवळ शास्त्रज्ञांना अश्या पिटुकल्या पक्षांच्या प्रचंड भ्रमणताकदीची कल्पना येऊ लागली आहे ! याची मानवी करामतीशी तुलना करायची झाली तर... १९८६ साली Rutan Model 76 Voyager या विमानाने उड्डाणकालात एकदाही इंधन न भरता नऊ दिवसांत ४२,२०० किमी अंतर कापून जगप्रदक्षिणा पूर्ण केली होती. मात्र असे मानवी प्रकल्प पार पाडतांना त्यांच्या नियोजनांत आणि अंमलबजावणीत जगभरच्या व्यक्ती व संस्थांचे प्रचंड श्रम-वेळ-धन खर्च होतात. या पार्श्वभूमीवर, या पिटुकल्या पक्षाने कोणतेही बाह्य मदत अथवा कृत्रिम साधन न वापरता केलेले ३०,००० किमी चे उड्डाण उठून दिसते यात संशय नाही !

या पृथ्वीवरच्या प्राणीजगतात आधुनिक मानवाचे आगमन सर्वात शेवटचे. भूमीवर आपला अधिकार रेखीत करून तिच्यासाठी झगडणारा मानव हा काही पहिला प्राणी नाही. पण, आपल्या गरजेपेक्षा जास्त हाव ठेवून आपल्या हातात अपरिमित जमीन ठेवण्याची आस बाळगणे आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद व हिंसेच्या कोणत्याही थराला जाणे या बाबतींत मानवाशी स्पर्धा करेल असा कोणी प्राणी ना झाला, ना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षांचे हे असे 'सर्व जग आपल्या बापाची जागीर' असल्यासारखे मुक्त भरारणे, भटकंतीचा छंद असलेल्या माझ्या मनाचा कोणतातरी एक हळवा कोपरा स्पर्शून त्याला हुळहुळता करून जाते. या विषयावरचे वाचन, मनन करताना माझ्या मनात माझे एक आवडते गीत सतत घुमत राहते...

(युट्युबवरून साभार)

दुर्दैवाने समुद्रकिनारी पक्षांची संख्या दिवसे दिवस धोक्यात येत आहे आणि काही तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे शत्रू आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या ओळखीचेच आहेत... पक्षांच्या नेहमीच्या वाटेवरच्या जमिनीवर होणारे मानवी आक्रमण, पर्यावरणाचा र्‍हास व त्यामुळे कीटकांची कमी होणारी संख्या. यामुळे पक्षांच्या प्रवासातले थांबे व त्यांचे अन्न नष्ट होऊन प्रवासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हे प्रवासी पक्षांचे पुढे काय होईल हा यक्षप्रश्न शास्त्रज्ञांना भेडसावित आहे.

मर्यादीत नैसर्गिक शरीरसाधने वापरून छोटे छोटे प्रवासी पक्षी मोठमोठी अंतरे काटतात. यामागची शास्त्रिय कारणे शोधून काढण्यावर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे... आणि मानवाच्या मर्यादांची क्षितीजे विस्तारायला त्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल, यावरही !

त्यावर आपण पुढच्या भागांत विचार करु.

(क्रमश : )

===================================================================

संदर्भ :

१. https://en.wikipedia.org/wiki/Plover
२. https://www.allaboutbirds.org/guide/Wilsons_Plover/id
३. https://cosmosmagazine.com/life-sciences/epic-journeys-plover

===================================================================

उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी...                               ०२ : महाभरार्‍यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली...
                ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात...
            ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...

===================================================================

लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून
किंवा इतर जालस्त्रोतांवरून घेतलेले आहेत.

===================================================================

विज्ञानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

21 Apr 2016 - 11:10 pm | बोका-ए-आझम

काय करु?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2016 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदा स्क्रिन रिफ्रेश करून पहा. बहुतेक दिसतील आता.

बोका-ए-आझम's picture

22 Apr 2016 - 1:26 am | बोका-ए-आझम

पक्ष्यांचं स्थलांतर हा तसाही अचंब्याचाच विषय आहे. पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके!
लेख आवडला.पुभाप्र!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2016 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे

पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके!

अगदी, अगदी ! लेख लिहिण्यापूर्वी हेच गीत मनात घोळत होते... पण लेखन करून प्रकाशित करताना मधे मधे आलेल्या व्यत्ययामुळे ते टाकायला विसरलो ! :( आता ते टाकून घेतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2016 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखात ती भर आता टाकली आहे ! (तिच्याविना लेख काहीसा अर्धाअधुरा वाटत होता :) )

राघवेंद्र's picture

23 Apr 2016 - 2:07 am | राघवेंद्र

लेख आवडला. लेख मालिकेसाठी शुभेच्छा !!!

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2016 - 11:29 pm | श्रीरंग_जोशी

या नव्या लेखमालिकेचा विषय एकदम रोचक आहे.

या चिमुकल्या पक्षाच्या कामगिरीचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत आहे.

ही लेखमालिका पर्वणी ठरणार असा विश्वास वाटतो.

