अविस्मरणीय ग्रीस - सँटोरीनी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

अनाहिता-भटकंती विशेषांकाची घोषणा झाली आणि कुठल्या विषयावर लिखाण करायचे याचा विचार सुरु झाला आणि मग लख्खं आठवले की आपण मिपावर सुरु केलेल्या ग्रीस लेखमालेचा शेवटचा भाग लिहिलेला नाहीये... .काही कारणास्तव त्यावर लिखाण असे करायला जमत नव्हतेच, ग्रीस लेखमाला अपूर्ण राहिली याची रुख्ररुख मनाला लागून राहीली होती पण भटकंती विशेषांक येणार असे कळल्यावर हुरुप वाढला आणि ही लेखमाला पूर्ण करायची असे ठरवूनच लेखणी आपलं ते कळफलक हातात घेतला आणि पुन्हा त्या रम्य आठवणीत रमून गेले :)

अविस्मरणीय ग्रीस सफरीचे आधीचे भाग-

अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना, भाग १ - अथेन्स, भाग २ - अथेन्स, भाग ३ - नॅक्सोस

तर नॅक्सोसहून साडे बाराला आमची सँटोरीनीची बोट निघाली आणि आम्ही नॅक्सोसला टाटा करत निघालो....

सँटोरीनी - दिवस पहिला

अडीच तासांचा प्रवास होता, त्यामुळे सँटोरीनीला पोहोचेपर्यंत तीन वाजणार होतेच म्हणून मग बोटीतच जेवण केले. बोट चालत होती आणि सोबतीला एगियन समुद्राची साथ होती. समुद्राचा निळाभोर रंग बघून डोळे सुखावले होते अगदी. दूर दिसणार्‍या इतर बोटी, निळेशार पाणी बघून मन उत्साही झाले. सँटोरीनी!! कधी स्वप्नातसुद्धा आपण इथे जाऊ शकू असे वाटले नव्हते, बर्‍याच सिनेमांमध्ये बघितलेले सँटोरीनी, ती सागर निळाई, टेकडीच्या कडेने असलेली पांढरी-निळी घरे, निळसर घुमट असलेले चर्च, मोठ-मोठाले हॉटेल्स, अगदी मोहक, अद्भुतरम्य पोस्टकार्डच जणू! त्यासुंदर देखाव्याने मनाला भुरळ घातली होती आणि आज प्रत्यक्षात आपण तिथे जात आहोत, हे सर्व बघणार आहोत, अनुभवणार आहोत या कल्पनेनेच मी हुरळून गेले होते.

एगियन समुद्राचे क्षेत्रफळ ८३,००० स्क्वे.मी आहे. एगियन समुद्रात हजारो बेटं पसरलेली आहेत, पूर्वी याला द्वीपसमूह असे म्हटले जाई कारण येथे समुद्रातून वर आलेले अनेक भूभाग किंवा बेटं आहेत. ही ग्रीक-एगियन बेटं सात भागात विभागलेले आहेत:

१. नॉर्थईस्टन एगियन आयलंड्स
२. Euboea
३. नॉर्थन स्पोरेड्स
४. सायक्लेड्स
५. सेरॉनिक आयलंड्स
६. Dodecanese
७. क्रेत

(माहिती विकिपिडियावरुन साभार - Reference https://en.wikipedia.org/wiki/Aegean_Sea)

काहीवेळातच घोषणा झाली आणि आम्ही प्रवासी आप-आपले सामान घेऊन उभे राहिलो. आमची फेरी किनार्‍याला लागताच फेरीचे दार उघडले आणि ही लोटच्या लोट गर्दी हळू-हळू बाहेर पडू लागली. सँटोरीनी हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे तौबा गर्दी होती तिथे. आम्ही रांगेत सामान घेऊन चालत होतो, काही मिनिटातचं आम्ही फेरीच्या बाहेर पडलो आणि जवळच एका आडोश्याला उभे राहिलो. आमच्या समोर होता बस थांबा आणि तिथे ही पर्यटकांची भली मोठी रांग दिसत होती. आम्ही सँटोरीनी फिरण्यासाठी आधीच गाडी बुक केली होती. मित्राकडे नेदरलँडचा परवाना होता शिवाय त्याला लेफ्ट-हँड ड्राईव्हिंगची सवय होतीच त्यामुळे गाडी बुक करुन फिरणं सोयीचे होणार होते. आम्ही टुअरला निघण्याआधीच बुकिंग केले असल्यामुळे सँटोरीनीला पोहोचताच काही मिनिटातच गाडीवाला सर्व कागदपत्रे आणि गाडी घेऊन हजर झाला. सगळे सोपस्कार पार पाडून, गाडीत सामान टाकून, सॅटनॅव्ह लावून व्हिलाच्या दिशेने, मेसारियाला निघालो.

क्रेतच्या उत्तरेस, १२० किलोमिटरावर, एगियन समुद्राच्या दक्षिणेस असलेल्या सायक्लेड्समधले, चंद्रकोर द्वीपसमूहातील सँटोरीनी हे सर्वात मोठे बेट आहे. या द्वीपसमूहाला सँटोरीनी कॅलडेरा असे म्हणतात. सुमारे ४००० वर्षांपूर्वी स्त्राँजिली नावाचे गोलाकार बेट एगीयन समुद्रात होते. पुरातत्वशास्त्रानुसार ताम्रयुगात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात या अखंड बेटाची चार भागात विभागणी झाली सँटोरीनी, थेरासिया, निया कामेनि, पालेया कामेनि तसेच कॅलडेरा परिघाच्या बाहेरील बाजूस असलेले Aspronisi ही या द्वीपसमूहाचा छोटासा भाग आहे. त्यातील सँटोरीनी आणि थेरासियावर मनुष्यवस्ती आहे तर निया कामेनि आणि पालेया कामेनि निर्जन आहे. सँटोरीनीला स्थानिक भाषेत थेरा किंवा थिरा म्हटले जाते आणि सँटोरीनीच्या राजधानीचे नाव फिरा ही त्यावरूनच पडले.

