किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
28 Feb 2016 - 4:31 pm

हा धागा लेख तसा केवळ अनाहितांसाठी मर्यादीत ठेवलेला नाही. या आठवड्या भरात 'कौटुंबीक टिमवर्क आणि नवर्‍यांचे जोखीम व्यवस्थापन' असा काहीसा कडबोळे विषय चर्चेस टाकण्याचा मानस आहे :). पण तत्पुर्वी किचन मॅनेजमेंट ! , म्हणजे कसे आहे ज्या घरी किचनची जबाबदारी पुरुषांची असते तेथेही बहुधा किचन रचना आणि व्यवस्थापनाचा अंतीम निर्णय घरातील स्त्रीकडेच असण्याची शक्यता अधिक (घरजावयांना किचन व्यवस्थापनात किती से मिळतो माहित नाही ;) असो). आणि बरे स्त्रियांचा से का असु नये ? बरेच मागे शरु रांगणेकरांचे व्यवस्थापन विषयक पुस्तक वाचले होते त्यात त्यांनी स्त्रियांच्या किचन मॅनेजमेंटचे बरेच कौतुक केले होते असे काहीसे आठवते (कुणाला त्या पुस्तकाचे नाव आठवते का ?).

पण माझा व्यक्तिगत अनुभव स्त्रियांना जन्मजात व्यवस्थापन कौशल्याचे ब्लँकेट सर्टीफीकेट देत नाही म्हणजे उडदामाजी काळे गोरे तसे स्त्रियांमध्ये काहींची किचन मॅनेजमेंट लाजवाब असेलही पण सर्वच स्त्रियांना जन्मजात कौशल्य असते त्यांच्यावर अन्याय करणारे होईल :). काही गोष्टीत कुणी पुढे दुसर्‍या काही गोष्टीत कोणी पुढे असे असणारच तर या धागा चर्चेच्या माध्यमातून तुम्ही किचन व्यवस्थापन कसे करता हे जाणून घ्यावयाचे आहे.

१अ ) किचन मॅनेजमेंट -स्वैपाकघरात व्यवस्थापन कौशल्याची गरज असते का ? किचन मध्ये वापरलेल्या व्यवस्थापन कौशल्याचे किचनबाहेर काही उपयोग होऊ शकतात का ?
१ब) ज्यांना किचनचे व्यवस्थापन जमत नाही असे वाटते त्यांना काय काय अडचणी येतात ?
२) किचनच्या कामांचे आणि वेळेचे तुम्ही पुर्वनियोजन करता का ? तुमचे पुर्वनियजन अ‍ॅडहॉक कधीतरी असते का की नियमीत असते ? तुमच्या पुर्वनियोजनात तुमच्या जोडीदाराचा अथवा कुटूंबातील इतर व्यक्तिंचा सहभाग असतो का ? समजा तुम्ही एकटे/ट्या पुर्वनियोजन करत असाल तर तुमच्या पुर्वनियोजनाची कल्पना तुमच्या जोडीदारास आणि कुटूंबीयांना असते का ? की तुम्ही कोणतेही पुर्वनियोजन न करता अ‍ॅडहॉक पद्धतीने कामे करता ? पुर्वनियोजनात अथवा अ‍ॅडहॉक विदाऊट पुर्वनियोजनात तुम्ही कामांच्या प्रिओरायटी कशा ठरवता ? ठरवलेल्या प्रिओरायटी प्रमाणे कामे करता का ?
३) तुम्ही किचन मधील सामान भरण्याचे व्यवस्थापन करता का असल्यास कसे करता ?
४) भरलेले सामान आणि चिजवस्तु कुटूंबातील व्यक्तिंना विचारत बसावे लागू नये म्हणून काय व्यवस्था केलेली असते ?
५) किचन मधील वेळेचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ? वेळा पाळता का ? खासकरुन शाळा आणि ऑफीसच्या वेळा कितपत परफेक्टली पाळता का निघण्याची वेळ झालेली नाही नाही झालचे एवढे खाऊन जा म्हणून उशीर करवता ? -वेळा पाळल्या जाव्यात म्हणून काय टिप्स द्याल- ब्रेकफास्ट केला जातो का वेळत होतो का ?

* ऐसिअक्षरे संस्थळावर एक संबंधीत विषयावर कौलचर्चा सकाळी शुन्य ब्रेकफास्ट + चहा दुपारीच जेवण ही संस्कृती कार्यालयीन कामाच्या लाईफस्टाईलसाठी सयूक्तीक आहे का ? अशी काहीशी वेगळी चर्चा लावली आहे त्यातपण आपण सहभागी होऊ शकता अथवा त्या बद्दल इथे आपली मते व्यक्त करु शकता.

६) पदार्थ किती शिजवायचा याचे अंदाज तुम्ही कसे बांधता ? तुमचे अंदाज कितपत बरोबर येतात / उरलेल्या पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ?
७) रेफ्रीजरेटर मधील पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ?
८) पुर्वनियोजीत पणे असल्यास कौटूंबिक टिमवर्कचे स्वरुप कसे असते ?
९) प्रत्येक गोष्ट जागच्या जागी मिळावी म्हणुन तुम्ही काय मेथडॉलॉजी वापरता ?
१०) समजा की तुम्ही नौकरी करता अथवा तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यावयाचा आहे किंवा बाहेरची कामे करावयाची आहेत तर किचन कामे चटकन /वेगाने आटपली जावीत म्हणून तुम्ही काय करता ?

सध्यातरी एवढे प्रश्न सुचले आहेत चर्चेतून अजून काही प्रश्न आल्यास हवे आहेत. चर्चा चालू करुयात.

*वेळ व्यवस्थापना बद्दल एक स्वतंत्र धागाचर्चा : २-५-१०-१५ मिनीटे एकटेच थांबण्याच्या प्रसंगातील अँक्झायटी आणि वेळ व्यवस्थापन

प्रतिसादांसाठी चर्चासहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

बरेच मागे शरु रांगणेकरांचे व्यवस्थापन विषयक पुस्तक वाचले होते त्यात त्यांनी स्त्रियांच्या किचन मॅनेजमेंटचे बरेच कौतुक केले होते असे काहीसे आठवते (कुणाला त्या पुस्तकाचे नाव आठवते का ?).

इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स

पैसा's picture

28 Feb 2016 - 11:01 pm | पैसा

बरेच प्रश्न आहेत! आमच्याकडून सगळ्यात पहिला खवचट प्रश्न म्हणजे ही सगळी माहिती कशासाठी पाहिजे आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तर वेळ काढावा लागेल. उत्तरांमधे आमची मॅनेजमेंट विरुद्ध स्वयंपाकघरात लुडबुड करणार्‍या शत्रूपक्षाचा घोळ वगैरे बरेच मुद्दे येतील. वेळ असेल तेव्हा लिहायचा प्रयत्न करीन.

आमच्याकडून सगळ्यात पहिला खवचट प्रश्न म्हणजे ही सगळी माहिती कशासाठी पाहिजे आहे?

अहो शरु रांगणेकरांचा संदर्भ दिलाय, स्त्री मुक्ती दिन जवळ येतोय मॅनेजमेंट शिकवायला नको ? अजून किती हिंटवायच, ते शरु रांगणेकर काही म्हणोत बाकी स्त्रीया ना मुळी .... ;) :)

एस's picture

28 Feb 2016 - 11:16 pm | एस

मला (पण) एक टंकनिका हवी आहे. गविंना मागितली होती. त्यांनी दिली नाही. कुठे मिळेल?

मी भलतंच वाचलं, पण एस भाऊंचा प्रतिसाद म्हणुन डोळे फाडुन पुन्हा एकदा वाचल्यावर कळलं :D

नशीब! मिपावर थोडंतरी रेप्युटेशन आहे म्हणायचं! हुश्श!

बादवे, टंकनिका हवी म्हणजे हवीच. मराठीतला हा 'च' फार घातक आहे.

सृजा मी पण तुझ्यासारखेच वाचले.

#टंकनिका- आताच्या तंत्र जगतात मूळ मुद्दा टंकणे आहे का अथवा "निका" हवीय?
इंग्रजी बोलून लिहिणारे अॅप आहे.हिंदीचेही थोडे रखडत चालते पण मराठी_बोलेल_ते_लिहिल ऐदान ( = अॅप ) नाहीये.ते आले की ते एका बाहुलीत बसवा - झाली टंकनिका.

# लेखाबद्दल
वेळच्यावेळी चविष्ट पदार्थ आतून हजर होतात याचा अर्थ आत काहीतरी म्यानिजमेंट चालत असावी एवढं खरं.

कालपासून तीन वेळा लिहायला बसले आणि किचन मॅनेजमेंटमध्ये अडकले ;)
मलाही टंकनिका हवी.मग मी तुमच्या सगळ्या धाग्यांवरच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन.मेगाबायटी चर्चांमध्ये भाग घेईन.गिगाबायटी प्रतिसाद लिहिन;)
रच्याकने-गवि अनाहितांसाठी पण द्या की एक टंकनिका;)

माहितगार's picture

29 Feb 2016 - 1:02 pm | माहितगार

कालपासून तीन वेळा लिहायला बसले आणि किचन मॅनेजमेंटमध्ये अडकले ;)
मलाही टंकनिका हवी.....

तुमची गरज टंकनिकेची आहे का किचन असिस्टन्सची ? ;)

टंकनिकाच.किचनमधुन ओरडून सांगता येईल की तिला!

किचन मॅनेजमेंट साठी स्टे ऑन कॅप्सुल घेतल्यास त्याचा उपयोग होतो असे परवाच्या लोकसत्ताच्या जाहिरातीतील बाई म्हणत होत्या. ही कॅप्सुल घेतल्यापासून नवरा मला स्वयंपाकघरात मदत करतो आणि मुलांकडेही लक्ष देतो असे त्यात लिहिले होते.
खरेखोटे देव आणि त्या बाईच जाणे.

माझ्या अनुभवानुसार काही माहिती देत आहे.

१अ ) किचन मॅनेजमेंट -स्वैपाकघरात व्यवस्थापन कौशल्याची गरज असते का ? किचन मध्ये वापरलेल्या व्यवस्थापन कौशल्याचे किचनबाहेर काही उपयोग होऊ शकतात का ?

=======>स्वैपाकघरात व्यवस्थापन कौशल्याची गरज असतेच.
आठवडाभर पुरेल इतकी लसूण सोलून ठेवणे आणि आठवडाभर कुठली कडधान्ये खायची आहेत, त्याप्रमाणे रोज रात्री न विसरता भिजत घालणे इ.

किचन मध्ये वापरलेल्या व्यवस्थापन कौशल्याचे किचनबाहेर उपयोग होऊ शकतातच.

======> जागच्या जागी वस्तू ठेवण्याची सवय मला किचनमुळेच लागली.ह्याचा पुढे कार्यालयांत काम करतांना फायदाच झाला.

===============================

१ब) ज्यांना किचनचे व्यवस्थापन जमत नाही असे वाटते त्यांना काय काय अडचणी येतात?

=====> आमचा पास.

=====================================

२) किचनच्या कामांचे आणि वेळेचे तुम्ही पुर्वनियोजन करता का?

===>हो.

तुमचे पुर्वनियजन अ‍ॅडहॉक कधीतरी असते का की नियमीत असते?

====> बर्‍यापैकी नियमित.अचानक कधी एखादा पाहुणा आला की त्या दिवसापुरते अ‍ॅडजस्ट करायचे.

तुमच्या पुर्वनियोजनात तुमच्या जोडीदाराचा अथवा कुटूंबातील इतर व्यक्तिंचा सहभाग असतो का?

====> १००%.

समजा तुम्ही एकटे/ट्या पुर्वनियोजन करत असाल तर तुमच्या पुर्वनियोजनाची कल्पना तुमच्या जोडीदारास आणि कुटूंबीयांना असते का?

===> ९५% असते.

की तुम्ही कोणतेही पुर्वनियोजन न करता अ‍ॅडहॉक पद्धतीने कामे करता?

=====> अचानक आलेल्या आपत्ती, कुणाचे देहावसान किंवा कुटुंबातील अझादा सदस्य आजारी पडल्यास किंवा अचानक आलेली मित्रमंडळी ह्यामुळे त्या दिवसापुरते प्लॅनिंग बोंबलते, पण त्याने शारिरीक अथवा मानसीक त्रास होत नाही.

पुर्वनियोजनात अथवा अ‍ॅडहॉक विदाऊट पुर्वनियोजनात तुम्ही कामांच्या प्रिओरायटी कशा ठरवता? ठरवलेल्या प्रिओरायटी प्रमाणे कामे करता का ?

