वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in काथ्याकूट
20 Aug 2008 - 1:57 pm
गाभा: 

काही पुस्तकं अतिशय वेगळ्या विषयांवर असतात. काही नेहमीच्याच विषयावर अगदी वेगळा दृष्टिकोन मांडतात. काहींची भाषा नि शैली धक्कादायक असते. काही उग्गीच धक्कादायक असतात.
असली पुस्तकं सहसा डोक्यातून पुसली जात नाहीत मात्र. परत परत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात डोकावत राहतात. असल्या पुस्तकांबद्दल जरूर सांगा. फक्त नाव सांगून थांबू नका मात्र. लेखक, प्रकाशन सांगाच. पण पुस्तक वेगळं का वाटलं, याबद्दलही जरूर लिहा.

सुरुवात करते -
टोकदार सावलीचे वर्तमान
रंगनाथ पठारे
प्रकाशन नाही आठवत.

लग्नाआधी 'प्रकरण' करून पळून जाणार्‍या, 'शेण खाणार्‍या' मुली म्हणजे बापाला विवंचना आणि मानहानी हा सर्वमान्य समज. पण या गोष्टीतला बाप मात्र वेगळा आहे. त्याची पहिली मुलगी पळून जाते, तेव्हा तो त्रागा करतो, खंतावतो, नशिबाला आणि मुलीला दोष देतो. पण हळूहळू त्याला प्रश्न पडायला लागतात. लग्न म्हणजे नेमकं काय? समाजमान्य समागमाची संधी. निसर्ग तर शरीराला हाक देणारच. कुणाला आधी, कुणाला नंतर. अशा वेळी नाही मिळाला जोडीदार, तर काय करावं कुणी? आपल्या शरीराची हाक ऐकून मुलीनं जोडीदार मिळवला, तर तिचं काय चुकलं? ती तिच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला तयार असेल, तर आपण तिला मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? असे निर्णय घेण्याची पाळी तिच्यावर येऊ नये, म्हणून तिच्या मनात बापाविषयी विश्वास निर्माण करायला नको का... अशा विचारांपर्यंत तो पोचतो. त्याच्या या स्थित्यंतराची ही गोष्ट आहे. पार वेगळी...

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

20 Aug 2008 - 2:17 pm | अभिरत भिरभि-या

एका चांगल्या विषयावर चर्चा सुरु केल्याबद्दल अभिनंदन

वादग्रस्त वा धक्कादायक नसले तरी एक चाकोरीबाहेरचे पुस्तक वाचले..

नावः एका मारवाड्याची गोष्टं
लेखकः गिरिश जाखोटीया

व्यवसायप्रिय मारवाडी समाज व चाकरीप्रिय मराठी समाजाची स्वानुभवातून केलेली तुलना आहे.
पुस्तकाचा ढाचा विश्लेषणात्मक नसून कांदबरीच्या स्वरुपाचा आहे.

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 2:28 pm | आनंदयात्री

नातिचरामि
- मेघना पेठे
- राजहंस प्रकाशन

थोडक्यात ओळख :

विशिष्ट कथानक, त्याचा आरंभ, मध्य, शेवटातीत व्यक्तिरेखांसह विकास अशा टप्प्यांतून ही कादंबरी सरकत नाही. या साच्यात ती सामावलेलीही नाही. तर अनेक विचारांचे अखंड मंथनच ही कादंबरी शब्दबद्ध करत जाते. समाजव्यवस्थेतील स्त्री-पुरुष नातेबंधांच्या आखलेल्या चौकटींना झुगारून देत पुरुषी सामर्थ्यरचनेला शह देण्याचा वैचारिक संघर्ष ती रेखाटत जाते.

मीराच्या आत्मनिवेदनातून कादंबरीचा प्रारंभ होतो. गावाहून परतलेली, घटस्फोट झालेली मीरा आता रिकाम्या घरी एकटीच प्रवेश करते आणि स्वत:च्या या एकटेपणाची पोखरणारी जाणीव तिला बोलतं करते. मग भूतकाळ ती वर्तमान म्हणून जगत राहते नि वर्तमान त्याला साक्षी होतो. भूतकाळातले तिचे नि तिच्या नवर्‍याच्या आठवणींचे तुकडे जोडता जोडता ती आपल्या विस्कटून गेलेल्या भावविश्वात डोकावते. पण या उदध्वस्त झालेल्या आयुष्याशी स्वत:ला गोठवून वा त्यात रुतून ती बसत नाही. किंबहुना आपलं लग्न मोडल्याने आयुष्य उदध्वस्त झालंय, हेच ती अमान्य करते आहे. ती पुरुषी वर्चस्वांना बेडरपणे उलथवून टाकते आहे. हे तिचं उलथवणं अगदी लग्नसंस्थेपासून सुरू होतं. लग्नसंस्थेचं फोलपण आतून तिला जाणवणं ही तिच्यातील सामर्थ्याची पहिली खूणच आहे. म्हणूनच ती तिच्या विवाहित 'पुरुष'मित्राला 'लग्न नाही केलं आपण तरी एकत्र राहू शकतो' हे ती सुचवू शकते ते याच फोलपणाच्या जाणिवेतून. मात्र तिला लग्नाशिवाय हवा असणारा सेक्सही अनैतिक वाटत नाही. थोडक्यात, ही मीरा स्वतंत्र विचारांनी जगणारी आणि आपल्याला हव्या त्याच पद्धतीने आयुष्य समजून घेणारी, तितक्याच उत्कटपणे जगण्याचे मार्ग आपलेसे करणारी आहे आणि त्याच उत्कटरीत्या तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांनीही जगावं अशी तिची अपेक्षा आहे.

(ही ओळख इथुन घेतलिये.)

भडकमकर मास्तर's picture

20 Aug 2008 - 6:10 pm | भडकमकर मास्तर

मला मेपेंचे कथासंग्रह फार आवडले होते म्हणून मी नातिचरामि ही कादंबरी मोठ्या् उत्साहाने आणि आशेने आणली आणि निराशा झाली....
.... ही खूप ऍटिट्यूड असलेली बिन्धास्त बाई आहे , जी तिला पायजे तसं जगायचा प्रयत्न करतेय हे समजलं... आपलं त्या आशयावर काही म्हणणं नाही... उत्तम... पण ती नॅरेशन स्टाईल / कथनशैली काय ती वैतागवाडी वाटली.... बाकीची पात्रं काही नीट कळली नाहीत... ( मला तर काही वेळेला फर्स्ट ड्राफ्ट चुकून प्रसिद्ध केला आहे असे वाटले....लेखक काही कारणानं अडून राहिला/ रायटर्स ब्लॉक की काय तो की त्यावर उपाय म्हणून विषयाच्या आसपास वाट्टेल ते लिहीत जातो ज्याला काही लोक फ्री रायटिंग म्हणतात, तसलं वाटत राहतं....)..... असं वाटण्यालाच आशयावर शैलीची कुरघोडी म्हणत असावेत...

