दाग अच्छे है

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
21 May 2015 - 5:40 pm

मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे.

त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या.

त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं. ज्या लोकांवर ज्या मोड्यूलची जबाबदारी होती, त्याचं काम संपलं कि ते घरी जात होते. असे करत आम्ही तिघे चौघेच पहाटेपर्यंत उरलो होतो.

त्यात दोघेजण अगदी जवळच राहत होते. ते पायीपायी निघाले. मी आणि माझी एक मैत्रीण दोघे उरलो. पहाट झाली असली तरी सामसूम असल्यामुळे मी आधी तिला सोडून मग घरी जायचं ठरवलं.

तिथे एक दोनच टॅक्सी होत्या. आम्ही त्यातल्या एकात बसलो आणि निघालो. आम्ही बसुन निघाल्यावर आमचं टॅक्सीमध्ये आजुबाजुला लक्ष गेलं. त्या सीटवर खूपच विचित्र डाग पडलेले होते. मुळचे काळे नसले तरी थोडे काळपट.

एवढ्या थकव्यानंतर अशी गचाळ टॅक्सी मिळाल्यामुळे आम्ही वैतागलो.

"कसले कसले लोक बसतात टॅक्सीमध्ये कोण जाणे. किती घाण करून ठेवलंय हे सीट? आणि ह्यांना साफ करता येत नाही का?" इति मैत्रीण.

"काय हो. सीट इतकं घाण झालंय, आणि तरी तुम्ही कसं काय बसवता लोकांना टॅक्सीमध्ये? ते साफ करा न आधी." मी त्या चालकावर डाफरलो.

"सॉरी सर. करायचं आहे ते काम. पण राहुन जातंय. करेल सर लवकरच. सॉरी." चालक अपेक्षेपेक्षा विनम्र निघाला.

"आधीच करायचं ना मग. आणि आहेत कसले हे घाणेरडे डाग?" तो फक्त मला उद्देशुन सॉरी म्हणाला म्हणुन बहुतेक तिचा राग अजून कायम होता.

"रक्ताचे". त्याने असं उत्तर दिल्यावर आम्ही दोघं दचकलो.

"काय???" मैत्रीण.

"कुणाच्या रक्ताचे?" मी.

"मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे साहेब, तुम्ही बसले ना तिथेच हब मॉलसमोर एक अपघात झाला होता.
दोन पोरं गाडीवर चालली होती. त्यांना ट्रकने उडवलं. एक जवळच पडला, आणि एक जरा गाडीसोबत फरफटत गेला."

"एकदम गर्दी जमली होती. लोक नुसते पाहत होते सर. मी ह्या भागात आलो कि इथेच येउन थांबत असतो, तर मी आलो तर मोठा घोळका जमला होता. ट्रकवाला पळुन गेला होता. आणि लोक एकमेकांना कसा अपघात झाला ते सांगत होते. मी जाऊन पाहिलं तर पोरं तशीच पडलेली. कोणी तरी समोरून पाणी आणलं त्यांच्यासाठी, पण दवाखान्यात कोणी नेत नव्हतं."

"फार रक्त सांडलं होतं. पोरं कोवळी होती सर. माझा मुलगा पण त्याच वयाचा असेल. थोडा कमी जास्त."

"मी फार विचार नाय केला. त्यांना गाडीत टाकलं आणि अजुन एका माणसाला बसवलं सोबत अन घेऊन गेलो दवाखान्यात."

"त्यांना दाखल तर करून घेतलं पण नावगाव काही माहित नव्हतं. त्याचं सामान काही असेल तर आम्हाला माहित नव्हतं. तिथे माझं नाव नंबर वगैरे लिहून घेतलं आणि पोलिसांना पण कळवलं."

"खूप वेळ गेला. मी गेलो घरी शेवटी."

"त्यांचा मोबाईल कोणाला तरी सापडला होता. तो पोलिसात जमा झाला. कशीतरी ओळख पटली आणि त्यांचे घरचे दवाखान्यात पोचले. त्यांनी मला धन्यवाद द्यायला बोलवुन घेतलं. साधी पण चांगली माणसं होती सर. त्यांच्या वडिलांनी माझे हात पकडुन आभार मानले, आणि त्यांना एकदम रडु फुटलं."