======> त्या-त्या वेळेच्या आणि त्या-त्या परिस्थितीचा साधक=बाधक विचार करून. इथे अगणिक उदाहरणे असल्याने, नक्की असे कुठलेच उत्तर नाही.

३) तुम्ही किचन मधील सामान भरण्याचे व्यवस्थापन करता का असल्यास कसे करता?

======>मी चिपळूणला रहात असतांना.... महिन्याची यादी तयार असायची.डबे २-३ दिवस आधी धुतले जात.प्रत्येक डब्यावर चिकटपट्टी असायची.

हल्ली गेली काही वर्षे सासूबाईंच्या घरी रहात असल्याने, स्वैपाकघरात जास्त लक्ष घालत नाही.

==========================================
४) भरलेले सामान आणि चिजवस्तु कुटूंबातील व्यक्तिंना विचारत बसावे लागू नये म्हणून काय व्यवस्था केलेली असते?

=======> काही सामान पारदर्शक बरणीत तर काही सामान चिकटपट्टी लावलेल्या डब्यात आणि प्रत्येक वस्तूला, वर्षानूवर्षे योग्य तीच जागा.

================================
५) किचन मधील वेळेचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता?

आठवडाभर लागणारे पदार्थ....जसे मिरच्या,आले, कोथिंबीर,लसूण आणि दाण्याचा कूट तयार ठेवणे.मसाल्याचे पाळे भरून ठेवणे. साप्ताहिक सूट्टी त्यासाठीच दिलेली असते.

वेळा पाळता का ? खासकरुन शाळा आणि ऑफीसच्या वेळा कितपत परफेक्टली पाळता का निघण्याची वेळ झालेली नाही नाही झालचे एवढे खाऊन जा म्हणून उशीर करवता?

======> आमचे बाबा महाराज म्हणतात, प्रत्येक क्षण सार्थकी लावा.तहान लागणारच आहे, विहिर आधीच खणून ठेवा.
----------------------

वेळा पाळल्या जाव्यात म्हणून काय टिप्स द्याल?

======> दूरदर्शन नामक राक्षसाला घरात घेवू नका.तो फार वेळ खातो.

ब्रेकफास्ट केला जातो का वेळत होतो का?

======> घरी असतांना होतोच.परदेशी खायची प्यायची व्यवस्था कंपनी तर्फे असेल तर १००% नसेल तरी पण १००%. ब्रेकफास्टचे पदार्थ कंपनीत घेवून जायचे आणि खायचे.

६) पदार्थ किती शिजवायचा याचे अंदाज तुम्ही कसे बांधता? तुमचे अंदाज कितपत बरोबर येतात / उरलेल्या पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता?

======> स्वयंपाकघर ही जगातली सगळ्यात पहिली आणि खूप विविधता असलेली प्रयोगशाळा आहे...त्यामुळे प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या रीतीने शिजवावा लागतो आणि तो शिजला आहे किंवा नाही? हे ओळखण्याचे पण विविध मार्ग असतात. उदा.

पुरण असेल तर, पुरण घोटायचा चमचा उभा राहिला की पुरण शिजले आणि सारण तयार झाले.

वड्या करायच्या असतील तर कडेला साखर जमायला लागली की ऑल़हायचे की वड्या आता ताटाळात घ्यायला हव्या.

७) रेफ्रीजरेटर मधील पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता?

=====> एक लेख तयार होइल....पण एका वाक्यात सांगायचे तर....आपण आपले कपड्याचे अथवा पुस्तकाचे कपाट जसे लावतो, तसाच फ्रीज लावायचा.

वरतून पहिल्या रॅक मध्ये डाव्या हाताच्या कोपर्‍यात दह्याचे भांडे आहे...त्याच्या बाजूलाच आज उरलेली काकडीची कोशिंबीर आहे, हे सांगता यायला पाहिजे.
=================================

८) पुर्वनियोजीत पणे असल्यास कौटूंबिक टिमवर्कचे स्वरुप कसे असते?

======> माणूस हा मुळातच बेशिस्त प्राणी.माणसाला शिस्त आवडत नाही पण ह्या अशा वेळच्या वेळी आणि जागच्या जागी असलेल्या वस्तूंमुळे वेळ फार वाचतो.हे एकदा लक्षांत यायला लागले, की कुटुंबातील सदस्यांचे पण सहकार्य लाभते.

९) प्रत्येक गोष्ट जागच्या जागी मिळावी म्हणुन तुम्ही काय मेथडॉलॉजी वापरता?

======> शिस्त आणि सवय. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट जागच्या जागी.रॅक्स आणि फ्रीजचा व्यवस्थित वापर करणे.

१०) समजा की तुम्ही नौकरी करता अथवा तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यावयाचा आहे किंवा बाहेरची कामे करावयाची आहेत तर किचन कामे चटकन /वेगाने आटपली जावीत म्हणून तुम्ही काय करता?

=======> ह्या सर्वांसाठी एक अप्रतिम पुस्तक आहे..."चौदा मिनिटांत स्वैपाक." ते वाचलेत तर उत्तम.

==============================================

वरील माहिती ही काल्पनिक नसून सत्य आहे, माझ्या आईच्या घरात अद्यापही स्वयंपाकघर असेच लावल्या जाते आणि माझ्या चिपळूणमधल्या घरांत पण स्वयंपाकघर असेच लावत होतो.

स्वच्छ सुंदर स्वयंपाकघर आणि वेळच्या वेळी आणि प्रमाणात मिळणा-या वस्तू, आपलाच वेळ वाचवतात.

सप्तरंगी's picture

29 Feb 2016 - 10:19 pm | सप्तरंगी

बापरे किती ते प्रश्न एवढ्या प्रश्नांची उत्तर शोधत / देत बसले किचन कसे manage होईल ? पुरुष असा गहन अभ्यास करत असतात तेंव्हा बिचाऱ्या बायका सगळे किचन सांभाळून घेतात :) तुम्हाला खरेच इतके प्रश्न आहेत ?

माहितगार's picture

29 Feb 2016 - 11:03 pm | माहितगार

वर मुविंचे उत्तर आलेले आहे. यापेक्षा अधिक काय बोलू.

माहितगार's picture

29 Feb 2016 - 11:06 pm | माहितगार

टोलवणे, खेळणे, पार पाडणे आणि व्यवस्थीतपणे करणे असे चार शब्द या निमीत्ताने आठवले.

सरावाचा आणि आवडीचा भाग आहे हा. बाहेर पर्फेक्शनिस्ट असणारा माझा नवरा किचन मध्ये आला की त्याला रणांगणाचं स्वरुप येतं.. किचन मध्ये परफ्केशनिस्ट असणारी मी फॉर्म भरताना काही तरी विसरतेच आणि त्याची बोलणी खातेच. बाकी मुवि काकांना बाडीस.

स्वयंपाकघरातली (आणि खरं तर दिनचर्येतली कोणतीही) वेगवेगळी कामे एकापाठोपाठ न करता शक्य तिथे एका-बरोबर दुसरे अशी करून वेळेतल्या non-productive फटी बुजवायच्या, म्हणजे वेळ वाचतो. खाली एक उदाहरणः

सुचिकांत's picture

1 Mar 2016 - 4:46 pm | सुचिकांत

बहुगुणी तुम्ही ग्रेट आहात ..

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 5:46 pm | तर्राट जोकर

धा घरची सून वीसमिनिटांत सगळा स्वयंपाक करते असे बोलली होती. ते ऐकले तेव्हा आमच्या सौचा असा काही पारा चढला होता की काय सांगू?

माहितगार's picture

1 Mar 2016 - 6:32 pm | माहितगार

अवांतरात अवांतर: कुणी 'धा घरची' सून असण्यास' म्हणण्यास/असण्यास आक्षेप नाही, अनावश्यक व्यक्तिगत टिका हे बाजूला ठेऊ त्यातील स्त्री विषयक हीनत्व दर्शक दृष्टीकोण -मग ती कोणतीही असो - स्पृहणिय नसावा स्त्री तीच्या सर्व शारिरीक आणि संबंध विषयक निर्णयात स्थितीत पवित्रच असते.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 11:49 pm | तर्राट जोकर

ओ सर, होणारसूनमीह्याघरची शिरेलातलाडॉयळॉ़क आहे. श्री (कशाने काही माहित नाही) आपले घर सोडून (बायकोही) दुसर्‍या फ्लॅटमधे राह्त असतो. तिथे कामावर जायाच्या (म्हणजे काय ते माहित नाही) आधी जान्हवीबाई नवर्‍याच्या कोपगॄहावरुन सहज एक चक्कर टाकावी ह्या हेतूने जातात. नवरा जेवला नाही ह्याच्या अतीव काळजीतून त्या जगन्माता वीस मिनिटात सगळा स्व्यंपाक करते असे दिव्य वाक्य फेकतात. शिरेलचा लेखकू कोण आहे. बाई का पुरुष, जो कोणी असेल त्यांनी आयुष्यत कधी किचनमधे पाय ठेवला नसेल ह्या आपण शपथेवर बोलु शकतो.

माहितगार's picture

2 Mar 2016 - 1:26 pm | माहितगार

माझ्या माहिती नुसार होणारसूनमीह्याघरची शिरेलातला डॉयळॉ़क लेखन एका बैने केले आहे. (-मी खूप कमी एपिसोड पाहिल्या आहेत-चुभूदेघे)

माहितगार's picture

2 Mar 2016 - 3:15 pm | माहितगार

तजो तुमचे २० मिनीटांचे कोडे खाली मुविंनी या प्रतिसादातून सोडवले आहे. 'केल्याने होत आहे, आधी व्यवस्थापन पाहिजे !'

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:40 pm | तर्राट जोकर

मुविंकडे तिघा-चौघांनी मदत करुन स्वयंपाक केलाय. इथे जान्हवीमाता एकहाती करतायत.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 5:56 pm | पिलीयन रायडर

त्या बैचं सोडा.. ती वेडीये..

डाळ तांदुळ धुवुन कुकर लावायला ३ मिनिटं खुप झाली
भाजी.. समजा कोबी.. चिरायला ५ मिनिटं.. चिरतानाच मी कढई गॅसवर ठेवेन.. चिरता चिरता फोडणी करु शकेन.. थोड्या सवयीने फोडणी होईस्तोवर भाज्या चिरुन रेडी करायचे तंत्र जमते. म्हणजे ह्याच पाच मिनिटांच्या शेवटी भाजी फोडणीत जाईल..
आता एका बर्नरवर कुकर.. दुसरीवर भाजी होत आहे.. कणिक मळायला घ्या... ५ मिनिटात कणिक..
म्हण्जे माझ्या अंदाजाप्रमाणे, २० व्या मिनिटाच्या एंडला कुकर आणि भाजी होऊन तवा बर्नरवर जायला काही हरकत नाही. इथुन पुढे ४-५ पोळ्या लाटायला १० मिनिटं खुप झाली. दुसर्‍या बर्नरवर वरण हिंग गुळ घालुन उकळायला घ्या.

म्हणजे २० व्या मिनीटाला बेसिक एक गरम पोळी + भाजी वरण भात व्हायला हरकत नाही. जेवायला कुणी ताटावर बसलं असेल तर गरम पोळ्या वाढु शकता.

ह्यात स्वयंपाक २ माणसांचा आहे. खाणारे वाटीभर भाजी आणि १-२ पोळ्या + वाटीभर वरण भात खातील असं धरलय.

२० मिनिटात ५ पोळ्यां सकट बाकी सगळं मात्र अवघड आहे. फक्त पोळी भाजी कदाचित जमेल.. पण पोळ्या करणारी पट्टीची हवी आणि भाजी नुसती फोडणीला टाकायचं काम हवं.. म्हणचे धुणे/चिरणे, वाटण बनवणे नाही..

माहितगार's picture

1 Mar 2016 - 6:33 pm | माहितगार

वीसमिनिटांत सगळा स्वयंपाक करते

हे काय आहे ?

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 2:00 pm | भरत्_पलुसकर

आमी तिनी त्रिकाल बाहेर खातू तवा कंदी मॅनेज कराया लागलं नाय किचन. कवा कवा चार पोरं ज्यादा येत्यात तवा झोपाय वापारतू किचन.
गावाकड आय पन्नास लोकांच्या भाकरी करती आन घरातल्या चिल्य्या पिल्ल्या खात नाही म्हुन मौ लुस्लुशीत चपाती करती. सकाळी उठली कि बसती बगा चूलीम्होर. कसलं आलंय मॅनेजमेंट न काय. आपल्या माणसास्नी गरम गरम आपल्या हातचं खाऊ घालायची हौस असाय लागती. मंग बाकी समंद जमून जातं.

