क्रीडायुद्धस्य कथा - दहा सेकंदांचं युद्ध

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
29 Aug 2015 - 2:07 pm

"तुला माहित्ये .... सगळे नऊच्या नऊ ग्रह जर एका लायनित आले ना..... त्या दिवशी पृथ्वी खतम होऊन जाणार!" आमचे ८ वर्षांचे ज्येष्ठ मित्रवर्य आम्हा ६ वर्षाच्या पोरांना सांगायचे. ते ऐकून जी टरकली होती म्हणता....त्यानंतरचे बरेच दिवस आकाशाकडे बघून सगळ्या ग्रह तार्यांची पोझिशन तपासण्यात गेले होते. जाम टेन्शन आलं होतं तेव्हा. तेव्हाच्या प्रदुषणविरहित आकाशात नेहमी दिसणारे गुरू, शनी, मंगळ वगैरे एकमेकांपासून हातभर अंतर ठेऊन आहेत बघितलं की हायसं वाटायचं. पल्याड शुक्र, बुध आणि न दिसणारे राहू केतू काही का गोंधळ घालेनात. जोपर्यंत ही नऊ लोकं एकत्र येत नाहीत तो पर्यंत प्रॉब्लेम इल्ले. पण समजा आले एकत्र तर राडाच के भौ.

ऑलमोस्ट तोच फील परवा बी़जिंगमध्ये झालेल्या जागतिक मैदानी स्पर्घेच्या १०० मीटर्सच्या अंतिम फेरीच्या वेळी येत होता. आणि का येऊ नये? जगातले सर्वांत वेगवान नऊ मानव एका ओळीत उभे होते. जागतिक स्पर्धेने अर्थातच अनेक दिग्गजांची धाव बघितली आहे पण ह्या वेळी पहिल्यांदाच मोसमात १०० मीटर्स अंतर १० सेकंदांपेक्षा कमी वेळात पार केलेले २-३ नाही... नऊच्या नऊ स्पर्धक जगातल्या सर्वात वेगवान मानवाचा खिताब जिंकण्यासाठी आपली शक्ती पणाला लावत होते. तुम्ही जर कधी ट्रॅकशेजारी उभं राहून अव्वल स्प्रिंटरला धावताना बघितलंत तर जमीन हादरल्याचा भास होत्तो. इथे तर ९ खंदे वीर जागतिक विजेतेपदासाठी जिवाची बाजी लावणार होते. ह्या शर्यतीचा थरार झेलण्यासाठी बीजिंगच्या अतिभव्य "बर्ड्स नेस्ट" राष्ट्रीय स्टेडियममध्ये वापरलेल्या १,१०,००० टन स्टीलची कसोटी लागणार होती. एक योहान ब्लेक सोडला तर वेगवान धावपटूंची अफलातून मांदियाळी जमली होती. दृष्ट लागावी असा स्टार्टिंग लाइन अप - प्रत्येक खेळाडूचं नाव प्रतिभावंतांच्या यादीत खूप खूप वरचं.

लेन १ - फ्रांसचा राष्ट्रीय विजेता जिमी विकौत - सर्वोत्तम वेळ ९.८६ से
लेन २ - यजमान चीनचा बिन्गशान शू - सर्वोत्तम वेळ ९.९९ से
लेन ३ - २० वर्षांचा नवोदित अमेरिकन ट्रेव्हन ब्रॉमेल - सर्वोत्तम वेळ ९.८४ से
लेन ४ - अमेरिकेचाच माइक रॉजर्स - सर्वोत्तम वेळ ९.८५ से
लेन ५ - जगज्जेता, ऑलिंपिक विजेता, स्प्रिंटचा बादशहा उसेन बोल्ट - सर्वोत्तम वेळ ९.५८ से
लेन ६ - माजी जागतिक विजेता टायसन गे - सर्वोत्तम वेळ ९.६९ से
लेन ७ - आजमितीला बोल्टचा सर्वोत्तम प्रतिद्वंद्वी - जस्टिन गॅटलिन - सर्वोत्तम वेळ ९.७४ से
लेन ८ - बोल्टचा देशबंधू झंझावाती असाफा पॉवेल - सर्वोत्तम वेळ ९.७२ से
लेन ९ - कॅनडाचा २० वर्षीय आंद्रे दे ग्रास - सर्वोत्तम वेळ ९.९५ से