"खोटं नाय बोलणार सर. पण असं कोणी नेउन सोडलं तर लोक देतात थोडी बक्षीस. मला पण होती थोडी अपेक्षा. आणि आपल्या गाडीचं सीट कव्हर एकदम साधंय न सर. ते रक्त वाळुन डाग पडले. लेदरचं असतं तर पुसता आलं असतं. इथे एकदम अवघड आहे. ते कव्हरच बदलावं लागणार. मला सध्या जरा जड जाइल ते. मी एरवी काही मागितलं नसतं, पण हे नुकसान झाल्यामुळे जरा मागावं वाटलं."

"पण तिथे गेल्यावर पाहूनच कळत होतं, त्या लोकांना उपचार जड चालले होते. एक मुलगा फारच जखमी झाला होता. मला मागावंच वाटलं नाय. बरं नसतं दिसलं ते. आणि त्या वडिलांनी जे माझे हात पकडून बोलले ना, कि तुमच्या मुळेच माझी पोरं जगली, त्याचंच फार समाधान वाटलं."

"माझी गाडी पाहून ते स्वतः म्हटले सर, कि तुमची नुकसान भरपाई देतो म्हणून. पण काही दिवस द्या, सध्या सगळे पैसे उपचारात चाललेत म्हणून. मी म्हटलं राहू द्या साहेब. तुमच्या पोरांचा जीव वाचला त्याच्यात समाधान आहे मला. मी बघेल माझ्या सीटचं."

"ते म्हणाले मला, पोरं बरी झाली कि भेटायला घेऊन येतो त्यांना. तुमचे त्यांना पण आभार मानायला सांगतो."

"तर असंय साहेब. ते साफ करायचं आहे मला, पण थोडा वेळ लागेल. म्हणून थोडे कस्टमर वैतागतात. पण इलाज नाय. काही दिवस हे असंच चालणार. त्या वडिलांना भेटल्यापासून मला त्या डागांचं पण काही वाटेना. म्हणजे मी कोणाचा तरी जीव वाचवल्याची खुण आहे ना सर ती. ती हटवावी लागणारच आहे, पण सध्या मला मेडलसारखी वाटतेय ती."

आम्ही निःशब्द झालो होतो. त्या डागांचं आता आम्हालाही काही वाटत नव्हतं. उलट अश्या चांगल्या माणसाची भेट झाल्याबद्दल छान वाटलं.

रस्त्यांवर रोज कितीतरी अपघात होतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून खूप जणांचे जीव जातात. आपण अनेकदा असे अपघात जाता येत बघतो. कधी लोक जमलेलेच आहेत बघतील तेच काय ते असं म्हणुन निघून जातो.

मला अशा वेळी थोडी अपराधी भावना येते. पण ती विसरली सुद्धा जाते. त्या गाडीत बसून मला ते सोडून दिलेले अपघात आठवले. आणि थोडं वाईट वाटलं. ती माणसं वाचली असतील का असा विचार आला.

प्रत्येक ठिकाणी आपण मदत नाही करू शकत. काही नालायक लोक दुर्जन ठिकाणी अपघाताचे सोंग करून लोकांना लुटमार करतात. कधी पोलिस परेशान करतील अशी भीती असते. अशा कारणांमुळे गरजू लोकांना मदत करण्यास लोक घाबरतात.

पण जेव्हा शक्य असेल तेव्हा आपली गाडी खराब झाली तरी चालेल, आपला थोडा वेळ गेला तरी चालेल पण आपण हे जीव वाचवण्याचा प्रयत्न करूया अशा विचाराने मदत करायला हवी.

असं करणारा एक माणुस आम्हाला भेटला आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटलं.

शेवटी मी त्याला मीटर च्या वर १०० रुपये दिले.

तो म्हणाला "नको साहेब, तुम्ही कशाला पैसे देताय. मी करेल ते काम माझं माझं."

मी म्हटलं त्याला "अहो तुम्ही उपकार किंवा मदत काहीच समजु नका याला. मी काही फार मोठी रक्कम देत नाहीये. तुम्ही जे चांगलं काम केलात त्याबद्दल आमची दाद समजा, कौतुकाने दिलेलं बक्षीस समजा."

त्यादिवशी पहिल्यांदा मला त्या साबणाच्या जाहिरातीतली ओळ सार्थ वाटली. "दाग अच्छे है".

---
फेसबुकवरील या दुर्दैवी अपघाताच्या वृत्तांतापासून प्रेरित.