माझ्याकडे भाज्या कापणे नाश्ता पोळ्या करणे यासाठी मदतनीस असल्याने माझे किचन मॅनेजमेंट चिरलेली भाजी फोडणीला घालणे इतपतच मर्यादित आहे!
व्हरायटी सेक्शन आणि रात्रीचे जेवण मी बघते. त्याची तयारी दुपारी करुन जाते.कितीही व्यवस्थापन असले तरी प्रचंड दमून आल्यावर काहीवेळा किचनमध्ये पाऊलही ठेवावे वाटत नाही. अशावेळी तयारी असलेले किचन कामी येते.
सामान दर महिन्याला भरते.आजारी पडल्यास मदतनीस असतेच.चटण्या,कूट, भाजण्या निरनिराळी पीठं हे बघून ठेवुन आधीच करुन ठेवते.
वर्षाचं तिखट हळद गोडा मसाला वाळवणं आईकडून येतात.मी फक्त टिकवते!
डाळी वर्षाच्या भरते.तांदूळ मला समहाऊ टिकवता येत नाही.किडे होतात.मग तो दर तीन महिन्यांनी आणते.
पदार्थ किती शिजवायचा ते इतकी वर्ष स्वैपाक करून कळतंच.(नशीब नवर्याचं!)
फ्रिजमध्ये जरा गोंधळाचे वातावरण असते.
एक आख्खा रॅक माझा कार्टा चाॅकलेटने भरतो.नवरा वाईनने.
खालच्या भाजीच्या रॅकमध्ये माझी पिठं नांदतात.मग खरी भाजी वरच्या रँकमध्ये.तिथेच कार्टा चिज बटर ठेवुन पळ काढतो.मग एखादा रविवार सकाळ फ्रिजमागे घालवावी लागते.अन्यथा एखाद्या डब्यामागे महिनाभर श्रीखंड राहिलं असं होतं कधीकधी!
सगळं सामान ठेवण्याच्या फिक्स जागा असण्याचा प्रचंड उपयोग होतो. मदतनीस बाईंना पण चटकन हाताशी येतं सामान.
अर्थात हे सर्व करायला मदत करणार्या दोघी माझ्याकडे असल्याने माझ्यावर फक्त करवून घेणे हीच जबाबदारी असते;)
ते मॅनेजमेंट मी अजून तरी परफेक्ट जमवलंय.
कामावरून दमून येऊन चिडचिड करत किचनमध्ये जाण्यापेक्षा बराचसा भाग मदतनीसांकडून करवून घेणे माझे व्यवस्थापन सुसह्य करते!

अगदी वर्षाचे लागणारे आणि टिकाऊ सामान ग्राहकच्या यादीत योग्य महिन्यात लिहिणे, यादी लिहीताना कोणते जिन्नस दर महिन्याला येणार कोणते चार महिन्यांनी त्यानुसार मागणीपत्रक भरणे. असे करताना एकाच महिन्यात आर्थिक तारांबळ होऊ नये म्हणून तांदूळ, साखर सिलेंडर याचे एकमहिनाआड ऑर्डर द्यावी लागेल असे व्यवस्थापन, पावसाळ्यात अति पावसामुळे फार सामान बाहेरून आणता येत नाही त्या प्रमाणात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात तांदूळ, कडधान्ये मागवणे. भाजी दोन दिवसांना पुरेल एवढी घरात ठेवणे. कारण पाहुणे केव्हाही येऊ शकतात. रवा आणल्यावर लगेच गरम करून ठेवणे. मसाला, तिखट, लोणचे, मिरच्या, मुरांबे, सांडगी मिरची ई. उन्हाळ्यातल्या कामांचे सुट्टीतील नियोजन!
दुसय्रादिवशीच्या नाश्त्याचा विचार आदल्यादिवशी करून तयारी ठेवणे. आमच्या फ्रिइजमध्ये दूध, दही, भाज्या या व्यतिरीक्त कशालाही जागा होत नाही. बाकी बरण्यांची जागा न बदलण्याचा प्रयत्न करणे, कारण घरात चार बायका आपापल्या वेळी योग्यच जागी ठेवत असल्याने होणाय्रा गोंधळाला सामोरे जायची तयारी ठेवणे. कितीही प्रमाणात अन्न शिजवले तरी १५ पौकी दोन तीन मेंबर जेवले नाहीत तर त्याप्रमाणे उरलेल्या वस्तूंनुसार दुसय्रा दिबशीचा नाश्ता आयत्यावेळी बदलणे.
यासर्वासाठी एक ठराविक बजेट दर महिन्याला ठेवून प्रत्येकाने केलेला खर्च डायरीत लिहायला लावणे.. यामुळे जादा झालेल्या खर्चाचा अंदाज घेऊन पुढ्च्या महिन्याचे बजेट ठरवणे.
ग्राहकशिवाय लागणाय्रा वस्तू शक्यतो एका महिन्यात एकच पण जास्त प्रमाणात डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर कडून घेणे, यामुळे मुळ किंमतीपेक्षा ७/८ टक्क्यांचा फरक पडतो. अर्थात हे एकत्र कुटूंबाच्या गरजांनुसार शक्य होते.
सर्व काही नीट पाहिले तरी एखाद्यावेळी संपलेली वस्तू बोर्डवर लिहिली गेली नाही की आणायची राहतेच!

सप्तरंगी's picture

1 Mar 2016 - 7:39 pm | सप्तरंगी

टोलवणे, खेळणे, पार पाडणे आणि व्यवस्थीतपणे करणे असे चार शब्द या निमीत्ताने आठवले.

नाही हो असा काही उद्देश नाही माझा, तुम्हाला असे वाटले असल्यास sorry! लोकांना खरेच असे प्रश्न पडतात का असा मला प्रश्न पडला.
खरे तर स्वयंपाक आणि व्यवस्थित केलेली आवराआवर हा माझ्या आवडीचा विषय. माझ्या घरात indian (यात सगळे प्रांत आले), chinese , थाई, मोराक्कन, japanese (फक्त २-३ items :), italian या सगळ्या प्रकारचे पदार्थ घरात बनतात, मी टिन फुड वापरत नाही, त्याचे सामान नेहमीच घरात असते, त्यात किचन मध्ये फार कुणाची लुडबुड नाही, कोणत्याही कामासाठी बाई नाही, त्यामुळे हे सर्व मीच बघते. तरीही मला कधीही हे त्रासदायक वाटत नाही , उलट किचन management हि आनंददायी गोष्ट वाटते, म्हणुन असा प्रश्न पडला असावा. तुम्हाला खरोखर माहिती हवी आहे तर मी नक्की पोस्ट करेन.

माहितगार's picture

2 Mar 2016 - 1:44 pm | माहितगार

दोन्ही कारणे, पहिले प्रांजळपणे सांगायचे तर व्यवस्थापनाची गरज असलेल्या जागा आणि क्षण कुठे कुठे अनुभवास येतात आणि प्रश्न पडतात, दुसरे व्यवस्थापन शास्त्राचा या निमीत्ताने परिचय होऊ शकल्यास किचनमध्ये सराव झालेले व्यवस्थापन इतरत्रही वापरता यावे. - या निमीत्ताने व्यवस्थापन विषय सोपा व्हावा आणि होप की एक दुसर्‍यापासून शिकण्यासारखे बरेच काही या चर्चेतून मिळेल.

तुम्ही विनोदाने लिहिताय हे लक्षात आले, परंतु धागाचर्चेत प्रवाहीपणा यावा म्हणून टोलवणे वगैरेचा उल्लेख केला बाकी आपल्या धागालेख विषयास प्रतिसादाची प्रतीक्षा.

"इडली, ऑर्किड आणि मी", ह्या पुस्तकात ह्या संबंधांचा बर्‍यापैकी उहापोह केला आहे.

पुर्वी, रात्री-बेरात्री पाहूणे आले तर, ऐनवेळी पिठले-भात किंवा झूणका-भाकर, बर्‍याचदा केल्या जात.

२ महिन्यापुर्वी माझा मोठा मुलगा अचानक घरी आला आणि तो पण मित्राला घेवून.त्यांचे हात-पाय धुवून आणि कपडे बदलून होईपर्यंत.बायकोने पोळ्या केल्या.लहान मुलाने कांदे-बटाटे-टोमॅटो चिरून दिले.मी कांदा-बटाटा-टोमॅटोचा रस्सा केला. जास्तीत जास्त १५-२० मिनिटात मुलांना रस्सा-पोळी देता आली.ते पहिली पोळी खात असतांनाच लहान मुलाने काकडीच्या फोडी चिरून दिल्या.तोपर्यंत बायकोने आम्लेट्स तयार केली.

घरी अंडी,टोमॅटो,कांदे, बटाटे,लसूण,आले,मिरच्या,कोथिंबीर,गव्हाचे पीठ आणि चण्याचे पीठ (बेसन) असल्यास पाहूणा उपाशी रहात नाही.तेल=तिखट-मीठ-मसाले हे तर असतेच असते.

माहितगार's picture

2 Mar 2016 - 4:34 pm | माहितगार

तुमचा प्रतिसाद आवडला, कमित कमी मिनीटात चौरस आणि रुचकर आहार चा मी पंखा, धागाचर्चा लावण्यामागचा हा ही एक उद्देश. ते पुस्तक माहित नव्हते, बुकगंगा डॉट कॉम वर "इडली, ऑर्किड आणि मी" दुवा मिळाला.

२० मिनीटे वाल्या पदार्थांमध्ये मुगदाळ-खिचडी प्रकार माझा आवडता, मला वाटते थालीपिठेही २० मिनीटात होतात माझ्यासारख्या जाडजूड थालिपीठ चालणार्‍यांना मस्त, तुम्ही म्हणता तसे अंडा आम्लेट म्हणजे खरे क्विकेस्ट -यातला माझा शोध म्हणजे मॅगीनुडल मोड आलेल्या मटकी सोबत उकडणे अर्धे होत आले की त्यावर अंडे फोडणे-;), इडली डोस्याचेही पिठ आधी पासून उपलब्ध करुन ठेवले असेल तर तेही लौकर होते (उडपी रेस्टॉरंटात इडली सर्वाधिक वेगाने टेबलवर येते असा अनुभव आहे) या तीन्ही प्रकारात कमी जास्त प्रमाणाततरी प्रोटीन्सची काळजी घेतली जाते.

मी एकटा रहात असताना शेगंदाण्याची तयार चटणी आणून ठेवत अस्ते रात्री साबुदाणा भिजवायचा सकाळी साबूदाणा उसळचा ब्रेकफास्ट फटाफट होत असे. त्यामुळे खाताना आवडते पण तेल आणि कॅलरीज आवश्यकते बाहेर त्यामुळे ते चिंतेचे.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 4:48 pm | पिलीयन रायडर

तुम्हाला झटपट होणारा स्वयंपाक हवाय का?

१. खिचडी - सार
२. भाज्या घालुन पुलाव / दलिया
३. थालपिठं
४. उकटशेंगोळे
५. वरण हाताशी असेल तर वरणफळं
६. कढी भात
७. मिश्र पीठं असतील तर भाज्या घालुन धीरडे
८. ज्वारीच्या पिठाचा उपमा
९. अंडे तर किती तरी फॉर्मॅट मध्ये
१०. सवय असेल स्वयंपाकाची (पक्षी:- मल्टीटास्किंग करता येत असेल तर) पास्ता पण झटपट होऊ शकतो
११. बॅम्बिनो शेवया आणुन ठेवा घरात - पटकन उपमा होतो
१२. आजकाल मोड आलेले कडधान्य सहज मिळते. नुसती उसळ करुन खायची. सोबत ब्रेड चालणार असेल तर उत्तमच.

घरात इडली पीठ वगैरे इतकी तयारी असेल तर काय मग! त्या पीठाचे आप्पे आणि सांबारपण कार्ब्स+प्रोटिन्स म्हणुन उत्तम पर्याय आहे.

तुमच्या त्या पिष्टमय पदार्थांच्या प्रश्नासाठी मला वाटतं की पोळी / भाकरी / भात ह्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी ठेवुन भाज्या / उसळी / दाळ ह्यांचे प्रमाण वाढवायला हवे. थालपीठ लावताना भाजणी असलेले बरे म्हणजे त्यात दाळी / कडधान्ये असतातच. शिवाय मेथीसारख्या भाज्या घालायच्या.