बरं निराशा इतकी झाली की एकदा वाचून संपल्यानंतर सुटलेले दुवे सांधायला , जरा पुन्हा समजून घेण्यासाठीही वाचावंसं वाटेना.... ( असे त्यांचेच कथासंग्रह वाचले आहेत ).... इथे रायटिंग नॉट द रायटर हे वचन आठवते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 6:15 pm | आनंदयात्री

हो ज्यांच्या ज्यांच्याशी बोल्लो त्यानी सगळ्यांनी याच मुद्द्यावर शिव्या घातल्या मेघना पेठे बाईंना. थोडा त्रास सहन करुन वाचायला हवे. सेकंड ईटरेशनमधे जरा चांगले समजते असे एकाचे मत पडले होते.

संदीप चित्रे's picture

20 Aug 2008 - 7:28 pm | संदीप चित्रे

मेपे मला तरी झेपल्या नाही ब्वॉ ... त्यांच्या कथांमधे सेक्स मुद्दाम घुसडल्यासारखा वाटला.
असाही एक फील आला की बघा मी बाई असूनही किती बोल्ड लिहितीय !
(अर्थात हे वैयक्तिक मत आहे. मेपे पंख्यांना दुखावून वाद सुरू करणे हा उद्देश नाही)

पद्मश्री चित्रे's picture

21 Aug 2008 - 4:35 pm | पद्मश्री चित्रे

मोठ्या अपेक्षेने वाचलं, पण अगदी रटाळ आणि विस्कळीत वाटल..सर्व ओढून-ताणुन आणल्यासारखं.
>>असाही एक फील आला की बघा मी बाई असूनही किती बोल्ड लिहितीय ! अगदी खरं..

ऍडीजोशी's picture

20 Aug 2008 - 2:34 pm | ऍडीजोशी (not verified)

काही पुस्तकं अतिशय वेगळ्या विषयांवर असतात.

वेगळं म्हणजे काय? जे स्वतःला झेपत नाही, माहिती नाही, उमगलं नाही ते. आज भारतात कुणी समलिंगी आहे हे कळलं की लगेच चेहेर्‍यावर आठ्या उमटतात, पण अमेरीकेसारख्या "पुढारलेल्या" देशात मात्र हे नॉर्मल आहे. त्यामुळे विषयाचा वेगळेपणा हा पर्सनल अनुभवावर आधारीत नसून तो अधीक वैश्वीक असावा अशी माझी कल्पना आहे.

असो. आता टोकदार सावलीचे वर्तमान ह्या पुस्तका विषयी.

लग्न म्हणजे नेमकं काय? समाजमान्य समागमाची संधी.

इतकी किरकोळ, उथळ आणि स्वतःच्या स्वार्थावर पांगरूण घालण्या साठी केलेली लग्नाची व्याख्या करणार्‍याच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते. लग्न म्हणजे सहजीवन, त्याग, संसार घडवणे, दुसर्‍यासाठी झिजणे, कुटुंब घडवणे, एका जिवाला स्वखुशीने जन्म देणे आणि ह्या क्रुतीचे उत्तरदाइत्व म्हणून स्व विसरून आई / बाबा बनणे, इत्यादी अँगल सोडून केवळ स्वतःच्या एक क्रुतीशी लग्नाचा अर्थ जोडणे हा खरा धक्का आहे.

लग्न म्हणजे समाजमान्य समागमाची संधी अशा व्याख्या सर्वसाधारण पणे मी लय पुढारलेला/ली इत्यादी गैरसमजातून बनवल्या जातात. अशाच संकुचीत आणि स्वार्थावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने केलेल्या लग्नाच्या अजून काही व्ह्याख्या-
लग्न - फुकट धुणी-भांडी करून मिळण्याची सोय (पुरूष)
लग्न - कमी खर्चात उत्तम जेवण मिळण्याची सोय (पुरूष)
लग्न - फुकटात मुलांसाठी आया मिळण्याची सोय (पुरूष)
लग्न - वेळी अवेळी जीव खर्चून सेवा करणारी नर्स मिळण्याची सोय (पुरूष)
लग्न - आयुष्यभर फुकट गिळण्याची सोय (स्त्री)
लग्न - फुकट बॉडीगार्ड मिळण्याची सोय (स्त्री)
लग्न - एकही पैसा न कमावता आयुष्यभर ऐषोरामात रहायची सोय (स्त्री)

ही यादी हवी तितकी लांबवता येईल.

लग्नाआधी 'प्रकरण' करून पळून जाणार्‍या, 'शेण खाणार्‍या' मुली म्हणजे बापाला विवंचना आणि मानहानी हा सर्वमान्य समज.

हा समज बनण्यामागेही काही कारणं आहेतच की. जर एखाद्या मुलीने चांगलं कुटुंब, सुस्वभावी, मानी, हुशार अशा मुलाला पसंत केले तर आई बाबा कशाला उगाच नाही म्हणतील? (ह्या यादीत मी स्वजातीय हा मुद्दा मुद्दामूनच टाकला नाहिये). प्रेमाच्या भलत्या कल्पनांचा बळी जाऊन जेव्हा मुली उतावीळ पणे निर्णय घेतात, तेव्हाच प्रॉब्लेम सुरू होतात. पण माझी मी / माझा मी स्वतंत्र आहे, आई बाबांना काय कळतंय / त्यांचं वय झालंय असं मानलं की मग त्यांच्या सजेशन्स म्हणजे व्यक्ती-स्वातंत्र्यावरचा हल्ला वाटायला लागतात. नी त्यातूनच आयुष्यभर आपल्यासाठी काळजाचं पाणी करणार्‍या आई बाबांना फाट्यावर मारून ह्या प्रेमाची इतीपुर्तता करण्यात येते.

भले आता मला तुम्ही पुराणमतवादी म्हणाल. पण गल्लीतलं कुत्रंही रोज अर्धी पोळी देणार्‍या विषयी स्वामीनिष्ठा दाखवतंच. माणूस तर फार पुढारलेला आहे (नी मला वाटतं हाच खरा प्रॉब्लेम आहे.)

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 2:35 pm | आनंदयात्री

>>पण माझी मी / माझा मी स्वतंत्र आहे, आई बाबांना काय कळतंय / त्यांचं वय झालंय असं मानलं की मग त्यांच्या सजेशन्स म्हणजे व्यक्ती-स्वातंत्र्यावरचा हल्ला वाटायला लागतात. नी त्यातूनच आयुष्यभर आपल्यासाठी काळजाचं पाणी करणार्‍या आई बाबांना फाट्यावर मारून ह्या प्रेमाची इतीपुर्तता करण्यात येते.

