माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तु प्रकार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
30 Apr 2015 - 6:28 pm
गाभा: 

चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा.

त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे.

काही मराठी संकल्पनांवर जालावर निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. किल्ले, दुर्ग यांचे फोटोज मिळतात पण निरनिराळे वाडे, गढी, वैगेरेंची माहिती मिळत नाही. आपल्याला काहीही माहिती असल्यास इथे टाकावी जेणेकरून सर्वांना उपलब्ध होईल.

प्रतिक्रिया

मराठा आर्किटेक्चर नामक एक पीडीएफ नुकतीच जालावरून उतरून घेतलीये. ती आर्काईव्ह.ऑर्ग वरती चढवतो अन तुम्हांला लिंक देतो.

इन अ‍ॅडिषन, मराठा टाऊन प्लॅनिंग या नावाचा एक पीएचडी थेसिस इथे पाहता येईल.

http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/2476

प्रत्येक चॅप्टरची वेगळी पीडीएफ आहे फ्री डौनलोडला.

टीपः हे दोन्हीही मी वाचलेले नाही तस्मात नेमके सांगू शकत नाही. तरी पाहून सांगा काय कसे वाटते ते.

शिवाय मंदा खांडगे यांनी लिहिलेले "वैभव पेशवेकालीन वाड्यांचे" हे पुस्तकही वाचनीय आहे, ते आप्पा बळवंत चौकात रसिक साहित्यमध्ये मिळून जावे.

सरतेशेवटी एकदा विश्रामबागवाड्यात जाऊन येणे. तिथे मॉडेल ठेवले आहे वाड्याचे. शिवाय वाड्याच्या आतबाहेर फिरून पाहता येईल काय कसे आहे इ.इ.

sidney toy नामक एका इंग्रजाने खास भारतीय मिलिटरी आर्किटेक्चरबद्दल काही पुस्तके लिहिलेली आहेत, उदा. द स्ट्राँगहोल्ड्स इन/ऑफ इंडिया, फोर्टिफाईड सिटीज़ इन इंडिया, इ.इ. ते मात्र कुठे जालावर उपलब्ध दिसत नाही. भाइसंमं च्या लायब्ररीतच जाऊन बघावं लागेल त्याकरिता.

संदीप डांगे's picture

30 Apr 2015 - 6:44 pm | संदीप डांगे

माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. :-)

मंदा खांडगेंचे पुस्तक नाशिकमधे कुठे मिळेल तर बघतो. विश्रामबागवाडा पुण्यात आहे का? मला पुण्याची फारशी माहिती नाही. तरी जाऊन येईनच.

विश्रामबागवाडा पुण्यात आहे का?

येस, तिथेच आहे. अप्पा बळवंत चौकापासून एकदम वॉकेबल अंतरावरती आहे. मेन खूण म्हणजे तुळशीबागेच्या बरोब्बर समोर आणि चितळेंच्या मेन ब्रँचला ऑलमोस्ट लागून आहे.

संदीप डांगे's picture

1 May 2015 - 11:17 am | संदीप डांगे

विश्रामबाग वाडा जबरदस्त आहे. इतकी प्रसिद्ध वास्तू मला माहित नाही याचं वैषम्य वाटलं :(

पुण्यात अजूनही बरेच वाडे शिल्लक आहेत असे जालावरुन कळतंय. आता पुणे-भेट आलीच.

नाखु's picture

1 May 2015 - 1:22 pm | नाखु

सर्कारी मालकीत अस्ल्याने जुन्या वसंत टॉकीजशेजारी नाना* वाडा अजून जिवंत आहे.
तसेच कसबा गणपतीच्या गल्लीत (व्य्वहारे मंडळाचा गणपती असतो तेथे रास्ते वाडा (मी या भागात गेल्या ४-५ वर्षात गेलो नाही तेव्हा अ-पार्ट्मेंट झाले असेल तर माहेत नाही. दुसरा माझ्या पाहण्यातला सूर्य हॉस्पीटलशेजारी असलेला वाडा कुणा सरदाराचा आहे भली मोठी झुंबरे आणी ऐसपैस झोपाळा पाहिल्याचे आठवते. त्यालाही वरील्प्रमाणेच निवेदन.

नाना* वाडा
यातील नानांचा माईंच्या नानाशी काहीही संबध नाही तूर्त तरी त्यांनी किंवा मिपासंशोधकानी लावला तर मी बापडा काय करणार !!!!

त्या सूर्य हॉस्पिटलशेजारच्या वाड्याला गोवंडे वाडा म्हणतात. गोवंडे सरदार असल्याचं मात्र ठाऊक नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा

@पुण्यात अजूनही बरेच वाडे शिल्लक आहेत असे जालावरुन कळतंय. आता पुणे-भेट आलीच.>> शिवाजी रोडच्या पलिकडच्या पुन्यात कचकून वाडे हायती! आगदी आपल्या म्हराटमोळ्या वाड्यांपासून ते मुसलमाणी,खिरीश्चणी,आनी फारशी वाडे घरं बी हायेत!

पैसा's picture

30 Apr 2015 - 7:30 pm | पैसा

म्हणजे चार सोपे (पडव्या) असलेला वाडा. यात चारी बाजूंना लांब पडव्या/खोल्या आणि मध्यभागी छोटे अंगण अशी रचना असते. अंगणात तुळस असते. या अंगणाला राजांगण म्हणतात. अशी घरे कोकणात, गोव्यात अजून आहेत. बाकीबाब बोरकरांचे घर असेच आहे आणि सुस्थितीत आहे.

कोकणातल्या घरांचे जे वैशिष्ट्य की मंगलोरी कौलांची दोन्ही बाजूंना उतरती छपरे ती या घरांतून बघायला मिळतात. विहीरसुद्धा घराच्या एखाद्या खोलीत असते.

सांरा's picture

30 Apr 2015 - 9:55 pm | सांरा

मलाही माझ्या प्रकल्पासाठी वाड्याची माहीती हवी होती पण शेवटी गुगल व आठवणीत असलेला एक वाडा यावरच भागवावे लागले.
जर तुम्हाला नव्या बांधलेल्या वाड्यांबद्दल माहिती हवी असेल तर प्रसिद्ध बल्लवाचार्य विष्णु मनोहर यांनी नुकताच वाडा बांधून घेतला आहे..

