सोशल नेटवर्किंग (भाग ७)

लाडू.'s picture
लाडू. in जनातलं, मनातलं
13 Jan 2016 - 1:21 pm

भाग ६ : http://www.misalpav.com/node/34464

हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रावणी शाह. याच नावावर भाळला होता मयंक काही महिन्यांपूर्वी. नावावर आणि फोटोवर. तिच्याशी आज एकदा बोलायलाच हवे. मल्हार विश्वसनीय नाही, हे मयंकला आधीपासूनच वाटत होते. पण तेव्हा फक्त वाटले होते. कसलाही पुरावा नव्हता. त्यानंतरही त्याने अनघाला जाळ्यात ओढले होते. आणि अनघासारखी मुलगी सहज फसली होती, फक्त कॅमेरा आणि glam हवे म्हणून. श्रावणीचे फोटो काढतो हा, ते ठीक आहे. पण त्यामागे काय कारणे आहेत हे श्रावणीने कधीच सांगितले नाही. मल्हारचे नाव सुद्धा घेऊ दिले नाही. काय असेल या सगळ्यामागे? मयंकला काही सुचत नव्हते. आणि जेवढा विचारांचा गुंता डोक्यात वाढत होता, तेवढे वाईट साईट, नको नको ते विचार त्याचा मेंदू पोखरू लागले होते.
कॉम्पुटर सुरु होऊन इंटरनेट कनेक्ट होण्यात आणि facebook सुरु होण्यात जेवढा वेळ लागला तो त्याला आता युगांपेक्षाही मोठा वाटत होता. facebook लावल्यावर त्याने सवयीने तिचे नाव टाईप केले. पण आश्चर्य, श्रावणी शाह नावाचे कोणते अकाऊंट अस्तित्वातच नव्हते. मयंक प्रचंड गोंधळला. क्षणभर त्याला कळलेच नाही काय झालेय ते. पण त्याला श्रावणी दिसत नव्हती हे मात्र खरे. तिने आपल्याला ब्लॉक केले असावे कदाचित, म्हणून मयंक जेमतेम दोन-एक मिनिटे शांत राहिला. पण तरीही त्याला आज तिच्याशी बोलायचे होते. त्याने सिद्धांतला call करून त्याचा facebook ID आणि पासवर्ड घेतला. आपल्या नाही तर सिद्धांतच्या अकाऊंटवरून तरी बोलता येईल असे त्याला वाटले. पण तरीही श्रावणी दिसली नाही. पण सिद्धांतला श्रावणी ओळखत नव्हती. मयंकने कधी उल्लेखही केला नव्हता तिच्याशी बोलताना सिद्धान्तचा. मग ती कशी काय ब्लॉक करेल त्याला? म्हणजे एकच शक्यता उरते. ती म्हणजे श्रावणीने तिचे अकाऊंट डिलीट करण्याची. पण ती असे का करेल? मयंकने तिच्या मैत्रिणींपैकी काही नवे आठवण्याचा प्रयत्न केला. त्याला आवडलेली ती दुसरी मुलगी- संयुक्ता पाटील. मयंकने तिचे नाव सर्च केले पण तीही नव्हती. तिचेही अकाऊंट डिलीट. आणखी आठवतील तेवढी नावे मयंकने शोधली. पण तिच्या ग्रुप मधले कोणीही आता facebook वर नव्हते. असे का झाले असेल, याचा विचार करत मयंक थोडा वेळ सुन्नपणे बसून राहिला. अचानक त्याला आठवले सिद्धांतने दिलेले app. त्याने ताबडतोब ते ओपन केले आणि त्यात त्याच्याकडे डाउनलोड असलेला श्रावणीचा त्याचा आवडता फोटो लोड केला. थोड्याच वेळात फोटोचे डीटेल्स मयंकसमोर होते:
नेम: मोना चटर्जी
अपलोडेड फ्रॉम : कोलकाता, इंडिया
time: 5/3/2014 3.45 PM
