अविस्मरणीय ग्रीस - भाग ३ - नॅक्सोस

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in भटकंती
7 Jul 2014 - 2:15 pm

अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना, भाग १, भाग २

पावणे सहाला आम्ही हॉटेल सोडले, हॉटेलच्या कॉफी शॉपमधून मस्तं कॉफी घेतली व तडक चालत ओमोनिया रेल्वे स्थानकावर आलो. पिराऊसला जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये सोबत असलेले ठेपले व कॉफी असा नाश्ता केला. २०-२५ मिनिटांत पिराऊसला पोहोचलो, स्थानकाच्या बाहेर येताच समोर दिसत होता मोठा समुद्र, अनेक मोठ्या बोटी, क्रुझ. एसकलेटरवरून खाली उतरून आम्ही सामान घेऊन सरळ नॅक्सोसच्या बोटीत चढलो.

.

.

साडे सातला बोट सुटणार होती. पटापट जागा पकडून आम्ही सामान लावले व गप्पा मारत बोट सुटण्याची वाट बघू लागलो. साडे पाच तासांचा प्रवास होता त्यामुले थोडे बोटीत भटकून, थोडं खाऊन आम्ही बसल्या बसल्या झोप काढली ;)

नॅक्सोसला बरोबर साडे बाराला बोट आली, आमच्याबरोबर असंख्य पर्यटक सामान घेऊन उतरले. बाहेर येत असताना डाव्या बाजूला आम्हला खुणावत होता पोर्तारा, संध्याकाळी आम्हाला तिथे जायचेच होते.

.

.

पोर्तारा

नॅक्सोस हे एगीयन समुद्रातील सायक्लेड ग्रुपमधील सर्वात मोठे बेट आहे. नॅक्सोस ची राजधानी छोरा हे सर्वात मोठं शहर आहे , आम्ही एक रात्र छोरामध्येच राहणार होतो. बंदरावर हॉटेलचा माणूस आम्हाला घ्यायला आलाच होता. सामान गाडीत टाकून आम्ही हॉटेलला पोहोचलो. रिस्पेशनवर एक ग्रीक आज्जी होती, तिला इंग्राजी फारसं बोलता येत नव्हतं , पण मोडकं- तोडकं बोलून, हातवारे, खाणा-खुणा करुन तिने आमचे स्वागत केले. भर उन्हाचे आल्यामुळे आम्हा सगळ्यांना तिने आईस्क्रिम ही खाऊ घातले.

.

कुकी क्रिम आईस्क्रिम :)

रुम मध्ये जाऊन , कपडे बदलून आम्ही थेट Agios Georgios बीचवर गेलो, बीच तसा अगदी जवळ होता. मस्तं पांढरी वाळू, निळंशार , स्वच्छ पाणी, अनेक पर्यटकांनी भरलेला हा बीच होता. नॉक्सोसची एका दिवसाची ट्रिप असल्यामुळे आम्हाला तो दिवस निवांत घालवायचा होता. मस्तं २-३ तास आम्ही बीचवर घालवले, मनसोक्तं पोहलो, उन्हं खात बसलो, धम्माल केली. तिथल्या दुसर्या बीच वर अनेक वॉटर स्पोर्ट्स होतात.

.

Agios Georgios बीच

.

Agios Georgios बीच

.

Agios Georgios बीच

हॉटेलवर आलो आणि हॉटेलच्या स्वीमींगपूलमध्ये मनसोक्तं डुंबलो आणि मग मस्तं फ्रेश होऊन फक्कडसा चहा घेतला, सोबत घेऊन गेलेलो घारगे ही हादडले. आवरून आम्ही पोर्ताराचा प्रसिद्ध सुर्यास्त बघायला निघालो. वाटेत आम्हला ग्रीसमध्ये अनेक ठिकाणी दिसणारे पांढर्‍या-निळ्या रंगाचे चर्च दिसले, लगेच कॅमेर्यात टिपून घेतले.

.