सव्यसाची's picture

1 May 2015 - 1:39 am | सव्यसाची

स्वदेस चित्रपटात जे घर आहे शाहरुख खानच्या आईचे ते चौसोपी आहे.
सोपा हा पूर्णपणे खुला असतो. त्याला दरवाजे वगैरे अशी कन्सेप्ट असत नाही. सोपा हा समोरील बाजूने लाकडी खांबांवर तरलेला असतो तर मागील बाजूने भिंतीवर. जर तो दुघई सोपा असेल म्हणजे मागे आणि पुढे दोन्ही बाजूला सोपा असेल तर खांबांच्या तीन रांगा असतील.
दोन खांबांमधील अंतरास खण असा शब्द आहे. (आमच्या गावाकडे त्याला आखण असे पण म्हणतात). एका खणाची रुंदी साधारण ३.५ फूट असते. (चुकत असेल तर दुरुस्त करावी).
सोपा झाला कि आत माजघर किंवा माळी किंवा माळवद असते. याला दरवाजे असतात तसेच मधून भिंतींच्या पडद्या करून खोल्याही केल्या असतील. आतली रचनाही साधारण तशीच असते. जर माजघर १०-१५ फुट रुंद आणि ६-७ खण लांब करायचे असेल तर खांबांची गरज पडणार नाही. परंतु जर हि रुंदी वाढवायची असेल तर मात्र दोन भिंतींच्या मध्ये अजून एक खांबांची रांग लावावी लागेल. अशी काही माजघरे मी पाहिली आहेत.
हे सर्व लाकडी बांधकाम असल्याने छतावरती करल (याचा नेमका उच्चार मला माहिती नाही पण आमच्याकडे असाच केला जातो. शाडू माती म्हणावे का त्याला?) टाकले जाते. थोडीशी वाळू पण मिक्स केली जाते. अलीकडे लोक कोबा किंवा तत्सम गोष्टी छतावर करू लागले आहेत.

दुघई आणि चौसोपी हे मी शनिवारवाड्याच्या संदर्भात जे रेफ़रन्स आले त्यातून लिहित आहे. काही दिवसांपूर्वी मी लेखमाला इथेच मिपावर लिहायला सुरुवात केली होती. त्याचा अभ्यास करतेवेळी चौसोपी, दुघई असे शब्द वाचण्यात आले. तुम्ही अजून पण शनिवारवाड्यात गेलात आणि मधला चौक आहे तिथले खांबांचे निशाण पाहिलेत तर समजून येईल कि तिथे दुघई आणि चौसोपी असण्याची शक्यता आहे.
पूर्वीच्या घरामध्ये ढेलज, देवडी वगैरे असत. मी माझ्या मावशीच्या घरी ढेलज पाहिली आहे. ढेलजेमध्ये लोक बसण्याची व्यवस्था वगैरे असे.
देवडी ही घरच्या नोकरांसाठी असावी असे वाटते. माझ्याच गावातील एका जुन्या घरामध्ये पेव होते आणि ते घराच्या खाली होते असे काही ऐकले आहे. आम्ही मोठे होईपर्यंत तो वाडा नष्ट झाला आणि आता तिथे भूतबाधा वगैरे आहे म्हणून कुणी जातही नाही.

(वरील माहिती मध्ये काही चुकीचे असेल तर कृपया करेक्ट करावे)

(वरील माहिती मध्ये काही चुकीचे असेल तर कृपया करेक्ट करावे)

स्वदेस चित्रपटात जे घर आहे शाहरुख खानच्या आईचे ते चौसोपी आहे. >> हे घर त्याच्या आएचे नसून गायत्री जोशीचे असते. त्याची दाई तिथे रहात असते. ;)

माफ करा हं.. बाकी काही चुकीचे सापडले नाही :)

असाच वाडा माझ्या आत्त्याचा अजूनही आहे. मी जेव्हा जेव्हा स्वदेस पाहते, मला हमखास तिचाच वाडा आठवतो. आता काळानुसार बेसिन, स्वयंपाकघरात ओटा वगैरे थोडे बदल झाले आहेत, पण बरीच मूळची रचना तशीच आहे. वरती गच्ची आहे - ज्यावर एका बाजूला खोल्या आहेत. गच्चीचा सोप्याच्या वरचा भाग मात्र फक्त लोखंडी गज बसवलेला आहे. त्यामुळे खाली हवा/ प्रकाश भरपूर आहे. गच्चीवर जायचा जिना मात्र अतिशय अरुंद आणि बर्याच उंच पायर्या असलेला असा आहे. अरुंद घाटात एकाच वेळी दोन बाजूंनी दोन वाहने आल्यावर जसा खोळंबा होतो तसाच त्या जिन्यात होतो, मग जरा अंग चोरुन, भिंतीला पाठ लावून वगैरे पुढे जायचे. :)

तिच्या माजघर आणि स्वयंपाकघर यांमधली भिंत साधारण एक मीटर जाडीची तरी असेल. त्यात थोडी बसण्यासारखी जागा आहे. ती तुम्ही म्हणता तशी धेलज असावी. त्यात आता त्यांनी जाळी टाकून बाहेरुन आत फोन वगैरे देता येईल अशी सोय केली आहे.

देवडी म्हणजे काय? नोकरांसाठी असावी असं म्हटलंय म्हणजे एखादी खोलीवजा असते का?

अशा वाड्यांमध्ये देवळ्या मात्र बर्याच असतात.

पेव हा शब्दही मी यासंदर्भात नव्हता ऐकला, पण आमच्या जुन्या वाड्यात खाली बळद होते. मला वाटते basement सारखा प्रकार असावा, पण आम्हा लहान मुलांमध्ये त्याबद्दल साधारणतः भीतीच होती (त्यात पाली, उंदिर असल्यामुळे असावी!).

या वाड्यांमध्ये सवानेही असायचे. सवाना म्हणजे खोलीच्या छतातून हवा/ प्रकाश येण्यासाठी मोकळी ठेवलेली जागा. पाऊस आला तर हे सवाने पत्र्याने झाकायला आमची पळापळ व्हायची. तसेच पत्रे उडून जाऊ नयेत म्हणून त्यावर विटा/ दगड असे काहीतरी वजन ठेवावे लागायचे. आमच्या/ आत्याच्या वाड्यात बर्याच खोल्या आकाराने अतिशय लहान. बर्याच दारांना उंबरा, आणि दारांची उंची फार कमी! माझा भाऊ उंच असल्यामुळे आत्याच्या घरी जायला फार वैतागतो. एक तर दारांतून फार वाकून जावे लागते आणि तिच्या घरी फारजण असल्यामुळे पाया पडायला वाकावे लागते ;)