पण स्वयंपाकाचा वेग ही गोष्ट फार रिलेटिव्ह आहे हां... मी चार कामं एकत्र करते. माझा स्वयंपाक आरामात २० मिनिटात होऊ शकतो. मे एखाद्याला २० व्या मिनिटाला गरम पोळी ताटात वाढु शकते. पण माझा नवरा एक एक काम एकावेळी करत नसतो. त्याला खिचडी करायला दिड तास लागतो!! मुविंच्या घरात सगळे एकत्र काम करत आहेत. म्हणुन इतकं सगळं सुद्धा फास्ट होऊ शकतं.

आम्ही (म्हणजे मी आणि मुले) बायकोला गरज भासली तर मदत करतो.पण आमची सौ. जास्तीत जास्त पाऊण तासात साग्रसंगीत स्वैपाक करते.

अर्थात इतर सटरफटर वस्तू (सोललेली लसूण, दाण्याचा कूट, निवडलेल्या पालेभाज्या आणि कोथिंबीर, देठे काढलेल्या मिरच्या, कढीपत्याची पाने, व्यवस्थित भरलेले मसाल्याचे पाळे आणि मीठ, तयार असल्याने मुख्य स्वैपाक करायला वेळ लागत नाही.

कूकर लावतांनाच एक दिवस बीट आणि एक दिवस बटाटे, लावल्या जातात.

त्यामुळे रोजच्या आहारात,

बीट ===> लोहासाठी (माझे हिमोग्लोबिन फार झपाट्याने घसरते.बीटामुळे अद्याप टिकून आहे.)

उकडलेले अंडे ====> कॅल्शियम साठी

माणशी पाव लिंबू ====> "क" जीवनस्त्वासाठी

एक वाटी उसळ किंवा वरण ====> प्रोटीन्स साठी

भात ====> कर्बोदके

दही अथवा ताक असतेच.

२-३ भाक-या ====> मला पोळ्या पचत नाहीत.भाकरी पचते.

एखादी कोशींबीर ====> काकडी किंवा मुळा किंवा पानकोबी

मुळ्याची कोशिंबीर असेल तर फळभाजी आणि पानकोबीची कोशींबीर असेल तर पालेभाजी.

काकडीची कोशींबीर असेल तर, फळभाजी आणि पालेभाजी.

जेवणानंतर मला गोड खायची सवय असल्याने, एखादी वाटी श्रीखंड किंवा नारळाच्या वड्या.

शक्यतो दोन्ही वेळचा स्वैपाक दुपारीच करून ठेवतो. (कोशींबीरी शिवाय, कोशींबीर थोडी उरली असेल तर मी जेवण झाले की खाऊन टाकतो.)

रात्री मग फक्त पोळ्या केल्या की झाले.साधे वरण उरले असेल तर आमच्या सासूबाई आमटी करतात.कर्नाटकी आमटी मस्त लागते.

असो,

४वेळा जेवणे (आमच्याकडे नाश्ते पण जेवणासारखेच भारदस्त असतात.) आणि २ वेळा झोपणे, असा सध्या दिनक्रम आहे.गेली २२-२३ वर्षे हे असेच चालू आहे.

बायको स्वैपाकात हौशी आहे आणि मुले एक नंबरची खवय्ये.(लहान मुलगा तर घरी, संध्याकाळी ५ वा. नाश्ता करून, परत बाहेर सोया-चिल्ली खाऊन येतो आणि ८ वाजता परत व्यवस्थित जेवतो.)

पैसा's picture

1 Mar 2016 - 8:33 pm | पैसा

मॅनेजमेंट. हम्म्म्म. महिन्याभरात लागणारा किराणा साधारण एकदम को ऑप बागायतदारमधून आणते. इतर काही रेडी टू कुक आणि रेडी टू ईट वस्तू मी गावाला जाते तेव्हाची मुलांसाठी प्रोव्हिजन म्हणून आणून ठेवाव्या लागतात. गव्हाचे पीठ १० किलो साधारण १५-२० दिवस पुरते. ते संपत आले की फोन करून ऑर्डर करणे वगैरे असतेच.

बहुगुणींनी म्हटल्याप्रमाणे एक काम करत असताना मी दुसरे कपडे वॉशिंग मशीनमधे टाकणे वगैरे कामे करत असते. त्यात मधेच मिपावर डोकावणे पण येते. रात्री कूकर लावला की एकीकडे नारळ खरवडणे, कांदे चिरणे इत्यादि करता येते. सकाळी पोळ्या करताना दुसर्‍या रिकाम्या गॅसवर आधी कूकर लावणे आणि मग दूध वगैरे तापवणे हे पटापट होते. भांडी घासायला बाई असल्याने ते काम करावे लागत नाही.

वर्षाचे सामान साठवणे वगैरे मी करायला जात नाही. कारण आमच्या इथे बागायतदार हे अतिशय उत्तम को कॉप स्टोअर आहे. तिथे सर्व किराणा बाजारभावापेक्षा बराच स्वस्त मिळतो. त्यामुळे बिलासाठी वेळ लागला तरी डाळी, तांदूळ तिथूनच आणायचे असा शिरस्ता आहे. बरेच दिवस मागे पडून राहिलेल्या बरण्यातला जुना झालेला एवढासा रवा वगैरे टाकून द्यायची वेळ येते. अशी साफसफाई महिन्यात एकदा तरी केली जाते.

फ्रीज आमच्याकडे दोन आहेत. एक डबल डोअरवाला आणि एक लहान दूध, दही इत्यादि पदार्थांसाठी. कोणत्या फ्रीजमधे काय आहे याची घरात सगळ्यान सवय झाली आहे. मोठ्या फ्रीझच्या फ्रीझरमधे मांजरांना लागणारे चिकन तुकडे, मासे, रेडी टू कुक रोट्या, पराठे, फ्रोझन मटार, पनीर वगैरे पदार्थ असतात. तो आठ दिवसानी तरी नीट साफ करावा लागतो. खालच्या कंपार्टमेंटमधे शिल्लक राहिलेले अन्न, भाज्या असतात. खोबरे, खराब होऊ शकेल असे लोणचे, एका घट्ट झाकणाच्या डब्यात चिरलेला कांदा, पोळ्यांसाठी भिजवून ठेवलेली कणीक, एका डब्यात खवलेले खोबरे असते. मसाले, आले लसूण पेस्ट, बोर्नव्हिटा हे सगळे फ्रीजमधे असतेच.

वेळ असेल तसे दिवसभर लागतील तेवढे कांदे एका डब्यात चिरून फ्रीजमधे टाकते. कणीक साधारण दोन दिवस पुरेल इतकी भिजवून ठेवते. कारण मुलाला सकाळी संपूर्ण जेवणाचा ड्बा द्यावा लागतो. त्यामुळे आमच्याकडे सकाळचा नाश्ता हा बरेचदा ताज्या पोळ्या आणि रात्रीची गरम केलेली भाजी, बोर्नव्हिटा असाच असतो. डब्याच्या गडबडीत पोहे शिरा वगैरे करत बसणे शक्य होत नाही आणि बाहेर जाणार्‍यांना सकाळचा नाश्ता असा व्यवस्थित आसला पाहिजेच. इतर काही नाश्त्याचे प्रकार सुटीच्या दिवशी करता येतात.

रोज लागेल तसे दूध आणले जाते. त्याचे दही, ताक करणे, लोणी, तूप करणे हे आपोआप होत जाते. त्यासाठी ठरवून नियोजन लागत नाही. भाज्या, मासेही २/३ दिवसांचे एकदम आणले जाते. स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट उपयोगानंतर तिच्या जागेवर गेली पाहिजेच हा माझा आग्रह असतो. रात्री लाईट गेले तरी मीठ साखर वगैरे न चुकता हातात आले पाहिजेत. आता इथूनच आमच्या शत्रूपक्षाबरोबर रणसंग्राम सुरू होतो.

माझ्या नवर्‍याला मासे आणि चहा हे करायला आवडते. पण चहा केल्यावर साखरेची बरणी कुठे जाईल याचा काही नेम नसतो. मासे त्याने करायचे म्हणाजे मी त्याच्या हाताखाली चिरकाम करणे अपेक्षित असते. पुन्हा मीठ आणि तिखट वगैरे कुठेही जाऊन पडते. मला सापडले नाही की मी अजिबात शोधत नाही. त्याला सांगते किंवा मुलाला शोधता येते त्याला सांगते. नवर्‍यालाच पुन्हा त्या वस्तूची गरज पडली की मी अजिबात शोधायला जात नाही. तू कुठे टाकलीस ती तूच शोधून घे म्हणून सांगायला मी अजिबात घाबरत नाय. त्याने एखादा पदार्थ केला की घरात असतील ती सर्व भांडी सिंकमधे जातील याची गॅरेंटी असते. पण भांडी घासायला बाई असल्याने मी पुन्हा घाबरत नाय.

एवढा गोंधळ सोडता आमची मॅनेजमेंट २५ वर्षे ठीकठाक चालली आहे. तेव्हा यशस्वी म्हणायला हरकत नसावी.

वापरलेली भांडी ताबडतोब विसळून ठेवणे, ह्यामुळे भांड्यांचा ढीग साचत नाही. दूध सकाळी क्लासला जाताना संपवून पातेलं भिजत घालत असल्यामुळे येईस्तवर साय खरवडून काढण्याइतपत झालेली असते, मग ताबडतोब पातेलं घासून दूध तापवता येतं. आठवडाभराचे ओटफ्लेक्स एकदाच भाजून ठेवायचे. हवे तितके काढून घेऊन तापलेलं दूध ओतून झाकण मारायचं. दहाएक मिनीटात खाण्यालायक होतात. अधून मधून किचनच्या ओट्यावर हात मारत राहायचं, मात्र ठरलेल्या दिवशीच हातात वे़ळ असताना नीट आवरायला घ्यायचा. तोवर थोडंफार काही पडलं तर वरचेवर पुसायचं.

पोळ्यांची कणीक मळून मग भाज्यांना फोडणी घालायची, भाज्या शिजेस्तवर पोळ्या होतात.

इति लेखनसीमा.

कपिलमुनी's picture

2 Mar 2016 - 12:01 am | कपिलमुनी

चांगला टॉपिक आहे विडंबन + माहितीपूर्ण धागा टाका

माहितगार's picture

2 Mar 2016 - 3:18 pm | माहितगार

करा करा सासंम ने विडंबन स्पर्धापण लावलीए स्पेशलs s !

