वरुणदेवाचे पहिले दर्शन.....

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 11:31 pm

परवा यावर्षी पहिल्यांदा वरुण देवाने दर्शन दिले. त्या आधी हि तो आला होता. पण का कुणास ठाऊक एखादा पोस्टमन जसा हळूच दरवाज्यातून पत्र टाकून दुसऱ्या घराकडे वळतो , तसाच तो आला आणि आपल्या जलधारांची छोटीशी पिशवी रिती करून गेला. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जाणवल कि काहीतरी वेगळ वाटतंय. जीवाची होणारी तगमग , अंगाची होणारी लाही लाही अचानक कमी झाली होती .हवेत एक प्रकारची प्रसन्नता आली होती. बाहेर येऊन बघतो तर सर्व अंगणभर पाणी !!!! म्हणतल हे केव्हा झालं ???? काही न कळवता ,काही संकेत न देता पाहुणा आला अन गेला ही !!!! असं का केल असावं त्याने ? त्याला मला भेटायची इच्छा नव्हती?
पण नंतर विचार केला कि हा पोस्टमन नाही. पाहुण्याचं आलेलं पत्र आहे. पाहुणे लवकरच तीन चार महिन्यासाठी राहायला येत आहेत असंच लिहील असाव त्या पत्रात.असा मानून मी स्वतःचेच समाधान करून घेतले. हा माणसाचा जन्मजात स्वभावच आहे. प्रत्तेक गोष्टीच आपल्याला पाहिजेतसा अर्थ लावून घेण्यात माणसाचा हातखंडाच आहे. मग मी ही माणूसच आहे , मी कसा त्याला अपवाद असेन???? अस म्हणून मी माझ्या मनाची समजूत काढली. म्हंटल बघीन मी अजून काही काळ पाहुण्याची वाट.
माझी अपेक्षा होती कि माझी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तसा झाल हि. एकच दिवस नंतर संध्याकाळी अचानक गार वारा सुटला , झाडे वाऱ्याच्या तालावर डोलू लागली , अत्तर लाऊन आलेल्या मातीने फेर धरला आणि हळूच सुरु झालेला टप टप आवाज त्यांना साथ देऊ लागला. टपोरे पाण्याचे थेंब तहानेने व्याकुळलेल्या धरणीला तृप्त करू लागले. मी तडक वर्षानंतर परतलेल्या पाहुण्याला बिलगायला अंगणाकडे धावलो. अंगणात जाऊन पहिले तर तिथे माझ्या आणि पाहुण्याशिवाय कोणीच नव्हते. मी एकटाच त्याला कडकडून मिठी मारावयास धावलो होतो. मला वाटले बाकी सगळे बाहेर असतील म्हणून मी बाहेर गेलो आणि तिथे दिसलेले दृश्य बघून मी थक्कच झालो. बाहेर जाऊन पाहतो तो काही जण दुकानांचा आसरा घेऊन पावसाशी पकड पकडी खेळत होते तर काही जण छत्र्यांची मदत घेऊन स्वताला त्याच्यापासून रोखू पाहत होते. काही जण घराच्या खिडकीत उभे राहून त्याच्याशी लपंडाव खेळत होते तर काही जण कार मध्ये बसून पावसाची मजा लुटण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. त्या आकाशातून बरसणाऱ्या अमृतधारा स्वताच्या अंगावर झेलून घ्यायला कोणीच तयार नव्हते. माझ्या बरोबर होती ती फक्त अशी लहान मुले जी आपल्या घरच्यांचे न ऐकता पावसात भिजावयास आली होती आणि ज्यांना माहित होते कि घरी आलेल्या आपल्या अतिथींचे स्वागत कसे करावे .
हे दृशा पाहून मला अतिशय आश्चर्य वाटले आणि फार दुःख हि झाले. मनात विचार आला कसे काय हि माणसे एवढ्या स्वार्थीपणे वागू शकतात ???? ज्याच्या आगमनामुळे सगळी श्रुष्टी आनंदाने डोलू लागते त्याच्यासाठी आपण एवढेही नाही करु शकत???? ज्याच्यामुळे आपल्याला हे अमूल्य जीवन मिळते त्याचे आज फक्त एवढेच महत्व राहिले आहे ???? आज लोकांना पाणी हवं आहे पण पाऊस नको असे तर झाले नाहीये ना ???? हे सगळ बघून मनातल्या मनात फार राग आला. वाटल ज्यांच्यासाठी पाऊस पडतो त्यांनाच जर त्याचं काही वाटत नसेल तर त्याने तरी का बरसावं ???? त्याने बरसावं फक्त शेतकऱ्याच्या घरी. त्याने बरसावं वाळवंटातील लोकांसाठी , पावसाची सतत वाट बघणाऱ्या चातकासाठी. ते म्हणतात ना "ज्या लोकांना एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात मिळते त्या लोकांना त्या गोष्टींचे फारसे महत्व राहत नाही " त्या प्रमाणे आपल्यालाही पावसाचे महत्व राहिलेले नाही. मी काही काळ विचारात पडलो पण ते विचार फार काळ माझ्या डोक्यात राहू शकले नाही. त्या वरुणराजाचीच जादू होती ही. काही वेळातच पानावर जमा झालेली धूळ जशी पावसाचे पाणी पडताच त्या बरोबर वाहून जाते त्याच प्रमाणे माझे हे विचारही पावसाच्या धारेबरोबर वाहून गेले.