सहमत !!

मनस्वी's picture

20 Aug 2008 - 2:58 pm | मनस्वी

सहमत आहे.
पण काही घरांमध्ये फक्त प्रतिष्ठेला धक्का बसेल म्हणून विवाहाला संमती दिली जात नाही.
संमती देणारे पालक असताना झापड लावून लग्न करणारे करंटेच.
आणि फक्त सधन म्हणून लग्न करून देणारे पण दोषी.
एकमेकांना नक्की काय हवंय ह्याचा विचार न करता घाईत लग्न करणारे पण दोषी.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 3:06 pm | आनंदयात्री

>>एकमेकांना नक्की काय हवंय ह्याचा विचार न करता घाईत लग्न करणारे पण दोषी.

हा मुद्दा अधिक महत्वाचा ! वयाच्या २१ व्या वर्षी ३० हजार रुपये पगार, लागतील त्या सोयीसुविधा, पाहिजे तेवढा एकांत यातुन कितीतरी चुकलेले तरुण तरुणी आजुबाजुला दिसतात. घाईघाईत आई वडिलांना काय समजतं, आपण जग जिंकलय अश्या अभिनिवेषात लग्न करणारी लोकं. हे चुक, असेच मत खरडफळ्यावरच्या चर्चेतही मांडायचे होते, कदाचित अजुनही योग्य शब्द सापडले नाहित.

ऍडीजोशी's picture

20 Aug 2008 - 3:29 pm | ऍडीजोशी (not verified)

ही प्रतिष्ठा काल्पनीक असेल अथवा मुलगा चांगला असूनही केवळ खालच्या जातीचा आहे म्हणून नकार असेल तर त्याला विरोध करायलाच हवा. त्यात काही चूक नाही. पण मी वर दिलेले गुण जर मुलात असतील तर कुणीही विचारी पालक लग्नाला नकार देणार नाहित. (अशी लग्न माझ्या आजूबाजूलाच घडलेली आहेत.)

एकमेकांना नक्की काय हवंय ह्याचा विचार न करता घाईत लग्न करणारे पण दोषी.
१००% सहमत

नारायणी's picture

20 Aug 2008 - 7:52 pm | नारायणी

बाकिची चर्चा मी अजुन वाचलेली नाही.पण
"लग्न म्हणजे सहजीवन, त्याग, संसार घडवणे, दुसर्‍यासाठी झिजणे, कुटुंब घडवणे, एका जिवाला स्वखुशीने जन्म देणे आणि ह्या क्रुतीचे उत्तरदाइत्व म्हणून स्व विसरून आई / बाबा बनणे, इत्यादी अँगल सोडून केवळ स्वतःच्या एक क्रुतीशी लग्नाचा अर्थ जोडणे हा खरा धक्का आहे"------ हे वाक्य मात्र मनाला स्पर्शुन गेलं.सुंदर!!!!!
(अवांतरःमला "ऍडी" लिहायचं कसं ते सांगाल का? ईथे तर कोपी पेस्ट केलंय्.मायबोलीसारखी प्रतिसाद लिहिताना हेल्प विंडोही ईथे दिसत नाही.)

अभिज्ञ's picture

20 Aug 2008 - 2:42 pm | अभिज्ञ

ऍडि शी पुर्ण पणे सहमत.

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऍडीजोशी,

तुमचे विचार काहीसे पटले पण विषयाला सोडून वाटले.

आज खव आणि खफवर आम्ही काही जणांनी आपल्याला आवडलेली "वेगळी" पुस्तकं अशा साधारण कल्पनेवर आधारीत चर्चा करत होतो. आणि त्यातून इतर सगळ्यांचेच अनुभव ज्यांना पुस्तकं वाचायची आहेत त्यांना समजावे म्हणून हा धागा सुरू केला आहे. याची सुरूवात झाली "कोबाल्ट ब्लू" या सचिन कुंडलकरांच्या पुस्तकावरून! (या पुस्तकासाठी मी वेगळा प्रतिसाद लिहिण्याचा विचार करत आहे, कृतीत आणण्याआधी कोणी माझं काम केलं नाही तर)

तुम्ही लग्न, का, कसं, कोणाशी, कशासाठी वगैरे चर्चां केलीत पण त्यासाठी दुसरा धागा सुरू करता येईल, (किंबहुना कराच)!

काही महिन्यांपूर्वी विजय तेंडुलकर गेले तेव्हा त्यांच्याबद्दल वाचलं. तेही "वादग्रस्त, चाकोरीबाहेरचं" लिहायचे; कदाचित ते आता तसं नसेलही! सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसल यांनी म्हटलं आहे, "Do not fear to be eccentric in opinion, for every opinion now accepted was once eccentric." त्यामुळे कुणाच्या बुद्धीची कीव आजच्या काळात केली जात असेल तर त्याच बुद्धीबद्दल दुसय्रा काळात गौरवोद्गार निघतील. खुद्द बर्ट्रांड रसलच्या बाबतीतही हे खरं आहे.

वेगळं म्हणजे माझ्या मते एवढंच की जे रोज दिसत नाही, स्थल आणि काल या चार मितींमधे ते वारंवार घडत नाही किंवा अनुभवास येत नाही किंवा दृष्टीस पडत नाही. अर्थात आपण सर्व एका धाग्याने जोडलेले आहोत, मराठी बोलणारे आहोत; तर जे आजच्या घडीला मराठी समाजाला जे वारंवार दिसत नाही, अनुभवता येत नाही त्याला आपण "वादग्रस्त, चाकोरीबाहेरचं" असं लेबल साधारणतः देतो. म्हणजे करण जोहरचे पिक्चर्स नॉर्मल अपवाद "कभी अलविदा ना कहना" चा! ते त्याच्यासाठी "वादग्रस्त, चाकोरीबाहेरचं" होतं.

(मेघनाची समविचारी मैत्रीण) यमी

ऍडीजोशी's picture

20 Aug 2008 - 3:16 pm | ऍडीजोशी (not verified)

माझे विचार पुस्तकातल्या विचारांवरच आधारीत आहेत. आपल्या मुलीने जे केलं त्याचं समर्थन करण्यासाठी त्या बापाने तसा विचार केला. पण तो त्याला मना पासून पटला का आणि त्यानी तो खरंच स्विकारला का ह्यावर कुठे टिप्पणी वरच्या अवलोकनात आढळली नाही. हे खरंच पटणं आहे की उपासाला सत्याग्रह म्हणण्याचा प्रयत्न आहे अशी सुद्धा शंका मला आली. तसंच शेण खाल्लं म्हणजे नक्की काय केलं ह्याचं ही स्पष्टीकरण पुस्तकाच्या वर दिलेल्या अवलोकनात आढळलं नाही. त्यामुळे मला हा पोस्ट टाकावा लागला.