कथाविचारसद्भावना

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 May 2015 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृदयस्पर्शी अनुभव !

नागरिकांच्या कर्तव्यांच्या किंवा 'सिस्टीम'च्या नुसत्या गप्पा मारणार्‍यांच्यापेक्षा तो टॅक्सीचालक अनेक पट वरच्या दर्जाचा नागरीक आहे ! तुम्ही त्याच्याप्रती दाखवलेली भावनाही स्पृहणीय आहे !

यानिमीत्ताने नुकताच मुंबईत भर वस्तीत आणि पोलीस चौकीपासून केवळ १५-२० मीटरवर झालेला एक अपघात आठवला. चारचाकीने ठोकर मारून पळून गेल्यामुळे आणि आजूबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या २३-२४ वर्षीय जखमी युवतीला २५-३० मिनिटे वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि तिचा मृत्यु झाला. अपघातानंतर २० मिनीटांनी तेथे आलेल्या दोन सीआरपीएफ च्या जवानांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पीटलच्या प्रवेशव्दारापर्यंत त्या तरूणीची नाडी लागत होती.

तिथे वेळेवर असा जागरूक आणि सहृदय नागरिक असता तर ती तरूणी आज जिवंत असती ! :(

असे प्रसंग आपल्यावर आणि आपल्या जवळच्यांवरही येऊ शकतात हे लोक विसरले आहेत काय ?

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 6:27 pm | टवाळ कार्टा

असे प्रसंग आपल्यावर आणि आपल्या जवळच्यांवरही येऊ शकतात हे लोक विसरले आहेत काय ?

होय...त्यामुळेच रस्त्यावर बेशिस्तीने गाड्या हाकायचे प्रकार सुरु झालेत...आत्ता आहे त्याच्या १० पट बेशिस्त आपण म्हातारे झाल्यावर असेल हे अश्या लोकांच्या गावीसुध्धा नसते
जाताजाता...इथे मिपावरसुध्धा माझ्या बाईकच्या धाग्यावर कट मारुन काटा किर्र बाईक चालवता येते असे लिहिले होते (रंगासेठ...शोधणार का? :) )

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 7:53 pm | श्रीरंग_जोशी

टक्याने मांडलेल्या भावनेशी सहमत.

हॄदयस्पर्शी लेखन भावले.

टक्या तू म्हणतोयस तो हा प्रतिसाद असावा.

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 10:48 pm | टवाळ कार्टा

हा णाआ नाही
तो प्रतिसाद माझ्या धाग्यावर होता

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 11:02 pm | श्रीरंग_जोशी

बाइक्स घेतानाच्या चारही भागांवर नाही मिळू शकला. शब्द वेगळे होते काय?

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 10:37 am | टवाळ कार्टा

"काटा किर्र" हे तरी नक्कीच होते

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2015 - 7:58 pm | श्रीरंग_जोशी

मग हा असावा.

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 8:45 pm | टवाळ कार्टा

http://www.misalpav.com/comment/690034#comment-690034

हा तो प्रतिसाद ;)

अन्या दातार's picture

22 May 2015 - 5:16 am | अन्या दातार

अत्यंत सहमत.

राही's picture

21 May 2015 - 6:16 pm | राही

खरोखर, दुर्मीळ का होईना काही चांगली माणसं या जगात अजूनही आहेत म्हणून चांगुलपणावरचा विश्वास उडाला नाहीय अजून. आपण त्या टेक्सीचालकाचे कौतुक केलेत हेही दुर्मीळच. नाही तर 'मला काय त्याचे' म्हणणारेच अधिक.
लेख लिहिलायही छान.

बाईगं! वाचूनच कसेतरी झाले. त्या टॅक्सीचालकाचे आभार मानावेत तेवढे थोडे! बरे झाले तुम्ही निदान थोडे पैसे वर दिलेत. चालकांनी बक्षिसाच्या अपेक्षेने का होईना अशी मदत करावी. नाहीतर कितीतरी तरणेताठे जीव हकनाक जातात.

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 7:09 pm | उगा काहितरीच

काय बोलणार ? सलाम तुम्हाला व त्या ड्रायव्हरला.लेखाबद्दल...साधेपणा भावला .

