दुसरे मरण (पान १)

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
20 Nov 2007 - 8:39 am

दुसरे मरण
लेखक : होर्हे लुईस बोर्हेस
(प्रकाशनाची तारीख : ९ जानेवारी १९४९, ला नासिओन नियतकालिक, बुएनोस आएरेस, आर्जेंटीना [माझ्या कालगणनेने प्रत अधिकार मुक्त], मूळ स्पॅनिश कथेचा दुवा)
झाली असतील याला दोन वर्षे आता. (गानोनचे मूळ पत्र माझ्या हातचे हरवले आहे.) पत्रात गानोनने मला अशी आगाऊ सूचना दिली होती की "राल्फ वॉल्डो एमर्सनच्या(१) The Past या कवितेचे कच्चे भाषांतर पाठवत आहे." (हे या कवितेचे बहुधा पहिलेच स्पॅनिश भाषांतर होणार होते.) मायन्याला त्याने ताजाकलम जोडले की श्री. पेद्रो दामियान मला आठवत असतीलच - काही दिवसांपूर्वी ते न्युमोनियाने कालवश झाले. कमालीच्या ज्वराने त्यांना वात भरला, आणि त्या भ्रमिष्ट अवस्थेत ते मासोयेरची रक्तबंबाळ लढाई(२) अक्षरशः पुन्हा जगले. ही गोष्ट मला मामूली, म्हणावे तर अपेक्षितही वाटली. पेद्रोसाहेब एकोणीस-विसाव्या वर्षी आंतोनियो सारावीयाच्या सैन्यदलात भरती झाले होते. १९०४च्या उठावाच्या वेळी पेद्रोसाहेब उरुग्वायमध्ये, पायसांदू किंवा रियोग्रांदेच्या छावणीत होते. तसे मूळचे ते आर्जेंटीना मधील एन्त्रेर्रीयोस प्रांतातले, मुक्काम ग्वालेग्वायचे होते. तरी आपल्या साध्या अडाणी साथीदारांइतकेच ते ईर्ष्येला पेटले, आणि त्यांच्या पाठोपाठ लढाईला निघाले. सुरुवातीच्या एका धुमश्चक्रीत आणि मग युद्धाच्या शेवटच्या लढाईत ते लढले. १९०५ मध्ये स्वदेशाला परत आल्यावर निगर्वी चिकाटीने ते शेतकामाला जुटले. माझ्या माहितीप्रमाणे पेद्रोसाहेब पुन्हा आपल्या गावाबाहेर पडले नाहीत. न्यान्कायपासून ५-६ मैलांवर असलेल्या एका आडबाजूच्या वसाहतीत त्यांनी जागा घेतली आणि तिथे त्यांनी पुढची तीस वर्षे काढली. १९४२ च्या सुमारास त्याच वैराण ठिकाणी मी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. म्हणजे, गप्पा मारायचा प्रयत्न केला होता. माणूस म्हणावे तर अबोल, डोक्याने मंद ट्यूबलाईट होते. मासोयेरच्या गोंगाटाचा आणि आवेशाचा त्यांच्या जीवनाच्या कथेवर इतका पगडा बसला होता, की मृत्यूच्या घटकेला त्यांनी तो पुन्हा जगावा यात मला काहीच आश्चर्य वाटले नाही. पेद्रो दामियान हे मला पुन्हा भेटणे नाही हे लक्षात आले, आणि मला त्यांच्या आठवणी उजळाव्याशा वाटल्या. प्रत्यक्ष बघितलेल्या माणसाची आठवण मला अंधुकच होती. त्यापेक्षा गानोनने त्यांचा घेतलेला फोटोच माझ्या आठवणीत अधिक होता. यात विक्षिप्त असे काही नाही - प्रत्यक्ष त्यांची माझी भेट एकदाच १९४२च्या सुरुवातीला झाली होती, फोटो मात्र मी बरेचदा पाहिला होता. गानोनने मला पाठवला खरा, पण आता तो माझ्या हातचा हरवला आहे. मी त्याचा शोधही घेत नाही. तो सापडलाच तर मला त्याची भीती वाटेल.
पुढची घटना काही महिन्यांनी मोंतेविदेओ (उरुग्वाय) येथे घडली. श्री पेद्रो दामियान यांच्या ज्वराच्या आणि भ्रमाच्या ओघाने मला मासोयेरच्या पराभवावर एक अद्भुतरम्य कथानक सुचले. त्याचा उल्लेख मी एमीर रोद्रीगेस मोनेगाल याच्यापाशी केला. त्या मोहिमेत कोणी एक कर्नल दियोनीसियो तावारेस लढले होते, ओळखीखातर त्यांच्या नावे त्याने मला चिठ्ठी दिली.
संध्याकाळच्या जेवणानंतर त्यांनी मला घरी यायची वेळ दिली. झोक्यावर झुलत झुलत मोठ्या जिव्हाळ्याने गतकाळच्या आठवणीचे पाल्हाळ त्यांनी मला सांगितले. दारूगोळा पोचायचा तो कसा पोचलाच नाही, धुळीने माखलेली माणसे अर्ध्या झोपेत मोहिमेचे व्यूह कसे रचायची, सारावीया मोंतेविदेओला चाल करून येता येता कसा काय थांबला ("त्या काऊबॉय गड्याला शहराची भीती वाटायची"), एकेका मुडद्याचे शिर केवळ कातडीने लोंबताना कसे दिसायचे, कितीतरी कथा! या कथांमध्ये गृहयुद्ध म्हणजे दोन फौजांची टक्कर वाटण्यापेक्षा एखाद्या रफूचक्कर काऊबॉयचे स्वप्नरंजनच वाटले. त्यांनी इयेस्कासच्या, तुपांबायेच्या, मासोयेरच्या गोष्टी सांगितल्या. प्रत्येक कथासूत्र ते इतक्या तयार वाक्यांत, इतक्या तपशीलवार सांगत होते, की ही वर्णने त्यांनी खूपवेळा सांगितली आहेत, अशी मला जाणीव झाली. मला शंका वाटू लागली की शब्दांपाठीमागच्या आठवणी कधीच पसार झाल्या असाव्यात. ते दम खायला थांबलेत, तेवढ्यात मी पेद्रो दामियानचे नाव काढण्याचे जमवले.
"दामियान? पेद्रो दामियान?" कर्नल म्हणाले. "हा फौजेत माझ्याच बरोबर होता. गिड्डासा आदिवासी... गावंढळासारखे त्याला लोक 'दायमान' म्हणून हाक मारायचे." खदाखदा हसताना एकाएकी ते अस्वस्थ झाल्यासारखे थांबले. आता ते खरोखरचे, की अस्वस्थपणाचे सोंग ते कोणास ठाऊक. बोलण्याचा स्वर बदलून ते म्हणाले, "युद्ध हे बाईसारखे असते - ते मर्दपणाला खर्‍या कसोटीला लावते. लढाईत पडण्याच्या आधी कोणाची कोणाला ओळख नसते. भित्रा वाटणारा एखादा शूर निघतो, आणि एखाद्याचे नेमके उलटे होते.
(क्रमशः)
दुसर्‍या पानाचा दुवा