हे पुस्तक म्हणजे आपली संस्क्रुती कशी बिनबुडाची आहे अथवा तिचे बुड कसे पोकळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचेही कुणाला वाटू शकते. पुस्तक लिहिलंय म्हणजे विचार बरोबरच आहेत असं होत नाही. त्यामुळे त्यावर सगळ्या बाजूनी चर्चा करायलाच हवी.

उदा: समागमाचा समाजमान्य मार्ग म्हणून लग्न केलं तर मुलानी ४ वर्षानी त्या मुलीला "आता तुझ्या बरोबर समागमात मजा येत नाही" म्हणून सोडले नी दुसरं लग्न केलं तर चालेल का?

सांगायचा मुद्दा हा की पुस्तकाच्या सर्व बाजूंवर, त्यातून निर्माण होणार्‍या सगळ्या प्रश्नांवर आणि न लिहीलेल्या शब्दांवर चर्चा झाली तरच तो त्या पुस्तकाला दिलेला खरा न्याय ठरेल.

अन्यथा "पुस्तक लय भरी आहे, वाचाच एकदा" अस म्हणायला माझ्या तातांचं काय जातंय? :)

ऋचा's picture

20 Aug 2008 - 2:50 pm | ऋचा

जर एखाद्या मुलीने चांगलं कुटुंब, सुस्वभावी, मानी, हुशार अशा मुलाला पसंत केले तर आई बाबा कशाला उगाच नाही म्हणतील? (ह्या यादीत मी स्वजातीय हा मुद्दा मुद्दामूनच टाकला नाहिये). प्रेमाच्या भलत्या कल्पनांचा बळी जाऊन जेव्हा मुली उतावीळ पणे निर्णय घेतात, तेव्हाच प्रॉब्लेम सुरू होतात. पण माझी मी / माझा मी स्वतंत्र आहे, आई बाबांना काय कळतंय / त्यांचं वय झालंय असं मानलं की मग त्यांच्या सजेशन्स म्हणजे व्यक्ती-स्वातंत्र्यावरचा हल्ला वाटायला लागतात. नी त्यातूनच आयुष्यभर आपल्यासाठी काळजाचं पाणी करणार्‍या आई बाबांना फाट्यावर मारून ह्या प्रेमाची इतीपुर्तता करण्यात येते.

ऍडि शी सहमत!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 3:47 pm | यशोधरा

ऍडी, मस्त मुद्दे मांडलेस!! तुझ्याशी सहमत, व्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द आजकाल जरा जास्तच स्वस्त आणि सवंग झालाय!!

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 3:54 pm | आनंदयात्री

व्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द आजकाल जरा जास्तच स्वस्त आणि सवंग झालाय!!

कसा ? काही उदाहरणे ? काही पुस्तकांबद्दल माहिती ?

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 4:13 pm | यशोधरा

स्वस्त आणि सवंग अशासाठी, की, स्वत:साठी व्यक्तीस्वातंत्र्याचा जप करताना दुसर्‍याचा विचार न करणे किंवा समोरच्याला गृहीत धरणे हे खूप दिसून येतं. मी, मी आणि मी हे वाढीला लागल आहे.

वर जे उदाहरण दिलां आहे मीरेचं तेच पहा, तिने जो जगायचा मार्ग निवडलाय, किंवा तिला हवासा वाटतोय, त्यातून निर्माण होणार्‍य गुंतागुंतीची जबाबदारी घेणार आहे का ती?? किंवा त्याचा विचार तरी केलाय का तिने??

ज्या व्यक्तीला स्वातंत्रय जपायचं आहे, तिने सांगोपांग विचार करुनच निर्णय घ्यावेत हे माझं मत, विषेशतः, जिथे दुसर्‍यांच स्वातंत्र्यही तुमचय स्वातंत्र्याशी बांधलं गेलेलें असत. नुसते जड शब्दांचे खेळ खेळणं आणि प्रत्यक्षात जगणं ह्या खूप भिन्न गोष्टी आहेत.

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 4:25 pm | आनंदयात्री

ह्म्म .. प्वाइंट आहे खरा !
म्हणुनच मीरेचे बंड फसवे वाटले कदाचित मला !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 4:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वर जे उदाहरण दिलां आहे मीरेचं तेच पहा, तिने जो जगायचा मार्ग निवडलाय, किंवा तिला हवासा वाटतोय, त्यातून निर्माण होणार्‍य गुंतागुंतीची जबाबदारी घेणार आहे का ती?? किंवा त्याचा विचार तरी ....
मी हे पुस्तक वाचलं नाहीये, पण गुंतागुंत म्हणजे नक्की काय?

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 4:45 pm | आनंदयात्री

यशो देइलच उत्तर पण .. गुंतागुंत म्हणजे ती ज्यांच्याबरोबर संबंध ठेवते त्या लोकांच्या आयुष्यात निर्माण होणारे प्रॉब्लेम्स !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता मी छिद्रान्वेषी आहे म्हणा हवं तर, पण कुठले प्रॉब्लेम्स?
मला विचाराल तर कोणी दुसय्राबरोबर लग्नाशिवाय संबंध ठेवायचं म्हणतोय (म्हणतेय), हे आधीपासून माहित नाही का? असेल तर नंतर का तक्रार करावी?

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 4:56 pm | आनंदयात्री

तक्रार कशाला हो कोण करतोय. पण मीरेच्या चौकट मोडुन वागण्याने (मोहात पडुन का होइना) त्या पुरुषांच्या परिवारांचे नुकसान तर झालेच ना !
मीरेला तिथे त्या पुरुषाचा पराभव महत्वाचा वाटत होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि मीरेनी त्या पुरूषांशी लग्न केलं असतं तर मतं बदलली असती? किंवा मीरेचा हेतू वेगळा असता, तिला विवाहित पुरूषाशी त्याच्या संमतीनी लग्न करायचं असतं, तर त्याच्या परिवारांचं नुकसान कमी झालं असतं?

अवांतरः आंद्या, ते पुस्तक तुझ्याकडे आहे का? असेल तर मी वाचते आणि मग माझी प्रश्नावली पाठवून देते, (exchange offer, काय?) ;-)

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 5:12 pm | आनंदयात्री

मिसळपाव वाचक संघाची सुरुवात इथे होतेय :)
एक्स्चेंज करुयात .. शोधतो.

ऍडीजोशी's picture

20 Aug 2008 - 4:58 pm | ऍडीजोशी (not verified)

आपण आपल्या स्वार्था साठी दुसर्‍या एखाद्या बाईच्या नवर्‍याला आपले विचार पटवून राजी करत असू आणि त्यामुळे त्या बाईचा संसार उध्वस्त झाला तर त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं? आपण आपल्या पुरतं पहावं आणि सुखी व्हावं.