या वाड्यांमधील नाहाणीघर मात्र मजेशीर आणि त्रासदायकदेखील प्रकार आहे. मुख्य नाहाणीघर शक्यतो फार मोठे, छत नसलेले आणि फक्त दार असलेले असते. पुरुष मंडळी शक्यतो तेथे आंघोळ करतात. स्वदेसमध्ये शाहरुख करतो तसेच ;) आणि त्याच्याच एका बाजूला स्त्रियांसाठी एक अतिशय लहान, बराच अंधार असलेली नाहणी असते. आमच्या गावाकडे मात्र आजीच्या घरात स्त्रियांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्थाच नव्हती. त्यात त्या नाहाणीतूनच गच्चीवर जाण्यासाठी जिना होता. त्यात गावात सगळ्या गच्च्या एकमेकींना जोडलेल्या. तसं गच्चीवरुन कुणी येत नाही, पण माझ्या मनात धाकधूक, त्यामुळे मी आपली फक्त आंघोळ केल्यासारखं करुन बाहेर यायचे. आजीला मात्र एकदा माहित झाल्यावर मी गावी गेले की आपली माझ्या मागे लागायची आंघोळ करण्यासाठी. आता आजी राहिली नाही, फक्त आठवणी आहेत! आजोबा आणि ती काही वर्षांपूर्वी शहरात राहायला आले. आजच आजोबांशी बोलणं झालं तेव्हा ते म्हणत होते की गावी जाउन आले आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता घर बरंच जुनं झालंय, बरीच पडझड झालीये, विकावं लागेल असं सांगत होते. त्यामुळे आता काही वर्षांत असा आणखी एक वाडा जाऊन त्याच्या जागी नवीन घर होणार! पण बाकी प्रतिक्रिया वाचून मला निदान अशा बर्यांच वाड्यांत राहायला / पाहायला मिळालं त्याचा आनंद आहेच. माझ्या मुलांना हे फक्त गोष्टींतूनच कळणार..

असो. विहिरीवरुन आठवलं.. आमच्या वाड्यात एक आड होता. हा आड जिथे नाहाणी होती तिथेच होता. आणि मग बादलीने त्यातून पाणी उपसून काढावे लागायचे. नंतर मोटर बसवून त्यातून पाणी काढायचे. आता वाडा पाडून त्याजागी नवीन घर बांधले, पण आड मात्र तसाच आहे.

अवांतरः बर्याच/ पायर्या हे शब्द मला बरोबर कसे टंकायचे कुणी सांगेल काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2015 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याच = baRyaach / baRyAch

पायर्‍या = paayaRyaa / pAyaRyA

सव्यसाची's picture

1 May 2015 - 3:18 pm | सव्यसाची

रुपीताई,
चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. :)

तिच्या माजघर आणि स्वयंपाकघर यांमधली भिंत साधारण एक मीटर जाडीची तरी असेल. त्यात थोडी बसण्यासारखी जागा आहे. ती तुम्ही म्हणता तशी धेलज असावी. त्यात आता त्यांनी जाळी टाकून बाहेरुन आत फोन वगैरे देता येईल अशी सोय केली आहे.

ढेलज हा शब्द देहलीज वरून आल्याची शक्यता आहे. देहलीज म्हणजे उंबरा. त्यामुळे ढेलज हि दरवाज्याजवळ असावी असे वाटते. सध्याच्या जमान्यात जश्या रिसेप्शन रूम असतात तसे काही असावे का?

देवडी म्हणजे काय? नोकरांसाठी असावी असं म्हटलंय म्हणजे एखादी खोलीवजा असते का?

हो नोकरांसाठी खोल्या असाव्यात. आपण शनिवारवाडा पाहिला असेल तर सध्या जिथे तिकीट विक्री होते ती देवडी असावी असे वाटते. ती खोली बरीच मोठी आहे. तसेच दुमजली पण आहे. नगारखान्यावर असलेले लोक पण तिथेच असावेत असे वाटते.

या वाड्यांमध्ये सवानेही असायचे.

मला वाटते हा शब्द सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला जातोय. आमच्याकडे त्याला 'सवने' असा शब्द आहे. जुनी माळवदे पहिली तर त्यांना असणाऱ्या खिडक्या खूपच छोट्या असतात किंवा नसतात तरी. त्यामुळे आतल्या बाजूला खूप अंधार असल्याने हे उजेडासाठी ठेवले जायचे. आमच्याकडे सवने पाहिली तर ती साधारण उतरंडीपाशी असत. त्यातील कुठल्यातरी एका माठात पैसे, सोने अश्या गोष्टी ठेवल्या जात.
आंबे पिकवण्यासाठीही माळी वापरली जायची.

पण बाकी प्रतिक्रिया वाचून मला निदान अशा बर्यांच वाड्यांत राहायला / पाहायला मिळालं त्याचा आनंद आहेच. माझ्या मुलांना हे फक्त गोष्टींतूनच कळणार..

सहमत. पुढच्या पिढीला हे पाहायला मिळणे थोडे कठीणच आहे. फक्त ऐकीव माहिती किंवा फोटो.

बॅटमॅन's picture

1 May 2015 - 4:16 pm | बॅटमॅन

मस्त माहिती एकदम!!!! सहीच. :)

माझा जन्म मुंबईतला आणि गाव नाहीच त्यामुळे गावातली घरे ही फक्त बाहेरूनच येता/जाताना पाहिलेली. खुपश्या कथा कादंबर्यात माजघराचा उल्लेख आढळतो. मुंबईच्या भाषेत बोलायचे झाल्यास माजघर म्हणजे नेमकी कोणती खोली ? हॉल, बेडरूम, किचन की ह्यांच्या शिवाय एखादी वेगळीच खोली ? खुप दिवसांपासून ही शंका मनात होती, ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा उफाळून वर आली.

सव्यसाची म्हणतायत तो बहुतेक खालील प्रकारचा वाडा.
abcd
किंवा असा
abcd

आणि पैसाताई म्हणतायत तो खालील प्रकारचा असावा. फक्त विहीर बाहेर आहे.
abcd

पैसा's picture

1 May 2015 - 8:30 am | पैसा

बेसिक रचना ही की चारी बाजूंनी बांधकाम, बाहेरच्या बाजूला चारी बाजूंना पडव्या आणि मधे राजांगण. त्यावर छप्पर नसतं.

सरल मान's picture

29 Aug 2018 - 12:22 pm | सरल मान

ताई तुम्ही सान्गताय अगदी तसाच आमचा वाडा होता गावी. चारी बाजूंनी बांधकाम, आत मध्ये यायला हत्ती येवू शकेल ईतका मोटा एकच दरवाजा, आतमध्ये मोट आन्गण, मध्यभागी तुळशी व्रन्दावण. आन्गणातल्या एका कोपर्‍यामध्ये रान्जण कट्टा, चारी बाजूला उघड्या पडव्या आणि एका पडवीच्या कोपर्‍यात मोहरी (बाथरुम). पुर्ण बान्धकामात आतल्या बाजूने खुप सार्‍या दिवळ्या आणि भिन्ती मध्ये कोरलेल्या खिडक्या होत्या. एका पडवीच्या बाजूला बन्दीस्त स्वयन्पाक घर आणि त्यात चिमणी असणारी चुल. पडव्याच्या आतील बाजूस वेगवेगळ्या खोल्या होत्या.
अलीकडे वाटण्या झाल्या आणि वाड्याच वाडापण हरवून गेल.
टन्क लेखनासाटी क्शमस्वः

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2015 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या आजोबांचा तिसर्‍या चित्रात दाखविल्याप्रमाणे चौसोपी वाडा आहे. त्याला मधे अंगण नसून त्यावर घरासारखेच पूर्ण छप्पर असलेली मोठी चौरस खोली आणि तिच्या अर्ध्या भागावर एक मजला (खण) होता. वर बहुदा अडगळीचे सामान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यात हापूस आंब्यांच्या अढ्या (आंबे पिकण्यासाठी पेंढ्याच्या आवरणात ठेवतात त्या मोठ्या टोपल्या) ठेवत असत. आंबे पिकले की त्यांचा मधुर वास त्या मधल्या खोलीत भरून जात असे. उजेडासाठी मधल्या खोलीच्या छताला मधे मधे काचेची कौले लावत असत.

