सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स, मॅनेजर्स, असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे.
मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं. त्यांना स्वतःच्या व्यवसायाविषयी लिहिण्यासाठी मुक्तहस्त दिला. शिक्षणाचं स्वरूप, शिकतानाचे बरे-वाईट अनुभव, काम करतानाचे अनुभव, हा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी लागणारे गुण, आजवरचा प्रवास, अशा बहुविध पैलूंवर या लेखकांनी लिहिलं आहे. श्रीगणेश ही बुद्धीची देवता. त्यामुळे श्रीगणेश लेखमालेत व्यवसायांवर आधारित लेख यावेत हे औचित्य साधलं गेल्याचा आनंद आहे.
मिपावर यापूर्वीही 'अकादमी', 'गुरुजींचं भाव-विश्व', 'राजाराम-सीताराम', 'पूर्वेच्या समुद्रात', 'प्रांतांच्या गोष्टी' अशा कार्यक्षेत्राशी निगडित लेखमाला आल्या आहेत, लोकप्रिय झाल्या आहेत. अशीच लोकप्रियता याही लेखमालेला मिळो, ही श्रीगणेशाचरणी प्रार्थना.
ही लेखमाला प्रत्यक्षात आणण्यात संपादक मंडळाचे आणि साहित्य संपादक मंडळाचे श्रम कारणीभूत आहेत. तरी या लेखांचं श्रेय सर्वस्वी लेखकांचंच आहे. 'फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥' अशीच संमंची आणि सासंमंची भावना आहे.
मिपासंवाद या नवीन मंचाद्वारे जुन्या जाणत्या मिपाकरांनी आणि काही माजी संपादकांनी खूप छान सूचना केल्या आणि लेख गोळा करण्यात मदत केली. सुधांशु नूलकर यांनी मुद्रितशोधनाचं मोठं काम करून मालिकेतील लेख दिवाळी अंकाप्रमाणेच सुव्यवस्थित करून दिले आहेत. त्यांना सर्वांना विशेष धन्यवाद!
उद्यापासून (ता० १८ सप्टेंबर) ते अनंत चतुर्दशीपर्यंत रोज एक लेख प्रसिद्ध होईल.
***************
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा||
***************
प्रतिक्रिया
17 Sep 2015 - 10:15 am | जेपी
श्रीगणेश लेखमालीकेला शुभेच्छा.
17 Sep 2015 - 10:26 am | एस
मेजवानीची सुरुवात! लेखांच्या प्रतीक्षेत...!
17 Sep 2015 - 10:39 am | मुक्त विहारि
म्हणूनच तर आम्ही "मिपाकर" झालो.
17 Sep 2015 - 10:50 am | नया है वह
_/\_लेखमालेला शुभेच्छा _/\_
17 Sep 2015 - 1:49 pm | आदूबाळ
या बात! एक नंबर!
17 Sep 2015 - 1:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
मेजवानी च्या प्रतिक्षेत !!!
वसंत किंवा हेमंत व्याख्यानमालेत जसे "प्रथम पुष्प" "अष्टम पुष्प" वगैरे असते तसे रोजच्या एका लेखाला "प्रथम मोदक" "द्वितीय मोदक" असे म्हणावे काय! मिपा च्या लौकिकाला शोभेल ते!
17 Sep 2015 - 1:58 pm | अभ्या..
म्हणा म्हणा. छान ऊकडलेलेच आहेत सगळे.
थोडे केशर कमी जास्त होईल इतकेच.
17 Sep 2015 - 5:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्कं. सोलापुरी मोदक किती तारखेला? =))
17 Sep 2015 - 2:06 pm | पैसा
लेखमालेला शुभेच्छा! आदूबाळाने खूप कष्ट घेतलेत. आदूबाळाला धन्यवाद!
17 Sep 2015 - 7:15 pm | अन्या दातार
बाळ लैच कष्टाळू अन गुणी हाये.
17 Sep 2015 - 7:19 pm | आदूबाळ
लोल! माझ्या बॉसला तुझा नंबर देतो.
17 Sep 2015 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रास्ताविक आवडलं ! आदुबाळ जियो.
एकेक लेख निवांत वाचुन लेखकांना दाद देईनच.
