घरोघरी पुरस्कार वापसी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 2:48 pm

“आज तर तुझ्या सवेंदनहीनतेचा कळसच झालायं!” आदिती तणतणत समोरच्या हॉलमधे आली. अक्षय फेसबुक आणि ट्वीटर वर आजकाल रोजच मिळणारे असहिष्णुतेचे पोस्टस चघळत होता. खरतरं असल्या पोस्टस विषयी त्याचीच सहिष्णुता आता संपुष्टात आली होती. त्यामुळे फेसबुकाने केव्हाच्या जाहीर केलेल्या सात भावचित्रांची तो आतुरतेने वाट पहात होता.

“जानू, काय झालं?” त्याने शंभर लाईक्सने ओथंबलेल्या आवाजात विचारले.

“मी किचनमध्ये मरमर मरतेय, आणि तू मजेत फेसबुक-फेसबुक खेळत बसलाय!”

“अग मी माझी मेल चेक करत होतो. बॉसचा एक अर्जंट इमेल यायचाय नां!”

“मला उगाच काऊचिऊच्या गोष्टी सांगू नकोस. तू आजकाल फारच असहिष्णूतेने वागतोयसं! मी मघापासून आतमधून ओरड्तेयं- मला मदत करायला ये. पण तुझ्याकडे बॉसला प्रेसेंट करायला किमती वेळ आहे. बायको तिकडे मरेना कां!

“जानू तुला माहीत आहे, मी तसला नवरा नाही!”

“तू! तू तर अर्क आहेस असंवेदनशीलतेचा. माझे विचार नेहमी हटके असतात, म्हणून तुला माझ्याविषयी आदर नाहीयं. तू तरी काय करणार म्हणा! तुझी संस्कृतीच तशी आहे!”

“झालं तूझं सुरू? आणि आपली दोघांची संस्कृती काही वेगवेगळी नाहीयं बऱं! तू फार फेसबुक वाचायला लागलीस कां गं?”

“कांऽऽही सारखी नाहीयं आपली संस्कृती! संस्कृती म्हणजे आईची शिकवण! जशी तुझ्या प्रिय आईची तुला शिकवण, तशीच तुझी संस्कृती!

“हे बघ आदिती, उगाच माझ्या आईला मधे आणू नकोस! मी कधीतरी तुझ्या आईचा अनादर केला आहे कां? तूच सारखी सारखी माझ्या आईचा उद्धार करतेस!”

नेहमीप्रमाणे आदितीने ह्या बोचक शेऱ्याकडे दुर्लक्षच केले. कमरेवर दोन्ही हात ठेवून महामायेच्या पोझमधे ती उंबऱ्यात उभी होती. ते पाहूनच आता युद्धाला तोंड फुटणार हे अक्षयला कळून चुकले. म्हणजे तसा तो युद्धाला घाबरत नव्हता, पण उगाचच चांगली सकाळ वाया जाणार होती. येणाऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्याने खोल श्वास घेतला. आणि हल्ला झालाच.

“आता बस! खूप सहन केली तुझी असंवेदनता. वर्षानुवर्षे सहनच करतेय! मी माझे सगळे सन्मान, आणि गिफ्ट्स परत करतेय!” आदिती सोसाट्याने आत गेली. काय करावे ते अक्षयला कळेच ना! तो दोन्ही हातांनी डोके गच्च धरून सोफ्यावर कोसळला. ही शांतता देखील त्याला फार वेळ लाभली नाही! अदिती हातात बऱ्याच वस्तू घेऊन परत आली. एकेक करून त्या मिसाईल्स अक्षयवर वेगाने चाल करून आल्या. त्यां मिसाईल्सचे लक्ष्य म्हणजे त्याच्या शरीराचे रँडमली निवडलेले भाग होते.
आदितीवर ह्या हल्ल्यासाठी डोमेस्टिक व्हॉयलन्सची तक्रार करायचे धैर्य आपणात आहे की नाही, हेच अक्षयला कळेना!