किचनमधील काम म्यानेज करून प्रतिसाद लिहित आहे. ;)
प्रश्न क्र. १. व त्यातील उपप्रश्न यांची उत्तरे- हो अशी आहेत.
क्र.२ व उपप्रश्नांची उत्तरे- पूर्वनियोजन असते, ते विकांती बरेचदा मनात असते व सवयिने लक्षात राहते. कधीतरी मेंदूचा भुगा झाल्याने लक्षात राहणार नाही असे वाटल्यास कागदावर लिहून काढते. मुलगा बाळ असताना वेळापत्रक स्वयंपाकघरातील कपाटाच्या मागे चिकटवलेले असे. नवर्‍याला बरेचदा माहित असते. तो बरा स्वयंपाक करतो म्हणून स्वयंपाकघरातील सामानाच्या जागा, ९५ टक्केवेळा माहित असतात. काम सुरु करताना जास्त वेळ लागणार्‍या पदर्थांना प्राध्न्यक्रम दिला जातो.
प्रश्न. क्र ३- याचे उत्तर तुमच्या घराजवळ किती अंतरावर भारतीय किराणासामानाचे दुकान आहे त्यावर अवलंबून आहे. आमच्या घराजवळ एक भारतीय दुकान आहे त्यातून अगदीच काही संपले तर आणते, अन्यथा जरा लांब असलेले जंबो आकारमानाचे दुकान काही महिन्यांपूर्वी सुरु झाल्याने तेथून डाळी, तांदूळ, गूळ असे अनेक प्रकार सहा महिन्यांपुरते आणून ठेवते. तरीही अध्येमध्ये काहीतरी संपतेच जसे तीळ, ओवा असे काहीतरी तेंव्हा जवळून आणते. बाकी भाजी अठवड्यातून एकदा आणली जाते. पाहुणे असल्यास अठवड्यातून दोनदा.
क्र.४- दर अठवड्याला/महिन्याला/ सहामहिन्याला जे आणायचे आहे त्याच्या याद्या अगदी रीतसर पद्धतेने होतात. त्यात आपापल्या वस्तू लिहिण्यासाठी मुलाला व नवर्‍याला सूचना दिलेल्या असतात त्याप्रमाणे ते करतात (कारण त्यांच्या फायद्याचे असते म्हणून). ;) मध्ये काही विसरलेले असल्यास व अगदीच अर्जंट नसल्यास आणत नाही.उदा. अमक्या कुकीज, कारण घरी कुकीज करत असते त्यावर मुलाने भागवावे.
क्र.५- शाळा, हापिसे वेळेत न गाठून सांगता कोणाला? आधुनिक यंत्रे वापरून कामात फाष्टता आणण्याचा प्रयत्न केला जातो, कधीकधी वेळेचे गणित अगदी फसते पण अशावेळा सगळ्यांच्याच असतात. उदा. आजारपणे, वाहतुकीचा मुरांबा, आपल्या समोरच्या गाडीला तिसर्‍याने ठोकणे वगैरे. डबे भरून, वाहनकिल्ल्या, बाहेर जातानाचे सामान जे दरवाज्यापाशी नेऊन ठेवायचे ठिकाण ठरलेले आहे. हे अर्थात माझ्यासाठी करते. नवर्‍याला तसे आवडत नसावे, मुलाला बेशिस्त आवडते. कधीकधी नाश्ता करण्यास घाई होते, त्यावेळी वैताग येतो. पदार्थ डब्यात भरून कामाच्या ठिकाणी खाल्ला जाईल याची काळजी घेण्याशिवाय पर्याय नसतो. उशिरा का होईना पोटात अन्न जायला हवे.
पदार्थ बरोबर शिजलाय हा अनुभव येण्यासाठी बरेचदा चुका करून करून मग बरोबर यायला लागलेय. तरी कधीकधी डाळींचा, रव्याचा ब्रँड बदलला की एखाद्यावेळी फसते मग पुढे सुधारायचे. पदार्थांचे प्रमाण ठरलेले आहे. ते तसे रहावे यासाठी माझ्या सासूबाईंनी घालून दिलेली पद्धत थोड्याफार बदलाने ते पाळते. मेजरींग कप्स, कोणत्यातरी औषधांबरोबर येणारे पिटुकले स्कुप्स, चमचे असे मुद्दाम ठेवले आहेत. ते वर्षानुवर्षे बदलत नाहीत. त्यात कमीजास्त करणे सवयीने जमते.
क्र.७- रेफ्रिजरेटर वेळोवेळी साफ करते. मागील वर्षी दुकानात फ्रिजातले लाईनर्स मिळालेत ते मशीन वॉशेबल आहे. ते घातल्याने स्वच्छता सोपी होते.

बाकी टायपायला वेळ मिळेल तसे करीन. वरील प्रतिसाद टायपताना इतक्या गोष्ती मध्ये आल्या की २ तास लागले.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 1:59 pm | पिलीयन रायडर

वरती पैसातै, रेवाक्का इ. ज्या बायका लिहीत आहेत, त्यांच्या कृपेने मला आता २५ किलो तांदुळ कसे साठवायचे इ गोष्टी जमतात. तिखटात खाली मीठ घालुन ठेवावे हे कळते.

मी फार वेळ स्वयंपाकघरात घालवत नाही. भाज्या, किराणा, दुध इ गोष्टी मी अजुनही "संपल्या की मग.." आणते. नियोजन वगैरे काही करत नाही. मुड आणि फ्रिज मधला स्टॉक वापरते.

जास्त किचकट भानगडीत पडत नाही.

बाई पोळ्या करते, मी भाजी. घरात चार लोक असतील तर कुकर. खुप मुड असेल तर कोशिंबीर ताक वगैरे.

चटण्या, लोणची, पापड-कुरवड्या, लाडु-वड्या-चिवडे ह्या साठी अजुनही माझी आई माझा संसार चालवते असे म्हणण्यास हरकत नाही. कधीतरी तर हे मला करावे लागेलच ह्या विचाराने मी आताच चिंतीत आहे.

सासुबाई येतात तेव्हा डबे घासुन घेणे, काय खराब झालंय, सम्पलय इ बघणे कामे करतात. त्या नसताना मी डबे एकात एक घालुन त्यांच्या समोर किराणामालातले पुडे जसे च्या तसे मांडुन ठेवते. लागेल तेव्हा पिशवी उघडायची! अशाने मला घरात काय शिल्लक आहे ते समजते. साबा ज्या गोष्टी नीट डब्यात ठेवुन जातात, त्या माझ्या दॄष्टीने संपलेल्या असतात. म्हणुन मी हा उपाय काढला आहे.

ह्या सर्व व्यवस्थेचे कारण माझा टिनी टायनी १.५ लोकांचा टेम्पररी फेज मधला संसार हे आहे. निम्मे अधिक दिवस मी घरात नसतेच.

एरवी घर ५-७ माणसांनी भरलेले असताना भरपुर स्वयंपाक केलेला आहे. पण तेव्हा सुत्रे साबांच्या हातात होती. मी मुळात फार हौशी नाही. (इति साबा!)

पण ह्यावरुन कुणी मुक्त बायका - स्वयंपाक न करणे - पोरांचे हाल इ निष्कर्ष काढु नयेत (लोक काढतात!)

माझ्या पोराच्या डब्यात रोज पोळी-भाजीच असते, पालेभाजी - फळभाजी - कडधान्ये - फळे - डाळी इ सर्व त्याच्या पोटात जाईल हे मी पहाते. फक्त त्यात "मॅनेजमेंट" वगैरे काही करावे लागत नाही. भाज्या आणताना सगळ्या प्रकारची एक आणायच्या न एक कडधान्य भिजवायचे.. झाले!

किराणा होलसेल मध्ये आणणे, तो स्टोअर करणे, घरात चिवडा बिस्क्टीट इ विविध प्रकार तय्यार असणे इ गोष्टी मी करत नसल्याने आपले काम सुटसुटीत आहे. बाकी आई समर्थ आहेच लाडू बिडु पुरवायला!

स्वयंपाकघराचे काम सुसज्ज असण्यापेक्षाही पौष्टिक, रुचकर आणि वेळच्या वेळी लोकांना खायला मिळणे हे आहे... असं माझं मी ठरवुन घेतलय!! जास्त लोड न घेता मी स्वयंपाक करते. आज काय बनवायचे हे सकाळी ठरवते, ज्या वस्तु नसतील त्या आणते आणि बनवते. फार पुढचं प्लानिंग वगैरे करत नाही, ते नेहमी फिसकटतं..

एक गोष्ट मात्र मी १००% भारी करते - स्वच्छता!

माझा ओटा कधीही न आवरलेला, खरकटं - भांडी इ असलेला सापडणार नाही. स्वयंपाक झाल्याच्या २र्‍या मिनिटाला ओटा पुसलेला, कचरा डस्टबीन मध्ये, भांडे ड्राय बाल्कनीत, वस्तु जागच्या जागी.

अधुन मधुन ओट्याखालुन सर्व नीट झाडुन पुसुन घेणे, ओटा नियमीत धुणे, टाईल्स घासणे, फ्रिज पुसणे वगैरे कामे मी आनंदाने करते. (नॉट जस्ट क्लिन.. पिरा क्लिन!)

महत्वाचे :- माझा नवरा स्वयंपाकघरातील अ‍ॅक्टिव्ह मेंबर आहे. तो किराणा, दळण, भाज्या आणणे इ कामे करतोच. पण प्रसंगी वन डिश मील टाईप पदार्थही करतो. फक्त त्याला नंतरचे आवरणे नीटसे जमत नाही. पण एकंदरीत काय शिल्लक आहे, काय संपले वगैरे गोष्टी त्यालाही नीट माहित असतात. बहुदा तोच साबांचा वारसा चालवेल.. मी फक्त रांधायचे काम करेन!

माहितगार's picture

2 Mar 2016 - 4:09 pm | माहितगार

"संपल्या की मग.." आणणे

ह्याला बहुधा 'हँड टू माऊथ' मॅनेजमंट (ह्या शब्द प्रयोगाची व्युत्पत्ती लो इनकम ग्रूपच्या अर्थशास्त्रीय वर्णना वरुन येत असावी पण हे तेवढ्यापुरते मर्यादीत नाही काही वेळा जाणीव पुरकही व्यवस्थापनात वापरले जाते -सरकारी भाषेत झीरो बजेट - म्हणतात का ? (चुभूदेघे) ह्याच्या सकारात्मक बाजू (व्यवसायिकांसाठी: खेळते भांडवल कमी अडकून राहते) , वेस्टेजची शक्यता कमी होते. मर्यादा सप्लाय चेन मध्ये पुरेशी क्वाटींटी आणि सहज किंवा लागेल तेव्हा उपलब्ध असावयास हवी एटीएमची सुविधा असेल तर सोबत अथवा घरी कॅश असण्याची गरज नाही पण नेमकी गरजेच्या वे़ळी एटीएमची सुविधा काही कारणाने बंद पडली तर ? इमर्जन्सीसाठी तुमच्या कडे पर्यायी व्यवस्था असावी. म्हणजे कच्चा मालच उपलब्ध नसेल तर उत्पादन ठप्प पडण्याची शक्यता असू शकते, तुमच्याकडे घरात हे व्यवस्थापन इतर कुणी बघत असल्यामुळे तुम्हाला त्याची तेवढी तुर्तास निकड भासत नसावी, पण या स्थितीत फिल्डींगला लावलेला खेळाडू मैदानावर नसेल तर तुम्ही ते काम अचानक आले तर त्याची जागा घेऊन फिल्डिंग स्वतः करु शकता का हे महत्वाचे.

'हँड टू माऊथ' मॅनेजमेंटची दुसरी मर्यादा क्वाटींटी खरेदीने होणार्‍या बचती हाताशी कमी लागू शकतात.

माहितगार's picture

2 Mar 2016 - 4:17 pm | माहितगार

अजून एक मर्यादा जाऊन आणण्याच्या एकुण चकरांची संख्या वाढण्याची शक्यता आणि त्या योगाने मनुष्य बळाच्या श्रम आणि वेळेवर येणारा तणावाची शक्यता पण समजा बाजारहाट हाकेच्या अंतरावर असेल तर ताण कमी असू शकेल बाजार हाट लांब असेल अथवा तुम्ही जे मनुष्यवेळ या कामास लावताहात तो इतरत्र सत्कारणी लागणे शक्य असेल तर ? म्हणजे मीठ मिरची पावडर आणण्याच्या वेळात कुठे प्रिऑरीटी काम सफर होते आहे असेही असावयास नको ( तुमच्या कडे असे होणार नाही याची काळजी तुम्ही घेत असणार पण मॅनेजमेंटची जनरल चर्चा करोत आहोत तेव्हा मुद्दा नोंदवलेला बरा म्हणून उल्लेख)

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 4:32 pm | पिलीयन रायडर

पुष्कळच फेर्‍या होतात. साधारणत: महिन्याच्या शेवटाला लिस्ट करायची..मनात! खाली जाऊन आणायचं एकदम.

भाज्या.. चकरा झाल्या तरी चालतं.. रोज ताजी भाजी मिळते. मी ८-८ दिवस स्टॉक करुन खात नाही.

दुध - अनियमित वेळापत्रक. घरी असते तर रोज घेतलं असतं. आज दुध हवं की नाही हे रोज फोन करुन कोण कळवणार?

आणि हो.. सगळं काही घराखाली उपलब्ध आहे.. त्यामुळे फार वेळ जात नाही.

माझी केस युनिक आहे. माझा तुम्हाला "जनरल" चर्चेसाठी उपयोग नाही. :)

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 4:27 pm | पिलीयन रायडर

मॅन्जमेंटचे फंडे बरोबर बसवलेत.. वाया जाऊ नये हा मुख्य हेतु,

सध्या मीच बॅट्समन, मीच बॉलर, मीच फिल्डर आणि मीच अंपायर आहे! दुसरं कुणीही नाही. तेव्हा मी नावाचा खेळाडु मैदानात जाऊ शकत नसेल तर खालच्या हॉटेलात जाऊन हाणणे हा फारच सोपा पर्याय आहे. तिथे कार्ड पेमेंट चालतेच.

अगदी एटीएम बंद पडलं तरी दुकानदारांशी ओळख असल्याने "क्रेडिट" घेता येईल वेळ आली तर.