.

* छायाचित्र आंतरजालावरुन साभार- Reference Site - www.santorinigreece.net.gif)

व्हिलाला पोहोचताच चेक-इन करुन रुममध्ये सामान टाकले, थोडे फ्रेश झालो, नाही म्हटले तरी वातावरणातला बदल जाणवत होताच. व्हिलाच्या स्टाफने आम्हाला चहा-कॉफी की फ्रेश ज्युस हवे ते विचारले आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आवडीनुसार पेयपान आणून दिले. सोबत असलेले घारगे, मुगाचे लाडू खाऊन आम्ही तयार झालो आणि निघालो इयाला फेरफटका मारायला आणि तिथला सुप्रसिद्ध सूर्यास्त बघायला.

इया हे सँटोरीनीच्या वायव्य दिशेला वसलेले सुंदर, नयनरम्य गाव आहे. इथला सूर्यास्त जगातला सर्वात सुंदर सूर्यास्त आहे असे म्हटले जाते आणि ते खरं ही आहेच. इया हे छोटेसे गाव आहे जिथे अरूंद रस्ते, निळ्या रंगाचे घुमट असलेली चर्च, पांढरी-पेस्टल रंगाची आकर्षक घरे, त्यांची सुर्यप्रकाशात न्हालेली ओसरी, कॅफेज, टॅव्हर्न्स आणि सगळ्यात व्यस्त असा पादचारी रस्ता जिथे अनेक दुकाने आहेत. इथे पर्यटकांची ये-जा सतत सुरु असते. इयाला पोहोचताच कार पार्क शोधणे आणि त्यातही पार्किंगसाठी जागा मिळवणे अवघड काम आहे. सुदैवाने आम्हाला एक जागा पटकन मिळून गेल्यामुळे फार शोधाशोध करावी लागली नाही पण तिथून वर चढत जायचे अंतर तसे बरेच होते. गाडी पार्क करुन आम्ही चालत निघालो. अरुंद, कॉबलस्टोन आणि दोन्ही बाजूंनी दुकाने असलेल्या पायर्‍यांवरुन आम्ही चढाई करायला सुरूवात केली, जसे जसे चढत होतो तसे तसे त्या जागेच्या प्रेमात पडत गेलो, शब्दात वर्णन करता येणार नाही इतके अप्रतिम सौंदर्य आहे इयाचे. मैत्रीण त्यावेळी गरोदर होती म्हणून हळू-हळू चढाई करत, वाटेत थोडे फोटो काढत आम्ही वर पोहोचलो. पांढर्‍या शुभ्र भिंती, जीने, गडद निळ्या रंगाचे दरवाजे, खिडक्या सगळेच आकर्षक दिसत होते.

* इयाला जाताना वाटेत काढलेले काही फोटोज

.

.

.

.

.

.

.

सूर्यास्त व्यवस्थित बघता यावा, फोटो काढता यावे म्हणून आम्ही जागा शोधत होतो. बर्‍याच पर्यटकांनी सूर्यास्त बघण्यासाठी मोक्याची जागा आधीच पकडून ठेवली होती. इयावर असलेल्या व्हेनेशियन किल्ल्याचे काही अवशेष आहेत त्यावरही लोकं चढून बसली होती. इयाचा सूर्यास्त बघण्यासाठी खास सनसेट क्रुझही निघतात. जवळच असलेल्या एका ओपन रेस्तराँच्या मागच्या बाजूस एक दगडी आवार होते त्यावर जागा पकडून आम्ही बसलो होतो. हळू-हळू अनेक पर्यटक आमच्या बाजूला येऊन बसले, कुणी कॅमेरा, कुणी मोबाईल हातात घेऊन सुर्यास्त टिपण्यासाठी सज्ज झाले. आता सुर्याचे तेज सर्वत्र पसरले होते, त्याच्या सोनेरी किरणांनी सगळे लख्ख चमकत होते. क्षणात समुद्राचे पाणी शंभर नंबरी सोन्यासारखे झळाळून गेले. हळू-हळू सूर्य अस्ताला जात होता, तो भव्य सोहळा बघून मंत्रमुग्ध व्हायला झाले अक्षऱशः. सूर्य मावळताना क्षितीजावर केशरी, पिवळी, गुलाबी रंगांची उधळण होत होती, हलके सोनेरी-गुलाबी सूर्यकिरणांनी तिथली पवनचक्की, पांढरी शुभ्र घरे व्यापून टाकले होते.

.

.

.

निसर्गमातेचे हे भावपूर्ण सौंदर्य, तो रूबाब बघून थक्क व्हायला झाले. सूर्याचे फोटो जमेल तेवढे काढत होतेच पण शेवटी तो कॅमेरा बाजूला सारला आणि ते जादूई क्षण भरभरून अनुभवले, जमेल तितक्या त्या सोनेरी क्षणांची आठवण जमा करत होते. सूर्य जेव्हा मावळला तेव्हा आकाशात पसरलेले विविध रंग बघून शांत वाटले आणि कुसुमाग्रंजाच्या कवितेच्या ओळी आपसूकच ओठी आल्या, "प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी". नॅक्सोसमधल्या सूर्यदेवाचे रूप बघताना असा सूर्यास्त याआधी कधीच अनुभवला नव्हता असे वाटून गेले होते पण इयाचा सूर्यास्त बघितला आणि जाणवले हा अनुभव तर अ फा ट आहे!! शब्द अपुरे पडतील इतके भारावून जायला होतं, कॅमेर्‍यात कितीही ते क्षण साठवण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक्षात ते अनुभवणं कैकपटीने सरसचं ठरले. सूर्याची ती मोहकता, ती साजिरी प्रतिमा तुम्ही कायम मनात जतन करून ठेवाल :)

* सूर्यास्ताचे काही टिपलेले फोटोज

.