सगळ्या पडव्यांना चारीबाजूंनी भिंती आहेत. एका लांबलचक पडवीत एका बाजूला स्वयंपाकघर आणि उरलेल्या भागात जेवण्याच्या पंगतीसाठी जागा अशी एकत्रच सोय आहे.

चौसोप्यातील एका भागात बांबूंच्या मजबूत चटईला गोलाकार गूंडाळून त्याला उभे करून त्यात मळणी करून आणलेले भात ठेवत असत. त्याला पेव म्हणत असत. शेतकर्‍याच्या उत्पन्नाच्या प्रमाणात एक किंवा अनेक पेवे असत. पेवाला भोक पडले तर आतले धान्याचे दाणे भराभर बाहेर पडून घरभर (पडवीभर) पसरत असत. यावरूनच "पेव फुटणे" हा वाक्प्रचार बनला आहे.

उन्हाळ्यात वाड्याच्या पडव्यांना जोडून पेंढ्याने शाकारलेला प्रशस्त मांडव केलेला असे. त्याच्या उपयोग दुपारच्या तळपणार्‍या उन्हाच्या वेळी हवेशीर सावलीत खेळण्यासाठी व रात्री झोपायला हवेशीर जागा म्हणून होत असे. उन्हं कमी झाली की आजूबाजूच्या माळांवर आणि टेकड्यांवर भटकायला आणि रानमेवा खायला जायची घाई व्हायची !

आता आजोबा जाऊन खूप दिवस झाले. वाड्यावर अखेरचे जाऊन पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असेल. पण, या लेखाच्या निमित्ताने लहानपणी मे महिन्यांच्या सुट्ट्यांत कोकणातल्या आजोळी केलेली धमाल आठवली. आंबे, करवंदे, जांभळे, जांब, भोकरे, काजू, कलिंगडे, वालाची पोपटी... किती किती सुगंध, स्वाद आणि आठवणी मनात तरळल्या !!!

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2015 - 7:52 am | श्रीरंग_जोशी

माझे लहानपण वरुडला ब्राह्मणवाडा या भागात गेले. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये जसे शंभर सव्वाशे वर्ष जुने वाडे दाखवायचे तसे अनेक वाडे तिथे होते. बर्‍याच वाडयांमध्ये काही फारशा वापरात नसलेल्या खोल्या असायच्या ज्यांचा उपयोग लहान मुलांना भिती दाखवण्यासाठी केला जायचा.

माझ्या माहितीप्रमाणे माजघर म्हणजे स्वयंपाकघराशेजारी जेथे कुटूंब एकत्र बसून जेवते ती जागा. ती वेगळी खोली असेलच असे नाही.

पैसा's picture

1 May 2015 - 8:28 am | पैसा

ती खोलीच असते, ओटी आणि स्वयंपाकघराला जोडणारी. घरात आत शिरलं की आधी पडवी, तिच्यापेक्षा १/२ पायर्‍या उंचावर ओटी. ओटी आणि पडवीच्यामधे भिंत किंवा दरवाजा नसतो. ओटीवरून थेट स्वयंपाकघर लागत नाही. मधे माजघर असते. त्यात फडताळे वगैरे असतात. आणि घरात जर कोठीची खोली नसेल तर साठवणीचे पदार्थ, ट्रंकांमधून काही कपडे वगैरे तिथे ठेवलेले असतात. थोडीच म्हणजे २/४ लोकं जेवायला असतील तर तिथे जेवतात. जास्त मोठी पंगत असेल तरच ओटीवर पानं घ्यायची. ही सहसा घरातल्या बायकांची दुपारच्या झोपेची आवडती जागा. सगळ्या घराच्या मधे असल्याने, म्हणजे चारी बाजूंनी खोल्या असल्याने हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड असते.

सुमीत भातखंडे's picture

26 Feb 2016 - 9:34 pm | सुमीत भातखंडे

सहमत.

संदीप डांगे's picture

1 May 2015 - 9:55 am | संदीप डांगे

@पैसाताई, सव्यसाची, रुपी, खटपट्या.

माहितीपुर्ण प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. ही सर्व माहिती कामी येईल असे वाटते आहे. अजून भरपूर माहितीची गरज आहेच. फोटोज मिळत असतील आणि शक्य असेल तर अवश्य द्यावे.

विशाखा पाटील's picture

1 May 2015 - 10:24 am | विशाखा पाटील

माझ्या आजोबांचा जळगाव जिल्ह्यात जामनेर या गावी वाडा आहे. हा वाडा थोड्या उंचावर असलेल्या गढीचा एक भाग आहे.
गढीतल्या विहिरीच्या थोडं पुढे गेल्यावर हा दुमजली वाडा लागतो. दरवाजात उभं राहिल्यावर समोर अंगण आणि त्याच्यापलीकडे प्रशस्त बैठक. डावीकडे मुख्य घर. बैठकीच्या भिंतीत अनेक गोखले (भिंतीतले कप्पे - नीट शब्द सुचत नाहीये.) होते.

अंगणाच्या उजव्या बाजूला सव्यासची यांनी म्हटल्याप्रमाणे नोकर बसण्यासाठीची जागा होती. डाव्या बाजूला मुख्य घर. यात चौकाचे घर, त्याला लागून एका बाजूला रांधणी आणि दुसऱ्या बाजूला देवघर आहे. रांधणी आणि देवघर यांच्या मध्ये सामान ठेवण्यासाठीचं माजघर होतं. रांधणीच्या छताला उजेड येण्यासाठी आणि चुलीचा धूर जाण्यासाठी 'सानं' होतं.

चौकाचं घर आणि देवघराचं छत लाकडी असल्यामुळे खान्देशातल्या उन्हाळयातही खोल्या गार असायच्या. खिडकीजवळ बसण्यासाठी ऐसपैस जागा. उंचीवरच्या खिडकीत बसून बाहेरचं जग बघणं, हा या बंदिस्त वाड्यातला विरंगुळा होता. खोल्यांच्या आकाराच्या मानाने खिडक्या लहान असल्यामुळे घरात उजेड कमी असतो.

