'कॉटन ग्रीन' स्टेशन..हे नाव या स्थानकाला कसं प्राप्त झालं ?

ग्रेटगणेश's picture
ग्रेटगणेश in जनातलं, मनातलं
28 Apr 2015 - 12:43 pm

'शब्दनाद'...मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे जन्म, उगम आणि अर्थांचा शोध घेणारे सदर..
'कॉटन ग्रीन' स्टेशन..
हार्बर रेल्वेमार्गावरील एक स्टेशन.
'कॉटन ग्रीन' स्टेशनच्या नांवातच काॅटन असल्याने त्याचा कापसाशी संबंध असावा हे तर उघडच आहे मात्र त्यातील 'ग्रीन'चा अर्थ काय हे कळत नव्हते, त्याचा शोध धेतला असता मस्त मनोरंजक माहिती हाती लागली..
हे स्टेशन मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी व भायखळा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या पूर्वेस हार्बर लाईनवर येतं. इंग्लंडमधील कापड गिरण्यांना लागणा-या आपल्या देशातील कापसाची निर्यात हार्बर लाईनच्या पूर्वेस असणा-या बंदरातून व्हायची. या आयात-निर्यातीचा लेखा-जोखा ठेवण्यासाठी तीथं एक मोठ्ठं केंद्र उभारलेलं होत त्याला 'काॅटन एक्सचेंज' म्हणत.
आपल्या सर्वांना माहित असलेल्या 'स्टाॅक एक्सचेंज'च्या धर्तीवरच याचं काम चालायचं. या काॅटन एक्सचेंजची पाश्चात्य वास्तुकलेचा नमूना असलेली एक भव्य इमारत कॉटन ग्रीन स्थानकाच्या पूर्वेस उभारलेली होती व तीस बाहेरुन हलक्या ग्रीन रंगात रंगवलेली होती. 'ग्रीन' रंगातलं ' कॉटन ' एक्सचेंज म्हणून या स्टेशनाला ' कॉटन ग्रीन' असं मांव मिळालं असं आपल्याला वाटेल, परंतू ते तसं नाहीय.
तर, या काॅटन एक्सचेंजच्या जोडीनं त्याच्या शेजारी धान्य साठवण्याची प्रचंड मोठी गोडाऊन्स होती व आजही आहेत. धान्याला इंग्रजीत 'ग्रेन' असं म्हणतात आणि या 'ग्रेन'चाच अपभ्रंश 'ग्रीन' असा होऊन या रेल्वे स्थानकाला काॅटन ग्री(ग्रे)न असं नांव प्राप्त झालं. ' कॉटन ' अॅण्ड 'ग्रेन'च्या व्यापाराचे वा साठवणूकीचे ठिकाण ते ' कॉटन -ग्रेन' म्हणजेच आपले आजचे ' कॉटन ग्रीन' स्टेशन..!!
कॉटन एक्सचेंजची ब्रिटीश कालीन इमारत आजुबाजूला धान्याची अनेक गोडाऊन्स कवेत घेऊन आजही तीथंच उभी आहे, मात्र तीचा 'ग्रीन' रंग जाऊन तीथं 'सरकारी' पिवळसर व ब्राऊन रंग चढला आहे.
जाता जाता -
मध्य रेल्वेच्या पश्चिमेस असलेली पश्चिम रेल्वेची एलफिन्सटन रोड ते महालक्ष्मी ही स्टेशनं आणि हार्बर लाईन वरील वडाळा ते कॉटन ग्रीन या स्थानकांचा मिळून जो एक आयताकार चौकोन तयार होतो तो पट्टा 'गिरणगांव' या नांवाने ओळखला जातो. मुंबईच्या बहुतांश कापड गिरण्या या परिसरात होत्या त्याचं सर्वात मोठ्ठ कारण म्हणजे हे कॉटन एक्सचेंज होय! इथून होणा-या कापसाच्या घाऊक देवाण-घेवाणीमुळे बहुतांश मिल्स या परिसरात वसस्या होत्या.
-गणेश साळुंखे
93218 11091

भूगोलप्रकटन

प्रतिक्रिया

जेपी's picture

28 Apr 2015 - 12:48 pm | जेपी

मोबल्यावरन टाकलय का ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Apr 2015 - 1:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान महिती रे गणेशा.करी रोड्,भायखळा,चिंचपोकळी ह्या स्थानकांचा ईतिहास जाणण्यास उत्सुक.

काय माई,नानाला इतिहास ठौक नाय का??
नाय मंजे भले ग्यानी हायत अस आयकुन होतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 6:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाना कसले डोंबल्याचे ग्यानी...माई खंबीर आहेत म्हणुन चाल्लयं सगळं सुरळी'त.

सुनील's picture

28 Apr 2015 - 1:30 pm | सुनील

माहिती छान.

मुंबईच्या बहुतांश कापड गिरण्या या परिसरात होत्या त्याचं सर्वात मोठ्ठ कारण म्हणजे हे कॉटन एक्सचेंज होय! इथून होणा-या कापसाच्या घाऊक देवाण-घेवाणीमुळे बहुतांश मिल्स या परिसरात वसस्या होत्या

ह्याबाबत शंका आहे.