.

.

.

.

* व्हेनेशियन किल्ल्याचे अवशेष आणि चमचमणारे इया

.

.

हळू-हळू अंधार पडू लागला, काही फोटो काढत, चमचमणारे इया बघत, थोडी खरेदी करत आम्ही खाली उतरलो. भूक ही लागली होती म्हणून एका ग्रीक टॅव्हर्नमधून ग्रीक जेवण घेतले आणि कार पार्कपाशी जायला निघालो. आज आवरून लवकर झोपायचे होते, उद्या ओल्ड पोर्ट ऑफ फिरावरुन बोट पकडून टुअर ऑफ कॅलडेरा करायची होती. व्हिलावर येऊन जेवलो व आजच्या सूर्यास्ताच्या मनमोहक रुपाने भारावलेले आम्ही त्या सोनेरी विचारातच झोपी गेलो :)

****************************************************************************************

सँटोरीनी - दिवस दुसरा

सकाळी लवकर उठून आवरले. व्हिलाच्या स्टाफने रुममध्येच ब्रेकफास्ट आणून दिला होता. मैत्रीणीची खोली शेजारीच असल्यामुळे तिच्या खोलीतच एकत्र जमलो आणि हेव्ही ब्रेकफास्ट केला. आवरून आम्ही फिराला पोहोचलो, तिथून खाली ओल्ड पोर्ट ऑफ फिराला जाण्यासाठी तीन पर्याय आहेत एक चालत (उतरत), केबल-कार आणि गाढवावरुन ;) हो सँटोरीनीमध्ये गाढवांचा वापर ओझी वाहण्यासाठी, पर्यटकांना चढाई करण्यासाठी होतो. पायी जाणे आम्हाला शक्य असले तरी मैत्रीण गरोदर होती आणि जवळ-जवळ ५७०+ पायर्‍या उतरणे तिला जमले नसते, गाढवावर बसून धिंड आपलं ते वरात आपलं ते टेकडी चढ-उतर करायची हौस आमच्यापैकी कोणालाच नव्हती त्यामुळे केबल-कारचा पर्याय सगळ्यात सोयीस्कर होता. केबल-कारचे तिकिट काढून आम्ही खाली बंदरावर जायला निघालो, वरुन दिसणारा निळा समुद्र आणि पांढर्‍या बोटी लक्ष वेधून घेत होते. खाली येताच नवरा व मित्र एक्सकर्शन टुअर्सवाल्यांकडे जाऊन टुअर ऑफ कॅलडेरा ची तिकिटं काढून घेऊन आले. एकूणचं साडेपाच तासाची टुअर होती ज्यात निया कामेनी (ज्वालामुखी विवर )--->पालेया कामेनी(हॉट स्प्रिंग्स)--->थेरासिया(लंचब्रेक)--->इया पोर्ट--->ओल्ड पोर्ट ऑफ फिरा अशी टुअर असणार होती.

.

.

.

काहीवेळातच आमची बोट लागली आणि आम्ही प्रथम निया कामेनी बघायला निघालो. बेटाच्या किनार्‍यावर अनेक पर्यटकांच्या बोटी लागल्या होत्या. काळ्या रंगाचे दगड, बोल्डर्स दिसत होते. ग्रीसला असेच उन्हाचे चटके बसत त्यामुळे सनस्क्रीन लावून, गॉगल, छत्री, पाण्याची बाटली घेऊनचं आम्ही बाहेर पडत असू (दे व्हिल बी युअर लाईफसेव्हर्स) पण ज्या क्षणी निया कामेनीवर पाय ठेवला प्रामाणिकपणे सांगते सूर्य आग ओकतोय या वाक्याचा अर्थ तंतोतंत समजला. उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता, त्वचा रापली होती. आम्ही इतक्या दिवसात जितके टॅन झालो नव्हतो तितके टॅन निया कामेनीवर येऊन झालो, रुक्ष, रणरणतं उन, सूर्य तळपत होता अगदी.

निया कामेनी बेट १३० मी.उंच, २ किलोमीटर व्यासाचे ज्वालामुखी विवर आहे. ताम्रयुगात झालेल्या ज्वालामुखीच्या महाभीषण उद्रेकात त्यावेळचे थेरा आणि आक्रोतिरी वसाहतीची नासधूस झाली होती. इथे मनुष्यवस्ती नाही पण रोज हजोरो पर्यटक हे विवर बघायला येत असतात. थोडी चढाई करुन उंचावर पोहोचायचे होते. तशी चढाई फार नाही पण डळमळीत, अस्थिर भूभाग असल्यामुळे वॉकिंग शूज असले तर चालणे सुसहय होईल हे आवर्जून सांगावेसे वाटते.

* फिरावरुन दिसणारे निया कामेनी आणि तिथली चढाई करताना काढलेले काही फोटोज

.

.

.

.

.