त्यां दाणादाणीत देखील त्याचे लक्ष खाली पडलेल्या प्रोजेक्टाइल्सकडे होते. कुठे लग्नाची अंगठी दिसत नव्हती. मंगळसूत्र देखील फेकलेले नव्हते. थोड्या आशेने त्याने निदान पाचव्या वर्षागाठीला दिलेला किमती रत्नहार तरी दिसतोय कां ते चोरून पाहिले. पण किमती असे काहीच फेकलेले नव्हते तिने! “पुरस्कार वापसीचे देखील अलिखित नियम असतात!” अक्षय विषादाने पुटपुटला.

“तू माझा मुळीच आदर करीत नाहीस! मी देखील तू दिलेले सन्मान ठेवणार नाही.” आदितीचा आवाज आता टिपेला पोहचला होता. हुंदके गर्जनां सारखे कान चिरत येत होते. बस! आता माघार नाही. आता कमी पडलो तर पुन्हा बोलायला मिळते- नाही मिळतं! पुरस्कार वापसीच्या चिखलफेकीत सामील होण्याखेरीज दुसरा पर्याय अक्षयला नव्हता!

“आदिती मॅडम....” आपल्याला चांगल्यात चांगला जमणारा डीसीपी प्रद्युम्नचा आवाज काढत अक्षय म्हणाला “कुछ तो गडबड हैं! मला सांगा, जेव्हा मी ऑफीसच्या कामासाठी बाहेरगावी गेलो होतो आणि तू एकटी घराची कामे करीत होतीस, तेव्हा कां तुझे गिफ्ट्स परत केले नाहीस? मी नेहमी बाहेरगावी गेलो की आणखी गिफ्ट्स आणतो म्हणून? आणि, हो, मी कधीतरी तू दिलेले गिफ्ट्स परत केलेय? अगदी तू महिनान महिना माहेरी ठाण मांडून बसली होतीस, तेव्हा मी तुझे पुरस्कार परत केलेत? मग आत्ताच फुसक्या कारणावरून तू हे पुरस्कार फेकलेस? ही फुसकी कारणे काही नक्कीच माझ्या असहिष्णूतेची हद्द नाहीत! आणि आणखी एक. ह्या फालतू वस्तू परत केल्यात, मी दिलेला रत्नहार फेकायला जड वाटला कां?”

एका दमात हे सगळे धडाधड बोलून अक्षयने विजयाचा कटाक्ष आदितीवर टाकला. पण अर्थातच त्याची ही धडपड वायाच गेली. नाकाची गुंजडी झटक्यात उडवून तिने अक्षयचा पार कचरा केला! त्याचे सगळे प्रश्न देखील त्यां कचऱ्यात वाहून गेले.

“आ गये ना अपने औकातपर!” हिंदी सिनेमातले डायलॉग अगदी वेळेवर आदितीच्या सहाय्यास यायचे! “तुला माझ्यापेक्षा त्यां रत्नहाराचीच जास्त किंमत!” हुंदके आता अपार्टमेंटच्या भिंती फोडून बाहेर जाऊ लागले होते.

अक्षय आता सोफ्यात आडवाच कोसळला. आजूबाजूला त्यांच्या आतापर्यंतच्या जोडीदार जीवनाचे तुकडे विखुरले होते. कां कोण जाणे, आदितीचे आक्रस्ताळी हुंदके देखील अक्षयचा सुन्नपणा भंग करू शकत नव्हते. तो मात्र शांतपणे विचार करीत राहिला- “आदिती आणि मी ह्यांत खरा असहिष्णू कोण आहे?

वावरसंस्कृतीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

सूड's picture

6 Nov 2015 - 2:58 pm | सूड

कथा आवडली, पण इतक्या आक्रस्ताळ्या अदितीकाकूंपुढे अक्षयकाकांचं शांत बसणं काही पटलं नाही.