एखाद्या दुसर्‍या जिन्नसासाठी गाडी अडली तर शेजारच्या वहिनींकडे जायचं.. त्यामुळे उत्पादन ठप्प वगैरे होत नाही. सुदैवाने आमचे परराष्ट्र धोरण पहिल्यापासुन व्यवस्थित असल्याने, शेजारच्या राष्ट्रांशी संबंध चांगले आहेत.

स्वयंपाकघर आहे हो.. सरकार नाही चालवायचय.. चिल..!

बहुगुणी's picture

2 Mar 2016 - 5:26 pm | बहुगुणी

स्वयंपाकघर आहे हो.. सरकार नाही चालवायचय.. चिल..!
भल्या पहाटे मोठ्याने हसलो!

माहितगार's picture

2 Mar 2016 - 6:01 pm | माहितगार

स्वयंपाकघर आहे हो.. सरकार नाही चालवायचय.. चिल..!

:) विचार करतोय पिरा सरकार मध्ये असतील तेव्हा काय उत्तर देतील ? :)

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 6:49 pm | पिलीयन रायडर

तेव्हा मी म्हणेन की "माताय.. संसार केलाय.. सरकार काय चीज है!"

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:15 pm | माहितगार

:) उत्तर आवडले तुम्हाला हवा तो किताब !

स्वयंपाकघर आहे हो.. सरकार नाही चालवायचय.. चिल..!
भारी!

स्रुजा's picture

2 Mar 2016 - 8:19 pm | स्रुजा

हाहाहा.. पिरा म्हणजे ना..

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 2:14 pm | मुक्त विहारि

दीपक कुवैत, पेठकर दादा आणि गणपाशेठ ह्यांचा प्रतिसाद का नाही?

(अचंबित) मुवि

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:16 pm | माहितगार

दीपक कुवैत, पेठकर दादा आणि गणपाशेठ

यांना आमंत्रण देण्यात आम्हीपण सहभागी आहोत

कवितानागेश's picture

2 Mar 2016 - 7:01 pm | कवितानागेश

आम्ही फ्रीझला पुराण वस्तू संग्रहालय म्हणतो! ;)

मला कुकींग ची खुप आवड आहे पण त्याला लागणारा खुप वेळ द्यायचा स्वभाव नाही. एकच गोष्ट खुप वेळ करत बसणं जमतच नाही. पिरा म्हणते तसं चार पाच हात असल्यासारखं माझी एकत्र कामं चालू असली तर च मला जमतं नाही तर उठुन नुसता स्वैपाक करणं हा प्रकार बोअरिंग वाटतो.

मी एकदाच रविवारी भाजी आणि फळं आणते. पालक मेथी सारख्या भाज्या त्याच दिवशी धुवुन, निवडुन ब्लांच करुन ठेवते. बाकीच्या भाज्या चिरत मात्र नाही कारण आता हात बसलाय. ५ मिन्टात कुठली ही भाजी चिरुन होते. फोडणी चालू असताना कांदा चिरुन होतो, तो तेलात असताना टोमॅटो चिरुन होतो, त्याला तेल सुटेपर्यंत मुख्य भाजी चिरुन होते. ती भाजी शिजत असताना वरणाला फोडणी होते. पोळ्या मात्र मी करत नाही. पंजाब किंग झिंदाबाद. आमच्याकडे रेडिमेड लाटलेल्या गव्हाच्या फ्रोझन पोळ्या मिळतात त्या भाजल्या की काम झालं. त्या एकिकडे भाजल्या जात असताना सलाड चिरुन होतं. रविवार च्या मुख्य कामात एखाद प्रकारचा सँडविच स्प्रेड करुन ठेवणे, आठवड्याचा कांदा चिरुन ठेवणे, मिरची लसुण आलं वाटुन फ्रीझ मधल्या आईस ट्रे च्या ५-६ क्युब्ज मध्ये लावुन ठेवणे (हे काम २ आठवड्यातुन एकदा पुरतं) , ट्रे च्या उरलेल्या ३ भागात लाल मिरची + आलं लसुण आणि शेवटच्या ३ भागात नुसती आलं मिरची (भेळेसाठी वगैरे) करुन ठेवते. लागेल तसं एक एक क्युब काढायचा. रविवारी एकदा २ अडिच वाट्यांचं आणी बुधवारी एकदा असंच मुगाचं वरण लावुन मी फ्रीझ मध्ये ठेवते. आलटुन पालटुन फोडणी देऊन ५ मिनिटात आमटी तयार होते. घरी मी फक्त व्हेज करत असल्याने वरण आणि उसळी प्रोटिन साठी अस्तात च. रवा वगैरे आणल्यावर भाजून ठेवते म्हणजे कांदा चिरलेला आणि रवा भाजलेला असल्यावर ५ मिनटात उपमा होतो .तिथे आम्ही दोघंच असल्याने आणि भूक लागल्यावर लगेच लागतील तशा गोष्टी करण्यावर माझा भर असतो त्यामुळे या सगळ्याचा विशेष फायदा होतो. कढिपत्त्याची चटणी हल्लीच रेवाक्का कडुन शिकले आहे, ते करुन ठेवते. विशाखा ने मला अ‍ॅपल+ प्लम चटणी शिकवली , ती ही अधुन मधुन ६-८ दिवसांची करुन ठेवते.

कुठलीही गोष्ट किचन मधली संपलेली मला आवडत नाही. त्या त्या पदार्थांच्या डब्याच्या सव्वापट सामान मी आणते. डबे भरुन उरलेले पॅक्स बंद करुन ठेवते. डबा संपला की तो पॅक काढायचा आणि दुकानातुन पुन्हा आणायचं. संपलं की उठुन जावं लागत नाही. २-३ दिवसांचं मार्जिन मिळतं.

ग्रोसरी आणतानाच इकडच्या पोर्शन्स प्रमाणे साधारण ८- ९ दिवसांची आणली जाते. त्यात उसळी आल्या आणि बाहेरचे जेवण अ‍ॅड झालं की २ आठवड्यांची सोय होते.

शुक्रवारी रात्री बाहेर डिनर आणि शनिवारी फ्रीझ साफ करणे मोहीम असते. छोटं छोटं जे उरलं असेल ते जरा भाजी आमटीत वापरुन टाकणे वगैरे. केळी उरलेली असतील तर ती कट करुन फ्रीझ करुन टाकणे वगैरे पण तेंव्हाच केलं जातं. पण अर्ध्या तासाच्या वर वेळ देत नाही मी या कामाला. एकदाच रविवारी २ तास द्यायचे की निदान १० दिवसांची सोय होते. रविवारी सकाळी ८.३० -९ पर्यंत नाश्ता करुन ग्रोसरी आणायला जाणे , ही कामं उरकुन १ च्या दरम्यान जेवणे आणि मग सिनेमा वगैरे नवर्‍याबरोबर बघणे हा माझा अतिशय आवडीचा कार्यक्रम आहे.

धागा आणि प्रतिसाद आवडले. माझ्याकडूनही थोडी भर!

स्वैपाकघरात व्यवस्थापन कौशल्याची गरज नक्कीच असते आणि वेळ व्यवस्थापनाचीही. ज्यांना किचनचे व्यवस्थापन जमत नाही असे वाटते त्यांना काय काय अडचणी येतात? - मला वाटते की व्यवस्थापन नीट न जमल्यामुळे गरजेपेक्षा फार वेळ स्वयंपाकात जातो, काही वेळा कीड, बुरशी लागून, सडून अन्न वाया जाते. शिवाय ते बाकी पदार्थांना लागले असतील तर पाहण्यात, निवडण्यात वेळ जातो तो वेगळाच!

बर्‍याचदा किचनची रचना कशी आहे यावरदेखील व्यवस्थापन अवलंबून असते. शक्यतो फ्रिज, गसची शेगडी आणि सिंक हा त्रिकोण जमेल तेवढा लहान असावा. किचनचा ओटा जमेल तेवढा मोकळा असावा. यासाठी वस्तू काम झाले की लगेच जागच्या जागी ठेवते. घासायची भांडी सिंकमध्ये ठेवते.
आम्ही रोज डब्यात भाजीपोळी नेतो, त्यामुळे सकाळी पोळ्या लाटताना, भाजताना जवळपास मुळीच पसारा होऊ देत नाही. शेवट्ची पोळी भाजेपर्यंत पोळपाट-लाटणे, ओटा साफ करुन टाकते. भाजी चिरण्यात जास्त वेळ जाणार असेल तर आदल्या रात्रीच चिरुन, निवडून डब्यात भरुन फ्रीजमध्ये ठेवते. पोळ्या लाटेपर्यंत भाजी शक्यतो तयार होते.

यासाठी पूर्वनियोजन म्हणजे वेळखाऊ भाज्या, पदार्थ संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी करणे, कधी कधी आठवड्याचा किंवा निदान २-३ दिवसांचा मेनू ठरवणे, संध्याकाळी थकलेले असले तर खिचडी, पास्ता असे सोपे पदार्थ करणे हे करते. जोडीदाराचाही सहभाग असतो. आम्ही दोघेही एकमेकांना पूरक, पण दुसर्‍याला अडचण/ व्यत्यय येणार नाही अशी कामे, त्यातही एकमेकांना अडचण होणार नाही (उदा. एक जण स्वयंपाक, दुसरा भांडी घासणे) अशा ठिकाणी उभे राहून करतो.

भरलेले सामान आणि चिजवस्तु कुटूंबातील व्यक्तिंना विचारत बसावे लागू नये म्हणून केलेली म्हणजे - नित्याच्या गोष्टी गॅसच्या जवळ - त्यातही मीठ, मसाले एका हाताला, चहा, कॉफी, साखर दुसर्‍या हाताला, सगळी पीठे एका कप्प्यात, डाळी/ कडधान्ये, पोहे/ साबुदाणा/ रवा, तीळ्/जवस/दाण्याचे कूट अशी विभागणी असते. सुट्टीच्या दिवशी डबे, बरण्या भरुन जास्तीचे सामान वरच्या/ दूरच्या कप्प्यांत ठेवते. जमेल तेवढे पारदर्शक बरण्या, डबे वापरते. ते वस्तू समोरच असली तरीही विचारतात ती गोष्ट वेगळी ;)

रेफ्रीजरेटर मधील पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता? - अजयाताईंनी लिहिल्याप्रमाणे फ्रीजमध्ये गोंधळाचे वातावरण होऊ नये किंवा एखादा डबा कुठे मागे दडलेलाच राहू नये यासाठी मी ड्राय-इरेजर बोर्ड वापरते. मॅग्नेटिक असल्यामुळे तो फ्रीजलाच लावता येतो. अतिशय कमी वजनाचा, सहज साफ करता येणारा हा बोर्ड गेली सात वर्षे मी वापरत आहे. माझ्या स्मरणशक्तीचे गर्वहरण इथे मिपावरच होण्याआधीच तो मला मिळाला होता! फ्रीजमध्ये काय काय भाज्या/ पदार्थ आहेत, पुढच्या वेळी ग्रोसरीत काय आणायचे आहत, फोन नं., दिवसभराची कामांची यादी अशा अनेक गोष्टी तात्पुरत्या लिहिण्यासाठी त्याची फार मदत होते. एकदा भरला कि ओलसर कागदाने पूर्वीसारखा साफ! माझ्या किचन आणि एकंदर बर्‍याच पूर्वनियोजनात याचे महत्त्वाचे योगदान आहे!

या आणि आणखी नियोजनामुळे खरंच माझाही स्वयंपाक अर्ध्या तासात होतो.