दुसऱ्या मजल्यावर एक मोठं दालन आणि बऱ्याच खोल्या आहेत. या वाड्याच्या रचनेत शत्रूला हुलकावणी देण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण योजना होत्या. वरच्या मजल्यावरच्या एखाद्या खोलीचा दरवाजा उघडल्यावर पुढे पायऱ्याच नाही, पुढे पाय टाकल्यास कपाळमोक्ष ठरलेला. संकटकाळी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी केलेली सोय म्हणून वाड्यात एक भूयारही होतं.

बैठकीच्या भिंतीत अनेक गोखले (भिंतीतले कप्पे - नीट शब्द सुचत नाहीये.) होते.

यासाठी देवळी किंवा दिवळ्या असा शब्द आहे. तसेच भितींमध्ये फडताळ पण असे. दिवळी पेक्षा बरेच मोठे असते ते.

पैसा's picture

1 May 2015 - 12:50 pm | पैसा

गोखले म्हणजे कोनाडे बहुधा. आमच्या घरीही भिंतीत असे लहान मोठे कोनाडे होते. कोनाड्यात घड्याळ, कंदील, बुके अशा सुट्या वस्तू ठेवायला बरे पडायचे. फडताळ म्हणजे फळ्या मधे टाकलेले कपाट. ते कोनाड्याहून बरेच मोठे. स्वयंपाकघर आणि माजघराच्या मधली भिंत खूप रुंद आणि तिच्या काही भागात भिंतीतले देवघर अशी रचनाही काही ठिकाणी पाहिली आहे.

सव्यसाची's picture

1 May 2015 - 2:43 pm | सव्यसाची

हो. कोनाडा हा शब्द पण आहे. पण आमच्या भागात कोनाडा हा शब्द कुणीच वापरत नाही म्हणून दिवळी हा शब्द लगेच समोर आला.

फडताळ म्हणजे फळ्या मधे टाकलेले कपाट. ते कोनाड्याहून बरेच मोठे. स्वयंपाकघर आणि माजघराच्या मधली भिंत खूप रुंद आणि तिच्या काही भागात भिंतीतले देवघर अशी रचनाही काही ठिकाणी पाहिली आहे.

हो नक्कीच. फडताळ तर बरेच मोठे. आमच्या घरच्या भिंती ह्या ३ फूट रुंदीच्या तरी असतील. त्यामुळे त्यात अशी २-३ फडताळ होती. त्याला दरवाजाही असे. मांजरांपासून दुध वाचवण्यासाठी फडताळाचा वापर केला जाई. दही विरजायला पण त्यातच ठेवले जात असे.

शिंकाळे हि एक अशीच दुर्मिळ होत चाललेली गोष्ट.

राही's picture

1 May 2015 - 10:31 am | राही

माझघर हा घराचा मधला म्हणजे मध्यघर. त्यावरून माझघर. पैसाताईने म्हटल्याप्रमाणे पडवी, ओटा ओलांडून पुढे आले की मध्यभागी माझघर आणि त्याच्या दोहोंबाजूंना लहान लहान खोल्या. पूर्वपश्चिमेनुसार बहुतेक वेळा घरात शिरल्यावर माझघराच्या एका डाव्या हाताला देवघर, मग त्याला लागूनच सोवळ्याचे स्वयंपाकर,पुढे कोठीची खोली, माझघराच्या उजव्या बाजूला, क्रमाने खोल्या, त्यात सोवळ्याचे आणि उंची कपडे,कागदपत्रे वगैरे. खास लोकांच्या झोपण्याची व्यवस्था इ. मग उजव्या बाजूला सर्वात शेवटी काळोखाची खोली (ही बहुधा बाळंतिणीसाठी असे), त्याला लागूनच एक छोटी न्हाणी-हीही बहुधा बाळ-बाळन्तिणीसाठी असे-इ. आम न्हाणीघर मागच्या बाजूला, थोडे प्रशस्त आणि वरून उघडे असे. त्याला जवळ पडेल अशी पाणी तापवण्याची चूल, पाणी साठवण्याची( घंगाळे, डोण्या ठेवण्याची) जागा वगैरे. अगदी मागे पुन्हा सोपे, पडव्या. मध्ये एखादा चौक.
जाता जाता- मुंबईतले माझगाव हे जुन्या मुंबईतल्या सात बेटांपैकी महत्त्वाच्या अशा मुंबई आणि परळ या बेटांमधले छोटे बेट होते. मधले गाव म्हणून माझगाव. मत्स्यग्राम वगैरे व्युत्पत्ति चुकीची आहे. कारण दोनशे वर्षांपूर्वी हे बेट शेतीप्रधान होते. फेरीव्हार्फ वगैरे मासळीबंदरांची बांधणी गेल्या शंभरदीडशे वर्षांतली आहे.

सौन्दर्य's picture

1 May 2015 - 7:18 pm | सौन्दर्य

खटपट्याजीनी डकवलेल्या दुसर्या फोटोतील मधला भाग म्हणजे माजघर का ?

प्रदीप's picture

1 May 2015 - 7:53 pm | प्रदीप

मूळ विषयाच्या संदर्भात अगदी नेमक्या भाषेत व माहितीपूर्ण आहेच, आणि शेवटचे अवांतरही.

(मुंबईच्या इतिहासाविषयी आपण एखादी लेखमाला लिहावीत, असे सुचवतो).

प्यारे१'s picture

1 May 2015 - 11:48 am | प्यारे१

चौसोपी म्हणजे चारी बाजूंनी खोल्या नि मध्ये अंगण किंवा मन्दिर किंवा तुळस वगैरे. वर सगल्यांनी सांगितल्याप्रमाणं.
अशा प्रकारचे वाडे वाई आणि परिसरात अजूनही आहेत. 2000 साला पर्यन्त खूप होते. पडझड़ झालेले तरी दिसायचे पण् आता तिथं इमारती उभ्या झाल्या आहेत.
स्वदेस चं चित्रीकरण तिथलंच आहे. इश्किया, गंगाजल, मृत्युदंड मधले वाडे वाई आणि भागातले च आहेत.
अनेक पेशवे कालीन वास्तु आणि हेमादपंथी शैलीतली मन्दिरे वाई मध्ये आहेत. फलटण ला देखील असे वाडे आहेत.

हाडक्या's picture

1 May 2015 - 8:02 pm | हाडक्या

उल्लेखलेल्या मृत्यूदंड, गंगाजल वगैरे चित्रपटातील वाडा हा नाना फडणवीसांचा मेणवलीचा वाडा आहे. शेवटी दहा वर्षांपूर्वी पाहिला होता तेव्हा तरी तसा वाईट अवस्थेतच होता. आजचे माहित नाही. तिथे मातीच्या भिंतीवरील रंगवलेली चित्रे ही खास चित्तवेधक वाटली होती.