ओसाड, खडकाळ, वळणा-वळणाच्या, रखरखीत रस्त्यावरुन चालत असताना असे वाटून गेले की आपण चंद्रावरच चालत आहोत. चहूबाजूंनी लाव्हारसाचे तयार झालेले फत्तर, लहान-लहान विखुरलेली खडी आहेत. असे म्हणतात की हा ज्वालामुखी आजही सक्रिय(अ‍ॅक्टिव्ह) आहे. गेल्या हजारो वर्षात अकरा वेळा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असल्याची नोंद आहे, शेवटचा उद्रेक १९५० मध्ये झाला होता. इथे बर्‍याच ठिकाणी सल्फरचे वायुमार्ग आहेत. आमच्या गाईडने अशाच एका वायुमार्गातून वाफ बाहेर येताना दाखवली, फोटोत ती टिपणं शक्य झाले नाही तरी वायुमार्गाचा फोटो देतेय. इथे आमच्यासोबत असलेले बरेच पर्यटक हात ठेवून वाफेची उब अनुभवत होते. वरती ISMOSAV ( Institute for the Study and Monitoring of the Santorini Volcano )च्या शात्रज्ञांनी त्यांच्या निरिक्षणासाठी ठेवलेली उपकरणं आपल्याला बघायला मिळतात. आमचा गाईड सांगत होता १९५० साली झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक त्याकाळी काही शाळकरी मुलांनी पाहिला होता. निया कामेनीवर अनेक मानवनिर्मित दगडांचे मनोरे रचून ठेवलेले दिसतात असे करण्यामागचे कारण माहित नाही कदाचित पर्यटकांनी कधीतरी हे केले असावे. संपूर्ण चढाई केल्यावर वार्‍याची उष्ण झुळुक त्या असह्य उकाड्यात तरतरी आणून गेली आणि समोर असलेले निसर्गाचे अद्भुत दृश्य बघून मन सुखावले. निया कामेनीवरुन दिसणारा पालेया कामेनी त्यामागे असलेले Aspronisi बेट, तर एकीकडे थेरासिया, एकीकडे इया, कुठे गडद निळे तर कुठे टर्क्वॉइज़ रंगाचे पाणी, पांढर्‍या बोटी, काळे-कुट्ट पाषाण तर फिके-निळे आकाश, आय मस्ट से, नो ट्रिप टू सँटॉरीनी इज कंप्लिट विदाऊट अ ट्रिप टू दी निया कामेनी! साधारण दीड-पावणे दोन तासात आम्ही संपूर्ण निया कामेनी बघून खाली उतरण्यास सुरूवात केली. पुढचा स्टॉप होता पालेया कामेनी.

* वायुमार्गाचा फोटो

.

* उपकरणं

.

* ज्वालामुखी विवर

.

* दगडी मनोरे

.

.

* निया कामेनीवरून दिसणारे Aspronisi

.

* निया कामेनीवरून दिसणारे पालेया कामेनी आणि Aspronisi

.

पालेया कामेनी येथे हॉट स्प्रिंग्स आहे. तिथे (Sulphuric) गंधकयुक्त, गरम /ऊन पाणी आहे जे रोगनिवारक मानले जाते. या पाण्याचा रंग तपकिरी आहे. पालेया कामेनीजवळ Agios Nikolaos या कोव्हमध्ये नांगर सोडले जाते आणि तिथून मग पर्यटक पालेया कामेनीच्या हॉट स्प्रिंग्जमध्ये पोहण्यासाठी उतरतात. आमच्याआधी अजून एक बोट आली होती, त्यातील प्रवासी ही पटापटा पाण्यात उतरून हॉट स्प्रिंग्सजवळ पोहत जाऊ लागले. आमची बोट किनार्‍याजवळ येताच बोटीतले लोकं चटकन स्वीमवेअर घालून पाण्यात डाईव्ह करु लागली, मैत्रीण सोडून आम्ही तिघेही उतरलो. साधारण ३० मिनिटे बोट थांबते या ठिकाणी, शिवाय पोहून आल्यावर बोटीत चेंज करण्यासाठी चेंजींग रुम्सची सोय आहे. या पाण्याचे तापमान ३०-३५ डिग्री असतं पण समुद्राचे पाणी यात मिक्स होत असल्याने खरंतर हॉट स्प्रिंग्ज नाही म्हणता येणार "वॉर्म स्प्रिंग्ज" म्हणता येईल. इथे जाणवलेल्या महाभयंकर उकाड्यात हॉट स्प्रिंग्जमध्ये पोहून छान ताजेतवाने वाटले. हॉट स्प्रिंग्जच्या पायथ्याशी ग्रीक सेंट.निकोलस ऑर्थोडॉक्स चॅपल आहे. सगळे प्रवासी पोहून पुन्हा बोटीत आल्यावर आमची बोट निघाली थेरासिया बेटावर लंच ब्रेक घ्यायला.

* पालेया कामेनीचे काही फोटोज

.

.

.

* सेंट.निकोलस ऑर्थोडॉक्स चॅपल

.

* पालेया कामेनी- सुखद निळाई आणि तेथून दिसणारे थेरासिया

.