ट्रेड मार्क's picture

21 Apr 2016 - 11:38 pm | ट्रेड मार्क

काय प्रचंड क्षमता आहे एवढ्याश्या पक्ष्याची.

ही ८,८०० किलोमीटरची महाभरारी त्याने एकही थांबा न घेता आठ दिवसात पूर्ण केली.

या काळात हे काही खात पीत नाहीत का? त्याची सोय कशी करतात? या बद्दल काही माहिती उपलब्ध झाली आहे का?

आनंदयात्री's picture

22 Apr 2016 - 12:00 am | आनंदयात्री

या पक्ष्याची सफर अचंबित करणारी आहे, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलची गोष्ट आठवली.

एस's picture

22 Apr 2016 - 12:14 am | एस

पुभाप्र.

अर्धवटराव's picture

22 Apr 2016 - 1:03 am | अर्धवटराव

भ्रमण नकाशा बघुनच दमायला होतं :)
लांब अंतराचा सलग प्रवास करताना ९७ टिफीन सोबत नेला होता कि काय? जीतेंद्रीयच म्हणायचा हा भौ.

नाखु's picture

22 Apr 2016 - 8:46 am | नाखु

निव्वळ थक्क करणारे !

स्वगतः अता कुणाला (मिपावर) गेलास उडत असे म्हणायची सोय नाही राहिली !!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2016 - 9:13 am | कैलासवासी सोन्याबापु

तीस हजार किमी!! काय बोलायचे काका! ही साधी पाखरे खुप काय काय शिकवत असतात. ही पाखरे इतर स्थलांतरित पक्षी उड़तात तसे उड़तात का? 'V' फॉर्मेशन मधे? ह्यात हवेचा जास्तीत जास्त अवरोध असलेले व्ही चे निमुळते टिप असते अन त्या पोजीशन वर उडणारा पक्षी कायम बदलत असतो जेणेकरुन त्याला आराम मिळत राहावा अन रोटेशन मधे नव्या दमाचा भिडू येत राहावा, ह्या पद्धतीने पक्षी विस्मयकारक अंतर कापत असतात.

९७ ला मानाचा मुजरा आमचा! खासकरुन तो अलास्का मधील त्रिभुज प्रदेश ते सुलावेसी चा कर्व प्रवास म्हणजे साक्षात दंडवत ____/\____

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2016 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

'V' फॉर्मेशनबद्दल काही माहिती पुढच्या भागात येईलच.

प्रचेतस's picture

22 Apr 2016 - 9:18 am | प्रचेतस

जबरी.

नेत्रेश's picture

22 Apr 2016 - 11:06 am | नेत्रेश

> "यामुळेच या प्रकल्पाचे 'निर्णय' जास्त आश्चर्यकारक आहेत"

इथे निर्णय च्या ऐवजी 'निष्कर्श' असे पाहीजे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2016 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर आहे. निष्कर्श हा जास्त योग्य शब्द लिहिताना पटकन सुचला नव्हता. तो सुचवल्या बद्दल अनेक धन्यवाद ! लेखात योग्य तो बदल केला आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2016 - 11:34 am | कैलासवासी सोन्याबापु

परतीचा प्रवास (पिवळी रेषा) हा अलास्काला पोचायच्या अगोदर कमचटका पेनिनसुला रशिया इथून (त्याच्या दक्षिण टोकाकडून) होतो!! काय मजबूत पाखरू आहे राव! कमचटका मधे उणे टेम्प्रेचर मुळे पत्रे सुद्धा तड़कतात लोखंडी !! लैच जबर्या

बबन ताम्बे's picture

22 Apr 2016 - 11:55 am | बबन ताम्बे

या विश्वात मनुक्षच क्षुद्र प्राणी आहे न काय :-)

शरभ's picture

22 Apr 2016 - 11:58 am | शरभ

वेरी विंट्रेस्टींग. पुभाप्र.

हर_हुन्नरी's picture

22 Apr 2016 - 12:43 pm | हर_हुन्नरी

निसर्ग त्याच्या पोतडीतून काही ना काही नवीन दाखवत असतोच !! वाचून थक्क झालो !!

प्रसाद गोडबोले's picture

22 Apr 2016 - 1:14 pm | प्रसाद गोडबोले

निव्वळ अप्रतिम लेख आणि प्लोव्हरही !
आम्हाला पडलेले काही प्रश्ण :
१)पक्षांना जेट लॅग होत नाही काय?
२)८,८०० किलोमीटर/ आठ दिवस = ११०० प्रत्येक दिवशी = म्हण्जे जवळपास ताशी ४५ किमि चा स्पीड झाला ! इतका स्पीड ठेवायला किती एनर्जी लागेल ?
३) पक्षी नेव्हीगेशन कसे करत असतील ? त्यांना दिसांचा अंदाज कसा लागत असेल?
४) त्याच्याअ पायाला सेटेलाईट ट्रान्स्मिटर ऐवजी तितकाच हलका सेटेलाईट फर्स्ट पर्सन व्यु वाला क्यॅमेरा लावता आला तर काय मजा येईल त्याचा प्रवास पहायला !