मनस्वी's picture

20 Aug 2008 - 5:09 pm | मनस्वी

प्रत्येक वेळी सारखीच परिस्थिती असते असे नाही. वेगवेगळे सिनॅरिओज असतात.
त्रयस्थाच्या चष्म्यातून दिसणे अवघड.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 5:06 pm | यशोधरा

चांगलं आहे आंद्या हां :)

छिद्रान्वेषी ताई, फक्त तेवढीच गुंतागुंत नाही. ती फार वरवरची. :) मागून वा ओढवून घेतलेली, तेह्वा त्याबद्दल तक्रार करायचं कारणच नाही. पण, फक्त तेवढेच लोक असतात का एखाद्याच्या आयुष्यात?? ऍडीचा पहिला प्रतिसाद वाचा, पुनरुक्ती होईल म्हणून परत तेच लिहित नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

होतं म्हणून उडवलं

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 5:14 pm | यशोधरा

हो मनस्वी , तू म्हणतेस ते खरे आहे, परिस्थिती दर वेळी तीच असते असे नाहीच. माझे म्हणणे एवढेच की व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये, आणि ज्याला/ जिला स्वतःचे स्वातंत्र्य प्रिय आहे त्याने/तिने दुसर्‍याच्या स्वातंत्र्याचाही तेवढाच आदर करावा.

मनस्वी's picture

20 Aug 2008 - 5:16 pm | मनस्वी

सहमत.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 5:20 pm | यशोधरा

>>मला कळलं नाही, लग्नाची व्याख्या हे लफडं का आई-बाबांना विचारलं नाही आहे हे ...

तिथेच तर गोची असते ना :) असो.

मेघना भुस्कुटे's picture

20 Aug 2008 - 7:38 pm | मेघना भुस्कुटे

शक्य आहे, मला वादग्रस्त वाटणारी पुस्तकं बाकी कुणाला वाटत नसतील. भंपक वाटत असतील. गल्लाभरू वाटत असतील. पण चर्चा पुस्तकाला मध्यवर्ती ठेवून करा ना मंडळी. फाटे फुटायला लागले, तर नवा धागा सुरू करा. तात्या काही हरकत घ्यायचे नाहीत. उलट लग्नसंस्था, लैंगिक स्वातंत्र्य, निष्ठा आणि व्यवहार अशा काही हॉट मुद्द्यांवर तर स्वतंत्र धागाच हवा. तितकी त्या विषयांची व्याप्ती आहे.
इथे 'तुम्हांला वेगळ्या वाटलेल्या' पुस्तकांवर लिहूया. किंवा इतरांशी वादविवाद करूया, पण 'पुस्तक' हा विषय मध्यवर्ती ठेवून.
निदान तुमच्या विवेचनाला फाटे फुटत असतील, तर विषयात 'अवांतर' असं तरी लिहा...
आनंदयात्री, अभिरत भिरभिरणार्‍या -
पुस्तकांबद्दल लिहिल्याबद्दल आभार!

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 8:22 pm | यशोधरा

>>शक्य आहे, मला वादग्रस्त वाटणारी पुस्तकं बाकी कुणाला वाटत नसतील. भंपक वाटत असतील. गल्लाभरू वाटत असतील.

असं इथे कोणीच म्हणालेलं नाही.

विजुभाऊ's picture

20 Aug 2008 - 8:29 pm | विजुभाऊ

तुम्ही कोणी तोत्तोचान वाचलय?
तारे जमीन पहाताना मला सारखे ते पुस्तक आठवत होते.
आपण लहान मुलाना सारखे हिणवत असतो त्यांच्यातील आत्मविष्वास मारुन टाकत असतो.
तोत्तोचान वाचल्यावर हे खूप जाणवते. मुलाना ते खरेच एक चांगले व्यक्तिमत्व आहे याची जाणीव पालाकानीच करुन द्यायची असते.
पण बहुतेक लायब्ररीत हे पुस्तक बाल वाचनविभागात टाकलेले असते.
(तारे जमीन पर हा चित्रपट सुद्धा माझ्या ओळखीतल्या बर्‍याच जणाना लहान मुलांचा चित्रपट वाटतो)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मेघना भुस्कुटे's picture

20 Aug 2008 - 8:32 pm | मेघना भुस्कुटे

मी वाचलंय. मस्त आहे.
विजुभौ, मग तुम्हांला 'चीपर बाय दी डझन'पण आवडत असेल. त्यातपण एकाच वेळी बारा मुलांना रूढ पद्धतीच्या विरोधात जाऊन वाढवणार्‍या आई-बाबांची कसरत आहे. लेखक नि प्रकाशनपण द्या ना प्लीज. पुस्तक मिळवायला बरं पडतं.
चीपर बाय दी डझन - फ्रँक गिलबर्ट
अनुवाद - मंगला निगुडकर
प्रकाशन - (बहुतेक) राजहंस

ऋषिकेश's picture

20 Aug 2008 - 9:46 pm | ऋषिकेश

तोत्तोचान आणि चिपर बाय दी डझन दोन्ही उ त्त म! :)
आठवण करून दिल्या बद्दल धन्यु!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

आम्ही त्याचे कौटुंबिक वाचन केले आहे. मला आणि बायकोला तर ते आवडलेच शिवाय आमच्या मुलालाही त्यातल्या गोष्टी फार आवडत.
त्याच्या वयाला (६ वर्षे) त्यातल्या बर्‍याच गोष्टी समजल्याही आणि त्याने विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांमुळे आम्हालाही पुस्तक वाचनाचा एक डोळस आनंद मिळाला!
प्रत्येकाने जरुर वाचावे असे पुस्तक!

(आत्ता लगेच आठवलेली माहिती)
तोत्तोचान - मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानेगी,
अनुवाद - चेतना सरदेशमुख-गोसावी

चतुरंग

मुशाफिर's picture

20 Aug 2008 - 9:21 pm | मुशाफिर

हे माझ्यामते फार वेगळं पुस्तक आहे. शेवटपर्यंत वाचकाना खिळवून ठेवणारं आणि तेव्हढचं ध़क्कादायकही! जरी हे पुस्तक १९४९ साली लिहिलं गेलं असलं, तरी आजही ते तेव्हढचं कालानुरूप (contemporary) वाटतं.

ह्या कथेची सुरूवात होते ती १९८४ मध्ये. आता जगात वेगवेगळी राष्ट्र नाहीत. फक्त तीनच मुख्य प्रदेश आहेत, ईस्टानिया, युरेशिया आणि ओशेनिया. हे प्रदेश सतत आपापसात लढत असतात. त्यातला ओशेनिया हा एक प्रदेश. ओशेनियाचं सरकार हे सर्वशक्तिमान (totalitarian) आहे. एकच पक्ष (पार्टी) इथलं सरकार चालवतं असते. ह्या सरकारचा लोकंसाठी असलेला चेहरा म्हणजे 'बीग ब्रदर' (Big Brother).