वाटेत दिसणारे थेरासिया इयाप्रमाणेच सुंदर दिसत होते, नागमोडी पायर्‍या, पांढर्‍या रंगाची हॉटेल्स, कॉर्फोसचे पारदर्शक पाणी आणि अगदी किनार्‍यालगत असलेली काही रेस्तराँ/टॅव्हर्न्स. आमची बोट लागली बंदराला तसे सगळे पर्यटक खाली उतरले. गाईड म्हणाला इथे दोन तासाचा ब्रेक आहे लंचसाठी इथल्या लोकल टॅव्हर्न्समध्ये जेवू शकता किंवा कोणाला डाँकी-राईड घेऊन वर मनोलास गावात फिरायचे असल्यास जाऊन येता येईल. आम्ही लंच ब्रेक घ्यायचा ठरवले आणि कॅप्टन जॉन रेस्तराँमध्ये जेवायला गेलो. इथे विविध प्रकारचे सी-फूड्स होते पण त्यात जास्तं करुन स्क्विड्स, ऑक्टोपस असल्यामुळे आम्ही मीटकडेच मोर्चा वळवला. आताशी भूक खूप लागली होती आणि पोहून आल्यामुळे, उन्हामुळे थकवा ही जाणवत होताच. पुरूषांनी ग्रीक मिथॉस बिअर आणि मी सँटो वाईन (सँटोरीनीला गेला तर तिथली वाईन प्याच) आणि सोबत ग्रीक सागानाकी चीझ (पॅन फराईड चीझ) अशी ऑर्डर केली. थोड्या वेळातच आमच्या ऑर्डर केलेल्या जेवणाच्या डिशेस आल्या कॉर्न-पीज राईस, चिकन कबाब, टोमॅटो पास्ता आणि ऑलिव्ह ऑईल + ब्रेड. रेस्तराँच्या थंडगार सावलीत शांत वाटत होतं, बाजूलाच समुद्राचे निळे पाणी, एखाद-दुसरी रिकामी बोट बांधून ठेवलेली आणि हलका-हलका वारा. जेवणं आटोपून तिथेच थोडा आराम केला, किनार्‍यावर फिरलो, तिथे लोकं पाण्यात माश्यांना ब्रेडचे तुकडे खायला देत होती, ते अन्न मिळवण्यासाठी छोटे-छोटे मासे अगदी लगबगीने यायचे तेव्हा पाण्यात माश्यांच्या हालचालींमुळे छान तरंग तयार होत, एक-दोन दुकानं होती तेथे डोकावून आलो. काही लोकं पाण्यात पोहत होते काही भटकत होते तर काही बिअर घेऊन बसले होते.

* थेरासिया बंदरावर काढलेले फोटोज

.

.

.

.

.

.

थोड्यावेळात निघायची वेळ झाली तसे सर्व सह-प्रवासी बंदरावर येऊ लागले. आमची बोट निघाली होती इयाला. इयाला सूर्यास्त बघायला उतरणारे काही प्रवासी होते त्यांना उतरवून आमची बोट ओल्ड पोर्ट ऑफ फिराला येणार होती. इया जवळ पोहोचताच प्रवासी उतरले काही पायी चालत गेले तर काहींनी डाँकी राईड घेतली. फिरून आम्ही फिराच्या पोर्टवर आलो, एक संपूर्ण दिवस मजेत घालवला होता आम्ही.

* फिरा

.

.

उतरून केबल-कारने दोन मिनिटांत वर पोहोचलो. वर येताच ऑलिव्ह ऑईल आणि स्मरणवस्तू विकत घेण्यासाठी आम्ही दुकानं फिरत रहिलो. मध्येच फ्रुट सॅलॅडचा स्टॉल दिसला मग फ्रेश फ्रुट सॅलॅड खात, फेर-फटाका मारत कार पार्काकडे गेलो. रात्रीचे जेवण व्हिलात होणार होते त्यामुळे थेट व्हिला गाठले. फ्रेश झालो, फक्कडसा चहा घेतला आणि व्हिलाच्या मोठ्या बाल्कनीत गप्पा मारत बसलो. त्या रात्री व्हिलामधून दिसणारा चंद्रही सुंदर दिसत होता आणि लगेच जाणवले, सँटोरीनीमधला अजून एक दिवस संपला.....

.

.

****************************************************************************************

सँटोरीनी: दिवस तिसरा

आज सँटोरीनीमधला शेवटचा दिवस, सकाळी उठून भरभर आवरले, नाश्ता करुन आम्ही इयाला निघालो, काय करणार इयाच्या प्रेमातच पडलो होतो ;) इयाला प्रथम आलो ते सूर्यास्त बघायला, आज दिवसा-उजेडी तिथून निघण्यापूर्वी एकद इया-दर्शन घ्यायचे होते शिवाय इयाच्या पांढर्‍या-निळ्या पार्श्वभूमीवर हौसेने सोबत आणलेले पांढरे-निळे कपडे घालून फोटो काढायचे होते =))

तर आजचा प्लॅन होता इया, तिथून आक्रोतिरीचा रेड बीच, पेरीसा ब्लॅक बीच आणि कामारी बीच बघण्याचा. त्याप्रमाणे आम्ही निघालो. इयाला पोहोचलो तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि दुतर्फी दुकाने ही उघडत होती. पटपट पायर्‍या चढून जमेल तिथे, मोक्याची जागा बघून आम्ही चौघे फोटो काढत होतो. इयाच्या खाली बंदरावर जाणार्‍या नागमोडी पायर्‍या, नीलवर्णी समुद्र, पायर्‍या उतराताना दिसणारी गाढवं आणि कडे-कडेला असलेली पंचतारांकित हॉटेल्स, घरे हे सर्व कॅमेर्‍यात टिपले. सँटोरीनीमध्ये ठिक-ठिकणी गाढवं दिसतात, अगदी दया येते त्यांना बघून पर्यटकांना बंदरावर ने-आण करणे, माल-ओझी वाहून नेणे, ते बिचारे आपले काम अगदी चोख करत असतात.

* इयाचे फोटोज

.

.

.

.

.

.

.

.

.

इयाच्या त्या सुंदर देखाव्याचे अनेक फोटो काढून झाले. तिथून निघताताना येता-जाता बघून ठेवलेली, सँटोरीनी लिहलेली, बुटाच्या आकाराची क्रॉस-बॉडी बॅग तिथली आठवण म्हणून मी घेतली. गाडी काढून आम्ही निघालो आक्रोतिरीला, तिथला रेड बीच बघण्याकरीता. आक्रोतिरी हे दुसर्‍या सहस्रकाच्या मध्यात झालेल्या थेरा ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या राखेत पुरले गेलेले शहर होते. १८९५-१९०० च्या काळात भूस्तरशास्त्रवेत्त्यांनी या जागी उत्तखनन केले. आजही मेसा व्युओनोच्या उंचावर पुरातन थेराचे काही भग्नावषेश आपल्याला बघायला मिळतात, तसेच काही पुरावशेष तिथल्या संग्रहायलायात बघायला मिळतात.