पोर्ताराला जाताना वाटेत एका पक्ष्यांचे दुकान लागले , तेथे हे पोपट महाराज पोपटपंची करत होते. त्यांच्या जवळ जाताच कर्कश्य आवाजात ओरडले आणि जसे आपण घाबरुन मागे सरतो तसे महाराज जोर-जोरात हसायला लागतात मात्र फोटो काढु दिला हे ही नसे थोडके ;)

.

पोर्तारा म्हणजे मोठे द्वार. पोर्तारा पॅलेटिया ह्या टेकडीवर बांधले गेले आहे. असे म्हणतात हे अर्धवट बांधलेले मंदिर अपोलो राजाला समर्पित केले होते. ५३० BC मध्ये Lygdamis ने ह्याचे बांधकाम सुरु केले. 506 BC मध्ये Lygdamis ला पदच्युत केले त्यावेळेस त्या मंदिराच्या फक्त भिंतीच तयार होत्या. ५-६ व्या शतकात ह्या मंदिराचे चर्चमध्ये रुपांतर झाले होते. व्हेनेशियन आणि तुर्कींच्या राज्यात ह्या चर्चला तोडून त्याचे संगमरवर किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले गेले होते. ही दाराची चौकट विशाल, भव्य असल्याकरणामुळे ती तशीच राहीली . आयताकृती ह्या दरवाच्याची उंची २६.फी उंच आहे आणि प्रत्येकी सोळा.फी लांब अश्या चार संगरवराच्या ठोकळ्यांनी बनला आहे.

.

.

चालत, फिरत आम्ही बंदरापाशी आलो. हळू हळू आकाशात सुर्यास्ताची लाली पसरु लागली होती. एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे अनेक कॅफे, उपहारगृह.

.

.

आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली, फार उंच नसल्यामुळे चढायला ही कमी वेळ लागला. लोकांची गर्दी ही जमू लागली. सुर्यास्तं बघायला प्रत्येक जण मोक्याची जागा शोधत होतं. हळू हळू सुर्याचे सौंदर्य खुलु लागले.

.

पोर्तारातून दिसणारा प्रकाशदाता

लाल- तांबडा आगीचा गोळा ढगाआड जाऊ लागला तसं तसं आकाशात सोनेरी लाली पसरली. समुद्राचे पाणी ही जणू काही केशर मिसळयासारखे दिसू लागले. हळू हळू सुर्यदेव ढगांखालून बाहेर आला आणि अस्ताला जाऊ लागला. त्याची पिवळट, गुलाबी रंगछटा बघून ते निव्वळ जादूई सौंदर्य आहे असे वाटून गेले. ट्रुअली मेस्मरायझिंग. सुर्याचे असले मोहक रुप ह्या आधी कधी पाहिले नव्हते.

.

.

एकीकडे शांतपणे अस्ताला जाणारा सुर्य स्वतःसोबत कातरवेळेची उदासीनता घेऊन जात होता तर दुसरीकडे चंद्रोदय झाल्यामुळे वातावरणात मस्तं धुंदी पसरली होती. खूप छान, शांत आणि प्रसन्न वाटत होतं.

.

.

पोर्तारा आणि चंद्र

.

पोर्तरावरुन दिसणारं नॅक्सोसचे ओल्ड टाऊन आणि किल्ला.

.

खाली उतरून आम्ही जेवायला गेलो. खाली उतरलो तेव्हा बंदरावरचे दिसणारे मोहक दृश्य.

.

रोस्ट चिकन, फ्रेंच फ्राईज, त्झात्झिकि, पिटा व सॅलॅड.