कच्च्याबच्च्यांच्या मागे यातल्या बर्‍याच नियोजनाचे सध्या बारा वाजलेत, पण लवकरच गाडी रुळावर येईल अशा आशा आहे :)

मुवि आणि बहुगुणींनी प्रतिसाद देऊन पुढाकार घेतला, नंतर भरभरून उपयूक्त प्रतिसाद आले आहेत, चर्चा सहभागासाठी सर्वांचे आभार

सस्नेह's picture

4 Mar 2016 - 5:30 pm | सस्नेह

बरंचसं पिराशी मिळतंजुळतं आहे. धान्ये, डाळी ग्रोसरी संपत आले की भिंतीवरच्या चार्टात लिवायचं आणि येतेल्या रविवारी आणून टाकायचं. गहू आणि साखर याशिवाय फारसे साठवण ठेवत नाही, उगाच किडे बिडे उपद्व्याप कोण करणार ? सकाळी पोळी भाजी आणि सॅलड. पैकी पोळ्या बाई करते. कणिक रात्रीच भिजवून फ्रीजमध्ये ठेवलेली असते. पालेभाज्या आदल्या दिवशी निवडणे, फळभाज्या आयत्यावेळी कापणे. चिरलेल्या कांद्याची/ कोथीम्बिरीची/आलेलसूण पेस्टेची अशा अक्षय डब्या फ्रीजमध्ये असतात. संपल्या की भरून ठेवायच्या. आठवड्याची शेंगदाण्याची चटणी एकदा रविवारी कुटणे कार्यक्रम. माझ्या लेकाला आठवड्याला पावशेर शेंगदाण्याची चटणी लागतेच लागते. मग भाजी आवडीची नसली तर फिकर नै !
संध्याकाळी भात आमटी/ पातळ भाजी /गरगट्टे पोळी/ भाकरी आणखी एखादे तोंडीलावणे जमल्यास. याच्या तयारीला बाई मदतीला असते, स्वयंपाकाला नाही.
सुट्टीदिवशी डोसे, इडल्या, पिझ्झा, पावभाजी, सँडविच, कटलेट, ब्रेडवडे, चिप्स , अळूवडी, कोथिंबीरवडी अशापैकी काहीतरी पेश्शल आयटम. त्याची तयारी आदल्या दिवशी किंवा त्याच वेळी. एरवी असले चोचले हाटेलच्या जिवावर.
महिन्यातून एकदा भेळेची चटणी, भडंग बनवून ठेवते. मी घरी नसताना मुलगा भेळ करून घेतो.
फ्रीजमध्ये श्रीखंड बासुंदी आणून ठेवते. भाजी आवडीची नसेल तर जादाचा पर्याय म्हणून.
किचन स्वच्छतेच्या बाबतीत मीही पिराची मोठी बहिण आहे. स्वैपाक झाल्यावर ओटा साफ न करता जेवायला घेईन तर , आजीच्या भाषेत, माझं मढं ताटकळेल सरणावर !! =))
फ्रिज वरचेवर साफ करायला वेळ नसतो, सो, तो घाण होणार नाही याची काळजी घेणे. किडे होतील अशा वस्तू न बाळगणे.
मावेओ, गॅस आणि इंडक्शन शेगडी यांच्या एकत्रित वापरामुळे नाष्टा बनवणे/ गरम करणे, भाजी शिजवणे, दुध तापवणे, चहा-कॉफी बनवणे, पोळ्या आदल्या रात्रीचे उरलेले पदार्थ गरम करणे इ. कामे फास्ट होतात.
आणि हो, मुख्य म्हणजे मला माझ्या किचनमध्ये मी असताना इतर लोक वावरले तर अगदी बावचळायला होते !! त्यामुळे स्वैपाक होईपर्यंत (बाई सोडून) इतरांना नो एन्ट्री टू किचन ! आले तरी काम झाले की झटपट बाहेर ! :)

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2016 - 5:15 pm | पिलीयन रायडर

इथे तू आणि स्रुजने लिहीले आहे म्हणुन दोन प्रश्न

१. चिरुन ठेवलेला कांदा वापरु नये म्हणतात ना?
२. आलं लसुण पेस्ट वगरे करुन ठेवलं तर चवीत बदल होतो का?

१. चिरलेला कांदा फ्रीजमध्ये दोन दिवस चांगला राहतो, आरामात . पण गच्च झाकणाच्या डबीत बंद करायला हवा.
2. आले लसूण पेस्ट करताना मी त्यात थोडे व्हाईट व्हिनेगर घालते, त्यामुळे फ्रीजमध्ये महिनाभर राहते.

माझा चिरलेला कांदा सोमवार ते शुक्रवार राहतो. स्नेहा ताई म्हणते तसं बंद डब्यात आणि तुला हवं असेल तर ५ दिवसांच्या छोट्या छोट्या डब्या पण करुन ठेवु शकतेस. एक एक दिवशी डबी वाप रुन टाकायची. आता मला वेळ होत नाही पण मी अगदी हौसेने डब्या वगैरे आणुन ठेवल्यात एक सारख्या.

आलं लसूण मिरची जिरं मीठ घालुन नीट राहते. अर्थात मी डीप फ्रीझ करते त्यामुळे प्रश्न येत नाही. आणि तुला वास जायला नको असेल तर फ्रीझ झालं की तू प्लास्टिक फिल्म लावुन ठेवु शकतेस. माझा नवरा ही कामं करुन देतो. निगुतीने, नीटनेटकेपणाने करायच्या कामांमध्ये त्याचा हातखंडा आहे ..

मुक्त विहारि's picture

5 Mar 2016 - 11:11 am | मुक्त विहारि

४ मोठे चिरलेले कांदे.उभे पातळ काप.

मध्यम आकाराचा लसणीचा गड्डा (सोलून)

२ इंच आले. किसून अथवा बारीच चिरून

२-३ मध्यम आकाराचे टोमॅटो (उभे पातळ काप)

४-५ मिरे

४-५ लवंगा

२-३ हिरव्या मिरच्या

(धने-जिरे-तीळ-खसखस-बडीशोप-शहाजिरे-मसाला वेलची-वेलदोडा-दालचिनी-तमालपत्रे, हवी असेल तर, नसल्यास काही फरक पडत नाही.)

कृती.....

लोखंडी कढईत खालील जिन्नस क्रमाक्रमाने परतून घ्या.बाजूला ठेवू नका.त्यातच टाकत परतत रहा.गॅस मध्यम आंचेवर ठेवा.

१. आले

२. लसूण

३. मिरे

४. लवंगा

५. हिरव्या मिरच्या

६. कांदा (चिरलेल्या कांद्यांपैकी अर्धा कांदा)

७. टोमॅटो (चिरलेल्या टोमॅटोंपैकी अर्धे)

टोंमॅटो शिजत आले की कढई खाली उतरवा.

५-६ मिनिटांनी कढईतल्या उष्ण्तेमुळे टोमॅटो बर्‍यापैकी शिजतात.(नाही शिजले तरी हरकत नाही.पुढच्या स्टेपला शिजतात.)

आता हे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्या.

त्याच लोखंडी कढईत, थोडे तेल तापत ठेवा.तेल तापले की,

कांदा गुलाबीसर परतून घ्या.कांदा गुलाबी झाला की, टोमॅटो परतून घ्या.

टोमॅटो शिजत आला की, वाटण घाला.

हे वाटण शिजले की, गार करून एखाद्या दब्यात भरून फ्रीझर मध्ये ठेवा किंवा एखाद्या घोट्या आइसट्रे मध्ये ठेवा.आइस-ट्रे मध्ये ठेवल्यास ऐनवेळी त्याचे क्युब्स काढायचे.वेळ वाचतो.

हा तयार रस्सा ७-८ दिवस टिकतो.

====================

ऐनवेळी रस्सा करायच्या वेळी फोडणी करून हे क्युब्स (मंद आंचेवर) परतून घ्यायचे.

===========

ह्या तयार रश्श्यात तुम्ही नारळ पण घालू शकता.

===========

ह्याच रश्श्यात तुम्ही साधे वरण घालून, आमटी पण करू शकता.

==============

हा तयार रस्सा जास्तीत-जास्त ३० मिनिटांत तयार होतो.सोमवार ते शनिवार ह्या कामाच्या दिवसांत हमखास कामाला येतो.

=============

माहितगार's picture

5 Mar 2016 - 12:33 pm | माहितगार

क्या बात है!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Mar 2016 - 10:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी

एकसे एक प्रतिसाद.बहुतेक प्रकार मी ही करते असेच.

सप्तरंगी's picture

7 Mar 2016 - 8:44 pm | सप्तरंगी

१अ ) किचन मॅनेजमेंट -स्वैपाकघरात व्यवस्थापन कौशल्याची गरज असते का ? किचन मध्ये वापरलेल्या व्यवस्थापन कौशल्याचे किचनबाहेर काही उपयोग होऊ शकतात का ?

व्यवस्थापन कौशल्याची गरज हि सगळीकडेच असते तशीच ती स्वयंपाकघरातपण १००% असतेच. आणि किचन मध्ये वापरलेल्या व्यवस्थापन कौशल्याचे किचनबाहेर उपयोग हा होतोच, किंबहुना एकूणच व्यवस्थापनाचा उपयोग दैनंदिन जीवनात होतोच कारण नीटनेटकेपण हि एक सवय आणि आवडही असते. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असल्या कि हे नियोजन सोपे जाते, माझ्या दोन obsessive बॉस कडून मी हे घेतले असावे त्यासाठीच रात्री सगळी झाकपाक झाल्यावर hall आणि किचनकडे एकदा नजर टाकायची मला सवय आहे. त्यामुळे सकाळी लगेच काम सुरु करता येते. Reminders, याद्या (cellphone वर) करण्याची सवय मला office मध्येपण उपयोगीच ठरते. ( उलट प्रोब्लेम असा आहे कि कधीकधी मीच मला आणि इतरांना जास्त perfectionist वाटू लागते :)

१ब) ज्यांना किचनचे व्यवस्थापन जमत नाही असे वाटते त्यांना काय काय अडचणी येतात ?

एकतर मला जमते, आवडतेही त्यामुळे नक्की सांगता येणार नाही पण अश्या लोकांचे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही, कुणी जेवायला येणार असेल तर त्यांचा एकतर स्वयंपाक राहिला असतो नाहीतर टेबलच लावलेला नसतो किंवा ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार नसतात. कधीही कुठेही वेळेत पोहोचत नाहीत. deadlines follow करत येत नाहीत. वस्तू जागेवर सापडत नाहीत. एकंदर दात आहेत तर चणे नाहीत , चणे आहेत तर दात नाहीत अशी त्यांची कायमच अवस्था असते.

२) किचनच्या कामांचे आणि वेळेचे तुम्ही पुर्वनियोजन करता का ? तुमचे पुर्वनियजन अॅडहॉक कधीतरी असते का की नियमीत असते ?

पूर्वनियोजन करतेच, म्हणजे आठवड्यातून दोन वेळा फळे, दुध, भाजी वगैरे आणते (आठवडाभरात साधारण काय खाणार आहोत त्यानुसार) आणि महिन्यातून किमान एकदा किरणा आणते. रात्री काही कडधान्य / डोसा साठी भिजवायचे असल्यास भिजवते. break-fast साठी oats+museli सारखे काही भिजवणे, कणिक मळणे, दही लावणे हि कामे रात्री करून किचन दुसर्या दिवशीसाठी सज्ज असते. मी कधीच कांदे, आले-लसुण paste अश्या गोष्टी आधी चिरून ठेवत नाही, पण मसाले: धने पूड, जिरे पूड , गरम मसाला, कोरड्या चटण्या, लोणची घरीच करते. सोया sauce, श्रीरच्चा जे घरी बनवता येत नाही ते किंवा फारसे न लागणारे उदा. पापड-सांडगे-भरली मिरची, विकतचे असते. अन्न उरले तर बर्याचदा दुसर्या दिवशीचा टिफिन रात्रीच pack करून ठेवते. त्याशिवाय बाकी वेळी फ्रेश गरम-गरम फूड खायला preferance असतो.

तुमच्या पुर्वनियोजनात तुमच्या जोडीदाराचा अथवा कुटूंबातील इतर व्यक्तिंचा सहभाग असतो का ?
पुर्वनियोजनात जोडीदाराचा अथवा कुटूंबातील इतर व्यक्तिंचा फारसा सहभाग नसतो. खर तर ते लुडबुड करत नाहीत हा मोठ्ठा सहभाग पण जवळच जावून भाज्या, फळे इत्यादी ते आणतात. आणि कधी-कधी वीकेंड्सला हटके स्वयंपाक पण करतात. बाकी किचन माझ्या हातात ठेवले आहे .

समजा तुम्ही एकटे/ट्या पुर्वनियोजन करत असाल तर तुमच्या पुर्वनियोजनाची कल्पना तुमच्या जोडीदारास आणि कुटूंबीयांना असते का ?
जोडीदारास आणि कुटुंबियांना काय खावेसे वाटते आहे हे मी माहिती करून घेते, त्यामुळे त्यांना पुर्वनियोजनाची थोडीफार कल्पना असतेच.