प्यारे१'s picture

1 May 2015 - 9:50 pm | प्यारे१

शूटिंगमध्ये 2 मिनिटांत एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. जिना एका इमारतीचा आणि खोली दुसरीच असा प्रकार. मृत्युदंड मध्ये नाना फडणवीसांचा वाडा आहे. तो फारसा ठीक नाही. 'जिस देस में गंगा रहता है' चं काही शूट तिथं झालं आहे. गंगाजल मध्ये वाईतलया मधल्या आळीच्या शिवदेंचा वाडा (बच्चा यादवचं घर) आहे. स्वदेस मध्ये पसरणी आणि एकसर मधले वाडे आहेत. हे वाडे सुस्थितीत नाही तरी बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत. तुम्हाला परिसर ठाऊक आहेच की! या एकदा.

छान विषय आणि एकसेएक प्रतिसाद!

कवितानागेश's picture

1 May 2015 - 4:11 pm | कवितानागेश

त्र्यम्बकेश्वर ला अजूनही असे वाडे आहेत. दगडी, चारी बाजूनि खोल्या मध्ये मोकळी जागा आणि त्यातच चौकोनी विहीर, असा एक पाटनकरांचा वाडा पाहिलाय.

संदीप डांगे's picture

1 May 2015 - 4:28 pm | संदीप डांगे

त्र्यंबक जवळच आहे.

नाशिकलाही काही वाडे अतिशय सुंदर आहेत. पण त्यांची बांधणी चौसोपी वाड्यापेक्षा वेगळी व नदीतीरी असल्याने पुराच्या पाण्याला अनुसरून केलेली आहे. अजून बरेच तग धरून आहेत. पण पुनर्बांधणीत वाड्यांची जागा आता अपार्टमेंट्स घेऊ लागले आहेत. कालाय तस्मै नमः

स्पंदना's picture

1 May 2015 - 4:45 pm | स्पंदना

शाडू मध्ये वाळु आणि पिंजर घालून केलेला गिलावा निघता निघत नाही आमच्या वाड्याचा.
वाडा!
पहिला समोर ही भली मोठी भिंत, त्याला आत बसायला एक कट्टी, कट्टीला लागून दरवाजा. दरवाजा ओलांडून आत आल की एक माचा टाकलेली बाहेरच्यांनी बसावं म्हणुन असलेली ओसरी. ओसरी नंतर एक मसूरीटाकिच्या दगडांच चौंगाण. हे वरुन ओपन! पावसाच पाणी त्यातुन केलेल्या दगडी पन्हाळ्यातुन घराखालून मागे परड्यात बाहेर पडाअयच. अशी चार चौंगाणं घराच्या चार बाजूला. हे बाहेरच चौंगाण ओलांडल की लागायचा सोपा! यावर बरेच खांब! अन त्या सोप्ञाच्या भिंतीला एक कोरीव शाडुत नक्षिकाम केलेलं गणपतीच मंदिर किंवा गणपतीची देवळी. या देवळीच्या एका बा़जूला घराचा खिळेबंद दरवाजा, त्याला आडणा आहे. अन त्याच्या उंबरा दिडफुट उंच! दोन्ही बाजूला घोड्यांची मुंडकी! अन दुसर्‍या बाजूला देवखोलीच दार. मुख्य दारातुन घरात गेलं की माळी. माळीला देवखोलीत जाण्यासाठी एक दरवाजा, अन त्या दरवज्या जवळ वर जायचा जिना. दगड मातीचा भरीव. माळीत जिन्याखाली एक भिंतीतली खोली कम कपाट कम समथिंग. आत मध्ये निवांत शिरता येतं. मग माळी संपली की माजघर. माजघराला लागून अंधार खोली. ही बाळंतीणीची. या खोलीत भिंतीत देवळ्याच देवळ्या. माजघर आणी स्वैपाकघर यांच्या मधल्या मिटरभर भिंतीत एक आरपार खिडकी. सहा बाय सहा फुटाची. तिला पण दार होतं. माजघराच्या अंधार खोलीच्या विरुद्ध बाजूला एक खोली तिला दार. मग मागे स्वैपाकघर. त्यात भिंतीत कपाटे. ताकाचा खांब. चुलीजवळ मागच्या चौंगाणात पहायला आणखी एक अशीच सहाफुटी खिडकी. घागरींचा कट्टा. पिंपाचा कट्टा. चुलीजवळ राख ठेवायला खड्डा. एक दुधाचा काय बर नाव? येथे चुलीतली गरम राख सरकवत रहायच. अन त्या गरम राखेवर कायम दुध ठेवायच म्हणे. स्वैपकघराच्या मागे तुळशी कट्ट्याच अंगण. तेथे कोपर्‍यात एक छोटा चुन्यात घडवलेला दगडई मोरीसारखा कोपरा. चुळा भरायला, अन रात्री मागे परड्यात न जाता सोय व्हावी म्हणुन. हे चौंगाण संपल की मग मागच्या पडवीत एका बाजूला कोठार, अन एका बाजूला न्हाणी घर. न्हाणी पुन्हा घडिव दगडांची, बाजूला चुलवाण. पण दरवाजा इल्ले! धुर कोंडू नये म्हनुन असावं.
त्या मागे जळणाची खोली, मग गोठा आणि मग परडं!
देवखोलीच्या दुसर्‍या बाजूला आणि एक प्रशस्त दरवाजा, त्या मागे मात्र नुसत्या खोल्या आणि मध्ये एक पॅसेज हा पॅसेज न्हाणीला येउन मिळायचा.

सौन्दर्य's picture

1 May 2015 - 7:14 pm | सौन्दर्य

फार सुंदर वर्णन, संपूर्ण वाडाच डोळ्यापुढे उभा केलात. कितीतरी नवीन शब्द वाचायला मिळाले तुमच्या लेखात. कट्टी, माचा, मसुरी टाकी, चौंगाण, परडी, देवळी, खिळेबंद, आडणा,माळ,चुलवाण, परडं, व्वा व्वा. ह्या शब्दांमुळे तुमच्या वाड्याला एक व्यक्तिमत्व प्राप्त झाल्यासारखं वाटलं. वाक्यांच्या संदर्भामुळे ह्या शब्दांचे साधारण अर्थ जरी कळले तरी नेमके अर्थ सांगितलेत तर आवडेल. तेव्हढीच ज्ञानात भर.

सव्यसाची's picture

1 May 2015 - 7:20 pm | सव्यसाची

सुंदर वर्णन केले आहे. अगदी त्या वाड्यात जाऊन आलोय असे वाटले.
जमले तर फोटो शेअर करावेत या वाड्याचे.
धन्यवाद.