दुसर्‍या दिवशी दुपारी साडे बाराची बोट होती सँतोरीनीसाठी, त्याआधी म्हटले जरा गावात फेर-फटका मारून येऊ. अकराला हॉटेलचा माणूस आम्हाला सोडायला येणार होता बंदरावर म्हणून त्याआधी आम्हाला फिरुन हॉटेलवर ही यायचे होते. नॅक्सोस गावात एक चक्कर मारून आलो, तिथे एक जुना किल्ला आहे त्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गेलो अजून आत गेलो असतो तर उशीर झाला असता म्हणून तिथून खाली उतरलो. वाटेत काही दुकांनामध्ये सन ड्राईड टोमॅटोज, ग्रीक कॉफी पॉट विकत घेतले. (ते फोटो अंतिम भागात)

.

नॅक्सोस गावात केलेली भटकंती

.

नॅक्सोस गावात केलेली भटकंती

.

किल्ल्या बाहेरील उपहारगृह.

.

.

.

हॉटेलच्या माणसाने आमचे सामान गाडीत टाकले आणि आम्हाला त्याने बंदरावर ड्रॉप केले. एक दिवसाची नॅक्सोसची ट्रिप आम्हाला खूप आवडून गेली, ह्या गावाच्या प्रेमातच पडलो होतो आम्ही.पुन्हा ग्रीसला कधी येऊ तेव्हा इथे नक्कीच यायचे हे ठरवूनच आम्ही तिथून निघालो. साडे बाराला आमची सँतोरीनीची बोट निघाली आणि आम्ही नॅक्सोसला टाटा करत निघालो.

.

क्रमशः

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Jul 2014 - 2:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त चालु आहे ग्रीसची सफर...
अवांतर-ग्रीसला शेंगेन व्हीसा चालतो काय?

सानिकास्वप्निल's picture

7 Jul 2014 - 2:36 pm | सानिकास्वप्निल

हो ग्रीसला शेंगेन व्हिसा चालतो :)

धन्यवाद.

मदनबाण's picture

7 Jul 2014 - 2:28 pm | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 3:00 pm | प्यारे१

वाचतोय!

अजया's picture

7 Jul 2014 - 3:30 pm | अजया

अप्रतिम फोटो ! अपोलो मंदिराच्या कमानीतला सुर्यास्त क्लासच टिपलाय !

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

अफा...ट आहे हे. इथे बसून पाहायला मिळतय याचं सूख जेव्हढं वाटतय..तसच तिथे कधी जाता येइल अशी हुरहुरही लागतीये!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2014 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो आणि वर्णन !

चित्रगुप्त's picture

7 Jul 2014 - 4:59 pm | चित्रगुप्त

वाहवा. खूपच सुंदर.

506 BC मध्ये Lygdamis ला पदच्युत केले

हा Lygdamis म्हणजे तोच का '३००' वाला?

बॅटमॅन's picture

9 Jul 2014 - 3:00 pm | बॅटमॅन

नाही. ३०० वाला म्हंजे Leonidas. तो स्पार्टाचा राजा, दक्षिण ग्रीसमधला.

खुप सुंदर फोटो गं.. छान झालाय हा भाग पण :)

सगळे भाग आता सलग वाचले, नेहमीप्रमाणेच छान फोटो आणि वर्णनही. या भागातला सुर्याचे आणि चंद्राचाही फोटो अतिशय सुरेख आलेत.

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2014 - 11:29 pm | स्वाती दिनेश

खूप छान! फोटो वर्णन .. दोन्ही!
स्वाती

सुर्यास्ताचे फोटू फारच आवडले. बाकीचेही शिनेमात असतात तसे आलेत.

खटपट्या's picture

10 Jul 2014 - 3:20 am | खटपट्या

सर्व फोटो जबरदस्त

सानिका मस्त आहे वर्णन . मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे प्रत्येक गोष्टीची तिथली नावं आणि त्याचं महत्त्व छान सांगितलं आहे. हे सगळे संदर्भ कळल्याशिवाय सफरीची मजाच येत नाही .

आज तुझ्या पाकृ पण सगळ्या शोधून बऱ्याच साठवून ठेवल्या आहेत :) लोकांचे प्रतिसाद वाचून तुझ्या पाकृ बद्दल उत्सुकता वाढली आणि ती अनाठायी नसल्याचा पण लगेच प्रत्यय आला