दुवे : पान एक, दोन, तीन, चार (अखेर)
-----
तळटिपा :
१. १९व्या शतकातील राल्फ वॉल्डो एमर्सन, एडगर ऍलन पो वगैरे स्वच्छंदी नाविन्यपूर्ण अमेरिकन साहित्याचे युरोपातील आणि दक्षिण अमेरिकेतील रसिकांना मोठे अप्रूप वाटे.
२. उरुग्वायच्या गृहयुद्धाची शेवटची लढाई. १९०४च्या निवडणुकीत "कोलोरादो" पक्ष जिंकला. काही राज्यांत "ब्लांको" पक्ष सत्तारूढ होता. ब्लांको पक्षाचे वर्चस्व मानणार्‍या सैनिकांनी आंतोनियो सारावीयाच्या नेतृत्वाखाली बंड केले. मासोयेरच्या लढाईमध्ये बंडवाल्यांचा अखेर पराभव झाला.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:13 pm | विसोबा खेचर

सुरवात तरी अंमळ भारीच वाटते आहे बुवा! पुढचे भाग येऊ द्या...

मी व्यक्तिश:, अनुवादीत साहित्याचं मिसळपाववर स्वागत करतो...

तात्या.

धनंजय's picture

27 Nov 2007 - 4:06 am | धनंजय

येथे वाचता येईल
http://www.infoplease.com/t/poetry/emerson-poems/the-past.html