की तुम्ही कोणतेही पुर्वनियोजन न करता अॅडहॉक पद्धतीने कामे करता ?
weekend ला , खास करून रविवार संध्याकाळ काहीतरी साधेसे खाण्याचा विचार असतो तेंव्हा कोणतेही नियोजन नाही केले तरी चालते. बाकी आठवडा मात्र planning करावे लागते. अर्थात अगदीच वेळ नसेल तर alternatives चा विचार कायमच डोक्यात असतो. उदा. one meals - भातांचे प्रकार, पास्ता, थालीपीठ, वरणफळ , नुडल्स etc. हे सगळे ३० मिनिट्स मध्ये होऊ शकते. आणि हे जिन्नस घरात असतातच. खुपदा आज अमुक एक खायचा मूड आहे / नाही म्हणून अचानक बदल होतात, पण planning हे मुख्यत्वे आपल्याच सोयीसाठी असते. आपल्यासाठी नियोजन , नियोजनासाठी आपण नाही . त्यामुळे अति खेचण्यात / त्याचा उहापोह करण्यात point नसतोच. तेंव्हा आम्ही ती flexibility ठेवतोच.

पुर्वनियोजनात अथवा अॅडहॉक विदाऊट पुर्वनियोजनात तुम्ही कामांच्या प्रिओरायटी कशा ठरवता ? ठरवलेल्या प्रिओरायटी प्रमाणे कामे करता का ?
जेवण, मुलांचे अभ्यास, ऑफिस हे priority मध्ये येतेच. washing machine लावणे, इस्त्री करणे, vaccum करणे (हो हे सगळे घरीच करावे लागते)हि कामे one meal च्या दिवशी करता येतात. शुक्रवारी सकाळी घर बर्यापैकी स्वच्छ केले जाते, त्यामुळे वीकेंड पर्यंत कामे तुंबून राहत नाहीत आणि बाकी आवश्यक गोष्टीसाठी वेळ काढता येतो. साधारणता २-३ वेळा १ मील केल्याने (यात शक्यतो proteins, carbohydrates, vitamins चा विचार करते ) माझी इतर कामे पूर्ण होतात.

३) तुम्ही किचन मधील सामान भरण्याचे व्यवस्थापन करता का असल्यास कसे करता ?
आमच्याकडे काहीही खराब होत नाही, त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डाळी, पीठे , मसाले, oats, रवा, पोहे , मैदा (वापर कमी) घरात असतात. हे बहुतांशी काचेच्या बरण्यांमध्ये आणि काही जास्तीचे जिन्नस plastic च्या डब्ब्यात store करते आणि लागेल तसे महिन्यातून एकदा मागवते.
४) भरलेले सामान आणि चिजवस्तु कुटूंबातील व्यक्तिंना विचारत बसावे लागू नये म्हणून काय व्यवस्था केलेली असते ?

एक तर काचेचे किंवा प्लास्टिक चे डब्बे वापरते, दुसरे म्हणजे हे ठेवण्याचे कप्पे अगदी पद्धतशीरपणे ठेवले आहेत म्हणजे कुणीही येऊन अगदी पुरणाचा स्वैपाक करू शकेल. खालील गोष्टी एका जवळ एक ठेवल्या आहेत, जेणेकरून पदार्थ बनवताना शोधाशोध करावी लागू नये. साधारणता एक पदार्थ बनवायला लागणारे जिन्नस एका कप्प्यात मिळावेत किंवा आज काय बनवायचे आहे हे विचार करताना सोपे जावे.
रवा, पोहे, बेसन, // कडधान्ये // तांदुळ, मुग, तुरडाळ, कणिक // नेहमी लागणाऱ्या बाकी डाळी // तिखट, हळद , जिरे, मोहरी , काळा मसाला // चिंच, खोबरे, गुळ, आक्खी मिरची , कसुरी मेथी.
५) किचन मधील वेळेचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ? वेळा पाळता का ? खासकरुन शाळा आणि ऑफीसच्या वेळा कितपत परफेक्टली पाळता का निघण्याची वेळ झालेली नाही नाही झालचे एवढे खाऊन जा म्हणून उशीर करवता ? -वेळा पाळल्या जाव्यात म्हणून काय टिप्स द्याल- ब्रेकफास्ट केला जातो का वेळत होतो का ?
breakfast १०मिनिटात बनवून आणि १० मिनिटांत खाऊन होईल असाच केला जातो. इडली-डोसा सारखे किंवा अगदी पोहे-उपमा सुद्धा बनवले जात नाहीत. दुध / कॉफी , boiled eggs, ब्रेड (फ्रीझर मध्ये ठेवते) -चीझ , गरम sandwitch, मुसली, oats (बऱ्याचदा oats, fruit, मध, दही, दुध, दही, dry fruits एकत्र करून सर्वांचे वेगवेगळे ग्लास फ्रिज मध्ये ठेवते), कधी फार फार तर आंबोळी-धिरडी सारखे पटकन बनणारे पदार्थ बनवते पण १० मिनिटापेक्षा खरच जास्त वेळ देत नाही. बाकी लोक जे ब्रेकफास्ट ला खातात ते खुपदा आम्ही दुपारच्या जेवणासाठी बनवतो- उपमा, शेवयाचा उपमा (दोन्ही भाज्या टाकून ) तांदळाची उकड, पराठे etc. healthy पण कमी वेळ लागणाऱ्या bf मुळे बाकी गोष्टींना वेळ मिळतो. उशीर झालाच तर कधी कधी जाता जाता हातात ब्रेड / फळ घेवून जातो. किंवा अर्धवट खावून पण !

* ऐसिअक्षरे संस्थळावर एक संबंधीत विषयावर कौलचर्चा सकाळी शुन्य ब्रेकफास्ट + चहा दुपारीच जेवण ही संस्कृती कार्यालयीन कामाच्या लाईफस्टाईलसाठी सयूक्तीक आहे का ? अशी काहीशी वेगळी चर्चा लावली आहे त्यातपण आपण सहभागी होऊ शकता अथवा त्या बद्दल इथे आपली मते व्यक्त करु शकता.
ब्रेकफास्ट किती जरुरी आहे हे मी नव्याने सांगायची गरज आहे का?
६) पदार्थ किती शिजवायचा याचे अंदाज तुम्ही कसे बांधता ? तुमचे अंदाज कितपत बरोबर येतात / उरलेल्या पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ?
पदार्थ किती शिजवायचा प्रत्येकच गृहिणीला माहिती असते. सवयीने जमते. शिजायच्या थोडे आधी gas बंद करते. मी जास्त बनवत नाही, बनलेच तर वाया जाऊ देत नाही, दुसर्या दिवशी पर्यंत संपवते, अगदीच नाही संपले तर तो माझा ब्रेकफास्ट असतो : उदा. १ वाटी राजमा, १ वाटी भाजी, खिचडी वगैरे (घरातले बाकी continental bf च prefer करतात. क्वचित जास्तच उरले तर मी फ्रीझरमध्ये स्टोर करते, हेक्टिक दिवसाची सोय होते.

७) रेफ्रीजरेटर मधील पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ?
फ्रीजला ३ कप्पे + भाजीचा + wijn stand + दरवाज्याचे कप्पे , फ्रीझर-३ कप्पे
सर्वात वर दुध, दही, चीझ. दुसर्या कप्प्यामध्ये अंडी, कोथिम्बिर-पुदिना डब्बा, उरलेले अन्न, तिसऱ्या कप्प्यात पेस्तो, लोणची, sundried tomato आंबोळी packet (जास्त दिवस टिकवायचे असल्या कारणाने) अश्या गोष्टी आणि सर्वात खाली भाज्या असतात. त्यात उजवीकडे आधी संपवायच्या भाज्या आणि डावीकडे नुकत्याच आणलेल्या. हा भज्याचा कप्पा फार भरलेला नसतो कारण इथे पटकन न मिळणाऱ्या बर्याच भाज्यांचे packets, मटार , ओला नारळ, पनीर, चिंच-खजूर चटणी, गार्लिक ब्रेड, हिरवी मिरची, एखादे पराठ्यांच packet , फ्रीझर मध्ये असतात. फ्रीझर मधेही लवकर संपवायचे जिन्नस एका कप्प्यात असतात तर बाकी जास्तीचे दुसर्या कप्प्यात. Ice-cream, पनीर, नारळ, मिरची, चिंच-खजूर चटणी हे फ्रीझर च्या सर्वात खालच्या छोट्या कप्प्यात असते.
दरवाज्याच्या कप्प्यात काही जास्तीचे घरचे मसाले (रस्सम, काळा मसाला), टोमाटो-सोया sauces, salad dressings, essence, वासाबी, श्रीरच्चा, cocktails अश्या गोष्टी !
फ्रीज आतून बाहेरून आठवड्यातून किमान एकदा साफ होतो, defroast करून जमाना झाला. फ्रीझर मात्र २ महिन्यातून एकदा बघते. काही विसरून नको जायला म्हणून.

८) पुर्वनियोजीत पणे असल्यास कौटूंबिक टिमवर्कचे स्वरुप कसे असते ?
ते लोक इतर कामे करतात, vacuum करणे, बाहेरून वस्तू आणणे, dusting पण रोजच्या स्वयंपाकात मी त्यांना अडकवत नाही. उगीच वेळ वाया जातो, त्यापेक्षा १ तासात मी माझा रोजचा स्वैपाक आरामात करते.

९) प्रत्येक गोष्ट जागच्या जागी मिळावी म्हणुन तुम्ही काय मेथडॉलॉजी वापरता ?

प्रत्येक गोष्टीला ठराविक जागा दिली आहे त्या जागेवरच आम्ही ती ठेवतो. (घरातले लोक जागेवर ठेवावे लागते म्हणून वस्तु उचलतही नाहीत :)कात्री सारख्या गोष्टी हरवतात म्हणुन किचन / बाथरूम / शिवणकाम / स्टेशनरी यांची वेगवेगळी आहे. एखादी वस्तू दुसर्या मजल्यावरून खाली आणलीच तर नंतर जिन्यात ठेवतो, जो वर जाईल त्याने घेऊन जायचे ते !
१०) समजा की तुम्ही नौकरी करता अथवा तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यावयाचा आहे किंवा बाहेरची कामे करावयाची आहेत तर किचन कामे चटकन /वेगाने आटपली जावीत म्हणून तुम्ही काय करता ?
बाहेरून भरपूर तेल घातलेले पदार्थ मागवण्यापेक्षा -1 meal -गरमागरम खिचडी our all time favorite - सर्वोत्तम पर्याय - ( nutritious असावी म्हणून मी हिरवे मुग, कमी तांदुळ- जास्त डाळ, पालक, भाज्या टाकून, पुदिना टाकून असे विविध पर्याय वापरते) , बाकी काहीही काम करत नाही

अजून काही राहिलेले, न विचारलेले :
बाहेरून फारसे जेवण मागवत नाही, टिन फुड, additives , preservatives शक्यतो avoid करतो. जे बनवता येत नाही ते सर्व sauces मात्र विकतचे मागवते.
जे घरी बनवता येते ते बाहेर जाऊन खायला आवडत नाही , बाहेर जेवण्याचा उद्देश oily / चमचमीत खाण्यापेक्षा चांगली कंपनी आणि वैविध्यपूर्ण जेवण हाच असतो.
रोजचे जेवण सहसा colourful असते, एकाच कलर चे पिवळे -पिवळे तर अजिबात नसते.
वेगवेगळी तेल - sunflower , शेंगदाणा, rice ब्रान, olive oil वापरते.
आठवड्यातून एकदा तरी नवीन पदार्थ बनवून पाहते, आठवड्यातून एक-दोनदा तरी non-इंडिअन पदार्थ बनवते.
नॉन-व्हेज चा वापर कमी असल्यामुळे अंडी (प्रोटीन साठी) तरी वापरतेच वापरते .
हिरव्या भाज्या कमी मिळत असल्यामुळे पालक, पुदिना, सलाड, कसुरी मेथी जास्त वापरते.
ब्रोकोली, ब्रुसेल्स sprouts, झुक्कीनी अश्या भाज्यांची आपल्या पद्धतीने भाजी बनवते.
कोणत्याही भाजीत काहीही मिक्स करून प्रयोग , लोकांच्या नकळत त्यांचा गिनिपिग , करते.
स्वच्छतेला, टापटिपेला जरा जास्तच महत्व, पण काम करायची आवड असली तर हे सगळे सोपे वाटू लागते. इथे हाताखाली बाई नाही, सतत लक्षात ठेऊन काम करावे लागते . कधीतरी वाईट वाटते पण त्यामुळेच कुणावर अवलंबून न राहायची आणि सगळे करायची सवय लागली. (मग मुलांना शिक्षा करायची असेल तरी एखादे काम सांगून देते. स्वत: आराम करते ) . लाईट जाणे, अचानक कुणीतरी येणे हे सहसा होत नाही त्यामुळेही हे शक्य होते.