लेख आणि माहिती चांगली परंतू रेखाचित्रे नसल्याची उणीव जाणवते. आता वाडे मालकांकडून फोटो दूर राहिले आमंत्रण येण्याची शक्यता नाही .पुण्यातल्याच एका जोडप्याने वाड्यांचे दरवाजे जमवले आहेत त्याबद्दल मटात लेख होता.इथलेच वाडे हा आग्रह नसेल तर एका मल्याळम चानेलवर शनिवारी संध्याकाळी एक चांगला कार्यक्रम असतो.

सौन्दर्य's picture

1 May 2015 - 7:21 pm | सौन्दर्य

संदीप जी, तुम्ही हा विषय मांडलात आणि खूप चांगली चांगली माहिती आपल्या मिपाकारांकडून मिळाली. तुमचे तसेच सर्व प्रतिसाददात्यांचे खूप खूप आभार.

श्रीरंग_जोशी's picture

2 May 2015 - 4:07 am | श्रीरंग_जोशी

पुण्यातले राजा दिनकर केळकर संग्रहालय ज्या वास्तुमध्ये आहे तीदेखील जुना वाडाच आहे. संबंधीतांची परवानगी मिळाली तर संग्रहालयासोबत वाड्याचेही निरिक्षण तुम्हाला करता येईल.

अहो तो मस्तानीचा महाल होता ना ? मूळ जागेवरून वीट आणि वीट आणून केळकरांनी तो तिथे पुन्हा घडवला असं काही तरी आहे ना?

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2015 - 1:47 am | श्रीरंग_जोशी

केळकर संग्रहालयात मस्तानीच्या महालातील काही ऐवजांचे केवळ एक दालन आहे.

नूतन सावंत's picture

2 May 2015 - 9:56 am | नूतन सावंत

वेगळा विषय आणि जाणकारांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती.धागाकर्ता आणि प्रतिसादाकांचे आभार.

सिरुसेरि's picture

2 May 2015 - 11:13 pm | सिरुसेरि

वास्तुपुरुष , एक डाव भुताचा या चित्रपटांचेही चित्रिकरण चौसोपी वाड्यांमध्ये झाले आहे.

संदीप डांगे's picture

4 May 2015 - 12:54 am | संदीप डांगे

वाड्यांबद्दल मनस्वी आणि हृदयस्पर्शी आठवणींच्या रुपात माहिती देणार्‍या प्रतिसादकांचे मनापासून आभार. हा धागा अशाच आठवणी, माहिती आणि फोटोंनी वाहत राहावा अशी अपेक्षा करतो.

पुढील आठवड्यात नाशिकातल्या काही वाड्यांचे फोटो टाकीन.

कोकणात आजही असे वाडे पहायला मिलतात
स्टार प्रवाह वर अग्निहोत्र मालिकेतील वाडा

पैसा's picture

4 May 2015 - 8:16 am | पैसा

दुपाखी चौपाखी असे प्रकार आठवले. सर्वात उंच मुख्य आडवा वासा आणि त्याच्या दोन्ही बाजूंना उतरते होत गेलेले छप्पर 'दुपाखी' आणि एका बिंदूपासून चारी बाजूंना उतरती होत गेलेली छपरे चौपाखी.

प्रचेतस's picture

4 May 2015 - 3:35 pm | प्रचेतस

सर्वच प्रतिसाद आवडले.

वाड्यांची तशी फारशी माहिती नाही. पूर्वी लोकसत्तेच वास्तुरंग पुरवणीत जुन्या भव्य वाड्याविषयी असे सदर चालू होते.

माझा स्वतःचा वाड्याविषयक अनुभव मंचर - भीमाशंकर रस्त्यावर असलेल्या घोडेगावचा.
आत्याचा वाडा. भला प्रशस्त, तीमजली. काळवत्री दगडांनी बांधलेला. वाड्याला दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना ओसरी. ओसरीतल्या कठड्याला बाजूने पितळी रिंगा, घोडे वगैरे बांधायला. मध्यभागी भव्य प्रवेशदरवाजा. त्यातच लहानसा दिंडी दरवाजा. ये जा सगळी दिंडी दरवाजानेच. आत प्रवेश केल्यावर मध्ये मोकळा चौक व इतर तिन्ही बाजूंनी खण. प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस मुख्य खोली, त्याच्या बाजूलाच बाळंतिणीची अंधारी वाटणारी लहानशी खोली. डाव्या बाजूस अंगचाच जिना त्यावर वरचा मजला. जिन्याच्या शेजारी लहानशा खोलीत केलेले स्वतंत्र देवघर. मुख्य खोलीतूनच जमीन खोदून केलेले एक तळघर तर तळघरातून वाड्याच्या बाहेर पडायला केलेला एक स्वतंत्र आणि गुप्त दरवाजा.
सर्व खोल्यांची प्रवेशद्वारे साधारण ५ फूट उंचीची. खोल्यांत प्रवेश करताना वाकूनच जावे, जणू वाड्याला नमन करून विनम्रतापूर्वकच आत जावे म्हणून अशी रचना.
मुख्य खोली आणि माजघर यांचेमध्ये दुसर्‍या मजल्यावर नेणारा अजून दरवाजा. तिथ ३ खोल्या. त्याहीवर अजून एक पोटमाळा. माळ्यावर २ बळदं. बळदात धान्याचा साठा करून ठेवायचा. लागेल तितके धान्य काढून घ्यायला मुख्य खोलीत दोन गोलाकार छिद्र. लाकडी ओंडक्याने बंद केलेली. धान्य हवे तेव्हा लाकडी ओंडका काढून घ्यायचा. आणि धान्य भरुन घ्यायचे.

बळदाच्या पोटमाळ्यावर गच्चीवर जाण्यासाठी लहानसा दरवाजा व पुढे लहानशीच गच्ची व त्याच्या चारी बाजूंनी वाड्याचे कौलारु छत. कौले शाकारण्यासाठी जायची केलेली सोय.

१५० वर्षांपूर्वीचा हा वाडा अजूनही तितकाच भक्कम आहे.