स्प्रिंटचा सम्राट बोल्ट, त्याला आव्हान देणारे दोन अनुभवी अमेरिकन्स गे आणि गॅटलिन, पॉवेल आणि रॉजर्ससारखी तगडी नावं आणि दे ग्रास, विकौत आणि ब्रॉमेलसारखे सळसळत्या रक्ताचे तरूण. आपलं जागतिक विजेतेपद टिकवण्याचं बोल्टपुढचं आव्हान कधी नव्हे इतकं कठीण होतं. टायसन गे, ब्रॉमेल, असाफा पॉवेल तर फॉर्मात होतेच पण बोल्टपुढे खरं आव्हान होतं ते बंदीनंतर कात टाकलेल्या, आपल्या आयुष्यातल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या, चवताळून उठलेल्या जस्टिन गॅटलिनचं. पायाच्या दुखापतीमुळे बोल्ट ह्या मोसमात मोजून दोन शर्यती धावला होता. २०१६ रियो ऑलिम्पिक्ससाठी पूर्ण फिट व्हायला अजून खूsssप पल्ला गाठायचा होता. लंडनमध्ये अॅनिवर्सरी गेम्स जिंकताना नोंदवलेली ९.८७ से वेळ फार आश्वासक नक्कीच नव्हती. काही धुरिणांनीतर ही उसेन बोल्टच्या शेवटाची सुरुवात असल्याचंही अनुमान काढलं.

ह्या उलट दोन वेळा उत्तेजक द्रव्य सेवनासाठी बंदी घातली गेल्यावर जस्टिन गॅटलिननं पुनरागमनासाठी जिवाचं रान केलं होतं. २०१५ मध्ये गॅटलिन जणू काही आधीच्या सगळ्या चुकांचा हिशोब चुकता करण्यासाठी धावत होता. ह्या मोसमात तब्बल २८ शर्यतींमध्ये अजिंक्य राहिलेल्या आणि सतत ९.८३ पेक्षा कमी वेळ नोंदवलेल्या गॅटलिनला बोल्टचं सार्वभौमत्त्व मोडून काढायची ही सुवर्णसंधी होती. ६ फूट ५ इच उंचीमुळे बोल्टला सुरुवातीचे काही मीटर्स बाकीच्यांपेक्षा जास्त वेळ लागतो. ह्याउलट गॅटलिन त्याच्या स्फोटक सुरुवातीसाठी प्रसिद्ध! गॅटलिनने जर जोरदार सुरुवात केली आणि बोल्टला पहिल्या १० मीटर्स मध्ये मागे टाकलं तर आधीच आत्मविश्वास कमी झालेल्या, कधी नव्हे ते स्वथंच्या क्षमतेबद्दल किंचित साशंक असलेया बोल्टवर प्रचंड दबाव पडणार होता. गॅटलिन, कोच ब्रूक्स जॉन्सन आणि त्याच्या सगळ्या टीमला ह्याची पुरेपूर कल्पना होती आणि म्हणूनच गॅटलिनला बोल्ट शेजारची लेन हवी होती. त्याला रियोच्या आधी बोल्टच्या आत्मविश्वासावर निर्णायक घाव घालायचा होता.

बोल्टची गणना आता सर्वकाळच्या सर्वश्रेष्ठ अ‍ॅथलीट्समध्ये केली जाते. आपण असे अनेक दिग्गज बघितले आहेत ज्यांनी एखाद्या दुखापतीनंतर अशक्य वाटावं असं पुनरागमन केलंय. पण मुहम्मद अलीला पहिल्या काही राऊंड्स मार खाण्याची आणि मग अंदाज घेऊन प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढवण्याची मुभा होती. सचिन तेंडुलकरला इनिंगमधले पहिले काही चेंडू जम बसवण्यासाठी खेळून काढता येत होते, नदालला पहिल्या काही फेर्‍यांमध्ये कमकुवत खेळाडूंशी खेळणं शक्य होतं. पण शंभर मीटर्स स्प्रिंटमध्ये असे लाड चालत नाहीत. शंभर मीटर अंतर सगळ्यात लवकर कोण पळतो अस साधा सोपा सरळ सवाल. नऊ पूर्णांक काही दशांश सेकंदांत काय अंदाज घेणार आणि काय मुसंडी मारणार? एकंदर सगळी दानं बोल्टच्या विरोधात होती.

