"सेफ, अ‍ॅण्ड फोर" - रिची बेनॉ

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
11 Apr 2015 - 7:48 am

७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्‍या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्‍याच्या डोक्यात येणार्‍या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"! तेथे कोणी कॅच घेतला का, आणि नसेल तर फोर गेली का, बास!

सध्याच्या फिल्डर पेक्षाही जास्त बॉल बडबडीत चेस करणार्‍या, लांबच लांब वाक्ये बोलून तरीही फारशी माहिती न देणार्‍या ("Raina is going after it, will it cross the boundary, it probably will... no he stops it inches before. will they run 3?...") कॉमेण्टेटर्सच्या तुलनेत या जुन्या मॅचेस मधल्या कॉमेण्टरीचे वेगळेपण लगेच जाणवते.

खरे सांगायचे तर एक जबरी कॉमेण्टेटर यापेक्षा बेनॉबद्दल खूप सखोल माहिती नाही. तो खेळाडू म्हणूनही ग्रेट होता, चांगला स्पिनर आणि कप्तान होता, भारतातही चांगला खेळून गेला आहे हे वरवरचे माहीत आहे. पण एक कॉमेण्टेटर म्हणून त्याचा खेळाचा, खेळाडूंचा अभ्यास जबरदस्त होता. त्यापेक्षाही खेळातील विविध स्टेजेस मधे आपल्याला समोर जे पटकन समजत नाही ते सहज 'पिक' करून ते सांगण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा त्याचा वेगळेपणा दाखवून द्यायची.

चॅनेल ९, इएसपीन, स्टार स्पोर्ट्स वगैरे वर रिची बेनॉ, बिल लॉरी, इयान चॅपेल, बॉयकॉट, गावसकर, वगैरे लोक असले की कॉमेण्टरीला एक वेगळाच क्लास आहे असे वाटते. त्यात सहसा रिची बेनॉ बरोबर एक दोन भरपूर बोलणारे कॉमेण्टेटर असत. पण त्याचबरोबर समोर जी गेम चालू आहे ती जज करण्याचे, व त्याबद्दल कमीत कमी शब्दांत बोलण्याचे कौशल्य, हे रिची बेनॉच्या कॉमेण्टरीला वेगळेच वजन देउन जायचे. त्यामुळे तो बोलू लागला की लोक लक्ष देउन ऐकत.

त्याचे असंख्य कोट्स माझे फेवरिट आहेत. जे आत्ता लक्षात आहेत ते खाली देत आहे. जसे आणखी आठवतील, सापडतील तसे देइन. तुम्हीही द्या.

"That’s it. Well I think it's only logical. If you need to get 24 runs to avoid follow-on, why wouldn’t you get it in 4 hits"
१९९० च्या लॉर्ड्स कसोटीत भारताच्या ९ विकेट्स गेल्या होत्या व कपिल स्ट्राईक वर होता. २४ रन्स हवे होते. एडी हेमिंग्ज च्या त्या ओव्हर मधे त्याने ४ सिक्सेस मारून फॉलो ऑन टाळला (आणि पुढच्या ओव्हर मधे हिरवानी आउट झाला). तेव्हा बेनॉ ची ही कॉमेण्ट.

"Oh no! Now that could be the match!"
पुन्हा कपिल. १९८५ च्या वर्ल्ड सिरीज कप मधे न्यूझीलंड विरूद्ध सेमी फायनल मधे आधीचे लोक वेगात खेळू न शकल्याने "आस्किंग रेट" बराच वाढला होता. तेव्हा कपिल खेळायला आला. त्यानंतर साधारण १८ वर असताना त्याचा कॅच किवीज नी सोडला. तेव्हा ही भविष्यवाणी. नंतर कपिल ने ३० बॉल्स मधे ५० मारून मॅच जिंकून दिली.

“Is it possible that Imran Khan might just be getting Greg Chappell’s measure?”
ही क्लिप माझ्या दुसर्‍या ("बाउन्सर्स आणि यॉर्कर्स") लेखातही आहे. इम्रान ग्रेग चॅपेल ला ज्या तर्‍हेने सेट अप करत होता ते बहुधा रिची बेनॉ ने ओळखले. नंतर पुढच्याच बॉल ला ग्रेग चॅपेल ची दांडी उडाली.

याखेरीज अनेक अॅशेस मॅचेस, ऑस्ट्रेलियातील इतर टेस्ट्स, भारताच्याही अनेक मॅचेस मधे तो होता. १९९८ च्या शारजाच्या (डेझर्ट स्टॉर्म) स्पर्धेतही त्याने कॉमेण्टरी केलेली आहे. आता त्यातील क्लिप्स पुन्हा बघायला हव्यात.

तुम्हीही द्या माहीत असतील तर अजून!

क्रीडाप्रतिक्रियालेखबातमी

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

11 Apr 2015 - 10:45 am | वेल्लाभट

फ्रॅाम द फार एन्ड, अँड सुपर्ब !

पिवळा डांबिस's picture

12 Apr 2015 - 10:27 am | पिवळा डांबिस

बस्स, तुमच्याच लेखाची वाट बघत होतो!
काल इथे रेडियोवर रिचि बेनॉच्या मृत्यूची बातमी सांगितली, एक शॉर्ट सेगमेंटही ऐकला....
अमेरिकेत, जिथे ९०% लोकांना क्रिकेट काय असतं हे माहिती नाही आणि जाणून घ्यायची इच्छाही नाही तिथे रिचि बेनॉवर सेगमेंट होणे हे विरळा, कदाचित हीच त्याच्या मोठेपणाला मिळालेली पावती....
आमच्या काळी भारतात टीव्ही म्हणजे फक्त दूरदर्शन होतं..
अहाहा, काय त्यांचं ते दिव्य कव्हरेज आणि काय ते एकेक कॉमेंटेटर्स!
त्यापेक्षा सक्तमजुरीची शिक्षा भोगायला बरी!!!!
पण जेंव्हा आपली टीम ऑस्ट्रेलियाला जायची तेंव्हा त्याचं ते उत्कृष्ट कव्हरेज पहाणं ही एक मेजवानी असायची.
आणि कानाशी रिची बॅनॉची कॉमेंटरी...
मिठाईला जणू केसराचा सुगंध!
वा, वा!
...
...
मे हिज सोल रेस्ट इन पीस!!!

माझीही शॅम्पेन's picture

12 Apr 2015 - 11:49 am | माझीही शॅम्पेन

एक वडिलांनी सांगितलेला किस्सा

बाबू टांगेवाला नावाचा एक पुणेकर आतरराष्ट्रीय सामन्यात कोणीही शतक काढल की पोलिसांची आणि पहारेदरांची नजर चुकवून त्या खेळाडूला तो हमखास फुलांचा हार घालायचा. बहुधा त्याने रिचीला सुध्धा असा हार घातला होता
पुढे पानशेत च धरण फुटलं आणि बाबू टांगेवाला ह्याच खूप नुकसान झाल , ही बातमी जेव्हा रिची पर्यंत पोहोचली तेंव्हा पुढच्या दौऱ्यात त्याने बाबुला भेट देवून त्याला मदत केली होती.

साधाराण खूप आक्रमक असलेल्या अनेक खेळाडू मध्ये रिची हा नक्कीच एक राजहंस होता , रिची बेनोयला आपला सलाम __/।\__

अस्मी's picture

13 Apr 2015 - 9:28 am | अस्मी

वा...अतिशय सुंदर लेख.

किसन शिंदे's picture

13 Apr 2015 - 1:56 pm | किसन शिंदे

रिची बेनाॅच्या आठवणी जागा करणारा सुंदर लेख!