एक्स्चेंज जवळ म्हणून गिरण्या तिथे उभारल्या गेल्या की गिरण्यांजवळ एक्स्चेंज? मला तरी दुसरी शक्यता अधिक वाटते.

बहुतांश कापड गिरण्या गिरणगावात होत्या हे खरेच. पण काही 'चुकार' गिरण्या इतरत्रही होत्या. पैकी एक-दोन कुर्ल्याला आणि एक तर चक्क ठाण्याला!

सौन्दर्य's picture

28 Apr 2015 - 7:27 pm | सौन्दर्य

एलफिस्टन रोड स्टेशनच्या पश्चिमेला बहुतेक ज्युपिटर मिल होती. ही त्या आयताच्या बाहेर होती. (अजून आहे की नाही ते ठाऊक नाही) पण एकूण सर्वच माहिती फार छान.

आदूबाळ's picture

28 Apr 2015 - 2:44 pm | आदूबाळ

जबरी माहिती.

कॉटन ग्रीनच्या पूर्वेला बंदर होतं? माझ्या माहितीप्रमाणे तो भाग उथळ आहे आणि तिथे मिटागरं वगैरे आहेत. बंदर आहे ते समोरच्या घारापुरी बाजूच्या किनार्‍यावर (न्हावा-शेवा, जेएनपीटी वगैरे).

अन्या दातार's picture

28 Apr 2015 - 4:51 pm | अन्या दातार

कॉटन ग्रीनच्या पूर्वेला बंदर होतं?

असावं. आजही कॉटन ग्रीनच्या पूर्वेचा बराचसा भाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा आहे. अलिकडे दारुखाना व कॉटन ग्रीनपासून पूर्वेस आज एचपीसीएल व बीपीसीएलच्या रिफायनरीज, आरसीएफचा खत कारखाना आहे. या ठिकाणी पूर्वी बंदरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेला बाजार दारुखान्यात तरी शिपब्रेकिंगचा व्यवसाय असल्याने बंदर असलेच पाहिजे.

चित्रगुप्त's picture

28 Apr 2015 - 3:06 pm | चित्रगुप्त

छान माहिती. अशीच जुन्या काळातील माहिती देत रहावी. सोबत फोटो पण असावेत.

मुंबईतील कॉटन मार्केटः
.

.

.

मुंबईचे जुने फोटो इथे बघा:
http://oldphotosbombay.blogspot.fr/2014/04/history-of-horniman-circlebom...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या प्रतिसादातील फोटो बघायचे म्हटले की दोनदा मागे वळुन पाहावं लागतं. लेकरं नसतील ना मागे आपल्या उभे म्हणुन. सालं प्रतिसादात/लेखात तुमच्या काही फोटोची प्रतिमा अशी घट्ट मनात रुतुन बसली आहे की ती जाता जात नाही. ;) ( ह.घ्या)

खुप दिवस झालेत तुम्ही 'काही' फोटो काही ऐतिहासिक संदर्भ टाकले नाहीत, जरा येऊ द्या. ;)

-दिलीप बिरुटे

सौन्दर्य's picture

28 Apr 2015 - 7:29 pm | सौन्दर्य

गणेश जी, मुंबईतल्या इतर ठिकाणांची अशीच माहिती येऊ द्या.

धर्मराजमुटके's picture

28 Apr 2015 - 8:19 pm | धर्मराजमुटके

छान लेख ! आता सँडहर्स्ट रोड चे संडास रोड नामकरण कसे झाले यावरही प्रकाश टाका.

पैसा's picture

28 Apr 2015 - 8:26 pm | पैसा

मुंबैत पण आहे का! रत्नागिरीत दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मिलिटरीने एक रस्ता एका रात्रीत तयार केला म्हणे. तो लोकांच्या परसातून गेला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे घराबाहेर जरा लांब असलेले संडास होते. त्यावरून त्या रस्त्याला संडास रोड असे नाव रत्नांग्रीकरांनी दिले. यथावकाश त्याचे नामकरण "डॉ.बा.ना.सावंत रोड" असे झाले तरी अस्सल रत्नांग्रीकर सावंत रोड कुठे म्हणून विचारल्यास नक्कीच गोंधळून जाईल!

पिवळा डांबिस's picture

28 Apr 2015 - 11:22 pm | पिवळा डांबिस

त्यावरून त्या रस्त्याला संडास रोड असे नाव रत्नांग्रीकरांनी दिले. यथावकाश त्याचे नामकरण "डॉ.बा.ना.सावंत रोड" असे झाले

त्या बिचार्‍या डॉ. सावंतांनी रत्नांग्रीकरांचा असा काय मोठा अपराध केला होता?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2015 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या बिचार्‍या डॉ. सावंतांनी रत्नांग्रीकरांचा असा काय मोठा अपराध केला होता?

