नवा पाहुणा - शिक्रा (इंडियन स्पॅरो हॉक)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 11:17 pm

गेले पाचेक महिने घरा मागच्या हिरवाईत पोपट वगळता सामसूम होती. उरली ती कावळ्यांची कावकाव. नतदृष्ट कावळ्यांनी आसपासच्या झाडात तीन चार घरटी बांधली आणि त्यांच्या उपद्रवाला कंटाळुन खंड्या, हळ्द्या, दयाळ, बुलबुल, कोतवाल, तांबट, नर्तक, सनबर्डस वगैरे मंडळी दूर गेली. पोपट मात्र कावळ्यांना पुरून उरत होते आणि धिटाईनं वावरत होते.

हळुहळु कावळ्यांची पिल्लं बहुधा मोठी होउन उडू लागली असावीत कारण वावर जरा कमी झालेला दिसला. साधारण महिन्या दिड महिन्यापूर्वी अचानक या जुन्या पाहुण्यांची चाहुल लागली आणि आनंद झाला. रविवारी सकाळी चहा आणि वर्तमानपत्रांचा आस्वाद घेता घेता मधेच कठड्याशी जायचं, टेहळणी करायची, काही टिपण्याजोगं दिसलं तर कॅमेरा उचलायचा हा माझा नित्याचा उद्योग. अचानक लांबवर पसरलेल्या तारेवर खंड्या दिसला आणि मी खुष झालो. पाठोपाठ तांबटानं हजेरी लावली. एकदा कोतवालानं दर्शन दिलं. सनबर्ड, हळद्या यांचा वावर दिसला मात्र ते कॅमेर्‍याच्या पल्ल्यापलिकडे लांब होते.

काल असाच रमत गमत तिसरा चहा घेता घेता कठड्यावर रेललो आणि समोर शेकटाच्या शेंड्यावर जरा खालच्या अंगाला एक करडा तपकिरी मोठा पक्षी दिसला. घाइघाईनं मी कॅमेरा उचलला. किरण साधताच त्या रुबाबदार पक्ष्याचं दर्शन झालं. हे प्रकरण शिकारी पक्ष्यांपैकी हे नक्की पण घार की ससाणा वर्गीय हे समजत नव्हतं. मात्र तो पक्षी - बहुधा पूर्ण वाढ न झालेलं ते पिल्लु फार देखणं आणि रुबाबदार होतं. एखाद्या राजाच्या रुबाबात तो पक्षी एका पायाच्या नख्यांनी फांदीची मजबूत पकड घेत दुसरा पाय फक्त पंजा समोर उभा धरुन आणि बाकी पाय पोटात घेउन अवलोकनात दंग होता. ताठ मान, बाकदार चोच, बळकट पिवळाधमक पंजा मऊसुत लालसर तपकिरी आणि पांढरी पिसं, पट्टेरी शेपूट आणि पाहणार्‍याची नजर खिळवुन ठेवणारे पिवळ्सर हिरवे डोळे.

एखाद्या कमांडोच्या थाटात सावधपणे सर्वत्र नजर फिरवताना अधुन मधुन पंख किंचित बाहेर काढणं, पिसांत चोच खुपसणं चालु होतं. हे महाशय यायच्या आधी काही वेळापूर्वी त्याच झाडावर पोपट आपापल्या फांद्यांच्या टोकावर जागा धरुन बसले होते आणि एका फांदीच्या टोकावर बसलेल्या बुल्बुलाला सतावत होते. तो बुलबुल अखेर तिथुन उडाला. मग त्याच जागी तांबटाच पिल्लू आलं, त्याला हुसकुन झालं. मात्र हे महाशय अवतरले आणि पोपटांची बोलती बंद झाली. चाँक चाँक चीर्र्र असे आवाज करत बहुतेक पोपट उडाले. मग तो देखणा पक्षी शांतपणे बराच वेळ तिथे बसून होता. सर्व परिसराची पाहणी करुन झाली, पिसं साफ करुन झाली, पंख हलवुन झाले. सकाळ्पासून मंद असलेलं उन जरा प्रखर झालं, आणि शेकटाच्या छोट्याच्या फांदीनं जणु त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि त्या कोवळ्या पानांच्या सावल्यांनी त्याच्या डोक्यावरच्या मूळच्या नक्षीत भर घातली.

त्याची लहर फिरली तशी त्याने क्षणात पंख मोकळे केले आणि एक झेप घेत तो पलिकडच्या झाडाच्या दाट फांदीत सूर मारत तो गायब झाला. तो असेतो पर्यंत मी त्याच्या अधिकाधिक छबी टिपायचा प्रयत्न केला.

1

2

3

4

5

6

7

8

9

10

चित्रण झालं. मी आत वळणार इतक्यात मला वर उजवीकडे बसलेल्या मित्राची जाणीव झाली. तो बारीक नजरेनं माझ्यावर लक्ष्य ठेवून होता. बहुधा नवे पक्षी दिसल्यावर मी त्याला न टिपल्याचा त्याला राग आला असावा.
11

मौजमजाछायाचित्रणआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

16 Nov 2015 - 11:21 pm | रामदास

माझ्या खिडकीत आणि तुमच्या खिडकीतलं अंतर फार तर पाचशे मिटरचं आहे पण मला अजून कावळेच दिसतायत.

सर्वसाक्षी's picture

16 Nov 2015 - 11:22 pm | सर्वसाक्षी

चहाला या. पाखरं पाहु.