Bolt had nothing to gain and Gatlin had nothing to lose

अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत गॅटलिनची वेळ सर्वोत्तम होती तर बोल्ट आपल्या रंगात आलाच नव्ह्ता. बर्याच महिन्यांनी पुनरागमन करताना आपलं वर्चस्व सिद्ध करायला लागायची ही बहुधा त्याची पहिलीच वेळ. समोरचं आव्हान तगडं. बोल्टचा खरा कस लागणार होता. स्टार्ट लाइनवर आपलं नाव पुकारलं गेल्यावर बोल्टने कॅमेर्याकडे बघून नेहेमीसारखे हावभाव केले. पण तो नेहेमीचा हरफनमौला बोल्ट नव्हता. कदाचित पहिल्यांदाच बोल्ट "कोणाकडूनतरी हरण्याच्या" दबावाखाली धावत होता.

सगळ्यांची उत्सुकता तुटेपर्यंत ताणली गेलेली. "ऑन युवर मार्क्स" ची घोषणा होण्याआधीच ९ च्या ९ धावपटू आपल्या पोझिशन्सवर आलेले. वातावरणातला तणाव तिथल्या शांततेत जाणवत होता. डोळे मिटलेल्या कोणाला तिथे ८० हजार लोकं आहेत असं वाटलंही नसतं. टीव्हीवरचे कॉमेंटेटर्ससुद्धा क्षणभर काय बोलावं विसरत होते. "सेट"...... आणि स्टार्टर पिस्टलचा आवाज घुमला.

अपेक्षेप्रमाणे तरुण दे ग्रास आणि माइक रॉजर्स सर्वांत आधी ब्लॉक्समधून बाहेर पडले... पाठोपाठ गॅटलिन... आणि.... लगेचच एरवी ८ वा ९ व्या क्रमांकावर अपेक्षित असलेला बोल्ट... मागून गे, ब्रॉमेल वगैरे. पहिल्या आणि नवव्या धावपटूच्या सुरुवातीत फरक किती? काही शतांश सेकंदांचा! पहिले काही मीटर्स.... रॉजर्स, ब्रॉमेल, गॅटलिनच्या अगदी मागोमाग चक्क बोल्ट.... ६ फूट पाच इंच माणसाकडून इतकी वेगवान सुरुवात अपेक्षित नव्हती... किमान गॅटलिनला तर नाहीच नाही. पहिल्या काही मीटर्समध्ये मोठी आघाडी घेण्याचा गॅटलिनचा डाव उधळला गेला .... बोल्टला किमान एक मीटर पुढे गॅटलिन दिसायला हवा होता पण गॅटलिन अजून बोल्टच्या पेरिफेरल व्हिजनमध्येच होता....चाळीस मीटर्सपर्यंत बोल्टला मोमेटम आला होता... बोल्टला हरवण्याची स्वप्नं बघणार्‍या कोणासाठीही पहिले २०-३० मीटर्स मध्येच सर्वांत चांगली संधी असते. कारण शेवटचे पन्नस-साठ मीटर्स म्हणजे बोल्टचा इलाखा .... होमो सॅपियन्स म्हणवणार्‍या कोणत्याही प्राणीमात्राला त्या साठ मीटर्समध्ये बोल्टला हरवणं केवळ अशक्य होतं..... गॅटलिन तरी जीव तोडून धावत होता.... ५० ते साठ मीटर्सपर्यंत ४ जणं एकत्र होते... पण ७० मीटर्सच्या आसपास बोल्ट - गॅटलिन आणि बाकीचे ह्यांच्यामध्ये बर्‍यापैकी अंतर निर्माण झालं.... आता हा दोन चिवट लढवय्या अ‍ॅथलीट्समधला सामना होता. गॅटलिन पूर्ण शक्तिनिशी धावत होता आणि बोल्ट आपल्या थकलेल्या शरीराच्या प्रत्येक कणाला, प्रत्येक पेशीला आपल्या मर्यादांच्या पलिकडे जाऊन झुंजायला लावत होता..... अंतिम रेषेजवळ येताना सुद्धा दोघांच्यात प्रकाशाची तिरीप जाणाइतकंसुद्धा अंतर नव्हतं.... पण शेवटच्या क्षणी बोल्टने आपल्या उंचीचा फायदा घेत मुसंडी मारली आणि तिच निर्णायक ठरली!