हाच विचार मनात आला ! :)

पैसा's picture

28 Apr 2015 - 11:38 pm | पैसा

मधल्या आळीतला हाडीमासी भरलेला खवट्टपणा हो! रत्नांग्रीस असाच एक चौक आहे. तिथे स्वा. सावरकरांचा पुतळा असल्याने त्याचे अधिकृत नाव स्वातंत्र्यलक्ष्मी चौक. पण ते नाव फक्त बशींच्या कपाळपट्टीवर लिहिलेले. त्याचे प्रचलित नाव गाडीतळ. कारण जुन्या जमान्यात तिथे बैलगाड्या मुक्कामाला असायच्या. माझ्या आजोबांच्या मते त्याचे नाव वृषभविष्ठा त्रिकोण! रत्नांग्रीत बैलगाड्या बंद होऊन कित्येक वर्षे झाली तरी अजून तो आमच्यासाठी गाडीतळच!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Apr 2015 - 12:05 am | माईसाहेब कुरसूंदीकर

'सड्यावर','खाली' हे खास शब्दही तिकडचेच हो.

नन्दादीप's picture

29 Apr 2015 - 11:23 am | नन्दादीप

+१.

रुपी's picture

29 Apr 2015 - 1:20 am | रुपी

चित्रगुप्त यांच्या प्रतिसादातील फोटोही मस्तच!

आनन्दिता's picture

29 Apr 2015 - 1:36 am | आनन्दिता

रोचक!!

किसन शिंदे's picture

29 Apr 2015 - 7:09 am | किसन शिंदे

रोचक माहीती!

श्रीरंग_जोशी's picture

29 Apr 2015 - 7:22 am | श्रीरंग_जोशी

रोचक आहे माहिती.

चित्रगुप्त यांच्या प्रतिसादातील फोटोंनी मोलाची भर घातली आहे.

१९२०च्या दशकातली मुंबईबद्दलची ही चित्रफीत जालावर प्रसिद्ध आहे.

हसरी's picture

29 Apr 2015 - 10:09 am | हसरी

छान माहिती.
ऑफिसमुळे मध्यंतरी काही वर्ष नियमित कॉटन ग्रीन स्टेशनला चढा-उतरावं लागत असे. हे स्टेशन रस्त्यापासून वरच्या पातळीवर आहे. रोज संध्याकाळी प्लॅटफॉर्मवर जाताना जिन्यावर खुलेआम गर्दुल्ल्यांची टोळी एकच सीरींज वापरून नशाधुंद होताना सर्रास दिसत असे. ऑफिसच्या गाडीत फक्त मुलीच असतील, पुरुष कोणी नसतील तर गाडीचा ड्रायव्हर अथवा सिक्य्रीटी गार्ड आम्हाला प्लॅटफॉर्मपर्यंत सोडायला येत असे. कॉटनग्रीनचा परीसरही एकूणात रखरखीत, बीपीटी रोड असल्याने मालवाहतूक जास्त, हेवीलोड ट्रॅफिक त्यामुळे ऑफिसला जाणं-येणं फारच कंटाळवाणी होतं. पावसाळ्यात तर अगदी हाल होत असत. सुदैवाने लवकरच दुसरीकडे ट्रान्स्फर झाली. या लेखाच्या निमित्ताने ते सगळे दिवस पुन्हा आठवले.

माहिती आणि प्रतिसाद दोन्ही आवडले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report

कविता१९७८'s picture

29 Apr 2015 - 11:35 am | कविता१९७८

मस्त माहीती

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2015 - 11:43 am | सानिकास्वप्निल

छान माहिती दिलीत आणि चित्रगुप्तांनी दिलेले फोटो ही मस्तं.

व्हिटीला जायला हार्बर लाईन वापरत असल्याने काॅटन ग्रिन नेहमीच्या परिचयाचे ठिकाण!त्याच्या नावाचा इतिहास या लेखामुळे कळला.धन्यवाद.

कंजूस's picture

29 Apr 2015 - 7:04 pm | कंजूस

मस्त.

एक एकटा एकटाच's picture

29 Apr 2015 - 10:10 pm | एक एकटा एकटाच

मस्त लेख

Vimodak's picture

30 Apr 2015 - 1:31 am | Vimodak

जुनी मुम्बई दाखवून छान मजा दिली तुम्ही..आभार.

अभिरुप's picture

30 Apr 2015 - 12:37 pm | अभिरुप

मस्त माहितीपूर्ण लेख.....हा परिसर खूप जवळून बघत आलो आहे लहानपणापासून. या कॉटन एक्स्चेंज जवळ आता भारतीय वायूसेनेचे ठाणे आहे तसेच त्याच्या बाजूला एक मंदिर सुद्धा आहे रामाचे.गर्दुल्ल्यांचा त्रास असतोच पण त्याचबरोबर प्रेमी युगुलेही हिंडत असतात.
रच्याकने अजून माहिती येऊ द्यात.

दुर्मिळ छायाचित्रांबद्दल चित्रगुप्त यांचे तर व्हिडिओबद्दल श्रीरंग जोशी यांचे मनःपूर्वक आभार