अरुण मनोहर's picture

6 Nov 2015 - 3:02 pm | अरुण मनोहर

बायकोच्या तोफखान्या पुढे कधीच सुन्न झाला नाहीत का? धैर्यवान आहात!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 5:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सूडच्या बायकोपुढे ह्म्म!! =))

प्यारे१'s picture

6 Nov 2015 - 5:23 pm | प्यारे१

इथे आपल्या 'जोड़ी'दाराबद्दल बोलता येतं का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Nov 2015 - 7:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

"जोडी"दार अगगगगगग!!! मेलो मेलो!!

अरुण मनोहर's picture

6 Nov 2015 - 4:46 pm | अरुण मनोहर

काहीही हं काका!
कथेमध्ये अक्षय आणि आदितीची वयं दिसतात काय?
की काकानी लिहीली म्हणजे काकांविषयीच असणार?

सूड's picture

6 Nov 2015 - 7:30 pm | सूड

ह. घ्या हो!!

पद्मावति's picture

6 Nov 2015 - 3:02 pm | पद्मावति

मस्तं खुसखुशीत कथा. आवडली.

मांत्रिक's picture

6 Nov 2015 - 3:06 pm | मांत्रिक

काय झकास लिहिलंयत!!!

पगला गजोधर's picture

6 Nov 2015 - 3:52 pm | पगला गजोधर

खरंतर त्याने आधीच आपली 'मन कि बात', तिच्यापुढे मांडायला हवी होती. त्याने असं गुळणी धरून बसायला नको होते, हि वेळ येई पर्यंत.

अरुण मनोहर's picture

6 Nov 2015 - 4:44 pm | अरुण मनोहर

शांत कुठे बसला? अहो येवढे सगळे प्रतिवाद केलेनीत की! आता यापेक्षा काही बोलायची सहनशक्ती उरली नाही हो!

चांदणे संदीप's picture

6 Nov 2015 - 4:41 pm | चांदणे संदीप

पुरस्कारवापसी आवडली!

प्यारे१'s picture

6 Nov 2015 - 4:47 pm | प्यारे१

माझ्या मते या सगळ्या शांत बसन्या मागे काही कारण असावं. दंगा करणं, पुरस्कार परत देणं वगैरे चालु द्या आम्ही मागच्या मागं काय करायचं ते करतो असं काही?

कपिलमुनी's picture

6 Nov 2015 - 5:02 pm | कपिलमुनी

"वाढत्या महागाईपासून जनतेचे लक्ष विचलीत व्हावा म्हणून मोदी सरकारचाच पुरस्कारवापसी हा कावा आहे "

या प्रतिसादासाठी कपिलमुनींना एक किलो तुरडाळ भेट..

लेख आवडला.

जेप्या बँकेकडून लोन काढलं काय रे?

बॅटमॅन's picture

6 Nov 2015 - 5:29 pm | बॅटमॅन

बाब्बो....त्यापेक्षा टनभर हिरे का नै भेट दिलेस रे जेप्या =))

मी-सौरभ's picture

6 Nov 2015 - 11:22 pm | मी-सौरभ

निवडणुकीच्या टायमाला लै कमाई केली काय? तूर डाळ गिफ्ट ?

टवाळ कार्टा's picture

6 Nov 2015 - 9:06 pm | टवाळ कार्टा

=))

पैसा's picture

6 Nov 2015 - 9:13 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लेख!

उगा काहितरीच's picture

6 Nov 2015 - 10:17 pm | उगा काहितरीच

+१

मजेदार कथा आहे.
तो दोन्ही हातांनी डोके गच्च धरून सोफ्यावर कोसळला. ही शांतता देखील त्याला फार वेळ लाभली नाही!
हा हा हा.

कापूसकोन्ड्या's picture

7 Nov 2015 - 9:32 am | कापूसकोन्ड्या

“जानू, काय झालं?” त्याने शंभर लाईक्सने ओथंबलेल्या आवाजात विचारले.

अप्रतिम