Finish
(छयाचित्र सौजन्यः http://www.iaaf.org/)

काही क्षणांतच स्कोअरबोर्डवर निकाल झळकला:
"सुवर्ण - उसेन बोल्ट - ९.७९ से
रौप्य - जस्टिन गॅटलिन - ९.८१ से
कांस्य - आंद्रे दे ग्रास आणि ट्रेव्हन ब्रॉमेल - ९.९२ से"

टीव्हीवरच्या समालोचकानी यथार्थ शब्दांत बोल्टच्या ह्या विजयाचं वर्णन केलं... "He has saved his title, he has saved his reputation.... he even may have saved his sport".

ह्या शर्यतीची यूट्यूब चित्रफीत

कारण स्पष्ट होतं.... "ट्रॅक अँड फील्ड" खेळांचा बोल्ट हा आदर्श प्रतिनिधी आहे. एरवी डोपिंग, खुनशीपर्यंत जाणारी स्पर्धा, खेळांत नको इतक्या प्रमाणात आलेली व्यावसायिकता, मानवी मर्यादांना अजून पुढे ढकलण्याच्या नादात खेळांत निर्माण झालेल्या अनेक अपप्रवृत्ती ह्या सगळ्यांमध्ये बोल्ट त्याच्या शारिरिक उंचीपेक्षाही जास्त "कलोसस" आहे. "मि. क्लीन" आणि अत्यंत कष्टाळू असला तरी बोल्ट आपल्या अविश्वसनीय कामगिरीच्या आणि मस्तमौला व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रेक्षकांना खेचून आणतो. बोल्ट धावत असताना लोकं आपले देश, वर्ण, धर्म सगळं विसरून त्याला प्रोत्साहन देत असतात कारण बोल्टने फक्त जमैकाच्या प्रतिनिधित्त्वाची सीमा कधीच ओलांडली आहे. तो आता धावतो तो तुमच्या आमच्यासाठी धावतो. जणू काही बोल्ट ही मानवी शरीराच्या वेगाच्या मर्यादेचं परिमाण झालाय. त्याच्या कामगिरीतला सुधारलेला प्रत्येक शतांश सेकंद जणू माणसाच्या कक्षा अजून रुंदावतोय.

बीजिंगमधलं ते दहा सेकंदांचं युद्ध जिंकून बोल्टनी त्याच्या पायातल्या अदृश्य बेड्या तोडल्या.... वार्‍याला पकडण्याची एक संधी होती ती आता निसटली.... दोनच दिवसांनी २०० मीटर्स फायनल्समध्ये जो जुना बोल्ट दिसला....ज्या पद्धतीने त्यानी निवांतपणे अंतिम रेषा पार करताना दोन्ही अंगठे छातीकडे दाखवत "मी परत आलोय" ची घोषणा केली त्यावरून त्यानी त्याला हरवण्याची स्वप्नं बघणार्‍या प्रत्येकाला जणू हेच सांगितलं की "I am off.... Catch me if you can!"

Victory
(छायाचित्र सौजन्य: गेटी इमेजेस)

क्रीडाअभिनंदनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

29 Aug 2015 - 2:18 pm | अन्या दातार

अहाहा!! काय ते वर्णन. ९ धावकांची नवग्रहांशी केलेली तुलना आणि लेखाची केलेली सुरुवात ही अगदी जे.पी. क्लास :)
भारीच रे मॉर्गनरावा.

