निथ साँग - निंदानालस्तीस मुक्त आणि शिवराळ एस्कीमोंची एक जुगलबंदी गायन-न्याय परंपरा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
17 Jan 2015 - 2:52 pm

कशावरून कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो म्हणून तर आपण मकर संक्रांतीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतो पण अवघ्या दिड - दोन महिन्यात धूलीवंदन आणि होळी येते आणि मग दिल्या घेतल्या शिव्यांची... मनमोकळी उधळण अधिकृतपणे करता येते. गोडगोड बोला हे कृत्रिम संस्कृतीकरण तर शिव्या देऊन मनमोकळे करणे हे अकृत्रिम आणि नैसर्गीक. हि होळीची शिवराळ परंपरा आपण होळीच्या निमीत्ताने जपतो तशीच एक वेगळी परंपरा एस्कीमो लोक जपतात त्या परंपरेला निथ साँग म्हणतात.

एस्कीमोंच्या निथ साँगचे वेगळेपण ? निथ साँग परंपरेची दखल विधी-अनुवंशशास्त्रात (लिगल अँथ्रॉपॉलॉजी) घेतली जाते कारण 'हत्या' हा एक विषय वगळता इतर सर्व तंट्यांचा तक्रारींची दखल म्हणजे केवळ आणि केवळ निथ साँग म्हणजे ज्याच्या/जिच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला/तिला निथ साँगसाठी तयारी करून आख्ख्या ग्रामसभेसमोर येण्यास सांगणे मग तक्रार असणार्‍या दोन किंवा जेवढ्या असतील तेवढ्या बाजूचे लोक विशेष रचलेल्या गाण्यांमधून एकमेकांची उणी-दुणी, निंदा नालस्ती, अपमान अगदी सर्व प्रकारच्या शिव्यांच्या आंतर्भावासह, कोणत्याही सेंसॉरशीप शिवाय, गावच्या संपूर्ण जनसमुदायापुढे गायन - जुगलबंदीच्या माध्यमातून करतात. जनसमुदाय ज्यांची बाजू पटते त्यांना वा वा करतो ज्यांना सरते शेवटी सर्वाधिक वा वा मिळाली ती बाजू जिंकली. आणि एकमेकांची निथसाँग सभेत झालेली निंदा नालस्ती हिच काय ती शिक्षा. अर्थात एकदा सभा संपली कि एकमेकांशी मिळून मिसळून वागावयाचे असते.

तीळगूळ खाणार्‍यांच्या भावना अधिक दुखावतात आणि निथ साँग गाणारे अधिक मोकळेपणाने जगतात तर मग कोणती गोष्ट अधिक योग्य असा प्रश्न पडतो !

संस्कृतीकवितासमाजमाहिती

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2015 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा लेख वाचून एक जपानी सामाजिक प्रयोग आठवला.

जपानमध्ये वरिष्ठ-कनिष्ठ उतरंडीला केवळ सामाजिक जीवनातच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही काटेकोरपणे पाळले जाते. वरिष्ठ अधिकार्‍याची चूक असली अथवा त्याचे वागणे अपमानास्पद असले तरी त्याचा तेथेच मुकाबला करणे जगात कोठेच सहज-सरळ नसते. जपानमधील वरिष्ठ-कनिष्ठ उतरंडीमध्ये ते अशक्यच आहे. त्यामुळे कामगार मनात साठलेला राग घरी घेऊन जातो आणि कुटुंबावर काढतो असे दिसले होते. यावर उपाय म्हणून एका कंपनीने निर्गमनव्दाराजवळ "मॅनेजर" अशी पाटी लावलेला एक पुतळा आणि त्याच्या शेजारी काही बांबू ठेवले. कामगारांना घरी जाण्याअगोदर या पुतळ्याला बांबूने बडवून मग घरी जायला सांगितले. आणि काही काळानंतर केलेल्या निरिक्षणामध्ये कामगारांच्या घरातल्या हिंसक घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले.

बोका-ए-आझम's picture

17 Jan 2015 - 10:23 pm | बोका-ए-आझम

माहितगार यांचा लेख आणि इस्पिक एक्का काकांचा प्रतिसाद हे दोन्हीही मस्त!जेवढे तुम्ही निसर्गाच्या जवळ राहता तेवढे क्षुद्रतेपासून मुक्त होता.

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:33 pm | पैसा

लेख आणि एक्का यांचा प्रतिसाद आवडला. मला असे पुतळे बर्‍याच जणांचे हवे आहेत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2015 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला असे पुतळे बर्‍याच जणांचे हवे आहेत! मग बनवा पुतळे अंगणात आणि द्या त्यांना सर्व जनतेसमोर बांबूचे फटके. हाकानाका :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jan 2015 - 10:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय मस्त शैलीत एक नेमका प्रश्न !! अंतर्मुख करणारे लेखन! जबरा आवडले!

(सालं आमचं डोस्कंच बाद!! आम्हाला इथं बी 'द पर्ज' आठवला :/ )

पिवळा डांबिस's picture

20 Jan 2015 - 11:22 pm | पिवळा डांबिस

मिसळपाव नसेल त्या एस्किमोंकडे म्हणून बिचार्‍यांना निथ्-साँग करावं लागतं!!!!!
:)

माहितगार's picture

21 Jan 2015 - 8:37 am | माहितगार

=))