जॉर्ज ऑर्वेलने मांडलेल्या ह्या कादंबरीचा नायक, विन्स्टन स्मिथ, हा ओशेनियाच्या 'सत्यशोधन' खात्यात (Ministry of Truth) मध्ये कार्यरत असतो. त्याचं काम म्हणजे, सरकारी धोरणांना अनुरूप असे ईतिहासात सतत बदल करित राहाणे. म्हणजे थोडक्यात ईतिहासाचं पुनर्लेखन करणे. 'जो ईतिहासावर नियंत्रण ठेवतो तोच भविष्यही नियंत्रित करतो' (He who controls the past, controls the future), ही ओशेनियाच्या सरकारची घोषणा आहे.

हे सरकार 'वैचारिक पोलिसी' (Though Policing) करतं. शब्दकोशातून काही शब्दचं नाहीसे करतं. तसेच काही नवीन (पर्यायी) शब्द तयार करतं. जर शब्दच नसतील तर विचार व्यक्तच होणार नाहीत किंवा व्यक्त झालेचं तर ते सरकारला अपेक्षित असतील तसेचं!

त्याचप्रमाणे, ओशेनियाचा प्रत्येक नागरिक हा सदैव सरकारच्या नजरकैदेत असतो. सरकारच्या परवानगीशिवाय त्याला काहीच करता येवु शकत नाही. अगदी, नागरिकांचे व्यक्तिगत निर्णयही त्यांच्यासाठी सरकारचं घेत असतं, उदा. लग्न वैगरे. त्यातही सरकार (म्हणजे पार्टी) ठरवेल तेच योग्य! त्याला वैचारिक(ही) विरोध करणार्‍याचा अंत हा निश्चित आणि फारच दुखःद असतो.

ह्या कादंबरीत जॉर्ज ऑर्वेलने प्रसार माध्यमांचे 'मतदिशादर्शक' (opinion-makerer) म्हणून असलेले महत्व चांगलेच अधोरेखित केले आहे. ओशेनिया (आणि इतर प्रदेश) नेहमीच युद्धात गुंतलेले असल्यामुळे सामान्य माणसे सदैव भितीच्या छायेखाली असतात. आणि सरकार ह्या भितीला सदैव खतपाणीचं घालतं असते.

एक वेळ अशी येते कि, विन्स्टनमधला विवेक जाग्रुत होतो आणि तो सरकारी धोरणांच्या विरोधात जातो. त्यप्रमाणे क्रुतीही करतो. त्यानंतर विन्स्टनचा प्रवास आणि कथेचा शेवट हे दोन्हिही फारच वाचनिय आहेत. त्यामुळे इथे ते लिहून रसभंग करत नाही.

ह्या पुस्तकातून ईग्रंजी भाषेत 'बीग ब्रदर', 'डबलस्पिक' असे नवीन शब्द प्रचलित झाले, जे आजही जागतीक राजकारणात बर्‍याचदा वापरले जातात. 'ऑर्वेलियन' (Orwellian) हे ईंग्रजी विशेषणही ह्याच पुस्तकानंतर जन्माला आले.

हे पुस्तक पूर्ण वाचल्यावर लोकशाहीत आपण उपभोगत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचं महत्व किती मोठं आहे, ह्याची थोडीतरी जाणिव आपल्याला नक्किच होते.

अधिक माहितीसाठी हे पहा:
http://www.online-literature.com/orwell/1984/
http://en.wikipedia.org/wiki/Orwellian

मेघना भुस्कुटे's picture

20 Aug 2008 - 9:26 pm | मेघना भुस्कुटे

माहितीकरता धन्यवाद मुशाफिर. या पुस्तकाबद्दल बरंच ऐकलं होतं, पण अजून वाचलं मात्र नाहीय. आता वाचावं लागणार!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऑर्वेल लहानपणी थोडा वाचला होता. त्याची आठवण करून दिलीत, धन्यवाद. ऍनिमल फार्म हे माझं आवडतं पुस्तक, जॉर्ज ऑर्वेलनी लिहिलेलं! पण आता काही फारसं आठवत नाही. पुन्हा एकदा वाचलं पाहिजेच ते आता आणि १९८४ पण!

टग्या's picture

21 Aug 2008 - 8:19 am | टग्या (not verified)

ऍनिमल फार्म हे माझं आवडतं पुस्तक, जॉर्ज ऑर्वेलनी लिहिलेलं! पण आता काही फारसं आठवत नाही.

फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड! ;-)

भडकमकर मास्तर's picture

20 Aug 2008 - 11:37 pm | भडकमकर मास्तर

पुस्तकाची फार सुंदर ओळख मुशाफिर...
धन्यवाद...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुशाफिर's picture

20 Aug 2008 - 10:47 pm | मुशाफिर

प्रतिक्रियेबद्दल आभारी!

ऑर्वेलच्या बाबतीत नेहमी ऍनिमल फार्मचा उल्लेख प्रथम होतो. ती ही एक सुंदर रूपकात्मक कादंबरी आहे. बहुतेक सगळे ऍनिमल फार्म नंतर १९८४ वाचतात.

माझा प्रवास याबाबतीत नेमका उलटा झाला आहे. मी आधी १९८४ वाचलं आणि मगं ऍनिमल फार्म. पण १९८४ एव्हढं ऍनिमल फार्मने मला तेव्हा 'हलवून' सोडलं नाही.

मात्र आता आजुबाजुची भयाण परिस्थिती पाहिली की, 'ऍनिमल फार्म' मधल्या 'बेंजामिन' ह्या गाढवाचं 'Yesterday Was Better!' हे वाक्य नेहमी आठवतं. असो!

यमीताई, 'ऍनिमल फार्म' बद्दल तुम्ही लिहालं(च) अशी अपेक्षा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2008 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यमीताई, 'ऍनिमल फार्म' बद्दल तुम्ही लिहालं(च) अशी अपेक्षा आहे.
लिहायला आवडेल, पण त्याआधी पुन्हा एकदा पुस्तक मिळवून ते पुन्हा एकदा वाचायला लागेल. ब्रिटनमधे असताना शिकलेल्या लोकांच्याच संपर्कात असल्यामुळे पुन्हा एकदा 'ऍनिमल फार्म' वाचलं होतं, पण त्यालाही आता साडेतीन वर्ष झाली!

पण अलिकडेच वाचलेल्या "कोबाल्ट ब्लू"बद्दल बहुतेक आजच्या दिवसातच लिहायचा प्रयत्न करते!