-दिलीप बिरुटे
17 Sep 2015 - 3:40 pm | मित्रहो
लेखांच्या प्रतिक्षेत
17 Sep 2015 - 4:11 pm | प्रियाजी
आम्ही वाचायला अन कोउतीक करायला तयार आहोत.आगामी लेखमालेसाठी शुभेच्छा.
17 Sep 2015 - 4:17 pm | प्रभाकर पेठकर
बहुरंगी, बहुढंगी लेखांनी नटलेल्या गणेशलेखमालेचे हार्दीक स्वागत आणि ह्या मागे ज्यांचे ज्यांचे परिश्रम आहेत त्यांचे मनःपूर्वक कौतुक.
17 Sep 2015 - 5:50 pm | बहुगुणी
आता वाचन-सुखाची प्रतीक्षा.
17 Sep 2015 - 7:44 pm | बोका-ए-आझम
म्हणजे प्रश्नच नाही. शशकस्पर्धा सुंदर आयोजित केली होती.
17 Sep 2015 - 8:41 pm | सुधांशुनूलकर
ही कल्पनाच फार भन्नाट आहे, त्यामुळे लेखमालाही भन्नाटच होणार.
वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. मिपाकर किती वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्यरत आहेत, त्याची एक ओझरती झलक..
उद्यापासून सुरुवात..
17 Sep 2015 - 8:45 pm | रेवती
वाचणार.
17 Sep 2015 - 9:48 pm | तुषार काळभोर
असं काही मिळतं आणि मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो
17 Sep 2015 - 10:00 pm | अजया
उत्तमोत्तम लेखांच्या मेजवानीसाठी सज्ज!
18 Sep 2015 - 11:01 am | चाणक्य
कल्पना. वाचनोत्सुक
18 Sep 2015 - 12:41 pm | पिशी अबोली
संमं आणि सासंमं चे विशेष अभिनंदन!
नवनवीन क्षेत्रांबद्दल जाणून घ्यायच्या प्रतीक्षेत.. :)
27 Sep 2015 - 1:01 pm | लाल टोपी
शी गणेश लेखमालेतील दहावा लेख आज प्रकाशीत झाला. नवनवीन क्षेत्राची ओळख करुन देणारी, रोज वेगळ्या विश्वात घेऊन जाणाती ही मालीका संपली म्हणून मनाच्या आता चुकल्या-चुकल्या सरखे होईल. व्यक्तिशः मला या लेखनाच्या निमित्ताने 'अरे ईतकी वर्ष झाली' असा अंतर्मुख होऊन विचार करायला लावला..खरोखरच आभार
रोज रात्री १२.०० च्या सुमारास लेख प्रकाशीत करण्यासाठी आणि ही मालिका यशस्वी करण्यासाठी झटणा-या आदूबाळ, पैसाताई आणि इतरही पडद्याआडील व्यक्तींचे आभार.
आता वेध दिवाळी अंकाचे....
27 Sep 2015 - 1:42 pm | पैसा
सगळे श्रेय तुम्हा लेखकांचे! आम्ही तो हमाल भारवाही!! मात्र आवर्जून आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!
27 Sep 2015 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर
दिवाळी अंकातील लेखांचे नियम - अटी संबंधी एक धागा टाका.
27 Sep 2015 - 1:40 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/32655 ३ सप्टेंबरलाच काढलाय. या वर्षीच्या अंकाचे मुख्य संपादक प्रा.डॉ. दिलीप बिरुटे आहेत. दिवाळी अंक लिखाणासंबंधात थेट त्यांना संपर्क केला तरी चालेल. अंक छान होणारच!
27 Sep 2015 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
ओह. सॉरी.
माझ्या लेखन कार्यात(?) आणि प्रतिसादांमध्ये गुंतुन पडल्याने हा धागा नजरेतून सुटला.
म्हणतात नं, 'स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला...'
27 Sep 2015 - 1:46 pm | पैसा
तेव्हा तुम्ही भारतात येऊन बिझी होतात. आणि मग श्रीगणेश लेखमालेच्या लेख पूर्ण करण्यासाठी मी तुमचा जीव खाल्ला! =)) तो लेख मात्र मिपावरच्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक झालाय!