आणि मयंकचा अंदाज खरा ठरला होता. मल्हारने हाही फोटो चोरलाच होता. दुसऱ्याच कोणाचा तरी. आणि श्रावणी शाह हे फेक अकाऊंट बनवून अपलोड केला होता. स्वत:च्या नावासहित. फक्त स्वत:च्या प्रसिद्धीसाठी. पण मयंकसाठी हा धक्का पचवणे खूप अवघड होते. या चेहऱ्यावर त्याने खूप प्रेम केले होते. श्रावणी म्हणून. या श्रावणीशी त्याने खूप गप्पा मारल्या होत्या. मनातल अस खूप काही तिच्याशी बोलला होता. एक हळुवार नात निर्माण केल होत. पण समोरच्या कोणासाठी हा एक timepass होता. समोर अशी कोणी मुलगी नव्हतीच. या मोना चटर्जी चा मुखवटा लावून हा मल्हार त्याच्याशी बोलला होता. मयंकने फेक अकाऊंटचे प्रकार याआधीही ऐकले होते. त्यानुसार फ्रेन्डशिप करताना प्रत्येक अकाऊंट तो तसे पारखून घेत असे. आणि तरीही तो फसला होता. कारण ते अकाऊंट फेक वाटतच नव्हत. तिची जन्मतारीख, शाळा, कॉलेज इथपासून सगळी माहिती त्याने पाहिली होती. तिचे मित्र मैत्रीनीही खूप होते. त्यांच्याबरोबर ती जी मस्ती करायची ते पण facebook वर अपलोड करायची. संयुक्ताच्या कॉलेज ला जाऊन आल्यावर तिने संयुक्तालाहि tag केल होत. हा आता tag करताना कधीही फोटो नव्हते. किवा श्रावणी आणि संयुक्ता किंवा त्यांचा एखादा ग्रुपफोटो अस कधीच काही नव्हत. कायम सगळ्यांचे एकेकट्याचे फोटो. हे मयंकला आधीही खटकल होत. पण तेव्हा श्रावणीच्या आकंठ प्रेमात असताना त्याने याचा विचार नव्हता केला. पण तरीही हे सगळ एक फेक अकाऊंट कस करू शकत? म्हणजे संयुक्ता पण फेक? मयंकने संयुक्ताचा फोटो app मध्ये लोड केला. आणि यावेळी त्याला कल्पना होती कि हे ही डिटेल्स विचित्रच मिळणार आहेत. त्यानुसार:
नेम: नेहा सिंग
अपलोडेड फ्रॉम : दिल्ली, इंडिया
time: 8/5/2014 07.33 PM
यानंतर मात्र मयंकने झपाट्याने सगळे फोटो चेक केले. श्रावणीच्या साऱ्या मित्र-मैत्रिणींचे. आणि थोड्याच वेळात सगळ सत्य मयंकच्या समोर होत. सगळीच्या सगळी अकाऊंट्स एकामागून एक निकालात निघाली. मल्हारने स्वत:च्या खोट्या प्रसिद्धीसाठी हे केले होते. त्याने स्वत: कधीच कुठलाच फोटो काढला नव्हता. या माणसाकडे कॅमेरा असेल की नाही याचीही शंकाच होती. म्हणूनच तो सिद्धांतला भेटायला आला नाही. पण मल्हार खूप डोक चालवून हा खेळ खेळला होता. इतक्या अकाऊंट्सचे डीटेल्स, फोटो आणि chats सांभाळण सोप्प काम नव्हत. पण त्याने ते केल होत. आपल्याला आधीचकळायला हव होत. आपण श्रावणीच्या कॉलेजला गेलो होतो, तेव्हाच चौकशी करायला हवी होती. अनघाला तेव्हाच विचारू शकलो असतो. आणि सर्वेश पण दिसला होता. श्रावणीच्या वर्गापर्यंत ओळख होती तरी आपण तिला भेटायचा प्रयत्न केला नाही. तिच्या वाढदिवसाला आपल्याला भेटाव लागेल म्हणूनच श्रावणीने आपल्याशी बोलण बंद केल. म्हणून इतका सस्पेन्स ठेवला मल्हारबद्दल काही विचारलं की. आता सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात झाली होती. आता या मल्हारला सोडायचा नाही हे मयंकने मनाशी पक्क केल. सिद्धांत जे कायदे सांगत होता ते आता वापरायचे. पण अडचण ही होती, कि ज्याचे फोटो चोरले गेलेयत त्याने तक्रार करायला हवी. त्यामुळे, आता केल्विन, मोना, नेहा या सगळ्यांशी संपर्क करायलाच हवा होता. मयंक पुन्हा facebook वर ही नावे शोधू लागला. आणि त्याला आणखी एक धक्का बसला. मोना चटर्जीचे अकाऊंट अगदी श्रावणीसारखेच होते. म्हणजे त्यात नवल काहीच नाही. तिचेच तर फोटो होते हे सारे. पण तरी क्षणभरासाठी मयंकला श्रावणी आठवून दु:ख झालेच. त्याने तिला मेसेज करून घटनेचे गांभीर्य सांगितले. तिलाच काय, पण तसाच मेसेज नेहाला. आणि बाकी ज्यांचे फोटो चोरले गेले