नंदन's picture

20 Aug 2008 - 11:59 pm | नंदन

उत्तम विषय. 'टोकदार सावलीचे वर्तमान'मधील बापाबद्दल वाचून 'फिडलर ऑन द रुफ' या चित्रपटातला तीन मुलींचा बाप आठवला. मुलींनी परस्पर ठरवून/धर्माबाहेर लग्न केल्यावर त्याला सुरुवातीला बसणारा धक्का, मग त्रागा, मुलीला दोष देणे आणि मग समंजसपणे हे सारे स्वीकारणे हा प्रवास असाच.

'अच्युत आठवले आणि आठवणी' हे मकरंद साठे-पॉप्युलर प्रकाशनाचे पुस्तक हे वादग्रस्त, धक्कादायक नसलं; तरी वेगळं आहे. ऍब्सर्डिस्ट किंवा निरर्थकत्वाच्या फॉर्ममधले.

इंग्रजीतल्या १९८४ कादंबरीचा उल्लेख मुशाफिर यांनी केलाच आहे. मात्र हा प्रकार आता तितका चाकोरीबाहेरचा राहिला आहे, असं वाटत नाही. ब्रेव्ह न्यू वर्ल्ड, फॅरनहाईट ४५१ आणि हँडमेड्स टेल ही सारी पुस्तके 'डिस्टोपियन नोव्हेल्स' याच प्रकारात थोड्या-फार फरकाने मोडतात.

विल्यम फॉकनरचे 'द साउंड अँड द फ्युरी' हे पुस्तक मात्र अगदी वेगळे. स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीत लिहिलेले. म्हणजे पात्राच्या मनात जे विचार येतील, जे मूक स्वगत त्याच्या डोक्यात चालू असेल ते तसंच्या तसं वर्णनात उतरवायचं. आधी व्यक्तिरेखांची, त्यांच्या स्वभावविशेषांची ओळख करून देणे आणि मग पुढे प्रसंग फुलवीत नेणे, असला काही प्रकार नाही. जे आहे ते थेट. त्या त्या पात्राला जसे दिसते, जसे वाटते तसे. त्यामुळे पहिल्या वाचनात हे पुस्तक अवघड वाटते. नावांचा गोंधळ होतो. असं असलं तरी, पुन्हा वाचल्यावर या शैलीचा (किंवा तिच्या अभावाचा) अपेक्षित तो परिणाम नक्कीच होतो.

व्लादिमिर नाबोकोव्हची लोलिता (जिच्यावर हल्लीच अमिताभ-जिया खानचा नि:शब्द बेतला होता), ही तिच्या विषयामुळे वादग्रस्त ठरलेली कादंबरी. अमेरिकन प्रकाशकांनी नाकारल्यावर पॅरिसमधून प्रसिद्ध करावी लागलेली. विषय अनैतिकतेकडे झुकणारा असला तरी भाषावैभवासाठी आवर्जून वाचावी अशी. ऍना कॅरेनिनातून शंभर-एक वर्षांपूर्वी दाखवलेले धाडस एका रशियन लेखकानेच तितक्याच ताकदीने पुढे न्यावे ही एक परंपरा मोडण्याची वेगळीच परंपरा म्हणावी लागेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बबलु's picture

21 Aug 2008 - 2:54 am | बबलु

गॉड ऑफ स्मॉल थिंग्स -- अरूंधती रॉय.

वाचलंय का कोणी ?

मला आवडलं. थोडंस धक्कादायक, थोडंस वादग्रस्त.
लेखनाची शैली ऊत्तम.
आणि पात्रांची Depth एकदम जबराट. केरळ मधलं वर्णन फारच छान.

....बबलु-अमेरिकन

रामदास's picture

21 Aug 2008 - 12:32 pm | रामदास

ऑल ऍनीमल्स आर इक्वल, सम ऍनीमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स. हे त्यातले लोकप्रिय वाक्य होते.
१९८४ मधले बिग ब्रदर इज वॉचींग यु.हे लोकप्रिय वाक्य होते.

ऋचा's picture

21 Aug 2008 - 12:44 pm | ऋचा

हे पण एक अस पुस्तक आहे ज्यात एक तरुणी जगण्यासाठी आणि स्वत्व जपण्यासाठी समाजाच्या विरुद्ध जाऊन लढते.
तीची स्वत:ची वेगळी वैशिष्ट जपते. त्याच वेळी तिला हव तस बेदारकपणे करते.
मला लेखक नाही आठवत आहेत पण छान आहे पुस्तक हे.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2008 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच ते पुस्तक ज्याच्यावरच्या चर्चेवरुन हा धागा सुरू केला.

नावः कोबाल्ट ब्लू, लेखकः सचिन कुंडलकर (अका: 'रेस्टॉरंट' या चित्रपटाचा दिग्दर्शक), प्रकाशकः $ man cobalt_blue

पुस्तक सुरू होतं ते 'तनय'च्या कथनातून, आणि तो मुख्यतः लिहित असतो त्यांच्याकडे पूर्वी असणाय्रा एका पेइंग-गेस्टबद्दल! "तो" येण्याच्या आधीच तनयला तो नकोसा झाला असतो, पण त्यांच्यातले संबंध प्रथमभेटीतच कडू रहात नाहीच. "तो" आणि तनय यांची मैत्री होते आणि मग ते नातं मैत्रीच्याही पुढे जातं. तनयला यापुढे दुसय्रा कोणाशीही शरीर-संबंध ठेवायचे नाही आहेत आणि "त्या"च्यामधेच तो संपूर्ण गुंतलेला आहे. मधेमधे येत रहातात ते 'अनुजा'चे, तनयच्या बहिणीचे उल्लेख, जी सध्या "त्या"च्याबरोबर पळून गेली आहे. घरच्यांना वाटत रहातं अनुजाचं घरातून जाणं तनयनी सर्वात जास्त मनावर घेतलं आहे. अनुजा एकदम बिनधास्त मुलगी आहे, घरात सांगून ही मुलगी चार-चार दिवस एकटीच गड-किल्ल्यांवर फिरणारी, अंगावर दागिने घालून मिरवण्यापेक्षा चेहरा-हातावरचा तांबूस टॅन आवडणारी! तिच्या अपरोक्ष तनय आणि"त्या"चं नातं फुलत जातं. एक दिवस अनुजा परत येते, विमनस्क मनःस्थितीत, आणि तरीही अर्थातच तनय उद्विग्नच राहतो, आपल्या प्रेमाच्या आणि प्रेमिकाच्या विरहात!
अर्ध्यात सुरू होते अनुजाची डायरी, ती घरी परत आल्यानंतरची! तिला सायकियाट्रीस्ट सुचवते तुला जे वाटतं ते लिहीत जा आणि या त्रिकोणी नात्याचा दुसरा कोन मोजता येतो. "तो" कलाशाखेचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला आणि त्याच्या मित्रांना मॉडेल हवी असते चित्र काढायला. त्यामुळेच अनुजाला जाणीव होते आपल्या सुडौल शरीराची! या वेळी वाटणारं 'प्रेम' अनुजाला समजतं आणि तनयच्या अपरोक्ष "त्या"ची एकाच घरातली दुसरी कहाणी सुरू होते. आणि एक दिवस अनुजाच्या म्हणाण्यावरून अनुजा "त्या"च्या बरोबर घर सोडते (मुद्दामूनच पळून जाते असं मी इथे लिहिलं नाहीये).
आता अनुजा ठीक होत आहे, ती अजूनही "त्या"चा विचार करतच रहाते, "काय चुकलं, कुठे बिनसलं, काही क्लूजकडे दुर्लक्ष झालं का?". पण तिला घरात राहून स्वतःवर आणखी बंधनं नको आहेत, ती वेगळी रहायला लागते; तनयही घरातून बाहेर पडतो, अनुजाप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभा रहायला! आणि आपण विचार करत रहातो, का असं वागला असेल "तो"? त्याच्या लहानपणच्या अनुभवांमुळे तो असा झाला असेल का काही लोकं 'अशीच' असतात, उभयलिंगी संबंधात रस असणारी?