27 Sep 2015 - 2:11 pm | बोका-ए-आझम
कष्ट घेणा-या आदूबाळ, पैसातै, अजयातै, सुधांशू नूलकर आणि इतर सर्व संपादकमंडळातील सदस्यांचे मन:पूर्वक आभार.
___/\____
27 Sep 2015 - 2:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गणेश लेखमालेमधे लिहिणारे सर्व लेखक, पडद्यामागची लेखनसुधारणा करणारे नुलकरकाका, रात्री उशिरापर्यंत जागुन लेख वेळच्यावेळी टाकणार्या पैसातै, लेखमालेची सर्व जबाबदारी जबाबदारीने पाड पाडणारे आदूदादुस व हि लेखमाला यशस्वीपणे पार पाडणारे इतर सर्व ह्यांचे आभार :)
27 Sep 2015 - 2:26 pm | चांदणे संदीप
श्री गणेश लेखमाला संपल्यावर अगदी लहानपणी गणपती जाताना जसे वाटायचे तसेच काहीसे वाटत आहे.
अशी उत्तम लेखमाला आयोजित करून आम्हा वाचकांना नुसतीच वाचनमेजवानीच नव्हे तर वाचकांना प्रेरणा मिळेल, शिकण्यास मिळेल, ज्ञानात भर पडेल, पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळेल असे उत्कृष्ट लेख अनुभवसमृद्ध वल्लींकरवी आमच्या पदरात टाकलेत, याबद्दल आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत!
संमंचे तसेच सर्व पडद्यामागील अवलियांचे यानिमित्ताने आभार.
पुढील लेखमालेसाठी तसेच येणाऱ्या दिवाळी अंकासाठीही खूप खूप शुभेच्छा!!
Sandy
27 Sep 2015 - 2:33 pm | मृत्युन्जय
संमंचे, आणी आदूबाळ आणी नूलकरांचे अनेक आभार. आदूबाळने वेळेच्या आधीच कल्पना देउनही नेहमीप्रमाणे माझ्याकडुन लेख देण्यासाठी गणेश चतुर्थी उलटुन जावी लागली. त्याने अतिशय संयमाने वेळोवेळी फॉलोअप घेतला. मिपाने ही लेखनाची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
28 Sep 2015 - 8:21 am | सुहास झेले
संपादक मंडळाचे आवर्जून आभार... एक हटके नैवैद्य आम्हा मिपाकरांना दिल्याबद्दल :)
28 Sep 2015 - 9:47 am | सुबोध खरे
संपादक मंडळाचे आवर्जून आभार... एक हटके नैवैद्य आम्हा मिपाकरांना दिल्याबद्दल +१००
शिवाय सर्व लेखकांना.
बर्याच वेगवेगळ्या क्षेत्रांच्या तोंड ओळखी करून दिल्याबद्दल
28 Sep 2015 - 8:29 am | मुक्त विहारि
सर्व लेखकांचे/लेखिकांचे आभार मानावेत तितके कमी.
संपादक मंडळींचे पण आभार मानतो.
आता, संपादक मंडळाने, थोडी साफ सफाई केली तर ह्या वर्षापासून दसरा-दिवाळी पण जोरदार साजरी साजरी होवू शकते.
28 Sep 2015 - 9:57 am | देशपांडे विनायक
लेखमाला आवडली . असे लेख वाचण्यासाठीच येथे येतो .
सर्व लेखकांचे आणि लेख माझ्यापर्यंत पोहचविणारे या सर्वांचे आभार
28 Sep 2015 - 5:00 pm | खटपट्या
या लेख मालेची लिंक पुढच्या गणेशोत्सवापर्यंत ठेवावी. ज्यांना कोणाला हवी असेल त्यांना ती देता येइल. ही लेखमाला एवढी सुंदर झाली आहे की नुसत्या लिंका फोरवर्ड केल्याबद्दल मला कायच्या काय धन्यवाद देतायत मित्र. या लेखमालेमुळे मिपाकरांमधे अजुन भर पडणार हे निश्चित.
28 Sep 2015 - 5:39 pm | सूड
सुंदर उपक्रम, काही लेख खरोखरच सुंदर आहेत.