* मेसा व्युओनोच्या उंचावर पुरातन थेरा

.

रेड बीच हा आक्रोतिरीच्या पुरातन स्थळापासून काही अंतरावर असलेला छोटा बीच आहे. इथे जाण्यासाठी तुम्ही फिराहून बस घेऊ शकता, तिथेच आक्रोतिरीचे प्रसिद्ध संग्रहालय आहे, आम्ही तिथे गेलो नाही. कार पार्क करुन चालत आम्ही निघालो रेड बीच बघायला, रेड बीचला जाण्यासाठीची पाऊलवाट खडबडीत आहे तसेच थोडे चढून वर जावे लागते. आम्ही पाऊलवाटेने जात असताना अगदी टेकडीच्या (खरंतर टेकडी नाही म्हणता येणार जराशा उंचवट भागाच्या) पायथ्याशी मकेवाला बसला होता. आम्ही जवळ पोहोचताच इंडियन असे त्याने विचारले, आम्ही हो म्हणताच नामास्ते, बुठा काओगे? असे विचारले, आम्हाला मौज वाटली, त्याला म्हटले बीच वरुन येताना घेऊ :) वर चढताच दिसतं निळे-हिरवे कोव्ह आणि उंच उंच लाल मातीच्या कडा. बीचला जाण्यासाठी त्याच रस्त्याने पुढे-पुढे चालत जाऊन थोडे खाली उतरावे लागते. आजू-बाजूला मोठमोठाल्या लाल रंगाच्या शिळा आहेत आणि कच्चा रस्ता आहे. खाली उतरताच बरेच पर्यटक टॉवेल अंथरून त्यावर उन्हं घेत बसलेली दिसतात. या बीचवर प्रसाधनगृहे, डेक चेअर्स नाहीत, इथे पायी खडबडीत वाटेने जाता येतं तसेच आक्रोतिरी बंदरावरून सुटणार्‍या बोटीतूनही जाता येत. इथल्या किनार्‍यावर वाळू नसून लालसर - काळसर रंगाचे खडे आहेत, तसेच पाणी स्वच्छ व पारदर्शक आहे. इथल्या बीचवर थोडा वेळा टाईमपास करुन आम्ही परत यायला निघालो, वाटेत एक स्थानिक माणूस अगदी रममाण होऊन व्हॉयलिन वाजवत होता, न रहावून त्याचा फोटो काढला. खाली उतरल्यावर सांगितल्याप्रमाणे भाजलेले मके घेतले व कार पार्ककडे प्रयाण केले.

* रेड बीचचे फोटोज

.

.

.

.

.

राजधानी फिराच्या आग्नेयाला पेरीसा बीच आहे. या बीचच्या किनार्‍यावर वाळू अशी नाहीच, संपूर्ण किनारा काळ्या गोट्यांचा, खड्यांचा आहे. किनार्‍यावर अनेक डेक-चेअर्स आणि पॅरासोल्स आहेत, गोरे पर्यटक समुद्रात पोहून त्या डेक चेअरवर येऊन विसावत. हजारो पर्यटक या समुद्रकिनार्‍याला भेट देत असतात ते इथल्या काळ्या खड्यांचा किनारा पहाण्यासाठी, स्फटिकासारखे स्वच्छ निळे पाणी बघण्यासाठी. Pofitis IIias / एलिजाह डोंगराच्या दक्षिणेला असलेला हा बीच तसा कमी गडबडीचा आहे. याच डोंगराला मेसा व्युओनो असे ही म्हटले जाते आणि पुरातन थेरा बघायला इथून जाता येतं. या समुद्रकिनार्‍यालगत अनेक रेस्तराँ, कॅफेज, पिझ्झा शॅक्स आहेत आणि इथे डेक चेअर्स पण ४ युरोला उपलब्ध असतात. तुम्ही चेअर घेतल्यावर कॅफेची माणसे तुमची खाण्या-पिण्याची ऑर्डर घ्याला येतात. आम्हाला रात्रीचा प्रवास करायचा होता त्यामुळे बीचवर येऊन पोहण्याच्या आम्हा मुलींचा विचार नव्हता फक्त विश्रांती घ्यायची होती. पिझ्झाची ऑर्डर देऊन मुलं पोहायला गेली. आम्ही निवांत पडून समुद्राच्या लाटा उसळताना बघत होतो, त्या पॅरसोलच्या शीतल छायेत, ती समुद्राची निळाई डोळ्यांना सुखावणारी होती. बीचवर कुठे मसाज करणार्‍या मुली आपले किट घेऊन फिरत होत्या, कुणी मालिश करवून घेत होतं कुणी पुस्तक वाचत बसले होते तर कुणी सनबाथ घेत होते. उन्हाची झळ बसत होती, अगदी चटके बसणारी. अशा कडक उन्हात काळ्या खडेवाल्या किनार्‍यावर अनवाणी चालूच शकत नाही, पायाचे तळवे भाजतात अक्षरशः.

* पेरीसा बीच्चे फोटोज

.

* मेसा व्युओनो

.

.

.