अमेरिकन त्रिशंकू's picture

22 Apr 2016 - 4:11 pm | अमेरिकन त्रिशंकू

४) त्याच्याअ पायाला सेटेलाईट ट्रान्स्मिटर ऐवजी तितकाच हलका सेटेलाईट फर्स्ट पर्सन व्यु वाला क्यॅमेरा लावता आला तर काय मजा येईल त्याचा प्रवास पहायला !

Ask and you shall receive. Peregrine Falcon is the fastest bird in the world who reaches speeds upto 200 mph when hunting.

http://www.pbs.org/wnet/nature/raptor-force-video-falcon-cam/1162/

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2016 - 4:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद!

याबाबतीत काही संशोधन झाले आहे आणि अजून बरेच होत आहे. तुमच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागांत येतील.

सतिश गावडे's picture

22 Apr 2016 - 4:31 pm | सतिश गावडे

वाचावे ते नवलंच.

चौकटराजा's picture

22 Apr 2016 - 4:41 pm | चौकटराजा

पूर्वी मानवाला नसलेल्या पण पक्षी व प्राण्याना असलेल्या क्षमतांविषयी एक पुस्तक वाचनात आले होते.पण हे नवलच आहे.
भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा या ओळींची आठवण आली. पण पुढच्या प्रवासात प्रगो यांची कॅमेर्‍याची सूचना
अमलात यावयास हवी. ( म्हण्जे मधे कुठे पुढची पिढी वाढवायचा प्रयत्न हे महाशय करतात की कसे याचेही ज्ञान येईल :|) ) .

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2016 - 1:11 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सद्यातरी १०० ते २०० ग्रॅम वजनाचा पक्षी त्याच्या भरारीला समस्या निर्माण न करता वाहून नेईल, पण तरीही उत्तम व्हिडिओ रेकॉर्ड मिळेल अशी उपकरणे, परवडेल अश्या किंमतीत उपलब्ध झालेली नाहीत.

अजया's picture

22 Apr 2016 - 6:31 pm | अजया

काय अचाट प्रकार आहे हा भ्रमणाचा.पुढचा जन्म असा भटक्या पक्ष्याचा यावा! कोई सरहदना इन्हे रोके!!
पुभाप्र.

चौकटराजा's picture

23 Apr 2016 - 8:54 am | चौकटराजा

नको विसा नको ,पासबुक
नको सर्वीस चार्ज ,नको टूरिस्ट ट्याक्स
नको पूर्ण-पानी जैरातीचा बोजा
पक्षाचाच जन्म यावा , बोले चौकट राजा

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2016 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१,००,०००

लाखमोलाचे बोल !

अर्धवटराव's picture

23 Apr 2016 - 9:35 pm | अर्धवटराव

मस्त काव्य जमवलं हो चौराशेठ.

मधुरा देशपांडे's picture

22 Apr 2016 - 6:41 pm | मधुरा देशपांडे

रोचक. पुभाप्र.

भंकस बाबा's picture

23 Apr 2016 - 8:53 am | भंकस बाबा

विस्मयकारक आणि मनोरंजक.

शलभ's picture

23 Apr 2016 - 3:13 pm | शलभ

मस्त..

पैसा's picture

23 Apr 2016 - 3:49 pm | पैसा

निव्वळ थरारक!

पद्मावति's picture

23 Apr 2016 - 5:37 pm | पद्मावति

फारच रोचक!!

एक अफलातून लेखमाला ठरणार ही नक्कीच.

आठ दिवस सलग उड्डाण, तेही पूर्णतः महासागरावरुन. म्हणजे उडायचं थांबवण्याचा पर्यायही नाही. अशा सागराच्या मध्यावर हवेतच खाद्य मिळणंही अवघड. तेव्हा ही सर्व ऊर्जा शरीरात साठवलेलीच असणार. सर्वच विलक्षण आहे.

बादवे, सीगल / टर्न्स यांपैकी काही पक्षी जरावेळ समुद्राच्या पाण्यावर बसून तरंगताना पाहिले आहेत. तो विश्रांतीचा प्रकार असावा काय?

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Apr 2016 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार

पक्षाचा प्रवास अत्यंत विस्मयकारक आहे. त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय.

या पक्षांचा प्रवास विशेषत: युकॉन ते ओकिनावा ही भरारी तर थक्क करणारी आहे.

हे असे मोठाले प्रवास करण्या मागची त्यांची काय बरं प्रेरणा असेल?

पैजारबुवा

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2016 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय.

हा शॉर्टकट नसून तो तसा का करावा लागतो याची शक्य असलेली भौतीक कारणे पुढच्या भागात येतील.

पियुशा's picture

24 Apr 2016 - 11:25 am | पियुशा

बाबो , थक्क करणारे उडान .

रोचक आणि थक्क करणारी माहिति .
लेख आवडलाच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2016 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचाकांसाठी व प्रतिसादकांसाठी अनेक धन्यवाद !

अरिंजय's picture

11 Sep 2016 - 7:31 am | अरिंजय

आर्क्टीक टर्न म्हणतात तो पक्षी हाच का?