९-१० सेकंदाच्या शर्यतिचं इतकं डिट्टेल आणि रोचक वर्णन तुम्हीच लिहू शकता .
जबर

बहुगुणी's picture

29 Aug 2015 - 6:02 pm | बहुगुणी

९-१० सेकंदाच्या शर्यतिचं इतकं डिट्टेल आणि रोचक वर्णन तुम्हीच लिहू शकता.अगदी खरंय!

रंगासेठ's picture

30 Oct 2015 - 2:40 pm | रंगासेठ

अगदी सहमत

चांदणे संदीप's picture

29 Aug 2015 - 2:32 pm | चांदणे संदीप

खिळवून ठेवणारा बोल्ट आणि तसाच वेगवान लेख!

ह्या अंतीम फेरीआधी आम्हा मित्रांमध्ये बोल्ट हरणार बहुतेक अशीच चर्चा होती, पण अर्थातच बोल्टने आम्हांलाही हरवले!

मग तो जिंकल्यावर तासभर त्याचे फोटो गुगलून पाहिले, विकीपिडीयावरची त्याची माहिती पुन्हा पुन्हा वाचून काढली. युवराजसिंग आणि ख्रिस गेलबरोबरचे फोटो आवडीने मित्रांना दाखवले.

एक एकटा एकटाच's picture

29 Aug 2015 - 3:46 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

मजा आली वाचुन

चाणक्य's picture

29 Aug 2015 - 4:38 pm | चाणक्य

काय लिहीलय राव तुम्ही. लैच आवडलं. पुन्हा पुन्हा वाचणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2015 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तम् मस्त समालोचन ! ...आणि नंतरचे विष्लेशणही !

चतुरंग's picture

29 Aug 2015 - 6:55 pm | चतुरंग

उसेन (लाईटनिंग) बोल्ट असंच त्याचं वर्णन केलं जातं. अरे शर्यत सुरु झाली म्हणेपर्यंत संपतेदेखील. खस जेपीट्च असलेले वर्णन वाचून दिवस मस्त सुरु झाला.
बीबीसीने बनवलेली बोल्टवरची डॉ़यूमेंट्री, बहुतेक बघितलीच असेल पण तरीही दुवा -
https://www.youtube.com/watch?v=UB_ZQfxXbTc

-रंगा

शलभ's picture

29 Aug 2015 - 9:29 pm | शलभ

खूपच सुंदर..
जेपमो मोर्गन म्हंजे मेजवानी.

एस's picture

29 Aug 2015 - 10:05 pm | एस

_/\_

शेखर काळे's picture

29 Aug 2015 - 10:06 pm | शेखर काळे

सुंदर वर्णन ..

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2015 - 11:00 pm | बोका-ए-आझम

स्टेडियममध्ये नेलं अगदी.

उगा काहितरीच's picture

30 Aug 2015 - 1:08 am | उगा काहितरीच

कडक !

तुमचा अभिषेक's picture

30 Aug 2015 - 1:35 am | तुमचा अभिषेक

कमाल कमाल लेख आहे अक्षर्शा !!
लहानपणी थिएटरमध्ये जो जिता वही सिकंदर पाहिलेला तेव्हा एक फिनिशलाईनचा थरार अनुभवलेला, तशीच अनुभुती या लिखाणाने दिली ..

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 7:30 am | मांत्रिक

सहमत! जब्बरदस्तच!

यशोधरा's picture

30 Aug 2015 - 6:38 am | यशोधरा

मस्त लिहिलंय!

मार्गी's picture

30 Aug 2015 - 7:16 am | मार्गी

अत्यंत सुंदर लेख. विश्लेषण आवडलं. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Aug 2015 - 7:57 am | कैलासवासी सोन्याबापु

वाचता वाचता कधी श्वास रोखला गेला कळले नाही राव! सुंदर!