तिथूनच जवळ म्हणजे कामारी बीच आहे. Pofitis IIias / एलिजाह डोंगराच्या उत्तरेस हा बीच आहे. याचा ही किनारा पेरीसा बीचप्रमाणेच काळ्या गोट्यांचा आहे पण इथे उन्हाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. या समुद्रकिनार्‍यावर अनेक जलक्रीडा होत असतात. इकडचे नाईट-लाईफ ही प्रेक्षणीय आहे. प्राचीन थेराला इथूनही जाता येतं. निघताना तिथे मिळणारे भन्नाट चवीचे पिस्ता आईस्क्रीम घेतले. बघता-बघता दिवस संपत आला, आता जड पावलांनी कामारीवरुन आम्ही निघालो व्हिलावर यायला. व्हिलावर आल्यावर फ्रेश झालो आणि सामानाची बांधाबांध करु लागलो. आज रात्री साडे-अकराला फिरा बंदरावर आम्हाला गाडी तिच्या मालकाच्या स्वाधीन करायची होती आणि तिथूनच पिराऊसला जाणारी आमची ब्लू-स्टार फेरी पकडायची होती. व्हिलावरचं रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती त्यामुळे जेवणं आटोपून, आम्ही तयार झालो.

* कामारी बीचचे फोटोज

.

.

बंदरावर येताच गाडी दिली. आमची बोट पहाटे १:२५ ची होती त्यामुळे आम्ही वेटिंग रुम मध्ये येऊन बसलो. बोट लागली, बरेच आधी आल्यामुळे बोटीत पटकन जाता आले आणि त्यामुळे पटापटा ४ सोफे आम्ही पकडून सामान ठेवून, आडवे झालो. पावणे सात तासांचा प्रवास सुरू होणार होता, थोडेसे उदास वाटत होते, सामानाकडे लक्ष ठेवत झोपी गेलो, मनात इथे घालवलेले प्रत्येक क्षण येत होते, प्रत्येक ठिकाण आठवत होते, प्रत्येक जागेचे आपले वेगळेपण, इतिहास, मनोहारी सौंदर्य, मजा, आठवणी या सगळ्यांची उजळणी सुरू होती, त्या विचारातचं डोळा लागला. पहाटे-पहाटे लोकांची उठाऊठ सुरू झाली. उठून आवरले आणि चहा आणि लाईट ब्रेकफास्ट केला. काहीवेळातच आम्ही पिराऊसला पोहोचलो. आता पुन्हा तसाच प्रवास पिराऊस ते ओमोनियाला ट्रेनने आलो. तिथून चालत सिंतगामा स्क्वेअरला आलो आणि अथेन्स एअरपोर्टला जाणारी बस पकडली. विमानतळावर आल्यावर इंडिकेटर चेक केले, गेट लागले नव्हते. वेटिंग एरियात गप्पा मारत बसलो, मैत्रिणीला मानले बुवा, ४ महिन्यांची गरोदर असूनही इतका प्रवास तिने स्वतःला अजिबात त्रास न होऊ देता केला हॅट्स ऑफ टु हर!! आमच्या आणि मित्राच्या विमानाच्या वेळेत एका तसाचा फरक होता. काही वेळांनी त्यांचे गेट लागले, अ‍ॅमस्टरडॅमचे बोर्डिंग सुरु झाले तसे गळाभेट करुन, एकमेकांचे आम्ही निरोप घेतले. आमचे विमान लागायला एक तास होता, आता मात्र वेळ जाता जाईना, पाय तिथून निघेना. सात दिवस भुर्र्क्कन गेले, उरल्या त्या सुखद आठवणी. काही वेळाने आमचे गेट लागले, मागे वळून वळून बघत होतो, पुन्हा केव्हा येऊ माहित नाही पण येऊ हे नक्की असा निश्चय केला आणि ग्रीसचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने आम्ही फ्लाईट बोर्ड केले.

समाप्त.

नोटः ग्रीसमध्ये खरेदी करण्यासारख्या वस्तू

बकलावा, कतैफी ग्रीक मिठाई घ्याच.
पाकवलेली, सुकवलेली फळे.
ऑलिव्ह ऑईल.
सन ड्राईड टोमॅटोज, सन ड्राईड टोमॅटोज इन ऑलिव्ह ऑईल.
ग्रीक कॉफी पॉट.
सुवालाकी मसाला.
कॅलामॅटा ऑलिव्ह पेस्ट.
सँटोरीनी वाईन.
वेगवेगळे प्रकारचे चीझ.
आवडत असतील तर ग्रीक आयलंड्समधली खास नॅचरल स्पाँजेस घेऊ शकता.
स्मरणवस्तू / सिरॅमिक्स / हँडीक्राफ्ट्स.
.....आणि कायमस्वरूपी जतन केलेल्या अमूल्य आठवणी :)

अनाहिता भटकंती विशेषांकाच्या निमित्ताने शेवटचा भाग जरी लिहिला तरी त्या स्वप्नातल्या प्रवासाच्या आठवणी अजून ताज्याच आहेत हे पुन्हा एकदा जाणवले. ग्रीसने हृद्याच्या कोपर्‍यात कायमस्वरूपी स्थान पटकावले आहेच. या जागेची जादूच अशी आहे की तुम्ही अगदी प्रेमात पडता तिच्या.

अफाट सौंदर्यांने नटलेल्या ग्रीसच्या पुनर्भेटीच्या प्रतिक्षेत....
समाप्त!!

Note: Some photos are from Internet and the purpose is only for Reference. We sincerely thank the sources mentioned above for these photos.

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

7 Mar 2016 - 11:11 pm | पद्मावति

केवळ अप्रतिम! वर्णन आणि फोटो दोन्हिही खूप सुरेख.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 7:25 am | प्रीत-मोहर

__/\__
फोटोज ने मार डाला

मितान's picture

8 Mar 2016 - 7:32 am | मितान

अप्रतिम आहे ग्रीस !!!
हे फोटो बघताना पुन्हा एकदा जाऊन आले .
छान लिहिलं आहेस सानिका :)

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:40 am | जेपी

मस्त फोटो आणी वर्णन

सामान्य वाचक's picture

8 Mar 2016 - 10:46 am | सामान्य वाचक

जायचे अजून जमले नाही
बघू कधी योग् येतो

वाह काय सुन्दर आहे हि जागा स्वप्ननगरिच जणु :)

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 11:59 am | सस्नेह

सुरेख फोटो आणि वर्णन.