माझा पण असाच अपघात झाला होता. २० मिनिटे रस्त्यावर पडुन होतो. अशाच एका काळीपिवळी ड्रायव्हरने सरकारी दवाखान्यात नेउन टाकले म्हणुन वाचलो.बाबांनी माझ्या लग्नात त्याचा पुर्ण मानपान केला.

यशोधरा's picture

21 May 2015 - 8:01 pm | यशोधरा

खरंच, दाग अच्छे थे!

असे दाग खरंच अच्छे असतात अाणि गाडी पुसली तरी मनातुन पुसले जात नाहीत.

स्वाती२'s picture

21 May 2015 - 9:00 pm | स्वाती२

अनुभव कथन आवडले. अशा टॅक्सीचालकाचे आभार मानावे तितके कमीच!

सुंदरच लिहिलंयत...

धन्यवाद!

सुधीर's picture

21 May 2015 - 9:21 pm | सुधीर

हब समोरचा पश्चिम द्रूत गती मार्ग ओलांडण्यासाठी सबवे आसतो हे ब-याच वेळा नवख्यांना माहीत नसतं (काही वेळा अगदी शहरात राहणा-यांनाही). अगांवर काटा यायचा भरगाव वेगाने जाणा-या गाड्यांपुढे पाठी-पुढे करणारी माणसं पाहिली की. दोन तीन जणांना मी स्वत: सबवे दाखवला आहे. तिथे एक साईन बोर्ड असायला हवा होता.

तसाच पुढे जोगेश्वरी फ्लायओव्हर वरून अंधेरीच्या दिशेकडून येणारे मोटरबाईकस्वार आणि पुलाखालून येणा-या गाड्या यांचे अपघातही बरेच झालेले आहेत.

सतिश गावडे's picture

21 May 2015 - 9:29 pm | सतिश गावडे

अनुभवकथन आवडले.

हल्ली "कशाला झंजटात पडायचे" असे म्हणत अपघातप्रसंगी कुणी मदत करत नाही. एका टॅक्सी ड्रायव्हरची सहृदयता पाहून बरे वाटले.

खरंच खूप कमी आहेत अशी मदत करणारे माणसे.खूप लोकांना वाटत कि आपण मदत केली पाहिजे,पण पोलिस उगाच ञास देईल म्हणून कोणी करत नाही.

रुपी's picture

22 May 2015 - 12:03 am | रुपी

फारच भावपूर्ण!

आकाश खोत's picture

22 May 2015 - 10:42 am | आकाश खोत

मंडळी हि कथा काल्पनिक आहे. हब मॉलजवळच काही दिवस आधी एका मुलीचा वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्यु झाला. तिच्या भावाने व्यथित होऊन तिचा जीव वाचू शकला असता अशी खंत फेसबुकवर "दि लॉजिकल इंडियन" या पेजवर व्यक्त केली.

त्यातुन मला हि कथा सुचली. असे लोक असावेत या आशेने.

आणि चांगले आणि (वाईट नाही पण) दुर्लक्ष करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक सर्वत्र असतात. आपण संकटात असताना आपल्याला कसे लोक भेटतात हे आपलंच नशीब म्हणायचं.

मी त्या फेसबुकवरच्या पोस्टचा दुवा पण कथेखाली दिला होता. पण तरीही काही वाचकांचा हा खरा अनुभव आहे असा समज झालेला दिसतो. त्यामुळे माझ्याकडून काही राहिले असल्यास क्षमस्व.

पण तरीही माझ्या कुटुंबियांना सुदैवाने काही प्रसंगी अशा वेगवेगळ्या लोकांनी खरोखर मदत केली आहे. हि कथा त्यांना अर्पण.

आणि टीवटीव यांच्या प्रतिसादावरून दिसते कि मी वर्णन केल्यासारखाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला होता. हा योगायोगच म्हणायचा.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

एस's picture

22 May 2015 - 8:13 pm | एस

या कथेवरून प्रेरणा घेऊन जर कोणी अपघातग्रस्तांना मदतीस प्रवृत्त झाले तर तेच या कथेचे खरे यश असेल.

लिहित रहा.