अतिशय सुंदर आणि तरीही सोप्या शब्दात, अतिशय वेगात तनय, "तो" आणि अनुजा आपल्याला भेटून जातात. तनय या नावातच शरीराला जास्त प्राधान्य आहे, आणि अनुजा त्याचीच धाकटी बहीण! शरीर आणि मनाचे खेळ, जे रोज दिसतीलच असं नाही ते इथे दिसतात. आई, बाबा, अनुभव, दादा, रश्मी, वगैरे मंडळी वेगवेगळ्या प्रसंगांमधून येतात आणि बाकीचं जग "नॉर्मल" आहे याची जाणीव करून देत रहातात. आणि पुस्तक एका बैठकीत संपवल्यावर डोक्यात काही विचित्र विचार मनात येत रहातात, त्यासाठी मला अजूनतरी शब्द सापडले नाही आहेत.

अवांतरः हे पुस्तक मला आवडलं तसं सगळ्यांनाच आवडेल असं नाही. आणि समलिंगी/उभयलिंगी संबंध यांच्यावर चर्चा हा या धाग्याचा हेतू नाही. तेव्हा पुस्तकपरीक्षण किंवा समलिंगी/उभयलिंगी संबंध यांच्यावर बोलायचं असल्यास आपण इथेच, पण वेगळ्या धाग्यावर बोलू शकतो.
दुसरं म्हणजे मी खूपच कमी (अबतक तीन) कादंबय्रा वाचल्या आहेत. त्यामुळे चुकांची मापी असावी!

(क्वचितच कादंबय्राही वाचणारी) यमी

मेघना भुस्कुटे's picture

21 Aug 2008 - 1:56 pm | मेघना भुस्कुटे

थँक्यू यमुताई.
या पुस्तकातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे - 'तो' किंवा त्याचे उभयलिंगी संबंध नाही विशेष धक्कादायक वाटत. पण बाईचं शरीर असो वा पुरुषाचं. आपल्याला किती लहानपणापासून शरीर दडवून ठेवायला, त्याच्या गरजांवर सामाजिक बंधनांची चौकट घट्ट बसवायला, चार लोकांसारखं'च' वागायला शिकवलं जातं - ते लक्षात येतं. आणि अशा चौकटीत धाडस न करू शकणार्‍या किती माणसांना आपलं वेगळेपण दडपून जगावं लागत असेल त्याचं भान येतं. ते चूक की बरोबर हा तर पूर्ण वेगळाच मुद्दा.
कसलेही अश्लील उल्लेख टाळून साध्या-सरळ भाषेत लिहिलंय हे पुस्तक. काही काही ठिकाणी काही परिच्छेद, काही ओळी परत परत येतात. पण त्या खटकत नाहीत. त्यानं या गोष्टीला एक छानसा फील येतो - दर कडव्यानंतर पुनरावृत्त होणार्‍या धृपदाचा.
महान पुस्तक आहे असं नाही, पण वेगळं नक्कीच आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Aug 2008 - 3:43 pm | बिपिन कार्यकर्ते

मेघना, यमी.... तुम्ही खरंच एक चांगला धागा सुरू केला आणि पुढे नेत आहात. कोबाल्ट ब्ल्यु ची ओळख छान आणि उत्सुकता चाळवणारी आहे. फक्त ही पुस्तके भारताबाहेर कशी मिळवायची हा एक मोठा प्रश्न आहे.

या धाग्यावर ईंग्रजी पुस्तकांबद्दल लिहिता येईल का?

बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2008 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्यावर ईंग्रजी पुस्तकांबद्दल लिहिता येईल का?

या दोन दिवसात मी काही लोकांना बर्ट्रांड रसल बद्दल सांगितलं. आता त्यांच्याबद्दल एक लेखच लिहिला तर बरं असं वाटायला लागलं आहे, तर हे काम एक-दोन दिवसात करते. त्यांची सगळीच पुस्तकं आंग्ल भाषेत आहेत.

आणि माझ्या मते तुम्हाला जर कोणती ईंग्रजी पुस्तकं आवडली असतील तर जरूर लिहा, आमचा काही लोकांचा वाचनाचा वेग कमी होईल एवढंच!

यमी

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 9:26 am | भडकमकर मास्तर

यमु आणि मेघना,
कोबाल्ट ब्लू ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
... वाचेन नक्की...
पण शीर्षक कोबाल्ट ब्लू का यावर काहीतरी लिहा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नंदन's picture

21 Aug 2008 - 11:59 pm | नंदन

आवडले. आता रसेलबद्दल वाचण्याची उत्सुकता आहे. त्याचेच 'मॅरेज अँड मॉरल्स' हे विवाहसंस्थेच्या इतिहासावर, रुढ झालेल्या परंपरांवर आणि त्यामागच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारे पुस्तक आहे. वर झालेल्या चर्चेवरून त्याची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

21 Aug 2008 - 7:23 pm | प्रकाश घाटपांडे

गुरुचरित्र म्हने बायामान्सांनी वाचु नये. कारन ते धक्कादायक हाये.
प्रकाश घाटपांडे

मेघना भुस्कुटे's picture

22 Aug 2008 - 9:30 am | मेघना भुस्कुटे

मंडळी, कृपा करून नव्या धाग्यावर लिहाल काय? इथे दर वेळी पान उलटावे लागते. हा त्याचा दुवा -
http://www.misalpav.com/node/3160