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 2:36 pm | वेल्लाभट

डोळ्याचं पारणं फिटलं

ग्रीस ला एक दिवस परतीचं ओपन तिकिट घेऊन जाणार
त्या व्हायोलिन वाल्यासारखं एका जागी बसून तबला, कोंगो, जेंबे, काहीतरी वाजवत बसणार
आणि भुकेला फक्त बखलावा खाणार...

स्वप्नरंजनात रमलेला
वेल्लाभट

अप्रतिम सँटोरिनी, लेख आणि फोटो. ;)
मला परत जायचे ग्रीसला....

ग्रीस माझ्या लिस्टमध्ये मागे होतं.तुझ्या लेखामुळे ते वर आलं आहे!

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 8:59 pm | प्रीत-मोहर

खत्तर्नाक फोटोज
__/\__

आरोही's picture

25 Mar 2016 - 3:11 pm | आरोही

+१ ... आणि लेख मस्त...

कविता१९७८'s picture

9 Mar 2016 - 1:42 pm | कविता१९७८

वाह,छान लेख, मस्त प्र.चि.

स्मिता.'s picture

9 Mar 2016 - 2:50 pm | स्मिता.

बास, जास्त काही लिहितच नाही आता.

पैसा's picture

9 Mar 2016 - 5:31 pm | पैसा

अप्रतिम!

नंदन's picture

9 Mar 2016 - 7:12 pm | नंदन

वर्णन आणि फोटो - दोन्ही क्लासच!

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 7:59 pm | नूतन सावंत

अ प्र ति म. लिस्ट बदलतेय मीही.

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2016 - 8:25 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम फोटो आणि वर्णन. आणि अगदी सविस्तर सगळं लिहिलंय, हे एवढं एका लेखात लिहिणं आणि तेही वाचकांना गुंतवून ठेवत कुठेही अजिबात कंटाळा येऊ न देता, हे विशेष आहे खूप. ग्रीस लिस्टवर आहेच.

इशा१२३'s picture

9 Mar 2016 - 8:33 pm | इशा१२३

काय सुंदर ठिकाण आहे.मीना प्रभुच्या ग्रींकांजली मधे वर्णन वाचल होतच.पण तु लिहिलेस ते वाचुन सँटीरोनी जास्तच आवडल.नक्की पहायच्या यादित टाकल आता ग्रीस.

इशा१२३'s picture

9 Mar 2016 - 8:33 pm | इशा१२३

काय सुंदर ठिकाण आहे.मीना प्रभुच्या ग्रींकांजली मधे वर्णन वाचल होतच.पण तु लिहिलेस ते वाचुन सँटीरोनी जास्तच आवडल.नक्की पहायच्या यादित टाकल आता ग्रीस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2016 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम वर्णन आणि फोटो... स्वतः फिरून आल्यासारखेच वाटले !

अन्नू's picture

10 Mar 2016 - 12:40 am | अन्नू

निव्वळ अप्रतिम!!!
डोळ्याचं अगदी पारणं फेडलंत.. ;)
काय ते निळं-निळं पाणी, पांढरी पांढरी घरं आणि डोळे दिपवणारी दृश्य... क्षणात स्वर्गातच गेल्यासारखं वाटलं.
फोटो बाकी एकदम झ्याक आलेत, फुल्ल टू कलरफुल्ल! :))
प्रत्येक बारकावे कॅमेरात अगदी छान टीपले आहेत तुंम्ही.
एका आगळ्या-वेगळ्या जगाची सफर घडवून आणल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.. :))

अर्धवटराव's picture

10 Mar 2016 - 2:13 am | अर्धवटराव

केवळ स्वर्गीय सफर.

इतकं अफाट सौंदर्य, पर्यटनाचा भरभराटीचा व्यवसाय, थोर परंपरेचा वारसा असुनही काय हालत झाली ग्रीसची :(
पण हे सौंदर्यच त्याला सुगीचे दिवस आणातील हे नक्की.

अप्रतिम फोटो !! अप्रतिम वर्णन !

जुइ's picture

14 Mar 2016 - 12:29 am | जुइ

निळाई पाहून डोळे निवले! dive relax

चौकटराजा's picture

14 Mar 2016 - 6:13 am | चौकटराजा

सॅन्टोरिनी म्ह्नणजे निळाई व सफेदी यान्चा सुरेख संगम. फरसबन्द टीप्टाप गल्ल्या.उतरल्या क्रमाने घरे. हे सारे इथे पाहयला मिळालेय. सूरेख फोटो व वर्णन.

सुरेख प्रवासवर्णन! फोटू पाहून प्रत्यक्षात जाऊन आल्यासारखे वाटले.

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2016 - 12:25 pm | स्वाती दिनेश

वर्णन आणि फोटो फार सुंदर.. ग्रीस लिस्टवर कध्धीचे आहे, बघू कधी आणि कसे जमते ते..
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2016 - 1:04 pm | सानिकास्वप्निल

सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार. भटकंती अंकात लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल स्वातीताई आणि मधुरेचे विशेष आभार: )

अप्रतिम ग्रीस,फोटो आणि वर्णन..

सुधीर कांदळकर's picture

25 Mar 2016 - 7:53 pm | सुधीर कांदळकर

नितांतसुंदर लेखमालेचे सर्व भाग आताच वाचले. मी स्वप्न तर पाहात नाही ना असे वाटले. काळ्या खड्यांच्या किनार्‍याचे सौंदर्य वेगळेच दिसते आहे.

धन्यवाद.