पुण्याची दीपी's picture

31 Aug 2015 - 4:01 am | पुण्याची दीपी

अंगावर काटा आला वाचुन !!! अतिशय सुंदर लेखन

सौंदाळा's picture

31 Aug 2015 - 10:39 am | सौंदाळा

शर्यतीइतकाच थरारक लेख.
धोनी (का रैना ?) च्या एका मुलाखतीतला त्याने सांगितलेला किस्सा.
धोनी देहभान हरपुन बोल्ट्ची १०० मी. शर्यत बघत होता. रैनाने विचारले, "अरे त्यात काय इतके बघण्यासारखे असते?" धोनी म्हणाला, "ते समोरच्या खोलीचे दार दिसतय का, इथुन ५ मीटरवर असेल तिकडे तु एक सेकंदात जाऊन दाखव." रैना म्हणाला, "१ सेकंदात ५ मीटर! हे तर कोणालाही अशक्य आहे" धोनी : "हे सगळे लोक १०० मीटरची शर्यत १० सेकंदाच्या आत पुर्ण करतात म्हणजे एका सेकंदात १० मीटरपेक्षासुद्धा थोडे जास्तच. मी तर तुला फक्त ५ मीटर सांगतोय"
रैना हे ऐकुन चाट पडला आणि म्हणाला, "मी तर असा विचारच केला नव्हता." आणि उत्साहात धोनीबरोबर शर्यत बघायला बसला.

मृत्युन्जय's picture

31 Aug 2015 - 11:45 am | मृत्युन्जय

कमाल लेख झालाय. मॉर्गन भाऊसाहेब नेहमीच सुंदर लेखन करतात खेळविषयावार

नाखु's picture

31 Aug 2015 - 2:51 pm | नाखु

थरार उत्कंठा आणि समारोप याची सूत्रबद्ध गुंफण.

नतमस्तक नाखु

नागेश कुलकर्णी's picture

31 Aug 2015 - 12:18 pm | नागेश कुलकर्णी

अप्रतिम !!!!
अगदी स्वतःच्या डोळ्यांनी बघित्याइतक जिवंत वर्णन...
जे.पी. मानला तुम्हाला.....

जबरद्स्त लेख. कार्ल लुईस आणि बेन जॉनसन यांच्यातील ठसन आठवली. त्यावेळेला ड्रग्ज घेउन का होईना बेन जॉन्सनने दीलेली वेळ कार्ल लूईसला देखील अविश्वसनीय वाटली होती. (९.५७/६८ अशी काहीतरी होती)

माझीही शॅम्पेन's picture

31 Aug 2015 - 2:13 pm | माझीही शॅम्पेन

__________________/|\_________________
मस्त :)

यमन's picture

31 Aug 2015 - 2:40 pm | यमन

जेंव्हा जेंव्हा मी वैतागतो ;कंटाळतो तेंव्हा तेंव्हा बोल्ट ची फायनल बघतो
खेळा वर लिहावं ते तुम्हीच . लिहिते रहा .
बोल्ट ला कोणीतरी पाठवा रे हे समालोचन ...

मी-सौरभ's picture

31 Aug 2015 - 6:06 pm | मी-सौरभ

सुंदर
जे पी मॉर्गन (आता एक अजून आय डि आहे ना जेपी नावाचा) शैलीतला फर्मास लेख_/\_

जे.पी.मॉर्गन's picture

31 Aug 2015 - 7:37 pm | जे.पी.मॉर्गन

धन्स मिपाकर्स!

लई दिवसांनी लिहिलं... आता जरा नियमितपणे लिहीत जाईन.

जे.पी.

निमिष ध.'s picture

31 Aug 2015 - 10:22 pm | निमिष ध.

जबरदस्त शर्यत आणि तितकीच जबरदस्त ओळख करून दिलीत मॉर्गनराव तुम्ही! आता भरपूर लिहीत रहा खंड पडू देवू नका :)

जुइ's picture

1 Sep 2015 - 8:46 am | जुइ

उसेन बोल्ट प्रमाणेच स्पर्धेचे वर्णन खूपच दमदार आणि वेगवान केले आहे.