पाखरांचेही फोटो येऊदेत हो सरकार! :)

(पाखरुप्रेमी)रंगा

साधारण नोव्हेंबरापासून शिक्रा दिसू लागतो. छान फोटो मिळाले आहेत.मुख्य म्हणजे समोरून आहेत खालून /वरून नाहीत.याटाइपचे पक्षी ओळखण्यासाठी पोट आणि गळा, छातीवरच्या रेघा उभ्या/आडव्या कशा आहेत ते स्पष्ट दिसते आहे.

चतुरंग's picture

17 Nov 2015 - 8:54 am | चतुरंग

उन्हाचा ताव अगदी नेमका आहे त्यामुळे झगझगीतपणाने होणारा ग्लेअरचा त्रास चित्रात होत नाहीये. शांत सौम्य चित्रे आली आहेत. फार सुंदर! __/\__

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2015 - 9:02 am | कैलासवासी सोन्याबापु

जरब!! विलक्षण जरब शिस्त अन आवेश दिसतो ह्या नजरेत भूल पाडणारी नजर म्हणूनच कदाचित नौदलाच्या हेलीकॉप्टर तळाचे नाव ही सार्थपणे आईएनएस शिकरा ठेवले असावे काय?

सुबोध खरे's picture

17 Nov 2015 - 9:40 am | सुबोध खरे

अगोदर असलेल्या आय एन एस कुंजाली चे नंतर द्विभाजन झाले आणि शिक्रा आणि कुंजली असे दोन तळ निर्माण झाले.
https://en.wikipedia.org/wiki/INS_Shikra
http://indiannavy.nic.in/about-indian-navy/ins-kunjali

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2015 - 10:33 am | कैलासवासी सोन्याबापु

माहिती बद्दल आभारी आहे डॉक साब

प्रचेतस's picture

17 Nov 2015 - 9:10 am | प्रचेतस

सुंदर छायाचित्रे.

एकदा देवगिरीवर ह्या पक्ष्याचे छायाचित्र घेता आले होते.
a

सुबोध खरे's picture

17 Nov 2015 - 9:41 am | सुबोध खरे

फोटो सुंदर आहेत

सस्नेह's picture

17 Nov 2015 - 10:17 am | सस्नेह

डौलदार आणि रुबाबदार !
ससाणा आहे का हा ?

नीलमोहर's picture

17 Nov 2015 - 10:29 am | नीलमोहर

तो पाय पोटात घेऊन कसला भारी बसला आहे. :)

मुक्त विहारि's picture

17 Nov 2015 - 10:50 am | मुक्त विहारि

आवडले...

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2015 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा!

t

हे महाशय नक्की कोण आहेत माहित नाही ..पण सगळ्या चिमण्या ह्यांना बघताच पळून गेल्या .

एस's picture

17 Nov 2015 - 1:05 pm | एस

हा नर शिक्रा आहे. सर्वसाक्षींच्या धाग्यातल्या फोटोत आहे ती बहुधा मादी आहे. नर शिक्रा किंवा अ‍ॅक्सिपिटर हा राखाडी रंगाचा असतो, तर मादी ही तपकिरी असते.

ताम्हिणी अभयारण्यातल्या जंगलात एकदा नर व मादी शिक्रा जोडीने एका कबुतराचा पाठलाग करतानाचा थरार पाहायला मिळाला होता. ते कबुतर वाचले आणि शिक्राची जोडी हात चोळीत परत आली.

माहितीबद्दल धन्यवाद एस

पैसा's picture

17 Nov 2015 - 9:40 pm | पैसा

कसला रुबाबदार, देखणा पक्षी आहे!

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2015 - 9:45 pm | स्वाती दिनेश

मस्त फोटो!
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2015 - 1:15 am | डॉ सुहास म्हात्रे

एका पायावर रुबाबदारपणे बसून आपले साम्राज्य धारदार नजरेच्या जरबेत ठेवणारा राजबिंडा आवडला !

शिक्रा हे तसं ओबडधोबड नाव वाटतं एवढ्या छान पक्ष्यासाठी. फोटो (लेखातले आणि प्रतिसादांमधले) अप्रतिम!

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 1:32 pm | भाऊंचे भाऊ

बीयुटीफुल.

तीक्ष्ण नजरेचा दिमाखदार ऐटबाज पक्षी.
फोटो सुंदरच.
इथे दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी यांचा अगदी सुरेख संगम झाला आहे.

खूपच सुंदर. मस्त फोटो मिळालाय.

यशोधरा's picture

19 Nov 2015 - 10:36 am | यशोधरा

सुरेखच फोटो!!

नाखु's picture

20 Nov 2015 - 5:07 pm | नाखु

आणि समर्पक वर्णन..

शुक (अगदी) शुक शुक केल्या सारखा पाहतोय !!!

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2015 - 3:40 am | श्रीरंग_जोशी

धागानायकाची अदाकारी काय टिपली आहे. केवळ अप्रतिम.

त्रिवेणी's picture

21 Nov 2015 - 7:05 am | त्रिवेणी

मस्त एकदम.

खरच सर्वसाक्षी
एकही सुटत नाही तुमच्या नजरेतुन.

नरेश माने's picture

23 Nov 2015 - 12:55 pm | नरेश माने

सुंदर फोटो!!!

पियुशा's picture

23 Nov 2015 - 6:27 pm | पियुशा

अगदी राजबींड़ा :)