पण विचार हे देखील एखाद्या ‘फॉर लूप’ प्रमाणे असतात. जो पर्यंत त्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत काही वेळाने पुन्हा पुन्हा येतच राहतात. पावसामुळे गेलेले हे विचार पाऊस थांबल्यावर पुन्हा डोक काढू लागले.
तुम्हाला काय वाटत पाऊस का पडत असावा ???? आपल्याला पाणी देण्यासाठी ???? नाही पाऊस पडतो कारण आपल्यालाही जसा त्याचा स्पर्श हवा असतो तसाच तो त्याला ही हवा असतो. आपला स्पर्श मिळवण्यासाठी आभाळातून पाऊस खाली येतो आणि स्पर्श झाल्यावर पुन्हा त्याच्या घरी निघून जातो , परंतु आपल्याला त्याच्या स्पर्शाची आणि त्याला आपल्या स्पर्शाची आठवण राहावी यासाठी एक छायाचित्र काढून ठेवतो , जेणे करून आपल्याला त्याची आठवण येत राहील व पुढील वर्षी जेव्हा तो येईल तेव्हा आपण पुन्हा त्याचे तसेच स्वागत करू जसे मागील वर्षी केले होते. ते छायाचित्र म्हणजे पाणी , जल , जीवन. परंतु आता त्याला आपला स्पर्श मिळेनासा झाला आहे. मग ज्या कारणासाठी तो वरुन खाली येतो ते जर सार्थ होत नसेल तर तो तरी कशाला येईल हो. जसे पाहुण्याचे स्वागत यजमानांनी चांगल्या मनाने त्यास आदर देऊन केले नाही तर पाहुणा परत येण्याबद्दल विचार करतो त्याच प्रमाणे आपल्या ह्या पाहुण्याचे स्वागत जर आपण मनापासून केले नाही तर तोही येताना विचार करून येईल.
आपल्याला आजकाल आपले वय वाढले आहे याचा गर्व वाटू लागला आहे. मजा म्हणजे वयानुसार आपले मन हि लवकर म्हातारे होऊ लागले आहे. आपल्याला पावसात भिजणे वयास न शोभणारे वाटू लागले आहे. वयाप्रमाणेच आपल्या विचारांमध्ये हि फरक पडू लागला आहे. ज्या चिखलात आपण मनसोक्त फुटबॉल खेळलो, चोर पोलीस खेळून अनेकदा मुद्दामच पकडायच्या नावाखाली चिखलात लोळलो, तो चिखल आज आपल्याला घाण वाटू लागला आहे. त्यात खेळणे तर सोडा त्याचा थोडासा हि स्पर्श होऊ नये या साठी आपण पावसात बाहेर पडणे टाळू लागलो आहे. काही लोकांना तर चिखल होतो म्हणून पावसालाच नकोसा झाला आहे. पावसाळ्याबद्दल ह्या लोकांकडून ‘शी.... का आला हा पावसाळा’ असे उद्गार ऐकले कि मला ह्या लोकांची दया आणि कीव दोन्ही येते. अशा लोकांना नळाचे पाणी १० मिनिटे गेलेले आवडत नाही पण तरी ह्यांना पाऊस नको. अशा लोकांना आपण काय म्हणणार???
माझ्यामते आपल्याला मिळालेले पावसासारखे दुसरे कुठले वरदान नाही. पाण्यासाठी तर पावसाचं महत्त्व आहेच पण पाऊस उन्हाळ्यानंतरच का पडतो असा कधी विचार केलाय. उन्हाळ्यात सुर्यनारायण आपल्यावर फारच संतापलेले असतात. अंगाची लाही होई पर्यंत आजूबाजूचे तापमान वाढतच जाते. माणसाला अशा उकाड्यात जगणे मुश्कील होते. सर्व नद्या नाले आटू लागतात. माणसांप्रमाणे निसर्गातील इतर जीवही असह्य उन्हात तळमळत असतात. त्यांना काही काळासाठी सुखावण्यासाठी पाऊस येतो.
अनेकदा लोक पाऊस म्हंटल कि त्यामुळे येणाऱ्या पूर, रोगराई इत्यादी गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात करतात. त्यांचे म्हणणे ही मानण्यासारखे असते. कधी कधी पाऊसही अगदी उर फोडून बरसतो. एखादा अतिदुखी माणूस ज्याप्रमाणे छाती बडवून बडवून रडतो त्याचप्रमाणे कुठली तरी सल मनात ठेऊन काळे मेघ आपलं दुख अगदे हाहाकार उडेपर्यंत रडतात. पण असे प्रसंग फक्त पावसातच येतात का हो???? धरणी माता अनेकदा चिडून आपल्यावरचा सगळा भार उध्वस्त करून टाकते म्हणून आपण धरणीमातेशी संपर्क तोडतो का???? मोठमोठे हिमनग आपली जागा सोडून अनेकांना आपल्यात सामावून घेतात म्हणून कोणी हिमालयाला वाळीत टाकते का ??? त्याचप्रमाणे जो सर्व जगाला जीवन देतो त्याने काही नुकसान केले म्हणून आपण त्याने केलेले उपकार विसरणार आहोत का ???? आणि असे जर होत असेल तर आपल्यासारखे संकुचित मनाचे आपणच .....

जीवनमानराहणीविचार

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

3 Mar 2015 - 12:38 pm | वेल्लाभट

विचारप्रवर्तक लिखाण !
उतम.
फॉर लूप ची उपमा आवडली. आयटी क्लियरली व्हिजिबल. :)
अत्तर लावून आलेल्या मातीसाठी विशेष टाळ्या.

निनाद जोशी's picture

3 Mar 2015 - 12:55 pm | निनाद जोशी

धन्यवाद.....

दिलिप भोसले's picture

3 Mar 2015 - 1:00 pm | दिलिप भोसले

खूपच छान लिहले आहे मनापासून आवडले. पाणी जीवन आहे.