अभिजीत अवलिया's picture

1 Sep 2015 - 8:33 pm | अभिजीत अवलिया

अतिशय उत्कंठावर्धक लिखाण. जबरदस्त आवडले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्स्स्स्त......... मज्जा आया!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 10:39 am | कैलासवासी सोन्याबापु

जेपी,

आधी प्रतिक्रिया दिली आहेच मी आवडल्याची पोचपावती ह्या प्रकारात पण थोड़े सविस्तर बोलायचे झाले तर हा थरार अनुभवणे मला साक्षात् आमच्या पिताश्रीनी शिकवले आहे, ते स्वतः यूनिवर्सिटी अन स्टेट चैंपियन एथेलीट होते (२०० मीटर व् चारशे मीटर) नेहमी सांगतात १० सेकंड चा थरार भयानक असतो, अन एथेलेटिक्स ला "स्लो डेथ" असे डिफाइन करतात कारण इतका भयानक वेग साधण्यात एथेलीट लोकांची जी काही शारीरिक झीज होते ती बियॉन्ड रिपेयर प्रकारातली असते व त्याचे इफ़ेक्ट शरीरावर उतारवयात भयानक दिसतात, ह्याची कल्पना अन सेकंड सेकंड चा थरार ह्यावरुन लक्षात यावा की जिल्हा क्रीड़ा स्पर्धेत १०० मीटर पळणार पोरगे (शालेय) अन नॅशनल रिकार्ड्स ह्यात जास्तीत जास्त ४ सेकंड चे अंतर असते ४ सेकंड म्हणायला इतकुसा वेळ वाटतो पण एका सीरियस एथेलीट ला तो भरून त्या लेवल चा रनर व्हायला किमान पुढली ६ वर्षे सराव करावा लागतो त्यानंतर ही बदलती रेकॉर्ड्स अन पद्धत अन ट्रेनिंग मेथडोलॉजी पाई तो कम्पटीशन ला टिकेल का नाही ह्याची काहीच गारंटी नसते

जे.पी.मॉर्गन's picture

2 Sep 2015 - 6:43 pm | जे.पी.मॉर्गन

धन्यवाद सोन्याबापू,

>>एथेलेटिक्स ला "स्लो डेथ" असे डिफाइन करतात साहजिक आहे हो. मी वाचलं होतं की बोल्टचा सर्वोत्तम "१० मीटर्सचा वेग" हा ०.८० सेकंद असतो (पीक स्पीड). म्हणजे टेक्निकली त्या वेगात तो १०० मीटर्स ८ - ८.२ सेकंदांत पूर्ण करू शकतो. म्हणून आता तो त्याच्या पिक अप वर काम करतोय म्हणजे ९.५९ पेक्षा चांगली वेळ नोंदवता येईल. म्हणे ९.४ गाठणं शक्य आहे! एक-एका शतांश सेकंदासाठी किती तो आटापिटा.

आपल्याकडे दुर्दैवानी खेळाडू "बिनधास्तपणे" खेळात करियर करू शकत नाहीत. काही झालं तुला तर आम्ही आहोत... तुला एक चांगली नोकरी आणि ३ बी एच के मिळवून देण्याची जबाबदारी आमची" अस कोणी सांगितलं तर तो पण जीव लावून मेहेनत करेल. परिस्थिती बदलते आहे म्हणा. रियोमध्ये दोन आकडी पदकं मिळावीत अशी इच्छा तरी आहे.

(आशवादी)
जे.पी.

चिगो's picture

2 Sep 2015 - 11:42 am | चिगो

अत्यंत जबरदस्त, थरारक समालोचन.. जबरा..

अतिशय सुरेख लिहिलय..जबरदस्त!!

नया है वह's picture

2 Sep 2015 - 5:13 pm | नया है वह

ह्या शर्यतीची यूट्यूब चित्रफीत पाहिली जबरा शर्यत

अफलातून लिखाण. जेपींचे लिएंडर पेस आणी मॅन्चेस्टर युनायटेडवरील लेख वाचल्यापासूनच मी त्यंच्या लेखनशैलीचा प्रचंड मोठा फॅन झालो. हा लेख पण तसाच खिळवून ठेवणारा.. रोमांच उभे करणारा.
खूप खूप धन्यवाद जेपी. अधिकाधिक लिहीत रहा!