सुनिल पाटकर's picture

4 May 2015 - 3:38 pm | सुनिल पाटकर

दापोली-जालगाव येय़े डाँ.वागळे यांचा असा वाडा आहे.येथे काही मालिकांचे चित्रीकरणही झाले आहे

नमकिन's picture

15 Jun 2015 - 5:02 pm | नमकिन

माझे आजोळ (आईचं गाव) व वडिलांचे गांव दोन्ही १० कि.मी परिघात असून तेथे असे चिरेबंदी वाडे लहानपणी दर ऊन्हाळी सुट्टीत अनुभवले, भाग्यंच. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात असे कैक वाडे बालपणी लग्न समारंभ निमित्ताने पाहता आले.
आज हा धागा सापडला त्याचे कारण वाडा दुरुस्तीसाठी शोध करत होतो. आज गावी गेलो होतो तेव्हा आत फक्त ३ जणी उरल्यात वाड्यात, त्यातली १ माझी आजी (आईची आई) बाक़ी सारे गाव सोडुन शेतावर खोल्या बनवुन राहतात. जेथे ५०-६० माणसे रहात होती पण पडझड, डागडुजीचा अभाव व वाढती गरीबी, आतबट्टयाची शेती, जुण्या बांधकाम जाणत्या कारागिरांचा तुटवडा, नवीन तंत्र जुन्याच्या मुळावर या सर्वांचा एकत्रित परिणाम वाडे नामशेष होताना दिसत आहे, मनात हळहळ ऊरते.

रोहित गोसावी's picture

26 Feb 2016 - 4:05 pm | रोहित गोसावी

कृपया मला पेशवेकाळातील विश्रामबागवाड्याचे महत्व द्या ना ? प्लिज मला खूप गरज आहे.. कृपया मला whtsapp करा ..8421060808

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2016 - 9:01 pm | श्रीरंग_जोशी

महत्व या शब्दामुळे घोळ होत आहे. पेशवेकालिन विश्रामबागवाड्याची माहिती मिळणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असावे असे वाटते.

सिरुसेरि's picture

26 Feb 2016 - 5:55 pm | सिरुसेरि

यासाठी अब मधली दुकाने , दुकानदार तुम्हाला मदत करु शकतील .

हेमंत लाटकर's picture

26 Feb 2016 - 11:16 pm | हेमंत लाटकर

छान माहिती. माझ्या मावशीचा आध्रप्रदेश मध्ये चाैसाेपी वाडा आहे. लहानपणी आम्ही उन्हाळ्यात नेहमी जात. तेथे आेसरीवर बंगई आहे. दुपारी मागील परसात आम्ही मावसभाऊ खेळत असू. आंब्याच्या रसाची पाेळी तयार करीत. खूप मजा यायची.

रोहित गोसावी's picture

27 Feb 2016 - 2:35 pm | रोहित गोसावी

विश्रामबागवाड्याचे त्या पेशवेकाळात काय महत्व होते ते हवे आहे... मला कॉलेजला प्रोजेक्ट आहे ...वाड्यांविषयी माहीती भेटली आहे पण महत्व काय होते याविषयी माहीती हवी आहे

प्रचेतस's picture

27 Feb 2016 - 2:40 pm | प्रचेतस

प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर दादूस वाड्याला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल. अशी कशी माहिती भेटेल डायरेक्ट?

प्रचेतस's picture

27 Feb 2016 - 2:44 pm | प्रचेतस

बाकी विश्रामबाग़वाडा उत्तरपेशवाईत दुसऱ्या बाजीरावाच्या निवासासाठी बांधला गेला. शनिवारवाडा आपणास लाभत नाही म्हणून दुसऱ्या बाजीरावाने तिथून जवळच स्वत:स राहण्यासाठी वाडा बांधवून घेतला.

किरण नाथ's picture

28 Aug 2018 - 9:00 pm | किरण नाथ

भोरचा राजवाडा पहा. उत्त्म स्थितित असलेला आहे. बर्याच चित्रपटामालिकांमधे असतो.

तेजस आठवले's picture

28 Aug 2018 - 9:35 pm | तेजस आठवले

काही फोटो असतील कोणाकडे तर डकवता येतील का? जसं की बळद, खोलीतली विहीर, भुयारी मार्ग इ इ

किरण नाथ's picture

29 Aug 2018 - 9:01 pm | किरण नाथ

2
1
3
4

सर्व फोटो आंतरजालावरुन घेतले आहेत.

II श्रीमंत पेशवे II's picture

29 Aug 2018 - 10:09 am | II श्रीमंत पेशवे II

कोकणात अशा प्रकारचे वाडे पहायला मिळतात.

माझ्या माहितीत एक वाडा मालगुंड , जिल्हा रत्नागिरी येथे आहे.
हा पूर्वी श्री लिमये यांचे घर होते ,शिक्षणा साठी आणि मग पुढे नोकरीनिमित्त घरातील मुलं तालुक्याबाहेर पडली त्यामुळे नंतर हा वाडा बंदच होता.
काही वर्षांपूर्वी श्री रमानंद लिमये यांनी पुन्हा गावी जाऊन त्याची योग्य डागडुजी करून त्याला जतन केले आणि हा वाडा एक ऐतिहासिक वारसा सांगणारा असल्यामुळे त्यांनी तो सर्वाना दाखवावा या हेतूने खुला केला
मालगुंड येथे कवी केशवसुत यांच्या स्मारकाजवळ हा वाडा आहे.

त्याचे नाव लिमये चौसोपी वाडा असेच आहे
सम्पर्का साठी . श्री लिमये यांचा दूरध्वनी क्रमांक डेट आहे - श्री रमानंद लिमये - ९८६०७८०९७३
फोन - ०२३५७-२३५१९२ , +९१ ८२७५९००९८१

ऐतिहासिक वातावरण आणि घरंदाज पाहुणचार अवश्य अनुभवा

सव्यसाचीजी पुर्वी कमी पावसाच्या प्रदेशात धाब्याची घरं बांधत. मातीच्या किंवा दगडी जाड भिंती.लाकडी खांबावर आडवी सागाची खांडं. मध्ये वासे असायचे. त्याच्यावर किरळी ही काटेरी वनस्पती अंथरुण त्यावर पांढरीची खारी माती ओली करुन छत तयार करायचे. श्रीमंत लोक चुना व वाळू घाण्यात मळून त्याचा कोबा करत. आजही गावोगाव पडके वाडे खिंडाररूपाने उभे आहेत.करंट्या लोकांना हा वारसा वाचवता येत नाही.
पर्यावरणपुरक अशी ही वास्तू जाऊन सिमेंटकाँक्रीटची जंगलं यांनी माणसाला माणसापासून दूर नेले आहे.

संदिप भाऊ नाशिक चा सरकारवाडा वाचवण्यासाठी नाशिककरांनी काहीच केले नाही. अजूनही काही वाडे अशोकस्तंभ ते रविवार कारंजाच्या उत्तर बाजूस नदीकाठी असे वाडे आहेत. चांदवडला रंगमहाल हा होळकरांचा राजवाडा जवळ पडेल तुम्हाला.

पेशव्यांचे एक सरदार बहुतेक खासगीवाले यांचाही वाडा असावा. शंभर जिलब्या खाऊन जाड चांदीचं ताट हाताने चोळामोळा करत. एकदा सतरंजी अंथरण्यासाठी वाड्याचा खांबच त्यांनी वर उचलला होता.

तनमयी खुप छान माहिती.