शि बि आय's picture

22 May 2015 - 7:02 pm | शि बि आय

खरच.. !!असे डाग एकाद्या मेडल पेक्षा कमी नसतात…म्हणूनच असे डाग चांगले असतात. धन्य तो माणूस !! पेशाने माणूस कोणी ही असो आतली माणुसकी जपली तरच माणूस म्हणता येते ना त्याला

नाखु's picture

23 May 2015 - 10:59 am | नाखु

ह्यो डाग मिरवायची ऐपत फक्त त्याच टॅक्शीवाल्याची हाये भित्राट लोकांना नाही संभाळणार हा दागिना

नतमस्तक नाखु

सुबोध खरे's picture

24 May 2015 - 10:57 pm | सुबोध खरे

हि जवळ जवळ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वडिलांच्या पोटात दुखत होते म्हणून मी लष्कर्तून निवृत्त झालेल्या पोटाच्या सर्जनची अपोइन्टमेंट घेतली. त्यांनी ठाणे येथील हिरानंदानी रुग्णालयात सायंकाळी सात वाजता आमच्या साठी येण्याचे कबुल केले. तेथे त्यांचा त्या दिवशी वार नव्हता तरीही त्यांनी माझ्या ओळखीमुळे यायचे कबुल केले होते. संध्याकाळी भरपूर वाहतूक असते म्हणून मी मोटर सायकलनेच जायचे ठरवले. सर लष्करातून निवृत्त झालेले असल्याने वेळेचे पक्के होते.
मुलुंड हून मी सव्वा सहा वाजता घरून निघालो. मध्ये ठाण्याच्या टोल नाक्यावर वाहनांचा खोळंबा झालेला होता. त्यातून वाट काढत पुढे आलो तर कोपरी पुलाच्या जरासे पुढे माझ्या पुढे चाललेल्या मारुती व्हानने तेथे रस्ता ओलांडत असलेल्या एका पन्नाशीच्या माणसाला ठोकले. तो माणूस रस्त्यावर आडवा झाला तेंव्हा त्या मोटारीतील माणसाने मोटार मागे घ्यायला सुरुवात केली माझ्या लक्षात आले कि हा पळण्याच्या तयारीत आहे. मी सरला मोटार सायकल त्याच्या पुढे आडवी लावली आणि त्याचा जाण्याचा मार्ग बंद केला. त्यानंतर मी आणि वडील खाली उतरलो आणि त्या माणसाला पाहू लागलो. त्याला बरेच लागले होते पण तो उठला. मी तेथे जमलेल्या माणसाना सांगितले कि मी डॉक्टर आहे आणि ठाणे सिव्हील रुग्णालयात याला घेऊन चला.आपण त्याला तेथे पाहू त्या मारुती व्हान च्या ड्रायव्हर ला सांगितले याला सिव्हील मध्ये घेऊन चल. तेथे जमलेल्या माणसांमुळे त्याला नकार देणे शक्य नव्हतेच त्या माणसाबरोबर त्याचे दोन मित्रही होते. तेही त्यात बसले. मी त्यांना म्हणालो यांना घेऊन या मी तेथे सर्व व्यवस्था करतो. आणि मी मोटार सायकल चालू केली. मला एकदम आठवले कि आपल्याला ठाणे हिरानंदानी येथे जायचे आहे. मी सरळ ठाणे सिव्हिल रुग्णालयाचा फोन फिरवला आणि ठेवणीतील आवाज काढून सांगितले कि मी नौदलातील डॉक्टर बोलतो आहे. मला ड्युटीवरील डॉक्टरशी बोलायचे आहे. तो डॉक्टर फोनवर आल्यावर त्याल मी सर्व परिस्थिती समजावून दिली आणि सांगितले कि मला तेथे येणे शक्य होणार नाही. पोलिस केस आहे तर जरा काळजी घ्या. परत येताना सिव्हिल रुग्णालयात जायचे असे ठरवून मी पुढे गेलो. सरांना भेटल्यावर वडिलांची शल्य क्रिया करेन आवश्यक आहे असे समजले तेंव्हा त्या सगळ्या गडबडीत मी हे सिव्हिल रुग्णालयात जायचे विसरून गेलो. त्यामुळे त्या माणसाचे पुढे काय झाले हे समजले नाही.( यथावकाश वडिलांची शल्यक्रिया ठाणे हिरानंदानी रुग्णालयात झाली आणि ते व्यवस्थित झाले) पण हि एक रुखरुख लागून राहिली. बहुधा त्या माणसाचा इलाज तेथे व्यवस्थित झाला असावा.

चटोरी वैशू's picture

1 Jun 2015 - 6:41 pm | चटोरी वैशू

आकाश मस्त लिहिले आहेस,लिहित रहा ...