त्यानाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती, कि अर्ध्या व्यक्तींना हि गोष्ट गंभीर वाटलीच नाही. त्यांनी मयंकला वाटण्याच्या अक्षता लावल्या. मोनाने मात्र सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. केल्विन सारखा फोटोग्राफर, पण तोही म्हणाला कि या सगळ्यात खूप वेळ खरच होईल, त्यापेक्षा नकोच अस काही. मयंक मल्हारच काहीही वाकड करु शकणार नव्हता. हा पण जर मोनाने मदत केली, मदत म्हणण्यापेक्षा तिने पुढाकार घेतला तर काहीतरी झाल असत.
मयंक आता झालेल्या कष्टांमुळे आणि मानसिक ताणामुळे थकून गेला होता. पण facebook बंदही करता येत नव्हते. मोना थोड्याच वेळात रिप्लाय करते म्हणाली होती. तसा थोड्याच वेळात तिचा रिप्लायही आला. पण आता पुन्हा एकदा मयंक निराश झाला होता. "sorry मयंक, मला कळू शकतंय तू माझ्या भल्याचा विचार करतोयस. त्याने माझे फोटो लोकांना फसवण्यासाठी वापरलेत. आणि मला कळू शकत हा किती मोठा गुन्हा आहे. पण तरीही तू म्हणतोस तशी कायदेशीर कारवाई वैगरे मला तरी शक्य नाही. मला कायद्याच्या भानगडीत पडायचं नाही. शिवाय हे माझ्या घरी कळल तर माझ सोशल नेटवर्किंग कायमच बंद होईल. I am really very sorry". मल्हारला अडकवण्याचे सगळे कायदेशीर मार्ग बंद झाले होते. तरीही एक मार्ग होता. स्वत:च काहीतरी करण्याचा. निदान एकदा मल्हारला शिव्या द्याव्यात, जमल्यास दोन-चार फटके असे तरी मयंकला प्रकर्षाने वाटू लागले. आता मल्हारचे घर शोधायला हवे होते. आणि त्याला आठवला अनिकेत. एकमेव दुवा. मयंकने अनिकेतला लगेच call करून सांगितले, "तयार राहा. आपल्याला मल्हारच्या घरी जायचंय " पण अनिकेतचे यावरचे उत्तर मात्र आजच्या दिवसाचा कळस होते. "मयंक मला माफ कर. मी मल्हारला ओळखत नाही. कधी पाहिलेही नाही. तू त्यादिवशी विचारलेस त्याआधी मला बऱ्याच जणांनी असाच प्रश्न विचारला होता, कि मल्हार तुझ्या शाळेत होता का?, मला आजपर्यंत कोणीही कधीही इतका भाव दिला नाही जितका त्या एक-दोन दिवसात मिळाला. मल्हारचा मित्र म्हणून लोक मला ओळखू लागले. आणि ती प्रसिद्धी हवीहवीशी वाटली म्हणूनच मी तुझ्याशी खोट बोललो. तू ही कॉलेज ला गेल्यापासून मला विसरलास, त्यामुळे मल्हारमुळे तुला होणारा त्रास मला आवडू लागला. मला नाही माहित मल्हार कुठे राहतो."
आणि आता मयंकला अनघाला भेटण्याशिवाय पर्याय नव्हता. तिच्यामार्फत एकतर मल्हारला भेटून राग काढायचा, आणि जमल तर तिलाही समजवायचं कि मल्हारला विसर. तेच भल्याच आहे.ती ऐकेल कि नाही' आणि मुळात आपल का ऐकेल हा प्रश्न आहेच पण तरीही फार विचार न करता तो निमुटपणे अनघाच्या घराच्या दिशेने चालू लागला.
क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Jan 2016 - 1:36 pm | पैसा

ही सत्यकथा आहे? अशाच फेक प्रोफाईलपायी एका मुलाचा जीव गेल्याची बातमी आठवली. तसेच मिपावरचेही काही लडिवाळ आयडी आठवले.

एस's picture

13 Jan 2016 - 1:37 pm | एस

वाचतोय. फारच रोचक!

लाडू.'s picture

13 Jan 2016 - 2:58 pm | लाडू.

हो हि सत्य कथा आहे.

पूर्वाविवेक's picture

14 Jan 2016 - 2:50 pm | पूर्वाविवेक

खूपच रोमांचक वळण घेतलंय आता कथेने. खूप मस्त !